Saturday, December 13, 2008

युद्धाय कृत निश्चय



आपल गुप्तचरं खातं इथेच कमी पडतं. मान्य आहे की, दहशतवाद्यांना ओळखणं फार कठीण असतं. परंतु प्रत्येक शहरात, ज्या वस्तीत दहशतवादी मुक्काम करू शकतात, त्या वस्त्यांवर गुप्तचर खात्याची विशेष नजर असावी. गुप्तचर खातं कसं असावं हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आहे. शिवाजी महाराजांच्या मोहिमांच्या यशात बहिर्जी नाईकच्या गुप्तचर खात्याचा मोठा वाटा होता. दुर्दैवाने काही दिवसांपासून आपलं गुप्तचर खातं, खरे दहशतवादी सोडून, साध्वी व लष्करी अधिकाऱ्यांच्या मागे लागलं होतं. यामागे राजकीय हेतू होते हे स्पष्टपणे समोर आलं. गठ्ठा मतांसाठी आपला कसा फायदा होईल, यामागे राजकीय पक्ष व यंत्रणा लागल्याने दहशतवाद्यांविषयी आपलं हेर खातं जरा नरम पडलं व त्याचाच फायदा 26/11 ला दहशतवाद्यांनी घेतला. त्यामुळे या हल्ल्यात जे नुकसान झालं आहे, त्याला पुढाऱ्यांचे राजकीय हेतूदेखील जबाबदार आहेत. नेत्यांनी राजकीय खेळी खेळाव्यात, पण ते जनतेच्या जिवावर नाही.
यावेळी दहशतवाद्यांनी पंचतारांकित हॉटेल्स व तेथील यात्रींना बंधक करण्याचे योजिले. याचसोबत नरिमन हाऊस निवडले, जिथे इस्रायलचे ज्यू राहतात. हॉटेल्समध्ये विदेशी लोक असतात. म्हणजे दहशतवादी हल्ल्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व देण्याची दहशतवाद्यांची योजना होती. दहशतवाद्यांचे इस्रायलशी हाडवैर आहे, हे आपण सर्व जाणतो. म्हणजे हा पूर्ण कट योजनाबद्ध आहे. आपल्या कारवाईला आंतरराष्ट्रीय महत्त्व देण्यासोबत, हॉटेल निवडण्यामागे दहशतवाद्यांचा खूप फायदा आहे. हॉटेल जर पंचतारांकित असेल तर ते खूप मोठं असेल. स्वाभाविकपणे त्यात खूप जास्त खोल्या असतील. त्या खोल्याही मोठ्या असतील. हॉटेल्समधील व्हरांडे लांबच्या लांब असतील व मध्ये मध्ये लपण्यासाठी बऱ्याच खोल्या. हॉटेल असल्यामुळे खाणे, टॉयलेट वगैरे सोय असतेच. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून दहशतवाद्यांनी पंचतारांकित हॉटेल व नरिमन हाऊसची निवड केली. येथे लोकांना बंधक केले. यानंतर जेव्हा महाराष्ट्र पोलिसांना कळले की, ही कारवाई आता भारतीय सेना, नौसेना, वायुसेना योग्य प्रकारे करतील, तेव्हा लष्कराला पाचारण करण्यात आले. ले. कर्नल पुरोहित प्रकरणातून भारतीय लष्कराबद्दल बऱ्याच वाहिन्यांनी अपप्रचार करून तोंडसुख घेतले होते. कारण, एटीएसने प्रसारमाध्यमांना त्याप्रमाणे बातम्या पुरविल्या होत्या. "कठीण समय येता भारतीय लष्कर कामास येते' याविषयी दुमत नाही. कमीत कमी 26/11च्या हल्ल्यानंतर तरी प्रसारमाध्यमांनी भारतीय सैन्यदलांचा मान राखावा.
मी स्वत: एक कमांडो आहे. त्यामुळे ओबेराय, ताज व नरिमन हाऊसवर जी कमांडो कारवाई चालू आहे, त्याची मला पूर्ण कल्पना आली आहे. हा लेख लिहीत असताना कोणत्याही क्षणी कमांडो कारवाई संपेल अशी स्थिती आहे. मला काही फोन आले की, आठ-दहा दहशतवाद्यांना पकडण्याकरिता सेनेच्या कमांडोजना इतका वेळ का लागत आहे? त्याचं असं आहे की, हॉटेलमधील सेनेची कारवाई पद्धतशीर असते. काही सैनिक हॉटेलच्या बाहेर, चारही बाजूने, आऊटर सर्कलमध्ये तैैनात असतात. मग पहिल्या मजल्यावर चढण्याकरता विविध मार्गाने दुसरे सैनिक जातात. हे सैनिक पहिल्या मजल्यावर प्रत्येक खोली तपासतात. या तपासातदेखील दोन सैनिक आत व दोन बाहेर असतात. पहिला मजला झाल्यावर त्या मजल्याचा ताबा घेतला जातो. याप्रमाणे प्रत्येक मजल्यावर कारवाई होते. ही कारवाई चालू असताना कमांडोज विविध मार्गाने भराभर पुढे जातात, जेथे दहशतवाद्यांनी लोकांना ओलीस ठेवले असते. नरिमन हाऊसमध्ये वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने कमांडोजना दोरीवरून इमारतीच्या गच्चीवर उतरविण्यात आले. याला "स्लिदरिंग' म्हणतात. वरती उतरलेले कमांडो वरून खाली कारवाई करतात. दोन्ही बाजूने कारवाई झाल्याने ऑपरेशन लवकर होण्याची शक्यता असते. भारतीय सेनेकरिता ही कारवाई अत्यंत कठीण आहे. कारण यात ज्या लोकांना ओलीस ठेवले आहे त्यांना इजा न पोचणे, हा सैनिकांचा उद्देश असतो. म्हणून फायरिंग करताना व इतर कारवाई करताना खूप संयम बाळगावा लागतो. ऑपरेशन ब्लू स्टारमध्येदेखील स्वर्णमंदिरात सेना जेव्हा आत घुसली, तेव्हा असाच संयम बाळगावा लागला. स्वत:चे जोडे बाहेर ठेवून सेना आत घुसली होती. जर कारवाई लवकर संपवणे हा उद्देश असता तर रणगाडे बोलावून हॉटेलवर फायर केला असता. अर्ध्या तासात इमारत कोसळली असती. परंतु, उशीर झाला तरी हरकत नाही, तेथील ओलीस असलेल्या नागरिकांची जीवहानी टाळण्याचा उद्देश असतो. भारतीय सेना, नौसेना व वायुसेनेने संयम राखून अद्वितीय शौर्याचं उदाहरण देत कारवाई केली. तपासात सारे काही उघड होईलच. सुरवातीच्या कारवाईत हेमंत करकरे, अशोक कामटे व विजय साळसकर या बहादूर पोलिस अधिकाऱ्यांनी आपले बलिदान दिले. पुढील दहशतवाद विरोधी कारवाईत यांचं बलिदान सर्वांना प्रेरणा देईल.
हॉटेलमधील कारवाईत दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या नागरिकांना ठार मारू नये, ही काळजी आपल्या कमांडोजना घ्यावी लागते. म्हणजे दहशतवाद्यांपर्यंत पोचण्याकरिता अत्यंत चुपचाप व सावधगिरीनं जावं लागतं. दहशतवाद्यांवर "सरप्राईज' हल्ला करणे हा उद्देश असतो. समजा दहशतवाद्यांना कळलं की, कमांडोज आता अगदी जवळ आले व आपल्याला मारणार, तर दहशतवादी ओलिसांवर ग्रेनेड फेकून त्यांना ठार करतील. म्हणून कमांडोजने दहशतवाद्यांपर्यंत चुपचाप जाऊन अचानक वार करायचा असतो. कमांडोजना ही पण काळजी घ्यावी लागते की, या ऑपरेशनमधून एकही दहशतवादी निसटता कामा नये. कारण दहशतवाद्यांकरिता निसटणे फार सोपे आहे. दहशतवादी आपले हत्यार टाकून, वेश पालटून ओलीस असलेला नागरिक म्हणून निसटू शकतो. अशा निसटण्याकरिता ते हॉटेलमध्ये बॉम्ब टाकून आग लावतात. लोक सैरावैरा पळू लागले की, त्यासोबत निसटणे सोपे जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाविरुद्ध लाल महाल येथे जी कारवाई केली, त्यात गोंधळ निर्माण केला व महालाची सर्व दारे आतून एकदम उघडली. मग या गोंधळात मोगल आत आले व मराठे बाहेर निसटले. म्हणून आपल्या कमांडोजना अत्यंत सावध राहावे लागते.
26/11 च्या कारवाईतील दहशतवादी पाकिस्तानातून आले आहेत, हे स्पष्ट आहे. आयएसआयच्या पाठिंब्यानेच या कारवाया सुरू आहेत. मी सैन्यात असताना लीडरशिपवर एकदा भाषण देत होतो. मी म्हटले की, सैन्यात "फीअरलेस लीडरशिप'ची आवश्यकता आहे. आज पंतप्रधानांनी स्पष्टपणे म्हटले पाहिजे की, या कारवाईत पाकिस्तानचा हात आहे. विनाकारण "विदेशी हात' म्हणून गोलमाल बोलण्यात अर्थ नाही. पाकिस्तानने भारतावर एक अघोषित युद्ध थोपलं आहे. आता सरकारने ठोस पावले उचलली पाहिजे. "पोटा' ताबडतोब लावला पाहिजे. अफजल गुरूला ताबडतोब फाशी दिली पाहिजे. यामुळे आपल्या देशाच्या स्पष्ट इराद्याचा दहशतवाद्यांना एक संदेश मिळेल. राजकीय नेत्यांनी व सरकारने आता हे जाणलं पाहिजे की, आतापर्यंतच्या दहशतवादी कृत्यांमध्ये जे निष्पाप बळी गेले आहेत त्याचे ते देखील भागीदार आहेत. सरकारने जर कणखर नीती अमलात आणली, तर दहशतवादी कृत्यावर आळा बसेल. गठ्ठामतांकडे लक्ष ठेवून सरकारची धोरणे स्वार्थी व नपुंसक आहेत. आता खूप झालं. राजकीय नेत्यांनी हे गांभीर्य ओळखलं पाहिजे. राजकीय खेळी खेळून जनतेची आपापसात धर्म, जातीपातीच्या नावाखाली भांडणे लावणे बंद केले पाहिजे. जर ते असे करत असतील तर जनतेने त्यांचा हा डाव समजला पाहिजे व निवडणुकीत त्यांना घरचा रस्ता दाखविला पाहिजे. अमेरिकेत 9/11 नंतर कोणतीही दहशतवादी घटना झाली नाही, कारण त्यांची दहशतवादाविरुद्धची भूमिका स्पष्ट आहे. तेथे लाड नाही. आपल्याकडील मिळमिळीत धोरण व गठ्ठामतांकरिता फाजील लाडांमुळे दहशतवाद्यांना कारवाई करणे सोपं जातं. भारतात तळ ठोकणे दहशतवाद्यांकरिता यामुळेच सोपे जाते. कडक कारवाईची सरकारने हिंमत दाखविली पाहिजे. नाही तर आपल्या सुरक्षा दलांच्या सैनिकांच्या बलिदानाला त्यांना उत्तर द्यावे लागेल. सरकारने व जनतेने आता कुंभकर्णी झोपेतून जागे झाले पाहिजे. जात, पात, पंथ विसरून सर्वांनी संघटित व्हावे व म्हटले पाहिजे- "आम्ही हिंदुस्थानी.' जर आपण आता खंबीरपणे लढा दिला नाही व सध्याचंच धोरण चालू ठेवलं तर सर्व जग आपली छी: थू: करेल व पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही. कारण आपण दहशतवाद्यांना त्यांच्या उद्देशांत मदत करीत आहोत. त्यांचं धोरण आहे- देशावर सत्ता मिळवणे व देशाला खिळखिळे करणे. म्हणून भारतमातेच्या सुपुत्रांनो, ""हिंदुस्थान्यांनो, युद्धाय कृत निश्चय:''
व्हीएसएम (निवृत्त)
वासुदेवलीला, 114, पांडे ले-आऊट,
खामला, नागपूर . दूरध्वनी क्रमांक : 0712- 2290109

सुसंस्कारांची मागणी

कुटुंबाची उभारणीच पायाशुद्ध कल्पनांवर व्हावी. "पेरावे तसे उगवते!' हा निसर्गाचा नियमच आहे. स्वार्थ, द्रव्यतृष्णा, संयमशून्यता, भोगासक्ती यांची पेरणी केल्यावर सदाचार, सच्चारित्र्य, कृतज्ञता, त्याग, सेवा इत्यादी सद्‌गुणांचे पीक येणे कसे शक्य आहे? प्रेम न देता प्रेम मिळेल काय? योग्यवेळी हा विचार केला गेला आणि व्यवहाराला तसे वळण मिळाले, तरच घराचे घरपण टिकून राहील, अन्यथा अनेक घरांची दुर्दशा आपण पाहातोच आहोत.ं


संगमनेरचे माझे स्नेही श्री. ओंकारनाथजी मालपाणी आणि सांस्कृतिक क्षेत्रात धडाडीने काम करणारे दुसरे एक मित्र श्री. किशोरजी व्यास यांच्या आग्रहावरून काही वर्षांपूर्वी संगमनेरला गेलो होतो. तिथे मुलांसाठी सात दिवसांचा एक संस्कारवर्ग श्री. किशोरजींनी आयोजित केला होता. दोनदिवस या वर्गात बालगोपालांच्या सान्निध्यात होतो मी. तोही एक आनंदाचाच योग !
संस्कारवर्ग आता ठिकठिकाणी भरू लागले आहेत. संगमनेरला 38 गावांतील 200 मुले आली होती. दहा-बारा तरुण कार्यकर्ते स्वतःला विसरून या वर्गाचे सारे कार्यक्रम पार पाडीत होते, मुलांत मिसळत होते आणि चांगले जीवन कसे असावे, चांगल्या सवयी कोणत्या आणि त्याज्य काय, हे पदोपदी मुलांच्या निदर्शनाला आणून देत होते. सकाळी 5 वा. मुले उठण्यापूर्वी उठत होते, मुलांबरोबर प्रभातफेरीला जात होते, रस्त्याने निःसंकोचपणे मोठ्याने "मनाचे श्र्लोक' म्हणत होते, गाणी गात होते आणि खेळत होते किंवा छोट्या गटात मुलांशी गप्पागोष्टी करीत होते. कसे प्रसन्न वातावरण! सदाचारसंपन्न, ईश्र्वराभिमुख जीवनाचा वस्तुपाठच. "आमच्या येथील शिक्षकांनी आम्हाला जसे प्रेम दिले, तसे शाळेतील शिक्षकांकडून कधी मिळाले नाही!' हे एका 12 वर्षाच्या मुलाने काढलेले उद्‌गार.
पालक वर्गाचा चांगलाच ओढा दिसतो आहे, अशा संस्कार वर्गाकडे. आपल्या महाराष्ट्र प्रांतात शेकडो ठिकाणी कोणी ना कोणी कार्यकर्ते पुढाकार घेऊन मुलांना एकत्र करीत आहेत, आपल्या परंपरेतील सद्‌विचार त्यांच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न जिद्दीने करीत आहेत. मुलांशी जिव्हाळ्याने बोलत आहेत. श्रेष्ठ आदर्श त्यांच्या मनावर बिंबवीत आहेत. शरीर, मन आणि बुद्धी ही जीवनात काही साध्य करून घेण्याची प्रमुख साधने. व्यायामाने शरीर पुष्ट आणि निरोगी बनले पाहिजे. तास, अर्धा तास एका जागी मांडी घालून शांतपणे बसू न शकणारी कितीतरी मुले आपण पाहतो. मोठी माणसेही पाहतो. अगदी पुढारी देखील पाहतो. व्यासपीठावर बसले तरी सारखी चाळवाचाळव करतील. कधी खुशाल पाय पसरतील, तर कधी घडोघडी मांडी बदलतील, कधी लोडाला टेकून कुशी बदलत राहातील. शरीराला वळण नाही, कळ सोसण्याची सवय नाही! मनही अस्थिर. सारखे बाहेर धावणारे. स्थिरता, एकाग्रता नाही. बुद्धी देखील सरळ चालायची नाही. वक्रता, परनिंदा, आत्मप्रौढी यांची तिला चटक. म्हणून बालपणापासूनच शरीर-मन-बुद्धी यांना चांगले वळण लावण्याची गरज.
एक धक्कादायक अनुभव !
ही गरज पालकांना तीव्रपणे जाणवायला लागली आहे. अनेक पालक अगदी प्रांजळपणे ही वस्तुस्थिती मान्य करतात. त्यांच्या मनांत भीतीने, चिंतेने ठाण मांडले आहे. ते पाहतात वातावरणातील दूषितपणा, त्याचा झटकन्‌ होणारा संसर्ग, त्यामुळे निर्माण होणारा संघर्ष, भलत्याच समस्या अन्‌ म्हणतात, ""अहो, आमच्या मुलांवर संस्कार करा!'' पुण्यातील एक सत्पुरुष श्री दादा वासवानी यांनी नुकताच सांगितलेला अनुभव बोधप्रद आहे. एका ठिकाणी ते गेले होते. तिथे कुटुंबातला एक लहान मुलगा (वय वर्षे 4-5 असावे) खांद्याला बंदूक लटकावून उभा होता. बंदूक अर्थातच "लुटूपुटूची', हट्ट करून वडिलांकडून मिळवलेली. मग साधू वासवानी व तो बालक यात थोडी प्रश्नोत्तरे झाली.
वासवानीजींना विचारले, ""अरे, ही बंदूक कशासाठी लटकावली आहेस खांद्याला?''
मुलगा - ""वा, बंदूक घेऊन मी दरोडा घालायला निघालो आहे ना !''
""दरोडा?''
""हो, पैसे लुटणार आहे !''
""बंदूक कशाला हवी?''
""वा, कोणी मधे आल्यास त्याला शूट करीन मी!''
""हे कुठे शिकलास?''
मुलाने टी.व्ही.कडे बोट दाखविले.
कोणाचा कदाचित विश्र्वास बसणार नाही, पण वास्वानीजी म्हणाले, "" त्या मुलाची उत्तरे ऐकली व एक वेदना हृदयात निर्माण झाली. असे विपरित काहीतरी मुले ग्रहण करीत आहेत. प्रौढ माता-पित्यांना माझी विनंती आहे की, आपल्या मुलांची काळजी घ्या ! त्यांच्यावर तुमच्या केवळ कुटुंबाचेच सुख-समाधान अवलंबून नाही, तर आपल्या देशाचे भवितव्यही अवलंबून आहे.''
समस्याच समस्या
कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य पूज्यपाद श्री जयेन्द्रस्वामी यांच्या सत्कारानिमित्त भरलेल्या सभेत वास्वानीजींना हा अनुभव सांगितला आणि तिथेच पालकांना कळविण्यात आले की, पू. स्वामीजी स्वतः रोज दुपारी एक तास मुलांच्या सहवासात घालविणार आहेत. सतत सहा दिवस ते मुलांशी बोलतील, त्यांना गोष्टी सांगतील. काही आवश्यक पाठांतर करवून घेतील. सद्भावनांचे मुलांत बीजारोपण करतील. मला नंतर असे कळले की, सुमारे 200 मुले-मुली आणि अनेक प्रौढ पालक देखील या उपक्रमासाठी रोज जमत असत, सत्संगाचा आनंद लुटीत असत. मुलांच्या मनाला अशा आनंदाची गोडी लावली तर लागू शकते. चांगले काही सांगितले, शिकविले आणि बोलणाराने अकृत्रिम जिव्हाळा दिला व त्याचे स्वतःचे जीवन निर्मळ आणि निःस्वार्थ असले, तर मुलांच्या मनावर अवश्य परिणाम होतो.
आज वांड मुलांची समस्या, कुमार्गाकडे वळलेल्या मुलांची समस्या, व्यसनांना बळी पडणाऱ्या तरुण मुलांची समस्या, शरीराचे व चंचल मनाचे चोचले पुरविण्यामागे लागलेल्या मुलांची समस्या, अशा अनेक समस्यांसंबंधी आपण ऐकतो. मोठ्या माणसांशी किंवा प्रापंचिकांशी बोलावे तर अशा समस्यांचा पाढाच ऐकावा लागतो. मुलींसाठी चांगला निर्व्यसनी मुलगा शोधणे ही समस्याच होऊन बसली आहे. कित्येक सत्प्रवृत्त मुलींना विवाहानंतर पतीचे "गुण' कळतात आणि बिचारीचे जीवन दुःसह होऊन जाते. संसाराची सगळी रम्य स्वप्ने उद्‌ध्वस्त होतात. नाईलाजाने परत पित्याकडे यावे लागते. चांगल्या कुटुंबात देखील असे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. आर्थिक सुबत्ता, मुलाची बड्या पगाराची नोकरी पाहून केवळ मुलगी देण्यातील धोके ध्यानात येऊ लागले आहेत.
पैशाच्या मर्यादा
हा एकप्रकारे भ्रमनिरास होत आहे, यात शंका नाही. एकेकाळी पैशाची गुर्मी असलेले व इतरांस तुच्छ लेखणारे अनेक महाभाग, नव्या पिढीकडून ठोकर बसल्यानंतर अगदी दीन आणि केविलवाणे होऊन गेलेले मी पाहिले आहेत. प्रपंच चांगला करायचा, मुलांची शिक्षणे करायची म्हणजे पैसा लागतोच हे निर्विवाद आहे, पण प्रत्येकवेळी पैशाचे जीवनातील जे स्थान आहे, त्याच्या मर्यादा कटाक्षाने ध्यानात असल्या तर पैसा उपद्रव निर्माण करीत नाही. उलट पैसा हेच सर्वस्व मानले व भरपूर पैसा मिळवून ऐषआरामात राहण्याची आकांक्षाच मुलांच्या मनात फुलविली, तर जीवनाचा सगळा तोल जातो, आज पुष्कळ प्रमाणात हे घडते आहे.
घरात समृद्धी आहे, ही भगवंताची कृपा आहे, असे मानणारे किती? आपल्याजवळ देवदयेने आहे, तर अडी-अडीचणीतील चार बांधवांना सहाय्य करूया, अशी बुद्धी असणारे किती? हाताशी पैसा आहे तर पाच- पन्नास रुपये "पॉकेट मनी' म्हणून मुलांच्या अंगावर फेकून हॉटेलिंग, सिनेमा यावर पैसा उधळण्याची चटक त्यांना लावणारे किती? गलेलट्ट पगारही पुरत नाही म्हणून कर्जबाजारी होत जाणारे किती? असे अनेक प्रश्न दृष्टीपुढे येतात. उत्तर हेच मिळते की, व्यक्तिगत आणि मर्यादित कुटुंबातील लोकांचे उथळ इंद्रियजन्य सुख यांचेच पैसा हे साधन बनते. त्या पैशाचीच आसक्ती जीवनव्यापी होते. यात खरे सुख, खरा आनंद आणि खरे समाधान यांची आपण आहुती देत आहोत, याचे भानच उरत नाही. असा हा "गृहस्थाश्रम' नव्हे, हे यथार्थाने घरही नव्हे. स्वैराचाराचे पोषण करणारे अड्डे असे फार तर त्यांना म्हणता येईल. अशा घरातील मुले चार दिवस संस्कार वर्गात पाठविण्यात आली तरी उपयोग काय होणार?
आत्मनिरीक्षण हवे
म्हणून मुलांचा व समाजाचा प्रश्न उत्तमप्रकारे सुटावयास हवा असेल, तर कुटुंबाची उभारणीच पायाशुद्ध कल्पनांवर व्हावी. "पेरावे तसे उगवते!' हा निसर्गाचा नियमच आहे. स्वार्थ, द्रव्यतृष्णा, संयमशून्यता, भोगासक्ती यांची पेरणी केल्यावर सदाचार, सच्चारित्र्य, कृतज्ञता, त्याग, सेवा इत्यादी सद्‌गुणांचे पीक येणे कसे शक्य आहे? प्रेम न देता प्रेम मिळेल काय? योग्यवेळी हा विचार केला गेला आणि व्यवहाराला तसे वळण मिळाले, तरच घराचे घरपण टिकून राहील, अन्यथा अनेक घरांची दुर्दशा आपण पाहातोच आहोत. मी वर भ्रमनिरास म्हटले ना, ते याच परिस्थितीला उद्देशून. खूप पालक पोळल्यासारखे झाले आहेत. काही तरी चुकले आहे, याची जाण त्यांच्याठायी निर्माण झाली आहे. म्हणून सध्या दिसणारी ही नवी ओढ. रोग जडलेला आहे, तो दुरुस्त करण्याचा आणि आरोग्य संपादण्याचा हा प्रयत्न, पण चार-आठ दिवसांच्या घराबाहेरील प्रयत्नांनी कितीसा कार्यभाग होणार?
मूळ तत्व हे आहे की, मुले शिकतात ती सहवासाने, प्रत्यक्ष उदाहरणाने, डोळ्यांनी पाहून!
याचे नुसते बौद्धिक आकलन नको आहे. आई, वडील, ज्येष्ठ मंडळी या सर्वांनी अतिशय दक्ष राहण्याचा हा विषय आहे. त्यांच्या आत्मनिरीक्षणासाठी कितीतरी प्रश्न ते स्वतःलाच विचारू शकतील. इष्टानिष्ट परिणामांची कल्पना करू शकतील. उदा. आई-वडिलांनी क्षुल्लक कारणास्तव एकमेकांशी भांडावे का? घरांची स्वच्छता, टापटीप याकडे दुर्लक्ष करावे का? पाहुणे येण्यापूर्वी अथवा येऊन गेल्यानंतर त्यांची निंदा करावी का? देव-धर्म यासंबंधी कुत्सितपणे बोलावे का? मुलाने किंवा मुलीने जर सत्कार्यासाठी चार पैसे मागितले तर त्यांचा हिरमोड करावा का? मुलाचे भलतेच लाड करावेत का? सकाळी आई- वडिलांनी उशीरापर्यंत झोपून राहावे का? मुलाच्या अभ्यासाचे दिवस असता त्याला अभ्यास करावयास सांगून आपण टी.व्ही.पुढे बसावे का? "स्टेटस्‌'- सामाजिक दर्जा व पैसा यांच्या अहंकाराने इतरांना तुच्छ लेखावे का? आज घराघरांतून जे घडताना प्रत्यक्ष दिसत आहे, त्याला अनुलक्षूनच आत्मनिरीक्षणासाठी हे काही प्रश्न सुचविले आहेत. ही यादी पुष्कळच लांबविता येईल, पण मुद्दा येवढाच की, अशा घरातून आई, वडील आणि मुले यांचे जे सहजीवन असते ते सुसंस्कारांना पोषक ठरत नाही. त्यात प्रेम, आस्था, आत्मीयता, सौहार्द यांचे रेशमी धागे गुंफलेले नसतात. परस्परसंबंधांना काही उदात्त आधारच नसतो.
ध्येय कोणते?
सुसंस्कारित जीवन हे असे छोट्या-मोठ्या गोष्टींतून घडत असते. मोठी गोष्ट म्हणजे विशिष्ट ध्येयाप्रेत नेणारे जीवन जगण्याची जिद्द निर्माण होणे. "नारायण' हे ते ध्येय. जगायचे ते "नराचा नारायण' व्हायचे या आकांक्षेने. शक्य तो "येणेचि जन्मे येणेचि काळे.' अन्यथा पुन्हा प्राप्त होणाऱ्या जन्मात नारायण व्हायचे असेल तर वाटेल तसे वागून चालत नाही. "नारायणी जेणे घडे अंतराय। हो का बाप माय त्यजावी ते ।।' हा पक्का निर्धार आवश्यक असतो. नारायणाच्या प्राप्तीत अंतराय येईल असे विचार नकोत, सवयी नकोत. प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीचा यात समावेश होतो. भगवंताला काय रुचते आणि रुचत नाही, याचा विवेक असतो. या विवेकाची सगळ्या विकारांवर मात असते. इंद्रियांचे विषय खूप हवेहवेसे वाटत असतील व बेचैनी निर्माण होत असेल तर खुशाल समजावे की, नारायणाशी जिथे अंतराय आहे, असे जीवन उभे होत आहे. विद्वत्तेचा अहंकार असेल, पैशाचा मद असेल, यशस्वी होणारांसंबंधी मत्सर असेल तर या विकारांच्या डोंगराआड नारायण राहून जाईल, तो दिसायचाच नाही, भेटायचाच नाही. प्रेम, तितीक्षा, करुणा, सेवातत्परता, निःस्वार्थता अशा एकेका सद्‌गुणाच्या विकासाबरोबर नारायण आपल्याला अधिकाधिक जवळ करीत असतो.
छोट्या-छोट्या गोष्टींतून या सद्‌गुणांचा संस्कार आपल्यावर होऊ शकतो. म्हणून या सद्‌गुणांना पोषक ठरणाऱ्या माणसांच्या सहवासात राहण्याचे महत्त्व, वाचन, श्रवण, चिंतन, दर्शन या सगळ्यांचे महत्त्व त्यांतून होणाऱ्या संस्कारासाठीच. मला ही जाण हवी की, माझ्या लिहिण्याने मी संस्कारित झालो पाहिजे. माझ्या जीवनातील मळ धुऊन निघाला पाहिजे व माझे मलाच प्रसन्न वाटले पाहिजे. पुष्कळ लोक सांगतात की, असे लिहा आणि तसे लिहा, पण विचार करावा लागतो की, त्या लिहिण्याचा आपल्यावर काय परिणाम होईल? जो केवळ इतरांना उपदेश करण्यासाठी किंवा रिझविण्यासाठी लिहितो-बोलतो त्याची बरोबरी मी बापडा काय करणार? तशी बरोबरी करण्याची माझी इच्छाही नाही, कारण गरज आहे संस्कारांची. समाजाच्या उभारणीचा भक्कम आधार सुसंस्कृत माणसांची नारायणाकडे वाटचाल करणाऱ्या हिंमतबहाद्दरांची घडण हाच असू शकतो.
संगमनेरला मला एक तरुण मित्राने विचारले, ""अशा संस्कार वर्गांचा आपल्या समाजावरील संकटांचा परिहार करण्यासाठी काय उपयोग आहे? तुम्ही तर मुलांत त्वेष आणि चीड निर्माण करीतच नाही. मुलांना कसे पेटविले पाहिजे!''
आपल्या प्राचीन समाजावर नव्याने कोसळणाऱ्या अनेकविध उघड आणि छुप्या संकटांचा प्रतिकार झालाच पाहिजे हे निर्विवाद, पण केवळ क्षणिक भावना भडकावून हे होईल काय? भावना उत्कट असाव्यात व ती उत्कटता हृदयात सदैव असावी, पण राष्ट्र विजयी करण्यासाठी दैनंदिन जगावे कसे, हे तर कळले पाहिजे ना? पुष्कळदा क्षोभ पचवून विजयासाठी सर्वांगीण सिद्धता करावी लागते. त्यासाठी मजबूत फळी उभारावी लागते. रोज झिजावे लागते. "सदा राष्ट्रकारणी झिजे देह ज्याचा' अशी माणसे सर्वत्र उभी व्हावी लागतात. मोह ठोकरण्याचे व निर्मळ राहण्याचे नैतिक बळ त्यांच्याठायी अखंड असावे लागते. संस्कार आणि अभ्यास यावाचून घडणारी ही गोष्ट नाही. ईश्वरभक्तीचा संस्कार व राष्ट्रभक्तीचा संस्कार यात आपण कुठेही विरोध मानलेला नाही. जे काय करावयाचे ते "देव मस्तकी धरूनच' करावयाचे आहे.
संस्कारांची व्याप्ती व त्यांचे मूलभूत महत्त्व ध्यानात घेऊनच घरात व घराबाहेर नव्या पिढीच्या घडणीचा जबरदस्त प्रयत्न आज संकटकाळी हवा आहे। कारण संकट चारित्र्यात्मक गुणांच्या अभावाचे, कॅरेक्टरचे आहे. जसे संकट तशीच उपाययोजना केली पाहिजे व ती टिकाऊ परंपरा निर्माण करणारी असली पाहिजे. "चार दिवस आमच्या मुलांवर चांगले संस्कार करा,' असे म्हणून भागणार नाही! ***

- चं.प. भिशीकर
917/8, गणेशवाडी, पुणे - 411004

त्यांच्या देशाचा नेता


ज्या माणसाने अभूतपूर्व क्रांती घडवून आणली, अमेरिकच्या इतिहासातील पहिलीच असे जिचे वर्णन केले जाते, त्यातील विजयी उमेदवाराची स्तुती करताना आत्मविश्र्वास कायम राहू द्या। ओबामाने आपल्या प्रचार मोहिमेतील अनेक भाषणांत एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे कुटुंब व्यवस्थेचा.


अमेरिकेच्या अध्यक्षपदावर झालेल्या बराक ओबामा यांच्या निवडीचे महत्त्व अमेरिकन लोकशाही, मूल्ये यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे. अमेरिकेत आजवर 43 राष्ट्राध्यक्ष होऊन गेले. त्यांच्या राजवटी, त्यांची कृती याबद्दल आपण चर्चा करतो. अमेरिकेचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन, सामाजिक निर्णय आणि त्यामागच्या भावना यातून होईल. ओबामा यांची निवड आणि त्यांची व्हाईट हाऊसवर झेप म्हणजे कॅथॉलिक पोपच्या कालबाह्य अश्मावशेष यांना मार्टिन ल्युथर किंग यांनी दिलेल्या आव्हानांची परिणिती आहे, त्याला अभिवादन केले पाहिजे. अमेरिकेत गौरवर्णीयांनी आपल्याच कृष्णवर्णीय बांधवांवर वंश, कातडीचा रंग यावरून वागणूक देताना जी असंख्य पापे केली, ती या निवडीने धुऊन निघाली आहेत. हे अगदी अविश्र्वनीय आहे, जगात शतकानुशतके जे शोषित आणि दुय्यम राहिले, त्यांच्यासाठी ही नवी पहाट आहे; त्यामुळे आशा पल्लवित झाल्या.
मुबलक, प्रत्येकासाठी,
ब्राव्हो अमेरिका
ओबामा यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द, विजयानंतरचे त्यांचे वक्तव्य हे मोकळ्या, स्वच्छ हवेची मंद झुळुक आल्यासारखे होते. त्याची अनुभूती मला माझ्या घरात बसून आली. मला ते उद्‌धृत करावेसे वाटते, संपूर्ण ओळ न ओळ. ""सर्व काही शक्य आहे, असा अमेरिका देश आहे, याबद्दल आता कोणाच्या मनात शंका आहे का? आपल्या संस्थापकांनी पाहिलेली स्वप्ने आजच्या काळातही सुस्थितीत आहेत, याबद्दल आता कोणाच्या मनात शंका आहे का? लोकशाहीची शक्ती किती असते, याचे उत्तर म्हणजे आजची रात्र आहे.''
""या देशाने न पाहिलेल्या, पण शाळा आणि चर्चभोवती आखलेल्या रेषांनी हे उत्तर दिले आहे. ज्यांनी 3-4 तास वाट पाहिली, त्यांनी उत्तर दिले आहे. आपला आवाज ऐकला जातोय, काहीतरी वेगळे घडतेय, याची जाणीव त्यांना प्रथमच झाली.''
थोडेसे मागे जाऊयात. 28 ऑगस्टाला डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार म्हणून त्यांची निवड पक्की झाली तेव्हा ते म्हणाले होते, ""4 वर्षांपूर्वी मी येथेच उभा होतो. माझा पूर्वेतिहास सांगत होतो. केनियातील एक तरुण आणि कन्सास येथील एक तरुणी यांचे मिलन. ते संपन्न वा प्रसिध्दही नव्हते, पण अमेरिकेला जे हवे त्याचे स्वप्न पाहिले आणि त्यांचे स्वप्न त्यांचा मुलगा प्रत्यक्षात उतरवत आहे. देशापुढे असलेले ते नेहेमीसाठीचे ध्येय आहे. कठोर परिश्रम आणि त्याग यांतून आपल्यापैकी प्रत्येकजण या स्वप्नापर्यंत पोहोचू शकतो. आपल्या पुढच्या पिढ्यांनाही हेच स्वप्न पाहता यावे यासाठी आता आपण एक झालो पाहिजे, एक अमेरिकन कुटुंब बनलो पाहिजे. अमेरिका हा छोटे संकल्प सोडणारा देश राहिलेला नाही.''
सहज, साधे पण स्फूर्तिदायी !
हिलरी, बिल आणि शेवटी मॅकेन - या आपल्या प्रतिस्पर्ध्यांविषयी तो नेहेमी चांगलेच बोलला.
विजयानंतर त्याचा उन्माद न चढता भारदस्तपणे त्याचा स्वीकार, हे आपण अमेरिकेतच पाहतो. पराभव हा देखील कसा भारदस्तपणे मान्य करायचा असतो, हे मॅकेन यांच्या शेवटच्या भाषणातून दिसले, अतिशय महान होते ते सर्व काही.
ओबामाचे भाषण ऐकताना मी येथील वृत्तपत्रे पहात होतो. आसाम, काश्मीर, भयावह कुजका भाग, दिल्ली नावाचा भाग, जेथे लघुदृष्टीचे, कसलेही स्वप्न नसलेले लोक, त्यांची गर्दी. प्रत्यक्षात हे लोक म्हणजे पैसा कमवायला आलेले. पैसा देऊन सत्ता हस्तगत करण्यात चतुर असलेले, भारतासाठी त्यांच्याकडे कसलेच स्वप्न नाही. भारतीय वचन म्हणण्याजोगे कोणतेच वचन त्यांच्यापाशी नाही. ते आपल्यात हिंदू-मुस्लिम अशी दुही पाडतात. मग परदेशातून आपले बाप आणतात. आपल्याला शिक्षेची भीती घालतात. आपल्याला ग्रीन कार्ड मिळेल, या आशेने आपण शरण जातो, आप्त मारले गेलेले सहन करतो. आपला प्राचीन वारसा विद्रुप होताना आपण निमूटपणे बघतो.
ओबामाने नेमकी याविरुद्धची कृती केली. त्याने आपल्या परकेपणाच्या भावनेचे रूपांतर उत्साही स्वदेशीत केले. मातीची महती, तिचा वारसा अंगिकारून तो टिकवण्याचे जाहीर केले. अमेरिकेचे जे रंग आहेत, त्यातील एक तो झाला.
आत्तापर्यंत अमेरिकेचे जेवढे म्हणून राष्ट्राध्यक्ष झाले त्यातील सर्वात शक्तिमान, यशस्वी, लोकप्रिय अध्यक्ष ओबामा होईल, याबद्दल मला खात्री आहे. अमेरिका आणि अमेरिकन लोक यांच्यासाठी तो काय करतो, याकडे लक्ष ठेवावे लागेल. अमेरिकनांचे हितसंबंध जपणे-इतरांचे नाही-हे त्याचे प्रमुख काम असेल. आता भारतीय नेत्यांचे हे कर्तव्य ठरते की, ओबामाची एखादी कृती भारतीय हितसंबंधांना बाधक ठरत असेल, तर ती कृती निष्प्रभ करून टाकायची. काश्मीरच्या बाबतीत ओबामा काही अनिष्ट चाल खेळत असेल तर ती वेळीच उद्‌ध्वस्त करायची. जर आपल्या देशाचे नेते आपले देशहित परकीयांना विकत असतील तर तो दोष आपला, विकणाऱ्याचा असेल, विकत घेणाऱ्याचा नाही.
ज्या माणसाने अभूतपूर्व क्रांती घडवून आणली, अमेरिकच्या इतिहासातील पहिलीच असे जिचे वर्णन केले जाते, त्यातील विजयी उमेदवाराची स्तुती करताना आत्मविश्र्वास कायम राहू द्या. ओबामाने आपल्या प्रचार मोहिमेतील अनेक भाषणांत एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे कुटुंब व्यवस्थेचा.
युनियन बॅंकेच्या जाहिरातीत एक ओळ आहे, ""तुमची स्वप्ने तुमच्या एकट्याची नाहीत.'' ही ओळ माझ्या डोळ्यांत अश्रू आणते. माता-पिता-पत्नी-छोटी बहीण या सर्वांना सामावून घेणारे कुटुंब. या जाहिरातीचे कौतुक करण्याची संधी मी बऱ्याच दिवसांपासून शोधत होतो.
ओबामाने ही संधी मला मिळवून दिली. बॅंकेच्या जाहिरातीसाठी ज्याने ही ओळ लिहिली आणि ज्याने ती मान्य केली, त्यांचा जाहीर सत्कार व्हायला हवा! ""तुमची स्वप्ने तुमच्या एकट्याची नसतात.'' होय, अगदी खरे, पण अतिशय निर्दय आणि आत्मकेंद्रित झालो आहोत! ज्या मुलांना आपण जन्म दिला, त्या मुलांकडे पाहण्यास आपल्याला वेळ नाही आणि ज्यांनी आपल्याला जन्म दिला व जे आता वृद्ध झाले आहेत, त्या माता- पित्यांकेडेही पाहण्यास आपल्याला वेळ नाही. मात्र ते वृद्धाश्रमासाठी भरभरून देणग्या देतात. राखी हे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक राहिले नाही, तर "व्हॅलेंटाईन डे'ला शह म्हणून त्याकडे पाहिले जाते. आपले सणवार म्हणजे अत्यंत तिरस्करणीय, मागासलेला प्रकार, अशा नजरेने पाहिले जाते. आधुनिक जगात सण म्हणजे "आंधळी रूढी' समजली जाते. भारतातील सुखसंपन्न समाजाने स्वतःभोवती विणून घेतलेले हे जाळे आहे.
नात्यांच्या बाबतीत आपण दिवसेंदिवस निष्ठूर आणि संवेदनविरहीत होत आहोत. भारताला सतःच्या पायावर उभे राहून जगाला मार्गदर्शक ठरायचे असेल, तर आपली कुटुंबव्यवस्था आणि पर्यावरण यांचे काळजीपूर्वक जतन केले पाहिजे, परंतु आता आपण अशांकडून शिकायला लागलोत की, ज्यांनी पूर्वी या चुका केल्या आणि त्या दुरुस्तही केल्या.
ओबामा यांचे वर्तन आणि वक्तव्य हे प्रामाणिक आहे. तरीही त्यांचे पद आणि त्यांचा देश यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले. आपल्या आईविषयी त्यांनी व्यक्त केलेली श्रध्दा, आपल्या आजीबद्दल जागवलेल्या मधुर स्मृती, त्यांचा प्रामाणिकपणा, 106 वर्षांची एक मतदार, जिने तिच्या कातडीच्या रंगामुळे खूप पक्षपात, अन्याय सहन केला होता तो काळ. जेव्हा विमानेही नव्हती, त्या मतदार महिलेस त्यांनी न्याय आणि उज्वल भविष्याचे आश्र्वासन दिले. आपले सहकारी निवडण्याची त्यांची पद्धत अतिशय समाधान देणारी आहे. एक निश्र्वास टाकून आपण म्हणायचे की, असे आपल्या देशात का घडू शकत नाही?
आपण बिनमणक्याचे झालो आहोत! राष्ट्र ही संकल्पना मोडीत काढून राष्ट्रउभारणीस सहाय्यभूत ठरलेल्या मूल्यांवर आघात करीत आहोत. शिकलेल्या कथित विद्वानांना त्यात आनंद मिळतो. प्रामाणिक, निःपक्ष, समर्पित भावनेने काम करणाऱ्यांचे "तारकामंडळ' आपण पहा, ज्यांची निःसंशय एकनिष्ठा........ पुढचे शब्द आपणच घाला. ते सुचवण्याचा मी प्रयत्नही करणार नाही.
ओबामाच्या निवडीचा आपल्याला फायदा काय, असा विचार करणारे चूक करीत आहेत. अमेरिकेचे वर्चस्व मान्य करीत आहेत. ओबामाशी आपले नेते कसे वागणार, असा आपल्यापुढे प्रश्न पडायला हवा. कारण जॉर्ज बुशमुळे अमेरिकेचा अध्यक्ष म्हणजे "जगातील दादा' अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. आपले नेते पुन्हा या नेत्याबरोबर हस्तांदोलन करता यावे यासाठी जीव टाकणार का? मोनिका लेव्हेन्स्कीबरोबरची भानगड उजेडात आल्यावर बिल क्लिंटन भारतात आले होते तेव्हा सेंट्रल हॉलमध्ये त्याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी खासदारांत विशेषतः महिला खासदारांत चढाओढ लागली होती.
आपल्यापुढे दहशतवाद, काश्मीर, फसवून किंवा धाकाने धर्मांतर, ईशान्य भारतातील घुसखोरी असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उकल करताना आपली मतपेढी भक्कम होईल की मोडेल, याचा विचार न करता केवळ राष्ट्रहिताच्या भावनेतून विचार करणारे नेतृत्व हवे. यासाठी ओबामाला भेटायचे तर ओबामा होऊन भेटा, तरच तुम्हाला मानसन्मान मिळेल.
ओबामा याचे मधले नाव (हुसेन) जरा वेगळे आहे व त्यामुळे अनेकांचा भृकुटीभंग होतो. इतकेच नव्हे तर त्याचे ओबामा हे नाव संगणकाने अनेकदा चुकून ओसामा (बिन लादेन) असे केले. नंतर ते दुरुस्त करावे लागले. असे असूनही अमेरिकेने त्याच्या निष्ठेबद्दल शंका घेतली नाही, त्याच्या प्रामाणिकपणावर विश्र्वास ठेवला.
ओबामा यांना शुभेच्छा व्यक्त करताना त्यांच्यासारखा खराखुरा नेता आपल्यालाही लाभावा, अशी आपण प्रार्थना करूया। अनेक गैरप्रकार करून निर्वाचित झालेले अनेक नेते आपल्याकडे आहेत, पण आता ओबामासारख्या खऱ्याखुऱ्या लोकप्रिय नेत्याची आपल्याला आवश्यकता आहे.


- तरुण विजय
नवी दिल्ली
अनुवाद - अरुण रामतीर्थकर
**

शक्तिदायी विचार




गृहस्थाश्रमी लोकांनी खूप प्रयत्न करून उत्साहाने संपत्ती मिळविली पाहिजे. आपल्या कुटुंबाचे आणि इतरांचे उत्तम पोषण केले पाहिजे. शक्यतो लोकहिताची कामे केली पाहिजेत. एवढेही तुम्ही करू शकला नाहीत, तर मग स्वत:ला माणूस कसले म्हणविता?
- स्वामी विवेकानंद

आठवतं,

आठवतं, आयुष्यात पहिली मोठी संधी तुम्हाला कोणी दिली?
तुमच्यातली "खास बात' त्याने प्रथम हेरली. तुम्हाला चांगला "बे्रक' दिला.
आज तुम्ही जे कोणी आहात, ते बऱ्याच अंशी त्याच व्यक्तीमुळे.
एखादा नातेवाईक, एखादा बॉस, एखादा शेजारी किंवा एखादा मित्र, ज्याने तुमच्या अडचणीच्या वेळी स्वतःच्या खिशात हात घातला. ज्याच्यात होती मदत करायची वृत्ती आणि तुम्ही पुढे जाल हे हेरण्याची दूरदृष्टी. दोन्ही गुण तसे दुर्मिळच!
पुढच्या 24 तासांत एक नक्की करा. 10 मिनिटं वेळ काढून त्या माणसाला पत्र टाका. तुमची कृतज्ञता कळवा. एक सुंदर नातं पुन्हा जिवंत होईल.
आणखीन एक गोष्ट. 10 मिनिटं याचाही विचार करा की, तुम्ही आज दुसऱ्या कोणाला असा "बे्रक' देऊ शकता, असा कोण आहे, ज्याला आज तुम्ही मदत करू शकता.
काही वर्षांनी त्याच्याकडून तुम्हाला एक सुंदर पत्र मिळेल. आयुष्यभर जपून ठेवावं असं एक पत्र.

स्वामी असीमानंद!

असीमानंद हे एम। एस्सी. झालेले आहेत आणि हिंदू धर्माच्या प्रचारार्थ दीक्षा घेऊन संन्यास घेतलेले स्वामी आहेत. प्रथम त्यांनी आसाम भागात आपले कार्य सुरू केले. तिथे होणारे धर्मांतर त्यांना अस्वस्थ करीत होते. प्रलोभन दाखवून, बळजबरीने हिंदू मोठ्या संख्येने ख्रिश्चन होत होते...


स्वामी असीमानंद यांच्या एका भाषणाची कॅसेट ऐकल्यापासून त्यांना भेटण्याची इच्छा होती. भाषण अत्यंत साधे असले तरी, रक्त तापविणारे होते. बंगाली उच्चार असल्यासारखी त्यांची हिंदी भाषा असली तरी, ज्या तळमळीने ते बोलत होते, ते निश्चितच हृदयाला भिडणारे होते.
गुजरात प्रांताच्या महाशिबिराच्या वेळी त्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. एक भगवे कपडे घातलेली, थोडी दाढी असलेली व्यक्ती समोरून भरभर चालत येत होती. लोक त्या व्यक्तीच्या पटापट पाया पडत होते. पाया पडणे त्या व्यक्तीला आवडत नसल्याचे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत होते. मी बाजूच्याला विचारले- कोण हे? तो म्हणाला- स्वामी असीमानंद! त्याच्या चेहऱ्यावर "असीमानंद को नही जानता?' असे भाव होते. मला खूप आनंद झाला. परंतु, त्यांचे भाषण ऐकून त्यांची जी प्रतिमा मी मनात तयार केली होती, त्याला छेद देणारे हे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या भोवती सतत लोकांचा गराडा राहायचा.
गुजरातमध्ये डांग जिल्ह्यात शबरीकुंभ आयोजित करण्याची तयारी सुरू झाल्यावर प्रसिद्धिमाध्यमांमधून त्यांच्याबद्दल उलटसुटल खूप काही येत गेले. शबरीकुंभावर होणारी सेक्युलर टीका संपूर्णपणे असीमानंदांवरच एकवटली आहे की काय, असे वाटायचे. एवढे काय या माणसाने केले, असे वाटायचे.
शबरीकुंभाचे वार्तांकन करण्यासाठी गुजरातमधील डांग जिल्ह्यात जाण्याचा योग आला. त्यावेळी मात्र असीमानंद म्हणजे काय चीज आहे, याची पुरती कल्पना आली. त्यांच्याबद्दलची खूप माहिती गोळा होत गेली आणि या व्यक्तीविषयीचा आधीच असलेला आदर द्विगुणित होत गेला.
गुजरातचा डांग जिल्हा हा सर्वात लहान व सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. संपूर्ण जिल्हा सातपुडा पर्वतरांगांनी व्यापलेला आहे. सातपुडा पर्वतातून वाहणारी पूर्णा नदी नयनरम्य आहे. घनदाट जंगल, त्यात ठिकठिकाणी वसलेली वनवासी लोकांची खेडी, असे या जिल्ह्याचे सर्वसाधारण स्वरूप आहे. आहवा हे जिल्ह्याचे ठिकाण. आपल्याकडील एखाद्या तालुक्याएवढे. ही सर्व भौगोलिक परिस्थिती मिशनरींना काम करण्यास अत्यंत अनुकूल होती आणि त्याचा त्यांनी पुरेपूर लाभही घेतला. दुर्गम भागातही मिशनऱ्यांनी उभारलेली रुग्णालये, शाळा यांची संख्या डोळ्यांत भरणारी आहे.
असीमानंद हे एम. एस्सी. झालेले आहेत आणि हिंदू धर्माच्या प्रचारार्थ दीक्षा घेऊन संन्यास घेतलेले स्वामी आहेत. प्रथम त्यांनी आसाम भागात आपले कार्य सुरू केले. तिथे होणारे धर्मांतर त्यांना अस्वस्थ करीत होते. प्रलोभन दाखवून, बळजबरीने हिंदू मोठ्या संख्येने ख्रिश्चन होत होते. या धर्मांतराचे समर्थन करणारे सेक्युलर म्हणत असत की, वनवासी लोकांकडे हिंदू समाजाचे दुर्लक्ष होते. परंतु, मिशनरींनी तिथे दवाखाने उघडले, शाळा काढल्यात, त्यांना आधुनिक विकासाचे धडे दिलेत. तुम्ही काय केले? आणि म्हणून जर हे वनवासी ख्रिश्चन होत असतील तर काय बिघडले? सेक्युलरांचा हा प्रश्न असीमानंदांना अस्वस्थ करीत होता. या संपूर्ण परिस्थितीचे सम्यक चिंतन केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, जंगलात राहणाऱ्या हिंदूंना शिक्षण दिले नाही, आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्या नाहीत म्हणून जर ते सहजपणे, स्वखुशीने ख्रिश्चन होत असतील तर, मग मुसलमान का नाही ख्रिश्चन होत? त्यांच्यातही या सर्व समस्या विद्यमान आहेत. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न स्वामीजींनी सुरू केला. आणि त्यांच्या लक्षात आले की, कितीही सुखसुविधा उभारल्या, विकासाच्या प्रवाहात या वनवासींना कितीही आणले तरी, त्यांचे धर्मांतर काही थांबणार नाही. हिंदू समाजात आपल्या धर्माबाबत कट्टरपणा नसल्याने हे सर्व काही होत आहे. ही कट्टरता मुसलमानांमध्ये असल्याने त्यांचे धर्मांतर होत नाही. कितीही नरकयातना भोगाव्या लागल्या तरी कुठलाही मुसलमान ख्रिश्चन होत नाही आणि हिंदू मात्र "तुम्ही आम्हाला काय दिले' असा प्रश्न आपल्याच समाजाच्या तोंडावर फेकून मारतात. हे बंद झाले पाहिजे, असा ध्यास स्वामीजींनी घेतला. हिंदूंना आपल्या धर्माबाबत कट्टरता शिकविली की, तो कितीही अडचणीत असला तरी धर्म काही सोडणार नाही, असे एक गृहीतक स्वामी असीमानंद यांनी तयार केले. या गृहीतकाला त्यांना सिद्ध करायचे होते. त्यासाठी स्वामीजींनी डांग जिल्हा निवडला.
डांग जिल्ह्यात हिंदू समाजातर्फे कुठल्याही विकासाच्या योजना चालू न करता, तिथल्या वनवासींना आपल्या स्वधर्माबाबत कट्टरता शिकविण्याचे कार्य त्यांनी सुरू केले. अगदी एकटे, निर्भयपणे स्वामीजी या परिसरात विचरण करू लागले. लोकांशी संवाद साधू लागले. त्यांच्या सुखदु:खाशी समरस होऊ लागले. त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी यथाशक्ती सोडविण्याचा प्रयत्न करू लागले. तिथल्या लोकांचाही आता स्वामीजींवर विश्वास वाढू लागला. ते त्यांना आपल्यापैकीच एक मानू लागले. या परिसरात राहणाऱ्या विविध जमातींचे एकमेकांशी पटत जरी नसले, तरी त्या सर्वांची शबरीमातेवर विलक्षण श्रद्धा आहे, असे त्यांच्या लक्षात आले. त्या परिसरात शबरीमातेची एक टेकडी आहे आणि पंपा सरोवरही आहे, याची माहिती स्वामीजींना समजली आणि मग त्यांनी शबरीमातेचे मंदिर बांधण्याचे ठरविले.
स्वामी असीमानंदांनी तिथे शबरीमातेचे मंदिर उभारले आहे. तेथील स्थानिक लोकांची अशी भावना आहे की, शबरी ही मूळ तिथलीच आहे आणि प्रभू रामचंद्र वनवासात असताना तिथे आले होते. एका टेकडीवर तीन शिला आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, दोन शिलांवर राम व लक्ष्मण बसले होते आणि तिसऱ्या शिलेवर शबरीने बसून या दोघांची पूजा करून त्यांना बोरे खाऊ घातली होती. तिथे जत्रा देखील भरत असे.
हळूहळू या शबरीमातेच्या मंदिराची महती वाढू लागली. कानाकोपऱ्यातील वनवासी तिथे श्रद्धेने येत. पंपा सरोवरात स्नान करून नंतर मंदिरात शबरीमातेची पूजा वगैरे करीत. आपला धर्म श्रेष्ठ आहे आणि तो आपण कुठल्याही कारणास्तव सोडता कामा नये, अशी स्वामीजींची शिकवण लोकांना पटू लागली. आणि येथूनच संघर्षाला सुरवात झाली.
मिशनरी आणि कम्युनिस्टांचा विरोध ज्यांनी भोगला आहे, त्यांनाच तो किती भयंकर असतो हे माहीत असेल. मिशनरीजना धर्मांतरासाठी भोळे-भाबडे वनवासी मिळणे दुरापास्त होऊ लागले आणि मग तेव्हापासून सेक्युलरांनी स्वामी असीमानंदांविरुद्ध विषारी प्रचाराची आघाडी उघडली.
धर्मांतर करण्याची ख्रिश्चनांची पद्धत वनवासींच्या श्रद्धेवर आघात करणारी होती. ख्रिश्चनांच्या दहशतीपुढे हे बिचारे वनवासी हतबल होते. परंतु, त्यांना स्वामीजींच्या रूपाने एक भक्कम आधार मिळताच, त्यांची हतबलता समाप्त झाली आणि त्याची जागा मिशनरींवरील संतापाने घेतली. आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा, फसवणुकीचा बदला घेण्याचा ते निश्चय करू लागले. लहानसहान झोपड्यांवर लागलेले क्रूस त्यांना सलू लागले आणि एके दिवशी त्यांच्या संतापाचा स्फोट झाला. त्यांनी मिशनरींचे दडपण झुगारून दिले आणि पुन्हा हिंदू धर्मात परतण्याचे सत्र सुरू झाले.
इतक्या वर्षांची मेहनत आणि परदेशातून आलेला अमाप पैसा व्यर्थ गेल्याचे पाहून मिशनरींचा थयथयाट सुरू झाला. संपूर्ण भारतात डांग जिल्हा, तिथल्या कथित चर्चेसवर झालेले हल्ले आणि स्वामी असीमानंद यांचे नाव गाजू लागले.
शबरीकुंभाच्या वेळी स्वामीजींची मुद्दाम भेट घेतली. शबरी मातेच्या मंदिराशेजारीच असलेल्या एका साध्या खोलीत त्यांचा मुक्काम असतो. तसे ते तिथे फार कमी काळ असतात. सतत फिरतीवर असतात. परंतु, योगायोगाने ते नुकतेच दौऱ्याहून आले होते. सायंकालीन प्रार्थना झाल्यावर भेटीला आलेल्या भाविकांशी त्यांनी चर्चा केली. त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलले आणि नंतर आमच्याशी चर्चा केली.
विषय अर्थातच चर्चेवरील हल्ले व सेक्युलरांचा विषारी प्रचार हा होता. स्वामीजींबद्दल बाहेरच्या जगात इतका विषारी प्रचार सुरू असताना ते मात्र अत्यंत शांत होते. स्वामीजी म्हणाले, मी इथल्या लोकांना काहीही सांगितले नाही. हल्ले करा की करू नका, हे देखील सांगितले नाही. मी फक्त त्यांना आपल्या हिंदू धर्माचे महत्त्व आणि श्रेष्ठत्व पटवून दिले आणि आपला धर्म आपण सोडता कामा नये, हे सांगितले. आजही माझे हेच कार्य सुरू आहे. मी त्यांना कुठलेही आश्वासन देत नाही की प्रलोभन किंवा धाक दाखवीत नाही.
तुम्हाला भीती नाही वाटत का, या प्रश्नावर ते म्हणाले, ""कशाला आणि कुणाला भ्यायचे. सर्व काही त्या परमेश्वराच्या अधीन आहे. मला जे नियत कार्य सोपविण्यात आले आहे, ते मी करतो. त्यामुळे या परिसरात मी निर्भयपणे फिरत असतो. करायचीच झाली तर माझी काळजी तो जयन्नियंता करतो.'' स्वामीजींचे उत्तर थक्क करणारे होते. नंतर शबरीकुंभावर चर्चा झाली.
वनवासींमध्ये आत्मविश्वास निर्माण करून भारतातील संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी आहे, ही भावना प्रबळ व्हावी म्हणून शबरीकुंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसिद्ध प्रवचनकार मुरारीबापूंची रामकथा आम्ही या शबरी मंदिरात आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी प्रवचनातून ही संकल्पना मांडली. आम्ही फक्त त्याला मूर्त रूप दिले, एवढेच. स्वामीजींनी नम्रपणे सांगितले.
आपल्याकडे जे कुंभमेळे होतात त्यांची स्थाने बघितली तर ते उत्तर-दक्षिण होतात, असे लक्षात येईल. भारताचे थोडे बारकाईने निरीक्षण केले तर लक्षात येईल की, बहुतेक वनवासी भाग हा पूर्व-पश्चिम असा पसरला आहे. त्यामुळे शबरीकुंभ पूर्व-पश्चिम पट्ट्यात घेण्याचा मानस आहे. दर बारा वर्षांनी याच ठिकाणी कुंभमेळा आयोजित होणार आहे. सुरवातीला थोडे फार आयोजन करावे लागणार आहे. नंतर मात्र जनताच या मेळ्याचे आयोजन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोकांमध्ये धर्माबाबत कट्टरता निर्माण केली की, धर्मांतरण होणार नाही, या त्यांच्या गृहीतकाचे आता एका सिद्धांतामध्ये रूपांतर झाले आहे. भारतातील धर्मांतरण रोखण्याच्या कार्याला स्वामीजींनी आपल्या चिंतनातून आणि अथक प्रयत्नांतून एक नवी, आश्वासक आणि सिद्ध अशी दिशा दिली आहे. आधुनिक भारताच्या इतिहासात याचे फार मोठे स्थान राहणार आहे. एका अर्थाने स्वामी असीमानंद ऐतिहासिक पुरुष ठरणार आहेत. मिशनरींच्या डोळ्यांत स्वामीजी अजूनही का सलत असतात, याचे कारण सहजपणे समजता येणारे आहे. त्या दृष्टीने अजूनही स्वामीजींविरुद्ध सुरू असलेल्या विषारी प्रचाराकडे आपण बघितले पाहिजे. एवढ्यावरच न थांबता, या परिसराला नेहमी भेट दिली पाहिजे. इथल्या समाजाशी समरस होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शबरीमातेचे मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात खूप रमणीय असे आहे. पंपा सरोवर तर छाती दडपून जाईल, इतके निसर्गाच्या जवळ आहे. आपण हे सर्व बघितले पाहिजे. शबरी कुंभानिमित्त या भागात चांगले रस्ते झाले आहेत. त्यामुळे ती अडचण आता राहिली नाही. एवढे जरी आपण केले तरी, स्वामीजींच्या अविश्रांत मेहनतीला आपण कृतिरूप अभिवादन केले, असे होईल.
***


- श्रीनिवास वैद्य
नागपूर

दिलेली वेळ पाळ

एखाद्याचे पैसे उसने घेणे आणि परत न करणे याला आपण फसवणूक म्हणतो. दिलेली अपॉईंटमेंट न पाळणे हेही तेवढंच आक्षेपार्ह आहे, किंबहुना थोडं जास्तच. कारण, पैसे उशिरा का होईना, पण परत करता येतात. एखाद्याचा फुकट घालवलेला वेळ मात्र आपण कधीच परत करू शकत नाही.
3 वा. येतो म्हटल्यावर आपण ठीक 3 ला हजर राहायलाच पाहिजे! 5 मिनिटं उशीर झाला तरी तो उशीरच! पडलीच आपल्या नावापुढे एक लाल फुली.
झेंडावंदनासाठी एक-एक, दोन-दोन तास बिचारी मुलं उन्हात उभी असतात, अध्यक्ष उशिरा येणार म्हणून.
बंदोबस्तासाठी पोलिसांची तासन्‌तास रखडपट्टी होते आणि अचानक मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम बदलतो.
जेवढा गायक मोठा तेवढा तो श्रोत्यांना जास्त ताटकळत ठेवतो.
हे सगळं बदलायला हवं! ठरलेल्या दिवसापूर्वी मालाची डिलिव्हरी झाली नाही, तर वॉल मार्टसारखी कंपनी लक्षावधी डॉलर्सची ऑर्डर कॅन्सल करते. सर्जन ऑपरेशन थेटरमध्ये उशिरा आला तर अमेरिकेतला रोगी त्याला कोर्टात खेचू शेकतो.
दिलेली वेळ पाळणं याचाच अर्थ दिलेला शब्द पाळणं आणि आपल्या शब्दाची किंमत म्हणजेच आपली स्वतःची किंमत!

भगवद्‌गीतेची शिकवण


समाज दुभंगलेला असताना, समाजात आसुरी शक्तींचे प्राबल्य असताना, अनेक समस्यांची गुंतागुंत असताना धर्माचे आकलन आणि आचरण गहन आणि सूक्ष्म बनून जाते. अशा किंकर्तव्यमूढ अवस्थेत कसे वागायचे? याचे शहाणपण, मार्गदर्शन, चातुर्य आणि विवेक आपणाला श्रीकृष्ण देतो.


या महिन्यात गीताजयंतीचा पवित्र दिवस येत आहे. द्वापारयुगाच्या शेवटी भगवान श्रीकृष्णाचे आगमन झाले होते आणि श्रीकृष्णाने देह ठेवला तसा कलियुगाचा प्रारंभ झाला. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने दिलेला संदेश हा नव्या युगासाठी अर्थात कलियुगासाठी होता, आपल्यासाठी होता. श्रीकृष्णाच्या जीवनचरित्रातून आणि सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशी कुरुक्षेत्रावर त्याने अर्जुनाला केलेल्या उपदेशातून आपल्याला तो संदेश मिळतो. काय आहे तो संदेश? तो संदेश, कालसुसंगत आहे काय? हे आपण पाहणार आहोत.
प्रत्येकजण धर्माने आचरण करीत असता, सगळीकडे सुखशांती नांदत असता, धर्म समजून घेणे अगदी सोपे असते. समाज दुभंगलेला असताना, समाजात आसुरी शक्तींचे प्राबल्य असताना, अनेक समस्यांची गुंतागुंत असताना धर्माचे आकलन आणि आचरण गहन आणि सूक्ष्म बनून जाते. अशा किंकर्तव्यमूढ अवस्थेत कसे वागायचे? याचे शहाणपण, मार्गदर्शन, चातुर्य आणि विवेक आपणाला श्रीकृष्ण देतो.
भगवान श्रीकृष्णाने आपल्याला उपनिषदांचे सार सांगितले. त्याने दिलेली शिकवण ही वेदांतावर आधारित आहे. श्रीकृष्णाने दिलेल्या संदेशात प्राचीन परंपरांचे विविध आयाम, त्याची दैनंदिन जीवनातील उपयुक्तता, कालसुसंगत मांडणी याचे एकीकरण झाले आहे. संत ज्ञानेश्वरांनी याचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. वेद हे ईश्वराचे निद्रावस्थेतील घोरणे आहे, असे गृहीत धरले तर गीता ही भगवंताच्या जागतेपणी मुखातून बाहेर पडलेली वाणी आहे. म्हणूनच गीता ही कालसुसंगत आणि स्पष्ट आहे.
श्रीकृष्णपूर्व काळात उपासकांचे प्रामुख्याने दोन प्रकार होते. आत्मज्ञानेच्छुकांसाठी संन्यासमार्ग. आत्मा हा कर्मापासून अलिप्त असल्यामुळे यामध्ये सर्वकर्मसंन्यासाचा आग्रह असायचा. कर्महीनता किंवा निष्क्रीयताच संन्यास मार्गाचे लक्षण मानले जायचे. दुसरा मार्ग होता, तो वर्तमान आणि भविष्यामध्ये आनंदाची कामना करणाऱ्यांचा. यात यज्ञ-कर्म करण्यावरच भर दिला जायचा. आतून सुसंघटित, स्वयंप्रेरित समाजासाठी तसेच शत्रुविरहीत समाजासाठी हे मार्ग ठीक होते, परंतु समाजात आसुरी शक्तींनी उच्छाद मांडलेला असताना स्वार्थात गुंतून राहणे, क्रीयाहीन राहणे परवडणारे नाही.
श्रीकृष्णाने उपरोक्त दोन्ही मार्गांचे एकीकरण केले. संन्यासमार्गातली कर्महीनता (निष्क्रीयता) काढून टाकली, पण आत्मज्ञान स्वीकारलं. त्यांनी आसक्तीयुक्त कर्म किंवा आवडी-निवडी, इच्छा यावर आधारित कर्म त्याज्य ठरवलं; परंतु आत्मज्ञान मिळविण्यासाठी नित्य कर्माला दैवी अधिष्ठान मिळवून दिलं. क्रियाशीलतेला महत्त्व मिळवून दिलं. अशाप्रकारे दोन्ही मार्गांचे उद्देश आणि ध्येय सारखे झाले आणि दोन्ही मार्ग परस्परपूरक ठरले. प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करण्यामागे ध्येयाचे झालेले एकीकरणच कारण आहे. एखाद्याला आत्मज्ञान हवं असेल अथवा आनंद हवा असेल (दोन्ही एकच आहेत.) त्याला कर्म करावेच लागेल. आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंतरही (आत्मा अलिप्त आहे तरी) एखादा कर्म करणे थांबवत नाही. अशाप्रकारे आत्मज्ञानाची इच्छा बाळगणारा आणि आत्मज्ञानी दोघेही समाजाच्या उत्थानासाठी सामाजधर्म म्हणून कर्म करतात.
उपनिषदामध्ये नसलेली अवताराची संकल्पना श्रीकृष्णाने भगवद्‌गीतेत सांगितली आहे. भगवद्‌गीतेनुसार भगवंताच्या जागरूक कृपादृष्टीखाली या जगाचा विकासरथ चालू आहे. तिची वाटचाल विनाशाकडे होत असता भगवंत स्वस्थ बसून राहत नाही. जेव्हा धर्माला अवकळा येते, अर्थात जग तेव्हा स्वविकासाची दिशा हरवून बसते, तेव्हा भगवंत प्रकट होऊन तिचे संरक्षण करतो. धर्माच्या संरक्षणासाठी मी पुन:पुन्हा जन्म घेईन, असे भगवंताने सांगितले आहे. गीतेतील दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे विश्वरूप दर्शन होय. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, "निमित्तमात्रम्‌ भव सव्यसचिन्‌।।' अर्थात माझे उपकरण बन!
भगवद्‌गीतेच्या अभ्यास करताना आपल्या ध्यानात येते की, ईश्वर स्वतःच्या कार्यासाठी मनुष्यमात्राची एक उपकरण म्हणून निवड करतो. महाभारत युध्दातदेखील भगवंत युध्दात प्रत्यक्ष भाग न घेता अधार्मिक शक्तींविरुध्द लढण्यासाठी पांडवांना प्रत्येक ठिकाणी धर्म समजून देत युध्दासाठी प्रेरित करतो. धर्माचे आकलन आणि स्पष्टता म्हणजेच कलियुगात ईश्वरी स्वरूप होय. दुर्दैवाने आमची आकलनशक्ती लोप पावली अन्‌ आम्ही गीतेचा संदेश विसरलो. आम्ही भगवद्‌गीतेची पारायणं करीत बसलो; परंतु श्रीकृष्णाने दिलेला संदेश जीवनात उतरवलाच नाही. अधार्मिक शक्तींच्या नाशासाठी ईश्वर अवतार घेईल, तोच धर्म संस्थापना करेल, या विचारातच आम्ही राहिलो. एखाद्याने यशस्वीपणाने धर्मकार्य केलेच तर त्याने ईश्वरी कार्याचे उपकरण बनून स्वतःची उन्नती कशी साधली, या दृष्टीने न पाहता त्या व्यक्तीचा अवतार बनवून टाकला आणि धर्मरक्षणाची स्वतःची जबाबदारी झटकून टाकली.
या विश्वाला धारण करणाऱ्या तत्वांचे संवर्धन आणि संरक्षण म्हणजे धर्म. कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या भौतिक तसेच आध्यात्मिक विकसनासाठी प्रयत्न करणे म्हणजे धर्म. समाज, राष्ट्र आणि धर्मासाठी वैयक्तिक अथवा संघटितपणे कार्य करीत असता स्वतःची प्रतिमा, स्वतःच्या आवडी-निवडी यामुळे एखाद्यावर काही बंधने येतील.
भीष्म हा लग्न न करण्याच्या आपल्या प्रतिज्ञेशी अधिक बांधील होता. सावत्र आईने वंशसातत्यासाठी लग्न अरण्याचा आग्रह करूनही तो आपली प्रतिज्ञा मागे घेत नाही. तसेच कर्णाच्या अधिपत्याखाली युध्द करण्यास भीष्माची तयारी नसते. कौरवांच्या विजयापेक्षा "दानवीर' ही प्रतिमा कर्णासाठी अधिक महत्त्वाची होती. द्रोणाचार्यांची आपल्या मुलावरील आसक्ती ही जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्त्वाची होती. म्हणूनच कौरव विजयी होऊ शकले नाहीत, परंतु धर्माधिष्ठित कल्याणकारी समाजासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी श्रीकृष्णाने केल्या. हाती शस्त्र न घेण्याची प्रतिज्ञा केली असली तरी युध्दभूमीवर भीष्माची सरशी होतेय हे पाहून तो रथाचे चाक घेऊन भीष्मावर धावून गेला. आवश्यक तेव्हा श्रीकृष्णाने संताप व्यक्त केला, पण इतर वेळी इतरांनी प्रयत्न करूनही तो संतापला नाही. आपली प्रतिमा, आपले नाव या साऱ्या गोष्टी समाजाच्या चांगल्यासाठी वापराव्यात. वेळप्रसंगी त्यांचा त्यागही करावा. युधिष्ठिराच्या तोंडी, "अश्वत्थामा हतः' (अश्वत्थामा मेला) हे शब्द उच्चारायला सांगून श्रीकृष्णाने हाच संदेश दिला आहे. काय घडले हे सांगणे म्हणजेच सत्य आहे असे नव्हे तर ज्या शब्दाने समाजाचे हित होते, संरक्षण होते ते सत्य होय. धमर्ाच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. धर्ममार्गी लोकांसाठी असलेले नियम अधर्मी अथवा आसुरी लोकांसाठी वापरणे म्हणजे अधर्म होय, असा महत्त्वाचा सिध्दांत श्रीकृष्णाने सांगितला आहे.
कर्ण रथात नसल्याचे सांगून अर्जुन त्याच्यावर बाण चालविण्यास नकार देतो. श्रीकृष्ण अर्जुनाला सजग करतो. युधिष्ठिर द्युतात हरला तेव्हा पांडव आणि द्रौपदीची मानखंडना करणारा हा कर्णच होता. नियम धाब्यावर बसवून अभिमन्यूची निर्दयपणे हत्या करणाऱ्या सहा योद्‌ध्यांमध्ये हाच कर्ण होता, याची आठवण तो अर्जुनाला करून देतो. कर्ण आपल्या जीवनात धर्माने वागला नाही, म्हणून त्याला धार्मिक नियम लावू नकोस असेही श्रीकृष्ण अर्जुनाला बजावतो. धर्माने न वागणाऱ्याला धर्माचे नियम लावणे खरे तर अधर्म आहे. भारताने जर हे तत्व भारतावर आक्रमण करणाऱ्या मोहंमद घौरी, बाबर, अहमदशाह अब्दाली आदींना वापरले असते, तर भारताचा नकाशा आज आहे त्याहून वेगळा दिसला असता. भगवद्‌गीतेने सांगितलेले तत्व खऱ्या अर्थाने पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अमलात आणले. राष्ट्र आणि धर्मासाठी त्यांनी सारे रूढ नीतिनियम झुगारून दिले. धर्माची सूक्ष्म आणि गहन जाण छ. शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून स्पष्टपणे व्यक्त होताना दिसते आणि म्हणूनच भारत आपले स्वत्व आणि संस्कृती टिकवू शकला.
आमच्या संस्कृतीवरती विविध राष्ट्रद्रोही शक्तींचे आघात होत असताना, भगवान श्रीकृष्णाने दिलेला धर्माचा संदेश आपण ध्यानात घ्यायला हवा. सर्वच प्रसंगी आणि सर्वांसाठी एकच धर्म किंवा नीती वापरून चालत नाही, हेही ध्यानात घ्यायला हवे. राष्ट्राच्या भल्यासाठी हे आवश्यकच आहे. आपण प्रत्येकजण त्या ईश्वराचे उपकरण आहोत आणि म्हणूनच आपल्यातील प्रत्येकाने धर्माच्या संस्थापनेसाठी, समाजाच्या संरक्षणासाठी आणि आसुरी शक्तींच्या नाशासाठी कार्य करायला हवे. व्यक्तिगत फायदा, आवडी-निवडी, स्वतःची प्रतिमा या सर्वाहून राष्ट्रहित महत्त्वाचे आहे, हे आपल्याला ध्यानात ठेवावे लागेल. जेव्हा असे लोक आपल्या भोवताली असतील, जेव्हा वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्याने ओतप्रोत लोक असतील तेव्हा विजय आपलाच आहे आणि समाजाचे कल्याणही होणारच!
(अनुवाद - सिद्धाराम)

कार्याची तळमळ

कार्याची तळमळ
आपण एखाद्या नवीन ठिकाणी जातो तेव्हा तेथील पूर्वी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना घेऊन कार्य कसे पुढे न्यावे, याचा आराखडा तयार करीत असतो. "विजय! पूर्ण विजय!!'साठी जळगावला मी आले आणि येथील कार्य पुढे नेण्याच्या दृष्टीने जे काही आधी परिचयात आहेत त्या व्यक्तींशी प्रथम संपर्क करण्याचे ठरवले. जळगावपासून 25 कि.मी. अंतरावर सामनेर म्हणून एक गाव आहे. तेथे आपला कार्यकर्ता विशाल सोनफुल राहतो. त्याच्याशी संपर्कासाठी उद्या जावे असे ठरले, तेव्हा रात्रीच कळले की त्याला अपघात झाला आहे. बस झाडावर जाऊन आदळली. विशालदादा बस व झाडाच्या मध्ये आला, हे ऐकून मन अगदी सुन्न झाले.
उद्या काय पाहावे लागणार, याची कल्पनाच करवत नव्हती. बसमध्ये बसताना डोळ्यांना समजावत होते की, दादापुढे रडायचे नाही. घरात पाऊल टाकताच दादा समोर बेडवर दिसला. त्याच्याकडे बघण्याची हिंमत होत नव्हती. दादाचा डावा हात कापला गेला होता. डाव्या पायात पूर्ण रॉड घातले गेले होते. उजव्या हाताची बोटे चेपून विद्रूप झाली होती. उजव्या मांडीला दुसरी त्वचा बसवलेली होती. एक मिनीट हे सर्व पाहून जागीच थिजून गेल्यासारखे झाले.
नमस्कार म्हटल्यावर तोच पूर्वीचा आनंदी चेहरा व आवाज अनुभवायला मिळाला. हे सर्व कसे झाले, हे विचारून त्यांना त्याच्या आई-वडिलांना त्रास देणे योग्य नव्हे म्हणून लगेच मी कॉलेजच्या संपर्कासाठी आले आहे असे सांगितले. मी कॉलेजला जाते असे सांगितल्यावर तुम्ही कशाला जाता, प्राचार्यांना मी इथेच बोलावून घेतो असे म्हणून लगेच भावाला प्राचार्यांना फोन करून बोलावून घेण्यास सांगितले. प्राचार्य आल्यावर खालीच थांबले, पण दादाने त्यांना वर बोलावून घेतले. प्राचार्यांना बसवून मला म्हणाले, हं सांगा ताई आता. दादाच्या या वाक्याने अगदी स्फुरण चढल्यागत सर्व माहिती सरांना दिली. बोलता बोलता हेही सांगितले की मुंबई, पुणे, नाशिक इ. ठिकाणी जूनपासून हे कार्य सुरू आहे. सरांना मी हे सांगतच आहे तोवर दादा लगेच सरांना म्हणाला की बघा सर, पूर्ण महाराष्ट्रात काम सुरू आहे. आपल्या जळगावातच काम नाही.
त्याही अवस्थेत ही कार्याची तळमळ, यावर काय बोलावे हेच मला सुचेना. सरांना जेव्हा पुस्तक दाखविले तेव्हा दादा म्हणाले की, ताई मलाही पुस्तक दाखवा. येवढ्या वेळात मी सर्व विसरले होते की, दादा कोणत्या अवस्थेत आहे. पटकन पुस्तक काढून त्यांना द्यायला गेला. अरे, दादाचा तर हात कापला गेला आहे. उजव्या हाताने पुस्तके घेतले व ते उघडण्याचा प्रयत्न करू लागला. न राहवून माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले, पुस्तक उघडून देऊ का? पण तोपर्यंत दादाने पुस्तक उघडले होते. संपूर्ण पुस्तक चाळल्यानंतर खूप छान पुस्तक आहे! महाशिबीर केव्हा आहे? हे ऐकल्यावर न राहवून अचानक माझ्या डोळयांतून अश्रू वाहू लागले. विचार करीतच मी घरातून बाहेर पडले. जळगाव केव्हा आले, हे कळलेच नाही !
पुन्हा चार दिवसांनी गेले तेव्हा जळगावच्या पूर्ण कार्याविषयीच विचारणा केली। कोणाकोणाच्या भेटी घ्यायच्या याची तपशीलवार माहिती दादाने दिली. सरांना (कॉलेजला) पुस्तके हवी आहेत असा फोन त्यांनी स्वतःच केला, परंतु उशिरा निरोप पोहोचल्याने त्यादिवशी तिकडे काही जाता आले नाही. 2 दिवसांनी जेव्हा पुस्तके घेऊन गेले, तेव्हा नमस्कार झाल्यानंतर प्रथम त्यांनी पुस्तके आणली का? असेच विचारले. तत्काळ सरांची भेट घेण्यास सांगितले. महाशिबिरासाठी कोण कोण येणार, याची विचारणा केली. नावे सांगितल्यावर त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, "अरे व्वा!'

-मीरा लहांगे, जीवनव्रती कार्यकर्ता, जळगाव.