Saturday, December 13, 2008

कार्याची तळमळ

कार्याची तळमळ
आपण एखाद्या नवीन ठिकाणी जातो तेव्हा तेथील पूर्वी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना घेऊन कार्य कसे पुढे न्यावे, याचा आराखडा तयार करीत असतो. "विजय! पूर्ण विजय!!'साठी जळगावला मी आले आणि येथील कार्य पुढे नेण्याच्या दृष्टीने जे काही आधी परिचयात आहेत त्या व्यक्तींशी प्रथम संपर्क करण्याचे ठरवले. जळगावपासून 25 कि.मी. अंतरावर सामनेर म्हणून एक गाव आहे. तेथे आपला कार्यकर्ता विशाल सोनफुल राहतो. त्याच्याशी संपर्कासाठी उद्या जावे असे ठरले, तेव्हा रात्रीच कळले की त्याला अपघात झाला आहे. बस झाडावर जाऊन आदळली. विशालदादा बस व झाडाच्या मध्ये आला, हे ऐकून मन अगदी सुन्न झाले.
उद्या काय पाहावे लागणार, याची कल्पनाच करवत नव्हती. बसमध्ये बसताना डोळ्यांना समजावत होते की, दादापुढे रडायचे नाही. घरात पाऊल टाकताच दादा समोर बेडवर दिसला. त्याच्याकडे बघण्याची हिंमत होत नव्हती. दादाचा डावा हात कापला गेला होता. डाव्या पायात पूर्ण रॉड घातले गेले होते. उजव्या हाताची बोटे चेपून विद्रूप झाली होती. उजव्या मांडीला दुसरी त्वचा बसवलेली होती. एक मिनीट हे सर्व पाहून जागीच थिजून गेल्यासारखे झाले.
नमस्कार म्हटल्यावर तोच पूर्वीचा आनंदी चेहरा व आवाज अनुभवायला मिळाला. हे सर्व कसे झाले, हे विचारून त्यांना त्याच्या आई-वडिलांना त्रास देणे योग्य नव्हे म्हणून लगेच मी कॉलेजच्या संपर्कासाठी आले आहे असे सांगितले. मी कॉलेजला जाते असे सांगितल्यावर तुम्ही कशाला जाता, प्राचार्यांना मी इथेच बोलावून घेतो असे म्हणून लगेच भावाला प्राचार्यांना फोन करून बोलावून घेण्यास सांगितले. प्राचार्य आल्यावर खालीच थांबले, पण दादाने त्यांना वर बोलावून घेतले. प्राचार्यांना बसवून मला म्हणाले, हं सांगा ताई आता. दादाच्या या वाक्याने अगदी स्फुरण चढल्यागत सर्व माहिती सरांना दिली. बोलता बोलता हेही सांगितले की मुंबई, पुणे, नाशिक इ. ठिकाणी जूनपासून हे कार्य सुरू आहे. सरांना मी हे सांगतच आहे तोवर दादा लगेच सरांना म्हणाला की बघा सर, पूर्ण महाराष्ट्रात काम सुरू आहे. आपल्या जळगावातच काम नाही.
त्याही अवस्थेत ही कार्याची तळमळ, यावर काय बोलावे हेच मला सुचेना. सरांना जेव्हा पुस्तक दाखविले तेव्हा दादा म्हणाले की, ताई मलाही पुस्तक दाखवा. येवढ्या वेळात मी सर्व विसरले होते की, दादा कोणत्या अवस्थेत आहे. पटकन पुस्तक काढून त्यांना द्यायला गेला. अरे, दादाचा तर हात कापला गेला आहे. उजव्या हाताने पुस्तके घेतले व ते उघडण्याचा प्रयत्न करू लागला. न राहवून माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले, पुस्तक उघडून देऊ का? पण तोपर्यंत दादाने पुस्तक उघडले होते. संपूर्ण पुस्तक चाळल्यानंतर खूप छान पुस्तक आहे! महाशिबीर केव्हा आहे? हे ऐकल्यावर न राहवून अचानक माझ्या डोळयांतून अश्रू वाहू लागले. विचार करीतच मी घरातून बाहेर पडले. जळगाव केव्हा आले, हे कळलेच नाही !
पुन्हा चार दिवसांनी गेले तेव्हा जळगावच्या पूर्ण कार्याविषयीच विचारणा केली। कोणाकोणाच्या भेटी घ्यायच्या याची तपशीलवार माहिती दादाने दिली. सरांना (कॉलेजला) पुस्तके हवी आहेत असा फोन त्यांनी स्वतःच केला, परंतु उशिरा निरोप पोहोचल्याने त्यादिवशी तिकडे काही जाता आले नाही. 2 दिवसांनी जेव्हा पुस्तके घेऊन गेले, तेव्हा नमस्कार झाल्यानंतर प्रथम त्यांनी पुस्तके आणली का? असेच विचारले. तत्काळ सरांची भेट घेण्यास सांगितले. महाशिबिरासाठी कोण कोण येणार, याची विचारणा केली. नावे सांगितल्यावर त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, "अरे व्वा!'

-मीरा लहांगे, जीवनव्रती कार्यकर्ता, जळगाव.

No comments: