Tuesday, January 6, 2009

जीवन - घडणीचा मंत्र


अलीकडे आमच्या वृंदाच्या स्वभावात खूपच फरक पडला आहे। माझ्या एका निकटच्या मित्राची ती मुलगी. तशी मुळात सात्विक. वाईट काही करायची नाही, पण बुजरी. सारखे आपण अमुक केले तर कोण काय म्हणेल, असे तिला वाटायचे. दडपणाखाली राहायची. तिनेच सांगितलेला एक प्रसंग. तिच्या घरी कोणी पाहुणे यायचे होते, उच्चभ्रू आणि आधुनिक. तशी वृंदाची सांपत्तिक स्थिती चांगली. राहणीचा दर्जाही आधुनिक संपन्न कुटुंबासारखा. घरी सर्व सुखसोयी, पण तरीही तिच्या मनावर या पाहुण्यांचे एक दडपण आले.


का यावे दडपण? तिने सांगितले, ""आमच्याकडे देवघर आहे. साधु-संतांचे फोटो आहेत. ज्यांनी आम्हा उभयतांवर अनुग्रह केला, त्या आमच्या सद्‌गुरूंचा मोठा फोटो फ्रेम करून भिंतीवर लावलेला आहे. त्याला आम्ही रोज ताज्या फुलांचा हार घालतो, उदबत्ती लावतो. आमच्याकडे ज्ञानेश्र्वरी, भागवत, दासबोद, गीता आदी गं्रथ बैठकीच्या खोलीतच ठेवलेले असतात. आमच्या उपासनेच्या ठरलेल्या वेळा असतात. या पाहुण्यांना यापैकी काहीही पटण्यासारखे नव्हते. ताबडतोब त्यांची टीका सुरू झाली असती. तरुण वयात हे काय चालविले आहेस, असा उपहास झाला असता. काय करावे मला कळेना. अखेर पाहुणे येणार त्यादिवशी मी सगळे फोटो, सगळी पुस्तके गुंडाळून एका पेटीत ठेवून दिली. दोन निसर्गचित्रे बैठकीच्या खोलीत लावली. वाटले, आता कोणी काही म्हणायचे नाही. पाहुणे गेले की सगळे पूर्ववत्‌ करू.''
इतका संकोची स्वभाव वृंदाचा. पाहुण्यांनी काही बोलू नये म्हणून स्वतःचे मन मारून तिने या गोष्टी केल्या. मग ती संकोची स्वभावाची, इतरांच्या टीकेला भिणारी व दडपणाखाली स्वतःचे मन मारणारी वृंदा बदलली कशी? आज तिच्यात एक आत्मविश्र्वास दिसतोय, आपण जर चुकीचे काही करीत नसू तर इतरांच्या बऱ्यावाईट टीकेची चिंता करण्याचे कारण नाही, असे ती स्पष्टपणे म्हणते. आधुनिकातील आधुनिक पाहुणा आला तरी सद्‌गुरूंचा फोटो किंवा घरातील सद्‌गं्रथ हलविणार नाही, आपल्या उपासनेत व्यत्यय येऊ देणार नाही, असे तेजस्वीपणाने सांगते. ती धीट झाली आहे. आपल्या श्रध्दांचे निर्भय समर्थन ती करते व जीवनात श्रध्दा पाहिजेच! असे आग्रहपूर्वक प्रतिपादन करते. मला हा बदल चांगला वाटला आणि मी तिचे अभिनंदन केले.
वृंदाचे निवेदन
पण बदल घडला कसा, यासंबंधीची जिज्ञासाही शमली नव्हती. वृंदाने प्रथम माझा प्रश्न टाळला, हसण्यावारी नेण्याचा प्रयत्न केला, परंतु माझा आग्रह पाहून ती म्हणाली.
""त्याचं असं झालं काका, की ते पाहुणे आले होते ना, त्याचं वागणं, बोलणं मला काही आवडलं नाही. तोंडात सिगारेट, बोलण्यात आत्मप्रौढी आणि परनिंदा. सारखी चर्चा, कोणी किती पैसा कशा मार्गाने मिळविला याचीच. "सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते' ही संस्कृत भाषेतील एकच ओळ बहुधा त्यांना ठाऊक असावी! एकदा ते बाहेर एका हॉटेलमध्ये (परमिट रूम असलेल्या) जेवायलाही जाऊन आले. आम्हालाही चला म्हणाले होते, पण आम्ही काहीतरी निमित्त सांगून जायचे टाळले. माझे मन या चार-दोन दिवसांत अत्यंत अस्वस्थ होते. नित्याच्या कार्यक्रमात खंड पडला होता. सद्‌गुरूंची प्रतिमा पेटीत बंदिस्त होऊन पडली होती. पाहुणे आपल्या तंत्राने "आधुनिक'तेचे प्रदर्शन करीत होते. त्यांना ना पिण्याचा संकोच, ना द्रव्याभिलाषेचा संकोच, ना आत्मप्रौढीचा व परनिंदेचा संकोच! जे करू नये या संस्काराचा सखोल ठसा माझ्या मनावर उमटलेला होता व जिथे चहापासून देखील मी मुक्त झाले होते, तिथे अशा माणसासाठी मी मन मारून का राहावे? जे चांगले आहे आणि जीवन आनंदमय करणारे आहे ते का लपवावे? खरंच काका, मला स्वतःच्या भित्रेपणाचा, बुजरेपणाचा विलक्षण राग आला. हा आपल्या स्वभावातला दोष आहे, असं वाटायला लागलं. वाईट गोष्टी लोक निर्जज्जपणे उघड उघड करतात. कोणी दारू पितात, अभक्ष्य भक्षण करतात, काणी उत्तान चित्रपट पाहण्यासाठी ब्लॅकने तिकिटे खरीदतात - काय काय चालेले आहे घरोघर! त्यापैकी कुणालाही तो जे अनिष्ट करतो, त्याची लाज वाटत नाही आणि मला मात्र सद्‌गं्रथ, सद्‌गुरू, संत यांना आपल्या जीवनात स्थान आहे, याचा संकोच निर्माण झाला. हा न्यूनगंड माझ्यात का असावा? कोणाही साधकात का असावा? मी फार चिडले स्वतःवर. फार मोठी प्रतारणा हातून घडल्याच्या भावनेने बेचैन होऊन गेले मी. संतांची एक उक्ती मी वाचली होती.
नारायणी जेणे घडे अंतराय ।
हो का बापमाय त्यजावी ते।।
आणि आपण काय केले? हे संतविचार केवळ वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठीच आहेत का? छोट्याशा कसोटीत आपण नापास झालो! ही खंत दाटून आली आणि निश्र्चय केला की, मूलभूत श्रध्दांच्या बाबतीत इतःपर तडजोड करायची नाही, संकोच बाळगायचा नाही, निर्भयपणे त्यांचा पुरस्कार करायचा. हा निश्र्चय केला व तसे वागू लागले. तुम्हाला काही फरक दिसत असेल तर तो येवढाच !''
चांगल्याची लाज कसली?
वृंदा खूप आवेगाने बोलत होती, मी ऐकत होतो. तिचा प्रत्येक शब्द खूप समाधान देत होता. कारण आधुनिकतेच्या नावावर माणसं स्वैर वागताना मी पाहत होतो. निष्ठापूर्वक नामाच्या आणि ध्यानाच्या अथवा अन्य कोणत्या मार्गाने जे उन्नत जीवनाची साधना करतात, त्यांची होणारी टवाळी मी वारंवार ऐकत होतो. फार काय, अर्धी विजार (हाफपॅंट) घालून व हाती दंड घेऊन संघ शाखेवर जाणारांचा उपहास मी अनुभवलेला होता. या संदर्भात सहज स्मरण झाले म्हणून एक उल्लेख करतो. मी 1940-41 मध्ये कराचीला असतानाची गोष्ट. काही सिंधी भाषक महाविद्यालयीन विद्यार्थी शाखेवर येऊ लागले. ते फुलपॅंट घालूनच शाखेवर येत. मी हाफपॅंट घालून जात असे. एकदा मी त्या मुलांना म्हटले, ""तुम्ही आता हाफपॅंट घालून येत जा ना, कार्यक्रमाला ते सोयीचे पडते. जरा मोकळेपणाने खेळता येईल आपल्याला.''
त्यावर एक मुलगा बोलला, ""भिशीकरजी, यदि निक्कर पहेनके हम सडकपर से घूमेंगे तो लोग क्या कहेंगे?''
पण मग ते एका पिशवीत अर्धी विजार बरोबर आणायचे. शाखेच्या वेळापुरती ती घालायचे आणि कार्यक्रम संपला की बाहेर पडताना पुन्हा फुलपॅंट चढवायचे. अखेर एक दिवस मी त्यांना म्हटले, ""यात लाज वाटण्यासारखे काय आहे? आपण कितीतरी गोष्टीत परक्यांचे निष्कारण अनुकरण करतो, त्याची लाज आपल्याला वाटत नाही आणि चांगल्या गोष्टीची आपण लाज बाळगतो. इथल्या माता-भगिनींची वेशभूषा, युवकांच्या नाना प्रकारच्या "आधुनिक' सवयी यात भूषण वाटण्यासारखे काय आहे? आपल्याला जे चांगले वाटते व जे चांगले आहे, ते करण्याचे नैतिक धैर्य आपल्यात असले पाहिजे. उद्या हजारो तरुण निक्कर घालून शाखेवर यायला लागले तर आपोआपच सगळी तोंडे बंद होतील.'' नंतरच्या पाच-सहा वर्षांत खरोखरच त्या अतिफॅशनेबल शहरात तसे घडून आले!
आणखी एक छोटीशी आठवण, मी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी असतानाची. मला आंघोळ झाल्यावर कपाळावर उभे गंध लावण्याची सवय होती. शाळेत जाताना ते गंध बहुधा कपाळावर असेच. आमच्या नववीच्या वर्गात एक जरा थोराड विद्यार्थी होता. अनेकदा शाळेबाहेर मी त्याला धूम्रपान करताना पाहिले होते. हाच विद्यार्थी शाळेत मी दिसलो की "भटजीबुवा' म्हणून माझी टिंगल करायचा. एक दिवस त्याने जरा मर्यादेबाहेर टिंगल करताच माझा पारा चढला व मी त्याला चढ्या आवाजात म्हटले, ""बाप्या, चारचौघात सिगारेटी फुंकताना तुला शरम वाटत नाही आणि कोणी गंध कपाळी लावले की तुला टिंगल सुचते होय? मला मुळीच लाज वाटत नाही माझ्या कपाळीच्या गंधाची आणि पुन्हा या बाबतीत काही बोललास तर याद राखून ठेव! ही टिंगल माझी नाही, आपल्या सगळ्यांच्या बापजाद्यांची आहे व ती सहन होणार नाही!'' तेव्हापासून त्याची टवाळी थांबली. हा विद्यार्थी अतिधूम्रपानामुळे पुढे तरुण वयातच असाध्य दुखण्याला बळी पडला!
श्रेष्ठ जीवनाचे गमक
वृंदाचे म्हणणे अगदी खरे होते. ज्या गोष्टींची खरोखरच लाज वाटायला पाहिजे, त्यांची कोणला लाज वाटत नाही, संकोच वाटत नाही आणि ज्या गोष्टींनी सुसंस्कारित व उन्नत जीवन उभे होते, त्या गोष्टींची मात्र टवाळी होते! वृंदाशी त्यादिवशी पुष्कळच बोलणे झाले. स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची जी दृष्टी तिने प्राप्त करून घेतली आहे, ती मला फार स्पृहणीय वाटली. या तिच्या विचारांचा स्त्रोत अर्थात्‌ सद्‌गुरूंचा उपदेश, संतांचे साहित्य, तिच्याप्रमाणेच वाटचाल करणाऱ्या साधकांचे व तिचे स्वतःचे अनुभव हा आहे.
यातील मुख्य सूत्र हे की श्रेष्ठ प्रतीचे जीवन याचा अर्थ प्रथम आकलन झाले पाहिजे व तदनुसार आपले जीवन घडविण्याचा जिद्दीने प्रयत्न केला पाहिजे. वृंदाने खुलासा केला तो असा ः "चांगल्या किंवा श्रेष्ठ जीवनाचे मुख्य गमक म्हणजे त्यातील अखंड प्रसन्नता, स्नेहार्द्रता, आनंदमयता आणि अहंकाररहितता. पैसा व चांगले जीवन यांचा लावण्यात येणारा संबंध सर्वस्वी भ्रममूलक आहे. प्रसन्नता यायची व टिकून राहायची तर आंतरिक शांतता पाहिजे. ती संपादन करण्याच्या आड जे येत असेल ते त्याज्य व ती शांतता, आनंदमयता, तृप्तता वाढविण्याला जे पोषक ठरत असेल ते ग्राह्य असा विवेक करीत रोज जगायचे. ज्या मार्गांनी जीवनात कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नसलेला निर्विषय आनंद प्राप्त होतो, त्या गोष्टींची मुळीच लाज बाळगायची नाही, वेळ वाया घालवायचा नाही.''
हे ऐकणे व समजून घेणे तसे अवघड ठरू नये, पण अवघड वाटते खरे. स्थूल स्वरूपात काही नेमक्या गोष्टी दृष्टीपुढे येत नाहीत. ही अडचण माझीच नाही, अनेकांची आहे. आनंद, प्रेम, शांती, तृप्ती हे मोठमोठे शब्द आहेत. त्या दिशेने रोजच्या धकाधकीच्या जीवनात जायचे कसे? अशा प्रश्नांची उत्तरे देण्यात वृंदा आता तयार झालेली दिसली. तिने शेजारचेच मनाच्या श्र्लोकाचे पुस्तक उचलेले व म्हणाली, ""कोणी विचारले तर मी सांगते, जे जडजड वाटते ते वाटल्यास वाचू नका. मनाचे श्र्लोक तर सोपे आहेत ना? त्यातील 47 व्या श्र्लोकापासून (मनी लोचनी.....) 56 व्या श्र्लोकापर्यंत (दिनाचा दयाळू.....) "जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा' अशी चौथी ओळ असलेले केवळ दहा श्र्लोक आहेत. ते अवधान देऊन आणि अर्थ समजावून घेऊन वाचावेत. हे जीवनाचे "मॉडेल' समोर ठेवावे आणि त्याप्रमाणे आपले जीवन घडविण्याचा रोज प्रयत्न करावा. बस, यापेक्षा अधिक काही करावयास नको. यात सारे काही "कॉंक्रीट' आहे. हवेतील काहीही नाही. असे जीवन घडविण्यासाठी काही मार्ग आहेत, तेही या श्र्लोकात सूचित केले आहेत. ही मी साधना मानते. प्रत्येक गोष्टीचा माझ्या जीवनात मला अनुभव घेता यावा असा प्रयत्न करते. यादृष्टीने आत्मनिरीक्षण करते.''
""अनुभव शब्द खूप ऐकतो, पण अनुभव घेण्याचा प्रयत्न कसा करायचा?'' अनेकांच्या मनातील आणखी एक शंका मी वृंदापुढे ठेवली. तिचे उत्तर तयारच होते. ती म्हणाली, ""उदाहरणादाखल मनोबोधातला 48 वा श्र्लोक घेऊया.'' मी पुस्तक घेतले व तो श्र्लोक वाचला -
सदा देवकाजी झिजे देह ज्याचा ।
सदा रामनामे वदे नित्य वाचा ।
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वात्तमाचा।।
वृंदाने मग खुलासा केला, ""मी रोज माझ्या मनाला विचारते, माझा देह परमेश्र्वराला प्रिय अशाच गोष्टी करण्यात गुंततो की स्वार्थापायी, रागापायी, द्वेषापायी, मत्सरापायी काही करतो व मनाला व्यग्रता येते? परमेश्र्वराचे नाव माझ्या मुखात नित्य असते का? अगदी रोजची साधीसाधी कामे करताना देखील! माझा जो स्वधर्म आहे म्हणजे जी प्राप्त कर्तव्ये कुटुंबाचा व समाजाचा घटक या नात्याने मला केलीच पाहिजेत, ती मी उत्तम प्रकारे पार पाडते ना? त्यात हयगय, आळस, कामचुकारपणा तर करीत नाही ना? या प्रश्नांची पूर्ण समाधानकारक उत्तरे अद्यापही मिळत नाहीत, पण कालच्यापेक्षा आज काही सुधारणा झाली आहे का? उणीव राहात असेल तर ती का? उणीव राहण्याची कारणे दूर करण्यासाठी माझी साधना अधिक चांगली व्हावयास हवी ना? याच प्रकारच्या सावध आत्मनिरीक्षणातून प्रगती होत गेली, समाधान वाढत गेले. संतवचनांचा अनुभव घेण्याची हीच पध्दती आहे. संत नामदेवांनी ज्ञानेश्र्वरीसंबंधी सांगताना "एक तरी ओवी अनुभवावी' असे म्हटले. त्याचा अर्थ आता कुठे सद्‌गुरूंच्या कृपेने मला थोडा थोडा कळायला लागला आहे.''
वृंदाच खरी मोठी
वृंदा बोलत होती, मी तिच्या मुखाकडे पाहत होतो. मला तिथे विलक्षण सात्विकतेचे एक तेजोमय पण माणसाला निवविणारे वलय दिसत होते. हा एक न विसरण्यासारखा अनुभव होता! एक साधी बुजरी मुलगी, पण दैनंदिन प्रयत्नांनी व सद्‌गुरूंवरील कृतिशील श्रध्देने किती उंच झाली होती! स्वतःच्या टीचभर आणि नाशवंत देहाची बांधिलकी गळून पडली तरच माणसे अशी विकसतात, मोठी होतात. वृंदाच्या आणि माझ्या वयात केवढे तरी अंतर, पण वृंदा मला खूप खूप मोठी वाटली. जीवन घडवावे कसे, याचा मंत्रच जणू आज या मुलीने सांगितला होता. आता माझे आयुष्य ते किती? पण वृंदाने मला जे काही सांगितले ते तरुण मित्रांनी अवश्य विचारात घ्यावे असे मला वाटते. म्हणूनच तर हा अनुभव शब्दांकित करण्याचा आजचा प्रयत्न.
मी उठलो, वृंदा मला नमस्कार करावयास खाली वाकली. मी मनोमन म्हणालो, "" वृंदा, नमस्काराची खरी अधिकारी तूच आहेस. गुणाः पूजास्थानं गुणिषु न च लिङ्‌गं न च वयः।।'' ***

No comments: