Thursday, April 14, 2011

संपादकीय april

'धर्म हा भारताचा आत्मा आहे. खरा भारत चंद्रमौळी झोपड्यात आहे.' हे
स्वामी विवेकानंद यांचे १०० वर्षांपूर्वीचे उद्गार आजही तेवढेच प्रासंगिक
आहेत. आज भारत जगातील एक महाशक्ती म्हणून उदयास येत आहे. एकीकडे
अब्जाधिशांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे कर्जाच्या विळख्यातून सुटका
करून घेण्यासाठी मृत्यूला कवटाळणारे लक्षावधी शेतकरी, वासनेचा बाजार,
गोत्र आणि जात पंचायतींची गडद होत असलेली जळमटं, शेजारील देशांत अनागोंदी
माजलेली, आपल्या परिपक्व लोकशाहीत भ्रष्टाचाराला आश्रय देणार्‍या वृत्ती
बळावत आहेत. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विसंगतींनी घेरलेले हे जगातील एक
प्राचीन राष्ट्र महान नियतीच्या सूर्योदयाने जागृत होत आहे. या अनोख्या
वेळी स्मरण असू द्या की या धरतीच्या कणाकणात राम व्याप्त आहे अन्
प्रत्येक निर्णयाच्या वेळी दिशादर्शनाचं कार्य पार्थसारथी श्याम करीत
आहे. विश्‍वास बसत नसेल तर कोणत्याही खेड्यातील अशा ठिकाणी जाऊन पहा की
जिथे चार-पाच भारतीय (ते अशिक्षित, खेडवळ असतील तर आणखी चांगले) बसलेले
असतील. गावच्या चावडीवर जायचं भाग्य कधी मिळालं नसेल तर भारतीय
रेल्वेच्या जनरल (सर्वसाधारण) बोगीतून प्रवास करा. तिथे सुरुवातीला भलेही
भ्रष्टाचार किंवा राजकारण या विषयांवर चर्चा सुरू होईल, परंतु १०-१५
मिनिटांत ती धर्मावर (रिलिजन नव्हे) येईल. तुकोबांची गाथा, ज्ञानेश्‍वरी,
दासबोध, रामचरितमानसच्या चौपाई, कबीर-रहीमचे दोहे, शास्त्रवचनांचे आधार
पुढे येऊ लागतील. माणसं जेवढी साधारण असतील तेवढ्या लवकर त्यांची चर्चा
धर्म-अध्यात्मावर येईल. आजही खेड्यात जाऊन पहा- रात्रीच्या वेळी जय
हनुमान, ॐ नम: शिवाय, महाभारत अशा धाटणीच्या टीव्ही कार्यक्रमांनाच
लोकांची पहिली पसंती आहे. गावागावांत दरवर्षी ग्रामदेवतेची जत्रा
तेवढ्याच उल्हासाने साजर्‍या होताहेत.धर्माच्या परिभाषेत सांगितलेली
गोष्ट आपल्या लोकांना अधिक भावते. या देशातील जनता सहजपणे ज्या गोष्टींशी
एक होते ती गोष्ट म्हणजे धर्म आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या 'स्पीकिंग
ट्री' या उपक्रमांतर्गत मार्च २०११ मध्ये भारतातील शहरी तरुणांचं
सर्वेक्षण प्रसिद्ध झालं आहे. ९१ टक्के तरुणांचा कल धर्म-अध्यात्माकडे
असल्याची बाब यातून समोर आली आहे. (
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/7637389.cms
)कारण धर्म ही भारताची आत्म चेतना आहे. व्यक्ती, कुटुंब, कुल, जाती,
प्रांत आणि राष्ट्राला स्वत:ची एक अंगभूत रचना असते. स्वभाव असतो. एक
संदेश असतो. हा धर्म जाणणे आणि त्याचा निर्वाह करणेच प्रत्येकाच्या
जीवनाचे ध्येय असते. वैयक्तिक जीवनात यशस्वीतेसाठी आणि जीवनाच्या
सार्थकतेसाठी आपल्या स्वभावानुकूल कर्म करणे जेवढे अनिवार्य असते तेवढेच
परिवार, समाज आणि राष्ट्रासाठीही प्रासंगिक असते. व्यक्तिगत आणि सामूहिक
व्यवहारातून असा प्रयत्न चालू असतो. स्वधर्म पालन किंवा अवहेलना यामुळे
राष्ट्राचे उत्थान किंवा पतन होत आले आहे. शिक्षण व संस्काराची प्रत्येक
समाजाची व्यवस्था म्हणजे याच आत्म-चेतना जागरणाचा संस्थात्मक किंवा
पारंपारिक प्रयत्न असतो. संस्कृतीच्या मुळांना चांगल्या रीतीने सिंचित
केल्यास वैज्ञानिक प्रयोगांप्रमाणेच ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा
प्रत्ययाला येऊ शकते. समाज जेव्हा आपल्या आत्म चेतनेनुसार जागृत व्यवहार
करीत असतो अर्थात आपल्या धर्माचे पालन करीत असतो तेव्हा व्यक्ती, केवळ
परंपरेच्या पालनातूनही आपल्या आत्म चेतनेची सहज, जैविक, सर्वोत्तम
अभिव्यक्ती करून आपले अंतिम उद्दिष्ट प्राप्त करू शकते. परंतु समाजाची
आत्म चेतनाच विस्मृतीत गेली असेल तर अशा वेळी यशस्वी आणि सार्थक जीवनाची
पहिली पायरी आत्मचेतनेचा परिचय हीच असू शकते. स्वत:ची ओळख करून घेण्यालाच
'प्रबोध' म्हटले जाते. बोधी गयाच्या 'त्या' वृक्षाखाली गौतमाच्या
आत्मचेतनेचे जागरण झाले आणि या 'प्रबोधा'ने तथागत बुद्धाचा जन्म झाला.
सार्‍या जगातील दु:ख दूर करण्यासाठी संघटित शक्तीचे साक्षात अवतरण बुद्ध
धम्माच्या रूपात झाले. आपल्या आईच्या हाकेने -'जागृत शंकर जागृत', चार
वर्षाच्या शंकराला प्रबोध झाला. यातूनच आद्य शंकराचार्यांच्या रुपाने
अद्वैत वेदांताची पुनर्स्थापना झाली. भारताच्या सुप्त आत्मचेतनेच्या
जागरणाचे हे अनुष्ठान हजारो वर्षांपासून सतत सुरू आहे. ही शृृंखला
अखंडपणे सुरू आहे. व्यक्तिगत प्रबोधाच्या सामूहिक प्रगटीकरणातून हे
राष्ट्र पुन: पुन: आपल्या नियतीकडे अग्रेसर झाले आहे. आधुनिक काळात
कन्याकुमारीच्या श्रीपाद शीलेवर स्वामी विवेकानंदांच्या 'प्रबोधा'मुळे
राष्ट्रीय आत्मचेतनेच्या जागरणाला प्रारंभ झाला आहे. तो आजही सुरू आहे.
२०१३ साली स्वामी विवेकानंदांच्या जन्माला १५० वर्षे पूर्ण होत आहेत.
स्वामीजींच्या सार्ध शती समारोहाच्या तयारीला प्रारंभ झालाय. आपल्या जीवन
लक्ष्याच्या 'प्रबोधा'ची ही सुवर्णसंधी आपल्यासमोर चालून आली आहे. 'भारत
जागो ! विश्‍व जगाओ!!' हा मंत्र घरोघर पोहचविण्याचे अभियान मानवतेचा
प्रबोध बनावा, या प्रार्थनेसह हा अंक सादर करीत आहोत. गुढीपाडवा, भारतीय
नववर्षाच्या शुभेच्छा !

--
visit @
www.psiddharam.blogspot.com

No comments: