Sunday, July 9, 2017

गुरुपौर्णिमा : मुळांचे पोषण

यावर्षी गुरुपौर्णिमेसाठी आपण "मुळांचे पोषण’ हा विषय घेतला आहे.
स्वामी विवेकानंद म्हणतात, "तुम्ही झाडांच्या मुळांना पाणी घाला. सर्व झाडाला ते आपोआप मिळेल.’
वेद ही आपल्या राष्ट्राची मुळं आहेत. वेद म्हणजे काय तर वेदांची एकात्म दृष्टी आणि वैदिक मूल्ये, तत्त्वे.

प्रिय बंधू आणि भगिनींनो,
सप्रेम नमस्कार,


या वर्षी ९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे.
आपण आपल्या गुरू परंपरेचा सन्मान  करण्यासाठी व्यास जयंती ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो. ही परांपरा ईश्वरापासून सुरू झाली आहे. परंतु आपण व्यास जयंती - आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो. यामागे कारण आहे. वेगवेगळ्या ऋषींकडून प्राप्त झालेले शाश्वत, सनातन  ज्ञान निरनिराळ्या ऋचांमध्ये विखुरलेले होते. त्या ऋचांचे संकलन आणि संपादन  महर्षी व्यास यांनी केले. त्यांनी वेदांच्या विविध शाखा आणि विद्या यांचे दायित्व विविध समाज आणि कुटुंबांकडे सोपवले आणि गुरू - शिष्य परंपरा सुरू करून शाश्वत ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहील याची पद्धतशीर व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे आपल्या देशावर एवढी आक्रमणे होऊनही वेद आणि विविध विद्यांचा महत्त्वाचा भाग आजही टिकून आहे. म्हणून हा दिवस आपल्या संस्कृतीतील तसेच जीवनातील सर्व गुरूंचे आदराने स्मरण करण्याचा आहे.

आपल्यासाठी विवेकानंद केंद्रामध्ये ईश्वर हाच आपला गुरू आहे.
ज्या नावाच्या कक्षेत ईश्वराचे सर्व आविष्कार आणि नावे येतात, जे नाव सर्व भाषांच्या पलीकडचे आहे, ईश्वराचे ते नाव, ती संज्ञा म्हणजेच ॐ कार आहे. म्हणून आपण ॐ कार हा आपला गुरू मानला आहे. तो गरू परंपरेचे प्रतिनिधित्व करतो.
आपल्या (विवेकानंद केंद्राच्या) पाच प्रमुख उत्सवांपैकी सगळेच काही आपण जाहीरपणे साजरे करत नाही. काही उत्सवांचे स्वरूप हे आपल्यापुरतेच मर्यादित असते. हे उत्सव आपण आपल्या कार्यकर्त्यांची आंतरिक शक्ती वृद्धिंगत व्हावी यासाठी करतो. गुरुपौर्णिमा हा असाच एक उत्सव आहे.

यावर्षी गुरुपौर्णिमेसाठी आपण "मुळांचे पोषण’ हा विषय घेतला आहे.
स्वामी विवेकानंद म्हणतात, "तुम्ही झाडांच्या मुळांना पाणी घाला. सर्व झाडाला ते आपोआप मिळेल.’
वेद ही आपल्या राष्ट्राची मुळं आहेत. वेद म्हणजे काय तर वेदांची एकात्म दृष्टी आणि वैदिक मूल्ये, तत्त्वे.

आपला देश स्वतंत्र झाला आहे. कदाचित हिंदू जागे होतील आणि संघटितही होतील. पण जोपर्यंत आपण आपल्या राष्ट्रीय व्यवस्थेची आणि आपल्या वैयक्तिक जीवनाची वेदांच्या एकात्म दृष्टीने आणि वैदिक तत्त्वांनुसार पुनर्बांधणी करत नाही तोपर्यंत खरे राष्ट्र निर्माण होणार नाही.
काही ऐतिहासिक बंधनांमुळे काही पद्धती आपण स्वीकारल्या असतील पण ती आपली परंपरा नाही. आपली मूळ संस्कृती नाही. जसा काळ बदलत जाईल, तसे आपण योग्य दृष्टिकोनाच्या आणि कार्यपद्धतींच्या आधारे आपल्या मुळांशी जोडले जायला हवे. विवेकानंद केंद्राचा मूळ उद्देश हा आहे.

विवेकानंद केंद्राचे संस्थापक माननीय एकनाथजी म्हणत, वेदांतून प्रेरणा घेतलेल्या वैचारिक चळवळीची गरज आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितले, तुमच्या अाध्यात्मिकतेने जग जिंका. एकनाथजी याचे स्पष्टीकरण करतात. ज्या दुर्गुणांनी आपल्या देशाला पछाडले आहे ते दूर करावयाचे असतील तर साऱ्या देशाला चैतन्ययुक्त करण्याचे एक प्रचंड आंदोलन हाती घेणे आवश्यक आहे. हे कार्य दुहेरी स्वरूपाचे असले पाहिजे.
अशा कार्याचे पहिले अंग आपल्या लोकांमध्ये स्वभावत: असलेली ईश्वराभिमुखता, उपनिषदांच्या शिकवणुकीच्या अनुषंगाने सुयोग्य अशा अध्यात्मिक प्रवृत्तीमध्ये रूपांतरित करणे. ही शिकवण कोणती ? एक - प्रत्येक व्यक्तीत परमेश्वराचा अंश आहे; आणि दोन - परमेश्वरावरील श्रद्धा; म्हणजेच उच्चतर दैवी पातळीवर आरूढ होण्यास आपल्यातील सुप्त क्षमतेवरील श्रद्धा.
या कार्याचे दुसरे अंग म्हणजे अशा प्रकारे निर्माण झालेली आध्यात्मिक प्रेरणा राष्ट्राच्या पुनर्रचनेच्या कार्यात प्रवृत्त करणे. आपल्या केंद्र प्रार्थनेमध्ये याचे सविस्तर स्पष्टीकरण आले आहे.

आपल्या केंद्र प्रार्थनेमध्ये असणाऱ्या पाच वैदिक तत्त्वांवर आपण भर द्यायला हवा.
१. ध्येयमार्गानुयात्रा - जी मुळांचे पोषण करण्यावर भर देते. म्हणजे जर आपण त्याग, सेवा आणि आत्मबोधाच्या मार्गाने गेलो तर वैदिक मूल्यांचे आचरण सोपे असते.
२. वयम् सुपुत्रा अमृतस्य नूनम् - आपल्यातील प्रचंड आत्मविश्वास आणि जे उत्तम आहे त्याचे प्रकटीकरण व्हावे यासाठी परिपूर्णतेचा ध्यास.
३. आपल्यासाठी ईश्वराची आराधना म्हणजेच आर्त आणि विपन्नांची कोणत्याही वैयक्तिक स्वार्थाशिवाय केलेली (निष्काम बुद्ध्या) सेवा.
४. तवैवाशिषा पूर्णतां तत्प्रयातु - आपण खडतर प्रयत्न करायलाच हवेत. पण कार्य ईश्वराच्या आशीर्वादानेच, त्याच्या योजनेप्रमाणेच पूर्ण होते. त्यामुळे कार्यात नम्रता ठेवून ईश्वरीय योजनेला शरण जा.
५. जीवने यावदादानं स्यात प्रदानं ततोधिकम् - जीवनात हिशेबीपणाने न वागता जेवढे काही मिळते त्यापेक्षा कितीतरी अधिक दिले जावे.

या सर्व गोष्टी आचरणात आणायच्या असतील तर कार्यकर्त्यांनी पुढील गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

१. वेळेचे नियोजन – हे जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत काम करू शकणार नाही. काय आवश्यक आणि काय अनावश्यक याचा विचार व्हायला हवा. आपण आपला वेळ गॅजेटस्मध्ये घालवणे योग्य नाही. आपले स्वत:वर बंधन असले पाहिजे. मोहाने त्यांचा भंग होऊ देऊ नये म्हणून आपण त्याला व्रत म्हणू शकतो.

२. वाणी संयम – हनुमंताची निवड श्रीरामांनी त्याची वाणी ऐकून केली. त्याच्या वाणीची चार लक्षणे होती.
अदीर्घम – थोडक्यात म्हणणे मांडा. आपले ध्येय आणि उद्दिष्ट जोपर्यंत स्पष्ट नसते तोपर्यंत आपण मोजकेच, स्पष्टपणे बोलू शकत नाही.
अविलंबितम् – लगेच बोला. आपल्याला आपल्या कार्यक्षेत्राची पूर्ण माहिती असेल तरच आपण लगेच त्याबद्दल बोलू किंवा सांगू शकतो.
असंदिग्धम् – कधीही संदिग्धपणे बोलू नका. कार्याबद्दलची स्पष्टता असल्याशिवाय असंदिग्धपणे बोलता येणार नाही. नेहमी कार्याबाबत तत्पर आणि प्रामाणिक राहा.
अव्याहतम् – आपल्या बोलण्याने कोणी दुखावला जाऊ नये. आपल्या मनात जर इतरांबद्दल अनुकंपा प्रेम नसेल तर आपण अव्याहतपणे बोलू शकत नाही.

३. आत्मीयता – एकाच चैतन्यापासून सर्व उत्पन्न झाले आहे. एकोहम् बहूस्याम् – मी एक आहे मला अनेक व्हायचे आहे. म्हणून ॐ काराची उपासना म्हणजे एकत्वाची अनुभूती घेणे आहे. सर्वांबरोबर एकत्वाची भावना निर्माण होणे आहे. आपल्या कुटुंबाशी, समाजाशी, राष्ट्राशी आणि संपूर्ण निर्मितीशी एकात्मता आणि आत्मीयता हाच आपल्या कामाचा पाया आहे.

४. निरहंकारिता – आत्मीयतेचा भाव येण्यासाठी क्षूद्र असा "मी', ‘मी आणि माझे’ सोडून द्यायला हवे. तेव्हाच आपण एकत्र काम करू शकतो. ‘मी’ हा मोठा अडथळा आहे. बऱ्याचदा कार्यकर्ता अतिशय कार्यतत्पर, समर्थ असतो पण त्याचा "मी’ जर प्रत्येक कामात यायला लागला तर तो कार्यकर्त्यांमध्ये एकोपा निर्माण करू शकणार नाही. त्यामुळे कार्य वाढणार नाही.

५. स्वत:कडे पाहा. आपल्यात काही गुण, लक्षणे अशी असतील की जी कार्यासाठी उपयुक्त असतील, त्यांचा आणखी विकास करायला हवा. जी लक्षणे उपयुक्त नाहीत ती हळूहळू कमी करायला हवीत. आपल्यावर जर आधीच चमूची जबाबदारी असेल तर दुसरा कोणी आपल्या चुका सुधारू शकणार नाही. आपणच आपल्याकडे चिकित्सक बुद्धीने पाहून सुधारणा करायला हवी.

सरतेशेवटी मुळांचे पोषण, त्यांना पाणी देणे म्हणजे काय तर आपण आपल्या आयुष्यात वैदिक तत्त्वांचा अाविष्कार करण्यासाठी स्वत:ला घडवणे.
जेव्हा आपल्यासमोर आव्हानात्मक उद्दिष्ट असते तेव्हाच आपल्यात जे उत्तम आहे ते प्रकट होते. त्यासाठी आवश्यक असे गुण, संघभावना विकसित होण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. म्हणून या वर्षाकरिता प्रत्येक नगराने अधिकारी बैठकीत ठरवलेल्या १० पैकी ३ "करणीयम्’ बिंदू निवडलेले आहेत. या तीन "करणीयम्’साठी लागणारे कार्याचे नियोजन प्रत्येक नगराने केलेच असेल. जर केले नसेल तर ते गुरुपौर्णिमेच्या आधी करता येईल. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण ते ॐ काराला समर्पित करू शकू.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी केंद्रात केंद्र प्रार्थनेचा अभ्यासवर्ग घ्यावा. त्यामध्ये प्रार्थनेतील वरील पाच बिंदूंवर चर्चा व्हावी किंवा वरील पाच बिंदूंवर किंवा तीन "करणीयम्’चे ध्येय साध्य करण्यासाठी लागणाऱ्या बाह्य आणि आंतरिक तयारीवर कार्यशाळा घ्यावी. बाह्य तयारी म्हणजे काय तर त्यासाठी लागणाऱ्या कार्यकर्त्यांची, साधनांची यादी करणे, जमवणे, आणि आवश्यक असे सूक्ष्म नियोजन. आंतरिक तयारी म्हणजे काय, आपला ठामपणा, जबाबदारी, तीन "करणीयम्’साठी लागणारे गुण विकसित करणे, वृद्धिंगत करणे. उदाहरणार्थ जर आपण योग वर्गाची संख्या वाढवायची असे ठरवले असेल तर जरी वर्ग शिक्षक वर्ग घेणार असले तरी इतर कार्यकर्त्यांनीसुद्धा योगाचा सराव, अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे केंद्रात असे वातावरण निर्माण होईल की ज्यामुळे लोकांना केंद्रात येऊन योग शिकावा अशी प्रेरणा मिळेल. अशा रीतीने तीन "करणीयम्'चा ध्यास सर्व कार्यकर्त्यांच्या मनात सतत राहू दे. त्यांची मने आणखी समृद्ध होऊ देत.
अशा प्रकारची वातावरण निर्मिती करण्याचा निश्चय करण्यासाठी आणि स्वत:ला त्यासाठी तयार करण्यासाठी गुरुपौर्णिमा हे निमित्त आहे.

शुभेच्छांसह,
तुम्हा सर्वांची
निवेदिता

No comments: