विश्वकल्याणाचा हिंदू मार्ग
कन्याकुमारीच्या विवेकानंदपुरम परिसरातली अशीच एक नित्याची संध्याकाळ. दिवसभर वाचन आणि लेखन करून त्या संध्याकाळी थोडासा बाहेर पडलो होतो. आकाश काळ्याभोर ढगांनी भरलेले होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, असे वाटत होते. मळभ असल्यामुळे लांबचे काही दिसत नव्हते, पण माझ्यापासून थोड्याच अंतरावर एक मोर दिसत होता. एकटाच उभा होता. माझ्या अस्तित्वाची त्याला अजिबात चाहूल लागलेली नव्हती. बघता बघता त्याने आपला पिसारा उभारला आणि सुप्रसिद्ध मयुरनृत्य सुरू केले. इतक्यात पावसाची भुरभुर सुरू झाली. मग तर त्याचे नृत्य अगदीच भरात आले. त्याला त्याचवेळी नाच करण्याचा "मूड' कसा आला, याचे आश्र्चर्य करीत मी थोडासा झुडपांच्या आड दडलो आणि हर्षविभोर होऊन सुरू असलेला तो नाच बघतच राहिलो!
पाऊस पडला की मोरांना आनंद होतो आणि ते नाचायला लागतात, असे म्हणतात, ते खरेच वाटत होते। मोराचा तो नाच उत्स्फूर्त वाटत होता, मनःपूर्वक वाटत होता. थोड्या वेळात तो नाच संपला आणि तो मोर झाडाझुडपांत अदृश्य झाला, पण मी एक विलक्षण अनुभव घेतला. तो पाऊस, तो मोर आणि त्याचा नाच यांची एक विलक्षण एकतानता मी अनुभवली. तो नाच कोणी पाहत नव्हते, मी तर त्याच्या खिजगणतीतही नव्हतो. त्यामुळे कोणाला तरी खुष करण्यासाठी किंवा कोणाला तरी प्रभावित करण्यासाठी तो नाच मुद्दाम केलेला नव्हता, तर तो उत्स्फूर्त होता. आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम होता तो. मोराचा पिसारा उभारला गेला तेव्हा त्याच्या पिसांचा मनमोहक रंग दृष्टीस पडला. कोणाचेही भान हरपून जावे, असे ते दृश्य होते. नाच करतानाचे मोराचे पदन्यास इतके तालावर होते की, कसलेल्या नर्तकालाही एवढ्या तालात आणि ऐटीत पावले टाकता येणार नाहीत.
त्या दुर्मिळ दृश्याने माझ्या मनात विचारांच्या साखळीला सुरुवात झाली। निसर्गातल्या साऱ्याच प्रक्रियांमध्ये अशी तालबद्धता आणि एकतानता, समरसता आढळत असते. आपल्या सभोवती वाढणारी झाडेसुद्धा अशी उत्स्फूर्त एकतानता व्यक्त करीत असतात. पक्ष्यांचा कलकलाटसुद्धा सभोवतालच्या वातावरणाशी मेळ साधत असतो. अनेक प्रकारचे, अनेक जातींचे पक्षी कसलीही कटुता येऊ न देता सहजीवन व्यतित करीत असतात. मध्येच थोडाफार संघर्ष झाला तरीही तो विसरून ते पुन्हा एकदिलाने नांदायला लागतात. आपल्या भोवतीच्या निसर्गाचेही स्वरूप असेच आहे. हे विश्र्व व्यापक, मोठे आणि महाकाय आहे. त्यात अतिव्याप्त समुद्र आहेत. विशाल खंड आहेत. ग्रह-तारे आहेत. ग्रहमाला आणि आकाशगंगा आहेत. हे विश्र्व विस्तारत चालले आहे, पण त्याचा परिणाम होऊन कोणतेही ग्रह परस्परांवर आदळत नाहीत, ते आपापल्या भ्रमणकक्षा आणि परिघातच फिरत आहेत. जणू काही ते ठरवून दिलेल्या सूचनांबरहुकूम वागत आहेत. दिवस, रात्र, ऋतू, परिभ्रमण, आवर्तन आणि क्रांती-उत्क्रांतीची चक्रे सारे काही आखून दिल्याप्रमाणे बिनचूकपणे सुरू आहे.
आमच्या प्राचीन काळातल्या जाणत्या विचारवंतांनी आणि द्रष्ट्या ऋषी-मुनींनी ध्यान-धारणा आणि चिंतनाच्या जोरावर काळाचे हे परिभ्रमण आणि चिरंतन रचना जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. हे सारे एका शाश्वत नियमाने चालले आहे, अशी त्यांची धारणा होती. या नियमाला ते "ऋतम्' असे संबोधत होते. त्यांच्या मते हा सारा एका उच्चतम सत्याचा आविष्कार आहे. त्या एकमेव सत्याला ते "सत्यम्' असे संबोधत होते. त्या चाणाक्ष द्रष्ट्यांनी मानवतेविषयीच्या गाढ प्रेमापोटी याच नियमाने मानवी व्यवहारही संचलित व्हावेत असा सल्ला दिला होता. त्यालाच त्यांनी धर्म ही संज्ञा दिली होती. मानवाच्या वर्तनासाठीच्या तत्वांचा हाच आधार असावा, असे त्यांचे म्हणणे होते. सर्व मानवी जातच त्या धर्माच्या आधारावर चालावी, असे त्यांचे आकलन होते. म्हणजे त्यांच्या दृष्टीने धर्म हा सर्वकालिक होता, शाश्वत होता. त्यालाच त्यांनी विश्र्वधर्म किंवा सनातन धर्म म्हटले होते. व्यक्ती आणि समाज या धर्माचे पालन करतील तेव्हा या मानवी जातीत एकतानता, सहकार्य, मेळ आणि आनंद निर्माण होईल, अशी ग्वाही या विचारवंतांनी दिली होती. त्यालाच ते सत्ययुग म्हणत असत.
ज्या काळात समाजावर धर्माचे वर्चस्व होते। कसलेही अपभ्रंश न करता धर्म पाळला जात होता, तेव्हा सत्ययुग होते. मग पुढे असे काय घडले? निसर्गाशी असलेली एकतानता, मेळ गेला कुठे? मानवी जात अशा अवनत अवस्थेला येऊन का पडली? सर्वत्र अधर्माचे साम्राज्य का वाढले? याचे स्पष्टीकरण मानवी स्वभावात दडलेले आहे. मानव हा निसर्गातल्या इतर जीवांपेक्षा वेगळा आहे. एखादा मोर आनंदित झाला की, एखाद्या लहान बालकाप्रमाणे नाचायला लागतो. तो हा नाच अंतःस्फूर्तीने करतो. झाडे आणि पक्षीही असेच अंतःस्फूर्तीने वर्तन करतात. ते वर्तन ठरवून किंवा योजून केलेले नसते किंवा विचारपूर्वकही केलेले नसते. माणसे मात्र अंतःस्फूर्तीपेक्षा विचाराने जास्त वर्तन करीत असतात. मानव हा सर्वात प्रगत प्राणी आहे, पण त्यापोटी विचारपूर्वक विचार करण्याने त्याला काही गमवावेही लागले आहे. कारण शेवटी अंतःप्रेरणा या कधी चुकीच्या नसतात. त्या निसर्गाची देणगी असतात. त्या कधी गफलत करीत नसतात. विचार ही मात्र मेंदूतल्या प्रक्रियांची परिणती असते आणि विचाराने एखादी कृती करायची म्हटले की, ही कृती करावी की ती करावी? असे पर्याय असतात. त्यातून संभ्रम निर्माण होतो. पक्षी आणि प्राण्यांना असे पर्याय नसतात, त्यामुळे ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे वागतात. निसर्गाशी मेळ साधून वर्तन करतात. माणूस मात्र विचाराने वागताना निसर्गाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करतो, त्याचे नियम मोडतो आणि चुका करून बसतो. असे वर्तन करण्याच्या स्वातंत्र्याचा वापर करून माणूस निसर्ग-नियमांचा भंग करतो, त्यानुसार चाललेली प्रक्रिया बिघडवतो आणि निसर्गातील स्वयंस्फूर्त घटनांचा क्रम विचलित करतो. जसजसा माणूस शिक्षण घेत आहे, तसतसा तो संस्कृती विकसित करण्याच्या बहाण्याने काही सोयी वाढवीत चालला आहे आणि त्यासाठी निसर्गातल्या या मेळापासून दूर चालला आहे. त्यामुळे मानव आणि निसर्ग यांच्यातल्या संबंधांत बेसूरपणा वाढत चालला आहे. मानवाची "प्रगती' होत आहे, पण ती होत असताना हा बेसूरपणा किंवा बेबनाव वाढत चालला आहे. माणसाची जडवादी किंवा भौतिक प्रगती पाहिली तर तो यापूर्वी एवढा कधीच प्रगत नव्हता असे लक्षात येते, पण अशी प्रगती होत असतानाच हे जग हिंसा, संघर्ष, गुन्हेगारी यांनी त्रस्त आणि ग्रस्तही होत चालले आहे. हा संसर्ग एवढा झाला आहे की, आपण या मानवी प्रवृतींच्या प्रदूषणाला "संस्कृतींचा टकराव' असे अभिधान दिलेले आहे. प्रगती आणि हे प्रदूषण यांच्याविषयी आणि त्यांच्या परिणामांविषयी विचार करणाऱ्यांनी चिंता व्यक्त करायला सुरुवात केली आहे.
अशा एका स्थितीशी आपली गाठ पडली आहे। साऱ्या जगाला विघातक परिणामांचा वेढा पडला आहे. एक पेचप्रसंग उभा आहे. एका संक्रमणावस्थेतून आपली वाटचाल सुरू झाली आहे. हा पेचप्रसंग लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यात विलंब झालेला चालणार नाही, परवडणार नाही. आद्य शंकराचार्यांनी आपल्या गीताभाष्यात धर्माचा विलय किंवा अधर्माचा उदय कसा होत असतो, हे दाखवले आहे. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा होत राहते आणि देवाच्या हस्तक्षेपाची गरज भासायला लागते. देव अवतार किंवा विभूतीच्या रूपाने असा हस्तक्षेप करीत असतो. मानवी जीवनातली वैगुण्ये जेव्हा समाजाच्या नेत्यात भिनतात, तेव्हा ती समाजाच्या सर्व थरांत झिरपत जातात. त्यातूनही एकप्रकारचा पेचप्रसंग जन्माला येत असतो, असंही शंकराचार्यांनी म्हटलं आहे.
""ज्यांनी धर्माचे पालन शहाणपणाला सोडचिठ्ठी देऊन केले, त्यांच्यात विषय-वासना बळावल्या. धर्म आणि मूल्य जागृती भिरकावली गेली, अधर्म आणि समाजविरोधी प्रवृत्ती अनेक पटींनी वाढल्या.''
आपण सध्या ज्या पेचप्रसंगांतून वाटचाल करीत आहोत, त्यावर मात करायची असेल तर आपल्याला सध्या आपण स्वीकारलेल्या पाश्र्चात्त्य संस्कृतीचा विचार करावा लागेल. ही संस्कृती बाकीच्या जगावर लादली गेली आहे. पाश्र्चात्त्यांनी जगात अनेक क्षेत्रांवर आपली छाप पाडली आहे, वर्चस्व निर्माण केले आहे. त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून किंवा "बळी तो कान पिळी !' या न्यायाने जगाने त्यांच्या संस्कृतीचा स्वीकार केला आहे. "सर्व्हायव्हल ऑफ दी फिटेस्ट' हेच या संस्कृतीचे सर्वमान्य तत्व आहे. या संस्कृतीचे विकास आणि प्रगतीचे तत्वज्ञान जडवादी आहे. निसर्गाचे आणि माणसाचे बेमुर्वत शोषण करून भोगवाद वाढवीत नेणे हेच या भोगवादाचे उद्दिष्ट आहे. गळेकापू स्पर्धा हाच या संस्कृतीचा कायदा आहे. भांडवलशाही असो की साम्यवाद असो, या उद्दिष्टांत फारसा फरक नाही. या साऱ्या बाबी स्वीकारल्या की परस्परातील संघर्ष आणि मतभेद यांचा प्रारंभ होतो. त्यांच्या धर्मांतही हीच शिकवण दिलेली आहे. ही सारी सृष्टी माणसाच्या सुखासाठी निर्माण झालेली आहे, त्यामुळे तिचे शोषण करण्याचा माणसाला निसर्गदत्त अधिकार आहे, असेच या धर्मांत परोपरीने सांगितले, शिकविले जात असते. असहिष्णुता हा सर्वप्रकारच्या संघषांर्चा पाया असतो आणि ती तर या धर्मांच्या मुळाशीच आहे. देवांकडून श्रध्दाळूंना मिळणारे अंतिम वरदान म्हणजे स्वर्ग, अशी त्यांची समजूत असते. फरक इतकाच की, धार्मिक नेते तो मेल्यानंतर मिळेल असे म्हणतात तर साम्यवादी तो जिवंतपणीच देण्याचे वचन देतात. सध्या जग हे एक खेडे बनले आहे. त्यामुळे या जगात बाजाराचा कायदा जारी आहे. प्रत्येकाला अमर्याद उपभोगाचे वचन देणारी आणि आमिष दाखवणारी ही व्यवस्था टिकणार नाही, कारण पृथ्वीवर उपलब्ध असलेली साधने कमालीची मर्यादित आहेत. त्यावर तंत्रज्ञानाच्या साह्याने मात करण्याचा प्रयत्न जारी आहे, पण त्यात फारसे यश येणार नाही. कारण तंत्रज्ञानाने उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर काही प्रमाणात वाढवता येतो, पण साधने तयार करता येत नाहीत. त्यातून एक विसंवाद निर्माण झाला आहे. उपभोगाला मर्यादा पडणार आहेत आणि समाजातला प्रभावशाली वर्गच भौतिक सुखाचा लाभ घेणार आहे. तो लाभ समाजाच्या वर्गापर्यंत पोचला तरच साधनांचे समान वितरण शक्य आहे, तसा तो पोचण्यासाठी प्रस्थापित सधन प्रभावशाली वर्गाला काही प्रमाणात त्याग करावा लागणार आहे. भोगवादी जडवादी संस्कृती असा त्याग करणाची शिकवण कधी देत नाही. त्यामुळे या संस्कृतीत विषमता अटळ आहे. ितच्यातून सामूहिक हिंसाचार आणि दहशतवाद याच्याशिवाय दुसरे काय निर्माण होणार आहे? परिस्थितीचे हे विश्र्लेषण सार्थ आणि तर्कशुध्द असेल तर त्यावर पौर्वात्त्य संस्कृतीचा स्वीकार हाच एकमेव इलाज आहे- हा मानवतेच्या जीवन-मरणाचा आणि पर्यायाने या पृथ्वीच्या अस्तित्त्वाचा प्रश्न आहे. आता आणि आताच त्यातल्या एका संस्कृतीची निवड करायची आहे.
ही कल्पना बरोबर पन्नास वर्षांपूर्वी जगप्रसिध्द इतिहास तज्ञ अर्नोल्ड रॉयनबी यांनी बोलून दाखवली होती।
""आज आपण इतिहासाच्या संक्रमणावस्थेतून प्रवास करीत आहोत. या प्रवासाबाबत एक गोष्ट स्पष्ट आहे की, या संक्रमणाच्या अध्यायाचा प्रारंभ पाश्र्चात्त्य असला तरी त्याचा शेवट मात्र खास भारतीय असणार आहे. तसे झाले तरच हा शेवट मानवतेसाठी हितावह ठरणार आहे. सध्याच्या काळात जग पाश्र्चात्त्य तंत्रज्ञानाच्या आधारावर आणि जडवादाच्या निकषावर एकत्र आले आहे. या जगात विविध मानवी गट एकमेकांच्या जवळ आले आहेत. या तंत्रज्ञानाने गटागटातले आणि माणसामाणसातले अंतर कमी केले आहे, पण ही माणसे आणि गट एकमेकांची नीट ओळख न होता आणि परस्परांविषयी प्रेम न वाटताच जवळ आले आहेत. एवढेच नव्हे तर परस्परांना उद्ध्वस्त करण्याची जबरदस्त ताकद हातात घेऊन जवळ-जवळ आले आहेत. ते गळाभेट घेतात की एकमेकांचे गळे घोटतात अशी भीती वाटते आहे. अशा या स्थितीतला हा गहन प्रश्न सोडवण्यासाठी मानवतेने भारतीय जीवनमार्ग स्वीकारणे हाच एक उपाय आहे...
...सर्व धर्मात मेळ बसवणाच्या विचारामुळे आपल्या भारतीयांमध्ये असा एक वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन विकसित झाला आहे की, त्याच्या जोरावरच साऱ्या मानवी जाती एका कुटुंबाप्रमाणे राहणे शक्य होईल. त्यातच या माणूस प्राण्याला आत्मघातकी तत्वज्ञानाच्या ऐवजी पर्यायी तत्वज्ञान पुरवण्याची क्षमता आहे.
मानवी जातीचे अस्तित्व पणाला लागले आहे. अशावेळी माणसा-माणसांच्या अंतःकरणापर्यंत रामकृष्ण भारतीय विचासरणी नेऊन पोचवायची आहे, त्या विचारांवर आपल्याला काही काम करायचे आहे. त्यामागे त्या विचारांची उपयुक्तता ठसवणे हा हेतू आहे, पण तो दुय्यम आहे. खरा आणि पहिला हेतू असा आहे की, हे विचार आध्यात्मिक सत्याच्या आविष्कारातून आणि खऱ्या तळमळीतून उगम पावलेले आहेत.''
आपण वारंवार म्हणत आहोत तो पौर्वात्य दृष्टिकोन आहे तरी काय? हे पाहिले पाहिजे, जो हिंदू जीवन दर्शनातून निर्माण झालेला आहे. वेद आणि उपनिषदांच्या संहितांत तो ग्रथित करण्यात आलेला आहे. तो आमच्या ऋषींनी मांडलेला आहे, तो दृष्टिकोन या विश्र्वाकडे आध्यात्मिक विचारांतून पाहायला शिकवतो. या दृष्टिकोनातला परवलीचा शब्द आहे "त्येन त्यक्तेन भुञ्जीथाः' तर स्वार्थ त्यागातून आनंद मिळवा ही कल्पना हा या दृष्टिकोनाचा गाभा आहे. या विचारांत आनंदाचा दुस्वास नाही, पण आनंदाच्या आधी त्याग आहे. त्यागाशिवाय भोग घेणे हा अभद्रपणा आहे. भोग किंवा आनंद यांना त्याग आणि सर्वसंगपरित्याग यांच्या साह्याने उन्नत करता आले पाहिजे, त्यांना पावित्र्यही प्राप्त करून देता आले पाहिजे. हिंदू विचारांमध्ये भौतिक बडिवार त्याज्य मानलेला नाही. आनंदाला बंदी नाही की, त्याला पाप मानलेले नाही. कमावणे आणि आनंदाने उपभोग घेणे ही इप्सिते मानलेली आहेत, पण ते सशर्त आहे, ही दोन्ही इप्सिते धर्माच्या आधारावर वर्तन करून मिळवली पाहिजेत आणि त्यांवर धर्माचे नियंत्रण असले पाहिजे. धर्म हा असा एक कायदा आहे, की जो प्रत्येक गोष्टीला लागू पडतो. सत्यम् आणि ऋतम् यांचा अंमल धर्माच्या रूपात होत असतो.
जेव्हा मानवी व्यवहार धर्माच्या मार्गदर्शनाखाली होतात, तेव्हा स्पर्धा संपून सहकार्य सुरू होते। हीच भावना व्यक्ती-व्यक्तीतल्या संबंधात आणि पर्यायाने समाजात सलोखा आणि सद्भाव निर्माण करीत असते. याच तत्वावर हिंदूंनी आपली समाजव्यवस्था उभी केली आहे. जी स्पर्धाविरहित आणि सलोखा करीत आहे. या व्यवस्थेत प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक कुटुंबाला आपापले असे काम नेमून दिलेले असते. धर्माचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. हा दंडक व्यक्तीपासून कुटुंब, समाज, सारी मानवजात आणि सारे विश्र्व असा विस्तारत जातो. तो सजीवांना तर लागू असतोच, पण निर्जीवांनाही लागू होतो. "वसुधैव कुटुंबकम्' ही संकल्पना याच मार्गाने राबवली जात असते. त्यात अचेतन वस्तूंसह सर्व प्राण्यांचा एका कुटुंबात समावेश केलेला असतो.
आता आपल्या संस्कृतीत ही उदात्त संकल्पना आणि आजच्या युगातली "जग हे एक मार्केट आहे' ही पाश्र्चात्त्य संकल्पना यांची तुलना करून पहा. या दोन्हींत काय फरक आहे, हे ताडून पहा, मग तुमच्या लक्षात येईल की, या फरकानेच जगाला दोन युध्दसज्ज गटतटात विभागले आहे.
पाश्र्चात्त्य विचारांत माणसाला समजून घेण्याच्या पध्दतीत मोठा दोष आहे। माणसाकडे विविध पैलूंचा पण एकात्मिक सजीव चैतन्यशाली प्राणी म्हणून पाहण्याऐवजी पाश्र्चात्त्य विचारवंत त्याच्याकडे अपूर्ण पण विभाजित दृष्टिकोनातून पाहत असतात. या भूमिकेत सुसंगती नाही. मानवतेच्या विविध पैलूंतली विविधता शेवटी एका सामान्य गुणातून उगम पावलेली असते, पण हे लोक त्या पैलूंना परस्पर विरोधी गुण म्हणून पाहत असतात. ते माणसाकडे एक साधन म्हणून पाहतात. या साधनाचा भरपूर वापर केला पाहिजे, त्याचे कमालीचे दोहन केले पाहिजे, असे त्यांचे विचार आसतात. हे सारे माणसासाठी चालले पाहिजे, असे त्यांना वाटत नाही तर माणसाला पिळून काढून झाले पाहिजे, असे त्यांना वाटते.
सध्याच्या बाजारी अर्थव्यवस्थेत तर प्रत्येक माणसाकडे ग्राहक म्हणून पाहिजे जाते आणि एक नागरिक किंवा माणूस म्हणून असलेल्या त्याच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केले जाते. ग्राहक म्हणून असलेल्या त्याच्या गरजांना प्राधान्य दिले जाते, पण त्यासाठी त्याच्या नागरिक म्हणून असलेल्या हक्कांचा बळी दिला जातो. माणसाचा विचार आध्यात्मिक विचारांचा प्राणी म्हणून करायचा असतो, पण त्याचा सध्या विसर पडला आहे. व्यक्ती व्यक्तीतले व्यवहार ज्या नैतिक मूल्यांच्या आधारावर चालतात, चालायला हवेत त्या तत्वांनाही सोडचिठ्ठी देण्यात आली आहे. मूल्यांना अंधश्रध्दा म्हणून हिणवले जायला लागले आहे. उपयुक्ततावादाने मूल्यांवर मात केली आहे. माणसाच्या अशा भ्रांत आकलनाच्या पायावर पाश्र्चात्त्य तत्वज्ञानाची इमारत उभी आहे. त्यातली तत्वे पौर्वात्त्य संस्कृतीशी तुलना करण्याच्याही पात्रतेची राहिलेली नाहीत. पाश्र्चात्त्य तत्वज्ञान हे मूल्यांबाबत उदासीन आहे. तंत्रज्ञानाचा विकासही त्यांच्या परिणामांचा विचार न करता केलेला आहे. त्यामुळे मानवी मूल्ये, सामाजिक व्यवहार यांना डोळ्यांसमोर ठेवून मानवाचा एकात्मिक विचार करणारे पर्यायी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे. इथेच भारतीय दृष्टिकोन कालोचितही ठरतो आणि अपरिहार्यही ठरतो.
पण एक प्रश्न महत्त्वाचा आहे। संस्कृती बदलणे हे काही सोपे काम नाही. संस्कृती निर्माण करावी लागते. सत्य युगाची तीच स्थिती आहे. सत्य युगाचे दुसरे नाव कृत युग आहे. तो एक आदर्श आहे. तो मानवी प्रयासांनी उभा करायचा आहे. सध्या जग हिंदू जीवनपध्दतीतून विकसित झालेल्या आदर्श व्यवस्थेची मागणी करीत आहे. ती व्यवस्था तिच्या आदर्श अवस्थेत आता सध्या अस्तित्वात नाही, पण तशी व्यवस्था निर्माण करण्याच्या ध्येयाने भारलेल्या समर्पणशील आणि प्रेरित व्यक्तींनी अथक परिश्रम करायचे आहेत, तर ती निर्माण होणार आहे. काम फार मोठे आहे, एकट्या दुकट्याने करून भागणार नाही. आमच्या पुराणांत म्हटले आहे की, अशावेळी परमेश्र्वर स्वतःच अवतार घेतो. तेव्हा तो अवतरणारच असेल तर त्याची पार्श्र्वभूमी आणि होमवर्क आपल्याला केले पाहिजे. काळाची आणि स्थितीची गरज ओळखून देवसुध्दा वेगवेगळ्या स्वरूपात अवतार घेत असतो. या कलियुगात हा अवतार या ध्येयाने झपाटलेल्या व्यक्तींच्या कार्याची पूर्ती करण्यासाठी होणार आहे. तेव्हा पौर्वात्त्य तत्वज्ञानाच्या प्रस्थापनेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकचित्ताने आणि अथकपणे काम केले पाहिजे. हे काम केवळ गप्पा मारण्याने किंवा केवळ कोणाचे तरी ताडन करण्याने साध्य होणारे नाही, तर आदर्शासाठी काम करणाऱ्या कार्यशील, प्रागतिक व्यक्तींच्या संघटनेच्या सातत्यपूर्ण आणि चिकाटीच्या प्रयत्नांनी होणारे आहे. अशा लोकांना त्यासाठी समर्पणशील भावनेने तसेच ध्येयवादाने संघटित व्हावे लागेल. अशा प्रयत्नांची गरज स्वामी विवेकानंदांनी हेरली होती. त्यांनी आपल्या उत्तर आयुष्यात आपले या संबंधातले विचार तरुण स्त्री-पुरुषांसमोर सातत्याने मांडले होते. एखाद्या संघटनेच्या नावाखाली त्यांनी संघटित होऊन हे काम करण्याचे आवाहन त्यांना केले होते.
स्वामीजींना जाऊन शतक लोटले आहे, पण त्यांच्या त्या आवाहनाचे औचित्य अजूनही टिकून आहे. त्यांच्या कल्पना सत्यात उतरवणाऱ्या मिशनरी वृत्तीच्या कार्यकर्त्यांची आजही गरज आहे. असे कार्यकर्तेच नवी संस्कृती आणि नवी व्यवस्था निर्माण करण्याचे आव्हान पेलू शकतील. विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांसाठी हाच स्वामीजींचा वारसा आहे. तो स्वीकारून अशा कार्यकर्त्यांनी स्वामीजींचे स्वप्न पुरे केले पाहिजे.
तेजस्वी तरुणांच्या नव्या पिढीसमोर हे एक आव्हान आहे। स्वामीजी म्हणत असत, ""मोठी कामे मोठ्या त्यागानेच साध्य होत असतात,'' पण त्या त्यागामागची तीव्र भावना अशा कामास सिध्द झालेल्या तरुणांच्या संख्येशी आणि गुणवत्तेशी मेळ राखणारी असली पाहिजे. स्वामीजींना हे काम किती कठीण आहे, हेही माहीत होते आणि म्हणूनच त्यांनी देशातल्या युवकांना सारे काही सोडून आपल्या युवावस्थेतला महत्त्वाचा काळ या भारत मातेच्या सेवेसाठी देण्याचे आवाहन केले होते. आपली सारी चेतना आणि तळमळ या मातृभूमीसाठीच समर्पित करावी, अशी हाक त्यांनी या तरुणांना दिली होती. ""आगामी 50 वर्षे इतर देवदेवतांचे विस्मरण झाले तरी चालेल, पण केवळ मातृभूमीलाच आपली देवता मानले पाहिजे'', असे स्वामीजी म्हणाले होेते. त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की, ""पावित्र्याच्या तेजाने तळपणारे, ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेले, मृगेंद्राचे सामर्थ्य नसांत स्फुरत असलेले, दीनदलितांबद्दल हृदयात अपार करुणा असलेले सहस्रों युवक-युवती हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र संचार करतील; मुक्ती, सेवा आणि सामाजिक उत्थानाचे आणि सर्व प्रकारच्या समानतेचे आवाहन करतील आणि हा देश पौरुषाने मुसमुसून उठेल!''
ही सारी गरज पूर्ण केली तरच सगळ्या जगाला व्यापून राहणारी शांती, समृध्दी यांनी भरलेली आणि भारलेली एक नवी व्यवस्था निर्माण होणे शक्य आहे, हेच स्वामीजींना अभिप्रेत होते आणि म्हणूनच त्यांनी म्हटले आहे। ""भारत देशा उभा रहा आणि आपल्या आध्यात्मिक ताकदीवर जग जिंकायला सज्ज रहा !''
टीप: मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे। तो सुरेलतेचा, समरसतेचा आणि सौंदर्याचा आविष्कार आहे। भारताच्या "विविधतेत एकता' या तत्वाचा आणि "सत्यम् शिवम् सुंदरम्' या वचनाचा धारक आहे।
***
- पी. परमेश्वरन्
राष्ट्रीय अध्यक्ष, विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी