Monday, September 27, 2010
Tuesday, May 11, 2010
नक्षलवादाला रोखणार कसे?
या देशात नक्षलवाद्यांनी शस्त्रास्त्रं हाती घेऊन आपली दहशत, मागास वा अति मागास भागात निर्माण करणे सुरू ठेवले आहे. त्याला आपण रोखणार कसे, हा खरा प्रश्न आहे आणि सत्ताधारी पक्षात नेमके त्याबाबत एकमत नाही. केंद्रीय गृहमंत्री या नात्याने पी. चिदंबरम् जी धोरणे राबवू बघत आहेत, त्याला कॉंग्रेस व सहयोगी पक्षातून काही गट विरोध करीत आहेत. पी. चिदंबरम् यांच्या बौद्धिक अहंकारामुळे नक्षलवादी दुखावले गेले आणि ते दंतेवाडासारख्या घटना घडवून आणत आहेत, अशी टीका त्यांच्यावर कॉंग्रेस पक्षातून होत आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग आणि नव्याने राज्यसभा सदस्य झालेले मणिशंकर अय्यर यांनी ही फळी सांभाळली आहे. आपण सोनिया गांधींच्या खूप जवळ आहोत, असे भासवणारी ही मंडळी, चिदंबरम्वर तुटून पडत आहेत आणि ज्यांनी कॉंग्रेस पक्षाची दाणादाण उडल्याबद्दल आनंद व्यक्त करायचा ते विरोधक चिदंबरम् यांच्या मागे ठाम उभे आहेत, असे हे गंमतीदार चित्र निर्माण झाले आहे.
एक काळ होता जेव्हा, नक्षलवाद्यांबद्दल समाजात खूप सहानुभूती होती. ते आदिवासी, जंगलात राहणारे यांच्या कल्याणाची काळजी वाहतात. त्यांना अधिक रोजगार व मोबदला मिळावा म्हणून प्रयत्न करतात, असे मानले जात होते. ती वस्तुस्थितीही होती. या गरीब आदिवासींचे शोषण करणारे जे कंत्राटदार होते, तेंदुपत्ता जमा करण्यासाठी आदिवासींचे शोषण करणारे जे होते, भ्रष्टाचाराने लडबडलेली जी सरकारी यंत्रणा होती तिला धडा शिकविण्यासाठी नक्षलवादी आघाडीवर होते. ते आपल्या पद्धतीने न्याय करीत. त्यांच्या या न्याय करण्याच्या पद्धतीमुळे सरकारी यंत्रणा, उद्योगपती हादरून गेले होते. तेंदुपत्ता संकलनाला चांगला भाव, मजुरी मिळू लागली. त्या मजुरीवाढीमुळे त्यांच्या जीवनात आशेचे काही किरण फुलू लागले होते, पण ते फक्त काही वर्षे टिकले. त्यानंतर या आदिवासींचेही शोषण करणे या चळवळीने सुरू केले. त्यांना विकासवंचित ठेवण्यात धन्यता मानली जाऊ लागली. त्यामुळे रस्ता बांधला जातो का, मग कर अडथळा उभा; पूल बांधतो का, उडव पुलाला अन् बांधकाम करणाऱ्याला, असा प्रयोग सुरू झाला. पुढे पुढे तर आपल्याबद्दल दहशत कशी निर्माण होईल, याची काळजी नक्षलवादी घेऊ लागले. जो कुणी मािहती देतो, पोलिसांना मदत करतो असा संशय आहे अशांना अन् नक्षलवादी प्रतिकार मोडत काढत जे सरकारी यंत्रणेला, विकासाला सहकार्य करीत होते त्यांना टिपणे नक्षलवाद्यांनी सुरू केले. अतिशय क्रूर पद्धतीने दहशत निर्माण करण्यासाठी म्हणून त्यांची हत्या केली जाऊ लागली. फक्त समोरच्याला मारणे हा नक्षलवाद्यांचा कधीच हेतू राहिला नाही, तर आपले क्रौर्य त्या भागातील जनतेला दिसावे, ते दहशतीत, दहशतीखाली यावेत, या हेतूने भीषण हत्या करणे सुरू झाले. इकडे नक्षलवाद्यांना मदत करता म्हणून पोलिस त्यांना वेठीला धरीत. अशा पद्धतीने आदिवासींचे दुहेरी शोषण सुरू झाले. त्यातूनच 2030 पावेतो या देशातील लोकशाही संपवून टाकू, अशी दर्पोक्ती नक्षलवादी करू लागले. अर्थात, या नक्षलवाद्यांबाबत कॉंग्रेस पक्षाने सुरवातीला घेतलेले बोटचेपे धोरण त्याला हातभार लावणारे ठरले. आंध्रप्रदेशात या नक्षलवाद्यांना मधल्या काळात खूप सोयीसवलती मिळाल्या. एरव्ही जंगलात लपूनछपून राहणारी ही मंडळी बाहेर आलीत. त्यांना एक संरक्षण मिळाले. ते थेट राजभवनात पोहोचले, पण त्यांचा दहशतवाद थांबला नाही. उलट त्यांचा उग्रवाद पराकोटीचा वाढला.
अशाप्रकारे सशस्त्र क्रांती करायची अन् त्याच वेळी आदिवासींनाही दहशतीखाली आणायचे, यावरून त्या नक्षलवाद्यांतही वाद सुरू झालेत. नक्षलवाद्यांचे स्थापनकर्ते बाजूला पडलेत, तर किसनजी वगैरेसारखे आग्यावेताळी नेतृत्व पुढे आले. हे नेतृत्व आदिवासींबाबतही क्रूर होते. सरकारी यंत्रणेचा लहानातील लहान खिळा उचकटून काढला पाहिजे, असे त्यांचे मत होते. म्हणून पोलिस व सरकारी यंत्रणेवर हल्ले सुरू झालेत. अगदी गर्भवती महिलेचीही, ती केवळ पोलिस दलात आहे म्हणून हत्या करण्यापावेतो क्रौर्य वाढले. त्याचा प्रतिकार केला पाहिजे, ही भावना सरकारी पातळीवर वाढीला लागली अन् त्यातून "ऑपरेशन ग्रीन हंट' सुरू झाले.
या "ऑपरेशन ग्रीन हंट'चा हेतू नक्षलवाद्यांना नमविणे हा होता. शस्त्राला शस्त्राने उत्तर देण्याला ते सज्ज होते. पण, तथाकथित मानवतावादी जे आहेत त्यांना या ग्रीन हंटने पोटशूळ निर्माण केला. पोलिस त्या नक्षलवाद्यांना टिपतात म्हणजे काय? असा सूर लावला जाऊ लागला. प्रत्यक्षात ज्यांनी हा नक्षलवादी क्रौर्याचा अनुभव घेतला होता ते तर त्यांचा नि:पात केला जावा, या मताचे होते. पोलिस यंत्रणा या कामात अपुरी पडत होती. कारण त्या कुणालाही अशा प्रकाराने शस्त्राने लढण्याचे प्रशिक्षण नव्हते. समोर ज्याचा प्रतिकार करायचा तो आधुनिक शस्त्रास्त्र घेतलेला आहे आणि आपण मात्र पुरातनकालीन शस्त्र वापरतो आहे, यातून एक भयगंडही उत्पन्न होतो. त्यामुळे पोलिस यंत्रणा या नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करायला जात जरूर होती, पण प्रत्यक्षात बंदोबस्त करण्यापेक्षा- "आम्ही आलो आहोत, आम्हाला सुरक्षित जाऊ द्या,' हा भाव जास्ती राहत असे. या नक्षलवाद्यांशी लढताना आधुनिक शस्त्रसज्जता व लढाईवृत्ती जरूरी होती, पण आमचे जवान त्या ऐवजी बेसावधपणाने त्यांच्या जाळ्यात अडकत होते. दंतेवाड्याला सीआरपीएफ जवानही असेच गेलेत. नक्षलवाद्यांशी दोन हात करण्याचे जे नियम होते त्या नियमांचे पालन झाले नाही, त्यामुळे 85 जवान शहीद झालेत.
या घटनेमुळे "ऑपरेशन ग्रीन हंट'चे संयोजकच, नेतेच, जनरलच हादरले आणि त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारीत, राजीनामा देण्याची तयारी दाखविली. आपला राजीनामा पंतप्रधान व संपुआच्या प्रमुख सोनिया गांधी यांना सादर केला. वास्तविक, अशा राजीनाम्याची मागणी विरोधक करीत असतात, पण विरोधकांनीच आग्रह धरला की, "पीसी' तुम्ही राजीनामा देऊ नका. राज्यसभेत तर अरुण जेटली म्हणाले, ""युद्ध सुरू असताना जनरल मैदान सोडून जात नाही. एखादी लढाई हरली तरी, चकमक हरली तरी फरक पडत नाही. अंतिम युद्ध जिंकायचे असते.'' चिदंबरम् यांनी राजीनामा देऊ नये, ही भावना खूप मोठ्या प्रमाणात व्यक्त झाली अन् तिचा पंतप्रधान व सोनिया गांधी या दोघांनीही सन्मान केला. पण... कॉंग्रेसमधूनच विरोधाचे हाकारे सुरू झालेत. हे हाकारे घालणारे होते- कम्युनिस्टांची वकिली करणारे मणिशंकर अय्यर! हो. तेच मणिशंकर अय्यर- ज्यांनी पोर्टब्लेअरमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्याची पट्टिका उखडली होती!! अन् त्यांना साथ देत होते- दिग्गी राजा! दिग्गी राजांना हा प्रश्न तरी माहीत होता का? छत्तीसगड होण्यापूर्वी ते मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते, यापलीकडे त्यांचा संबंध नव्हता. पण, त्यांनी या िचदंबरम्विरोधी आंदोलनाचे नेतृत्व केले.
एकूण चिदंबरम् यांची स्थिती महाभारतातील कर्णासारखी झाली होती. त्यांना शापाचे धनी बनविण्यात आले होते. ते जी धोरणे मांडीत होते ती धोरणे विरोधकांनाही मान्य होती, पण त्यांच्याच पक्षातील मंडळी दुभंगली होती. एकूण त्यांची स्थितीही बोलून-उपरोधिक बोलण्याने बेजार होणाऱ्या कर्णासम झाली आणि राजा शल्याची टोचून उपरोधिक बोलण्याची भूमिका दिग्गी राजा व मणिशंकर आज निभावीत होते. तर अरुण जेटली मात्र कौतुक करताना सांगत होते, सेनापती कधीही युद्ध क्षेत्र त्यागून सोडून जात नाही. ही तर अशी युद्धभूमी आहे की, ज्यावर सुरू असलेले युद्ध गमाविणे भारताला परवडणारे नाही. आज आम्हाला स्वत:च्या गृहमंत्र्याचे पाय ओढणाऱ्या सरकारचीच गरज नाही. आज सरकार आणि सत्ताधारी कॉंग्रेस पक्ष माओवाद्यांशी कसे लढायचे, या प्रश्नावर विभाजित झाला आहे, तर विरोधी पक्ष माओवादी पक्षाविरुद्ध धोरणाला पाठिंबा देण्यासाठी एक झाला आहे. आज गृहमंत्र्यांना देशाप्रति आपली प्रतिबद्धता आणि पक्षशिस्त यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. तसेच सरकारमधील जे नक्षलवाद्यांचे छुपे समर्थक आहेत, त्यांच्याशीही संघर्ष करावा लागणार आहे. जेटली जेव्हा चिदंबरम् यांचे कौतुक करीत बोलत होते, तेव्हा जनार्दन द्विवेदी खुलासा करू लागले होते की, एखाद्याचे व्यक्तिगत मत हे पक्षाचे मत होत नाही.
पण या सरकारमध्ये कशी मंडळी आहेत. ममतादीदी आहेत, ज्या म्हणतात- ""लालगडमध्ये एकही नक्षलवादी नाही. उलट प. बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनाच अटक करण्याची गरज आहे.'' सीताराम येचुरी यांनीही ममतादीदींवर असाच आरोप लावला आहे. ""एकीकडे पंतप्रधान आज डावे अतिरेकी हा सर्वांत मोठा अंतर्गत धोका असल्याचे मानतात आणि ममतादीदी नक्षलवाद्यांना पाठीशी घालतात.'' हा त्याचा मथितार्थ.
वास्तविक बघता राजकारणात, सत्ता असताना सर्वांची सामूहिक जबाबदारी असते. असे असताना ममतादी या त्या तत्त्वाला हरताळ फासून वाटेल ते बोलत आहेत. त्यांना सभागृहासमोर बोलावून या सामूहिक जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे, ती गरज आहे.
नक्षलवाद्यांशी लढताना आम्हाला एकदिलाने, एका विचाराने लढावे लागणार आहे. त्या नक्षलवाद्यांचा बंदोबस्त झाला, तर त्याचा फायदा भाजपाला होईल वा विरोधी बाकांवर बसणाऱ्यांच्या राज्यांना होईल, असा विचार करणे हा वैचारिक कोतेपणा ठरणार आहे. खरोखर पक्षीय राजकारणापल्याड जाऊन आम्हाला नक्षलवाद, त्यांचा धोका, त्यांची वाढती आक्रमकता यांचा विचार करावा लागणार आहे व त्याला तोडीस तोड असे उत्तर द्यावे लागणार आहे. नक्षलवाद्यांचा हिंसाचार रोखण्यासाठी आम्ही कसे सज्ज होणार, हा खरा प्रश्न आहे.
एका अमेरिकन संन्यासी शिष्याला पत्र
हॉटेल बेल व्ह्यू, बोस्टन
13 सप्टेंबर 1894
लिऑन लॅन्ड्सबर्ग नामक एका अमेरिकन संन्यासी शिष्याला
प्रिय लिऑन,
तुम्हाला मी एक गोष्ट करावयास सांगणार आहे, त्याबद्दल मनाला काही वाटू देऊ नये. गुरू या नात्याने तुम्हाला उपदेश करण्याचा मला अधिकार आहे, म्हणून तुम्ही स्वत:साठी काही कपडे करून घ्यावेत, असे मी तुम्हाला आग्रहपूर्वक सांगतो; कारण त्यांच्या अभावी या देशात कोणतेही कार्य करण्यास तुम्हाला अडचण होईल. एकदा कार्य सुरू झाले म्हणजे तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे पोशाख करू शकाल. त्याबद्दल लोक मग काही म्हणणार नाहीत.
तुम्ही माझे आभार मानण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण हे माझे कर्तव्यच होय. हिंदू कायद्यानुसार शिष्यच संन्याशाचा वारस असतो. संन्यासग्रहणापूर्वी जरी त्याला पुत्र झालेला असला तरीदेखील शिष्यच त्याचा उत्तराधिकारी असतो. गुरुशिष्यांचा संबंध म्हणजे खरा आध्यात्मिक संबंध असतो, ज्याला तुम्ही अमेरिकन लोक "ट्यूटर' म्हणता, तशा प्रकारचा हा संबंध नव्हे.
तुमच्या यशासाठी मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला आशीर्वाद देतो।
तुमचा
विवेकानंदा
मे सम्पादकीय
श्री आणि समृद्धी यांमध्ये साधनसामग्री आणि पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच संपूर्ण समाजाची सुख, शांती व निर्भयताही अंतर्भूत असते, परंतु आज तर समाजाची शकलं उडताना दिसत आहेत. माणूस हा विकासाचा आधार मानला गेला आहे. माणूस हा एकटा राहू शकत नाही, तो तर कुटुंब, समाज आणि राष्ट्राचे नैसर्गिक अंग आहे, याचे विस्मरण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. जोवर मन-वाचा-कर्माने ही भावना विस्तारित होणार नाही, तोवर खरा विकास होणे शक्य नाही! परंतु आज अर्थव्यवस्था असो वा न्यायव्यवस्था, ते समाज आणि कुटुंबव्यवस्था तोडण्याचे काम करीत असल्याचे दिसते. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावावर करण्यात येत असलेल्या तथाकथित सुधारणा या व्यक्तीलाच आतून पोखरून काढत आहेत.
राजकारणात तर स्वार्थासाठी समाजाचे तुकडे-तुकडे करण्यालाच सफलता मानण्यात येऊ लागले आहे. बहुपक्षीय निवडणूकप्रणालीत सर्वाधिक मते मिळवणे म्हणजेच विजयी होणे असल्यामुळे तेथे सर्व काही तोडण्या-फोडण्यावरच आधारलेले असते. 100 च्या लोकसंख्येत समजा आपला गट 20 चा आहे, तर इतरांना इतक्या छोट्या-छोट्या तुकड्यांत विभागून टाका की, 20 वालाच सर्वात मोठा गट राहील. परिणामी करण्यात आलेल्या मतदानापैकी 22 प्रतिशत मते घेऊन आमचे प्रतिनिधी संसदेत जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची धोरणं निर्धारित करतात. यात सुधारणा करणे सहज शक्य आहे. 50 प्रतिशतपेक्षा किमान 1 मत अधिक घेणाराच विजयी असेल, असा नियमच केला पाहिजे. असे झाले तर मग जाती, भाषा आणि अन्य गोष्टींवरून समाज तोडणारे हेच सारे स्वार्थी राजकीय नेते आपल्या विजयासाठी समाज जोडण्याचे काम करू लागतील.
आपली इतिहासाकडे पाहण्याची दृष्टीदेखील याच व्यक्तिवादी दृष्टिकोनाने ग्रासली गेली आहे. यामुळेच आपण आपल्या महापुरुषांचे वर्णन आणि मूल्यमापन दोन्हीही व्यक्तिगत उपलब्धंींच्या आधारेच करतो. भगवान गौतम बुद्ध यांना त्यांच्या त्याग, साधना, बोध आणि करुणा यासाठी स्मरले जाते, परंतु त्यांचा मुख्य विचार तर व्यक्तिकेंद्रित कर्मकांड आणि त्यामुळे समाजात आलेल्या अंध रूढींच्याप्रति विद्रोह होता. त्यांच्याच अनुयायांकडून सर्वाधिक अन्याय जर कोणत्या महापुरुषावर झाला असेल, तर तो बुद्धांवरच होय. ज्या बुद्धाने मूर्तिपूजेच्या अज्ञानाचा जीवनभर विरोध केला, आज मूर्तींच्या बाबतीत सारे विश्व-कीर्तिमान, बुद्ध मूर्तींच्या नावानेच आहेत. साक्षात करुणेची प्रतिमूर्ती भगवान बुद्धांचे अनुयायी त्यांच्या नावावर विद्वेषाचे समाजकारण करताना दिसत आहेत. राज्याचा त्याग करून ज्ञानाची साधना करणाऱ्या बुद्धाच्या नावावर नोटांचा हार घालून सत्तेचे राजकारण सुरू आहे.
भगवान बुद्धांचा मुख्य संदेश त्यांच्या मंत्रात सामावला आहे -
बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि।।
हाच चिरंतन विकासाचा मूलमंत्र आहे. माणसाने आपला अहं आणि स्वार्थ ज्ञानाच्या शरणात न्यावा. याचे व्यवस्थारूप माध्यम आहे- संघटनेला शरण जाणं आणि अशा संघटनशक्तीनेच संपूर्ण मानवता धर्माच्या सिद्धांताना शरण जाऊन खऱ्या अर्थाने विकास साधू शकेल. या त्रिसूत्रीय मंत्रावर आधारित गणतंत्र, राजतंत्र आणि समाज निर्माणातूनच मानवी समस्यांचे दूरगामी निदान आणि समाधान शक्य आहे. याच महिन्यात जयंती असलेल्या वि.दा. सावरकर आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनातूनही हाच संदेश ध्वनित होतो.
धर्माच्या सनातन तत्त्वांना युगानुकूल आवश्यकतेनुसार आचरणात आणून समाजात रुजविण्याचे कार्य करणाऱ्या बुद्ध, बसवेश्वर आणि वि.दा. सावरकरांवरील लेख निश्चितच वाचकांना उपयुक्त ठरतील, अशी आशा आहे. धर्माचे मर्म आचरणात आहे, म्हणून याची सम्यक प्रतिष्ठा प्रत्यक्ष आपल्या कार्यानेच होईल. "विवेक विचार'चे वाचक विवेकानंद केंद्र परिवाराचे सदस्य आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून कार्यात प्रत्यक्ष सहभाग आणि सेवाकार्यात सक्रीय नेतृत्वाची अपेक्षा आहे.
अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना शुभेच्छा!
भगवान बुद्ध
शहरी एकदा व्याख्यान देताना स्वामी
विवेकानंदांनी भगवान बुद्धदेवांसंबधी पुढील विचार
प्रकट केले होते.
प्रत्येक धर्माने एकेका विशिष्ट साधनावर भर देऊन त्याचाच विशेष विकास केला असल्याचे आपल्याला आढळून येईल. बौद्ध धर्मामधे निष्काम कर्माला प्राधान्य मिळाले आहे. तुम्ही लोक बौद्धधर्म आणि ब्राह्मणीधर्म यांत घोटाळा करून नका. या तुमच्या देशात अनेक व्यक्ती असला घोटाळा करताना आढळतात. ह्या लोकांची अशी समजूत आहे की, बौद्धधर्माचा सनातनधर्माशी काहीही संबंध नसून, तो एक संपूर्ण स्वतंत्र धर्म आहे, परंतु ही त्यांची गैरसमजूत आहे, वस्तुस्थिती अशी नाही. वस्तुत: बौद्धधर्म हा सनातन धर्माचाच केवळ एक विशिष्ट संप्रदाय आहे. हा बौद्धधर्म गौतम नामक एका महापुरुषाने स्थापिला आहे. तत्कालीन लोकांतील तात्त्विक काथ्याकुटाची बेसुमार आवड, प्रचलित कर्मकांडातील अनुष्ठानांची अस्वाभाविक गुंतागुंत आणि विशेषत: जातिभेदाची प्रथा या सर्वांना गौतम अगदी विटून गेले होते.
कुणाकुणाचे असे म्हणणे असते की, आम्ही एका विशिष्ट कुळात जन्मलो आहोत आणि म्हणून जे अशा कुळात जन्मले नाहीत, त्यांच्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत! भगवान बुद्ध जातिभेदाच्या असल्या कल्पनेचे विरोधक होते. त्याप्रमाणे धर्माच्या गोंडस नावाखाली कपट-कौशल्याने आपलीच तुंबडी भरून घेण्याच्या पुरोहितांच्या स्वार्थी खटाटोपाचेही ते घोर विरोधी होते. त्यांनी स्वत: अशा धर्माचा प्रचार केला की, ज्यात सकामभावाला थाराच नव्हता.
तत्त्वज्ञान व ईश्र्वर या संबंधीची नानाविध मतमतान्तरे घेऊन वादावादी आणि चर्वितचर्वण करीत बसणे त्यांना मुळीच पसंत नव्हते. या बाबतीत ते संपूर्ण अज्ञेयवादी होते. पुष्कळदा अनेक लोक त्यांना ईश्र्वर आहे की नाही, म्हणून विचारीत. त्यावर त्यांचे उत्तर ठरलेलेच असे. ते उत्तर देत - ""यासंबंधी मला काहीच माहिती नाही.'' माणसाचे खरे कर्तव्य काय, अशी पृच्छा केल्यास ते म्हणत की, सच्छील व्हा आणि इतरांचे कल्याण करा.
एकदा पाच ब्राह्मणांनी बुद्धदेवांकडे जाऊन त्यांच्यात आपापसात चाललेला वादविवाद मिटवून देण्याची त्यांना विनंती केली. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, ""भगवन्, माझ्या शास्त्रात ईश्र्वराच्या स्वरूपासंबंधी आणि त्याचा लाभ करून घेण्याच्या उपायासंबंधी ही अशी अशी वचने आहेत.'' दुसरा ब्राह्मण म्हणाला,""अंहं, ती सारी खोटी असली पाहिजेत. कारण माझ्या शास्त्रात ईश्र्वराच्या स्वरूपासंबंधी आणि त्याला मिळविण्याच्या साधनासंबंधी अगदी निराळेच सांगितले आहे.'' याप्रमाणे बाकीचेही आपापल्या आवडीच्या शास्त्रांतून ईश्र्वराचे स्वरूप व त्याच्या प्राप्तीचे उपाय व यासंबधी नाना वचने उद्धृत करू लागले. बुद्धदेवांनी त्या सगळ्यांचे म्हणणे अगदी शांतपणे ऐकून घेतले आणि नंतर एकामागून एक त्यांतील प्रत्येकाला त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला. ते म्हणाले, ""बरे पण तुमच्यापैकी कुणाच्या शास्त्रात असे सांगितले आहे काय की, ईश्र्वर क्रोधी, हिंसापरायण वा अपवित्र आहे?''
पाचही ब्राह्मण एकमुखाने म्हणाले,""नाही भगवन्, सर्वच शास्त्रांचे म्हणणे आहे की, ईश्र्वर शुद्ध आणि शिवस्वरूप आहे.'' त्यावर बुद्धदेव म्हणाले, ""बंधूंनो, मग तुम्ही स्वत: आधी शुद्ध आणि चांगले बनण्याचा का बरे यत्न करीत नाही, की जेणेकरून ईश्र्वर म्हणजे काय वस्तू आहे, हे तुम्हाला आपोआपच कळून येईल.''
अर्थातच मी बुद्धदेवांच्या सर्वच मतांचे समर्थन करीत नाही. तात्त्विक चिंतनाचीच मला स्वत:ला अत्यंत आवश्यकता आहे, असे मला वाटते. कितीतरी बाबतीत माझा बुद्धदेवांशी संपूर्ण मतभेद आहे, पण मतभेद आहे एवढ्यासाठी मी त्यांच्या चारित्र्याचे, त्यांच्या उदात्त उपदेशांचे सौंदर्य लक्षात घेऊ नये असे थोडेच आहे? जगातील सर्व आचार्यांमध्ये बुद्धदेव हे एकटेच असे आहेत, की ज्यांच्या कार्याला बाहेरील कोणताही हेतू प्रेरक नव्हता. इतर महापुरुषांनी व सर्वांनीच आपण ईश्र्वरावतार आहोत अशी घोषणा केलेली आहे आणि ते असेही संगून गेले आहेत की, त्यांच्यावर जो विश्र्वास ठेवील तो स्वर्गी जाईल, मुक्त होईल, पण बुद्धदेवांकडे बघा. मृत्यूच्या अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी काय म्हटले आहे? ते नेहमी हेच म्हणत असत, ""कुणीही तुम्हाला मुक्त होण्यासाठी सहाय्य करू शकणार नाही. स्वत:च स्वत:ला सहाय्य करा, स्वत:च्याच प्रयत्नांनी मुक्तिलाभाची कास धरा!''
स्वत:संबंधी ते म्हणत, ""बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशाप्रमाणे अनंत ज्ञानसंपन्न. मी गौतमाने ती अवस्था प्राप्त करून घेतली आहे. तुम्हीही जर तिच्यासाठी प्राण पणास लावून प्रयत्न कराल, तर तुम्हालाही ती प्राप्त होऊ शकेल?''
ते पूर्ण कामनाशून्य होते. त्यांचे ठायी स्वार्थी हेतूंचा लेशही नव्हता. म्हणून स्वर्गात जाण्याच्या वा ऐश्र्वर्याच्या आकांक्षेचा गंधही त्यांचेठायी नव्हता. यौवनाच्या भर वसंतात, राज्यलक्ष्मीच्या स्नेहल अंकावर लोळत असताना सत्यलाभार्थ सिंहासनावर लाथ मारून आणि सर्व भोग-सुखांवर पाणी सोडून ते भारताच्या रस्त्या-रस्त्यांतून भ्रमण करीत भिक्षावृत्तीने उदरभरण करीत फिरले आणि समुद्रासारख्या आपल्या विशाल हृदयाच्या पवित्र प्रेरणेने, समस्त नर-नारींची व इतर प्राणिमात्रांचे कल्याण व्हावे म्हणून सत्याचा प्रचार करीत त्यांनी सर्वत्र संचार केला. अवघ्या जगामध्ये तेच असे एकमेव महापुरुष आहेत, की ज्यांनी यज्ञातील पशुहत्या थांबविण्यासाठी यज्ञपशूंच्या ऐवजी स्वत:चे जीवन बळी देण्याची तयारी दाखविली.
एकदा ते एका राजाला म्हणाले होते, ""यज्ञात पशूंचा बळी दिल्याने जर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होऊ शकत असेल, तर मानवाचा बळी दिल्याने त्याहीपेक्षा केवढीतरी श्रेष्ठ प्राप्ती होईल यात काय संशय? म्हणून यज्ञवेदीवर माझाच बळी द्या!'' त्यांचे हे म्हणणे ऐकून तो राजा खरोखर अत्यंत विस्मित होऊन गेला आणि लक्षात ठेवा, हे सर्व त्यांनी केले ते कोणताही मतलब पोटात न बाळगता. ते कर्मयोगाचे मूर्तिमंंत उदाहरण होते. त्यांना जी अत्युच्च अवस्था लाभली होती, तिच्यावरून हेच स्पष्ट दिसते की, कर्माच्या जोरावर आपणही आध्यात्मिक जीवनाचा अंतिम टप्पा गाठू शकू.
ईश्र्वरावर विश्र्वास ठेवल्याने पुष्कळांचा साधनामार्ग सुगम होत असतो यात शंका नाही, परंतु बुध्ददेवांच्या जीवनाचे अनुशीलन केल्यास हे स्पष्टपणे प्रतीत होते की, एखाद्याचा ईश्र्वरावर मुळीच विश्र्वास नसला, कोणत्याही विशिष्ट तत्त्वज्ञानाकडे त्याचा ओढा नसला, त्याने कोणत्याही संप्रदायाची कास धरलेली नसली किंवा तो कोणत्याही मंदिरात देवदर्शनार्थ जात नसला, फ़ार काय पण तो जरी बाह्यत: नास्तिक वा जडवादी वाटला तरीही तो ती चरम अवस्था प्राप्त करून घेण्यास समर्थ होऊ शकेल, यात काहीच संदेह नाही.
बुद्धदेवांच्या मतांचे वा कार्याचे मूल्यमापन करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. त्यांच्या अपूर्व हृदयाचा एक लक्षांशही मला लाभता, तर मी स्वत:ला धन्य मानले असते. त्यांचा ईश्र्वरावर विश्र्वास असला काय आणि नसला काय, त्याच्याशी मला काहीच करावयाचे नाही आणि त्याने माझी काही हानीही व्हावयाची नाही, परंतु एवढे मात्र निश्चित की, इतर व्यक्ती योगाच्या, भक्तीच्या वा ज्ञानाच्या साहाय्याने ज्या पूर्णावस्थेचा लाभ करून घेत असतात, तिचा बुद्धदेवांनाही लाभ झालेला होता. यावर किंवा त्यावर नुसता विश्र्वास ठेवीत गेल्याने सिद्धी लाभते असे नव्हे. केवळ तोेंडाने धर्माच्या आणि ईश्र्वराच्या लांबलचक बाता झोकूनही काहीच साधावयाचे नाही. एखादा पोपटही शिकवाल त्याची घडघड उजळणी करून दाखवू शकतो. कर्म निष्कामभावाने करू शकल्यासच सिद्धिलाभ होत असतो.
बसवेश्वर
ऐक्य होय, हे तत्त्व बसवण्णा जाणून होते. भारतातील
अध्यात्माचे ऐक्य साधण्यासाठीच त्यांनी "अनुभव मंडप'
ही संस्था स्थापन केली. या संस्थेत प्रवेश घेण्यास
कोणासही बंदी नव्हती. स्त्रियांनासुद्धा संस्थेचे सभासद
होता येत होते. जातीभेदाला तर थाराही नव्हता.
प्रत्येक माणसाला धार्मिक जीवन जगण्याची समान संधी मिळावी. त्या धार्मिक जीवनात जन्म, जात, व्यवसाय, स्त्री-पुरुष म्हणून भेदभाव केला जाऊ नये.
- म. बसवेश्वर
भारतात प्राचीन काळापासून भगवान शिवाची उपासना होत आली आहे. नंदी हा भगवान शिवाचे वाहन आणि शिष्य. कृषिप्रधान भारतात वृषभ (बैल) हा शेतकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. वृषभाला नंदीच्या रूपात पूजण्याची प्रथाही भारतात प्राचीन काळापासून आहे. सोमवार हा भगवान शंकराचा वार मानला गेला आहे. यादिवशी बैलांना शेतीकामाला जुंपण्यात येत नाही. शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता भाव ठेवून आठवड्यातून एकदा विश्रांती देण्याची परंपरा भारतीयांच्या तरल संवेदनेची ओळख करून देण्यास पुरेशी आहे. पशु-पक्षांचे शोषण होऊ नये यासाठी 21 व्या शतकातील मानव कायदे बनविताना दिसतो, परंतु भारतामध्ये प्राणिमात्रांवर दया करणेच नव्हे, तर ईश्वररूपात पाहणेदेखील दैनंदिन आचरणाचा अविभाज्य भाग आहे. 900 वषार्र्ंपूर्वी समाजात समरसता निर्माण करणाऱ्या महात्मा बसवेश्वरांना साक्षात नंदीचा अवतार मानले गेले. संस्कृतमधील "वृषभ' या शब्दाचे बसव हे कन्नड रूप. सन 1131 मध्ये बसवण्णांचा जन्म झाला. (बसवला लोक प्रेमाने बसवण्णा म्हणत) पुढे लोकांनी त्यांना आदराने "बसवेश्वर' हे नामाभिधान दिले.
समुद्राला भरती येते, त्यानंतर ओहोटी येते. सूर्य मध्यावर येतो आणि नंतर मावळतोही. समाजाचेही तसेच असते. या भूमीने व्यास, कपिल, कनाद, गौतम, चार्वाक, महावीर आणि बुद्ध यांच्यासारखे श्रेष्ठ तत्त्ववेते, चंद्रगुप्तांसारखे सम्राट निर्माण केले. समाज भरभराटीला आला आणि नंतरच्या काळात अधोगतीही झाली. निरर्थक अंगरूढींनी उच्छाद मांडला. स्पृश्य-अस्पृश्यता यांसारख्या समाजाला मागे खेचणाऱ्या प्रथा बोकाळल्या. दुर्दैव असे की हे सारे धर्माची झूल पांघरून सुरू होते. अशावेळी बसवण्णा यांचा उदय झाला आहे.
आधुनिक सुधारणावाद्यांपेक्षा बसवण्णा वेगळे होते. 19 व्या शतकातील थोर सुधारक स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत सांगायचे तर आधुनिक सुधारणावाद्यांना धर्माची मोडतोड केल्यावाचून सामाजिक सुधारणा करणे अशक्य वाटते. अलीकडच्या काळात असा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला, त्यांना अपयश मिळल्याचे दिसते. कारण त्यांच्यापैकी फारच थोड्यांनी स्वत:च अभ्यास केला होता आणि सर्व धर्मांची जननी असलेल्या आपल्या धर्माचे शिक्षण, त्यासाठी आवश्यक ती साधना तर एकाचीही झाली नव्हती.
समाजाची अवनती होते, ती धर्मामुळे नव्हे तर धर्मतत्त्वांचे योग्यरीतीने पालन न केल्याने, हे महात्मा बसवेश्वर जाणून होते. कृष्णा आणि मलापहारी नद्यांच्या संगम ठिकाणी असलेल्या गुरुकुलात ज्ञानी गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण घेतले होते. विविध ग्रंथांचा, ज्ञानाच्या सर्व शाखांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांनी संस्कृत ग्रंथातील धर्मतत्त्वे कन्नडमधून लिहिली. बसवण्णांपूर्वी कन्नड वाङ्मय फक्त पद्यस्वरूपात लिहिले गेले होते. बसवण्णांनी गद्यातून वचने लिहिण्यास सुरुवात केली, त्यामुळे कन्नड भाषेतील गद्य वाङ्मयाचा विकास झाला. कित्येक शिवशरणांनी म्हणजे शैवसंतांनी बसवण्णांचे अनुकरण केले. या वचनांचा लोकांमध्ये प्रचार झाला. वचनांच्या माध्यमातून समाजाच्या निरनिराळ्या बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. समाजाची नैतिक व धार्मिकदृष्ट्या रचना कशी असावी, हे सांगण्यात आले. प्रत्येकाने आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय करतानाच प्रामाणिक व आध्यात्मिक जीवन जगायला मार्गदर्शक ठरतील अशी तत्त्वे बसवेश्वरांनी समाजाला दिली.
कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील खेड्यांतील लोकांच्या जिभेवर आजही बसवेश्वरांची वचने आरूढ झालेली दिसतात.
बसवण्णांचे समाजपोषक विचार आणि आचार याने प्रभावित होऊन चालुक्य राजाच्या दरबारात बसवण्णांना मानाचे स्थान मिळाले. सर्वसामान्यांच्या उन्नतीची कामे करण्यात बसवण्णांचा हातखंडा होता. निस्पृहता आणि कर्तृत्वाच्या बळावर बसवण्णा राज्याच्या मंत्रिपदी आरूढ झाले. सत्ता आणि वैभव, कीर्ती पायाशी लोळण घेतानाही बसवण्णा आध्यात्मिक नीतिमूल्यांपासून ढळले नाहीत. या समाजाचे ऐक्य म्हणजे येथील अध्यात्मिक शक्तींचे ऐक्य होय, हे तत्त्व बसवण्णा जाणून होते. भारतातील अध्यात्माचे ऐक्य साधण्यासाठीच त्यांनी "अनुभव मंडप' ही संस्था स्थापन केली. या संस्थेत प्रवेश घेण्यास कोणासही बंदी नव्हती. स्त्रियांनासुद्धा संस्थेचे सभासद होता येत होते. जातीभेदाला तर थाराही नव्हता.
बसवण्णा - मंत्री, प्रभुदेव - तेजस्वी आध्यात्मिक नेते, सिद्धाराम - कर्मयोगी, चेन्नबसवण्णा - प्रकांड पंडित, अक्कमहादेवी - महासाध्वी, माचैया - धोबी, रामण्णा - गुऱाखी, मद्द्य - शेतकरी, रेम्मवे - विणकर, रामीदेव - कोतवाल, कनैया - तेली, संगण्णा - वैद्य, बसप्पा - सुतार, काकैया - चर्मकार, हरळैया - मोची असे विविध क्षेत्रांतील लोक अनुभव मंडपात सहभागी होते.
जातीभेद निर्मूलन, समाज प्रबोधन, प्रशासन या क्षेत्रांतील महात्मा बसवेश्वर यांचे कार्य 900 वर्षांनंतरही तेवढेच प्रासंगिक असल्याचे आजच्या समाजाकडे पाहिल्यास जाणवते. महात्मा बसवेश्वरांनी समाजाला जोडण्याचे, अंधरूढी नष्ट करण्याचे कार्य केले, परंतु गुरूंचा पराभव करणारे शिष्य इतिहासात जागोजागी दिसतात. तसे बसवण्णा यांच्याही बाबतीत पाहायला मिळते. म. बसवेश्वर यांचे नाव घेत "शैव हे हिंदू धर्माहून वेगळे आहेत', "आमचा धर्म वेगळा आहे' असे म्हणणारे अंध बसवेश्वरभक्त पाहायला मिळातात. ज्या लोकांना या देशाशी आणि येथील धर्मतत्वांशी काही देणेघेणे नव्हते, त्या परक्यांनी लिहिलेली पुस्तके घोकून पीएच.डी. मिळविणारे आमचे बांधव बसवेश्वरांचा जयजयकार करीत समाजात भेद उत्पन्न करण्याचा प्रयत्न अज्ञानामुळे करीत आहेत. अन्य धर्मीय प्रसारक आपल्या भारतीय धर्मांची लचके तोडत असताना भारतातील आध्यात्मिक शक्तींचे ऐक्य साधणे आवश्यक आहे. "एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति' हे हिंदू धर्माचे मूलभूत तत्त्व "जगात ईश्वर एकच आहे, फक्त नावे निराळी आहेत' म. बसवेश्वर यांनी सांगितली. "माझाच धर्म खरा' असा दुराग्रह धरून भारताबाहेर उगम पावलेले रिलिजन (धर्म नव्हे) भारतीय धर्मावर आघात करू पाहताना भारतीय आध्यात्मिक पंथांनी एकजूट होण्याची आवश्यकता आहे. जातीपातीच्या भिंती पाडून एकरस समाजासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे. माझा महात्मा बसवेश्वरांच्या आजच्या युवापिढीला हाच संदेश आहे.
***
सावरकरांची विज्ञाननिष्ठा
व्याख्या काय, त्या कल्पनेची ठळक वैशिष्ट्ये
कोणती? हे समजून घेतले की, सावरकरांच्या
विचार-व्यवहाराला त्या सर्व लक्षणांचे कसे
भक्कम अधिष्ठान होते, ते दिसून येईल. प्रत्येक
बाब बुध्दीच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून
मगच स्वीकारणे, शोधक- जिज्ञासू वृत्तीचा
अंगिकार करणे, प्रत्ययाला येणाऱ्या कोणत्याही नव्या गोष्टींचा मन:पूर्वक स्वीकार करण्याची मानसिकता
बाळगणे ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्यवच्छेदक लक्षणे म्हणता येतील.
क्रांतीवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावामागे जितक्या स्वाभाविकपणे "स्वातंत्र्यवीर' ही बिरुदावली लावली जाते, तितक्याच सहजपणे अन्यही अनेक विशेषणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसतात. कट्टर राष्ट्राभिमानी, प्रतिभावन्त साहित्यिक, बुध्दिमान विचारवंत, निरलस-स्वार्थत्यागी देशभक्त, संवेदनशील कवी, ... या साऱ्या विशेषणांबरोबरच "निखळ विज्ञाननिष्ठ' याही शब्दांत सावरकरांचे वर्णन केले जाते. सनातन हिंदुधर्माचे कडवे अभिमानी असूनही बावनकशी विज्ञाननिष्ठांची जोपासना या दोन बाबींमध्ये विरोधाभास असल्याचा भ्रम अनेकदा सावरकरांच्या संदर्भात हेतुपूर्वक निर्माण केला जातो. गमतीची बाब पहा : सावरकरांच्या व्यक्तित्वाच्या या विज्ञानिष्ठ पैलूकडे एकतर आंधळेपणाने दुर्लक्ष तरी केले जाते किंवा त्यांच्या विज्ञानविषयक वक्तव्यांचा मतलबासाठी गैरवापर तरी केला जातो. अन्यथा त्यांच्या विचारांशी सुतराम संबंध नसणारे राजकारणी आपल्या स्वार्थासाठी मात्र सावरकरांच्या वक्तव्यांचा-मोडून, तोडूनच- आधार घेतात.
गोहत्येबाबतची चर्चा आणि त्यात आपापल्या युक्तिवादासाठी सावरकरांच्या मताचा दिला जाणारा दाखला हे याचे अत्यंत ठळक उदाहरण आहे. आभास असा निर्माण केला जातो की जणू "उठा आणि सरसकट गायींची कत्तल करीत सुटा' असेच सावरकरांनी सांगितलेय. खरेतर सावरकरांनी गायीविषयी जे विचार व्यक्त केले आहेत, त्यांचा वस्तुनिष्ट सारांश, "गोपालन, गोरक्षण आणि गोसंगोपन ही मनुष्यमात्रांस अतिशय उपयुक्त बाब आहे,' असाच आहे. "गोपालन-गोपूजन नव्हे' हे त्यांच्या गायीवरील निबंधाचे शीर्षकच बोलके आहे. "गाय हा पशु हिंदुस्थानसारख्या कृषिप्रधान देशात अत्यंत उपयुक्त असल्याने अगदी वैदिक काळापासून आपल्या हिंदू लोकांत तो आवडता असावा, हे साहजिकच आहे. शेतीच्या खालोखाल जिच्या दूध-दही-लोणी-तुपावर मनुष्याचा पिंड आजही पोसला जात आहे, त्या अतिउपयुक्त पशुंचे आम्हां मनुष्यांस एखाद्या कुटुंबीयाइतके ममत्व वाटावे, हे माणुसकीला धरूनच आहे. अशा त्या गायीचे रक्षण करणे, हे आपले वैयक्तिक नि कौटुंबिकच नव्हे तर, आपल्या हिंदुस्थानपुरते एक राष्ट्रीय कर्तव्यच आहे... तेव्हा आमची साऱ्या गोरक्षक संस्थांस अशी विनंती आहे की, त्यांनी गोपालक बनावे. वैज्ञानिक साधनांनी मनुष्यास त्या पशुचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल, याच काय त्या दृष्टीने तिची अमेरिकेसारखी सकस नि सुरेख वीण वाढवून, दूध वाढवून, आरोग्य वाढवून जोपासना करावी, गोरक्षण करावे. राष्ट्राचे गोधन वाढवावे, परंतु त्या नादात भाबडेपणाची भेसळ होऊ देऊन पशुलाच देव करून पूजण्याचा मूर्खपणा करू नये. गाईचे कौतुक करायचे तर तिच्या गळ्यात घंटा बांधा-पण देवाच्या गळ्यात हार घालतो त्या भावनेने नव्हे तर, कुत्र्याच्या गळ्यात पट्टा घालतो त्या भावनेने...' या शब्दांत भाष्य करताना सावरकराना जो संकेत ठळकपणाने व्यक्त करायचा आहे, तो लक्षात घेणे आवश्यक आहे.
त्या निबंधात सावरकर पुढे म्हणतात, "हा प्रश्न एका फ़ुटकळ धर्मसमजूतीचा नाही. अशा धार्मिक छापाच्या ज्या शेकडो खुळ्या समजुती आपल्या लोकांची बुद्धिहत्या करीत आहेत, त्या भाकड प्रवृत्तींचा आहे...! तिचे एक उपलक्षण म्हणून आम्ही गायीची गोष्ट तेवढी निवडली...' या उद्गाराचा थोडा तटस्थ आणि बारकाईने विचार केला तर, त्यांच्या दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य लक्षात येते. ते ध्यानात घेण्याऐवजी मोडतोड करून संकुचित अर्थाने सावरकर विचारांचा वापर केल्यामुळे विज्ञानाचा अंगिकार म्हणजे धर्मावर आघात असा अत्यंत चुकीचा समज प्रस्तुत होतो. सावरकरांनी उलट धर्माची जोपासना खऱ्या अर्थाने विज्ञानाच्या आधारेच करता येईल आणि केली पाहिजे असेच महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे. सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेचे संपूर्ण आकलन करून घ्यायचे तर, अशा अर्धवट आणि मतलबी तर्कवादाच्या पलीकडे जाऊन विचार करणे आवश्यक आहे.
वैज्ञानिकता म्हणजे काय?
मुळात विज्ञाननिष्ठा या शब्दाची वा संकल्पनेची व्याख्या काय, त्या कल्पनेची ठळक वैशिष्ट्ये कोणती? हे समजून घेतले की, सावरकरांच्या विचार-व्यवहाराला त्या सर्व लक्षणांचे कसे भक्कम अधिष्ठान होते, ते दिसून येईल. प्रत्येक बाब बुध्दीच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून मगच स्वीकारणे, शोधक-जिज्ञासू वृत्तीचा अंगिकार करणे, प्रत्ययाला येणाऱ्या कोणत्याही नव्या गोष्टींचा मन:पूर्वक स्वीकार करण्याची मानसिकता बाळगणे ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्यवच्छेदक लक्षणे म्हणता येतील. मात्र यातल्या कोणत्याही एका बाबीचा- अगदी बुध्दिवादासकट-एकात्मिक दुराग्रहसुध्दा वैज्ञानिकतेला अंतिमत: बाधाच उत्पन्न करणारा ठरतो, याचे भान बाळगले पाहिजे. आंधळा दैववाद जसा चुकीचा, तितकाच एककल्ली बुध्दिवादही अनुपयोगी. बुध्दिगम्यतेच्याही पलीकडच्या अनेक गोष्टी एका मर्यादेपर्यर्ंत मान्य करणे अपरिहार्य असते. याचे असंख्य उदाहरणे आपण दैनंदिन जीवनात अनुभवतो. बुध्दी ही सृष्टीतल्या सर्व सजीवांपेक्षा मानवाला श्रेष्ठत्व प्रदान करणारी बाब आहे, हे सर्वमान्य सत्य."बुध्दिर्विहिन: पशुभि: समान:' ही उक्ती प्रसिध्दच आहे. मात्र भूकंपासारख्या अवचित येणाऱ्या संकटांची पूर्वसूचना माणसाच्या कितीतरी आधी त्या "निर्बुध्द' पशुंना कळते, हे आपण अनुभवले आहे. पावसाळा जवळ येत चालला की मुंग्यांची वर्दळ वाढते, पक्ष्यांचीही धांदल उडते, हेही आपण पाहतो. म्हणूनच निसर्गात असलेल्या नियमांना संपूर्णपणे समजून घेण्यात मानवी बुध्दी तोकडी पडते, हे मान्य करावेच लागते. सावरकर हे मोकळेपणाने मान्य करतात, हे त्यंाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य.
"खरा सनातन धर्म कोणता,' या त्यांच्या निबंधात सावरकर नमूद करतात, "ही गोष्ट आम्ही जाणून आहोत की हे सनातन धर्म, हे सृष्टिनियम संपूर्णपणे मानवाला आज अवगत नाहीत. जे आज अवगत आहेसे वाटते, त्याबाबतचे आमचे ज्ञान विज्ञानाच्या विकासाने पुढे थोडेसे चुकलेलेही आढळेल आणि अनेक नवनवीन नियामांच्या ज्ञानाची भर त्यात निश्चित
पडेल. जेव्हा जेव्हा ती पडेल वा त्यात सुधारणा करावी लागेल, तेव्हा तेव्हा आम्ही आपल्या या वैज्ञानिक स्मृतीत न लाजता, न लपविता किंवा आजच्या श्र्लोकांच्या अर्थाची अप्रामाणिक ओढताण न करता नवीन श्र्लोक प्रकटपणे घालून ती सुधारणा घडवून आणू आणि उलट मनुष्याचे ज्ञान वाढले म्हणून त्या सुधारणेचे भूषणच मानू...' इतक्या स्वच्छ शब्दांत विज्ञानाचे महानपण आणि मानवी शक्तीचे तोकडेपण मान्य करणारे स्वातंत्र्यवीर नव्याचा स्वीकार करण्याची- सदैव टवटवीत मानसिकता बाळगणे या वैज्ञानिकतेच्या कसोटीला तंतोतंत उतरतात.
त्याउलट दैववादावर मात्र ते कडाडून हल्ला चढवितात-मात्र तोही अत्यंत तर्कनिष्ठ शब्दांत आणि समर्पक उदाहरणांसह. विरोधासाठी विरोध नव्हे, तर बिनतोड युक्तिवादाच्या आधारे त्यांनी भाबड्या दैववादावर आपल्या निबंधात कसा आसूड ओढला आहे, तो त्यांच्याच शब्दांत पाहणे उद्बोधक होईल. "खरा सनातन धर्म कोणता' या निबंधात सावरकर लिहितात, "सूर्य, चंद्र, आप, तेज, वायु, भूमि, अग्नि आणि समुद्र प्रभुती या कोणी लाभाच्या लहरीप्रमाणे प्रसन्न वा रुष्ट होणाऱ्या देवता नसून, या आमच्या सनातन धर्माच्या नियमांनी पूर्णपणे बध्द असणाऱ्या वस्तू आहेत. ते नियम जर आणि ज्या प्रमाणात मनुष्यास हस्तगत करता येतील, तर आणि त्या प्रमाणात सर्व सुष्ट शक्तींशी त्याला रोखठोक आणि बिनचूक व्यवहार करता आलाच पाहिजे-करता येतोही. भर महासागरात तळाशी भोके पडलेली नाव सोडून मग ती बुडू नये म्हणून त्या समुद्रास प्रसादविण्यासाठी नारळांचे ढीग त्यात फ़ेकले आणि अगदी शुध्द वैदिक मंत्रांत जरी टाहो फ़ोडला तरी तो समुद्र आमच्या जनांसह त्या नावेस बुडविल्यावाचून हजारात नऊशे नव्याण्णव प्रसंगी राहत नाही आणि जर त्या नावेस वैज्ञानिक नियमांनुसार ठाकठीक करून, पोलादी पत्र्यांनी मढवून, बेडर बनवून सोडली तर तिच्यावर वेदांची होळी करून शेकणारे आणि पंचमहत्पुण्ये समजून दारू पीत, गोमांस खात मस्त झालेले रावणाचे राक्षस जरी चढलेले असले तरी त्या बेडर नावेस हजारात नऊशे नव्याण्णव प्रसंगी समुद्र बुडवीत नाही-बुडवू शकत नाही, तिला वाटेल त्या सुवर्णभूमीवर तोफ़ांचा भडिमार करण्यासाठी सुखरूपपणे वाहून नेतो. जी गोष्ट समुद्राची तीच इतर महाभूतांची. त्यांस माणसाळविण्याचे महामंत्र वेदात, कुराणात, झेंद अवेस्थात नसून, प्रत्यक्षनिष्ठ विज्ञानात सापडणारे आहेत...!' केवळ दैववादावर आंधळी निष्ठा ठेवणे कसे चुकीचेच नव्हे तर, सर्वथा अनर्थकारक आहे, हे सावरकरांनी निखळ बुध्दिनिष्ठ आणि तर्कशुध्द भाषेत सातत्याने मांडले. श्रुती, स्मृतींमध्ये जे मांडले, ते अनुभवसिध्द आणि ज्ञाननिष्ठ चिंतनातूनच पूर्वजांनी सांगितले आहे, त्याबद्दल शंका न घेता त्याचा अवलंब करणेच हिताचे आहे, त्यातच संस्कृतीचे जतन, रक्षण सामावले आहे. अशा प्रगाढ श्रध्देच्या आधारे रूढींचे पालन करणाऱ्यांना उद्देशूनही सावरकरांनी दिलेला संदेश असाच तर्कशुध्द आहे. "संस्कृतीरक्षणाचा खरा अर्थ प्राचीन काळी वेळोवेळी ज्या उलटसुलट प्रथा त्या काळच्या ज्ञान-अज्ञानाप्रमाणे "संस्कृत' वाटल्या, त्या जरी आज व्यर्थ वा विक्षिप्त वाटल्या तरीही तशाच चालू ठेवणे हा नव्हे- आज जे संस्कृत म्हणून अभिमानाने रक्षावयाचे, ते प्राचीनातले आजही मनुष्यास हितकारक ठरणारे तेवढे, तेवढेच काय ते होय...' थोडक्यात, प्राचीन ग्रंथवाङ्मयातून जे सांगितले, तेही आजच्या विज्ञानसिध्द, वस्तुनिष्ठतेच्या कसोटीवर पारखून मगच स्वीकारायचे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. "वस्तुनिष्ठता' हा त्यांच्या बुध्दिप्रामाण्यवादी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा दुसरा महत्त्वाचा पैलू आहे, हे येथे लक्षात घ्यायला हवे. याच वस्तुनिष्ठतेच्या कसोटीवर शंकराचार्यादि महापुरुषांचे मार्गदर्शनही पारखून घ्यायला हवे, हेही स्पष्टपणे सांगण्यात ते संकोच करीत नाहीत. एका निबंधात याचा परामर्श घेताना त्यांनी म्हटले आहे की, "आंतरअनुभूतीतून प्राप्त झालेले आणि शंकराचार्य, मध्व, रामानुज, पतंजली, कपिलमुनी आदींच्या कथनांतून प्रकट झालेले ज्ञानही अंतिम नाही- नाहीतर त्या सर्वार्ंच्या मांडणीत विसंगती राहिली नसती...' हाच मुद्दा एका मार्मिक काव्यपंक्तीतून अधिक स्पष्ट करताना सावरकर लिहितात :
" पाहिले प्रत्यक्षचि, कथितो पाहियले त्याला,
वदति सारे आप्तचि सारे, मानू मी कवणाला...?'
सगळेच थोर चिंतक जे प्रत्यक्ष पाहिले त्याचेच प्रमाण देऊन सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात. ते सारे आत्मीय, आप्तच आहेत. तरीही त्यांनी त्यांना जे सत्य गवसले वा भासले ते सांगितले आहे, परंतु सत्याचा शोध ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सखोल विचार आणि सातत्याच्या संशोधनातून सत्याचे नवे नवे पैलू प्रत्येक चिंतकाला गवसतात. त्यामुळेच त्यांच्या मांडणीत, ती अनुभवसिध्द असली तरीही, परस्परविरोधी आणि विसंगती आढळते. अशा स्थितीत "मानू मी कवणाला?' अशा संभ्रमात न घोटाळता, बुध्दिनिष्ठा आणि विवेकनिष्ठा अंगिकारणे हेच श्रेयस्कर आहे. म्हणजेच वस्तुनिष्ठेच्या पाठोपाठ विवेकनिष्ठा हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणखी एक पैलू सावरकर आपल्यासमोर उलगडून ठेवतात आणि बुध्दीच्या सहाय्याने, विवेकाच्या आधारे सतत चिंतनशील राहण्याची प्रेरणा जागवितात. ज्ञान-विज्ञानाच्या अंगिकाराने सामोरा येणारा सत्याचा नवा पैलू जुन्या समजुतींना धक्का देणारा असला तरीही त्याला मोकळेपणाने स्वीकारण्याचे धैर्य ही प्रेरणा आपल्याला प्रदान करते.
परिपूर्ण वैज्ञानिकता
सावरकर यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा चौथा आणि महत्त्वाचा पैलू लक्षात घेणे अतिशय आवश्यक आहे. कारण तो पैलू त्यांच्या विज्ञाननिष्ठेला परिपूर्णता प्रदान करतो आणि आपणा सर्वांना एक उज्ज्वल प्रेरणा प्रदान करतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयीच्या भौतिक आणि सैध्दांतिक चर्चेच्या पलीकडे आपणा सर्वांना घेऊन जाणाऱ्या या प्रेरणेचा अंगिकार हाच सावरकरांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला केलेला सर्वश्रेष्ठ प्रणाम होय. प्रखर वास्तवतेची जाणीव करून देत आपणा सर्वांना कर्तव्यबोध करून देणारा संदेश जागविताना सावरकर म्हणतात, "कोणत्या हेतूने वा हेतुवाचून हे जगड्व्याळ विश्र्व प्रेरित झाले, ते मनुष्याला तर्किता देखील येणे शक्य नाही. जाणता येणे शक्य आहे ते इतकेच की, काहीही झाले तरी मनुष्य या विश्वाच्या देवाच्या खिजगणतीतही नाही. जशी कीड, मुंगी, माशी तसाच या अनादि अनंत काळाच्या असंख्य उलाढालीतील हा मनुष्यही एक तात्पुरता आणि अत्यंत तुच्छ परिणाम आहे... विश्वात आपण आहोत, पण विश्व आपले नाही. फार फार थोड्या अंशांनी ते आपणास अनुकूल आहे. फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे...' या शब्दांत केवळ वस्तुस्थितीची जाणीव करून देऊन ते थांबले असते तर, कळत-नकळत तुम्हा आम्हा सर्वांना न्यूनभावाच्या आहारी जाऊन अधोमुख होण्याला प्रवृत्त करणारे ठरले असते, पण सावरकर येथेच थांबत नाहीत आणि यातच त्यांच्या चिंतनाचे, दृष्टिकोनाचे आणि मार्गदर्शनाचे सर्वांत मोठे महत्त्व प्रत्ययाला येते. सावरकर पुढे बजावून सांगतात : "... फार फार मोठ्या अंशांनी आपल्याला प्रतिकूल असे जे आहे ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी, विश्वाच्या देवाची तीच खरी पूजा... ही विश्वाची आदिशक्ती ज्या काही ठराविक नियमांनी वर्तते, ते तिचे नियम समजतील, जे समजून घेऊन त्यातल्या त्यात आपल्या मनुष्यजातीच्या सुखाला नि हिताला पोषक होईल तसा त्यांचा साधेल तसा उपयोग करून घेणे मनुष्याच्या हातात आहे...!' म्हणजे, विश्वाच्या आदिशक्तीच्या दृष्टीने भले मानवी जीवनास अत्यंत तात्पुरते वा तुच्छ स्थान असो; आपण मात्र त्या शक्तीच्या नियमांना बेधडक आणि धीटपणे सामोरे जावे, हीच खरी माणुसकी. असा पुरुषार्थप्रेरक आवाहन करणारा आणि जगड्व्याळ आदिशक्तीच्याही समोर आव्हान उभे करू पाहणारा विचार सावरकर देऊन जातात. नुसता विचारच देतात असे नव्हे, तर तशा पुरुषार्थाच्या व्यवहाराचे खणखणीत उदाहरण आपणासमोर आणि आगामी अनेक पिढ्यांसमोर स्वत:च्या जीवनव्यवहारातून उभे करतात.
सावरकरांच्या व्यक्तित्व, चरित्र आणि विचारांचा या उत्तुंग उंचीला नीटपणे समजून घेतले म्हणजे मग त्यांच्या कवितेच्या ओळी कारागृहाच्या भिंतीवरून पुसून टाकण्याचा नतदृष्टपणा करणाऱ्यांनी क्षुद्रतेची कशी पराकोटी गाठलीय, हे सहज लक्षात येईल. अशा कोत्या आक्षेपांना आणि अडथळ्यांना सहजपणे ओलांडून सावरकरांचे नाव आणि शिकवण इतिहासाच्या कालपटलावर कधीच कोरली गेली आहे आणि ती सृष्टीविज्ञानाशी इतकी घट्ट नाते सांगणारी आहे की, निसर्ग आणि त्यातून अभिव्यक्त होणारे ज्ञानविज्ञान जितके चिरपुरातन आणि नित्यनूतन आहे, तितकेच अमरत्व सावरकरांच्या विचारांनाही प्राप्त झाले आहे. बुध्दिप्रामाण्य, वस्तुनिष्ठता, विवेकनिष्ठा आणि पुरुषार्थ या चार स्तंभांच्या भक्कम आधारावर उभा असलेला सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकरण्याची प्रेरणा आपणां सर्वांच्या विचार, वृत्ती आणि वर्तनात सतत जागती राहो, ही भारतमातेच्या चरणी प्रार्थना !
***
अक्षता
पिंजर किंवा केशर लावून रंगविलेल्या अक्षत म्हणजेच अखंड तांदुळांना अक्षता म्हणतात. अक्षतांचे अनेक उपयोग आपल्या धर्मकृत्यांत सांगितले आहेत. अक्षता हे पूजोपचारांतले प्रातिनिधिक द्रव्य आहे. म्हणजे देवपूजेत एखादा उपचार उपलब्ध नसेल, तर त्या ऐवजी देवाला अक्षता वाहतात. महापूजेतील अंगपूजा, आवरणपूजा इ. पूजा अक्षता वाहूनच करतात. विविध कर्मांग देवता, पीठावर देवतेसाठी ठेवलेल्या सुपारीवर अक्षता वाहूनच त्या त्या देवतेचे आवाहन करतात. अक्षता हा पूजेतला एक गौण पण स्वतंत्र असा उपचारही आहे. त्या साठीचा हा मंत्र -
अक्षतास्तंडुला: शुभ्रा: कुंकुमेन विराजिता: ।
मयानिवेदिता भक्त्या गृहाण परमेश्र्वर ।।
कुंकुमाने रंगविलेले शुभ्र तांदूळ म्हणजेच अक्षता मी तुला भक्तीने समर्पण करतो. हे परमेश्र्वरा, त्यांचे ग्रहण (स्वीकार) कर.
लग्न-मुंजीच्या प्रसंगी, वधू-वरांच्या आणि मुंजा मुलांच्या मस्तकावर अक्षता टाकतात. वधू-वरांवर अक्षता टाकण्याचीही चाल पुरातन आहे. अक्षतेतले धान्य सुपीकपणाचे प्रतीक समजले जात असे. वधू-वरांचा विवाह संततीने सुफ़लित व्हावा, हा उद्देश त्यात आहे. याशिवाय धान्याच्या ठिकाणी भूता-खेतांचे निवारण करण्याची शक्ती असल्यामुळे वधू-वरांना भूता-खेतांची दृष्ट लागू नये, म्हणूनही त्यांच्यावर अक्षता टाकतात. लग्नविधीत ""अक्षता रोपण'' हा एक स्वतंत्र विधी आहे.
या मंगल अक्षता तांदूळ, ज्वारी इत्यादी कोणत्याही धान्यांच्या असू शकतात. प्राचीन काळी ग्रीसमध्येही वधू-वरांवर याच कारणासाठी पीठ आणि मिठाई उधळण्याची चाल होती. प्राचीन पर्शियन विवाह समारंभातही तांदुळांना महत्त्वाचे स्थान होते. आजही पारश्यांत लग्न आणि नवज्योत या प्रसंगी अक्षता टाकण्याची चाल आहे. विविध कर्मांमध्ये ब्राह्मण आशीर्वादाचे मंत्र म्हणून यजमानाला मंत्राक्षता देतात. या अक्षता बळ, समृध्दी आणि दीर्घायुष्य देणाऱ्या आहेत.
***
जयंत फडके
अनुसंधानातून ध्यानाकडे
स्वयंसूचनेद्वारा एखादी प्रक्रिया न्याहाळणे म्हणजे अनुसंधान. तेव्हा या अनुसंधानाच्या साह्याने धारणेकडून ध्यानाकडे जायचे आहे. ध्यानालाच प्रत्यय एकतानता असे म्हटले जाते. आपल्या शरीरातल्या काही मर्मस्थानांमध्ये "व्यान' प्राणाची जाणीव जागृत करून म्हणजे अनुसंधानाच्या साह्याने आपण शरीरातल्या मर्मस्थानांच्या जोडांमधले म्हणजे सांध्यांमधले व्यान-प्राणाचे भ्रमण न्याहाळणार आहोत. ही प्रक्रिया पूर्णपणे आंतरिक असते. या प्रक्रियेत आता प्राणशक्ती एका मर्मस्थानाकडून दुसऱ्या मर्मस्थानाकडे कशी जाते, हे तर अनुभवायचे आहेच, पण हा प्रवास होताना वाटेतल्या अवयवांवरही त्याचा प्रभाव कसा पडतो, याचाही अनुभव घ्यायचा आहे. प्राणशक्ती स्वत:च फिरणार आहे. आपल्याला तिचा प्रवाह केवळ अनुभवायचा आहे. या भ्रमणाचे आपल्याला साक्षीदार व्हायचे आहे.
पहिल्या स्तरावर ही हालचाल डोक्यापासून तळपायांपर्यंत म्हणजे अधोगामी असते. हा प्रवास होताना ही प्राणशक्ती वाटेत काही स्टेशन्स घेत जाते. मस्तकापासून तिचा प्रवास चेहऱ्यावरून त्याच्या मागून सुरू असतो. ती डाव्या, उजव्या बाजूने मागून पुढून गळ्यापर्यंत येते. तेव्हा तिचा अन्य प्राणिक शक्तींशी मिलाफ होतो. यावेळी आपल्याला एक प्राणिक कंठा परिधान केल्याची जाणीव होते. ही जाणीव आणि प्राणिक शक्तींचा मिलाफ यांच्यात अधिक एकतानता निर्माण व्हावी यासाठी आपण "म'काराचा घोष करू शकतो. तसे केल्यास आपण चेहऱ्यावरून प्राणिक मुखवटा घातला आहे, असे वाटायला लागते.
अशाच रीतीने गळ्यापासून कटिप्रदेशापर्यंत प्राणशक्तीचा अधोगामी प्रवास सुरू राहतो. गळा, मान, खांदे, पाठ, छाती, बगल, पोट असा मागे-पुढे आणि डाव्या-उजव्या बाजूंनी प्राणशक्ती कटिप्रदेशापर्यंत हा प्रवास सुरू असतो आणि अनुसंधानाद्वारा या प्रवासाची जाणीव घेतली जाते. तेव्हा कंबरेभोवती "उ'काराचा कंबरपट्टा घातला असल्याची जाणीव होते. हातांच्या बोटांच्या पेरापासून ते कंठस्थानापर्यंतच्या या प्रवासातली जाणीव आणि ही प्राणशक्तीच्या जाणिवेची एकतानता प्रस्थापित होण्यासाठी "उ' काराचा घोष केला जातो. तेव्हाच्या अननुभूत चेतनेमुळे आपण प्राणिक शक्तीचा सदरा घातला आहे की काय, असे वाटायला लागते.
प्राणिक शक्तीच्या या अधोगामी प्रवासाच्या तिसऱ्या टप्प्यात प्राणिक शक्तीचा प्रवास कंबरेपासून पायांच्या बोटांच्या पेरांपर्यंत सर्वबाजूंनी होत असताना आपल्याला वेगळीच जाणीव होते. ती जाणीव अधिक एकात्मिक व्हावी यासाठी "अ' काराचा घोष केला जातो. अनुसंधानाच्या या पायऱ्यांवर अ, उ आणि म कार उच्चारला जातो. त्यास "नादानुसंधान' असे संबोधले जाते.
अनुसंधानाच्या दुसऱ्या भागात प्राणशक्तीच्या ऊर्ध्वगामी प्रवासाची जाणीव घेतली जाते. याच प्राणशक्तीच्या अधोगामी प्रवासाच्या नेमक्या उलट दिशेने म्हणजे पायाच्या बोटाच्या टोकापासून ते डोक्यापर्यंत प्रवास होत असतो. हा ऊर्ध्वगामी प्रवासही अधोगामी प्रवासाप्रमाणेच तीन टप्प्यांत होत असतो. पहिल्या टप्प्यात हा प्रवास पायांच्या बोटांच्या टोकापासून कंबरेपर्यंत होतो. प्राणशक्ती कंबरेपर्यंत आल्यावर होणारी जाणीव एकात्मिकपणे व्हावी यासाठी "उ' काराचा घोष करावा.
दुसऱ्या टप्प्यात हा प्रवास कंबरेपासून ते कंठापर्यंत होतो. प्राणशक्ती कंठापर्यंत आल्याची जाणीव होताच ती अधिक एकात्मिक व्हावी यासाठी "म'काराचा उच्चार करावा तर कंठापासून मस्तकापर्यंत होणाऱ्या प्रवासाचे साक्षीदार होतानाच नाद आणि प्राण यांच्या एकतानतेसाठी "अ'काराचा नाद करावा.
अनुसंधानाच्या तिसऱ्या पायरीवर फारसे प्रयास करावे लागत नाहीत. प्राणशक्तीच्या ऊर्ध्वगामी आणि अधोगामी अशा दोन्ही प्रवासांची केवळ जाणीव घेत राहावे लागते. ही जाणीव घेण्याची प्रक्रिया अखंड, विनासायास आणि सतत सुरू राहिली की धारणेचाच विकास ध्यानाच्या रूपात होतो. ध्यान म्हणजेच प्राणशक्तीच्या भ्रमणाची सतत नेहमीसाठी जाणीव घेत राहणे.
अशी जाणीव घेत असतानाच आपण नादानुसंधान करतो. आपण ॐकार गर्जना करतो, तेव्हा शरीरभर आतून-बाहेर खालून-वर आणि डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे अशी सर्वत्र ॐकाराची स्पंदने जाणवायला लागतात. त्यांची स्पंदने हा आपल्या जाणिवेचा विषय केला की ती स्पंदने यथावकाश आपल्या आतल्या शांतिस्थळाला स्पर्श करतात. चित्त शांत आणि शांत होत जाते. प्राणशक्तीची ही जागृती पसरत जाते आणि वैश्विक शक्तीच्या संपर्कात येते. साधक शांत होतो, आनंदी होतो, चैतन्याने भारला जातो. ऊर्जेच्या जागृतीच्या जाणिवेने समाधानी होतो. शरीरात वैश्विक प्राणशक्तीचा संचार होतो. शरीरातल्या प्राणाला प्रेरणा मिळते आणि साधक शक्तिमान होतो.
या अवस्थेत आपण एक संकल्प केला पाहिजे की, आपण ही अवस्था कायम टिकवू आणि ध्यान थांबवले पाहिजे. यानंतर दोन्ही तळवे डोक्यावर ठेवावेत. तिथून ते अधोगामी दिशेने मान, कान, चेहरा, गळा, कंठस्थान, छाती, पोट अशारीतीने पायाच्या तळव्यापर्यंत खाली आणावेत. आपल्या शरीरातले सारे मालिन्य शरीरातून बाहेर पडत असून, आपले शरीर, चित्त शुद्ध होत आहे, अशी कल्पना करावी. तळवे परस्परांवर घासावेत आणि डोळे उघडावेत. हळूच आपल्या भोवतालच्या वातावरणाची जाणीव घेऊन मग ते ठिकाण सोडावे.
या साऱ्या प्रक्रियेच्या पायऱ्या खालीलप्रमाणे थोडक्यात देता येतील.
1) प्रार्थना - सहनाववतु, 2) पूर्वतयारी - कपालभाती, योगिक श्र्वसन, नाडीशुद्धी 3) प्राणायाम मंत्र 4) करन्यास 5) अंगन्यास 6) अनुसंधान 7) संकल्प
8) प्राणशक्तीची प्रार्थना 9) प्राणशक्तीचे संचयन
10) विश्र्वशांतीची प्रार्थना। ***
सतीश चौकुलकर
केंद्र वृत्त
विवेकानंद केंद्राकडून साप्ताहिक संस्कार वर्ग सुरू असतात. इयत्ता 5 वी ते 8 वीचे बालमित्र या वर्गांत सहभागी होत असतात. दरवर्षी सुटीच्या कालावधीत विविध शहरांमध्ये केंद्राकडून संस्कार शिबिरे, तसेच व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचेही आयोजन होत असते. गेल्या महिन्यात विविध ठिकाणी झालेल्या काही शिबिरांचे वृत्त...
नागपूर : दि. 26 ते 29 एप्रिल या कालावधीत निवासी व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराची दिनचर्या पहाटे 5 ते रात्री 10 अशी होती. "वीर व्रतधारी बनूया' या विषयावर लखेश दादा, "ऋषीमुनियोंकी संतती हम है' या विषयावर प्रियादीदी तर "आपणही असे बनूया' या विषयावर क्षमाताई यांनी मार्गदर्शन केले.
कृष्णाष्टकम्, ऐक्यमंत्र, एकात्मता स्तोत्र, हनुमान चालिसा, राष्ट्रभक्तीपर गीते, मैदानी खेळ, सूर्यनमस्कार, प्राणायाम, नाट्यप्रशिक्षण, मातीची भांडी बनविणे आाणि प्रेरक गोष्टी या माध्यमातून विद्यार्थ्यांची आंतरिक क्षमता वाढविण्याचा प्रयत्न झाला. आत्मविश्वास वृद्धी झाली.
समारोप सत्रासाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसेविका समितीच्या अ.भा. प्र. कार्यवाहिका मा. शांताक्का व अध्यक्ष म्हणून नगरप्रमुख श्री. आनंद बागडिया उपस्थित होते. आदरणीय शांताक्का यांनी आई-वडील आणि ग्रहस्थ धर्माचे महत्व सांगितले. यावेळी मातृपितृपूजन व भारतमाता पूजन झाले.
सोलापूर : दि. 18 ते 25 एप्रिल या कालावधीत सोलापूर केंद्राकडून 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांकरिता वासंतिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रेरणेतून पुनरुत्थान -धनंजय सूर्यवंशी (विवेक विचार व्यवस्थाप्रमुख), कथाकथन -गीता भालेराव, व्यक्तिमत्व विकास -प्रभाकर जमखंडीकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. वन्य जीव या विषयावर भरत छेडा यांनी सादरीकरणासह मार्गदर्शन केले. शिबीर प्रमुख पार्वती शेटे आणि योगेश, विवेक, राहूल, पवन, किरण, प्रणव, केशव, प्रतीक्षा, पूजा, स्वेता आदी युवा कार्यकर्त्यांनी शिबिरात विविध दायित्व घेतले होते.
मुंबई : दि. 14 ते 18 एप्रिल या कालावधीत मुंबई विवेकानंद केंद्राकडून संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 16 मुले व 16 मुलींनी सहभाग घेतला. विवेकानंदांच्या कथा - विभाग संघटक मंगलाताई, सुलेखन - सुचेता चाफेकर, माझा भारत -मंगलाताई, वैज्ञानिक खेळ -भगवान चक्रदेव याप्रमाणे विविध विषयांवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. आशियायी चॅंपियन कु. पूर्वा मॅथ्यू हिची मुलाखत झाली. दि. 18 रोजी मुंबई विभाग प्रमुख श्री. अभय बापट यांच्या उपस्थितीत शिबिराचा समारोप झाला. यावेळी पालकांशी संवाद साधला गेला.
विटी-दांडू
गिल्ली क्रिकेटमधल्या बेल (क्रिकेट बेल्स) सारखी व दाडू क्रिकेट बॅटसारखा असतो. हा दोन्ही बाजूंनी खेळला जातो आणि त्यात काही नियम असतात. गिल्ली-दंडा खेळात खेळाडूंची संख्या किंवा संघाच्या संख्येची काही अधिकृत सीमा निश्चित केलेली नाहीये. खेळाडू आपल्या सोयीने नियम बनवू शकतात.
हा खेळ दोघातही खेळता येतो आणि दोन संघांमध्येपण खेळला जाऊ शकतो.
गिल्ली मारली गेल्यावर हवेत उडते. जर विपक्षी संघाच्या कोणी खेळाडूने गिल्लीला हवेतच झेलली, तर मारणारा (डाव घेणारा) आऊट होतो.
जर गिल्ली जमिनीवर पडली, तर गिल्लीच्या जवळच्या खेळाडूला, गिल्ली फेकून दंड्याला (जो की खड्ड्याच्या तोंडावर ठेवलेला असतो) मारायचा एक मोका मिळतो, (क्रिकेटमधल्या धावबादसारखं). जर का खेळाडू दंड्याला मारण्यात यशस्वी ठरला, तर डाव घेणारा आऊट होतो आणि जर यशस्वी नाही झाला, तर डाव घेणाऱ्याला एक पॉईंट आणि दुसऱ्यांदा मारायची संधी मिळते.
जास्त पॉईंट मिळवणारा संघ (किंवा व्यक्ती) खेळात जिंकतो. जर डाव घेणारा खेळाडू तीनवेळा प्रयत्न करूनही गिल्लीला मारण्यात यशस्वी नाही झाला तर तो आऊट होतो. हा खेळ क्रिकेटसारखा असून, बरेचशे लोक असं मानतात की क्रिकेट हा खेळ गिल्ली-दांडूवरूनच अस्तित्वात आलेला आहे.
हा खेळ विविध प्रकारे खेळता येतो.
दर्शन, "गणपत वाण्या' च्या चिवटपणाचे.....!
एक पुरातन संस्था होय. आज मात्र या प्राचीन संस्थेचे पारंपरिक स्वरूप पालटते आहे. कारण
जगाच्या कानाकोपऱ्यातील किरकोळ व्यापाराच्या व्यवसायाचेच रंगरूप आताशा आमूलाग्र बदलू लागलेेले दिसते.
दुर्बोधतेचा शिक्का रचनेवर बसलेला असल्याने "नवकवितेचे प्रर्वतक' गणल्या गेलेल्या बाळ सीताराम मर्ढेकरांच्या कवितेच्या वाटेला फ़ारसे कोणी सहसा जात नाहीत. असे असले तरीही मर्ढेकरांचा "गणपत वाणी' कधी ना कधी, कोठे ना कोठे भेटलेला असतो. निदानपक्षी शालेय जीवनात मराठीच्या क्रमिक पुस्तकात तरी "गणपत वाण्या'शी गाठ झालेली असतेच असते. बाळपणीचे मैत्र टिकावू असते. त्यामुळे, अगदी संपूर्ण कविता जरी नाही तरी ,
गणपत वाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काडी
म्हणायचा अन् मनाशीच की या जागेवर बांधीन माडी
मिचकावून मग उजवा डोळा आणि उडवून डावी भिवयी
भिरकावून तो तशीच द्यायचा लकेर बेचव जैशी गवयी
हे त्या कवितेचे पहिले कडवे आजही आठवणारे कितीतरी सापडतील. कर्तृत्वाचे इमले मनातल्या मनातच बांधणारा, परंतु त्या मनोरथांना प्रयत्नाची साथ व्यवहारात यत्किंंचितही न देणारा तो कृतिशून्य "गणपत वाणी' एक दिवस मर्ढेकरांच्याच शब्दांत सांगावयाचे तर "बापडा बिडी पिता पिताना मरून गेला...'
खंगलेल्या दुकानाच्या जागेवर एकही माडी न बांधताच मर्र्ढेकरांच्या कवितेतील "गणपत वाणी' मनातले इमले आपल्या चिवट प्रयत्नांनी भुईवर प्रत्यक्षात उठवण्याच्या खटाटोपात गुंतलेेले ठायी ठायी दिसतील. कष्टांची पराकाष्ठा करणे त्यांना भागच आहे. कारण, आता त्यांच्याही अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते आहे. मर्ढेकरांचा"गणपत वाणी' हे खरे म्हणजे एक प्रतीक आहे. किराणा मालाचे पिढीजात दुकान पेठेत थाटलेला, रोजच्या गिऱ्हाईकाशी जिव्हाळ्याचे नाते जोपासलेला, पुड्याच्या दोऱ्याने गुंडाळलेल्या कागदात गूळ-मीठमिरची बांधून देणारा, रोख हिशेब चुकता करण्याचा हठ्ठ न धरता नेहेमीच्या गिऱ्हाईकाला उधारीवर माल देणारा, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा पारंपारिक किरकोळ दुकानदार मर्ढेकरांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या कवितेत नेऊन बसवला आणि त्याचे बारसे केले "गणपत वाणी'.
किराणा-भुसार मालाचा असा किरकोळ व्यापारी दुकानदार ही जगभरातीलच व्यापाराच्या प्रांतातील एक पुरातन संस्था होय. आज मात्र या प्राचीन संस्थेचे पारंपरिक स्वरूप पालटते आहे. कारण जगाच्या कानाकोपऱ्यातील किरकोळ व्यापाराच्या व्यवसायाचेच रंगरूप आताशा आमूलाग्र बदलू लागलेेले दिसते. किरकोळ व्यापाराच्या प्रांतात मोठ्या संघटित व्यवसायघटकांना अलीकडच्या काळात मोठाच रस निर्माण झालेला आहे. जगभरातच हे चित्र दिसते. अनेक संघटित "कार्पोरेट' उद्योग आता किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात उतरले आहेत. आजही उतरत आहेत. केवळ इतकेच नाही तर, नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्याही या व्यवसायात भांडवल गुंतवणूक करून आपले बस्तान बसविण्याबाबत उत्सुक आहेत. राजधान्यांची शहरे, मोठमोठी महानगरे, महानगरसंकुले इथे झपाट्याने वाढत असलेेले मॉल्स, मेगा स्टोअर्स, सुपरस्टोअर्स, हायपर मार्केटस.... या सगळ्या किरकोळ व्यापारातील या नवीन प्रवाहांच्या खुणा आहेत.
याचा स्वाभाविक परिणाम म्हणजे, परंपरागत किरकोळ व्यापारी दुकानदार एकीकडे आणि या क्षेत्रात नव्याने हातपाय पसरत असलेले संघटित "प्लेअर्स' दुसरीकडे असे एक द्वैत आता किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात स्थिरावते आहे. या दोन गटांमधील स्पर्धा वाढते आहे. पारंपरिक पध्दतीने किरकोळ व्यापार करणाऱ्या सगळ्या "गणपत वाण्या'चा या स्पर्धेत टिकाव लागणार का, हाच प्रश्न त्यामुळे विचारला जातो आहे. कारण, व्यवसायाचे आकारमान, भांडवली पाया, तंत्रज्ञान... अशा सगळ्याच बाबतीत किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात नव्याने प्रवेशत असलेल्या घटकांची बाजू पारंपरिक व्यापारी दुकानदारांच्या तुलनेत प्रचंड वरचढ आहे. या क्षेत्रातील परिभाषेत, पारंपरिक किरकोळ व्यापाऱ्यांच्या वर्गाला किरकोळ व्यापारांचे "असंघटित क्षेत्र' असे संबांधले जाते. तर नव्याने येत असलेल्या व्यवसायघटकांना किरकोळ व्यापाराचे "संघटित क्षेत्र' असे म्हटले जाते.
भारतातील किरकोळ व्यापाराचे क्षेत्रही आजमितीस या स्थित्यंतरामधून जात आहे. तसे पाहिले तर, किरकोळ व्यापाराच्या क्षेत्राचा हा जो रूपपालट घडून येतो आहे, त्या प्रवाहात भारत तुलनेने उशीराच दाखल होत आहे, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. आधुनिक अशा संघटित व्यवसायघटकांनी विकसनशील देशांमधील किरकोळ व्यापाराच्या क्षेत्राकडे वळण्याच्या प्रवाहाची पहिली लाट 1990 च्या दशकाच्या प्रारंभी उमटली. 1990 च्या दशकाच्या मध्यापर्यंत ही लाट टिकली. अर्जेन्टिना, ब्राझील, चिली, दक्षिण कोरिया, मलेशिया, थायलंड, तैवान, फिलिपिन्स या देशांमधील किरकोळ व्यापार क्षेत्राने या पहिल्या लाटेत हात धुवून घेतले. 1990 च्या दशकाच्या मध्यास या लाटेचे दुसरे पर्व जे सुरू झाले, ते त्या दशकाच्या अंतापर्यंत टिकले. ग्वाटेमाल, कोलंबिया, इंडोनेशिया, बल्गेरिया या देशांमधील किरकोळ व्यापाराचे क्षेत्र या दुसऱ्या लाटेमधून प्रक्षाळून निघाले. विकसनशील देशांमधील किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात घुमणाऱ्या या प्रवाहाची तिसरी लाट उमटली ती 1990 च्या दशकाच्या अखेरीस. केनिया, निकाराग्वा, पेरू, बोलिव्हिया, व्हिएतनाम, चीन, भारत आणि रशिया या देशांमधील किरकोळ व्यापारक्षेत्र या तिसऱ्या लाटेवर आता स्वार झालेले दिसते.
देशोदेशींच्या किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात संघटित व्यवसायघटकांनी बसवलेले बस्तान, यामुळेच एकसारखे दिसत नाही. विकसित देशांच्या गटात किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात संघटित घटकांचा हिस्सा सरासरीने जवळपास 75 ते 80 टक्क्यांचा असल्याचे दिसते. विकसनशील देशांच्या गटात मात्र या प्रमाणात तुफान तफावत दिसते. 2006 सालातील जी काही आकडेवारी उपलब्ध आहे, ती बघितली तर पाकिस्तानात हे प्रमाण अवघा एक टक्का इतकेच होते. भारताची स्थिती जरा "बरी' होती. किरकोळ व्यापारात संघटित व्यापारक्षेत्राचा तौलनिक हिस्सा होता चार टक्क्यांचा हे दोन सख्खे शेजारी या यादीत तळाला आहेत. यादीच्या दुसऱ्या टोकाला आहेत मलेशिया (संघटित किरकोळ व्यापार घटकाचा एकंदर किरकोळ व्यापारातील हिस्सा 55 टक्के), थायलंड (40 टक्के), ब्राझील (36 टक्के), इंडोनेशिया (30 टक्के) आणि व्हिएतनाम (22 टक्के).
आर्थिक विकासाच्या संदर्भात ज्या आपल्या शेजाऱ्याबरोबर आपली सतत तुलना केली जाते, त्या चीनमध्येही किरकोळ व्यापाराच्या एकूण उलाढालीत संघटित क्षेत्रांचा तौलनिक हिस्सा 2006 साली जवळपास 20 टक्क्यांच्या घरात होता. संघटित क्षेत्राने किरकोळ व्यापाराबाबत रस घेण्याच्या प्रवाहाच्या तिसऱ्या लाटेत भारताच्या आगेमागेच प्रवेश होऊनही चीन आणि रशिया तुलनेने बरेच पुढे सरकलेले दिसतात; याचे कारण त्या देशाच्या व्यापारविषयक धोरणांत दडलेले आहे. परकीय थेट भांडवली गुंतवणुकीस किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात मुक्तद्वार न देण्याचे या तीनही भांडवली गुंतवणुकीस प्रवेश न देण्याचे हे धोरण चीन आणि रशिया या दोन देशांनी 1990 च्या दशकात क्रमाने शिथील केले. भारताच्या बाबतीत मात्र, ही बंधने शिथिल करण्याची - तीही पुन्हा संपूर्ण नव्हे तर अंशत: प्रक्रिया 2000 सालानंतर हळूहळू सुरू झालेली दिसते.
देशी बाजारपेठेतील संघटित उद्योगघटकांबरोबर व्यवसायीक हातमिळवणी करून किरकोळ व्यापाराच्या भारतीय क्षेत्रात पाऊल घालण्यास आजमितीस बहुराष्ट्रीय अनेक ताकदवान कंपन्या उत्सुक आहेत. परंतु, अशा सुदृढ स्पर्धकांपुढे भारतीय किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रातील असंघटित, पारंपरिक व्यापारी दुकानदारांचा टिकाव लागेल अथवा नाही, या चिंतेपायी किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात परकीय थेट गुंतवणुकीस पायघड्या घालण्याबाबत धोरणात्मक एकवाक्यता दिसत नाही. ते साहजिकही आहे. किंबहुना, देशी काय वा बहुराष्ट्रीय काय, संघटित व्यापारघटकांची तगडी स्पर्धा अर्थव्यवस्थेतली पारंपरिक, असंघटीत किरकोळ व्यापारी दुकानदारांना पेलवेल का, ही शंका जवळपास सगळ्याच विकसनशील देशांमधील धोरणकत्यार्ंना आजवर सतावत आलेली आहे. किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात संघटित व्यवसायघटकांना मुक्त वाव देण्याने असंघटित, पारंपरिक किरकोळ व्यापारघटकांचे अस्तित्वच धोक्यात येईल का, हा खरोखरच एक संशोधनाचा विषय होय. केवळ असंघटित किरकोळ व्यापारीच नव्हे तर, ग्राहक, उत्पादक, शेतकरी... अशांसारख्या अन्य आर्थिक घटकांवर तसेच या क्षेत्रातील रोजगारावर त्याचे कोणते परिणाम संभवतात ?
संघटित व्यापारघटकांचा प्रवेश किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात घडून आल्याने त्याचे जे विविधांगी परिणाम -पडसाद उमटतात त्यांबाबतचा जो एक अभ्यास "इंडियन कौन्सील फॉर रीसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स' या नवी दिल्ली येथील संस्थेने अलीकडेच केलेला आहे .
त्या अभ्यासाचे निष्कर्ष अतिशय उद्बोधक आहेत. नमुना पाहणी तत्त्वावर (सॅम्पल सर्व्हे) केलेल्या या व्यापक क्षेत्रीय अभ्यासात देशभरातील 10 मोठ्या शहरामधील पारंपरिक किरकोळ असंघटित व्यापारी, दुकानदार, असंघटित तसेच संघटित दुकानदार, व्यावसायिकांकडून नेहमी खरेदी करणारे ग्राहक, शेतकरी, विक्री -विपणनाच्या साखळीतील मध्यस्थ-अडते अशा नानाविध घटकांचा अंतर्भाव करण्यात आलेला होता. या व्यतिरिक्त मोठे उत्पादक-कारखानदार, लघुउद्योजक, आधुनिक व संघटित व्यापारी, व्यावसायिक यांचाही समावेश या पाहणीत आवर्जून करण्यात आला होता. संघटित व्यापारी, दुकानदारांनी किरकोळ व्यापाराच्या प्रांतात पाऊल घातल्याने पारंपरिक, असंघटित किरकोळ व्यापारीवर्गावर नेमके काय परिणाम होतात, याचा अभ्यास करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू होता.
संघटित, आधुनिक व्यापारी घटक किरकोळ व्यापाराच्या व्यावसायात प्रवेशल्याने देशाच्या कानाकोपऱ्यात पिढ्यान्पिढ्या व्यवसाय करणाऱ्या असंघटित, पारंपरिक किरकोळ व किराणा भुसार मालाच्या व्यापारी, दुकानदारांवर अरिष्ट कोसळेल, ही भीती निराधार असल्याचा या सर्वेक्षणाचा निर्वाळा आहे. संघटित व्यापारक्षेत्राच्या प्रवेशामुळे किरकोळ व्यापाराच्या प्रांतातील वाढलेल्या स्पर्धेचा चिमटा पारंपरिक, असंघटित व्यापाऱ्यांना जाणवतो हे खरे, परंतु त्यामुळे या क्षेत्रातील उद्यमशीलताही सक्रीय व स्पर्धात्मक बनत असल्याचे या अभ्यासक्रमाद्वारे समोर आले आहे. बदललेल्या वातावरणात टिच्चून टिकून राहण्यासाठी पारंपरिक किरकोळ व्यापारीही प्रगत तंत्रज्ञानाचा अंगिकार करतात. आपले परंपरागत ग्राहक आपल्याशीच एकनिष्ठ राहावेत यासाठी नानाविध व्यावसायिक क्लृप्त्या लढवितात, असे या पाहणीअंती स्पष्ट झाले आहे. "गणपत वाण्या'च्या अंगी असणाऱ्या या चिवट जिजीविषेचे हे दर्शन जितके दिलासादायक, तितकेच आश्र्वासक नाही का?
साभार : अर्थबोधपत्रिका
कृताद्न्यता
कृतज्ञता शब्द उच्चारला की लोक म्हणतात, त्यात काय नवीन गोष्ट सांगताय? कोणी काही मदत केली तर आम्ही थॅंक्स, आभारी आहे, असे म्हणतच असतो, परंतु आभारी आहे वगैरे म्हणणे हा केवळ एक शिष्टाचार झाला. कृतज्ञता म्हणजे शिष्टाचारपेक्षा काहीतरी वेगळे आहे, त्याचा मनाशी, हृदयाशी संबंध आहे. तो वरवरचा शिष्टाचार नाही, भारतीय संस्कृतीचा तो एक भाग आहे. माणसाचे मन उन्नत होऊन दैवीगुणांची वाढ होण्यासाठी याची जरुरी आहे.
कृतज्ञता म्हणजे आपल्याला मदत करून किंवा काही देऊन उपकृत केल्याची भावना. ही भावना व्यक्त करण्यासाठी आपण काही छोटीशी परतफेडही करतो, परंतु ही परतफेड म्हणजे त्याच्या ऋणातून मुक्त होणे असे मात्र नाही. उलट त्या व्यक्तीच्या ऋणात राहणे आपण पसंत करतो, ही कृतज्ञता होय.
आई मुलाला 9 महिने गर्भात वाढविते, तो भार आनंदाने सहन करते. त्याचे संगोपन करते, वाढविते, त्याला पुढील आयुष्यात आवश्यक असलेल्या गोष्टी शिकविते. त्यामागे तिची काहीही अपेक्षा नसते. वडीलही मुलांसाठी सर्व गोष्टी करीत असतात. गुरुजन आपल्या विद्यार्थ्याला ज्ञानार्जन करून सज्ञान बनवीत असतात. त्यामुळे आई, वडील, गुरुजन यांचे आपण सदैव कृतज्ञ असले पाहिजे.
आपल्या घरी कामासाठी गडी, मोलकरीण असते. आपण त्यांना दर महिन्याला पगार देतो व आपले काम झाले असे समजतो, परंतु त्यांनी त्यांच्या आयुष्यातील केलेल्या या योगदानामुळे आपले जीवन सुसह्य झालेले असते. त्यामुळे आपण त्यांचे कृतज्ञ असले पाहिजे. निव्वळ पैसे फेकून सर्व कामे होत नसतात. आपण कृतज्ञता दाखविण्यावर ते लोकसुध्दा मनापासून काम करतील.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी निंदकांबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली आहे. धोबी साबण लावून कपडे स्वच्छ धुवून देतो, परंतु त्यासाठी तो पैसे घेतो परंतु निंदक मात्र आपले दोष सतत दाखवून आपली सुधारणा करण्यासाठी आपणास फ़ुकटात मदत करीत असतो. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की, "निंदकाचे घर असावे शेजारी!'
माणसात दैवी संपत्तीची वाढ करणारी कृतज्ञता आपण अंगी बाणवूया व मानवाचे देवमाणसात रूपांतर होण्यासाठी प्रयत्न करूया।
वसंत कुलकर्णी ठाणे
माधुरी गुप्ताचादेशद्रोह
अपराध भारतीय जनमानसाला मोठा धक्का
देणारा आहे. एकीकडे आपले शूर जवान रात्रंदिवस
डोळ्यांत तेल घालून सीमेचे रक्षण करीत आहेत,
प्रसंगी शत्रूशी लढताना प्राण पणाला लावत आहेत
आणि त्याचवेळी परराष्ट्र सेवेतील महिला
अधिकारी देशाशी गद्दारी करीत आहे, ही बाब
चिंताजनक आहे।
इस्लामाबाद (वृत्तसंस्था)- पाकिस्तानी गुप्तचर संस्था "आयएसआय'साठी हेरगिरी केल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेली महिला राजनयिक अधिकारी माधुरी गुप्ता हिने सहा वर्षांपूर्वीच इस्लाम धर्म स्वीकारला असल्याचे वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्रांनी दिले आहे.
माधुरी गुप्ता इस्लाम धर्मामुळे प्रभावित झाली होती व तिने सहा वर्षांपूर्वीच इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. ती शिया मुस्लिम आहे, असा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे.
""इस्लामच्या शिकवणुकीमुळे प्रभावित झालेल्या माधुरी गुप्ता हिने इस्लाम धर्म स्वीकारला खरा; मात्र, आपली ही नवीन ओळख जाहीर करण्यास ती धजावत नव्हती. माधुरी गुप्ता हिच्या नातेवाईकांचे लखनौतील ़़ख्यातनाम मुस्लिम परिवार असलेल्या आशिक हुसेन जाफरी यांच्या कुटुंबीयांशी निकटचे संबंध आहेत. माधुरी गुप्ता हिने आपल्या पूर्वायुष्यातील मोठा कालावधी लखनौतील जाफरी कुटुंबीयांसमवेत काढलेला आहे. येथेच तिला मुस्लिम मूल्यांची शिकवणूक मिळाली,'' असेही प्रसारमाध्यमांच्या वृत्तात म्हटलेले आहे.
रमझानच्या महिन्यात एका स्थानिक पत्रकाराने संवाद साधला असता माधुरी तेव्हा त्याला म्हणाली,""माझे उपवास सुरू आहेत. मला इस्लामविषयी प्रचंड आदर आहे.''असेही वृत्तात म्हटलेले आहे.
माधुरी गुप्ता या महिला अधिकाऱ्याने केलेला हा अपराध भारतीय जनमानसाला मोठा धक्का देणारा आहे. एकीकडे आपले शूर जवान रात्रंदिवस डोळ्यांत तेल घालून सीमेचे रक्षण करीत आहेत, प्रसंगी शत्रूशी लढताना प्राण पणाला लावत आहेत आणि त्याचवेळी परराष्ट्र सेवेतील महिला अधिकारी देशाशी गद्दारी करीत आहे, ही बाब चिंताजनक आहे.
भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत अतिशय गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसकट इतर पाकिस्तानी यंत्रणांना पुरविणाऱ्या रॅकेटचा वेळीच पर्दाफाश झाला, ही बाब देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आनंदाची म्हटली पाहिजे. पाकिस्तानात भारतीय उच्चायुक्तांचे जे कार्यालय आहे, त्या कार्यालयात काम करणाऱ्या द्वितीय सचिव दर्जाच्या महिला अधिकाऱ्याने ही माहिती आयएसआयसारख्या संस्थेला पुरवावी, ही तशी गंभीर बाब होय. माधुरी गुप्ता नावाच्या महिला अधिकाऱ्याचे हे कृत्य म्हणजे देशाशी "गद्दारी'च होय. पाकिस्तान अतिरेकी संघटनांच्या माध्यमातून सातत्याने भारतात घातपाती कारवाया घडवून निष्पाप लोकांचे जीव घेण्याचे कारस्थान करत असताना आपल्याच देशाच्या महिला अधिकाऱ्याने गोपनीय माहिती त्या देशाला पुरवावी, हा देशद्रोहही आहे.
माधुरी गुप्ता नावाच्या या महिलेने यासंदर्भात जो कबुलीजबाब दिला आहे, तो तर आणखी धक्कादायक आहे आणि भ्रष्टाचाराने कुठले टोक गाठले आहे, यंत्रणा कशा बरबटल्या आहेत, याचा परिचय देणारा आहे. परराष्ट्र सेवेअंतर्गत विदेशात काम करताना या महिलेला 70 हजार रुपये पगार असल्याची माहिती आहे. शिवाय, इतर सोई-सवलती आहेतच. असे असतानाही ही बाई म्हणते, मला पैशांची अतिशय आवश्यकता असल्याने मी ही माहिती आयएसआय व इतर पाकिस्तानी यंत्रणांना पुरवीत असे. लठ्ठ पगार आणि सोई-सवलती मिळत असतानाही या बाईला अतिरिक्त पैसा कशासाठी हवा होता आणि तो मिळविण्यासाठी तिने कोणकोणती माहिती आयएसआयला पुरविली, याचा शोध आता जरुरी आहे.
देशात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. घोटाळ्यांवर घोटाळे होत आहेत. लाच घेताना पकडले, अशी बातमी वर्तमानपत्रात नाही, असा दिवसच उगवेनासा झाला आहे. त्याची आता लोकांना सवयही झाली आहे. बातमी आली की, लोक ती वाचतात, त्यावर चर्चा करतात अन् दुसरी बातमी आली की, पहिली विसरतात व नव्याची चर्चा करतात. चार-पाच दिवसांपूर्वी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष केतन देसाई यांच्याकडे आयकर खात्याने धाड घातली असता जे घबाड मिळाले, त्याचे वृत्त वाचूनच अनेक जण चक्रावून गेले. त्यांच्याकडे अठराशे कोटी रुपये रोख आणि दीड टन सोने आढळून आले. कुठून आणला याने एवढा पैसा? सामान्यांना त्याची आजही माहिती नाही आणि भविष्यातही होईल, याची शाश्वती नाही. मध्यंतरी महाराष्ट्राचे पोस्टमास्तर जनरल बाली यांना दोन कोटींची लाच घेताना पकडले, त्यानंतर सुमित्रा बॅनर्जी या आयकर सहआयुक्त असलेल्या महिला अधिकाऱ्याला कोट्यवधींची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. मध्यप्रदेशातील आयएएस जोशी दाम्पत्याकडे तीनशे कोटींची माया आढळून आल्याचे प्रकरणही अलीकडचेच आहे. आणखी एक घटना एकदम ताजी आहे. केंद्रीय गृहमंत्रालयात सहसचिव पदावर असणारे अो. रवी यांच्यावर 50 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असून, सीबीआयने त्यांच्या घरी छापा मारला आहे. पैसा दिल्याशिवाय कुठलेही काम करायचे नाही, असा निर्धारच जणु बहुतांश अधिकाऱ्यांनी केलेला दिसतोय् आणि लाच दिल्याशिवाय काम होतच नाही, असा जनतेचाही समज झालेला आहे. या सगळ्या घटना बघितल्या, तर जनतेचा समज योग्यच म्हटला पाहिजे. सरकारी यंत्रणा भ्रष्टाचाराने किती कुजली आहे, सडली आहे, चपराश्यापासून अधिकाऱ्यापर्यंत सर्वजण कसे भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहेत, याचेच निदर्शक या सगळ्या घटना आहेत. माधुरी गुप्ता यांनीही पैशांसाठी (की इस्लामसाठी?) गोपनीय माहिती विकून भ्रष्टाचारच केला आहे, पण त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे, तो देशाच्या सुरक्षेलाच धोका पोहोचविणारा आहे. पाकिस्तानसाठी चाललेली या बाईंची हेरगिरी उघड झाली नसती, तर आगामी काळात देशाला आणखी कोणकोणत्या संकटाला सामोरे जावे लागले असते, किती निष्पाप लोकांना नाहक जीव गमवावा लागला असता, याची कल्पना न केलेलीच बरी.
53 वर्षे वय असलेल्या गुप्ता बाईंना उर्दू चांगले लिहिता, बोलता आणि वाचता येते म्हणून तिला पाकिस्तानात पाठविण्यात आले, तर तिने त्याचा असा दुरूपयोग केला. पकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांबाबत भारताचे जे धोरण आहे, त्याची माहिती आयएसआय व इतर पाकी यंत्रणांना पुरवून या बाईने देशाच्या सुरक्षेशीच खेळ केला आहे.
पान 23 वरुन....
गुप्ता बाईंची हेरगिरी दोन वर्षे बिनबोभाट चालली, पण आपल्या कार्यकक्षेबाहेरची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणे सुरू केले, तेव्हा संशय आल्याने त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली अन् बाईची हेरगिरी उघड झाली. पाकिस्तानात राहून भारतासाठी हेरगिरी केली असती, तर समजण्यासारखी गोष्ट होती, पण बाईने आपल्या देशाशी संबंधित संवेदनशील माहिती त्या देशाला पुरवून फार मोठे पाप केले आहे. पैशांची एवढीच आवश्यकता होती, तर आपल्या सहकाऱ्यांना, वरिष्ठांना सांगून मदत मिळविता आली असती. पैशांच्या आवश्यकतेमागील कारण योग्य वाटले असते, तर सहकाऱ्यांनीही मदत केली असती. प्रसंगी सरकारकडून मदत मिळवून दिली असती, पण असे काही न करता गुप्ता बाईने एकाच वेळी भ्रष्टाचार, धर्मद्रोह अन् देशद्रोह असे तीन गुन्हे केले आहेत. त्यामुळे गोपनीय माहिती कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुप्ता बाईला किमान दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल, यात शंका नाही. या गुप्ता बाईने दिलेल्या आणखी एका माहितीची शहानिशा करणे क्रमप्राप्त आहे. दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेकडील देशांमध्ये भारताची जी उच्चायुक्त कार्यालये आहेत, त्या कार्यालयांमधील काही अधिकारीही हेरगिरी करीत असल्याचे तिने सांगितले आहे. त्यामुळे परराष्ट्र धोरणाच्या पातळीवर सरकारने अधिक सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे. या हेरगिरी प्रकरणाच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्रालयाने जगभरातील आपल्या उच्चायुक्त कार्यालयांमधील कामकाजाच्या पद्धतीचा आढावा घेऊन यंत्रणा स्वच्छ केली पाहिजे. वास्तविक, पाकिस्तानमधील उच्चायुक्त कार्यालयात काम करण्याच्या मिळालेल्या संधीचा माधुरी गुप्ता यांना देशसेवेसाठी फायदा करून घेता आला असता. अशी संधी सर्वांना मिळत नसते. ती नशिबाने माधुरी गुप्ता यांना मिळाली. देशासाठी उत्तम कामगिरी करून नाव कमावण्याऐवजी त्यांनी स्वत:ला व देशालाही खाली मान घालायला लावणारे कृत्य केले आहे.
साभार : तरुण भारत
तरुण साधकांचा प्रपंच
मकरंद, पंकज, माधव, विजय, शशांक, प्रमोद, दुसरा मकरंद ही नावाची मालिका. या मुलांचं विवाहपूर्व जीवन मी पाहिलेले आहे. नंतरचंही जीवन पाहतो आहे. खरं सांगायचं तर ही मुलं प्रपंचात पडतील असं मला प्रथम वाटलंच नव्हतं. कारण ती "साधक' बनलेली होती. उपासनेच्या मार्गाकडे वळली होती. या सगळ्या मुलांनी आपलं जीवनध्येय निश्चित केलं होतं. आत्मदर्शन आणि अखंड आनंदानुभूती. तसंच परमार्थाचा प्रसार !
ही गोष्ट माझ्या निदर्शनाला आली तेव्हा मला खूप नवल वाटलं होतं. कारण ही मुलं चांगली शिकली-सवरलेली. कुशाग्र बुध्दीची. चांगल्या पगाराच्या नोकऱ्या असलेली, पण याच वयातील आणि असंच शिक्षण वगैरे झालेल्या कितीतरी कमावत्या तरुणांपेक्षा किती वेगळी ! खूप पैसा मिळवावा, उपभोगसाधनं गोळा करावीत. इंद्रीयसुखात डुंबावं, नाटक-सिनेमा-हॉटेलिंग यात आनंद मानावा, अशा प्रवत्तीची तरुण मुलं पदोपदी दिसतात. त्यात कोणाला काही गैर वाटत नाही. न आई-वडिलांना न समाजाला. हेच चांगलं आणि यशस्वी जीवन, अशी त्यांची धारणा. अशा मुलांच्या दोन हाताचे चार हात झाले, घर समृध्द करण्यातच धन्यता त्यांना वाटली, तर ते जगरहाटीला धरूनच ठरते.
उलट, परमार्थाकडे आकृष्ट झालेली, उच्चविद्याविभूषित तरुण मुलं म्हणजे मात्र कुतूहलाचा, टीकाटिप्पणीचा विषय. "ही काय दुर्बुध्दी आठवली तरुणपणीच या मुलांना कोणास ठाऊक !' म्हणून हळहळणारेही असतातच, पण कशाचीही चिंता न करता या मुलांचा कार्यक्रम चालू असतो. पहाटे उठणं, व्यायाम करणं, ध्यानाला बसणं, नामस्मरणात रंगणं, संतसाहित्यात रमणं, स्वामी माधवनाथांच्या सत्संगाला व प्रवचनांना जाणं, स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळाचे उत्सव दृष्ट लागावी अशा देखणेपणानं व कल्पकतेनं पार पाडणं, नित्य अभ्यास विषयावर चिंतन करणं, बस, हाच एक ध्यास. दिवसभराचा सगळा कार्यक्रम रेखीव. कुठे वेळेचा अपव्यय नाही, सुख-साधनांची आसक्ती नाही, हे हवं आणि ते हवं नाही. सवंग करमणूक नाही. भलतं-सलतं खाणंपिणंही नाही.
सात्विक आनंद!
एकदा मी मकरंदला विचारलं, ""इतर तरुणांप्रमाणे मौजमजा करावीशी वाटत नाही तुला? कसलं रुक्ष आणि कळाहीन जीवन अंगिकारलंय तुम्ही तरुण मुलांनी?''
या प्रश्नांवर मकरंद प्रथम केवळ हसला. मला वाटलं तो उत्तराची टाळाटाळ करणार, पण त्यानं तसं केलं नाही. तो म्हणाला, ""बापूसाहेब, ज्या प्रकारचं जीवन आम्ही स्वीकारलं आहे, ते नियमबाह्य असेल, संयमित असेल, आमच्याच वयाच्या इतर बहुतेक तरुणांना नाकं मुरडण्यासारखं वाटत असेल, पण आम्हाला त्यापासून सुख वा आनंद लाभत नाही, हा मात्र सर्वस्वी चुकीचा समज आहे. आम्ही ध्यानास बसतो, नाम घेतो, सत्संगाला उपस्थित असतो, प्रवचनं ऐकतो, पाद्यपूजेच्या सोहळ्यात भाग घेतो आणि हे करीत असताना आमचा प्रत्येक क्षण दिव्य आनंदाचाच असतो. राजस आणि तामस स्वरूपाचा नव्हे, तर सात्विक आनंद आम्ही लुटत असतो. उपभोग्य वस्तूंकडे म्हणजे विषयाकडे मनाची धाव नसल्यामुळे मन पुष्कळ शांत राहते, हलके राहते व समाधान लाभते.''
सुमारे 22-23 वर्षांचा एक तरुण मुलगा मला हे सांगत होता. एक श्रेष्ठ प्रतीचा, दिवसाचे 24 ही तास चित्त व्यापून टाकणारा आनंद लाभतो, हे अगदी सहज बोलत होता. आपल्या मार्गदर्शक सद्गुरूंसंबंधी अपार श्रद्धेचा, अकृत्रिम आविष्कार तो करीत होता. त्याचवेळी मी मकरंदला विचारलं होतं, ""लग्नबिग्न करायचा विचार आहे का तुझा?'' ""अद्याप त्या बाबतीत मी काही ठरवलं नाही बापूसाहेब. आजच ठरवलं पाहिजे असंही नाही. पू. स्वामींच्या मार्गदर्शनानुसार अभ्यास करणं हेच सध्यातरी करायचं आहे. लग्न करणं किंवा न करणं यापैकी कोणताही पर्याय मी पुढे स्वीकारू शकेन. त्यामुळे जीवनात मोठे अंतर पडतं, असंही मला वाटत नाही.''
काय कारण असेल ते असो, पण या मुलांनी प्रपंचात पडण्याचा निर्णय केला. मकरंद त्याच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी जेव्हा मला भेटला, तेव्हा मी त्याला विचारलं, ""मकरंद, आता जीवनाचा नवा अध्याय सुरू होईल तुझ्या. आजवर एकचित्त होऊन परमार्थ साधना करता आली तुला. इत:पर वेगळी दिशा मिळेल तुझ्या दिनक्रमाला. साधक मित्रांचा सहवास, ध्यानधारणा, सद्गं्रथांचे वाचन, ध्यानकेंद्राची कामं इत्यादीसाठी वेळ कसा मिळणार तुला? तुझ्या पत्नीच्याही अपेक्षा राहतील. तुझ्या फावल्या वेळाचा वाटा तिलाही द्यावाच लागेल.''
मी विचारले ते मकरंदची परीक्षा पाहण्यासाठी नव्हे. मला त्यावेळी खरंच असं वाटत होतं की, एका म्यानात दोन तलवारी राहाणार कशा? प्रपंच आणि परमार्थ यांचं घनिष्ट साहचर्य या तरुण मुलाला साधणार कसं? यांची मानसिक ओढाताण तर होणार नाही? मकरंदची गुरुनिष्ठा अत्यंत उत्कट. परमार्थाची त्याची ओढ जबरदस्त. ध्यानाला बसला की त्याचा देहभाव हरपून जायचा. पुरता रंगला होता तो या मार्गात. आता संसारात पडल्यावर कोठल्या संघर्षाला तोंड द्यावे लागेल या मुलाला? म्हणूनच मी त्याला ही पृच्छा केली होती. हा विवाह न करता अधिक आनंदात राहिला असता, असं माझ्या अंत:करणात खोलवर कुठंतरी वाटत होतं.
परमार्थी भूमिका
माझ्या प्रश्नाचा सगळा आशय मकरंदच्या ध्यानात आला असावा. प्रश्नाचं गांभीर्य जाणूनच त्यानं मला सविस्तर उत्तर दिलं. जणू काही आपल्या सगळ्या तरुण साधक मित्रांचा प्रतिनिधी या नात्यानं. त्याचं हे उत्तर तीन-चार वर्षांपूर्वीचं, पण माझ्या ध्यानात पक्के राहून गेलेले. त्यानंतर मकरंदच्या साधक मित्रांचेही विवाह झाले. त्यांच्यापैकी कोणालाही विचारलं असतं तरी मकरंदनं सांगितलं तेच त्यांनी सांगितलं असतं, यात मला मुळीच शंका नाही. मिलिंदच्या लग्नाला 8 दिवसांपूर्वी गेलो तेव्हा या जुन्या संभाषणाचं स्मरण मला झालं. मकरंदला जे मी विचारलं, ते या मुलांपैकी कोणालाही पुन्हा विचारलं नाही. विचारण्याची गरजच नव्हती.
मकरंदशी झालेल्या प्रश्नोत्तरातून त्याची जी भूमिका मला कळली, ती केव्हातरी सर्वच तरुण मित्रांपुढे यावी असं मला वाटतं. म्हणून मकरंदाचं म्हणणं जरा विस्तारानं नमूद करीत आहे. मकरंद म्हणाला, ""माझ्या अनेक हितचिंतकांनी तुमच्याप्रमाणेच प्रश्न विचारला, मला वाटतं दोन गोष्टी स्पष्ट करून टाकणं बरं. पहिली गोष्ट ही की श्री स्वामींच्या संमतीने आणि त्यांचा शुभाशीर्वाद घेऊनच हे पाऊल मी उचललं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सभोवार लोक कशा प्रकारचे जीवन सुखकारक मानतात, यासंबधी मीही काही विचार केला आहे. माझे सद्गुरू हे स्वत: प्रापंचिक आहेत, त्यांचा प्रपंच मी जवळून पाहिला आहे. आंधळेपणाने गतानुगतिक म्हणून मी काही करतो आहे, अशातला भाग नाही. प्रपंचाचं स्वरूप मला कळलेलं आहे. त्या प्रपंचात परमार्थ कसा भरावा याचं साक्षात् उदाहरण माझ्या दृष्टीपुढं आहे. मी प्रवाहपतित होईन, असं मला वाटत नाही.''
एका तरूण मुलाच्या मुखातून निघणारे, सध्याच्या भोगप्रवण वातावरणात सहसा कानी न येणारे केवढे हे आत्मनिर्भराचे शब्द ! अन् मग मकरंदनं प्रपंचाचं त्याला कळलेलं स्वरूप मला ऐकविलं. तो म्हणाला, ""मी ऐकले, वाचले आणि पाहिले त्यावरून कोणत्या मर्यादेत प्रपंच करावयाचा यासंबंधीच्या कल्पना स्पष्ट झाल्या. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही स्वीकारलेला साधनेचा मार्ग आणि घरगृहस्थीचा तथाकथित व्याप यात मूलत: विरोध मानण्याचे कारण नाही. उलट परमार्थ नसलेला पसारा नि:सार होय. खाणेपिणे, उपभोग घेणे इत्यादी गोष्टींपुरतेच जीवन सीमित राहिले तर ते मनुष्यजीवन नव्हे. मनुष्यजन्म मिळाल्यानंतर आत्मदर्शनाच्या साधनेने त्याचे सार्थक करावयास पाहिजे. बुद्धीचा निश्चय आहे. संतांचा हा निर्णायक सांगावा आहे.
आता दुसरी गोष्ट : प्रपंच अशाश्र्वत आहे. मी किंवा माझी भावी पत्नी, आमचे सारे आप्त यापैकी कोणाच्या देहाची शाश्र्वती आहे? ही अशाश्र्वतता गृहीत धरून मी प्रपंचात पाऊल टाकणार आहे. तसेच मला हेही ठाऊक आहे की बरे वाईट माझ्यावर येणारच. तेव्हा या सर्व प्रसंगात चित्त प्रसन्न राखण्याचा अभ्यास करणे, त्यासाठी शाश्र्वत वस्तूचा बोध अंत:करणात मुरविणं हा परमार्थाचा भाग आहे, हेच सार आहे. माझे प्रत्येक कर्म जर भगवंतापीत्यर्थ झाले तर संसारही तसाच होईल.
तिसरी गोष्ट : घरादाराचा व्याप अवघड होऊन बसतो. तो "मी-माझे' या अहंकाराने व वासना आणि गरजा यांना आळा न घातल्याने. ही वखवख जर मला नसेल तर अमुक गोष्ट नाही म्हणून मी रडणार नाही किंवा वैभव लाभले म्हणून नाचणार नाही. उपभोगाच्या स्पर्धेत मी उतरणारच नाही. परमार्थ प्रयत्नपूर्वक करावयाचा व प्रपंचात जे वाट्याला येईल त्यात समाधान मानावयाचे, हीच सार्थ जीवन जगण्याची खरी पध्दती आहे.''
लोकांतील गैरसमज
मला हे सगळेच मोठे अवघड वाटत होते. मकरंद मात्र अगदी सहजपणे बोलत होता. मी माझे समाधान व्हावे म्हणून त्याला आणखी एकच प्रश्न विचारला. माझा प्रश्न असा : ""संसार जर सारहीन आहे व परमार्थ जर जीवनाला सारभूत आहे, तर त्या प्रपंचाचा व्याप मागे लावून घेतोस कशाला? सद्गुरूंनी खरे तर तुझ्यासारख्या साधकाला या मार्गाने जाऊच द्यावयास नको होते. श्रीरामकृष्ण परमहंसांनी नाही का आपल्या तरुण शिष्यांना संन्यासदीक्षा घ्यावयास लावली?''
पण याही प्रश्नाचं उत्तर मकरंदने सहजपणे देऊन टाकले. तो म्हणाला, ""सध्याचा काळ जरा लक्षात घेतला पाहिजे आणि जे जीवनध्येय माझ्यापुढे स्थिर झाले आहे, त्याचाही संदर्भ ध्यानात ठेवला पाहिजे. सध्या परमार्थ व प्रपंच या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि परमार्थ ही उत्तरायुष्यात केव्हातरी सवडीने करावयाची गोष्ट आहे, असा समज बळावलेला दिसतो. तरुणपणी तर परमार्थाचा वाराही नकोसा वाटतो. हा अपसमज दूर झाला पाहिजे आणि प्रपंचच परमार्थरूप करता येतो, हा विश्र्वास बळावला पाहिजे. असा परमार्थरूप प्रपंच धन्य आणि आनंदमय ठरतो, हे लोकांना प्रत्यक्ष पाहता आले पाहिजे. कोणी अविवाहीत व एकांतात राहून परमार्थी झाला, तर "छे, हा मार्ग आपल्यासाठी नव्हे' असे म्हणून तरुण मंडळी चटकन् मोकळी होतात. आम्हाला स्वत:चा उद्धार तर करून घ्यायचाच आहे, पण परमार्थाचे शुद्ध स्वरूपात पुनरुज्जीवन करण्याचे दायित्व देखील साधक या नात्याने आमच्यावर आहे, असे आम्ही मानतो. श्री सद्गुरू स्वामी समर्थांची एक ओवी वारंवार सांगतात -
आत्मज्ञान जीर्ण जर्जर ।
त्याचा करी जीर्णोद्धार ।
विवेके पावे पैलपार ।
या नाव साधक ।।
"परमार्थासी माजविले । विरवित बळे' असेही समर्थांनी म्हटले आहे. या दायित्वाचा स्वीकार करून जीवन आम्हाला जगायचे आहे. जे पाच-दहा टक्के सात्विक प्रवृत्तीचे लोक समाजात असतील, त्यांच्याद्वारे आध्यात्मिक पुनरुत्थान घडवून आणायचे आहे. या पुनरुत्थानामागोमाग आपले भौतिक जीवनही उजळून निघेल, असा आमचा विश्र्वास आहे.''
कृतार्थ जीवनाचा वस्तुपाठ
अशा स्वरूपाची चर्चा कधी विस्मरणात जात नाही. मकरंदचा आणि त्याच्या अनेक साधक मित्रांचा विवाह झाला. सर्वसामान्यांप्रमाणेच तेही गृहस्थी बनले. ज्यांचे ज्यांचे साधकावस्थेत विवाह झाले, त्यांचे जीवन मी पाहतो आहे. या मुलांपैकी कोणामध्येही आसक्ती, वखवख, साधनेतील टाळाटाळ मला अद्याप तरी दिसलेली नाही. पतिपत्नी दोघांचाही मार्ग एकच. मुलांनी निवड योग्य अशीच केलेली आहे. परवा मिलिंदच्या लग्नाच्या वेळी स्वामी मोठ्या कौतुकाने म्हणाले, ""ही मुले अशी आहेत की, लग्नाच्या दिवशी देखील त्यांच्या नित्यसाधनेत खंड पडलेला नाही. उगाच आपण प्रपंचाचा बाऊ करीत असतो. परमार्थावरील पकड घट्ट असली की प्रपंचाच्या मर्यादा कळतात व आपल्या बोधाचा जो आनंद आहे, तो बाधित होत नाही. केवळ भोगाधीन जीवन हे पशुजीवन होय. परमार्थी साधकाला आपली कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय अशी कर्तव्ये उत्तमप्रकारे पार पाडता येतात, हे आपल्या जीवनानेच आपल्याला दाखवून द्यावे लागेल.''
प्रपंच आणि परमार्थ यांच्या अन्योन संबंधाची व जीवन कृतार्थ करण्यासाठी लागणाऱ्या गुणवत्तेची अशी नवीन जाण या मुलांच्या विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने मला लाभत गेली आहे. म्हणूनच, या मुलांच्या भावी कर्तृत्वासंबंधी काही आगळीच स्वप्ने मला पडतात. ती साकार झालेली पाहण्यास मी असलो काय आणि नसलो काय, त्याचं महत्त्व मला वाटत नाही.
***
चिनी चक्रव्यूहाचा भेद
भारताशी नव्याने गोत्र जुळविल्याचे वर्तमान आहे.
या नव्या परिस्थितीचा लाभ उठविण्यासाठीच
भारताने अन्दमान निकोबारला अत्याधुनिक
पाणबुड्या व युद्धनौका यांनी सुसज्ज असे
नौदलाचे तळ उभे करण्याचे ठरविले आहे. या
माध्यमातून हिन्दी महासागरातली चीनची
घुसखोरी आटोक्यात आणता येईल ही खात्री
आपल्या नौदलप्रमुखांनी व्यक्तविली आहे.
चीनने तिबेटवर ताबा मिळविला या घटनेला साठ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारताने चीनला या कृतीपासून रोखले असते, तिबेटच्या स्वातंत्र्याची ध्वजा उंच उचलून धरली असती, तर त्यानंतरच्या दशकांमध्ये चीनकडून भारताचे जे अपमान सातत्याने झाले, त्यापासून आपल्या अब्रूचीही राखण करता आली असती. सुरुवातीस आपण "हिन्दी-चिनी भाई भाई' या घोषणेची व पंचशील धोरणाची कबुतरे उडविली, खोट्या भ्रामक मृगजळामागे धावण्यात धन्यता मानली. चीनने मात्र, सरळ सैन्य पाठवून आपला पराभव केला. नंतर काही वर्षे उलटल्यावर आपण पुन्हा चीनशी बोलणी सुरू केली. ही बोलणी करण्यासाठी आपले बडे पुढारी बीजिंगला गेले. चीनच्या राज्यकर्त्यांनी यापैकी प्रत्येकाकडून "तिबेटवर चीनचे निर्भेळ वर्चस्व आहे' या वाक्यावर सह्या घेतल्या. एकदा तिबेटवरचा स्वत:चा हक्क असा मोहोरबंद करून घेतल्यावर चीनने "अरुणाचल सुद्धा चीनचाच हिस्सा आहे' असा सूर आळविण्यास सुरुवात केली. पण आश्चर्य म्हणजे गेल्या वर्षापासूनच नियतीने भारताच्या बाजूने फासे टाकण्यास प्रारंभ केला व या वर्षी तर वेगवेगळ्या कारणांमुळे चीनची कोंडी होतेय् असे चित्र दिसू लागले. म्हणजे एका बाजूने चीन भारताच्या भोवती चक्रव्यूहाचे जाळे विणत आहे, हे सत्य अाहे. पण भारताचे सेनापती दीपक कपूर, निस्संदिग्ध शब्दांत चीनने चालविलेल्या घुसखोरीबद्दल आरोप करून मोकळे झाले आहेत. हिन्दी महासागरात खास करून श्रीलंकेच्या आसपास आपल्या नौदलाने सागरी सीमांच्या रक्षणासाठी प्रभावी पावले उचलली आहेत आणि आपले संरक्षणमंत्री "भारताच्या सैन्याच्या सामर्थ्याची ग्वाही' देऊन मोकळे झाले आहेत. चीनने दलाई लामांच्या अरुणाचल भेटीवर आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्या अरुणाचल दौऱ्यावर आक्षेप घेतले. आपण या आक्षेपांना कस्पटासमान लेखून दोन्ही दौऱ्यांची आखणी केली. अमेरिकेनेही दलाई लामांशी खुलेआम चर्चा करून चीनच्या धमक्यांना धुडकावून लावले. कल्पना करा, भारताने बदलत्या परिस्थितीचा फायदा उठवून हिमतीने आपले सैन्य अद्ययावत केले. सीमांच्या रक्षणासाठी दमदार पावले उचलली, तर सन 1962 च्या पराभवाचे शल्य संपुष्टात येईल. चीनच्या चक्रव्यूहाचा भारताने भेद केला याचा आनंद आपणास साजरा करता येईल.
मुळात चीनने रचलेले चक्रव्यूह समजून घेतले पाहिजे. आपण एकतृतीयांश काश्मीर पाकिस्तानच्या वर्चस्वाखाली राहू दिला. चीनने त्याच भागात आपले तळ रोवले, आपण ब्रह्मदेशाला काही भूदान केले, चीनकडून तिथेही वाटमारी झाली, शेजारच्या बांगला देशातही चीनने घुसखोरी केली. म्हणजे बंगालच्या उपसागरात चीनने मुसंडी मारली आहे. पाकिस्तानच्या ग्वादार बंदरापर्यंत थेट काराकोरमपासून रस्ता बांधून चीनने अरबी समुद्रात पाय रोवले आहेत, तर थेट श्रीलंकेशी संधान साधून हिन्दी महासागरापर्यंत धडक मारण्यात याच चीनने यश मिळविले आहे. तिबेट म्हणजे जगाचे छप्पर. या छपरावर बसून बीजिंग ते ल्हासा आणि उजवीकडे ल्हासा ते काठमांडू असा प्रशस्त महामार्ग चीनने बांधला आहे. परिणामत: चीनचे भूदल व नौदल विनादिक्कत भारताला वळसा घालू शकते, असे वर्तमान आहे! रशिया, मंगोलिया, कझाखस्तान, किरगीझस्तान या देशाबरोबर करारमदार करून चीनने तिकडच्या सीमांवर पकड मिळविली आहे. साहजिकच खुश्कीच्या मार्गाने थेट युरोप गाठता येईल, तर जलमार्गाने पर्शियन आखातात व इराणमधेही घुसता येईल, अशी व्यूहरचना आखण्यात चीन सफल झाला आहे.
पाकिस्तानचा जन्मच भारताच्या द्वेषापोटी झाला. याच पाकिस्तानला सर्वतोपरी सहकार्य देण्यास चीन सदैव सिद्ध आहे. अमेरिकेला अफगाणिस्तानातले तालिबानी उद्योग उद्ध्वस्त करायचे आहेत व बिनभरवश्याच्या पाकिस्तानवरच वॉशिंग्टनचे राज्यकर्ते विसंबून राहात आहेत. चीनला "शत्रूचा शत्रू तो मित्र' या सूत्राच्या प्रकाशात भारतविरोधी पाकिस्तान एकदम प्रिय वाटतो. नजीकच्या भविष्यात समजा, अमेरिकेने अफगाण भूमीवरून काढता पाय घेतला, तर पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही राक्षस दिवाळी साजरी करतील. राहू व केतू यांची अभद्र युती भारताच्या सुखात माती मिळवील. चीनचा चक्रव्यूह भीषण आहे, यात शंका नाही.
चीनने भारताच्या परिघावर संकटांचे ढग उत्पन्न केले आहेतच; पण भारताचे तुकडे होतील असे शिव्याशापही दिले आहेत. काश्मीरमधून चीनचा प्रवास करणाऱ्या त्रयस्थ भारतीय नागरिकांना वेगळ्या प्रकारचा व्हिसा देऊन काश्मीर भारतापेक्षा वेगळा आहे, असे सूचित करणारा चीन भारतविरोधी कट कारस्थाने करण्यात व्यग्र आहे. बिचारे जवाहरलाल नेहरू याच चीनला युनायटेड नेशन्समध्ये प्रवेश मिळावा म्हणून जिवाचे रान करीत होते. अँग्लो-अमेरिकन व जपानी साम्राज्यवाद्यांपासून चीनला वाचविले पाहिजे, चिनी क्रान्ती यशस्वी झाली पाहिजे, यासाठीही कटिबद्ध होते. चीनने भारताचा विश्वासघात केला, तरी या विश्वासघातकी कारवायांवर पांघरूण घालीत होते. चीनच्या विरोधात भारतात म्हणे युद्धज्वर उत्पन्न होऊ नये यासाठीच जवाहरलालजींची घालमेल चालली होती. पण शेवटी चीनच्या पापांचा घडा भरला. चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा मात्र जवाहरलालजींच्या रूपातला शांतिदूत संरक्षणसज्ज झाला. या नव्या धोरणामुळेच दलाई लामांना भारतात आश्रय देण्याचा निर्णय झाला. दुर्दैव म्हणजे रणांगणात मात्र चीनकडून आपला पराभव झाला. चीनने भारताच्या भावनांची कधीच कदर केली नाही, उलटपक्षी भारताला शंभर टक्के नामोहरम् करायचे, युनायटेड नेशन्समध्ये प्रवेश मिळाल्यावर जो नकाराधिकार प्राप्त झाला त्याचा आधार घेऊन जगाच्या चावडीवर भारताची सतत कोंडी करायची, अशीच दुष्ट खेळी या कृतघ्न राष्ट्राने नेहमी खेळली.
पण ढगालाही सोनेरी किनार असते याची सुखद प्रचीती नजीकच्या भूतकाळात आपण घेतलीय् व म्हणूनच समाधान आहे. चीनच्या चढेल आगाऊपणावर अंकुश बसविण्यासाठी अमेरिकन अध्यक्षांनी दलाई लामांना सन्मानपूर्वक स्वत:च्या कार्यालयात पाचारण केले व चीनमधल्या लोकशाहीच्या गळचेपीचा निषेध केला. पाठोपाठ तैवानला क्षेपणास्त्रविरोधी अस्त्रे आणि लक्षावधी डॉलर्सच्या किमतीची शस्त्रेही रवाना केली. शिवाय, चीनकडून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर आयात करही लावले. जपानने चीनच्या विस्तारवादावर तोडगा म्हणून भारताशी नव्याने गोत्र जुळविल्याचे वर्तमान आहे. या नव्या परिस्थितीचा लाभ उठविण्यासाठीच भारताने अन्दमान निकोबारला अत्याधुनिक पाणबुड्या व युद्धनौका यांनी सुसज्ज असे नौदलाचे तळ उभे करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून हिन्दी महासागरातली चीनची घुसखोरी आटोक्यात आणता येईल ही खात्री आपल्या नौदलप्रमुखांनी व्यक्तविली आहे.
भारताने स्वसामर्थ्य वाढविण्याचे व निर्धारपूर्वक पावले उचलून चिनी चक्रव्यूह भेदून जाण्याचे ठरविले आहे. अशी ही शुभचिन्हे सुखद आहेत, असेच सच्चा भारतीय म्हणेल!
Thursday, February 25, 2010
प्रेरानेवर आघात
इयत्ता 9 वीचे "सामाजिक विज्ञान'
पहिल्या धड्यातील "वैदिक सभ्यता विश्व की प्राचीनतम... सभ्यता है', हा परिच्छेद गाळावा.
सातव्या धड्यातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे लिखाण गाळावे.
आठव्या धड्यातील "प्राचीन भारतीय आर्थिक चिंतन' हा भाग गाळावा.
इयत्ता 10 वीचे "संस्कृत' या विषयाचे पुस्तक
"स्वराष्ट्रम्।' हा 4 था धडा पूर्ण गाळण्यात यावा.
"वीर सावरकर।' हा 11 वा धडा संपूर्ण वगळावा.
"कुंभमेळा।' हा 12 वा धडा वगळण्यात यावा.
ई "अपठितावबोधनम्।' मधील "संघे शक्तिः कलौयुगे' (अर्थ ः कलियुगात संघशक्ती महत्त्वाची आहे.) हे वाक्य धड्यात जिथे जिथे असेल, तेथून ते काढावे.
"पत्रलेखनम्।' या भागातील "भारती संस्कृतपत्रिका' ऐवजी "स्वरमंगला संस्कृतपत्रिका' असे म्हणावे.
"शब्दाधारितवाक्यानां निर्माणम्' यामधील "लक्ष्मणः रामस्य भ्राता।' (अर्थ ः लक्ष्मण हा रामाचा भाऊ आहे.) याऐवजी "श्यामाः रमेशस्य भ्राता।' (अर्थ श्याम हा रमेशचा भाऊ आहे) असे वाचावे.
इयत्ता 11 वीचे "संस्कृत' या विषयाचे पुस्तक
"भरतस्य मोहः।' हा संपूर्ण धडा गाळावा.
"वेदोपदेशः।' हा संपूर्ण धडा गाळावा.
"संघे शक्तीः' असेल तिथे "संगठने शक्तिः' म्हटले जावे.
"चंद्रगुप्त' हा 13 वा धडा पूर्ण गाळावा.
"उत्तिष्ठत जाग्रत।' (अर्थ ः ऊठ, जागा हो!) हा 14 वा धडा पूर्ण गाळावा.
वरील प्रमाणेच रामायण, वाल्मिकी ऋषी आणि संस्कृत भाषा यांचे महत्त्व सांगणारी वाक्ये काही पाठांतून वगळण्याचा आदेश आहे.
इयत्ता 11 वीचे "राजनीती विज्ञान' या विषयाचे पुस्तक
7 व्या धड्यातील क्रांतिकारकांच्या साहसाच्या संदर्भातील वाक्ये गाळण्यास सांगितले आहे.
11 व्या धड्यातील "विनायक दामोदर
सावरकर' या नावाच्या अंतर्गत जे काही असेल, ते सर्व गाळावे.
***
खरा ख्रिस्ती
आपण हिंदू समाजातील माणसे. आपल्याला आपलाच धर्मविचार किंवा जीवनविषयक तत्त्वज्ञान यांची नीटशी ओळख नसते, तिथे तुलनात्मक चिंतन आपण काय करणार? आपण तरुणपणी तत्त्वज्ञान तर समजून घेत नाहीच, पण जेवढ्या प्रकाराने आपल्या समाजाचे दोष काढता येतील आणि त्याचा तेजोभंग करता येईल, तेवढे सारे प्रकार अवलंबितो. आपला धर्म आपल्याला वायफळ, भ्रांत समजुतीच्या एखाद्य़ा गाठोड्यासारखा वाटू लागतो. जेवढ्या लवकर या धर्माला व संस्कृतीला मूठमाती मिळेल तेवढे आधुनिक प्रगतीसाठी आपले मन मुक्त होईल, असे तारस्वराने सांगणारे महाभागही आपल्यात आहेत. हिंदू समाजात जन्म घेतला म्हणून बिचारे शरमिंदे असतात! कत्येक गरम रक्ताचे असतात ते, जे, जुने आहे त्या सगळ्यांची होळी करण्याची आक्रस्ताळी भाषा वापरतात. ख्रिस्ती धर्माची स्तुतिस्तोत्रे तर अनेकजण गातात. भूतदया, करूणा, समानता, सोशिकपणा, सोपेपणा इ. अनेक "ख्रिस्ती' सदगुणांचा उल्लेख वारंवार त्यांच्या बोलण्यात येतो. आपल्या समाजातील उपेक्षित बांधवांना मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली, तरी त्याचे त्यांना काही वाटत नाही.
असे जे बंधू आहेत, त्यांच्यासाठी मायकेल जीचा अनुभव मोठा बोधप्रद ठरेल. घळीवरील अभ्यास वर्गानंतर मायकेल जी यांनी हिंदू व ख्रिस्ती मतांचे अनेक अंगांनी सखोल तुलनात्मक चिंतन केले. आपले विचार ते व्यक्त करू लागले. ख्रिस्त्यांनी आपल्या इतर मतांसंबंधीच्या भूमिकेत सहिष्णुता, उदारता व गुणग्राहकता आणली पाहिजे, असे प्रतिपादन करू लागले. फादर मायकेल जी यांचे मराठी भाषेचे ज्ञान चांगले. त्यांनी वसईच्या "नम्रता' मासिकासाठी "ख्रिस्ती दृष्टिकोनातून गणपती दैवत' या मथळ्याचा एक लेख लिहिला, तो त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाला.
खळबळजनक लेख
या लेखात लेखकाने असे सूचित केले आहे की, ख्रिस्ती मतानुयायांनी संकुचित, एकांगी आणि असहिष्णू न राहता विविध मूर्तीतील देवत्वाच्या संकल्पनेबद्दल सहिष्णु राहावे आणि त्यातील सत्य ध्यानात घेऊन ख्रिस्ती पंथात देखील ते ग्राह्य मानावे. नमुन्यादाखल त्यांचा हा एक अभिप्राय पाहा.
""विवेकानंदांची उदार मनोवृत्ती पाहिल्यावर मला गेल्या शतकातील ख्रिस्ती धर्मातील इन्क्विझिशन पद्धती आठवते. ख्रिस्तावरचीच श्रद्धा, पण रोमचे अधिकारी म्हणतील त्याच शब्दात व्यक्त न करणारांचा छळ करणारी ती इन्क्विझिशन कोर्टे कुठे आणि हजारो धर्मपंथांचे स्वागत करणारे विवेकानंद कुठे!'' सर्व देवता ही निराकार ईश्वराची केवळ प्रतीके आहेत, असे म्हटल्यावर माझ्यासारखा ख्रिस्ती माणूस गणपतीच्या मूर्तीसमोर बसून परमात्म्याचे ध्यान फार सुंदर करू शकेल. जोपर्यत परमात्म्याच्या ध्यानाचे ते एक साधन म्हणून मी मानतो, तोवर ख्रिस्ती धर्मपंथाची देखील काही अडचण नसावी. अशाने माझी ख्रिस्तावरील भक्ती कमी न होता उलट वाढेल. हे ख्रिस्ताचेच एक रूप असे मी मानीन. कारण संत पॉलने दुसऱ्या शब्दात त्याला "मंडळींचा पति' म्हटले आहे. तेव्हा गणपती हे ख्रिस्तांचेचरूप मानून मी त्याला नमस्कार करायला हरकत कुठे आहे? पण बरेच ख्रिस्ती लोक ख्रिस्ताचे वैश्विक रूप स्वीकारावयास तयार नाहीत. त्यांना तो इस्त्रायली येशूच हवा आहे, पण असा आग्रह धरण्याने ख्रिस्ती लोक आपली आध्यात्मिक दिवाळखोरीच प्रकट करतात.''
प्रतिक्रिया
ख्रिस्ती समाजाच्या विचारांना एक नवी व्यापक दिशा दाखविणाऱ्या या लेखाची प्रतिक्रिया ख्रिस्ती समाजात काय झाली? किंवा नंतर ""सज्जनगड' मासिकात "आम्ही ख्रिस्ती देखील हिंदूच आहोत' ही जी भूमिका त्यांनी मांडली, तिचा परिणाम काय झाला? परिणाम असा झाला की, वसईतून ख्रिस्ती मिशनऱ्यांनी त्यांची उचलबांगडी केली व चुळणे या ठाणे जिल्ह्यातील आडगावी त्यांना काम करावयास सांगितले.
(मुक्काम चुळणे, पोस्ट वसई रोड, जि. ठाणे पिन- 401202) तेथे "फातिमा माता मंदिरा'त ते असतात. त्यांचे एक पत्र मी पाहिले. चिंचवडच्या एका समर्थभक्त मित्राला आलेले. पत्रावर "श्रीअभिषिक्ताय नम:' असे लिहिलेले असते. आपण श्रीगणेशाय नम: लिहितो तसे. स्वत:ला ते "अभिषिक्तानंद' म्हणवितात. अभिषिक्त म्हणजे येशू ख्रिस्त!
वसईतून हकालपट्टी होण्यावरच थांबले नाही. त्यांच्या लेखांची कात्रणे अनुवादासहित थेट रोमपर्यंत रवाना झाली. रोमने या कागाळीची दखल घेतली आणि "शो कॉज नोटीस'सारखी एक प्रश्नावली रोमहून मायकेल जी यांच्याकडे येऊन थडकली. मला असे कळले आहे की, या प्रश्नावलीला एक दहापानी उत्तर मायकेल जी यांनी तयार केले आहे. यात आपल्या भूमिकेचे समर्थन त्यांनी केले असून, ख्रिस्ती पंथाने उदार होण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. या निवेदनाचा उपयोग बहुधा होणार नाही आणि संभवत: चर्चमधून त्यांची हकालपट्टी होईल! ख्रिस्ती पंथाचे व मिशनऱ्यांच्या मतलबी सेवेचे ऊठसूट कौतुक करणाऱ्यांना मायकेल जी यांचाच आणखी एक अनुभव सांगण्यासारखा आहे. हिंदुस्थानातील ख्रिश्चनांच्या प्रतिगामित्वावर त्यामुळे झगझगीत प्रकाश पडतो.
ख्रिस्ती लोकात अशी पद्धत रूढ आहे की, " गुड फ्रायडे'ला धर्मगुरूने शिष्याच्या पायावर पाणी घालावे, ते धुवावे. येशूने तेच केले होते. जीवनाच्या अंतिम समयी केलेली ती सेवा होती. स्वामी विवेकानंदांनी महासमाधी घेण्याच्या दोनच दिवस आधी (2 जुलै 1902) असाच प्रसंग घडला होता. भगिनी निवेदिता यांना त्यांनी स्वहस्ते मोठ्या प्रेमाने जेवण वाढले होते. त्यांच्या हातावर पाणी घातले होते आणि टॉवेलने त्यांचे हात पुसले होते. ""स्वामीजी, जी सेवा मी करावयास हवी ती तुम्ही का करताहात?'' या निवेदितांच्या प्रश्नावर स्वामीजी उद्गारले होते, ""ख्रिस्ताने तर आपल्या शिष्याचे पाय धुतले!''
विवेकनंदांनाही एवढा उदात्त वाटलेला तो प्रसंग! त्याची स्मृती म्हणून धर्मगुरूने शिष्याचे पाय धुण्याची प्रथा ख्रिस्ती संप्रदायात चालू आहे, पण चमत्कार असा की, बिचाऱ्या महिलांना यात कुठेही स्थान नसते. मायकेल जी यांच्या उदार मनाला वाटले की, ज्यांचे पाय धुवावयाचे, त्यांत काही महिलांचाही समावेश करावा, त्या प्रमाणे त्यांनी केले, पण ख्रिस्ती लोकांना हा "धर्मभ्रष्टपणा' अजिबात मानवला नाही. सोहळा पाहण्यासाठी आलेल्या ख्रिस्ती लोकांपैकी अनेकांनी धर्मगुरूवर हल्ला चढविला! त्यांना मारायला ते उठले, हिंदू महिलांचा कळवळा ख्रिस्ती धर्मप्रचारक दाखवितात, पण ख्रिस्ती समाजात औदार्य ते आणीत नाहीत. समतेचा भाव ओतत नाहीत. अनाथ आणि गांजलेल्या हिंदू स्त्रियांना आश्रय देऊन त्यांना ख्रिस्ती कळपात ओढण्यापलीकडे कोणता विचार त्यांच्याजवळ असतो? काही तरुणांनी साहसपूर्वक मायकेल जी यांना संरक्षण दिले म्हणून केवळ तो प्रसंग निभावला.
मला म्हणायचे असे की, आपल्या हिंदू समाजात दोष शिरले असतील. वौदिक तत्त्वज्ञानाची विटंबना करणाऱ्या प्रथा रूढ झाल्या असतील, अध्यात्माच्या किंवा परमार्थाच्या मूळ शुद्ध प्रेरणा मलीन होऊन गेल्या असतील. भोंदू महाराजांचा सुळसुळाट झाला असेल, पण परधर्मात आपल्या बांधवांनी जाणे हा त्यावर तोडगा ठरू शकत नाही. त्या समाजातही अवगुण काय थोडे आहेत? असहिष्णुता आणि छळवाद काय कमी आहे? विधवांसाठी जे आश्रम (होम्स) ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केले, त्यातील महिलांच्या दुर्धर अवस्थेने स्वत: विवेकानंद कळवळून चिडून गेले होते. हिंदू समाजाने या दुर्दैवी महिलांना कुटुंब व्यवस्थेत सामावून घेतले पाहिजे, असा अभिप्राय आपल्या अखेरच्या दिवसात त्यांनी व्यक्त केला होता. तेव्हा, ज्या त्या समाजाने आपल्याच पद्धतीने अवगुण किंवा दोष निपटून काढले पाहिजेत व समाज एकरस, एकात्म आणि प्रगतीशील बनविला पाहिजे. हाच योग्य मार्ग आहे. गांधीजींनीही ख्रिस्ती मिशनऱ्यांना सांगितले होते की,""तुम्ही आमच्या सुधारणेची चिंता करू नका ते आमचे आम्ही पाहून घेऊ.''
या मायकेल जी प्रकरणावरून आणखी एक विचार मनात येतो तो हा की, आपल्या समाजातील दोषच केवळ पाहण्याची धडपड का? आपली बलस्थाने हेरून त्यांच्यावर भर देण्याचा व आत्मगौरवाची भावना हिंन्दूंच्या ठायी पुष्ट करण्याचा विधायक प्रयत्न का नाही? ज्याची जगण्याचीच पात्रता नाही, जो केवळ सडलेलाच आहे आणि जिजीवेच्छा जो पूर्णपणे हरवून बसला आहे, तो समाज अनादी काळापासून आजवर एक सातत्यपूर्ण जीवन कंठू शकेल, ही गोष्ट अशक्यच. ज्या अर्थी हा समाज जगला, वेळोवेळी त्याचे पुनरुत्थान झाले, थोर अवतारी व महात्मे या समाजाने जन्माला घातले, जीवनाच्या सर्व क्षेत्रांत दिग्गज इथे निपजले व ख्रिस्ती आणि इस्लामी आक्रमणांचे हालाहल पचवून आपले अमृतत्त्व त्याने सिद्ध केले, त्याअर्थी काही तरी अंगभूत गुणवत्ता या समाजात व या भूमीत असलीच पाहिजे. त्या गुणांचा शोध घेऊन त्यांचा पुन्हा उत्कर्ष घडवून आणला, तर आज त्याचे भासणारे विकृत दयनीय स्वरूप नाहीसे होऊन नव्या तेज:पुंज स्वरूपात तो उभा का होऊ शकणार नाही? घरच्या म्हातारीचा काळ बनणारांनी तसेच हताश वैफल्यग्रस्त होऊन गेलेल्यांनी या दृष्टीने परिस्थीतीकडे पाहावयास पाहिजे. परक्यांना आपले गुण दिसू शकतात. आपल्या श्रेष्ठ द्रष्ट्या पुरुषांचे द्रष्टेपण कळू शकते, पण आपण मात्र "उध्दरेदात्मनात्मानम्' हा प्राचीन महामंत्र विसरून आत्मनिंदेत मश्गुल होतो! आत्मसन्मानाची भावना तर माणसात आधी पाहिजे. कोणत्या मूल्यांसाठी आपले जीवन आहे, याचा विवेक सदैव पाहिजे. त्यासाठी प्राणपणाने झुंजण्याची वृत्ती पाहिजे. परक्यांकडे आपली बुद्धी गहाण टाकून हे करता येत नाही. आंधळया व मर्कटछाप परानुकरणाने काहीच साधत नाही. मानसिक दास्य, पराभूतता व परावलंबन यांनाच जन्म देते.
आपले बलस्थान
आज मायकेल जी यांचे अनुभव मी सांगितले याचे कारण एवढेच की, आपल्यापेक्षा अन्य समाज सुखी, प्रगतीशील व प्रगल्भ आहेत, हा अनेकांच्या मनातील भ्रम दूर व्हावा. कोणाच्या स्तुती-निंदेवर आपली महत्ता अवलंबून नसते. "स्वयमेव मृगेन्द्रता' हीच पुरुषार्थी वृत्ती समाज वा राष्ट्र या नात्याने जीवनात धारण करावी लागते. अनेक विचारवंतांच्या दृष्टीने आपले मुख्य बलस्थान आपल्या तत्त्वज्ञानाने दिलेल्या आणि हजारो सत्पुरुषांनी आचरून उद्घोषिलेल्या आपल्या जीवनदृष्टीत आहे. ही जीवनदृष्टी एकदा स्वीकारली व तद्नुसार जगण्याचा प्रयत्न केला, तर एकेका व्यक्तीपासून तो समस्त विश्वापर्यंत सर्वांच्या सुखी आणि विकासोन्मुख, तृप्त आणि धन्य जीवनाचा राजमार्ग दृष्टिपथात येतो. मात्र या जीवनदृष्टीची दोन्ही अंगे नीट आत्मसात केली पाहिजेत. पहिले अंग हे की, कोणीही व्यक्ती क्षुद्र नाही. उपेक्षणीय नाही. कारण तिच्यात भगवंत असतो. त्या व्यक्तीलाही हे ज्ञान व्हावे की मी क्षुद्र, क्षणभंगुर, सुख-दु:खाचे आगतिकपणे हेलकावे खाणारा जीव नाही, तर अविनाशी, शाश्र्वत चैतन्य हे माझे "स्वरूप' आहे. यालाच देहबुद्धीचा लोप आणि आत्मबुद्धीचा उदय असे आपल्या जीवन चिंतकांनी म्हटले आहे. देहबुद्धी क्षीण झाली की, इतरांची दु:खे दिसतात. त्यांच्यातील देवत्व जाणवते. त्यागभावना निर्माण होते. सोशिकता येते. क्षुद्र मानापमान गळून पडतात. सत्ता आणि संपत्ती यासाठी सर्व उन्नत जीवनमूल्ये पायदळी तुडविण्याचा उन्मत्तपणा स्पर्शही करीत नाही. समाजाचे जीवन आध्यात्मिकतेच्या भक्कम पायावर उभे होते. ओघानेच भौतिक सुस्थितीही समाजाला अवश्यमेव लाभते.
आणि दुसरे अंगही महत्त्वाचे आहे. जगात देवमाणसे असतात तसे प्रकृतीच्या अंगाने दानव ठरणारेही असतात. कितीही प्रयत्न केला, तरी त्यांची प्रकृती पालटत नाही. हे दानव सात्विक गुण आणि संस्कृती यांच्यावर आततायी आघात करतात. त्यांना ऐश्र्वर्य हवे असते. अमर्याद देहसुखाची अनावर अभिलाषा असते. हे यज्ञरूपी जीवनाचा विध्वंस करण्यास प्रवृत्त होतात. आतंक निर्माण करतात. नृशंस व्यवहार करतात. सुसंस्कृत व दिव्यत्वाची साधना करणाऱ्या समूहांचा प्रत्येक मानबिंदू विटंबितात, अशा आततायी आणि दानवी शक्तीला वेळीच ठेचण्याचे व त्यांचा उपद्रव रोखण्याचे अमोघ सामर्थ्यही समाजात पाहिजे. सज्जनांना निर्वेधपणे जगता येईल आणि आनंद साधना करता येईल, अशी भौतिक परिस्थिती राखणे हे थोर धर्मकार्य आपल्याकडे मानले गेले आहे, ते ईश्र्वरी कार्य आहे. सुखी व संपन्न समाजासाठी या जागृत, नित्यसिद्ध शक्तीची परम आवश्यकता असते. तशी ऐहिक रचना समाजाने करावयाची असते.
खरे प्रबोधन
मूलत: हा सगळा विचार हिंदू तत्त्वज्ञानाने सांगितला आहे. आपल्या इतिहासातील घटनात त्याची गुंफण झालेली आहे. या दुहेरी जीवनविचाराने आपल्याला अमरत्व प्रदान केले आहे. माणसाला वेळोवेळी याच विचाराने उंच उठविले आहे, परंतु या विचारापासून आपण दूर भरकटलो, तेव्हा आपल्याला दैन्यावस्थाही आलेली आहे. हे आज आपण जाणले पाहिजे. कोण पुढारी कसा वागतो, लोक कसे पैशाच्या व भोगाच्या मागे वेड्यासारखे धावत आहेत, हे आपण विषण्ण होऊन सांगतो, पण मुळाशी जात नाही. सत्तेषणा, लोकेषणा, वित्तेषणा, अनिर्बंध दुर्वासना, मत्सरग्रस्तता यावर माणूस व समाज कशी मात करू शकेल, हा मूळ प्रश्न आहे. केवळ ऐहिक विचाराने या प्रश्र्नाचे उत्तर मिळूच शकत नाही. अनेक पंथ, अनेक संप्रदाय, अनंत प्रकारची विविधता यांना सामावून घेणारा तत्त्वविचार कोणता व हे भगवंताने दिलेले वैभवशाली जीवन उद्ध्वस्त करणारा असहिष्णु दानवी विचार कोणता याची स्पष्ट जाण समाजात प्रसृत करणे म्हणजे खरे समाजप्रबोधन होय. असे प्रबोधन जो करीत असेल, तो समाजाचा हितकर्ता आणि रक्षणकर्ता या स्वरूपाच्या वैश्र्विक प्रबोधनाचे निहित सामर्थ्य ख्रिस्ती वा इस्लामी पंथांनी कधी प्रकट केले नाही. रक्तपात आणि शोषण केले. धमार्च्या क्षेत्रात जुलूम आणि वंचना याचे थौमान घातले. त्याला इतिहास साक्षी आहे. हिंदूचे हे अजोड बलस्थान आपण जाणले पाहिजे व संस्कृतिधारेतील अमृत सर्व बांधवांपर्यंत पोचविले पाहिजे. प्रथम स्वत: ते ग्रहण करावे लागेल हे सांगणे न लगे!
( 30 वर्षांपूर्वीचा हा लेख आजही प्रासंगिक आहे.)
... "कॅथॉलिक' बनावे
नुकतीच "कॅथॉलिक कौन्सिल ऑफ इंडिया,' या ख्रिस्ती संप्रदायाच्या संस्थेची 10 वी सर्वसाधारण बैठक झाली. ती चार दिवस चालली. त्या बैठकीला, कॅथॉलिक चर्चच्या भारतातील 160 घटकसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तेथे पारित झालेल्या एका ठरावान्वये "राष्ट्रीय एकात्मता आणि भारतातील अन्य नागरिकांच्या शांततापूणर्ण सहजीवनासाठी' आपली प्रतिबद्धता प्रकट करण्यात आली. ही प्रतिबद्धता, प्रस्तावाच्या शब्दांमध्ये बुडून न जाता, ती प्रत्यक्षात उतरली, तर ती स्वातंत्र्योत्तर भारताच्या राष्ट्रजीवनातील फार मोठी उपलब्धी ठरेल, याविषयी शंका नको. "कॅथॉलिक' या विशेषणाचा अर्थ वैश्विक उदारता असा आहे. त्या अर्थाला साजेसेच हे वर्तन ठरेल. परंतु, कॅथॉलिक चर्चचा इतिहास आणि वर्तमानही, या प्रतिबद्धतेला अनुरूप आहे, असे मात्र म्हणता यावयाचे नाही.
भूतकाळ : मागच्या इतिहासातील कृष्णकारस्थाने उगाळीत बसण्यात अर्थ नाही. तथापि, एवढे सांगणे अप्रासंगिक होऊ नये की, सर्व ख्रिस्ती संप्रदायांमध्ये, कॅथॉलिक चर्च अधिक कट्टर, अधिक जुलमी, अधिक असहिष्णू आणि अधिक मूलस्थितिवादी राहिलेले आहे. या चर्चची म्हणजे चर्च चालविणाऱ्या प्रमुखांची अशी वागणूक राहिल्यामुळेच तर, त्याविरुद्ध मार्टिन ल्यूथरला या चर्चविरुद्ध बंड करावे लागले. त्याने स्थापन केलेल्या पंथाचे "प्रॉटेस्टंट' हे नावच कॅथॉलिक चर्चच्या निषेधाचे द्योतक आहे. ल्यूथरनंतर सुमारे शंभर वर्षांनंतर गॅलिलिओ झाला. त्याचा अपराध एवढाच होता की, तो सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्याभोवती फिरते, असे प्रतिपादित होता. हा धर्मद्रोह आहे, असे चर्चने ठरविले आणि त्याला तुरुंगात टाकून त्याचा इतका छळ केला की, त्याने आपले मत चूक असल्याचे कबूल केले, तेव्हा त्याची तुरुंगातून सुटका झाली. किती प्रॉटेस्टंट धर्मगुरूंना कॅथॉलिक चर्चने जिवंत जाळले, याचा सारा हिशेब प्रॉटेस्टंटांजवळ आहे.
वर्तमान : पण ही सारी "रानटी' मध्ययुगातील प्रकरणे आहेत. त्याबद्दल कॅथॉलिक चर्चच्या अलीकडच्या प्रमुखांनी म्हणजे पोपमहाशयांनी खेदही व्यक्त केला आहे. पण या 20 व्या व 21 व्या शतकातही, कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट पंथीय लोकांमध्ये सामंजस्य निर्माण झाले, असे दिसून येत नाही. मी, नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये 17 वर्षे प्राध्यापक होतो. हे कॉलेज, "चर्च ऑफ स्कॉटलंड' या प्रॉटेस्टंट चर्चमार्फत चालविले जाते. त्या काळात अनेक नव्या प्राध्यापकांची नियुक्ती झाली. काही वर्षे मी या निवड मंडळीचा एक सदस्यही होतो, पण एकाही कॅथॉलिकाला आमच्या कॉलेजमध्ये नोकरी मिळाल्याचे उदाहरण नाही. नागपूरचे सेंट फ्रान्सिस डिसेल्स कॉलेज कॅथॉलिकांकडून चालविले जाते. त्या कॉलेजमध्ये कधीतरी कुणा प्रॉटेस्टंटाला नोकरी मिळाली असेल, असे वाटत नाही. माझे हे विधान चूक असेल, तर मी आले शब्द माफीनाम्यासह परत घेईन. मी असे ठामपणे म्हणण्याचे कारण आहे. गोष्ट 2002 ची आहे. मी, तेव्हा, दिल्लीला रा. स्व. संघाचा प्रवक्ता म्हणून कार्यरत होतो. संघाच्या राष्ट्र जागरण अभियानाच्या दरम्यान अल्पसंख्यक आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष सरदार तरलोचन सिंग यांच्या घरी आम्ही गेलो होतो. शीख रिलिजन आणि शीख समाज यांच्यासंबंधी संघाची भूमिका, आम्ही त्यांना समजावून सांगितली. ते आम्हाला म्हणाले, ""हे तुम्ही अल्पसंख्यक आयोगासमोर सांगाल काय?'' आम्ही होकार दिला. त्याप्रमाणे बैठक ठरली. आयोगाचे संपूर्ण सदस्य उपस्थित होते. आम्ही आपले निवेदन इंग्रजी भाषेत लेखी स्वरूपात सादर केले होते. बहुतेक चर्चा इंग्रजीतच झाली. तेव्हा त्या आयोगाचे एक सदस्य श्री जॉन जोसेफ म्हणाले, ""आपण ख्रिस्ती धर्मगुरूंशीही बोलाल काय?'' आम्ही होकार दिला. त्याप्रमाणे त्यांनी दिल्लीच्या कॅथॉलिक चर्चच्या प्रमुखांशी संपर्क केला. त्यांच्या तीन अटी होत्या- 1. आम्ही प्रवक्ता वगैरे खालच्या दर्जाच्या संघ कार्यकर्त्याशी बोलणार नाही, सर्वोच्च व्यक्तीशीच बोलू. 2. आमच्याबरोबर प्रॉटेस्टंट असणार नाहीत आणि 3. बैठक चर्चच्या इमारतीतच होईल. आम्ही या सर्व अटी मान्य केल्या. मात्र, प्रॉटेस्टंटांबरोबर बसायचेही नाही, एवढी अस्पृश्यता हे चर्च का पाळत असते, याचा उलगडा काही झाला नाही. त्यानंतर सुमारे एक महिन्याने प्रॉटेस्टंटांच्या 27 उपसंप्रदायांचे 29 प्रतिनिधी नागपूरला संघाच्या मुख्य कार्यालयात आले होते. दीड-दोन तास त्यांच्याशीही चर्चा झाली. सर्वांनी आमच्याबरोबर कार्यालयातच भोजन केले. हे सांगण्याचा उद्देश हा की, जो पंथ आपल्या अभिधानात "कॅथॉलिक' हे व्यापक विशेषण वापरतो आणि ज्याला आपल्याच धर्माच्या अन्य पंथांविषयी एवढी अनुदारता आहे, तो अन्य धर्मांच्या बाबतीत सहिष्णू आणि शांततापूर्ण सहजीवनासाठी उत्सुक राहील काय?
कॅथॉलिकच तेवढे अनुदार आहेत आणि बाकीचे पंथ खूप उदार आहेत, असे मला सूचित करावयाचे नाही. अमेरिकेचे उदाहरण माझ्यासमोर आहे. अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र. या राष्ट्रात, बहुसंख्या प्रॉटेस्टंटांची आहे. पण कॅथॉलिकही 24 टक्के आहेत. या राष्ट्राच्या गेल्या तीनशे-सव्वातीनशे वर्षांच्या इतिहासात, फक्त एकदाच एक कॅथॉलिक राष्ट्रपती बनू शकला, पण तोही आपला चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही. तीन वर्षांच्या आत त्याची हत्या झाली.
सेमेटिक : सारेच सेमेटिक पंथ संप्रदाय अनुदारतेने ग्रस्त आहेत. केवळ ख्रिस्तीच अनुदार आहेत असे नाही. मुसलमानातही भरपूर अनुदारता आहे. शिया, सुन्नी, अहमदिया हे स्वत:ला इस्लामीच मानतात; ते सारे कुराण शरीफवर विश्वास ठेवतात आणि पैगंबरसाहेबांचाही आदर करतात; पण परस्परांचा द्वेष करावयाला कमी करीत नाहीत. इराण व इराक यांमधील संघर्ष हा शिया व सुन्नी यांच्यातील संघर्ष असतो. अहमदियांना, तर पाकिस्तानात मुसलमानच मानले जात नाही! कारण हे की, ते महमदसाहेबांना अंतिम पैगंबर मानीत नाहीत! अन्य बाबतीत सर्व समान असताना, या एका बाबीवरून जे आपल्या बांधवांना परके ठरवितात, ते अन्य पंथसंप्रदायांच्या लोकांशी समानतेने व्यवहार करू शकतील? -हा सर्वात मोठा कळीचा प्रश्न आहे. आणि त्याचे ठाम सकारात्मक उत्तर अद्यापि प्राप्त झालेले नाही, पण आजचा आपला मुद्दा कॅथॉलिक पंथांच्या संदर्भात आहे. त्यांच्याशी झालेल्या वार्तालापात आम्ही एकच प्रश्न उपस्थित केला की, चर्चमध्ये न जाताही पापमुक्ती मिळू शकते काय? (Can there be salvation outside the Church also) आणि या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आम्हाला मिळू शकले नाही. हिस्लॉप कॉलेजमध्ये असताना माझ्यापेक्षा निदान दोन दशके वयाने ज्येष्ठ असलेल्या अत्यंत शांत स्वभावाच्या प्राध्यापकाने मला प्रश्न केला होता की, ""मी आरएसएसचा सदस्य होऊ शकतो काय? त्यासाठी मी काय केले पाहिजे?'' मी उत्तर दिले होते की, ""आपणास आपले चर्च सोडण्याची जरुरी नाही. आपण बायबलवर श्रद्धा ठेवू शकता, परंतु आपणास हे मान्य करावे लागेल की, इतरही पंथ आणि विश्वासही, आपल्या पंथासारखेच योग्य असू शकतात.'' माझे वाक्य, पन्नास- पंचावन्न वर्षांनंतर आजही माझ्या स्मरणात आहे. मी म्हटले होते, Sir, You have to accept the validity of other faiths and religions. ते प्रामाणिक होते. ते म्हणाले, ""मी हे मान्य करू शकत नाही. हे मान्य केले तर मी आपल्या धर्माचा प्रचार कसा करू शकेन?''
अनिवार्यता : भारताच्या एकात्मतेसंबंधी आणि शांतिपूर्ण सहजीवनासाठी कॅथॉलिक चर्चची खरेच प्रतिबद्धता असेल, तर रोमची गोष्ट सोडा, भारतातील कॅथॉलिक चर्चच्या प्रमुखांनी असे नि:संदिग्ध विधान केले पाहिजे की, ईश्वराच्या उपासनेचे, ईश्वरप्राप्तीचे अन्यही मार्ग असू शकतात. आहे या चर्चच्या प्रमुखांची तयारी? एकात्मतेसाठी ही अगदी मूलभूत आवश्यकता आहे. या भारतात हिंदू बहुसंख्य आहेत, म्हणूनच एवढी उदारता, भारताच्या संविधानात आहे. आपल्या घटनेच्या 25 व्या कलमात प्रत्येकाला आपला वेगळा पंथ मानण्याचा (प्रोफेस), त्याप्रमाणे उपासना करण्याचा (प्रॅक्टिस), आणि प्रचार करण्याचा (प्रॉपॅगेट) मौलिक अधिकार दिला आहे. माझा व्यक्तिश: या व्यापक अधिकाराला विरोध आहे. ज्यांना इतर पंथ व आस्था यासंबंधीची वैधता मान्य नाही, त्यांना आपल्या असहिष्णू मताचा प्रचार करण्याचा अधिकार असू नये, असे मला वाटते. कारण, ते असहिष्णुतेचाच प्रचार करणार. आमची अशी इच्छा आहे की, सारेच पंथ, संप्रदाय, रिलिजन, मजहब खऱ्या अर्थाने "भारतीय' बनावेत; आणि त्यासाठी सर्व पंथसंप्रदायांच्या अस्तित्वाला मान्यता देणे अनिवार्य आहे. भारतातीलच ख्रिस्ती व इस्लामी संप्रदाय हे महत् कार्य करू शकतात. कारण, नवे स्वीकारण्याची इथली फार प्राचीन परंपरा आहे.
उदारता : परमेश्वराची अनेक रूपे व अनेक नावे असू शकतात, ही इथली फार प्राचीन काळापासूनची मान्यता आहे. ऋग्वेदात इंद्र, वरुण आणि अग्नी या प्रधान देवता होत्या. नंतरच्या काळात ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिमूर्ती आल्या. त्यानंतरही राम, कृष्ण अशा अवतारी महापुरुषांना देवत्व प्राप्त झाले. विठोबा, खंडोबा, बालाजी अशी नवी दैवते आली. साई महाराज, गजानन महाराज, संतोषी माता ही आणखी अलीकडची दैवते आहेत. त्यांची भव्य, समृद्ध मंदिरेही उभी झाली. या मंदिरांच्या उभारणीला कुणाचाही आक्षेप नाही. अट एकच आहे की, जुने मंदिर उद्ध्वस्त करून आपले नवे मंदिर उभे करावयाचे नाही. बाबराला हे जमले नाही म्हणून अयोध्येत मंदिराच्या जागी मशीद बांधण्याचे दुष्कृत्य त्याच्या हातून घडले. वस्तुस्थिती ही आहे की, शरयूच्या किनाऱ्यावर मशीद बांधण्यासाठी भरपूर जागा होती, पण बाबराच्या सेनापतीला मशीद बांधायचीच नव्हती. हिंदूंचे मंदिर आक्रमायचे होते. औरंगजेबानेही त्याचेच अनुकरण करीत काशी व मथुरेची मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्या. गझनीच्या महमदानेही सोमनाथला तेच केले. अत्याचारांची, ही दृष्टीला बोचणारी आणि अंत:करणाला पिळवटून काढणारी प्रात्यक्षिके संपली पाहिजेत. भारतातील मुसलमानांचे हे आद्य कर्तव्य आहे. राजकारणाच्या आणि मतपेढीच्या मर्यादेच्या बाहेरचे हे प्रश्न आहेत.
अंतरंग : "कॅथॉलिक कौन्सिल ऑफ इंडिया'ने आपल्या एका प्रस्तावात "घरवापसी'ला (रिकॉन्व्हर्शन) विरोध केला आहे. त्यांनी मुख्यत: ओरिसा, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांचा निर्देश केला आहे. मला बरे वाटले. मिशनऱ्यांना, घरवापसीची आच लागत आहे, ही चांगली गोष्ट आहे. धर्मान्तराचा एकदिक् मार्गच का असावा? जे ख्रिस्ती झाले, खरे म्हणजे ज्यांना ख्रिस्ती करण्यात आले, त्यांना परत स्वधर्मात का आणले जाऊ नये? यात व्यक्तीच्या "धर्मस्वातंत्र्या'वर कसा काय घाला पडतो? केवळ कॅथॉलिकच नव्हे, तर सर्वच चर्चेसने विचार केला पाहिजे की, ओरिसा आणि छत्तीसगड पूर्वी ज्या प्रांतात अंतर्भूत होते तो मध्यप्रदेश, यातील सरकारांनी "लालूच, कपट आणि जबरदस्ती' याद्वारे धर्मांतर करण्यावर बंदी का घातली? ही सरकारे भाजपाची सरकारे नव्हती. "सेक्युलर' कॉंग्रेसची सरकारे होती. या सरकारांनी अवैध धर्मपरिवर्तनाला प्रतिबंध करणारा, कायदा केल्याबद्दल, त्या कायद्याच्या विरोधात कुणी न्यायालयात धाव घेतली होती? चर्चेसनीच ना! का? लालूच, लबाडी व जबरदस्ती हे धर्मप्रसाराचे मार्ग चर्चेसला मान्य आहेत, म्हणूनच की नाही! हे पापलिप्त मार्ग या चर्चेसना योग्य वाटत असलेच पाहिजेत आणि आजही या वृत्तीत फारसा फरक पडला असेल, असे वाटत नाही. म्हणून तर, या कायद्याचे मनापासून स्वागत करण्याऐवजी चर्चची मंडळी न्यायालयात गेली. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने साफ सांगितले की, "धर्मस्वातंत्र्याचा हक्क' म्हणजे धर्मपरिवर्तन करण्याचा हक्क नव्हे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय कॅथॉलिक चर्चला मान्य आहे की नाही, हे त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे.
हित-अहित : हे खरेच आहे की, धर्म, उपासना, श्रद्धा हे वैयक्तिक पातळीवरचे विषय आहेत. पण चर्चेसने सामूहिक धर्मपरिवर्तन केले आहे. कायद्याची ऐसीतैसी करून हे अपप्रकार करण्यात धन्यता मानली आहे. स्टेन्सची हत्या, या अपप्रकारामुळे घडली. चर्चच्या उद्दंड कारवायांना लक्ष्मणानंद सरस्वती विरोध करीत होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. आताचा काळ, ना बाबर- औरंगजेबाचा आहे, ना सेंट झेवियरचा. आता अत्याचाराची प्रतिक्रिया उमटणार आहे. ओरिसात ज्या निरपराध ख्रिस्ती बांधवांचे विस्थापन झाले आहे, त्यांचे पुनर्वसन झालेच पाहिजे. कॅथॉलिक कौन्सिलच्या ठरावाच्या या भागाचे कुणीही समजदार माणूस समर्थनच करील. परंतु, कॅथॉलिक चर्चने, त्यांच्या त्या कारवायाही थांबविल्या पाहिजेत. आपल्या कळपाची संख्या वाढविणे हे एका काळी वैध मानले गेले असेलही, पण आता ते चालायचे नाही. धर्मपरिवर्तनाची फार मोठी किंमत या आपल्या हिंदुस्थानाने दिली आहे. आपल्या पवित्र मातृभूमीचे तुकडे यामुळेच झाले. यामुळेच काश्मीरच्या खोऱ्यातील पाच टक्के हिंदूंना देशोधडीला लागावे लागले. यामुळेच नागालॅंडमध्ये भारत सरकारचे नाममात्र अस्तित्व आहे. तेथे म्हणे "युद्धबंदी' (सीज् फायर) आहे! युद्धबंदी कोणात असते? दोन देशांमध्येच की नाही? नागालॅंड वेगळा देश आहे काय? वेगळे राष्ट्र आहे काय? तेथे कोणत्या चर्चचे वर्चस्व आहे, याची मला कल्पना नाही, पण कुणाचेही वर्चस्व असो, त्यांच्या फूटपाड्या कारवाया सहन करण्याची जनतेची मानसिकता नाही. हे ख्रिस्ती चर्चेस जेवढ्या लवकर समजून घेतील, तेवढे त्यांच्या हिताचे आहे.
अल्पसंख्य? : सर्व ख्रिस्ती आणि इस्लामी संघटनांना माझा प्रश्न आहे की, आपण स्वत:ला अल्पसंख्यक का समजता? बहुसंख्यकांना जे अधिकार आहेत, त्यातल्या कोणत्या अधिकारापासून आपणांस वंचित ठेवण्यात आले आहे? वस्तुत:, जे अधिकार बहुसंख्यकांना नाही, ते ज्या अल्पसंख्यकांना, हिंदूंच्या उदारतेमुळे म्हणून प्राप्त आहेत, ते आम्हाला नको, असे या धर्मसंस्थांना म्हणता आले पाहिजे. घटनेच्या 30 व्या कलमात अल्पसंख्यकांना आपल्या शिक्षणसंस्था स्थापन करण्याचा अनिर्बंध अधिकार दिला आहे. या तथाकथित अल्पसंख्यकांना आपले वेगळे अल्पसंख्यकत्व टिकविण्याला मोकळीक असावी, यासाठी या कलमाचा अंतर्भाव घटनेत केला असावा, असे मला वाटते.
मग त्यांनी, आपले कार्यक्षेत्र आपल्या पंथाच्या लोकांपर्यंतच मर्यादित ठेवायला हवे. उदाहरणार्थ, स्थानिक हिस्लॉप कॉलेजात फक्त प्रॉटेस्टंट पंथीय ख्रिस्त्यांनाच प्रवेश असावा. सेंट फान्सिस डिसेल्समध्ये फक्त कॅथॉलिकांना, परंतु या कॉलेजांमधील 90 टक्के विद्यार्थी त्यांच्या संप्रदायांच्या बाहेरचे असतात. त्यांना "अल्पसंख्यक संस्था' का मानायचे? केवळ मालकीच्या आधारावर? हे योग्य नाही. सर्वसाधारण संस्थांप्रमाणे तेथेही नियम लागू असले पाहिजेत. तेथेही एस. सी., एस. टी. यांच्यासाठी आरक्षण असले पाहिजे. केवळ विद्यार्थ्यांच्या बाबतीतच नाही, तर सर्व नियुक्त्यांच्या बाबतीतही. या महाविद्यालयाचा प्राचार्य ख्रिस्तीच का असावा?
दांभिकपणा : अलीकडे ख्रिस्ती चर्चेस, दलित ख्रिश्चनांना अन्य दलितांप्रमाणे सुविधा मागत आहेत. या मागणीने, माझ्या मते, या धर्मसंस्था आपल्याच धर्माचा अपमान करीत आहेत. जे जुन्या काळात अस्पृश्यतेच्या दुष्ट रूढीचे बळी ठरले होते, त्यांच्याकरिता "दलित' शब्द प्रचलित आहे. गांधीजी त्यांना "हरिजन' म्हणत. आता त्यांना "दलित' शब्द अधिक पसंत आहे. हिंदू समाजात अस्पृश्यतेची दुष्ट रूढी होती. अनेक समाजसुधारकांच्या आणि समाजसंघटकांच्या प्रयत्नांनी ती जवळ जवळ समाप्त झाली आहे. कायदाही अस्पृश्यतेच्या विरोधात ठामपणे उभा आहे. त्यांना काही काळपर्यंत इतरांच्या बरोबर येण्यासाठी काही सोयी, काही सुविधा आवश्यक होत्या. गेल्या 60 वर्षांपासून त्या त्यांना प्राप्त आहेत. त्यांचे फायदेही दृग्गोचर आहेत, पण ख्रिस्त्यांमध्ये "दलित' केव्हापासून शिरलेत? कोणत्या ख्रिस्ती संप्रदायाची किंवा पंथाची जातिव्यवस्थेला मान्यता आहे? हिंदू समाजातील या अनिष्ट प्रथेवर आघात करूनच, तर या समाजातून लोकांचे घाऊक धर्मांतर करण्यात आले. त्यांना समान वागणुकीचे आश्वासन देण्यात आले. मग, ख्रिस्त्यांमधील सवर्ण लोक त्यांना बरोबरीने का वागवीत नाहीत? ते ख्रिस्ती बनण्यापूर्वी "दलित' होते. ख्रिस्ती बनल्यानंतरही "दलित'च कसे राहिले? ख्रिस्ती चर्चने आणि विशेषत: ज्या कॅथॉलिक कौन्सिलने, दलित ख्रिस्त्यांच्या मागण्यांचा, आपल्या ठरावात पाठपुरावा केला आहे, याचे उत्तर दिले पाहिजे. ख्रिस्त्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब नक्कीच असतील. त्यांना खरेच काही सुविधा मिळाल्या पाहिजेतच. तेव्हा आवश्यकता ही आहे की, यच्चयावत् ख्रिस्ती संस्थांनी आरक्षणाचा आणि तसेच अन्य सुविधांचा निकष आर्थिक स्तर ठरविण्यासाठी मागणी केली पाहिजे. जन्माने येणारे दलितत्व हा आधार राहू शकत नाही. तो निकष मानायचा असेल, तर पोपपासून व प्रॉटेस्टंट बिशपपर्यंत सर्व ख्रिस्ती संप्रदायांच्या धर्मनेत्यांनी आणि धर्मपंडितांनी एकमुखाने सांगावे की, ""होय, आम्ही जन्माने येणारी जात मानतो; म्हणून जातीच्या आधारावर आम्हाला सोयी-सवलती व आरक्षणे हवी आहेत.'' या घोषणेत, निदान प्रामाणिकपणा तरी दिसेल. एकीकडे, जन्माने येणारी जातिव्यवस्था मानली जाते म्हणून हिंदू धर्म व हिंदू समाज यांच्यावर टीकेचे आसूड ओढायचे आणि दुसरीकडे त्याच आधारावर मतलबी मागण्या करायच्या, हा दांभिकपणा आहे. राजकारण्यांना दांभिकपणाबद्दल सामान्यत: कोणी वेठीस धरणार नाही. उक्ती एक आणि कृती दुसरी, हे त्या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे, पण धर्माच्या, अध्यात्माच्या, पारलौकिक कल्याणाच्या आणि नैतिकतेच्या गोष्टी करणाऱ्यांनी असला दांभिकपणा अंगीकारू नये. असला दांभिकपणा त्यांचे सारे वैशिष्ट्यच समाप्त करील.
कॅथॉलिकांची संख्या साऱ्या जगात अधिक आहे. त्यांनी नव्या चांगल्या परंपरा पाडल्या पाहिजेत. त्यामुळेच ते आपल्या धर्माचे सच्चे संवाहक बनतील आणि आपल्या अभिधानातील "कॅथॉलिक' या शब्दाच्या अर्थाप्रमाणे त्यांची धोरणे व आचरण राहील, तर ते केवळ भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या एकात्मतेचे ते पुरोधा बनतील. खऱ्या अर्थाने भारतीय बनतील. जैन आणि बौद्धांप्रमाणे समान सांस्कृतिक मूल्यांचे वारसदार बनतील. खऱ्या अर्थाने "कॅथॉलिक' म्हणजे उदारमनस्क व समावेशक बनतील. इतर संप्रदायही मग त्यांचे अनुकरण करतील.
***