Thursday, February 25, 2010

प्रेरानेवर आघात

राजस्थान शासनाने शैक्षणिक अभ्यासक्रमातून गाळण्यास सांगितलेला काही भाग पुढीलप्रमाणे
इयत्ता 9 वीचे "सामाजिक विज्ञान'
पहिल्या धड्यातील "वैदिक सभ्यता विश्व की प्राचीनतम... सभ्यता है', हा परिच्छेद गाळावा.
सातव्या धड्यातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे लिखाण गाळावे.
आठव्या धड्यातील "प्राचीन भारतीय आर्थिक चिंतन' हा भाग गाळावा.
इयत्ता 10 वीचे "संस्कृत' या विषयाचे पुस्तक
"स्वराष्ट्रम्‌।' हा 4 था धडा पूर्ण गाळण्यात यावा.
"वीर सावरकर।' हा 11 वा धडा संपूर्ण वगळावा.
"कुंभमेळा।' हा 12 वा धडा वगळण्यात यावा.
ई "अपठितावबोधनम्‌।' मधील "संघे शक्तिः कलौयुगे' (अर्थ ः कलियुगात संघशक्ती महत्त्वाची आहे.) हे वाक्य धड्यात जिथे जिथे असेल, तेथून ते काढावे.
"पत्रलेखनम्‌।' या भागातील "भारती संस्कृतपत्रिका' ऐवजी "स्वरमंगला संस्कृतपत्रिका' असे म्हणावे.
"शब्दाधारितवाक्यानां निर्माणम्‌' यामधील "लक्ष्मणः रामस्य भ्राता।' (अर्थ ः लक्ष्मण हा रामाचा भाऊ आहे.) याऐवजी "श्यामाः रमेशस्य भ्राता।' (अर्थ श्याम हा रमेशचा भाऊ आहे) असे वाचावे.
इयत्ता 11 वीचे "संस्कृत' या विषयाचे पुस्तक
"भरतस्य मोहः।' हा संपूर्ण धडा गाळावा.
"वेदोपदेशः।' हा संपूर्ण धडा गाळावा.
"संघे शक्तीः' असेल तिथे "संगठने शक्तिः' म्हटले जावे.
"चंद्रगुप्त' हा 13 वा धडा पूर्ण गाळावा.
"उत्तिष्ठत जाग्रत।' (अर्थ ः ऊठ, जागा हो!) हा 14 वा धडा पूर्ण गाळावा.
वरील प्रमाणेच रामायण, वाल्मिकी ऋषी आणि संस्कृत भाषा यांचे महत्त्व सांगणारी वाक्ये काही पाठांतून वगळण्याचा आदेश आहे.
इयत्ता 11 वीचे "राजनीती विज्ञान' या विषयाचे पुस्तक
7 व्या धड्यातील क्रांतिकारकांच्या साहसाच्या संदर्भातील वाक्ये गाळण्यास सांगितले आहे.
11 व्या धड्यातील "विनायक दामोदर
सावरकर' या नावाच्या अंतर्गत जे काही असेल, ते सर्व गाळावे.
***

खरा ख्रिस्ती

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात एक ख्रिस्तानुयायी "फादर' दासबोध अभ्यास वर्गासाठी शिवथर घळीत येऊन आठ-दहा दिवस राहिले होते. फादर मायकेल घोन्सालविस हे त्यांचे नाव. त्यांना संक्षेपाने "मायकल जी' असे संबोधले जाते. या वर्गातील वातावरण, शिवथर घळीचा इतिहास व परिसर, दासबोधातील जीवनविचार आणि एकूणच हिंदू तत्त्वज्ञानाचा आवाका यांनी ते अतिशय प्रभावित झाले. समरस होऊन गेले. "फादर' असल्यामुळे ख्रिस्ती मताचा त्यांचा अभ्यास अर्थात आहेच. हिंदू आणि ख्रिस्ती अशा दोन विचारांचा तुलनात्मक अभ्यास ते सहज करू शकले.
आपण हिंदू समाजातील माणसे. आपल्याला आपलाच धर्मविचार किंवा जीवनविषयक तत्त्वज्ञान यांची नीटशी ओळख नसते, तिथे तुलनात्मक चिंतन आपण काय करणार? आपण तरुणपणी तत्त्वज्ञान तर समजून घेत नाहीच, पण जेवढ्या प्रकाराने आपल्या समाजाचे दोष काढता येतील आणि त्याचा तेजोभंग करता येईल, तेवढे सारे प्रकार अवलंबितो. आपला धर्म आपल्याला वायफळ, भ्रांत समजुतीच्या एखाद्य़ा गाठोड्यासारखा वाटू लागतो. जेवढ्या लवकर या धर्माला व संस्कृतीला मूठमाती मिळेल तेवढे आधुनिक प्रगतीसाठी आपले मन मुक्त होईल, असे तारस्वराने सांगणारे महाभागही आपल्यात आहेत. हिंदू समाजात जन्म घेतला म्हणून बिचारे शरमिंदे असतात! कत्येक गरम रक्ताचे असतात ते, जे, जुने आहे त्या सगळ्यांची होळी करण्याची आक्रस्ताळी भाषा वापरतात. ख्रिस्ती धर्माची स्तुतिस्तोत्रे तर अनेकजण गातात. भूतदया, करूणा, समानता, सोशिकपणा, सोपेपणा इ. अनेक "ख्रिस्ती' सदगुणांचा उल्लेख वारंवार त्यांच्या बोलण्यात येतो. आपल्या समाजातील उपेक्षित बांधवांना मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली, तरी त्याचे त्यांना काही वाटत नाही.
असे जे बंधू आहेत, त्यांच्यासाठी मायकेल जीचा अनुभव मोठा बोधप्रद ठरेल. घळीवरील अभ्यास वर्गानंतर मायकेल जी यांनी हिंदू व ख्रिस्ती मतांचे अनेक अंगांनी सखोल तुलनात्मक चिंतन केले. आपले विचार ते व्यक्त करू लागले. ख्रिस्त्यांनी आपल्या इतर मतांसंबंधीच्या भूमिकेत सहिष्णुता, उदारता व गुणग्राहकता आणली पाहिजे, असे प्रतिपादन करू लागले. फादर मायकेल जी यांचे मराठी भाषेचे ज्ञान चांगले. त्यांनी वसईच्या "नम्रता' मासिकासाठी "ख्रिस्ती दृष्टिकोनातून गणपती दैवत' या मथळ्याचा एक लेख लिहिला, तो त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाला.
खळबळजनक लेख
या लेखात लेखकाने असे सूचित केले आहे की, ख्रिस्ती मतानुयायांनी संकुचित, एकांगी आणि असहिष्णू न राहता विविध मूर्तीतील देवत्वाच्या संकल्पनेबद्दल सहिष्णु राहावे आणि त्यातील सत्य ध्यानात घेऊन ख्रिस्ती पंथात देखील ते ग्राह्य मानावे. नमुन्यादाखल त्यांचा हा एक अभिप्राय पाहा.
""विवेकानंदांची उदार मनोवृत्ती पाहिल्यावर मला गेल्या शतकातील ख्रिस्ती धर्मातील इन्क्विझिशन पद्धती आठवते. ख्रिस्तावरचीच श्रद्धा, पण रोमचे अधिकारी म्हणतील त्याच शब्दात व्यक्त न करणारांचा छळ करणारी ती इन्क्विझिशन कोर्टे कुठे आणि हजारो धर्मपंथांचे स्वागत करणारे विवेकानंद कुठे!'' सर्व देवता ही निराकार ईश्वराची केवळ प्रतीके आहेत, असे म्हटल्यावर माझ्यासारखा ख्रिस्ती माणूस गणपतीच्या मूर्तीसमोर बसून परमात्म्याचे ध्यान फार सुंदर करू शकेल. जोपर्यत परमात्म्याच्या ध्यानाचे ते एक साधन म्हणून मी मानतो, तोवर ख्रिस्ती धर्मपंथाची देखील काही अडचण नसावी. अशाने माझी ख्रिस्तावरील भक्ती कमी न होता उलट वाढेल. हे ख्रिस्ताचेच एक रूप असे मी मानीन. कारण संत पॉलने दुसऱ्या शब्दात त्याला "मंडळींचा पति' म्हटले आहे. तेव्हा गणपती हे ख्रिस्तांचेचरूप मानून मी त्याला नमस्कार करायला हरकत कुठे आहे? पण बरेच ख्रिस्ती लोक ख्रिस्ताचे वैश्विक रूप स्वीकारावयास तयार नाहीत. त्यांना तो इस्त्रायली येशूच हवा आहे, पण असा आग्रह धरण्याने ख्रिस्ती लोक आपली आध्यात्मिक दिवाळखोरीच प्रकट करतात.''
प्रतिक्रिया
ख्रिस्ती समाजाच्या विचारांना एक नवी व्यापक दिशा दाखविणाऱ्या या लेखाची प्रतिक्रिया ख्रिस्ती समाजात काय झाली? किंवा नंतर ""सज्जनगड' मासिकात "आम्ही ख्रिस्ती देखील हिंदूच आहोत' ही जी भूमिका त्यांनी मांडली, तिचा परिणाम काय झाला? परिणाम असा झाला की, वसईतून ख्रिस्ती मिशनऱ्यांनी त्यांची उचलबांगडी केली व चुळणे या ठाणे जिल्ह्यातील आडगावी त्यांना काम करावयास सांगितले.
(मुक्काम चुळणे, पोस्ट वसई रोड, जि. ठाणे पिन- 401202) तेथे "फातिमा माता मंदिरा'त ते असतात. त्यांचे एक पत्र मी पाहिले. चिंचवडच्या एका समर्थभक्त मित्राला आलेले. पत्रावर "श्रीअभिषिक्ताय नम:' असे लिहिलेले असते. आपण श्रीगणेशाय नम: लिहितो तसे. स्वत:ला ते "अभिषिक्तानंद' म्हणवितात. अभिषिक्त म्हणजे येशू ख्रिस्त!
वसईतून हकालपट्टी होण्यावरच थांबले नाही. त्यांच्या लेखांची कात्रणे अनुवादासहित थेट रोमपर्यंत रवाना झाली. रोमने या कागाळीची दखल घेतली आणि "शो कॉज नोटीस'सारखी एक प्रश्नावली रोमहून मायकेल जी यांच्याकडे येऊन थडकली. मला असे कळले आहे की, या प्रश्नावलीला एक दहापानी उत्तर मायकेल जी यांनी तयार केले आहे. यात आपल्या भूमिकेचे समर्थन त्यांनी केले असून, ख्रिस्ती पंथाने उदार होण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. या निवेदनाचा उपयोग बहुधा होणार नाही आणि संभवत: चर्चमधून त्यांची हकालपट्टी होईल! ख्रिस्ती पंथाचे व मिशनऱ्यांच्या मतलबी सेवेचे ऊठसूट कौतुक करणाऱ्यांना मायकेल जी यांचाच आणखी एक अनुभव सांगण्यासारखा आहे. हिंदुस्थानातील ख्रिश्चनांच्या प्रतिगामित्वावर त्यामुळे झगझगीत प्रकाश पडतो.
ख्रिस्ती लोकात अशी पद्धत रूढ आहे की, " गुड फ्रायडे'ला धर्मगुरूने शिष्याच्या पायावर पाणी घालावे, ते धुवावे. येशूने तेच केले होते. जीवनाच्या अंतिम समयी केलेली ती सेवा होती. स्वामी विवेकानंदांनी महासमाधी घेण्याच्या दोनच दिवस आधी (2 जुलै 1902) असाच प्रसंग घडला होता. भगिनी निवेदिता यांना त्यांनी स्वहस्ते मोठ्या प्रेमाने जेवण वाढले होते. त्यांच्या हातावर पाणी घातले होते आणि टॉवेलने त्यांचे हात पुसले होते. ""स्वामीजी, जी सेवा मी करावयास हवी ती तुम्ही का करताहात?'' या निवेदितांच्या प्रश्नावर स्वामीजी उद्‌गारले होते, ""ख्रिस्ताने तर आपल्या शिष्याचे पाय धुतले!''
विवेकनंदांनाही एवढा उदात्त वाटलेला तो प्रसंग! त्याची स्मृती म्हणून धर्मगुरूने शिष्याचे पाय धुण्याची प्रथा ख्रिस्ती संप्रदायात चालू आहे, पण चमत्कार असा की, बिचाऱ्या महिलांना यात कुठेही स्थान नसते. मायकेल जी यांच्या उदार मनाला वाटले की, ज्यांचे पाय धुवावयाचे, त्यांत काही महिलांचाही समावेश करावा, त्या प्रमाणे त्यांनी केले, पण ख्रिस्ती लोकांना हा "धर्मभ्रष्टपणा' अजिबात मानवला नाही. सोहळा पाहण्यासाठी आलेल्या ख्रिस्ती लोकांपैकी अनेकांनी धर्मगुरूवर हल्ला चढविला! त्यांना मारायला ते उठले, हिंदू महिलांचा कळवळा ख्रिस्ती धर्मप्रचारक दाखवितात, पण ख्रिस्ती समाजात औदार्य ते आणीत नाहीत. समतेचा भाव ओतत नाहीत. अनाथ आणि गांजलेल्या हिंदू स्त्रियांना आश्रय देऊन त्यांना ख्रिस्ती कळपात ओढण्यापलीकडे कोणता विचार त्यांच्याजवळ असतो? काही तरुणांनी साहसपूर्वक मायकेल जी यांना संरक्षण दिले म्हणून केवळ तो प्रसंग निभावला.
मला म्हणायचे असे की, आपल्या हिंदू समाजात दोष शिरले असतील. वौदिक तत्त्वज्ञानाची विटंबना करणाऱ्या प्रथा रूढ झाल्या असतील, अध्यात्माच्या किंवा परमार्थाच्या मूळ शुद्ध प्रेरणा मलीन होऊन गेल्या असतील. भोंदू महाराजांचा सुळसुळाट झाला असेल, पण परधर्मात आपल्या बांधवांनी जाणे हा त्यावर तोडगा ठरू शकत नाही. त्या समाजातही अवगुण काय थोडे आहेत? असहिष्णुता आणि छळवाद काय कमी आहे? विधवांसाठी जे आश्रम (होम्स) ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केले, त्यातील महिलांच्या दुर्धर अवस्थेने स्वत: विवेकानंद कळवळून चिडून गेले होते. हिंदू समाजाने या दुर्दैवी महिलांना कुटुंब व्यवस्थेत सामावून घेतले पाहिजे, असा अभिप्राय आपल्या अखेरच्या दिवसात त्यांनी व्यक्त केला होता. तेव्हा, ज्या त्या समाजाने आपल्याच पद्धतीने अवगुण किंवा दोष निपटून काढले पाहिजेत व समाज एकरस, एकात्म आणि प्रगतीशील बनविला पाहिजे. हाच योग्य मार्ग आहे. गांधीजींनीही ख्रिस्ती मिशनऱ्यांना सांगितले होते की,""तुम्ही आमच्या सुधारणेची चिंता करू नका ते आमचे आम्ही पाहून घेऊ.''
या मायकेल जी प्रकरणावरून आणखी एक विचार मनात येतो तो हा की, आपल्या समाजातील दोषच केवळ पाहण्याची धडपड का? आपली बलस्थाने हेरून त्यांच्यावर भर देण्याचा व आत्मगौरवाची भावना हिंन्दूंच्या ठायी पुष्ट करण्याचा विधायक प्रयत्न का नाही? ज्याची जगण्याचीच पात्रता नाही, जो केवळ सडलेलाच आहे आणि जिजीवेच्छा जो पूर्णपणे हरवून बसला आहे, तो समाज अनादी काळापासून आजवर एक सातत्यपूर्ण जीवन कंठू शकेल, ही गोष्ट अशक्यच. ज्या अर्थी हा समाज जगला, वेळोवेळी त्याचे पुनरुत्थान झाले, थोर अवतारी व महात्मे या समाजाने जन्माला घातले, जीवनाच्या सर्व क्षेत्रांत दिग्गज इथे निपजले व ख्रिस्ती आणि इस्लामी आक्रमणांचे हालाहल पचवून आपले अमृतत्त्व त्याने सिद्ध केले, त्याअर्थी काही तरी अंगभूत गुणवत्ता या समाजात व या भूमीत असलीच पाहिजे. त्या गुणांचा शोध घेऊन त्यांचा पुन्हा उत्कर्ष घडवून आणला, तर आज त्याचे भासणारे विकृत दयनीय स्वरूप नाहीसे होऊन नव्या तेज:पुंज स्वरूपात तो उभा का होऊ शकणार नाही? घरच्या म्हातारीचा काळ बनणारांनी तसेच हताश वैफल्यग्रस्त होऊन गेलेल्यांनी या दृष्टीने परिस्थीतीकडे पाहावयास पाहिजे. परक्यांना आपले गुण दिसू शकतात. आपल्या श्रेष्ठ द्रष्ट्या पुरुषांचे द्रष्टेपण कळू शकते, पण आपण मात्र "उध्दरेदात्मनात्मानम्‌' हा प्राचीन महामंत्र विसरून आत्मनिंदेत मश्गुल होतो! आत्मसन्मानाची भावना तर माणसात आधी पाहिजे. कोणत्या मूल्यांसाठी आपले जीवन आहे, याचा विवेक सदैव पाहिजे. त्यासाठी प्राणपणाने झुंजण्याची वृत्ती पाहिजे. परक्यांकडे आपली बुद्धी गहाण टाकून हे करता येत नाही. आंधळया व मर्कटछाप परानुकरणाने काहीच साधत नाही. मानसिक दास्य, पराभूतता व परावलंबन यांनाच जन्म देते.
आपले बलस्थान
आज मायकेल जी यांचे अनुभव मी सांगितले याचे कारण एवढेच की, आपल्यापेक्षा अन्य समाज सुखी, प्रगतीशील व प्रगल्भ आहेत, हा अनेकांच्या मनातील भ्रम दूर व्हावा. कोणाच्या स्तुती-निंदेवर आपली महत्ता अवलंबून नसते. "स्वयमेव मृगेन्द्रता' हीच पुरुषार्थी वृत्ती समाज वा राष्ट्र या नात्याने जीवनात धारण करावी लागते. अनेक विचारवंतांच्या दृष्टीने आपले मुख्य बलस्थान आपल्या तत्त्वज्ञानाने दिलेल्या आणि हजारो सत्पुरुषांनी आचरून उद्‌घोषिलेल्या आपल्या जीवनदृष्टीत आहे. ही जीवनदृष्टी एकदा स्वीकारली व तद्‌नुसार जगण्याचा प्रयत्न केला, तर एकेका व्यक्तीपासून तो समस्त विश्वापर्यंत सर्वांच्या सुखी आणि विकासोन्मुख, तृप्त आणि धन्य जीवनाचा राजमार्ग दृष्टिपथात येतो. मात्र या जीवनदृष्टीची दोन्ही अंगे नीट आत्मसात केली पाहिजेत. पहिले अंग हे की, कोणीही व्यक्ती क्षुद्र नाही. उपेक्षणीय नाही. कारण तिच्यात भगवंत असतो. त्या व्यक्तीलाही हे ज्ञान व्हावे की मी क्षुद्र, क्षणभंगुर, सुख-दु:खाचे आगतिकपणे हेलकावे खाणारा जीव नाही, तर अविनाशी, शाश्र्वत चैतन्य हे माझे "स्वरूप' आहे. यालाच देहबुद्धीचा लोप आणि आत्मबुद्धीचा उदय असे आपल्या जीवन चिंतकांनी म्हटले आहे. देहबुद्धी क्षीण झाली की, इतरांची दु:खे दिसतात. त्यांच्यातील देवत्व जाणवते. त्यागभावना निर्माण होते. सोशिकता येते. क्षुद्र मानापमान गळून पडतात. सत्ता आणि संपत्ती यासाठी सर्व उन्नत जीवनमूल्ये पायदळी तुडविण्याचा उन्मत्तपणा स्पर्शही करीत नाही. समाजाचे जीवन आध्यात्मिकतेच्या भक्कम पायावर उभे होते. ओघानेच भौतिक सुस्थितीही समाजाला अवश्यमेव लाभते.
आणि दुसरे अंगही महत्त्वाचे आहे. जगात देवमाणसे असतात तसे प्रकृतीच्या अंगाने दानव ठरणारेही असतात. कितीही प्रयत्न केला, तरी त्यांची प्रकृती पालटत नाही. हे दानव सात्विक गुण आणि संस्कृती यांच्यावर आततायी आघात करतात. त्यांना ऐश्र्वर्य हवे असते. अमर्याद देहसुखाची अनावर अभिलाषा असते. हे यज्ञरूपी जीवनाचा विध्वंस करण्यास प्रवृत्त होतात. आतंक निर्माण करतात. नृशंस व्यवहार करतात. सुसंस्कृत व दिव्यत्वाची साधना करणाऱ्या समूहांचा प्रत्येक मानबिंदू विटंबितात, अशा आततायी आणि दानवी शक्तीला वेळीच ठेचण्याचे व त्यांचा उपद्रव रोखण्याचे अमोघ सामर्थ्यही समाजात पाहिजे. सज्जनांना निर्वेधपणे जगता येईल आणि आनंद साधना करता येईल, अशी भौतिक परिस्थिती राखणे हे थोर धर्मकार्य आपल्याकडे मानले गेले आहे, ते ईश्र्वरी कार्य आहे. सुखी व संपन्न समाजासाठी या जागृत, नित्यसिद्ध शक्तीची परम आवश्यकता असते. तशी ऐहिक रचना समाजाने करावयाची असते.
खरे प्रबोधन
मूलत: हा सगळा विचार हिंदू तत्त्वज्ञानाने सांगितला आहे. आपल्या इतिहासातील घटनात त्याची गुंफण झालेली आहे. या दुहेरी जीवनविचाराने आपल्याला अमरत्व प्रदान केले आहे. माणसाला वेळोवेळी याच विचाराने उंच उठविले आहे, परंतु या विचारापासून आपण दूर भरकटलो, तेव्हा आपल्याला दैन्यावस्थाही आलेली आहे. हे आज आपण जाणले पाहिजे. कोण पुढारी कसा वागतो, लोक कसे पैशाच्या व भोगाच्या मागे वेड्यासारखे धावत आहेत, हे आपण विषण्ण होऊन सांगतो, पण मुळाशी जात नाही. सत्तेषणा, लोकेषणा, वित्तेषणा, अनिर्बंध दुर्वासना, मत्सरग्रस्तता यावर माणूस व समाज कशी मात करू शकेल, हा मूळ प्रश्न आहे. केवळ ऐहिक विचाराने या प्रश्र्नाचे उत्तर मिळूच शकत नाही. अनेक पंथ, अनेक संप्रदाय, अनंत प्रकारची विविधता यांना सामावून घेणारा तत्त्वविचार कोणता व हे भगवंताने दिलेले वैभवशाली जीवन उद्‌ध्वस्त करणारा असहिष्णु दानवी विचार कोणता याची स्पष्ट जाण समाजात प्रसृत करणे म्हणजे खरे समाजप्रबोधन होय. असे प्रबोधन जो करीत असेल, तो समाजाचा हितकर्ता आणि रक्षणकर्ता या स्वरूपाच्या वैश्र्विक प्रबोधनाचे निहित सामर्थ्य ख्रिस्ती वा इस्लामी पंथांनी कधी प्रकट केले नाही. रक्तपात आणि शोषण केले. धमार्च्या क्षेत्रात जुलूम आणि वंचना याचे थौमान घातले. त्याला इतिहास साक्षी आहे. हिंदूचे हे अजोड बलस्थान आपण जाणले पाहिजे व संस्कृतिधारेतील अमृत सर्व बांधवांपर्यंत पोचविले पाहिजे. प्रथम स्वत: ते ग्रहण करावे लागेल हे सांगणे न लगे!
( 30 वर्षांपूर्वीचा हा लेख आजही प्रासंगिक आहे.)

... "कॅथॉलिक' बनावे

सर्व ख्रिस्ती संप्रदायांमध्ये, कॅथॉलिक चर्च अधिक कट्टर, अधिक जुलमी, अधिक असहिष्णू आणि अधिक मूलस्थितिवादी राहिलेले आहे. या चर्चची म्हणजे चर्च चालविणाऱ्या प्रमुखांची अशी वागणूक राहिल्यामुळेच तर, त्याविरुद्ध मार्टिन ल्यूथरला या चर्चविरुद्ध बंड करावे लागले. त्याने स्थापन केलेल्या पंथाचे "प्रॉटेस्टंट' हे नावच कॅथॉलिक चर्चच्या निषेधाचे द्योतक आहे.
नुकतीच "कॅथॉलिक कौन्सिल ऑफ इंडिया,' या ख्रिस्ती संप्रदायाच्या संस्थेची 10 वी सर्वसाधारण बैठक झाली. ती चार दिवस चालली. त्या बैठकीला, कॅथॉलिक चर्चच्या भारतातील 160 घटकसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तेथे पारित झालेल्या एका ठरावान्वये "राष्ट्रीय एकात्मता आणि भारतातील अन्य नागरिकांच्या शांततापूणर्ण सहजीवनासाठी' आपली प्रतिबद्धता प्रकट करण्यात आली. ही प्रतिबद्धता, प्रस्तावाच्या शब्दांमध्ये बुडून न जाता, ती प्रत्यक्षात उतरली, तर ती स्वातंत्र्योत्तर भारताच्या राष्ट्रजीवनातील फार मोठी उपलब्धी ठरेल, याविषयी शंका नको. "कॅथॉलिक' या विशेषणाचा अर्थ वैश्विक उदारता असा आहे. त्या अर्थाला साजेसेच हे वर्तन ठरेल. परंतु, कॅथॉलिक चर्चचा इतिहास आणि वर्तमानही, या प्रतिबद्धतेला अनुरूप आहे, असे मात्र म्हणता यावयाचे नाही.
भूतकाळ : मागच्या इतिहासातील कृष्णकारस्थाने उगाळीत बसण्यात अर्थ नाही. तथापि, एवढे सांगणे अप्रासंगिक होऊ नये की, सर्व ख्रिस्ती संप्रदायांमध्ये, कॅथॉलिक चर्च अधिक कट्टर, अधिक जुलमी, अधिक असहिष्णू आणि अधिक मूलस्थितिवादी राहिलेले आहे. या चर्चची म्हणजे चर्च चालविणाऱ्या प्रमुखांची अशी वागणूक राहिल्यामुळेच तर, त्याविरुद्ध मार्टिन ल्यूथरला या चर्चविरुद्ध बंड करावे लागले. त्याने स्थापन केलेल्या पंथाचे "प्रॉटेस्टंट' हे नावच कॅथॉलिक चर्चच्या निषेधाचे द्योतक आहे. ल्यूथरनंतर सुमारे शंभर वर्षांनंतर गॅलिलिओ झाला. त्याचा अपराध एवढाच होता की, तो सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्याभोवती फिरते, असे प्रतिपादित होता. हा धर्मद्रोह आहे, असे चर्चने ठरविले आणि त्याला तुरुंगात टाकून त्याचा इतका छळ केला की, त्याने आपले मत चूक असल्याचे कबूल केले, तेव्हा त्याची तुरुंगातून सुटका झाली. किती प्रॉटेस्टंट धर्मगुरूंना कॅथॉलिक चर्चने जिवंत जाळले, याचा सारा हिशेब प्रॉटेस्टंटांजवळ आहे.
वर्तमान : पण ही सारी "रानटी' मध्ययुगातील प्रकरणे आहेत. त्याबद्दल कॅथॉलिक चर्चच्या अलीकडच्या प्रमुखांनी म्हणजे पोपमहाशयांनी खेदही व्यक्त केला आहे. पण या 20 व्या व 21 व्या शतकातही, कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट पंथीय लोकांमध्ये सामंजस्य निर्माण झाले, असे दिसून येत नाही. मी, नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये 17 वर्षे प्राध्यापक होतो. हे कॉलेज, "चर्च ऑफ स्कॉटलंड' या प्रॉटेस्टंट चर्चमार्फत चालविले जाते. त्या काळात अनेक नव्या प्राध्यापकांची नियुक्ती झाली. काही वर्षे मी या निवड मंडळीचा एक सदस्यही होतो, पण एकाही कॅथॉलिकाला आमच्या कॉलेजमध्ये नोकरी मिळाल्याचे उदाहरण नाही. नागपूरचे सेंट फ्रान्सिस डिसेल्स कॉलेज कॅथॉलिकांकडून चालविले जाते. त्या कॉलेजमध्ये कधीतरी कुणा प्रॉटेस्टंटाला नोकरी मिळाली असेल, असे वाटत नाही. माझे हे विधान चूक असेल, तर मी आले शब्द माफीनाम्यासह परत घेईन. मी असे ठामपणे म्हणण्याचे कारण आहे. गोष्ट 2002 ची आहे. मी, तेव्हा, दिल्लीला रा. स्व. संघाचा प्रवक्ता म्हणून कार्यरत होतो. संघाच्या राष्ट्र जागरण अभियानाच्या दरम्यान अल्पसंख्यक आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष सरदार तरलोचन सिंग यांच्या घरी आम्ही गेलो होतो. शीख रिलिजन आणि शीख समाज यांच्यासंबंधी संघाची भूमिका, आम्ही त्यांना समजावून सांगितली. ते आम्हाला म्हणाले, ""हे तुम्ही अल्पसंख्यक आयोगासमोर सांगाल काय?'' आम्ही होकार दिला. त्याप्रमाणे बैठक ठरली. आयोगाचे संपूर्ण सदस्य उपस्थित होते. आम्ही आपले निवेदन इंग्रजी भाषेत लेखी स्वरूपात सादर केले होते. बहुतेक चर्चा इंग्रजीतच झाली. तेव्हा त्या आयोगाचे एक सदस्य श्री जॉन जोसेफ म्हणाले, ""आपण ख्रिस्ती धर्मगुरूंशीही बोलाल काय?'' आम्ही होकार दिला. त्याप्रमाणे त्यांनी दिल्लीच्या कॅथॉलिक चर्चच्या प्रमुखांशी संपर्क केला. त्यांच्या तीन अटी होत्या- 1. आम्ही प्रवक्ता वगैरे खालच्या दर्जाच्या संघ कार्यकर्त्याशी बोलणार नाही, सर्वोच्च व्यक्तीशीच बोलू. 2. आमच्याबरोबर प्रॉटेस्टंट असणार नाहीत आणि 3. बैठक चर्चच्या इमारतीतच होईल. आम्ही या सर्व अटी मान्य केल्या. मात्र, प्रॉटेस्टंटांबरोबर बसायचेही नाही, एवढी अस्पृश्यता हे चर्च का पाळत असते, याचा उलगडा काही झाला नाही. त्यानंतर सुमारे एक महिन्याने प्रॉटेस्टंटांच्या 27 उपसंप्रदायांचे 29 प्रतिनिधी नागपूरला संघाच्या मुख्य कार्यालयात आले होते. दीड-दोन तास त्यांच्याशीही चर्चा झाली. सर्वांनी आमच्याबरोबर कार्यालयातच भोजन केले. हे सांगण्याचा उद्देश हा की, जो पंथ आपल्या अभिधानात "कॅथॉलिक' हे व्यापक विशेषण वापरतो आणि ज्याला आपल्याच धर्माच्या अन्य पंथांविषयी एवढी अनुदारता आहे, तो अन्य धर्मांच्या बाबतीत सहिष्णू आणि शांततापूर्ण सहजीवनासाठी उत्सुक राहील काय?
कॅथॉलिकच तेवढे अनुदार आहेत आणि बाकीचे पंथ खूप उदार आहेत, असे मला सूचित करावयाचे नाही. अमेरिकेचे उदाहरण माझ्यासमोर आहे. अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिका. जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र. या राष्ट्रात, बहुसंख्या प्रॉटेस्टंटांची आहे. पण कॅथॉलिकही 24 टक्के आहेत. या राष्ट्राच्या गेल्या तीनशे-सव्वातीनशे वर्षांच्या इतिहासात, फक्त एकदाच एक कॅथॉलिक राष्ट्रपती बनू शकला, पण तोही आपला चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही. तीन वर्षांच्या आत त्याची हत्या झाली.
सेमेटिक : सारेच सेमेटिक पंथ संप्रदाय अनुदारतेने ग्रस्त आहेत. केवळ ख्रिस्तीच अनुदार आहेत असे नाही. मुसलमानातही भरपूर अनुदारता आहे. शिया, सुन्नी, अहमदिया हे स्वत:ला इस्लामीच मानतात; ते सारे कुराण शरीफवर विश्वास ठेवतात आणि पैगंबरसाहेबांचाही आदर करतात; पण परस्परांचा द्वेष करावयाला कमी करीत नाहीत. इराण व इराक यांमधील संघर्ष हा शिया व सुन्नी यांच्यातील संघर्ष असतो. अहमदियांना, तर पाकिस्तानात मुसलमानच मानले जात नाही! कारण हे की, ते महमदसाहेबांना अंतिम पैगंबर मानीत नाहीत! अन्य बाबतीत सर्व समान असताना, या एका बाबीवरून जे आपल्या बांधवांना परके ठरवितात, ते अन्य पंथसंप्रदायांच्या लोकांशी समानतेने व्यवहार करू शकतील? -हा सर्वात मोठा कळीचा प्रश्न आहे. आणि त्याचे ठाम सकारात्मक उत्तर अद्यापि प्राप्त झालेले नाही, पण आजचा आपला मुद्दा कॅथॉलिक पंथांच्या संदर्भात आहे. त्यांच्याशी झालेल्या वार्तालापात आम्ही एकच प्रश्न उपस्थित केला की, चर्चमध्ये न जाताही पापमुक्ती मिळू शकते काय? (Can there be salvation outside the Church also) आणि या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आम्हाला मिळू शकले नाही. हिस्लॉप कॉलेजमध्ये असताना माझ्यापेक्षा निदान दोन दशके वयाने ज्येष्ठ असलेल्या अत्यंत शांत स्वभावाच्या प्राध्यापकाने मला प्रश्न केला होता की, ""मी आरएसएसचा सदस्य होऊ शकतो काय? त्यासाठी मी काय केले पाहिजे?'' मी उत्तर दिले होते की, ""आपणास आपले चर्च सोडण्याची जरुरी नाही. आपण बायबलवर श्रद्धा ठेवू शकता, परंतु आपणास हे मान्य करावे लागेल की, इतरही पंथ आणि विश्वासही, आपल्या पंथासारखेच योग्य असू शकतात.'' माझे वाक्य, पन्नास- पंचावन्न वर्षांनंतर आजही माझ्या स्मरणात आहे. मी म्हटले होते, Sir, You have to accept the validity of other faiths and religions. ते प्रामाणिक होते. ते म्हणाले, ""मी हे मान्य करू शकत नाही. हे मान्य केले तर मी आपल्या धर्माचा प्रचार कसा करू शकेन?''
अनिवार्यता : भारताच्या एकात्मतेसंबंधी आणि शांतिपूर्ण सहजीवनासाठी कॅथॉलिक चर्चची खरेच प्रतिबद्धता असेल, तर रोमची गोष्ट सोडा, भारतातील कॅथॉलिक चर्चच्या प्रमुखांनी असे नि:संदिग्ध विधान केले पाहिजे की, ईश्वराच्या उपासनेचे, ईश्वरप्राप्तीचे अन्यही मार्ग असू शकतात. आहे या चर्चच्या प्रमुखांची तयारी? एकात्मतेसाठी ही अगदी मूलभूत आवश्यकता आहे. या भारतात हिंदू बहुसंख्य आहेत, म्हणूनच एवढी उदारता, भारताच्या संविधानात आहे. आपल्या घटनेच्या 25 व्या कलमात प्रत्येकाला आपला वेगळा पंथ मानण्याचा (प्रोफेस), त्याप्रमाणे उपासना करण्याचा (प्रॅक्टिस), आणि प्रचार करण्याचा (प्रॉपॅगेट) मौलिक अधिकार दिला आहे. माझा व्यक्तिश: या व्यापक अधिकाराला विरोध आहे. ज्यांना इतर पंथ व आस्था यासंबंधीची वैधता मान्य नाही, त्यांना आपल्या असहिष्णू मताचा प्रचार करण्याचा अधिकार असू नये, असे मला वाटते. कारण, ते असहिष्णुतेचाच प्रचार करणार. आमची अशी इच्छा आहे की, सारेच पंथ, संप्रदाय, रिलिजन, मजहब खऱ्या अर्थाने "भारतीय' बनावेत; आणि त्यासाठी सर्व पंथसंप्रदायांच्या अस्तित्वाला मान्यता देणे अनिवार्य आहे. भारतातीलच ख्रिस्ती व इस्लामी संप्रदाय हे महत्‌ कार्य करू शकतात. कारण, नवे स्वीकारण्याची इथली फार प्राचीन परंपरा आहे.
उदारता : परमेश्वराची अनेक रूपे व अनेक नावे असू शकतात, ही इथली फार प्राचीन काळापासूनची मान्यता आहे. ऋग्वेदात इंद्र, वरुण आणि अग्नी या प्रधान देवता होत्या. नंतरच्या काळात ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिमूर्ती आल्या. त्यानंतरही राम, कृष्ण अशा अवतारी महापुरुषांना देवत्व प्राप्त झाले. विठोबा, खंडोबा, बालाजी अशी नवी दैवते आली. साई महाराज, गजानन महाराज, संतोषी माता ही आणखी अलीकडची दैवते आहेत. त्यांची भव्य, समृद्ध मंदिरेही उभी झाली. या मंदिरांच्या उभारणीला कुणाचाही आक्षेप नाही. अट एकच आहे की, जुने मंदिर उद्‌ध्वस्त करून आपले नवे मंदिर उभे करावयाचे नाही. बाबराला हे जमले नाही म्हणून अयोध्येत मंदिराच्या जागी मशीद बांधण्याचे दुष्कृत्य त्याच्या हातून घडले. वस्तुस्थिती ही आहे की, शरयूच्या किनाऱ्यावर मशीद बांधण्यासाठी भरपूर जागा होती, पण बाबराच्या सेनापतीला मशीद बांधायचीच नव्हती. हिंदूंचे मंदिर आक्रमायचे होते. औरंगजेबानेही त्याचेच अनुकरण करीत काशी व मथुरेची मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्या. गझनीच्या महमदानेही सोमनाथला तेच केले. अत्याचारांची, ही दृष्टीला बोचणारी आणि अंत:करणाला पिळवटून काढणारी प्रात्यक्षिके संपली पाहिजेत. भारतातील मुसलमानांचे हे आद्य कर्तव्य आहे. राजकारणाच्या आणि मतपेढीच्या मर्यादेच्या बाहेरचे हे प्रश्न आहेत.
अंतरंग : "कॅथॉलिक कौन्सिल ऑफ इंडिया'ने आपल्या एका प्रस्तावात "घरवापसी'ला (रिकॉन्व्हर्शन) विरोध केला आहे. त्यांनी मुख्यत: ओरिसा, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांचा निर्देश केला आहे. मला बरे वाटले. मिशनऱ्यांना, घरवापसीची आच लागत आहे, ही चांगली गोष्ट आहे. धर्मान्तराचा एकदिक्‌ मार्गच का असावा? जे ख्रिस्ती झाले, खरे म्हणजे ज्यांना ख्रिस्ती करण्यात आले, त्यांना परत स्वधर्मात का आणले जाऊ नये? यात व्यक्तीच्या "धर्मस्वातंत्र्या'वर कसा काय घाला पडतो? केवळ कॅथॉलिकच नव्हे, तर सर्वच चर्चेसने विचार केला पाहिजे की, ओरिसा आणि छत्तीसगड पूर्वी ज्या प्रांतात अंतर्भूत होते तो मध्यप्रदेश, यातील सरकारांनी "लालूच, कपट आणि जबरदस्ती' याद्वारे धर्मांतर करण्यावर बंदी का घातली? ही सरकारे भाजपाची सरकारे नव्हती. "सेक्युलर' कॉंग्रेसची सरकारे होती. या सरकारांनी अवैध धर्मपरिवर्तनाला प्रतिबंध करणारा, कायदा केल्याबद्दल, त्या कायद्याच्या विरोधात कुणी न्यायालयात धाव घेतली होती? चर्चेसनीच ना! का? लालूच, लबाडी व जबरदस्ती हे धर्मप्रसाराचे मार्ग चर्चेसला मान्य आहेत, म्हणूनच की नाही! हे पापलिप्त मार्ग या चर्चेसना योग्य वाटत असलेच पाहिजेत आणि आजही या वृत्तीत फारसा फरक पडला असेल, असे वाटत नाही. म्हणून तर, या कायद्याचे मनापासून स्वागत करण्याऐवजी चर्चची मंडळी न्यायालयात गेली. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने साफ सांगितले की, "धर्मस्वातंत्र्याचा हक्क' म्हणजे धर्मपरिवर्तन करण्याचा हक्क नव्हे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय कॅथॉलिक चर्चला मान्य आहे की नाही, हे त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे.
हित-अहित : हे खरेच आहे की, धर्म, उपासना, श्रद्धा हे वैयक्तिक पातळीवरचे विषय आहेत. पण चर्चेसने सामूहिक धर्मपरिवर्तन केले आहे. कायद्याची ऐसीतैसी करून हे अपप्रकार करण्यात धन्यता मानली आहे. स्टेन्सची हत्या, या अपप्रकारामुळे घडली. चर्चच्या उद्दंड कारवायांना लक्ष्मणानंद सरस्वती विरोध करीत होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. आताचा काळ, ना बाबर- औरंगजेबाचा आहे, ना सेंट झेवियरचा. आता अत्याचाराची प्रतिक्रिया उमटणार आहे. ओरिसात ज्या निरपराध ख्रिस्ती बांधवांचे विस्थापन झाले आहे, त्यांचे पुनर्वसन झालेच पाहिजे. कॅथॉलिक कौन्सिलच्या ठरावाच्या या भागाचे कुणीही समजदार माणूस समर्थनच करील. परंतु, कॅथॉलिक चर्चने, त्यांच्या त्या कारवायाही थांबविल्या पाहिजेत. आपल्या कळपाची संख्या वाढविणे हे एका काळी वैध मानले गेले असेलही, पण आता ते चालायचे नाही. धर्मपरिवर्तनाची फार मोठी किंमत या आपल्या हिंदुस्थानाने दिली आहे. आपल्या पवित्र मातृभूमीचे तुकडे यामुळेच झाले. यामुळेच काश्मीरच्या खोऱ्यातील पाच टक्के हिंदूंना देशोधडीला लागावे लागले. यामुळेच नागालॅंडमध्ये भारत सरकारचे नाममात्र अस्तित्व आहे. तेथे म्हणे "युद्धबंदी' (सीज्‌ फायर) आहे! युद्धबंदी कोणात असते? दोन देशांमध्येच की नाही? नागालॅंड वेगळा देश आहे काय? वेगळे राष्ट्र आहे काय? तेथे कोणत्या चर्चचे वर्चस्व आहे, याची मला कल्पना नाही, पण कुणाचेही वर्चस्व असो, त्यांच्या फूटपाड्या कारवाया सहन करण्याची जनतेची मानसिकता नाही. हे ख्रिस्ती चर्चेस जेवढ्या लवकर समजून घेतील, तेवढे त्यांच्या हिताचे आहे.
अल्पसंख्य? : सर्व ख्रिस्ती आणि इस्लामी संघटनांना माझा प्रश्न आहे की, आपण स्वत:ला अल्पसंख्यक का समजता? बहुसंख्यकांना जे अधिकार आहेत, त्यातल्या कोणत्या अधिकारापासून आपणांस वंचित ठेवण्यात आले आहे? वस्तुत:, जे अधिकार बहुसंख्यकांना नाही, ते ज्या अल्पसंख्यकांना, हिंदूंच्या उदारतेमुळे म्हणून प्राप्त आहेत, ते आम्हाला नको, असे या धर्मसंस्थांना म्हणता आले पाहिजे. घटनेच्या 30 व्या कलमात अल्पसंख्यकांना आपल्या शिक्षणसंस्था स्थापन करण्याचा अनिर्बंध अधिकार दिला आहे. या तथाकथित अल्पसंख्यकांना आपले वेगळे अल्पसंख्यकत्व टिकविण्याला मोकळीक असावी, यासाठी या कलमाचा अंतर्भाव घटनेत केला असावा, असे मला वाटते.
मग त्यांनी, आपले कार्यक्षेत्र आपल्या पंथाच्या लोकांपर्यंतच मर्यादित ठेवायला हवे. उदाहरणार्थ, स्थानिक हिस्लॉप कॉलेजात फक्त प्रॉटेस्टंट पंथीय ख्रिस्त्यांनाच प्रवेश असावा. सेंट फान्सिस डिसेल्समध्ये फक्त कॅथॉलिकांना, परंतु या कॉलेजांमधील 90 टक्के विद्यार्थी त्यांच्या संप्रदायांच्या बाहेरचे असतात. त्यांना "अल्पसंख्यक संस्था' का मानायचे? केवळ मालकीच्या आधारावर? हे योग्य नाही. सर्वसाधारण संस्थांप्रमाणे तेथेही नियम लागू असले पाहिजेत. तेथेही एस. सी., एस. टी. यांच्यासाठी आरक्षण असले पाहिजे. केवळ विद्यार्थ्यांच्या बाबतीतच नाही, तर सर्व नियुक्त्यांच्या बाबतीतही. या महाविद्यालयाचा प्राचार्य ख्रिस्तीच का असावा?
दांभिकपणा : अलीकडे ख्रिस्ती चर्चेस, दलित ख्रिश्चनांना अन्य दलितांप्रमाणे सुविधा मागत आहेत. या मागणीने, माझ्या मते, या धर्मसंस्था आपल्याच धर्माचा अपमान करीत आहेत. जे जुन्या काळात अस्पृश्यतेच्या दुष्ट रूढीचे बळी ठरले होते, त्यांच्याकरिता "दलित' शब्द प्रचलित आहे. गांधीजी त्यांना "हरिजन' म्हणत. आता त्यांना "दलित' शब्द अधिक पसंत आहे. हिंदू समाजात अस्पृश्यतेची दुष्ट रूढी होती. अनेक समाजसुधारकांच्या आणि समाजसंघटकांच्या प्रयत्नांनी ती जवळ जवळ समाप्त झाली आहे. कायदाही अस्पृश्यतेच्या विरोधात ठामपणे उभा आहे. त्यांना काही काळपर्यंत इतरांच्या बरोबर येण्यासाठी काही सोयी, काही सुविधा आवश्यक होत्या. गेल्या 60 वर्षांपासून त्या त्यांना प्राप्त आहेत. त्यांचे फायदेही दृग्गोचर आहेत, पण ख्रिस्त्यांमध्ये "दलित' केव्हापासून शिरलेत? कोणत्या ख्रिस्ती संप्रदायाची किंवा पंथाची जातिव्यवस्थेला मान्यता आहे? हिंदू समाजातील या अनिष्ट प्रथेवर आघात करूनच, तर या समाजातून लोकांचे घाऊक धर्मांतर करण्यात आले. त्यांना समान वागणुकीचे आश्वासन देण्यात आले. मग, ख्रिस्त्यांमधील सवर्ण लोक त्यांना बरोबरीने का वागवीत नाहीत? ते ख्रिस्ती बनण्यापूर्वी "दलित' होते. ख्रिस्ती बनल्यानंतरही "दलित'च कसे राहिले? ख्रिस्ती चर्चने आणि विशेषत: ज्या कॅथॉलिक कौन्सिलने, दलित ख्रिस्त्यांच्या मागण्यांचा, आपल्या ठरावात पाठपुरावा केला आहे, याचे उत्तर दिले पाहिजे. ख्रिस्त्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब नक्कीच असतील. त्यांना खरेच काही सुविधा मिळाल्या पाहिजेतच. तेव्हा आवश्यकता ही आहे की, यच्चयावत्‌ ख्रिस्ती संस्थांनी आरक्षणाचा आणि तसेच अन्य सुविधांचा निकष आर्थिक स्तर ठरविण्यासाठी मागणी केली पाहिजे. जन्माने येणारे दलितत्व हा आधार राहू शकत नाही. तो निकष मानायचा असेल, तर पोपपासून व प्रॉटेस्टंट बिशपपर्यंत सर्व ख्रिस्ती संप्रदायांच्या धर्मनेत्यांनी आणि धर्मपंडितांनी एकमुखाने सांगावे की, ""होय, आम्ही जन्माने येणारी जात मानतो; म्हणून जातीच्या आधारावर आम्हाला सोयी-सवलती व आरक्षणे हवी आहेत.'' या घोषणेत, निदान प्रामाणिकपणा तरी दिसेल. एकीकडे, जन्माने येणारी जातिव्यवस्था मानली जाते म्हणून हिंदू धर्म व हिंदू समाज यांच्यावर टीकेचे आसूड ओढायचे आणि दुसरीकडे त्याच आधारावर मतलबी मागण्या करायच्या, हा दांभिकपणा आहे. राजकारण्यांना दांभिकपणाबद्दल सामान्यत: कोणी वेठीस धरणार नाही. उक्ती एक आणि कृती दुसरी, हे त्या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे, पण धर्माच्या, अध्यात्माच्या, पारलौकिक कल्याणाच्या आणि नैतिकतेच्या गोष्टी करणाऱ्यांनी असला दांभिकपणा अंगीकारू नये. असला दांभिकपणा त्यांचे सारे वैशिष्ट्यच समाप्त करील.
कॅथॉलिकांची संख्या साऱ्या जगात अधिक आहे. त्यांनी नव्या चांगल्या परंपरा पाडल्या पाहिजेत. त्यामुळेच ते आपल्या धर्माचे सच्चे संवाहक बनतील आणि आपल्या अभिधानातील "कॅथॉलिक' या शब्दाच्या अर्थाप्रमाणे त्यांची धोरणे व आचरण राहील, तर ते केवळ भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या एकात्मतेचे ते पुरोधा बनतील. खऱ्या अर्थाने भारतीय बनतील. जैन आणि बौद्धांप्रमाणे समान सांस्कृतिक मूल्यांचे वारसदार बनतील. खऱ्या अर्थाने "कॅथॉलिक' म्हणजे उदारमनस्क व समावेशक बनतील. इतर संप्रदायही मग त्यांचे अनुकरण करतील.
***

कृताद्न्यता २

अरुण करमरकर, ठाणे
डोळ्यांनी बघतो, ध्वनि परिसतो कानीं, पदी चालतो,
जिव्हेने रस चाखितो मधुरही वाचे आम्ही बोलतो!
हाताने बहु साल काम करितो, विश्रांतीही घ्यावया
घेतो झोपे सुखे, फिरूनि उठतो ही ईश्वराची दया।।
अगदी बालवाडीच्या वर्गात शिकविलेल्या या बडबडगीतातूनही आपल्या साऱ्या क्रियांची क्षमता सृष्टीकर्त्यानेच आपल्याला दिली असल्याचा संकेत ठळकपणाने केला आहे. थोडक्यात, सारे मानवी जीवन ही केवळ ईश्वराची देणगी आहे. ईश्वराचे नाव घेण्यास काही जणांना लाज वाटते, तरी त्यांनाही हे मान्य करावेच लागते की, माणसाला निसर्गाने शक्तीसंपदा बहाल केली आहे. यातल्या कुठल्याही एका शक्तीची कमतरता असली तर रोजच्या जगण्यात पदोपदी ती जाणवत, बोचत राहते. डोळस माणसाने प्रयोग म्हणून एक-दोन तास डोळे बांधून वावरावे, म्हणजे त्याला नेत्रहीनांची वेदना कळेल. समंजस माणसाने यावर दोन तीन उपाय शोधून काढले आहेत. एकतर विज्ञानाच्या साह्याने आणि बुद्धीच्या वापराने त्याने काही साधने बनवून अपंगत्व भरून काढण्याचा (फक्त काही प्रमाणातच) प्रयत्न केला आहे, दुसरे म्हणजे ज्याच्यापाशी एखादंदुसरी क्षमता कमी आहे, त्याला इतरांनी साह्य करण्याची जाण विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. याबरोबरच ज्या क्षमता मिळाल्या आहेत, त्यांच्याविषयीची कृतज्ञता बाळगणे ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब नव्हे काय? आणि ही मनात बाळगलेली कृतज्ञता व्यक्त करण्यात का संकोच करावा? स्वर्गातील "त्या' दालनाच्या वर्णनाच्या िनमित्ताने आणि तिथे आळसावून, खंतावून बसलेल्या देवदूताच्या मनोगताच्या माध्यमातून हीच जाणीव आपल्या स्नेही प्राध्यापिकेने करून दिलीय. त्यांचा ई-मेल पुढे म्हणतो, "दोन्ही वेळेच्या जेवणाची आपल्याला भ्रांत नसेल तर आपण जगातील एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के भाग्यवंतांपैकी एक आहोत. अहो एवढंच काय आपले बॅंकेत खाते असेल तरीही आपला फारच थोड्या भाग्यवंतांमध्ये समावेश असेल. त्या खात्यात जमा रक्कम असणे ही तर आणखीनच भाग्याची बाब आहे. एकट्या महाराष्ट्रातच सात-आठ लाख कुटुंबे अशी आहेत की, ज्यातल्या सदस्यांना स्वतःवर दिवसाकाठी 20 रुपये सुद्धा खर्च करता येत नाहीत. हिशेबच करायचा झाला तर जेवणखाण, चहा-कॉफी, कपडे आणि डोक्यावरील छप्पर या गरजांसकट सर्व गरजा महिना 600 रुपयांपेक्षा कमी उत्पन्नात भागवाव्या लागतात. आर्थिकदृष्ट्या "प्रगत' असलेल्या महाराष्ट्राची ही कथा. बिहार, ओरिसाच्या गोष्टी बोलायला नको! म्हणजे असा "चमचाभर' विकासही ज्यांच्या वाट्याला आलेला नाही अशांची संख्या काही कोटींची आहे. त्यात आपला समावेश नाही, आपल्या वाट्याला चांगला बादलीभर विकास आलाय, मग जे विकासाच्या लाभाचा समुद्र ओरबाडताहेत त्यांच्याकडे बघून बोटे मोडायची की जे मिळालेय त्याबाबत ईश्वराचे/निसर्गाचे आभार मानायचे? आणि परमेश्वराचीही आभाराची अपेक्षा म्हणजे तरी काय आहे? तर त्याचे स्मरण करायचे, त्याला मनोभावे नमन करायचे आणि मनातल्या मनातच पण मनापासून म्हणायचे "धन्यवाद देवा!' तेवढेही करावेसे आपल्याला वाटू नये?
sahavedana@gmail.कॉम



***

"लव्ह पाकिस्तान' एक कारस्थान

टाइम्स हे भारतातले आघाडीचे दैनिक आहे. पण भारताच्या सुरक्षेच्या सामाजिक, संरक्षण विषयक
प्रश्नांवर त्यांची मते फारच एकांगी राहिलेली आहेत. त्याची काही संपादकीय मते राष्ट्रविरोधी वाटावीत
अशी आहेत. भारतात बांगला देशातून येणारे निर्वासित आणि घुसखोर ही डोकेदुखी ठरलेली आहे. पण
टाइम्सला मात्र ती संधी वाटते. कारण त्यांच्यामुळे भारताला स्वस्त मजूर मिळतात.

नवे वर्ष सुरू झाले की, सर्वांनाच हे वर्ष आपल्याला आनंदाचे जावे असे वाटते. पण माझ्यासाठी तरी या वर्षाचा पहिला दिवस निराशाजनक ठरला. या दिवशी टाइम्स ऑफ इंडियाने "लव्ह पाकिस्तान' हे अभियान सुरू केले. त्या दिवशी एक विशेष लेख छापून या आंग्ल दैनिकाने भारतीयांना, पाकिस्तानचा आदर करण्याचा संदेश दिला. आपण पाकिस्तानशी सलोख्याने जगायला शिकले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतात बहुसंख्य लोक याच मनाचे आहेत, असा दावाही टाइम्सने केला. त्यासाठी सर्व्हे केल्याचे त्याचे म्हणणे आहे. भारताच्या मोठ्या शहरात तो केला म्हणे.
टाइम्स हे भारतातले आघाडीचे दैनिक आहे. पण भारताच्या सुरक्षेच्या सामाजिक, संरक्षण विषयक प्रश्नांवर त्यांची मते फारच एकांगी राहिलेली आहेत. त्याची काही संपादकीय मते राष्ट्रविरोधी वाटावीत अशी आहेत. भारतात बांगला देशातून येणारे निर्वासित आणि घुसखोर ही डोकेदुखी ठरलेली आहे. पण टाइम्सला मात्र ती संधी वाटते. कारण त्यांच्यामुळे भारताला स्वस्त मजूर मिळतात. नक्षलवादी चळवळीने देश तुटण्याची वेळ आली आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये त्यांच्या विरोधात सलवा जुडुम ही सामाजिक चळवळ उभी करण्यात आली. पण टाइम्सने नक्षलवाद्यांना सोडून या चळवळीलाच टीकेचे लक्ष्य केले. वास्तविक नक्षलवाद्यांना परदेशी पैसा मिळतो आणि त्यांनी देशाच्या आर्थिक विकासात मोठाच अडथळा आणायला सुरुवात केलेली आहे. पण टाइम्सला ती मात्र सामाजिक, आर्थिक समस्या वाटते. ही राष्ट्रविरोधी चळवळ बळाने दडपता कामा नये असे टाइम्सचे मत आहे. नक्षलवादी चळवळ बंद पाडली पाहिजे असे टाइम्सने कधी म्हटलेले नाही. सलवा जुडुमवर बंदी घालण्यासाठी याच या दैनिकाने आपली संपादकीय मजकुराची जागा भरपूर खर्ची घातली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने भूतकाळात अशा अनेक निरर्थक आणि समाजघातक मोहिमा हाती घेतल्या आहेत. त्यातलीच एक म्हणजे ही "लव्ह पाकिस्तान' मोहीम. खरे तर पाकिस्तानवर भारताने प्रेम करावे हे सांगण्याची काही गरज आहे का ? त्यासाठी टाइम्स एवढा जीव का टाकत आहे ? भारताने पाकिस्तानचा कधी अधिक्षेप केला आहे का ? भारताशी एक हजार वर्षे लढण्याची प्रतिज्ञा कोणी केली आहे ? भारत-पाक सीमेवर दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबिरे काय भारत सरकार चालवत आहे का ? भारताचे हजार तुकडे करून भारतात रक्तपात घडवण्याच्या आणि त्यासाठी घातपाती कारवाया करणाऱ्या पाकिस्तानवर भारतीयांनी प्रेम केले पाहिजे असा भारतीयांना उपदेश करणाऱ्या टाइम्सचा भोंचकपणा पाकिस्तानी जनतेला मान्य आहे का ? टाइम्सच्या या प्रेम मोहिमेला पाकिस्तान प्रतिसाद देणार आहे का ? आणि कसा ?
1987 पासून म्हणजे जवळपास 23 वर्षांपासून काश्मीरमार्गे पाकिस्तानने भारतात दहशतवादी पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर 17 वर्षांनी दाऊद इब्राहिमने हा काश्मीरमधला दहशतवाद भारताच्या मुख्य भूमीत आणला. 1993 साली त्याने मुंबईत 258 जणांचे प्राण घेणारी बॉम्बस्फोटांची मालिका घडवली. त्यासाठी त्याने जैश-ए-महंमद, लष्करे-तोयबा अशा इस्लामी दहशतवादी संघटनांची मदत घेतली. त्यानंतर हे प्रकार भारतात जारीच राहिले. दाऊदच्या कारस्थानातून भारतात 2006 साली मुंबईत पुन्हा एकदा असाच घातपात घडवण्यात आला. 26/11 चा प्रकार तर ताजाच आहे. दाऊदचे 5 हजार दहशतवाद्यांचे दल आता भारत, पाकिस्तानात आणि अरबस्तानात निरनिराळ्या प्रकाराने वळवळ करीत आहे. पाकिस्तानस्थित मुस्लीम दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानची आय.एस.आय. ही लष्करी गुप्तचर संघटना यांच्या सहकार्याने हे धोकादायक अतिरेकी आणि त्यातले मानवी बॉम्ब कार्यरत आहेत.
हा दाऊद इब्राहिम आता पाकिस्तानातल्या कराची शहरात एका आलिशान बंगल्यात आपल्या कुटुंबासह रहात आहे. आंतरराष्ट्रीय पोलिसांनीही त्याचा छडा लावलेला आहे. तिथूनच तो अनेक दहशतवादी कारवायांचे नियंत्रण करीत असतो. तो तिथे पाकिस्तानच्या कृपेने विलासी जीवन जगत आहे. एवढेच नव्हे तर नकली नोटा छापणे, नशिल्या पदार्थांची निर्यात करणे अशा अनेक गुन्ह्यांचा तो सूत्रधार आहे. त्याला पाकिस्तानने आश्रय दिला आहे. एवढेच नव्हे तर पाकिस्तानचे लष्करी जवान या दाऊद इब्राहिमच्या दिमतीला असतात आणि पाकिस्तानी निमलष्करी दलाचे जवान हे त्याचे अंगरक्षक असतात. पण हे सारे एवढे उघडपणे होत असताना पाकिस्तानचे सरकार मात्र दाऊद पाकिस्तानात नाहीच, असा खुलासा करून हात झटकत असते. दाऊद इब्राहिमसह विविध दहशतवादी कृत्यांतले आरोपी पाकिस्तानात आश्रयाला आहेत. टाइम्सच्या लव्ह पाकिस्तान मोहिमेतून पाकिस्तान या दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करणार आहे का ?
पाकिस्तानात विविध छापखान्यात छापल्या गेलेल्या लाखो रुपये किंमतीच्या बनावट चलनी नोटांचा भारतात सुळसुळाट झाला आहे. बांगला देश, नेपाळ, दुबई या मार्गांनी किंवा कराचीतून थेट या नोटा भारतात आणल्या जात आहेत. मुंबईच्या मानखुर्द भागात अशा नोटा बाळगणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली. या चौघांनी या नोटा पाकिस्तानात छापल्या गेल्या असल्याचे कबूल केले. महसुली गुप्तचर खात्याने अशा चार महिलांना पकडून त्यांच्याकडून 18 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. तामिळनाडू आणि नेपाळात अशाच काही लोकांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळ सापडलेल्या नकली नोटांचे मूळ पाकिस्तानात असल्याचे दिसून आले. टाइम्सच्या "लव्ह पाकिस्तान' मोहिमेला पाकिस्तान भारतातले हे चलन बंद करून प्रतिसाद देणार आहे का? पाकिस्तान भारतावर एवढे प्रेम करणार आहे का?
भारत-पाक सीमेवर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारी 50 शिबिरे जारी असून या शिबिरात आय.एस.आय. आणि पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी काही तरुणांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देत आहेत. काही दहशतवाद्यांनीच ही माहिती दिली आहे. टाइम्सच्या लव्ह पाकिस्तान मोहिमेत ही प्रशिक्षण शिबिरे बंद करण्याची काही तरतूद आहे का ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही अशी आहेत. अट्टारी सरहद्दीवर 12 जानेवारी 2010 रोजी नूमात हर्षद या तरुण मानवी बॉम्बला पकडण्यात आले. त्याने आपल्यासह सात मानवी बॉम्ब भारतात पाठवण्यात आले असल्याचे मान्य केले. एवढेच नव्हे तर पाकिस्तानी पंजाबच्या ओकारा इथे आपल्याला प्रशिक्षण देण्यात आले आहे हेही त्याने मान्य केले.
26/11 च्या हल्ल्याने तर अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. वस्तुस्थिती अशी असताना टाइम्सला "अमन की आशा' कशाच्या आधारावर वाटत आहे? टाइम्सची ही मोहीम म्हणजे काही पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांचे कारस्थान आहे. त्याला अमेरिकेतल्या सी.आय.ए.ची फूस आहे. काश्मीरचा प्रश्न पाकिस्तानच्या बाजूने सोडवला जावा अशी भारतीयांची मन:स्थिती निर्माण करण्याचा हा एक गुप्त डाव आहे.
याच कारस्थानाचा एक भाग म्हणून कारगीलमध्ये आक्रमण करण्यात आले होते. अशा चळवळी आणि वळवळी करून भारताला चर्चेच्या मेजावर ओढून आणण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. त्यात यशही येत आहे. कारगीलच्या युद्धानंतर भारताने पाकिस्तानशी काश्मीरच्या प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी दाखवली. खरे तर काश्मीरवर चर्चा करण्याची काहीच गरज नाही. पण भारताने तशी तयारी दाखवणे हा पाकिस्तानचा विजय आहे. जनरल मुशर्रफ यांनी तसे म्हटलेही होते. 2004 आणि 2009 या दोन निवडणुकांतून भारतात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेवर आले. या आघाडीतले काही अमेरिका शरण नेते आता पाकिस्तानबाब मवाळ धोरणांची चर्चा करायला लागले आहेत.
2006 साली मुशर्रफ भारत-पाक मैत्रीचा एक चार कलमी मसुदा घेऊन आले होते. त्यात भारताने काश्मीरमधले लष्कर काढून घ्यावे, काश्मीरला स्वायत्तता द्यावी, दोन देशांदरम्यान नागरिकांना मुक्तपणे ये-जा करण्याची परवानगी द्यावी अशी होती. खरे तर या चार कलमांत नवे काही नव्हते. ती केवळ नवे रुप देऊन मांडली गेली होती. मुशर्रफ यांनी मांडलेली ही चार कलमे हिजबुल मुजाहिदीनच्या नेत्यांनी आपल्या सुपीक डोक्यातून काढली होती. ती मान्य केली तर काश्मीर भारतात राहणार नाही. त्यामुळे ती स्पष्टपणे नाकारायला हवी होती. पण त्याऐवजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी ती भारत-पाक चर्चेच्या कार्यक्रम पत्रिकेत घेण्याचे मान्य केले. ही चर्चा सुद्धा होऊ शकत नाही इतके या दोन देशांतले संबंध बिघडले आहेत. पण या चर्चेचा प्रस्ताव पुढे रेटण्याचा अमेरिकेचा प्रयत्न जारी आहे.
भारताचा अविभाज्य भाग असलेले जम्मू-काश्मीर कसलाही संघर्ष न करता पाकिस्तानला मिळावे असा अमेरिकेचा डाव आहे. त्यासाठी दोन देशांदरम्यानची बस, रेल्वे वाहतूक सुरू रहावी असा अमेरिकेचा दबाव आहे. काश्मीरला स्वायत्तता देण्याचा प्रस्ताव हा त्याच कारस्थानाचा एक भाग आहे. मुशर्रफ यांनी मांडलेला 4 कलमी प्रस्तावच आता काश्मीरमधल्या विभाजनवादी संघटनांनीही मांडायला लागल्या आहेत. हा सारा कट आहे.
भारत सरकारने 3000 सुरक्षा सैनिक, निमलष्करी दलाच्या आठ तुकड्या मागे घेतल्या असून अजूनही काही पावले टाकण्याची तयारी दाखवली आहे. त्याऐवजी काश्मिरी पोलीस नेमण्यात येत आहेत. त्यांची भरती सुरू आहे. त्यांच्या संख्या 30 हजारांवरून 70 हजारांपर्यंत वाढवली जात आहे. न्या. सागीर अहमद यांनी सरकारला एक अहवाल सादर करून त्यात काश्मीरला स्वायत्तता देण्याची शिफारस केली आहे.
अमेरिका आणि पाकिस्तान यांचे संबंध सर्वज्ञात आहेत. काश्मीरवरून सुरू असलेल्या भारत आणि पाक यांच्यातल्या वादात अमेरिकेने मध्यस्थ म्हणून काम करण्याची कितीही तयारी दाखवली तरी मध्यस्थ म्हणून अमेरिकेवर विश्वास ठेवता येत नाही. अमेरिकेलाही ते कळते. म्हणून आपल्याला जे घडवायचे आहे ते भारतातल्या बुद्धीवादी लोकांच्या तोंडून वदवून घेण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे आणि त्यांची मन:स्थिती तशी व्हावी यासाठी लव्ह पाकिस्तान सारख्या मोहिमा आखल्या जात आहेत आणि टाइम्ससारखी दैनिके त्यांना त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत.
विशेष नोंद
हा मजकूर लिहिताना एक आशादायक बातमी हाती आली आहे. नक्षलवाद्यांच्या मानवी हक्कांसाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या मेधा पाटकर आणि संदीप पांड्ये यांच्यावर छत्तीसगडमधील काही वनवासींनी हल्ला केला. त्यांच्या सभेवर अंडी आणि टोमॅटो फेकले. नक्षलवाद्यांनी आयोजित केलेल्या एका जनता कोर्टात सहभागी होण्यासाठी ते चालले होते. पण वनवासींनी त्यांना पळवून लावले. मेधा पाटकर आदि ढोंगी लोकांचे ढोंग वनवासींना तर कळले आहेच. पण शहरातल्या सुशिक्षितांनाही ते कळायला लागले आहे.

आठवणीतील अरुणाचल

अभियांत्रीकीची पदवी घेतलेला सोलापूरचा एक
तरुण समाजऋणाचे भान ठेवून अरुणाचल
प्रदेशातील विवेकानंद केंद्राच्या शैक्षणिक
सेवाकार्यात सहभागी होतो. तेथील समाज
जीवनाशी समरस होण्याचा प्रयत्न करतो. या
काळातील संस्मरणीय आठवणींना उजाळा देणारा सचिन भिडे यांचा हा लेख. अरुणाचल दिनाच्या (20 फेबु्रवारी) निमित्ताने....

"केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे'
"यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे

या श्रीसमर्थांच्या उक्तीचा मान ठेवत मी शाळेतील कार्यास आरंभ केला. जर काश्मीर भारतमातेचा मुकुट असेल, तर त्यात जडविलेला "कोहिनूर' म्हणजे अरुणाचल प्रदेश! नयनरम्य अशा येथील निसर्ग सान्निध्यात मन लवकरच रमले. येथून जाताना ऐकिवात होते की, तेथे काही अतिरेकी कारवाया होतात. तिथे गेल्यावर त्या कारवायांमागील मानसिकता व कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला. अरुणाचल हा म्यानमार, नेपाळ, चीन व तिबेट यांच्या सीमालगतचा प्रांत आहे. दक्षिण व अग्नेय आशियावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने काही जागतिक शक्तींनी येथील कारभारात ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली व राजकीय डोळेझाकीमुळे त्यात ते यशस्वीही झाले. माध्यमे अनेक होती, जसे गुप्त संघटना, सशस्त्र कारवाया, मादक पदार्थांचा वापर, ख्रिश्चन मिशनरीज वगैरे. याचा परिणाम तिथे दिसतच आहे. ""आम्ही सर्व लोक या सात बहिणी घेऊन भारतातून वेगळे होणार. आम्हास कोणीही अडवू शकत नाही'', असे बोलणे सर्रास ऐकू येऊ लागते, कधी उघड तर कधी छुपे! (सात बहिणी-ईशान्येकडील सात राज्ये - आसाम, अरुणाचल, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय) तेव्हा ही फोफावत असलेली विषवल्ली वेळीच उखडण्याच्या दृष्टीने आपण आपले प्रयत्न सुरू करावे हा विचार केला गेला.
शाळेत गेल्यावर मुलांना गाणी, शिवचरित्र व इतर कथा, नाटक वगैरेंच्या माध्यमातून आपलंसं केलं. त्यांना आपण भारतीय संस्कृतीचे पाईक आहोत ही बाब विविध प्रकारे सांगितली. अर्थात त्यांनाही हे पटलेच. कारण यात वावगे व चुकीचे असे काहीच नव्हते. महाभारत व इतर ग्रंथातील अरुणाचलचा उल्लेख सांगून, आपली नाळ या संस्कृतीशी कशी जोडली आहे हे समजावले गेले. "देणाऱ्याने देत जावे व घेणाऱ्याने घेत जावे'प्रमाणेच स्वामीजींचे विचार आम्हास प्रेरित करीत होते. खूप काही देत होते, तर आम्ही तेच सर्व सदस्य परिस्थितीशी एकरूप होऊन पुढील पिढीस प्रदान करीत होतो. मुले ही चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असतात, त्यांना जसा आकार देऊ तशी ती घडतात, तेव्हा त्या चिखलाच्या गोळ्यापासून देवाची मूर्ती घडवायची का दानवाची हे आपल्याच हाती असते, नाही का?
मी इयत्ता चौथीत असताना मराठी पाठ्यक्रमात आम्हाला एक कविता होती "निर्धार'. त्यातील काही ओळींनी मला खूप काही शिकविले. त्यात तो कवी म्हणतो -
"दे टोले जोवरी असे, तप्त लाल लोखंड
येईल आकारास कसे, झाल्यावर ते थंड'
जगणे व कर्म याबद्दल तो म्हणतो -
"झटणे या जगण्याचे, तत्त्व मनी तू जाण
म्हणून उद्य़म सोडू नको, जोवरी देही प्राण'
अतिरेकी आहेत, जीव गेला तर काय करशील? या प्रश्नास वरील ओळींचे उत्तर पुरेसे आहे ना!
दुर्गम भागातील जंगली लोक हा मनावर उमटलेला शिक्का तेथे गेल्यावर काही दिवसांतच पुसला गेला. निसर्गाच्या एवढ्या जवळ राहण्याची सवय झालेले ते कलेच्या क्षेत्रात इतकी उत्कृष्ट कामगिरी बजावताना दिसतात की, विचारायची सोय नाही. शिल्पकला हस्तकला, चित्रकला, वाद्य, नृत्य, संगीत, खेळ व बरेच काही! त्यांच्या सुपिक डोक्यातून व अनुभवी हातातून साकारलेल्या त्या आखीवरेखीव कलेकडे बघतच राहावे वाटते. माणूस अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो.
मुलांबाबत तर विचारायचीच सोय नाही. लहान वयातच दिसून येणारी परिपक्वता व सामंजस्य तिथे खूप अनुभवायला मिळते; जे इकडे कमीच दिसते. निसर्गाच्या कुशीत जगताना त्याच्याशी अनुरूप होणे नवीन नाही. अगदी छोट्या छोट्या मुलांना इतक्या औषधी वनस्पतींची माहिती आहे की, विचारू नका. मला असे अनेक बालवैद्य तेथे भेटले. माझ्या पोटदुखीवर त्यांनी फारच प्रभावी औषध मला दिले होते. तेथे पाऊस प्रचंड व त्याचमुळे जळवाही! त्यांच्यापासून सुटकेसाठीचा रामबाण इलाजही त्यांनीच मला सांगितला. अशा बुद्धिमान लोकांसोबत वावरताना कोण आनंद होत असेल!
गणित (त्यांच्यामते राक्षस) हा विषय सोडला तर इतर विषयात व मुख्य करून भाषा विषयात फार लवकर प्रगती होताना दिसते. मला त्याच गणिताची भीती दूर करण्यासाठी धाडले गेले होते. कधी वेगवेगळ्या मजेदार पद्धतीतून गमतीशीर उदाहरणे, चित्रे यांच्या सहाय्याने, तर कधी आपले प्राचीन शास्त्रज्ञ व शोध, गणिताचा इतिहास या मार्गाने गणित सोपे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. बौद्धिक पातळीनुसार माझ्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन दिले गेले, त्यामुळे प्रथम चाचणीस जो निकाल 30% होता तो शेवटी 90-92% पर्यंत वाढला. अर्थात याचे श्रेय मला नसून मुलांच्या कष्टालाच आहे.
शाळेत 11 सप्टेंबर (विश्वबंधुत्वदिन) व 12 जानेवारी (राष्ट्रीय युवादिन) फार मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. वस्तीतील नागरिकांशी सलोख्याचे संबंध असल्याने त्यांचाही यात सक्रिय सहभाग असतो. त्यानिमित्ताने विविध क्रीडा व कलेच्या स्पर्धा होतात. अतिशय आनंदी व चुरशीचे वातावरण असते. तेथील गावबुढा (ज्येष्ठ व्यक्ती) राजा व नेते मंडळी यांच्याही उत्तम संपर्कात असल्याने फारच बरे वाटते. शाळेसही त्यांची खूप मदत होते. आम्ही काही शिक्षकांनी बस्तीत जाऊन प्रौढ साक्षरता वर्गही सुरू केला. इंग्रजी, गणित, हिंदी हे विषय तेथे होत होते. शिवाय केंद्राची गीतेही शिकविली. प्रतिसाद इतका सुंदर मिळाला की बस! संध्याकाळी शेतीची कामे करून दमून आलेली मंडळी लगेचच वर्गात धाव घेतात, ते पाहून फार आनंद वाटायचा, उत्साह वाटायचा. त्यांचे इतके स्नेह व आपुलकी आम्हास मिळाली की, पूर्ण वर्षात कधीच घरची आठवण व उणीव भासली नाही. तेथील वृद्धांना आम्ही आपू (आजोबा) व आपी (आजी) असेच म्हणत होतो.
तेथील मुख्य सण म्हणजे "बिहू'व "ओरीया'. त्या वेळी केलेले अगत्य, झालेले आतिथ्य पाहून डोळे भरून आले. इतक्या प्रेमाने आपल्याशी एक प्रथमदर्शी अनोळखी गृहस्थ वागतो, हे आपण शहरात अनुभवू शकतो का? ही व अशी हजारो उदाहरणे मी अनुभवली. किती लिहावे हा प्रश्नच आहे. या सर्वानंतर मला खरंच प्रश्न पडला की, या सभ्य संस्कृतीस जंगली, रानटी का म्हटले जाते? केवळ जंगलवासी आहेत म्हणून? मग आपण सिमेंटच्या जंगलात राहणारे त्यापेक्षा काय वेगळे आहोत?
अनुभव न संपणारे आहेत, पण इतर गोष्टीस मर्यादा आहेत. आपणही यांच्या उन्नतीसाठी खूप काही करू शकता.
"ज्यांना जे जमेल, त्यांनी ते जरूर करावे', माझे तरुण उसळत्या रक्ताचे मित्र आपला वेळ या शाळांसाठी देऊ शकतात. सेवाव्रती, जीवनव्रती म्हणून केंद्राचे कार्य करू शकतात, कारण तन-मन अर्पणाची हिच तर वेळ आहे.
माझे ज्येष्ठ व आदरणीय बांधव की, ज्यांनी आपले सारे आयुष्य गृहस्थाश्रमी वेचले ते "अरुणाचल बंधू परिवारास' आपली आर्थिक सेवा देऊ शकतात. तेथील मुलांना शिष्यवृत्ती रूपाने सहाय्य करू शकतात. यथाशक्ती श्रमदान व वेळही केंद्रास देऊ शकतात.
आपल्या इच्छेचा मान ठेवत हे केंद्र आपल्या सेवेशी या पत्त्यावर हजर आहेच.
विवेकानंद केंद्र, विवेकानंदपुरम्‌, कन्याकुमारी - 629702.
तामिळनाडु- दूरध्वनी ः 04652 - 347012, 346250, 346232.
website.www.vkendra.org
शेवटी माझे आपणा सर्वांना, माझ्या सुज्ञ बांधवांना एक आवाहन आहे.
"अरुणाचल वाचवा, देश वाचवा'
"जीवने यावदादानं, स्यात्‌ प्रदानं ततोऽधिकम्‌'

वसुधैव कुटुम्बकम्‌

मानवजातीपुढील पर्याय ः मानवधर्म की मार्केट
या भारत देशात फार पुरातन काळापासून उदात्त विचारांची धारा वाहत आली आहे. हा केवळ विचारच होता असे नाही, तर आपला जीवनव्यवहार होता. तोच पुढे आपल्या संस्कृतीत परिवर्तित झाला. द्रष्ट्या विचारवंतांनी हा विचार काही सुभाषितांमध्ये आकर्षकपणे मांडला आहे.
अयं निजः परोवेति, गणना लघुचेतसाम्‌
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्‌

संकुचित विचाराचे लोक जगाला आपले आणि परके अशा वर्गांत वाटत असतात, पण उदात्त विचारांचे लोक जगाकडे एक कुटुंब म्हणून पाहत असतात. ही काही एक कविकल्पना नाही. हा तर "सर्वं खल्विदं ब्रह्म' या अंतिम सत्याचा अविष्कार आहे. हे सारे विश्व म्हणजे अनेकात झालेलं "एका'चं प्रकटन आहे. भारताचा इतिहास हा या सत्याचा दैनंदिन व्यवहारी जीवनात वापर करण्याच्या प्रयासातून साकार झाला आहे.
व्यक्तिगत जीवनापासून राष्ट्रीय जीवनापर्यंत साऱ्या पातळ्यांवर या तत्त्वाच्या विविध पैलूंचा अनुभव आपण घेत आलो आहोत. या देशात विविधतेतून एकता दिसत आली आहेच, पण या एकात्मतेच्या मुळाशी वसुधैव कुटुम्बकम्‌ हे तत्त्व आहे. कारण आपल्या पूर्वजांनी विविधतेत एकतेचा विचार भारत देशाच्या भौगोलिक सीमांपर्यंत मर्यादित केलेला नव्हता. त्यांनी आपल्या प्रेम आणि आपुलकीच्या मर्यादा वाढवून तिच्यात पूर्ण मानव जातीला अंतर्भूत केले होते. या प्रेमानेच त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेले होते. त्यांनी आपल्या व्यवहारातून हा एकतेचा संदेश जगभर नेला असल्यामुळे भारतातल्या संस्कृती दूतांची छाप जगाच्या सर्व भागात उमटली आहे. हा भारतीय संस्कृतीच्या उदात्त अवस्थेचा कालखंड होता.
केवळ सत्याला बांधील असलेल्या अनेक संशोधकांनी याची ग्वाही दिलेली आहे. पुरातन मानल्या गेलेल्या ग्रीक आणि रोमन संस्कृती. तसेच ग्रीक आणि लॅटिन भाषांचा उगम भारतात असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. या भाषा भारतात उगम पावल्या आणि नंतर त्या जगाच्या विविध भागांत गेल्या, असे त्यांनी म्हटले आहे. हे विस्तार कार्य लढाया करून साध्य झालेले नाही, तर गतिमान संस्कृतीच्या माध्यमातून हळूहळू झाले आहे, पण नंतरच्या काळात विजेत्या पाश्चात्यांनी हा इतिहास विपरितरित्या सांगितला. भारतातली संस्कृती ही परक्यांनी भारतात आणली असा विचित्र शोध त्यांनी लावला, पण हळूहळू सत्य समोर येत आहे. ते त्याच्या अंगभूत सामर्थ्याच्या जोरावर प्रस्थापित होणार आहे.
रोमन आणि ग्रीक संस्कृती लयाला गेल्यानंतर पाश्चात्य जग अंधारात बुडाले होते आणि उर्वरित जगापासून तुटून राहिले होते, पण ग्रीक संस्कृती पुन्हा जागी आणि पुनरुज्जीवित झाली आणि तिने या पाश्चात्य लोकांना बाहेर पाहण्याची प्रेरणा दिली. साम्राज्यवादी आक्रमकता आणि ख्रिश्चन धर्मगुरूंची मिशनरीवृत्ती यामुळे युरोपीय देशांनी एकामागे एक अतिक्रमणे करून अफ्रिका आणि आशिया खंडातले भूभाग पादाक्रांत करायला सुरुवात केली. त्यांनी या भागात नांदत असलेल्या पुरातन, शांततापूर्ण सहजीवन मानणाऱ्या संस्कृतीचा बिमोड करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांचे परिणाम या दोन खंडांवर व्यापकपणे व्हायला लागले. असहिष्णू धर्मग्रंथ आणि संकुचित वृत्ती यांचीच प्रेरणा या विध्वंसामागे होती. त्यांचा हा विचार भारतीयांच्या वसुधैव कुटुम्बकम्‌ या तत्त्वाशी पूर्णपणे विरोधी होता. त्यांना व्यापार आणि धर्म यांचे वैचारिक पाठबळ होते. त्यांनी धूर्त आणि फसव्या मार्गांनी तसेच लष्करी सामर्थ्याच्या जोरावर हे काम केले. गेल्या तीन-चार शतकांचा इतिहास ज्यास आधुनिक इतिहास असे म्हटले जाते, या अनैतिक विजयांनी आणि भूमी पादाक्रांत करण्याच्या घटनांनी भरलेला आहे. पाश्चात्यांच्या या स्वार्थी धाेरणांचा पदोपदी वापर झाला आणि त्याची परिणती आजच्या जागतिक बाजारपेठ या संकल्पनेत झाली आहे. पाश्चात्य देशांनी सहकारी सामर्थ्य, आर्थिक शोषण, वैचारिक आणि बौद्धिक युक्त्या यांच्या साह्याने जगावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. या जागतिक बाजारपेठेने उर्वरित जगातच काय पण खुद्द पाश्चात्य देशांनाही तंग केले आहे.
जग एक कुटुंब ही भावना आणि जग ही एक बाजारपेठ ही भावना या दोन भावना परस्परांपासून केवळ भिन्नच असतात असे नाही तर परस्पर विसंगत असतात. घरातले व्यवहार प्रेमावर आधारलेले असतात, तर बाजारातले व्यवहार स्पर्धा आणि कपट यावर आधारलेले असतात. घरात समविचारीपणा नांदत असतो, तर बाजारात परस्पर विरोधी हितसंबंधांचा टकराव होत असतो. घराचे अंतिम उद्दिष्ट शांती हे असते, तर बाजाराचे अंतिम उद्दिष्ट नफा हे असते. बाजार जडवादी तत्त्वांवर चालतो, तर घर आध्यात्मिक मूल्यांवर चालते. परस्पर सहकार्य हा कुटुंबाचा पाया असतो, तर शोषण हा बाजाराचा मान्यता प्राप्त मार्ग असतो.
बाजारात बिभत्स उपभोक्तावाद वाढवला जातो, तर घरात मूल्याधारित, काटकसरीचे संस्कार केले जातात.
आज जगासमोरचा कळीचा प्रश्न आहे यातल्या कोणत्या तत्त्वाचा अंगिकार करावा? कोणती जीवनप्रणाली आत्मसात करावी?कोणता दृष्टिकोन अंगिकारावा? पाश्चात्य विचाराचा प्रयोग करून झाला आहे. त्याच्या साह्याने संपन्न आणि समाधानी जीवन जगता येत नाही. मानव जातीला आता योग्य मार्गाची निवड करायची आहे. आता काही पाश्चात्य विचारवंतही या निष्कर्षाप्रत आले आहेत की, या पृथ्वीतलावर मानवी जात टिकायची असेल आणि तिला समाधानी जीवन जगायचे असेल, तर पौर्वात्य विचारांशिवाय पर्याय नाही. जगासमोर दोन पर्याय आहेत. एक आहे मानवधर्म आणि दुसरा आहे "बाजार'. एक पर्याय आहे विश्व कुटुंबाचा तर दुसरा विश्वव्यापाराचा. याबाबत भारतीय प्रबोधन युगातल्या अनेक विचारवंतांनी आपले विचार मांडले आहेत. या विचारवंतांचे खरे प्रतिनिधी स्वामी विवेकानंद हे होत. त्यांनी 100 वर्षांपूर्वीच म्हणून ठेवले आहे, ""सारे पाश्चात्य जग ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहे. या ज्वालामुखीचा येत्या 50 वर्षांत स्फोट होणार आहे. उपनिषदांतला विचारच त्यांना या स्फोटापासून वाचवणार आहे.'' स्वामीजींचा हा विचार कोणी विचारात घेतला नाही आणि त्यामुळे छोट्या-मोठ्या ज्वालामुखींचे स्फोट हा आता नित्यक्रम झाला आहे. पाश्चात्य देशातले प्रामाणिक विचारवंत निराश झाले आहेत. इलेनोर स्टार्क यांनी आपल्या "द गिफ्ट अनओपन्‌ड' या पुस्तकात आपली निराशा या शब्दात व्यक्त केली आहे. "कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला, पण स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेचा आत्मा शोधला.' स्वामीजींनी स्वतः अमेरिकेचा आत्मा म्हणजे काय? याचा खुलासा केला आहे. शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत सादर केलेल्या आपल्या हिंदुत्वावरच्या प्रबंधात त्यांनी म्हटले आहे, अमेरिकेला उद्देशून ते म्हणतात, "तुलाच हे स्वातंत्र्य दिले गेले आहे, जिने आपले हात कधी शेजाऱ्याच्या रक्ताने बरबटवून घेतलेले नाहीत, शेजाऱ्यांना लुबाडणे हाच श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग आहे असा विचार तिने कधी केला नाही आणि सौहार्दाचा ध्वज हाती घेऊन संस्कृतीच्या अग्रदूताकडे कूच करण्याचा मार्ग तिने पत्करला आहे.'
(कंपलीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद भाग-1 पृष्ठ 20)
या जगाने जागतिक आणि शीत युद्धामुळे वेगळेच वळण घेतले. जगाला स्वातंत्र्याचा संदेश देणारी अमेरिकाच गरीब देशांची लूट करणारी अमेरिका ठरली. स्वातंत्र्य आणि लोकशाही यांचे जतन आणि जोपासना करण्याऐवजी या अमेरिकेने हुकुमशाही देशांना आणि लष्करी राजवटीस मदत पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले.
धार्मिक सहिष्णुता आणि सांस्कृतिक विविधता यांची कास धरण्याऐवजी अमेरिकेने मूलतत्त्ववाद आणि जिहादी शक्तींचे पोषण केले, धार्मिक उन्माद आणि बाजार व्यवस्था यांमुळे त्रस्त झालेले हे जग गोंधळ आणि संभ्रम यांच्या चक्रात सापडले आहे. पर्यायी जीवन व्यवस्थेचा एखादा आशाकिरण दिसतो का याचा शोध हे जग घेत आहे. ही वेळ फार निर्णायक आहे. आत्ताच भारताने पुढे येऊन मार्केट पेक्षा मानवधर्म मोठा आहे, हे जगाला सांगण्याची गरज आहे. तरच मानवी जात उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करू शकेल. याबाबत भारताने आदर्श उभा केला पाहिजे. त्याचे अनुकरण बाकीचे जग करील.
(अनुवाद - अरविंद जोशी)