मानवजातीपुढील पर्याय ः मानवधर्म की मार्केट
या भारत देशात फार पुरातन काळापासून उदात्त विचारांची धारा वाहत आली आहे. हा केवळ विचारच होता असे नाही, तर आपला जीवनव्यवहार होता. तोच पुढे आपल्या संस्कृतीत परिवर्तित झाला. द्रष्ट्या विचारवंतांनी हा विचार काही सुभाषितांमध्ये आकर्षकपणे मांडला आहे.
अयं निजः परोवेति, गणना लघुचेतसाम्
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्
संकुचित विचाराचे लोक जगाला आपले आणि परके अशा वर्गांत वाटत असतात, पण उदात्त विचारांचे लोक जगाकडे एक कुटुंब म्हणून पाहत असतात. ही काही एक कविकल्पना नाही. हा तर "सर्वं खल्विदं ब्रह्म' या अंतिम सत्याचा अविष्कार आहे. हे सारे विश्व म्हणजे अनेकात झालेलं "एका'चं प्रकटन आहे. भारताचा इतिहास हा या सत्याचा दैनंदिन व्यवहारी जीवनात वापर करण्याच्या प्रयासातून साकार झाला आहे.
व्यक्तिगत जीवनापासून राष्ट्रीय जीवनापर्यंत साऱ्या पातळ्यांवर या तत्त्वाच्या विविध पैलूंचा अनुभव आपण घेत आलो आहोत. या देशात विविधतेतून एकता दिसत आली आहेच, पण या एकात्मतेच्या मुळाशी वसुधैव कुटुम्बकम् हे तत्त्व आहे. कारण आपल्या पूर्वजांनी विविधतेत एकतेचा विचार भारत देशाच्या भौगोलिक सीमांपर्यंत मर्यादित केलेला नव्हता. त्यांनी आपल्या प्रेम आणि आपुलकीच्या मर्यादा वाढवून तिच्यात पूर्ण मानव जातीला अंतर्भूत केले होते. या प्रेमानेच त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेले होते. त्यांनी आपल्या व्यवहारातून हा एकतेचा संदेश जगभर नेला असल्यामुळे भारतातल्या संस्कृती दूतांची छाप जगाच्या सर्व भागात उमटली आहे. हा भारतीय संस्कृतीच्या उदात्त अवस्थेचा कालखंड होता.
केवळ सत्याला बांधील असलेल्या अनेक संशोधकांनी याची ग्वाही दिलेली आहे. पुरातन मानल्या गेलेल्या ग्रीक आणि रोमन संस्कृती. तसेच ग्रीक आणि लॅटिन भाषांचा उगम भारतात असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. या भाषा भारतात उगम पावल्या आणि नंतर त्या जगाच्या विविध भागांत गेल्या, असे त्यांनी म्हटले आहे. हे विस्तार कार्य लढाया करून साध्य झालेले नाही, तर गतिमान संस्कृतीच्या माध्यमातून हळूहळू झाले आहे, पण नंतरच्या काळात विजेत्या पाश्चात्यांनी हा इतिहास विपरितरित्या सांगितला. भारतातली संस्कृती ही परक्यांनी भारतात आणली असा विचित्र शोध त्यांनी लावला, पण हळूहळू सत्य समोर येत आहे. ते त्याच्या अंगभूत सामर्थ्याच्या जोरावर प्रस्थापित होणार आहे.
रोमन आणि ग्रीक संस्कृती लयाला गेल्यानंतर पाश्चात्य जग अंधारात बुडाले होते आणि उर्वरित जगापासून तुटून राहिले होते, पण ग्रीक संस्कृती पुन्हा जागी आणि पुनरुज्जीवित झाली आणि तिने या पाश्चात्य लोकांना बाहेर पाहण्याची प्रेरणा दिली. साम्राज्यवादी आक्रमकता आणि ख्रिश्चन धर्मगुरूंची मिशनरीवृत्ती यामुळे युरोपीय देशांनी एकामागे एक अतिक्रमणे करून अफ्रिका आणि आशिया खंडातले भूभाग पादाक्रांत करायला सुरुवात केली. त्यांनी या भागात नांदत असलेल्या पुरातन, शांततापूर्ण सहजीवन मानणाऱ्या संस्कृतीचा बिमोड करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांचे परिणाम या दोन खंडांवर व्यापकपणे व्हायला लागले. असहिष्णू धर्मग्रंथ आणि संकुचित वृत्ती यांचीच प्रेरणा या विध्वंसामागे होती. त्यांचा हा विचार भारतीयांच्या वसुधैव कुटुम्बकम् या तत्त्वाशी पूर्णपणे विरोधी होता. त्यांना व्यापार आणि धर्म यांचे वैचारिक पाठबळ होते. त्यांनी धूर्त आणि फसव्या मार्गांनी तसेच लष्करी सामर्थ्याच्या जोरावर हे काम केले. गेल्या तीन-चार शतकांचा इतिहास ज्यास आधुनिक इतिहास असे म्हटले जाते, या अनैतिक विजयांनी आणि भूमी पादाक्रांत करण्याच्या घटनांनी भरलेला आहे. पाश्चात्यांच्या या स्वार्थी धाेरणांचा पदोपदी वापर झाला आणि त्याची परिणती आजच्या जागतिक बाजारपेठ या संकल्पनेत झाली आहे. पाश्चात्य देशांनी सहकारी सामर्थ्य, आर्थिक शोषण, वैचारिक आणि बौद्धिक युक्त्या यांच्या साह्याने जगावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. या जागतिक बाजारपेठेने उर्वरित जगातच काय पण खुद्द पाश्चात्य देशांनाही तंग केले आहे.
जग एक कुटुंब ही भावना आणि जग ही एक बाजारपेठ ही भावना या दोन भावना परस्परांपासून केवळ भिन्नच असतात असे नाही तर परस्पर विसंगत असतात. घरातले व्यवहार प्रेमावर आधारलेले असतात, तर बाजारातले व्यवहार स्पर्धा आणि कपट यावर आधारलेले असतात. घरात समविचारीपणा नांदत असतो, तर बाजारात परस्पर विरोधी हितसंबंधांचा टकराव होत असतो. घराचे अंतिम उद्दिष्ट शांती हे असते, तर बाजाराचे अंतिम उद्दिष्ट नफा हे असते. बाजार जडवादी तत्त्वांवर चालतो, तर घर आध्यात्मिक मूल्यांवर चालते. परस्पर सहकार्य हा कुटुंबाचा पाया असतो, तर शोषण हा बाजाराचा मान्यता प्राप्त मार्ग असतो.
बाजारात बिभत्स उपभोक्तावाद वाढवला जातो, तर घरात मूल्याधारित, काटकसरीचे संस्कार केले जातात.
आज जगासमोरचा कळीचा प्रश्न आहे यातल्या कोणत्या तत्त्वाचा अंगिकार करावा? कोणती जीवनप्रणाली आत्मसात करावी?कोणता दृष्टिकोन अंगिकारावा? पाश्चात्य विचाराचा प्रयोग करून झाला आहे. त्याच्या साह्याने संपन्न आणि समाधानी जीवन जगता येत नाही. मानव जातीला आता योग्य मार्गाची निवड करायची आहे. आता काही पाश्चात्य विचारवंतही या निष्कर्षाप्रत आले आहेत की, या पृथ्वीतलावर मानवी जात टिकायची असेल आणि तिला समाधानी जीवन जगायचे असेल, तर पौर्वात्य विचारांशिवाय पर्याय नाही. जगासमोर दोन पर्याय आहेत. एक आहे मानवधर्म आणि दुसरा आहे "बाजार'. एक पर्याय आहे विश्व कुटुंबाचा तर दुसरा विश्वव्यापाराचा. याबाबत भारतीय प्रबोधन युगातल्या अनेक विचारवंतांनी आपले विचार मांडले आहेत. या विचारवंतांचे खरे प्रतिनिधी स्वामी विवेकानंद हे होत. त्यांनी 100 वर्षांपूर्वीच म्हणून ठेवले आहे, ""सारे पाश्चात्य जग ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहे. या ज्वालामुखीचा येत्या 50 वर्षांत स्फोट होणार आहे. उपनिषदांतला विचारच त्यांना या स्फोटापासून वाचवणार आहे.'' स्वामीजींचा हा विचार कोणी विचारात घेतला नाही आणि त्यामुळे छोट्या-मोठ्या ज्वालामुखींचे स्फोट हा आता नित्यक्रम झाला आहे. पाश्चात्य देशातले प्रामाणिक विचारवंत निराश झाले आहेत. इलेनोर स्टार्क यांनी आपल्या "द गिफ्ट अनओपन्ड' या पुस्तकात आपली निराशा या शब्दात व्यक्त केली आहे. "कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला, पण स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेचा आत्मा शोधला.' स्वामीजींनी स्वतः अमेरिकेचा आत्मा म्हणजे काय? याचा खुलासा केला आहे. शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत सादर केलेल्या आपल्या हिंदुत्वावरच्या प्रबंधात त्यांनी म्हटले आहे, अमेरिकेला उद्देशून ते म्हणतात, "तुलाच हे स्वातंत्र्य दिले गेले आहे, जिने आपले हात कधी शेजाऱ्याच्या रक्ताने बरबटवून घेतलेले नाहीत, शेजाऱ्यांना लुबाडणे हाच श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग आहे असा विचार तिने कधी केला नाही आणि सौहार्दाचा ध्वज हाती घेऊन संस्कृतीच्या अग्रदूताकडे कूच करण्याचा मार्ग तिने पत्करला आहे.'
(कंपलीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद भाग-1 पृष्ठ 20)
या जगाने जागतिक आणि शीत युद्धामुळे वेगळेच वळण घेतले. जगाला स्वातंत्र्याचा संदेश देणारी अमेरिकाच गरीब देशांची लूट करणारी अमेरिका ठरली. स्वातंत्र्य आणि लोकशाही यांचे जतन आणि जोपासना करण्याऐवजी या अमेरिकेने हुकुमशाही देशांना आणि लष्करी राजवटीस मदत पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले.
धार्मिक सहिष्णुता आणि सांस्कृतिक विविधता यांची कास धरण्याऐवजी अमेरिकेने मूलतत्त्ववाद आणि जिहादी शक्तींचे पोषण केले, धार्मिक उन्माद आणि बाजार व्यवस्था यांमुळे त्रस्त झालेले हे जग गोंधळ आणि संभ्रम यांच्या चक्रात सापडले आहे. पर्यायी जीवन व्यवस्थेचा एखादा आशाकिरण दिसतो का याचा शोध हे जग घेत आहे. ही वेळ फार निर्णायक आहे. आत्ताच भारताने पुढे येऊन मार्केट पेक्षा मानवधर्म मोठा आहे, हे जगाला सांगण्याची गरज आहे. तरच मानवी जात उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करू शकेल. याबाबत भारताने आदर्श उभा केला पाहिजे. त्याचे अनुकरण बाकीचे जग करील.
(अनुवाद - अरविंद जोशी)
No comments:
Post a Comment