Monday, May 25, 2009

मे सम्पादकीय

आपण आपल्या राष्ट्रीय चैतन्याचे प्राणपणाने जतन केले, त्यासाठी सर्वस्व समर्पण केले, म्हणूनच शतकानुशतके होत आलेले आघात आपण सोसू शकलो. आपल्या पूर्वजांनी त्यासाठी सारे काही सोसले, अगदी मृत्यूसही कवटाळले. आपले धर्मचैतन्य सांभाळले. परकीय आक्रमणांच्या बेबंद लाटेखाली मंदिरांमागून मंदिरे कोसळत होती, पण ती लाट परतून जाताच त्याच मंदिरांचे कलश पुन्हा एकदा उन्नत मस्तकाने उभे राहिले.
दक्षिण हिंदुस्थानातील काही मंदिरे आणि गुजराथेतील सोमनाथाचे मंदिर आपल्याला खूपच काही शिकवून जातात. पुस्तकांच्या राशी वाचून हिंदू वंशाच्या इतिहासाबाबत जी समज येणार नाही, ती केवळ सोमनाथाकडे पाहिल्याने येईल. शतावधी प्रहारांच्या आणि शतावधी पुनर्निर्माणाच्या कहाण्या या मंदिरावर आपल्याला वाचता येतील. ही मंदिरे पुनःपुन्हा भग्न होत होती आणि पुनःपुन्हा राखेतून उभी राहत होती - नव्या चैतन्याने, नव्या सामर्थ्याने! हाच आपला राष्ट्रीय स्वभाव आहे, हाच आपला राष्ट्रीय जीवनप्रवाह आहे. त्याचे अनुगामी व्हा! तो तुम्हाला वैभवाप्रत नेईल. त्याचा पाठपुरावा सोडून द्या - लगेच तुमचा मृत्यू, तुमचा विनाश ठरलेलाच आहे!
- स्वामी विवेकानंद
वाचक बंधू - भगिनी,
संपूर्ण देश लोकसभा निवडणुकीने ढवळून निघाला आहे. हा अंक आपल्या हाती पडेपर्यंत कदाचित निवडणुकांचे निकाल लागलेले असतील. देशाचे नेतृत्व कोण सांभाळेल, हे स्पष्टही झालेले असेल किंवा त्रिशंकू परिस्थिती उद्‌भवल्यास स्वार्थप्रेरित शक्ती सक्रीय होतील. निकाल काहीही लागू द्या - जनतेला तिच्या लायकीप्रमाणे राज्यकर्ते मिळतील, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही!
लोकशाहीमध्ये मतांना मूल्य असते. वैचारिक प्रबोधनाने मते बदलतात. मते बदलही घडवून आणू शकतात. जनतेसमोर उदात्त विचार नसतील तर मते विकली जातात. मतदार मतदान न करण्यातच धन्यता मानतात. केवळ 40-45 टक्केच मतदान होते. अशावेळी दोनपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असतील तर एकगठ्ठा मतदान करणाऱ्या जमाती (15 टक्के मते) विजयी उमेदवार ठरवतात. येथे प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरते. वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या जनतेसमोर काय चित्र उभे करतात, यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे; कारण प्रसारमाध्यमे समाजमन घडवीत किंवा बिघडवीत असतात.
आज प्रसिद्धीमाध्यमे व्यावसायिकतेकडे अधिक झुकली आहेत. समाजाच्या दृष्टीने, राष्ट्राच्या दृष्टीने हितकारक काय अन्‌ अहितकारक काय, याचा विचार करणे मागासलेपणाचे ठरवले जात आहे. भारतीय जनमनावर एकप्रकारे वैचारिक हल्ला चढविला जात आहे. पारंपरिक युद्धापेक्षा वैचारिक युद्ध अधिक परिणामकारी असते. प्रशिक्षित मनेच वैचारिक युद्धाला यशस्वीपणे तोंड देऊ शकतात. वैचारिक आक्रमण हे पुराणांमधील "मायावी' राक्षसांच्या आक्रमणाप्रमाणे असते. या देशाचे अहित चिंतणाऱ्या शक्तींनी बेमालूमपणे धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा आपल्या विकट चेहऱ्यावर चढविला आहे. इस्लामी मूलतत्त्ववाद आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांचा विस्तारवाद याकडे कानाडोळा करून या देशातील राष्ट्रीय विचारधारेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करण्याचा प्रयत्न नेटाने सुरू आहे.
या देशाचा आत्मा असलेल्या हिंदुत्वालाच संपविण्याचा प्रयत्न सुरू झाल्यामुळे राजकीय आणि सामाजिक सुधारणांकडे स्वाभाविकपणेच दुर्लक्ष होत आहे. या अंकामध्ये ज्येष्ठ विचारवंत एस. गुरुमूर्ती यांच्या "घटनाचक्र' या सदरात "वैचारिक पुनरुज्जीवनाची गरज' हा लेख आहे. या लेखातून वैचारिक आक्रमणाचे अनेक पैलू आपल्यासमोर उलगडत जातात.
याच महिन्यात स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची जयंती आहे. सशस्त्र क्रांतीचा केतू उभारताना बौद्धिक लढ्यासाठी प्रचंड वाङ्‌मय निर्माण करणारे सावरकर हे या देशाचे अलौकिक महापुरुष आहेत. 'Savarkar In The Light Of Vivekananda' या पुस्तकाची मराठी आवृत्ती सावरकर जयंतीदिनी प्रकाशित होत आहे. यानिमित्ताने या पुस्तकातील एक प्रकरण या अंकात देत आहोत.

1 comment:

विक्रम एक शांत वादळ said...

छान माहिती आहे

धन्यवाद