Monday, August 14, 2017

राष्ट्रभक्तीच्या भावनेचे सर्वोच्च पुरस्कर्ते काय म्हणतात पाहा...



राष्ट्रभक्तीच्या भावनेचे सर्वोच्च पुरस्कर्ते काय म्हणतात पाहा... 
 

लोकमान्य टिळक 
दोघे जेव्हा बेलूरला भेटले तेव्हा त्या भेटीत विवेकानंदांनी शत्रूशी मुकाबला करताना अधिक विध्वंसक मार्ग चोखाळण्याचा आग्रह टिळकांपाशी धरला. टिळक हे स्वामी विवेकानंदांना राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे, पिता मानित होते.

सुरेंद्रनाथ बॅनर्जी
सुरेंद्रनाथांनी आपल्या बंगाली वृत्तपत्रात विवेकानंद चरित्राचे परीक्षण करताना, कार्लाइलच्या ‘देशाचा इतिहास हा त्याच्या महापुरुषांचा इतिहास असतो’ या वाक्याचा संदर्भ देऊन रामकृष्ण व विवेकानंद यांचे समकालीन महामानव म्हणून उदाहरण दिले.

बिपिनचंद्र पाल
बिपिनचंद्र पाल लिहितात, आपल्या राष्ट्रभक्तीच्या भावनेचे सर्वोच्च पुरस्कर्ते व महापुरुष होण्याचा मान विवेकानंदांचाच आहे. आपल्या देशाबद्दलच्या व संस्कृतीबद्दलच्या ज्वलंत भावनेची तार त्यांनीच प्रथम छेडली.

गोपाळकृष्ण गोखले
गोपाळ कृष्ण गोखलेंच्या धर्मासंबंधी कल्पनांमध्ये विवेकानंदांच्या प्रभावामुळे बदल घडल्याचे दिसून येते. त्यांच्या सामाजिक कल्पना, बहुजन समाजाच्या उद्धारावरील त्यांचा भर याचे स्फूर्तिस्थान विवेकानंद होते हे म्हणणे साधार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भगवान बुद्ध यांच्यानंतर कोणी महापुरुष या भारतवर्षात अवतरीत झाला असेल तर ते स्वामी विवेकानंद होत.
(संदर्भ : रिमेन्सेस ऑफ नेहरू एज, लेखक : एम. ओ. मथाई)

वि. दा. सावरकर
क्रांतिकारकांचे मुकुटमणी वि. दा. सावरकर लिहितात, 1898च्या सुमारास उभा हिंदुस्थान विवेकानंदांच्या पुस्तकांनी भारला होता. ती पुस्तके आणि व्याख्याने माझ्या बंधूंनी आणि त्यांच्या नादाने मीही वाचली. राष्ट्रासाठी जीवनाचे बलिदान करण्याची प्रेरणा यातूनच मिळत होती.

महात्मा गांधी
आपली देशभक्तीची भावना प्रचंडतेने प्रखर होण्याचे कारण सांगताना महात्मा गांधी म्हणतात, मी विवेकानंदांच्या समग्र वाङमयाचे अध्ययन केले आहे. त्याचमुळे माझ्या ठायी असलेले मातृभूमीवरील प्रेमहजारोपटीने वाढले आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस
सुभाषचंद्र बोस वारंवार हेच लिहित की, त्यांचे जीवन विवेकानंद यांच्या प्रभावाखाली घडवले गेले; आणि युवकांनीही विवेकानंदांचा आदर्श समोर ठेवावा असाच त्यांचा आग्रह असे. त्यांच्या मते, चारित्र्य निर्माणाचा सर्वोच्च आदर्श देशापुढे जर कुणी ठेवला असेल तर तो विवेकानंदांनी. 

रवींद्रनाथ टागोर
रवींद्रनाथ टागोर लिहितात, तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल, तर स्वामी विवेकानंदांचा अभ्यास करा. स्वामी विवेकानंदांनी मानवाच्या संपूर्ण विकासाचा मूलमंत्र दिला व त्यातून देशाच्या उद्धारासाठी अनेक तरुण कार्यप्रवृत्त झाले व अनेकांनी सर्वोच्च त्यागही केला.

जवाहरलाल नेहरू
चिनी आक्रमण होत असताना तरुणांपुढे आदर्श म्हणून ठेवण्यास नेहरुंनी सामर्थ्याची व तेजाची मूर्तिमंत प्रतिमा असलेल्या विवेकानंदांची निवड केली.विवेकानंदांबद्दल ते म्हणतात : ते कोणी राजकारणी नव्हते... आणि तरीही भारतातील राष्ट्रीय आधुनिक चळवळ सुरू करणारे ते एक थोर संस्थापक होते.

इंदिरा गांधी
इंदिरा गांधी यांचा स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठाशी घनिष्ट संबंध होता. भारतीय तरुणांसमोर स्वामी विवेकानंदांचा आदर्श असला पाहिजे, अशी त्यांची भावना होती. १२ जानेवारी हा विवेकानंद जयंतीचा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित करण्याचे त्यांनीच ठरवले. राजीव गांधी यांनी या निर्णयाला मूर्त रूप दिले.

सर्वपल्ली राधाकृष्णन
डॉ. राधाकृष्णन म्हणतात, मातृभूमीच्या चैतन्याची विवेकानंद प्रत्यक्षमूर्ती होते. तिच्या आध्यात्मिक आशा आकांक्षा व त्यांची परिपूर्ती याचे ते प्रतीक होते. आणि हेच ते चैतन्य की जे आमच्या भक्तजनांच्या काव्यातून, द्रष्ट्यांंच्या तत्त्वज्ञानातून, पूजा प्रार्थनांतून व्यक्त झाले.

डॉ. एपीजे कलाम
डॉ. एपीजे कलाम म्हणतात, लोकांमध्ये विवेकानंदांच्या संदेशाचा प्रचार आणि प्रसार करणे खूप महत्त्वाचे आहे. मानव सेवा आणि मनुष्य निर्माण या संबंधात स्वामीजींची किमान १० बोधवाक्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि चमकणार्या बोर्डाद्वारे जागोजागी प्रचारित केली पाहिजेत. आणि लोकांना आवाहन केले पाहिजे की त्यांनी यातील किमान एका संदेशाचे जीवनभर पालन करावे.

नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. श्री. मोदी हे १७ वर्षांचे असताना स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांमुळे अतिशय प्रभावित होऊन सत्याच्या शोधासाठी घराबाहेर पडले होते. संन्याशी बनण्यासाठी राजकोट येथील रामकृष्ण मठात गेले होते. त्यांच्यावरील विवेकानंदांच्या प्रभावामुळेच द गार्डियनने आपल्या संपादकीयात लिहिले, १६ मे २०१४ पर्यंत भारतात ब्रिटिशांचेच राज्य होते आणि नरेंद्र मोदी यांच्या निवडीमुळे भारत खर्या अर्थाने स्वतंत्र झाला.

-------

स्वामी विवेकानंदांनी आधुनिक काळामध्ये जगद्गुरू भारताची संकल्पना मांडली. समर्थ भारताशिवाय जगद्गुरू भारत ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही, याची जाण स्वामीजींना होती.

स्वामी विवेकानंदांनी स्वातंत्र्य आंदोलनाला गती दिली, इतकेच नाही तर पुढील काळात भारत कधीच परतंत्र बनणार नाही यासाठीची पायाभरणीही केली. जे कार्य त्यांच्या पश्चातही हजारो वर्षे चालू राहणार आहे. आणि वृद्धिंगत होत राहणार आहे.

स्वामी विवेकानंद म्हणतात,
मी भविष्यकाळात डोकावून पाहात नाही. तसे करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण एक चित्र माझ्या दृष्टीपुढे साक्षात् उभे राहते : ही प्राचीन माता पुन्हा एकदा जागी झाली आहे. सर्व वैभवांसह पुनश्च आपल्या सिंहासनावर आरूढ झाली आहे. शांतिमंत्रांनी आणि आशीर्वचनांनी तिचे आगमन जगापुढे प्रकट करू या !

विवेकानंद केंद्राचे मासिक - विवेक विचार । ऑगस्ट २०१७ मधून साभार 
vivekvichar.vkendra.org

Sunday, July 9, 2017

गुरुपौर्णिमा : मुळांचे पोषण

यावर्षी गुरुपौर्णिमेसाठी आपण "मुळांचे पोषण’ हा विषय घेतला आहे.
स्वामी विवेकानंद म्हणतात, "तुम्ही झाडांच्या मुळांना पाणी घाला. सर्व झाडाला ते आपोआप मिळेल.’
वेद ही आपल्या राष्ट्राची मुळं आहेत. वेद म्हणजे काय तर वेदांची एकात्म दृष्टी आणि वैदिक मूल्ये, तत्त्वे.

Wednesday, June 21, 2017

योग आणि बौद्ध धम्म - साम्यस्थळे आणि वेगळेपण


डेव्हिड फ्राॅली,

विविध धर्मांचे साक्षेपी अभ्यासक. भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरव केला.

योग आणि बौद्ध धम्म या प्राचीन भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीतून विकसित झालेल्या भगिनी परंपरा आहेत. या दोन्ही परंपरांमध्ये अनेक संज्ञा एकसारख्या आहेत. अनेक तत्त्वं आणि उपासना एकसारख्या आहेत. यामुळेच माझ्यासारख्या पाश्चात्त्य देशात जन्म झालेल्या माणसाला सुरुवातीच्या काळात तरी योग आणि बौद्ध धम्माची शिकवण एकसारखी वाटते, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

वास्तविक पाहता या दोन्ही परंपरांमध्ये फरक नसल्यामुळे त्यातील शिकवण आणि साधना यांचा आम्ही एकत्र अभ्यास करू शकतो. ऐतिहासिकदृष्ट्या या दोन्ही पद्धतींमध्ये अस्तित्वात असलेल्या वेगळेपणामुळे त्यांना स्वतंत्र परंपरा म्हणून वेगळे ठेवले आहे. परंतु आमच्यासारख्या पाश्चिमात्यांच्या दृष्टीने या दोन्ही परंपरांत वेगळेपणापेक्षा समानताच अधिक आहे किंवा या दोन्हींपैकी एका परंपरेचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीची समजूत अशी होऊ शकते की, त्या परंपरेचा दुसऱ्यावर प्रभाव पडला आहे.
बौद्ध धम्माचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीस योगामध्ये इतकी समानता आढळून येईल की, त्याला वाटू शकते की योगावर बुद्ध धम्माचा मोठा प्रभाव आहे. योगाचे अध्ययन करणाऱ्याला बौद्ध धम्मात इतकी समानता आढळून येईल की, त्याला वाटू शकते बुद्ध धम्मावर योगशास्त्राचा अमिट प्रभाव आहे.
तथापि, या दोन महान आध्यात्मिक परंपरांतील समानता शोधण्याची जिज्ञासा फक्त पश्चिमेपुरती मर्यादित नाही. पश्चिमेकडे योगशास्त्र सर्वप्रथम आणण्याचे श्रेय महान योगी स्वामी विवेकानंद यांना जाते. ते वेदांती होते. त्यांनी बौद्ध महायान ग्रंथावर भाष्य केले आहे. बौद्ध तत्त्वज्ञानाची प्रमुख तत्त्वे आणि वेदांत तत्त्वज्ञान हातात हात घालून जातात, हे त्यांनी पुरेसे स्पष्ट करून सांगितले आहे. अलीकडच्या काळात आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्यासह तिबेटी निर्वासित मोठ्या प्रमाणात भारतात आले. त्यानंतर या दोन्ही परंपरांमध्ये सुसंवाद होऊन परस्परांविषयी आदरभावना वाढीस लागल्याचे दिसते. तिबेटी बौद्ध अनेकदा हिंदूंच्या धार्मिक संमेलनांमध्ये सहभागी होताना दिसतात आणि सर्व प्रकारच्या चर्चा, विचारविनिमय यामध्येही भाग घेतात.

अलीकडच्या काळातील संदर्भ घेऊन दोन परंपरा जोडणे हा माझा उद्देश नाही. हिंदू-बौद्ध एकत्रीकरणाची अनेक उदाहरणे इतिहासात दिसून येतात. बुद्ध स्वत: हिंदू धर्मात जन्मले होते आणि काही विद्वानांनी असा दावा केला आहे की, गौतम बुद्ध यांच्या महानिर्वाणानंतर अनेक वर्षांपर्यंत हिंदू धर्मापेक्षा वेगळा धर्म म्हणून बुद्ध धम्म अस्तित्वात नव्हता. मध्ययुगीन काळात इंडोनेशियामध्ये शिव-बुद्धांची उपासना अस्तित्वात होती. अनेक तांत्रिक योगींना हे सांगणे अवघड आहे की, ते हिंदू आहेत की बौद्ध. मध्ययुगीन काळात हिंदूंनी विष्णूचे अवतार म्हणून बुद्ध स्वीकारले आणि बहुतेक हिंदू अजूनही मानतात की, आपण बुद्ध-अवतार युगात आहोत. बहुतांश हिंदू गौतम बुद्धांची उपासना करत नसले तरी गौतम बुद्ध हे महान ऋषी असल्याची त्यांची श्रद्धा आहे.

असे असले तरी समानतेची सूत्रे बाजूला ठेवल्यास दोन्ही परंपरांमध्ये काही मतभेद आहेत, हे आपण नाकारू शकत नाही. मतभेद आणि वादविवाद यामुळेच या दोन्ही परंपरा आजवर पूर्णपणे एकजूट होऊ शकल्या नाहीत. दोन्ही परंपरांतील काही प्रथा आणि इतर बाबी आजपर्यंत वेगळ्या चालत आल्या आहेत. सामान्यतः हिंदू योग परंपरेने गौतम बुद्धांची वेदांतिक प्रकाशात पुनर्मांडणी केली आणि बुद्धांना आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. बौद्ध धर्माने मात्र आपले वेगळेपण जपण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचे दिसते. वैदिक आस्तिकता आणि स्व:च्या उच्च स्वरूपाला असलेली वैदिक मान्यता या दोन्ही बाबींशी असलेली असहमती बौद्ध परंपरेने जपली आहे.
बहुतेक हिंदू आणि बौद्ध गुरूंनी (यामध्ये विविध योग संस्था चालवणारे हिंदू आणि तिबेटी बौद्धही आले) आपल्या शिकवणीमध्ये विवेकभाव आणणे आवश्यक आहे. विशेषत: साधना आणि अंतर्दृष्टी याचा सूक्ष्म स्तरावर विचार करताना. योगविषयक ग्रंथांमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी बौद्ध मताचे खंडन केल्याचे दिसते आणि बौद्ध ग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी योग आणि वेदांत मताचे खंडन केल्याचे दिसते. म्हणूनच आपण या दोन परंपरांतील साम्यस्थळांचा गौरव करताना त्यांतील मतभेदांकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

योग परंपरा
शास्त्रीय योग प्रणालीचा विचार करता ही प्रणाली ऋषी पतंजली यांनी योगसूत्रांद्वारे मांडली. पतंजली ऋषींनी मांडलेली प्रणाली ही मोठ्या वैदिक परंपरेचा केवळ एक भाग होता. ऋषी पतंजली यांच्याकडे योग परंपरेचे संस्थापक म्हणून कधीही पाहिले गेले नाही, हे ध्यानात घेतले पाहिजे. योगशास्त्राचे संकलक म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. आधीपासून चालत आलेल्या परंपरेचा आधार घेत त्यांनी अष्टांगयोगाचा मार्ग सांगितला. यामध्ये नैतिक शिस्त (यम आणि नियम), आसन, श्वसनाद्वारे प्राणशक्तीचे नियमन (प्राणायाम), इंद्रियांचा निग्रह (प्रत्याहार), एकाग्रता (धारणा), ध्यान आणि समाधी यांचा समावेश होतो.
योगाकडे पाहण्याचा हा आठ आयाम असलेला दृष्टिकोन बहुतेक हिंदू विचाराच्या संस्थांमध्ये स्वाभाविकपणे दिसून येतो. पुराणे, महाभारत आणि उपनिषद आदी पतंजलीपूर्व साहित्यात योगासंबंधीची ही मूलभूत चर्चा दिसून येते. योग परंपरेचा उगम हिरण्यगर्भापासून झाला असे मानले जाते. हिरण्यगर्भ हा विश्वातील सृजनशील आणि उत्क्रांती शक्तीचे प्रतीक आहे.
ऋग्वेदामध्ये योगाचा शोध घेतला जाऊ शकतो, जो हिंदूंचा सर्वात प्राचीन ग्रंथ समजला जातो. या ग्रंथामध्ये मनाचा संयम आणि सत्याकडे घेऊन जाणाऱ्या अंतर्ज्ञानाबद्दल वर्णन आले आहे. योगाच्या सुरुवातीच्या महान गुरूंमध्ये वशिष्ठ, याज्ञवल्क आदी महान वैदिक ऋषींचा समावेश होतो. भगवान श्रीकृष्ण हे सर्वात महान योगी होते. म्हणूनच त्यांना योगेश्वर असे म्हटले जाते. भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेल्या भगवद््गीतेला योगशास्त्रही म्हटले जाते. हिंदू देवतांपैकी भगवान शिव यांना आदियोगी म्हटले जाते. म्हणूनच शास्त्रीय योग आणि बौद्ध धम्म यांची तुलना करताना सामान्यपणे बौद्ध आणि हिंदू मत (त्यातही विशेषकरून हिंदू धर्मातील योग आणि वेदांताचा भाग) यांची तुलना करावी लागते.
काही लोक, विशेषतः पश्चिमेमध्ये, असा दावा केला जातो की, "योग हिंदू किंवा वैदिक नसून एक स्वतंत्र किंवा अधिक सार्वभौमिक परंपरा आहे. ते दाखवतात की हिंदू शब्द योगसूत्रांत दिसत नाही आणि योगसूत्रांचा हिंदुत्वाच्या मूलभूत उपासनापद्धतींशीही काही संबंध नाही.’ वरवरचे वाचन करणाऱ्यांना असेच दिसते. योगसूत्रे ही हिंदू आणि वैदिक तत्त्वज्ञानाच्या तांत्रिक संज्ञांसह प्रचलित आहेत. ग्रंथांमध्ये या संज्ञांचे विस्तृत आणि तपशीलवार विवरण आढळून येते. 

योगशास्त्र हे वेद, भगवद््गीता आणि उपनिषद यांचा अधिकार स्वीकार करणाऱ्या वैदिक तत्त्वज्ञानाच्या सहा दर्शनांतील एक आहे. या परंपरेतील भाष्यकारांनी हे ठळकणे पुढे आणले आहे. बृहद योग याज्ञवल्क्य स्मृती हा प्रारंभिक योगशास्त्रावरील एक महान ग्रंथ आहे. यामध्ये आसन आणि प्राणायाम साधनेसह वैदिक मंत्र आणि उपासना याविषयीचे वर्णन आहे. अनेक संख्येने असलेल्या योग उपनिषदांमध्येही असेच वर्णन आहे. एखाद्याने या महान परंपरेला दूर सारून योग सूत्रांचा अभ्यास करायचा प्रयत्न केला तर तो मार्ग चुकणार हे निश्चित आहे. कारण योगसूत्र हे केवळ सूत्र रूपात आहेत. सूत्र म्हणजे अतिशय छोटी वाक्ये आहेत. बहुतेक वेळा अर्धवट भासणारी ही वाक्ये विस्तृत भाष्याशिवाय जवळजवळ अर्थहीन ठरतात किंवा त्या सूत्रांतून अनेक अर्थ निघू शकतात. त्यामुळे एखाद्याला योग सूत्र आणि योग परंपरेचा अभ्यास करायचा असेल तर त्याने केवळ त्या विषयावर आधुनिक काळात व्यक्त होणाऱ्या मतांचा विचार करून चालणार नाही. संबंधित सूत्राचा विचार अधिकृत ग्रंथ, भाष्य आदींचा आधार घेतच करावा लागेल.
पश्चिमेकडील योग शिक्षकांसह अनेकजण म्हणतात की योग हा धर्म नाही. हा मुद्दा विचार करण्यासारखा असला तरी यातून प्रामुख्याने दिशाभूल करण्याचाच अधिक प्रयत्न असतो. योग हा ईश्वर किंवा तारणकर्त्याकडे जाण्याचा आम्ही सांगतो तोच एकमेव मार्ग खरा आहे. अशा प्रकारचा प्रचार करणाऱ्या कोणत्याही धार्मिक शिकवणीचा भाग नाही. भारतातील योग शिक्षक हे त्यांच्या विद्यार्थ्यांनी औपचारिकरीत्या हिंदू धर्म स्वीकारला पाहिजे यासाठी कधीच आग्रह करत नाहीत, हे खरेच आहे. असे असले तरी योग हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा भाग आहे आणि हिंदू धर्माच्या सर्व पैलूंशी आणि भारतीय संस्कृतीशी तो जोडलेला आहे. योग हा आत्मा, ईश्वर आणि अमरत्वाचे स्वरूप उलगडून दाखवतो, जे संपूर्ण जगभरातील धर्मांचे प्रमुख विषय आहेत. योग हा केवळ व्यायाम किंवा आरोग्याशी संबंधित नसून  धर्म (रिलीजन या अर्थाने नव्हे) हा त्याचा मुख्य विषय आहे. योग हा प्रामुख्याने धर्माच्या आध्यात्मिक बाबींशी निगडित असला तरी तो उपासनापद्धतींशी संबंधित किंवा संस्थात्मक स्वरूपाचा नाही.
स्वैर अनुवाद : सिद्धाराम
साभार : विवेक विचार । जून २०१७
vivekvichar.vkendra.org

Monday, April 10, 2017

विवेक विचार : एप्रिल २०१७

मागील 1200 वर्षांपासून भारतीय मनाला छळणारा एक प्रश्‍न आजही कायम आहे. 1947 ला तेव्हा देशाच्या नेतृत्वस्थानी असलेल्या हिंदू नेत्यांना वाटले, ‘मुस्लिमांसाठी वेगळी भूमी देऊ, त्यामुळे या प्रश्‍नातून सुटका होईल.’ त्यासाठी काकडी कापावी इतक्या सहजतेने मातृभूमीचे तुकडे पाडले गेले. त्यानंतरही लक्षावधी निष्पाप देशवासीयांची कत्तल रोखणे शक्य झाले नाही. लाखोंना आपल्याच भूमीतून परागंदा व्हावे लागले. अगणित लोकांना निर्वासिताचे जगणे नशिबी आले. प्रश्‍न जसाच्या तसा राहिला. भारतीयांनी जिहादी मानसिकता कधीच समजून घेतली नाही. ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांची अक्षम्य अवहेलना करण्यात आली. परिणामी, उर्वरित खंडित भारतातही जिहादी फुटिरता कायम राहिली. वाढत गेली. पश्‍चिम बंगाल, आसाम, केरळसारख्या अनेक राज्यांमध्ये हिंदूंची संख्या मोठ्या प्रमाणात घटू लागली आहे. काही ठिकाणी 2 टक्के तर काही ठिकाणी 18 ते 20 टक्क्यांनी फरक झाला आहे. आजही काही मुस्लिमबहुल ठिकाणी निर्वासित होण्याची वेळ हिंदू कुटुंबांवर येत आहे. आता जनतेत हळूहळू जागृती होत आहे. आव्हानाचे स्वरूप पाहता ती खूपच तोकडी आहे. या पार्श्‍वभूमीवर बीबीसीचे माजी पत्रकार, विचारवंत आणि ओपन सोर्स इन्स्टिट्यूटचे संचालक श्री. तुफेल अहमद यांची लेखमाला विवेक विचारच्या वाचकांसाठी सुरू करत आहोत. या लेखांमधून लेखकाने या देशाला दीर्घकाळ छळणार्‍या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येईल.



Saturday, April 8, 2017

१० कारणे, मदरशांपासून का व्हावी इस्लाममधील सुधारणांना सुरुवात !


२०५० पर्यंत सुमारे ३१.१ कोटी लोकसंख्येसह भारत हा जगातील सर्वात अधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश असेल. या पार्श्वभूमीवर आधुनिक लोकशाही देशाने काही ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

तुफैल अहमद,
संचालक, ओपन सोर्स इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली
 
शांतीपूर्ण इस्लामची चर्चा करताना इस्लाममधील सुधारणांना सुरुवात कोठून करायची हे आपण समजून घेणे आवश्यक आहे. येथे काही मुद्द्यांची चर्चा करत आहे. मदरशांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणात बदल करणे का आवश्यक आहे, हे यातून समजू शकेल. असे करणे मुसलमानांच्या आणि संपूर्ण भारताच्या हिताचे आहे.
माझ्या मनात दोन प्रश्न आहेत. आम्हाला सांगण्यात येते की, शांततेने करण्यात येणारे इस्लाम धर्मांतरण ठीक आहे. उदाहरणार्थ. हिंदू युवती जिने इमाम बुखारीच्या मुलाशी लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारला. अतिशय शांततेत. इमाम बुखारी हे दिल्लीच्या जामा मशिदीचे इमाम आहेत. पहिला प्रश्न : २१ व्या शतकातील स्वतंत्र विचारांशी शांतीपूर्ण इस्लाम तर्कसंगत आहे काय? दुसरा प्रश्न : कुराण आणि हदीसमध्ये बदल होऊ शकत नाही. तर मग भारतातील मुस्लिमांमध्ये परिवर्तन आणण्याचा काही मार्ग आहे काय? या दुसऱ्या प्रश्नावरच चर्चा करू.

।। १ ।।
शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना विनाशुल्क आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध केले जाते. यानुसार, ६ ते १४ वयोगटातील सर्व मुले चांगल्या शाळेत असली पाहिजेत; मदरशांमध्ये नव्हे. एक चांगली शाळा म्हणजे जिथे विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या विषयांचे शिक्षण मिळाले पाहिजे, जसे की मुख्य प्रवाहातील शाळांमधे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळते. जर एखादी मदरसा या शिक्षणविषयक नियमांचे पालन करत नसेल तर शिक्षण हक्क कायद्यानुसार त्या मदरशाला बेकायदा घोषित करून त्यावर बंदी घातली पाहिजे.

।। २ ।।
मदरसे हे स्वातंत्र्यासाठी धोकादायक आहेत. मदरसे म्हणजे स्वतंत्रता विरोधी आंदोलनच. २१ व्या शतकातील स्वतंत्रतेच्या विचारांना अनुकूल शिक्षण तेथे दिले जात नाही. सेक्युलर हिंदू नेता आणि इस्लामिक बुद्धिजीवी हे धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली मदरशांना योग्य ठरवत असतात. परंतु, भारतीय राज्यघटनेनुसार धार्मिक अधिकार हा अन्य सर्व मौलिक अधिकारांचा विचार करता अतिशय कमी महत्त्वाचा अधिकार आहे. धार्मिक अधिकाराच्या अनुच्छेद २५ मधील दोन बाबींवरून धार्मिक अधिकार कमी महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट होते.
२५ (१) : लोकव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्याच्या विषयांत आणि या भागातील अन्य उपविषयांसाठी (घटना ही मौलिक अधिकारांनी युक्त आहे.)
२५ (२) : "या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट कोणत्याही कायद्याचे काम करण्यात किंवा राज्याने कोणताही कायदा बनवताना प्रभावित करणार नाही.’
धार्मिक अधिकारांना काहीच महत्त्व नाही, असे माझे म्हणणे नाही. माझे म्हणणे असे की, धार्मिक अधिकार हे अन्य मौलिक अधिकारांपेक्षा कमी महत्त्वाचे आहेत. समजा, माझ्याकडे खाण्याचा मौलिक अधिकार आहे, माझ्याकडे पिण्याचा मौलिक अधिकार आहे आणि माझ्याकडे श्वास घेण्याचा मौलिक अधिकार आहे. पण, माझ्याकडे असलेला श्वास घेण्याचा मौलिक अधिकार हा  माझ्या खाण्या-पिण्याच्या मौलिक अधिकारांहून मोलाचा आहे. म्हणूनच धार्मिक अधिकार हा वयाच्या १८ वर्षांच्या आधी मौलिक अधिकार होऊ शकत नाही. तुम्ही १८ वर्षे पूर्ण होण्याआधी सेक्स करू शकत नाही. १८ वर्षे पूर्ण होण्याआधी मतदान करू शकत नाही. तद्वत तुम्ही १८ वर्षांचे होण्याआधी धर्माचा मौलिक अधिकार तुम्हाला मिळू शकत नाही.

।। ३ ।।
मदरसे मुस्लिम मुलांच्या मेंदूवर ६ ते १४ वर्षांच्या महत्त्वाच्या वयातच ताबा मिळवतात. मुलांचे हे वय शिक्षण हक्क कायद्यांतर्गत सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता आहे. १४ वर्षांचे वय झाल्यानंतर, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलांना कुराण आणि हदीस शिकवण्याची परवानगी मदरशांना देता येऊ शकेल. आपण या घटनात्मक नियमांचे पालन केले तर आशा करू शकतो की, किमान २० टक्के भारतीय मुस्लिम येत्या ५० वर्षांत सामाजिक बदलाचे सूत्रधार बनून पुढे येतील.
कृपया माझी सर्वात मोठी चिंता समजून घ्या : भारताने ६ ते १४ वर्षे वयाच्या मुलांप्रती आपल्या दायित्वाचा त्याग केला आहे. भारताने आपली जबाबदारी टाळलेली आहे. इतकेच नाही तर या देशाने मुलांच्या भविष्याशी निगडीत आपले दायित्व मदरशांसारख्या धार्मिक संस्थांकडून संचलित करण्याला मान्यताही देऊन टाकली आहे.
।। ४ ।।
आता समान नागरी कायद्याबद्दल थोडे... वैयक्तिक धार्मिक कायद्यांना एका सरकारी कायद्याने दूर करण्याचा हा प्रस्ताव आहे. यामुळे मुस्लिम महिलांना समानतेचा अधिकार मिळणार आहे. राज्यघटनेचा आत्मा स्पष्ट आहे; पण न्यायाधिशांमध्ये स्पष्टता येण्याची आवश्यकता आहे. राज्यघटनेनुसार, भारतीय गणराज्य मुस्लिम, ख्रिश्चन आणि हिंदूंना एक समुदाय म्हणून नाही तर व्यक्तिगत रूपात पाहण्यासाठी अधिकृत आहे. याचा अर्थ असा की, जर एखादी मुस्लिम महिला मुस्लिम पर्सनल लाॅमुळे तिच्या समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन होत आहे म्हणून न्यायालयात गेली तर तिच्या अधिकारांना मुस्लिमांच्या वैयक्तिक कायद्यापेक्षा मोलाचे मानून संरक्षण दिले जाईल. कारण भारतीय राज्यघटनेनुसार कोणाही व्यक्तीवर एखादा समुदाय आपला हक्क गाजवू शकणार नाही.

।। ५ ।।
हिंदू - मुस्लिम दंगे आणि आरक्षणाचे राजकारण याच्या मुळाशी मुस्लिमांची जड मानसिकता आणि अल्पसंख्याक सिंड्रोम हे कारण आहे. सेक्युलर हिंदू नेते या मानसिकतेला खतपाणी घालत असतात. यामुळे त्यांच्या समजुतीतील सेक्युलॅरिझमच्या विचारांना जीवदान मिळत असते. ही जड मानसिकता संपवण्यासाठी भारताने पोेलिसांत झीरो टाॅलरन्स सुधारणा घडवण्याची आणि देशातील सर्व दारिद्र्यरेषेखालील कार्डधारकांच्या (गरिबीरेषेखाली जीवन जगणारे परिवार) मुलांना त्यांचा धर्म आणि जात न पाहता पुस्तके, कपडे आणि शिक्षण विनामूल्य देण्याचे राष्ट्रीय धोरण बनवण्याची आवश्यकता आहे. यामुळे आरक्षणाचे राजकारण मागे पडेल. हे शक्य आहे.

।। ६ ।।
आता पहिल्या प्रश्नाकडे जाऊ या. शांतीप्रिय इस्लामचा स्वतंत्रतेशी काही ताळमेळ आहे काय ? धर्मनिरपेक्ष हिंदू मुसलमानांना सांगतात - आम्ही तुम्हाला "धर्मनिरपेक्षता आणि नोकऱ्या, महाविद्यालयांमध्ये ५ टक्के आरक्षण देऊ.' एक मुसलमान म्हणून मला असे वाटते की, धर्मनिरपेक्ष हिंदू नेत्यांनी मुसलमानांना सांगावे की, "आम्ही ५ टक्के आरक्षणाचे आश्वासन देणार नाही. पण आम्ही आपल्या मुलीला पहिलीपासून गणित, अर्थशास्त्र आणि विज्ञानाचे शिक्षण देण्याची हमी अवश्य देऊ.’ मुस्लिम आई-वडिलांसाठी माझा असा तर्क आहे की, जर तुम्ही एलकेजीपासून (लोवर किंडरगार्टेन, पहिलीच्या आधीची दोन वर्षे) कुराण शिकवू शकता तर पहिलीपासून गणित का शिकवू शकत नाही? हा तर्क शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेतच यायला हवा.

।। ७ ।।
अरब स्प्रिंगला यश आले नाही. कारण मुस्लिम समाजात स्वतंत्र लोकशाही विचारांसाठी कोणतीही आधारभूत अशी रचना नव्हती. इस्लामी सत्ता किंवा आयएसआयएसला जागतिक स्तरावर समर्थन मिळताना दिसते. कारण भडकवणारे विचार आमच्या समाजात आधीपासूनच अस्तित्वात आहेत. या विचारांमुळेच जिहादींनी पॅरिसमध्ये चार्ली हेब्दोवर हल्ला केला होता. बरेलवी मौलवी याच विचारांचा प्रचार भारतभर करताना दिसत आहेत. प्रामुख्याने ईशनिंदा आणि धर्म सोडण्याच्या मुद्द्यावरून याचा प्रचार होताना दिसतो.
भारत सरकारने एक दीर्घकालीन रणनीती आखली पाहिजे. यानुसार पहिली ते बारावी इयत्तेपर्यंत तीन अभ्यासक्रम सुरू केले पाहिजेत. १. भारतीय क्लासिक्सवरील अभ्यासक्रम : उपनिषद, महाभारत, गीता, भारतीय तत्त्वज्ञ व विचारवंतांवर आधारित. २. भारतीय राज्यघटनेच्या तत्त्वांवर आधारित. आणि ३. यामध्ये सर्व धर्मांतून संकलित केलेले चांगले विचार असतील.

।। ८ ।।
अबू बकर अल बगदादी याने स्वत:ला खलिफा घोषित करण्याच्या दोन महिने आधी मुंबईतील चार तरुण इराकला जाऊन आयएसआयएसमध्ये सहभागी झाले. त्यानंतर केरळ आणि आझमगड येथूनही काही मुसलमान गेले. इतर काही जणांना भारत सोडण्यापूर्वीच हैदराबाद आणि कोलकाता येथे थांबवण्यात आले होते. एक युवक मुंबईतील अमेरिकन स्कूलमध्ये आत्मघाती हल्ल्याची तयारी करत होता. आॅस्ट्रेलिया, सिंगापूर, अफगाणिस्तान-पाकिस्तान, यूएई, कतार या ठिकाणी राहणारे काही भारतीय सीरियाला निघून गेले. सध्या आसाम, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ आदी काही भारतीय राज्यांमध्ये आयएसआयएस समर्थकांच्या हालचाली दिसून येत आहेत. सध्या सीरियात किमान ५० ते ३०० भारतीय आयएसआयएसच्या बाजूने लढत असल्याची माहिती आहे.

।। ९ ।।
इस्लाममधील सुधारणांच्या संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मुसलमान युवा पिढी आपले माता-पिता आणि इस्लामी मौलवींकडून परंपरेने मिळालेल्या विचारांचा त्याग करू शकते काय? सुदैवाने, इतिहासातील काही उदाहरणे आपल्या आशा पल्लवित करतात. युवा पिढीने इटली आणि जर्मनीत नाझीवाद आणि फासीवादासंबंधी आपल्या आई - वडिलांच्या मान्यतांचा त्याग केला होता. भारतातही, हिंदू तरुणांनी जाती आणि सतीच्या प्रथेचा त्याग केला. ख्रिश्चन धर्म आणि यहुदीवादाने आंतरिक संघर्षाला तोंड दिले. बायबल आणि टोरा सर्वसामान्य लोकांच्या जीवनातून हद्दपार झाला. भारताने मनुस्मृतीतील कालबाह्य गोष्टींचा त्याग केला. मध्य पूर्वेतील धर्मांमध्ये इस्लाम हा सर्वात अलीकडचा आहे, त्यामुळे आशा करायला वाव आहे. कुराणाची भूमिका मशिदींपर्यंत मर्यादित होणे आवश्यक आहे. आम्ही शांतीप्रिय इस्लामचे अध्ययन केले पाहिजे, आणि भारतात इस्लामिक सुधारणांचे बीज ६ ते १४ वर्षे वयातच पेरले गेले पाहिजे.

।। १० ।।
संवादातील हा बदल आतूनच येतो, मुसलमानांमधूनच येतो असे म्हणता येणार नाही. कारण संपूर्ण इतिहासात सामाजिक बदल हा वेगळ्या विचारांच्या प्रभावाने, जागतिकीकरणाने, युद्ध आणि औद्योगिकीकरणाने झाल्याचे दिसते. मवाळपंथी मुसलमान हा नेहमी ज्वलंत मुद्द्यावर झोपून राहतो. पण उदारवादी मुसलमानाची एखाद्या कट्टरपंथी इस्लामिक मौलवीशी चर्चा सुरू झाली तर मात्र मवाळपंथी मुसलमान दोघांवर हल्लाबोल करण्यासाठी सरसावून पुढे येतो.
भारतात धर्मनिरपेक्षता या शब्दाचे तीन अर्थ होतात - १. हे विचारांचे आंदोलन आहे. सामाजिक जीवनातून धर्म बाजूला काढून माणसाला आपले दैनंदिन जीवन सार्थक आणि तर्कसंगत पद्धतीने जगण्याची शक्ती देणारे विचार म्हणजे धर्मनिरपेक्षता. २. धर्म निरपेक्षता या शब्दाचा राज्यघटनेतील अर्थ आहे - भारतीय सत्तेने धोरणांची आखणी करताना धर्मापासून अंतर राखणे आवश्यक असते. ३. याला व्यावहारिक संदर्भ आहेत. यामुळे भारतीय अस्वस्थ आहेत. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली "मुस्लिम' आणि बुरख्याचे समर्थन केले जाते. कट्टरवादी इस्लामिक विचारांची बाजू घेतली जाते. धर्मनिरपेक्षता या शब्दाचा आपल्या सोयीने अर्थ लावण्याच्या प्रवृत्तीमुळे देशातील सामाजिक एकोप्याची खिल्ली उडवली जात आहे.
स्वैर अनुवाद - सिद्धाराम

Friday, January 6, 2017

'समर्थ भारत पर्व : January 2017

गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती. जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद. १२ जानेवारी ही स्वामीजींची जयंती. 

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सर्वच स्तरांतील लोकांचे जीवन गतिमान झाले आहे. जीवनात अचानक आलेल्या या गतीमुळे सर्वसामान्यांची स्थिती भांबावल्यासारखी झाली आहे. ज्ञानार्जन करू पाहणाऱ्या तरुणांची स्थितीही याहून वेगळी नाही. अशा स्थितीत मनाला स्थैर्य देऊन आपल्या प्रगतीला सहाय्यक ठरणाऱ्या विचारांची निकड आहे. अशावेळी ‘फोटोग्राफिक मेमरी’साठी प्रसिद्ध असलेल्या स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्या मदतीला धावून येतात. नोबेल परितोषिक विजेते आणि विख्यात विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘तुम्हाला जर भारत जाणून घ्यायचा असेल, तर विवेकानंदांचा अभ्यास करा. त्यांच्यात सर्वच सकारात्मक आहे, नकारात्मक काहीही नाही.’ सकारात्मक विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. सकारात्मक विचारामुळे जीवनाचे नंदनवन होऊ शकते, परंतु केवळ सकारात्मक विचार उपयोगाचे नसून, माणसाला आपल्या ध्येयाची निश्‍चितीही करता आली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘एखादे ध्येय निश्‍चित केलेला मनुष्य शंभर चुका करीत असेल, तर ध्येय नसलेला मनुष्य दहा हजार चुका करतो.’ तात्पर्य असे की, ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, परंतु असे असले, तरी ध्येयाची निवड देखील महत्त्वाची बाब असते.