Monday, May 25, 2009
मे सम्पादकीय
दक्षिण हिंदुस्थानातील काही मंदिरे आणि गुजराथेतील सोमनाथाचे मंदिर आपल्याला खूपच काही शिकवून जातात. पुस्तकांच्या राशी वाचून हिंदू वंशाच्या इतिहासाबाबत जी समज येणार नाही, ती केवळ सोमनाथाकडे पाहिल्याने येईल. शतावधी प्रहारांच्या आणि शतावधी पुनर्निर्माणाच्या कहाण्या या मंदिरावर आपल्याला वाचता येतील. ही मंदिरे पुनःपुन्हा भग्न होत होती आणि पुनःपुन्हा राखेतून उभी राहत होती - नव्या चैतन्याने, नव्या सामर्थ्याने! हाच आपला राष्ट्रीय स्वभाव आहे, हाच आपला राष्ट्रीय जीवनप्रवाह आहे. त्याचे अनुगामी व्हा! तो तुम्हाला वैभवाप्रत नेईल. त्याचा पाठपुरावा सोडून द्या - लगेच तुमचा मृत्यू, तुमचा विनाश ठरलेलाच आहे!
- स्वामी विवेकानंद
वाचक बंधू - भगिनी,
संपूर्ण देश लोकसभा निवडणुकीने ढवळून निघाला आहे. हा अंक आपल्या हाती पडेपर्यंत कदाचित निवडणुकांचे निकाल लागलेले असतील. देशाचे नेतृत्व कोण सांभाळेल, हे स्पष्टही झालेले असेल किंवा त्रिशंकू परिस्थिती उद्भवल्यास स्वार्थप्रेरित शक्ती सक्रीय होतील. निकाल काहीही लागू द्या - जनतेला तिच्या लायकीप्रमाणे राज्यकर्ते मिळतील, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही!
लोकशाहीमध्ये मतांना मूल्य असते. वैचारिक प्रबोधनाने मते बदलतात. मते बदलही घडवून आणू शकतात. जनतेसमोर उदात्त विचार नसतील तर मते विकली जातात. मतदार मतदान न करण्यातच धन्यता मानतात. केवळ 40-45 टक्केच मतदान होते. अशावेळी दोनपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असतील तर एकगठ्ठा मतदान करणाऱ्या जमाती (15 टक्के मते) विजयी उमेदवार ठरवतात. येथे प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरते. वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या जनतेसमोर काय चित्र उभे करतात, यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे; कारण प्रसारमाध्यमे समाजमन घडवीत किंवा बिघडवीत असतात.
आज प्रसिद्धीमाध्यमे व्यावसायिकतेकडे अधिक झुकली आहेत. समाजाच्या दृष्टीने, राष्ट्राच्या दृष्टीने हितकारक काय अन् अहितकारक काय, याचा विचार करणे मागासलेपणाचे ठरवले जात आहे. भारतीय जनमनावर एकप्रकारे वैचारिक हल्ला चढविला जात आहे. पारंपरिक युद्धापेक्षा वैचारिक युद्ध अधिक परिणामकारी असते. प्रशिक्षित मनेच वैचारिक युद्धाला यशस्वीपणे तोंड देऊ शकतात. वैचारिक आक्रमण हे पुराणांमधील "मायावी' राक्षसांच्या आक्रमणाप्रमाणे असते. या देशाचे अहित चिंतणाऱ्या शक्तींनी बेमालूमपणे धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा आपल्या विकट चेहऱ्यावर चढविला आहे. इस्लामी मूलतत्त्ववाद आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांचा विस्तारवाद याकडे कानाडोळा करून या देशातील राष्ट्रीय विचारधारेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करण्याचा प्रयत्न नेटाने सुरू आहे.
या देशाचा आत्मा असलेल्या हिंदुत्वालाच संपविण्याचा प्रयत्न सुरू झाल्यामुळे राजकीय आणि सामाजिक सुधारणांकडे स्वाभाविकपणेच दुर्लक्ष होत आहे. या अंकामध्ये ज्येष्ठ विचारवंत एस. गुरुमूर्ती यांच्या "घटनाचक्र' या सदरात "वैचारिक पुनरुज्जीवनाची गरज' हा लेख आहे. या लेखातून वैचारिक आक्रमणाचे अनेक पैलू आपल्यासमोर उलगडत जातात.
याच महिन्यात स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची जयंती आहे. सशस्त्र क्रांतीचा केतू उभारताना बौद्धिक लढ्यासाठी प्रचंड वाङ्मय निर्माण करणारे सावरकर हे या देशाचे अलौकिक महापुरुष आहेत. 'Savarkar In The Light Of Vivekananda' या पुस्तकाची मराठी आवृत्ती सावरकर जयंतीदिनी प्रकाशित होत आहे. यानिमित्ताने या पुस्तकातील एक प्रकरण या अंकात देत आहोत.
Wednesday, May 13, 2009
अंदमानचा कर्मयोगी
"सावरकर इन द लाईट ऑफ विवेकानंदा' या पुस्तकाची मराठी आवृत्ती "सावरकर आणि स्वामी विवेकानंद
- वैचारिक एकरुपता' या नावाने विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागातर्फे सावरकर जयंतीचे
औचित्य साधून प्रकाशित करण्यात येत आहे. पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक आणि सोलापूर येथील
विवेकानंद केंद्र शाखांतर्फे महाराष्ट्रात विविध प्रकाशन समारंभांचे आयोजन करण्यात आले आहे.
मनोज नाईक यांनी लिहिलेल्या या पुस्तकातील एक अनुवादित प्रकरण येथे देत आहोत। -संपादक
श्रीमद् भगवद् - गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात
"" अर्जुना ! नीट लक्ष देऊन पहा ! " मजजवळ नाही ' असे काहीच नसते आणि " मी काही मिळवावे ' असेही काही नसते, तरीही मी सतत कार्यरतच असतो. " कार्य करणे ' मी क्षणभरासाठी जरी थांबवले, तरी अवघे विश्व नष्ट होऊन जाईल. काही मिळावे, कशाचा तरी लाभ व्हावा या इच्छेने जे काम करतात, त्या लोकांहून वेगळया, प्रज्ञावंत लोकांनी कसल्याही लाभाची अपेक्षा न धरता, तसेच बांधिलकी, ओढ न ठेवता, कार्य करीत रहावे.''
हीच कर्मयोगाची मध्यवर्ती कल्पना आहे. सावरकरांच्या जीवनाचा अभ्यास केला तर असे आढळून येईल, की वरील शिकवणुकीशी मिळती जुळती अशीच त्यांची विचारसरणी होती. त्यांच्या तोडीची बुध्दिमत्ता असलेल्या माणसास, " आवाक्यांत येणार नाही ' असे काही सुध्दा नव्हते. सात पिढयांना पुरुन उरेल इतकी धनदौलत, पैसा - अडका मिळवणे त्यांना मुळीच अशक्यप्राय नव्हते. श्रीमंती, ऐषआरामी आयुष्य जगणे, त्यांना सहज शक्य होते. पण स्वतःसाठी काही मिळवणे हे त्यांचे कधीच उद्दिष्ट नव्हते. व्यक्तिगत लाभासाठी काही करणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. ते स्वतः तत्त्वज्ञान जगले व म्हणूनच त्यांना तत्त्वज्ञानी म्हणावयाचे. निव्वळ शुष्क तत्त्वज्ञान इतरांस शिकवणे, त्यांनी कधीच केले नाही.
अंदमानच्या अंधार कोठडीमध्ये फार अमानुष वागणूक मिळत असूनही या महान आत्म्याने गंभीर गुन्हे केलेल्या गुन्हेगारांना आणि अन्य काही अट्टल दरोडेखोरांसमान असलेल्या बदमाषांना प्राथमिक शिक्षण देण्याचे कामही स्वेच्छेने आणि जिद्दीने केले. हेतू असा होता, की भावी काळात, स्वतंंत्र भारतात हेच लोक अव्वल देशकार्य करण्यास उपयोगी पडतील.
त्यांच्या तरुण वयांत " अभिनव भारत ' या त्यांनीच स्थापन केलेल्या संस्थेचे मुख्य नेते म्हणून ते युवकांना वारंवार एकच गोष्ट बजावून सांगत, की कशाचाही नाश करण्यापूर्वी त्याच्या जागी कोणते नवीन कार्य निर्माण करणार आहात? ते आधी पक्के ठरवा.
दूरदृष्टी असलेले सावरकर "" राज्यशास्त्र आणि घटनात्मक कायदेकानून '' या विषयांत विशेष निष्णात होते आणि " घटनात्मक समस्या ' केंद्रस्थानी ठेवून ते लिखाण करीत व भाषणे देत असत.
स्वामी विवेकानंदांनी सुध्दा माणूस घडविणे हेच व्रत अंगिकारले होते. देशाच्या प्रत्त्येक कानाकोपऱ्यातील समाजापर्यंत शिक्षणाचा प्रसाार होणे आवश्यक असल्याचे त्यांचे मत होते. इंग्रजांनी लादलेली शिक्षण प्रणाली त्यांना पार नापसंत होती. कारण त्या योगे आत्म सन्मान, श्रध्दा दुर्बल होते आणि स्वतःच्या हिंदुत्वाचा - भारतीयत्वाबद्दल वाटणारा वंशाभिमान हा नष्ट होतो. त्यांच्या स्वतःच्याच अशा स्वयंस्फूर्त शब्दांत सांगायचे झाले तर ते असे होते -
"" सारी माणसे कशी श्रध्दा-विहीन होत आहेत ते पहा. लहान मुलास शाळेत घातल्या घातल्या सर्वांत प्रथम त्याच्या मनावर हे बिंबवण्यात येते की त्याचे वडील म्हणजे एक मूर्ख गृहस्थ आहेत. त्याचे आजोबा हे सुध्दा एक माथेफिरु आहेत. त्याचे गुरुजन हे सारे दांभिक, ढोंगी आहेत आणि सर्व पवित्र हिंदू ग्रंथ तद्दन खोटे आहेत. याचा संकलित परिणाम म्हणून जेव्हा तो षोडशवर्षीय होतो तेव्हा तो एक कणाविहीन, निर्जीव आणि नकारात्मक प्रवृत्तीचा गोळाच बनतो. ''
म्हणून विवेकानंदांची इच्छा अशी होती की "" पवित्र कार्यासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या संन्यस्त वृत्तीच्या व्यक्तिंची फौज उभारावी आणि त्यांनी खेडयापाडयांत गावोगावी जाऊन आम जनतेला त्यांचा वडिलोपार्जित सांस्कृतिक अमोल ठेवा काय होता ते समजावून सांगावे. त्यांचा भव्य दिव्य असा भूतकाळ त्यांना वर्णन करुन सांगावा, म्हणजे ते पराभूत मनोवृत्ती आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडतील आणि त्यांची स्वश्रध्दा जागृत होईल. ''
याच्याच बरोबरीने त्यांचा असाही दृष्टीकोन होता की "" आम जनतेला आपला इतिहास , आपला भूगोल, ऐहिकासंबंधीचे ज्ञान, अन्य राष्ट्रांनी केलेल्या प्रगतीचा इतिहास, भूगोलशास्त्र अशा विविध ज्ञान - शाखांनी समृध्द करावे. ''
विवेकानंदांची ही दूरदृष्टी सावरकरांनी प्रत्यक्षांत आणली होती. सदैव कार्यतत्पर राहणाऱ्या या युवकास विश्रांती, ऐषआराम, या शब्दांचा जरासासुध्दा अर्थ माहिती नव्हता. निष्ठावान् शिक्षकाच्या कौतुकास्पद, आत्मसमर्पित वृत्तीने, प्रेमाने व सहनशीलतेने त्यांनी त्या अल्पबुध्दी, सुस्त गुन्हेगारांना वाचन व लेखन यांचे प्राथमिक धडे देण्याचे काम अंगावर घेतले. काही राजकीय कैदी पदवीधर व पदव्युत्तर पदवीधारकही होते. पण त्यांच्यापाशी इतरांना शिकविण्यासाठी लागणारा उत्साह, कळकळ व सहनशीलता नव्हती, या कामाकडे, " एक कंटाळवाणे काम ' म्हणून पाहू नये हा मुद्दा सावरकरांनी त्यांच्या मनावर ठसविला. उगाचच विचार करीत कुढत बसण्यापेक्षा आपल्याजवळचे ज्ञान त्यांनी या पतित गुन्हेगारांना सुशिक्षित करण्यासाठी वापरावे असे सावरकरांचे म्हणणे होते. ते म्हणतात, "" परदेशस्थ थोर धर्मप्रसारक, पश्चिमेकडील देशांमधील तुरुंगात असलेल्या गुन्हेगारांना ज्ञानप्रदान करण्याचे कार्य सातत्याने करीत असतात. रशियामध्ये सुध्दा हजारो क्रांतीकारक, तेथील खेडयापाडयात जाऊन दुर्दैवी व अडाणी जनतेमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचे कार्य पार पाडण्यामध्ये आपले उभे आयुष्य खर्च करतात. तर मग आपणच या कामाविषयी कमीपणा का मानावा ?''
अशाप्रकारे शिकवून तयार केलेल्या अंदमान येथील कैद्यांमध्ये कर्तव्यदक्षता आणि जागृतीची जाणीव बाणवीत असताना ते म्हणतात - ""आपणापैकी काही लोकांनी तरी या कामांसाठी स्वतःस वाहून घ्यायला हवे ... केवळ लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या पत्करुन आणि उच्च-पदांवर डोळा ठेवून आणि कंटाळवाणे व कष्टप्रद काम इतरांवर सोपवणे ... याच्याचसाठी आपला जन्म झाला आहे काय? अशी भावना मनांत ठेवणे हे अयोग्य नाही का? खरंखुरं व विश्वसनीय अशा प्रकारचे राष्ट्रीय कर्तव्य, तळागाळातील आणि पायाखाली तुडवल्या गेलेल्या लोकांचा उध्दार करुनच सुरु व्हावयास हवे. ''
सावरकरांची हरएक कृती, त्यांचे एकूण एक विचार हे शुध्द चैतन्य पाझरणारे असेच होते. दररोजचे कष्टप्रद काम आटोपल्यावर आणि रात्रीचे भोजन उरकल्यावर सर्व कैदी एकत्र जमत व सावरकर त्यांना भारताच्या प्राचीन इतिहासाबद्दल, पूर्वीच्या वैभवशाली कालखंडाबाबत गोष्टी सांगत. तसेच युरोपचा इतिहास व त्यांच्या राजकारणाच्या अर्थशास्त्राची मूलतत्वे याविषयीही माहिती देत.
या कैद्यांचे वाचन सुधारावे व त्यांना अधिकाधिक ज्ञान व्हावे यासाठी त्यांनी तुरुंग अधिक्षकांकडे एक अर्ज सादर केला होता. यथावकाश तेथे वाचनालय सुरु केले.
स्वामी विवेकानंद, राजा राममोहन रॉय, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, रविंद्रनाथ टागोर, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी रामतीर्थ, संतकवी ज्ञानेश्वर यांची चरित्रे आणि त्यांचे इतर लिखाण, काव्ये यांचा सावरकरांनी कैद्यांना परिचय करुन दिला व ते वाचावयासही प्रवृत्त केले. त्याचप्रमाणे रामायण, महाभारतासारखे धार्मिक गं्रथ, महाकाव्ये, कुराण - ग्रंथ हे ही त्या ग्रंथालयामध्ये समाविष्ट केले. पाश्चिमात्य देशामधील रुसो, शेक्सपीयर, व्हॉल्टेअर, स्पेन्सर, टॉलस्टॉय आदि थोर लेखक, महान तत्त्ववेत्ते यांचे ग्रंथही यथावकाश वाचनालयात ठेवण्यात आले. राजकीय क्रांतिकारकांना, सावरकरांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील ग्रंथांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. सावरकरांनी अंदमान सोडले त्यावेळी त्या वाचनालयात अंदाजे दोन सहस्त्र पुस्तके संग्रहीत झालेली होती. स्वतः सावरकरांनी पण " राज्यशास्त्र व अर्थशास्त्र यांची मूलतत्त्वे' यांबद्दलची थोडी फार माहिती कारागृहांतील कोठडीच्या भिंतींवर खिळयाने वा गारगोटीच्या दगडांनी कोरुन लिहून ठेवली होती. या कोठडीतून त्या कोठडीमध्ये कैद्यांची अदलाबदल जेव्हा होत असे तेव्हा भिंतीवरील त्या लिखाणाच्या सहाय्याने कैद्यांना आपला स्वाध्याय करता येत असे.
सावरकरांचे उद्दिष्ट सफल झाले होते. त्यांनी जेव्हा अंदमान सोडले तेव्हा कैद्यांमधील 60% साक्षर बनलेले होते. यावरुन आठवण येते ती - भगवद् गीतेमध्ये स्वतः भगवंतांनी जे आश्वासन दिले होते त्याची. ते असे आहे.
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोेशसंभवम् ।। 10 . 41
"" जेव्हा केव्हा तुम्हां लोकांना एखाद्या माणसाचे अंगी असामान्य, अलौकिक, अध्यात्मिक शक्ती असल्याचे जाणवते, तेव्हा तुम्ही हे पक्केपणाने समजा की त्या व्यक्तीच्या अंगी "" माझे अस्तित्व '' आहे. त्या माणसाच्या अंगचे अलौकिक सामर्थ्य हे फक्त माझ्यापासूनच आलेले असते''
असे वाटते, की खरोखर प्रत्यक्ष भगवंतच स्वतःचे चैतन्य सावरकरांना बहाल करुन त्यांच्यामार्फत कार्य करवून घेत होता. एरवी सावरकरांसारख्या असामान्य कर्तृत्ववान व्यक्तीकडून, मानवजातीच्या भल्यासाठी एवढे प्रदीर्घ प्रयत्न, मोठ्या निश्चयपूर्वक रीतीने कसे केले गेले असते ?