गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती. जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद. १२ जानेवारी ही स्वामीजींची जयंती.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सर्वच स्तरांतील लोकांचे जीवन गतिमान झाले आहे. जीवनात अचानक आलेल्या या गतीमुळे सर्वसामान्यांची स्थिती भांबावल्यासारखी झाली आहे. ज्ञानार्जन करू पाहणाऱ्या तरुणांची स्थितीही याहून वेगळी नाही. अशा स्थितीत मनाला स्थैर्य देऊन आपल्या प्रगतीला सहाय्यक ठरणाऱ्या विचारांची निकड आहे. अशावेळी ‘फोटोग्राफिक मेमरी’साठी प्रसिद्ध असलेल्या स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्या मदतीला धावून येतात. नोबेल परितोषिक विजेते आणि विख्यात विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘तुम्हाला जर भारत जाणून घ्यायचा असेल, तर विवेकानंदांचा अभ्यास करा. त्यांच्यात सर्वच सकारात्मक आहे, नकारात्मक काहीही नाही.’ सकारात्मक विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. सकारात्मक विचारामुळे जीवनाचे नंदनवन होऊ शकते, परंतु केवळ सकारात्मक विचार उपयोगाचे नसून, माणसाला आपल्या ध्येयाची निश्चितीही करता आली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘एखादे ध्येय निश्चित केलेला मनुष्य शंभर चुका करीत असेल, तर ध्येय नसलेला मनुष्य दहा हजार चुका करतो.’ तात्पर्य असे की, ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, परंतु असे असले, तरी ध्येयाची निवड देखील महत्त्वाची बाब असते.