Monday, May 25, 2009

मे सम्पादकीय

आपण आपल्या राष्ट्रीय चैतन्याचे प्राणपणाने जतन केले, त्यासाठी सर्वस्व समर्पण केले, म्हणूनच शतकानुशतके होत आलेले आघात आपण सोसू शकलो. आपल्या पूर्वजांनी त्यासाठी सारे काही सोसले, अगदी मृत्यूसही कवटाळले. आपले धर्मचैतन्य सांभाळले. परकीय आक्रमणांच्या बेबंद लाटेखाली मंदिरांमागून मंदिरे कोसळत होती, पण ती लाट परतून जाताच त्याच मंदिरांचे कलश पुन्हा एकदा उन्नत मस्तकाने उभे राहिले.
दक्षिण हिंदुस्थानातील काही मंदिरे आणि गुजराथेतील सोमनाथाचे मंदिर आपल्याला खूपच काही शिकवून जातात. पुस्तकांच्या राशी वाचून हिंदू वंशाच्या इतिहासाबाबत जी समज येणार नाही, ती केवळ सोमनाथाकडे पाहिल्याने येईल. शतावधी प्रहारांच्या आणि शतावधी पुनर्निर्माणाच्या कहाण्या या मंदिरावर आपल्याला वाचता येतील. ही मंदिरे पुनःपुन्हा भग्न होत होती आणि पुनःपुन्हा राखेतून उभी राहत होती - नव्या चैतन्याने, नव्या सामर्थ्याने! हाच आपला राष्ट्रीय स्वभाव आहे, हाच आपला राष्ट्रीय जीवनप्रवाह आहे. त्याचे अनुगामी व्हा! तो तुम्हाला वैभवाप्रत नेईल. त्याचा पाठपुरावा सोडून द्या - लगेच तुमचा मृत्यू, तुमचा विनाश ठरलेलाच आहे!
- स्वामी विवेकानंद
वाचक बंधू - भगिनी,
संपूर्ण देश लोकसभा निवडणुकीने ढवळून निघाला आहे. हा अंक आपल्या हाती पडेपर्यंत कदाचित निवडणुकांचे निकाल लागलेले असतील. देशाचे नेतृत्व कोण सांभाळेल, हे स्पष्टही झालेले असेल किंवा त्रिशंकू परिस्थिती उद्‌भवल्यास स्वार्थप्रेरित शक्ती सक्रीय होतील. निकाल काहीही लागू द्या - जनतेला तिच्या लायकीप्रमाणे राज्यकर्ते मिळतील, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही!
लोकशाहीमध्ये मतांना मूल्य असते. वैचारिक प्रबोधनाने मते बदलतात. मते बदलही घडवून आणू शकतात. जनतेसमोर उदात्त विचार नसतील तर मते विकली जातात. मतदार मतदान न करण्यातच धन्यता मानतात. केवळ 40-45 टक्केच मतदान होते. अशावेळी दोनपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असतील तर एकगठ्ठा मतदान करणाऱ्या जमाती (15 टक्के मते) विजयी उमेदवार ठरवतात. येथे प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरते. वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या जनतेसमोर काय चित्र उभे करतात, यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे; कारण प्रसारमाध्यमे समाजमन घडवीत किंवा बिघडवीत असतात.
आज प्रसिद्धीमाध्यमे व्यावसायिकतेकडे अधिक झुकली आहेत. समाजाच्या दृष्टीने, राष्ट्राच्या दृष्टीने हितकारक काय अन्‌ अहितकारक काय, याचा विचार करणे मागासलेपणाचे ठरवले जात आहे. भारतीय जनमनावर एकप्रकारे वैचारिक हल्ला चढविला जात आहे. पारंपरिक युद्धापेक्षा वैचारिक युद्ध अधिक परिणामकारी असते. प्रशिक्षित मनेच वैचारिक युद्धाला यशस्वीपणे तोंड देऊ शकतात. वैचारिक आक्रमण हे पुराणांमधील "मायावी' राक्षसांच्या आक्रमणाप्रमाणे असते. या देशाचे अहित चिंतणाऱ्या शक्तींनी बेमालूमपणे धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा आपल्या विकट चेहऱ्यावर चढविला आहे. इस्लामी मूलतत्त्ववाद आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांचा विस्तारवाद याकडे कानाडोळा करून या देशातील राष्ट्रीय विचारधारेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करण्याचा प्रयत्न नेटाने सुरू आहे.
या देशाचा आत्मा असलेल्या हिंदुत्वालाच संपविण्याचा प्रयत्न सुरू झाल्यामुळे राजकीय आणि सामाजिक सुधारणांकडे स्वाभाविकपणेच दुर्लक्ष होत आहे. या अंकामध्ये ज्येष्ठ विचारवंत एस. गुरुमूर्ती यांच्या "घटनाचक्र' या सदरात "वैचारिक पुनरुज्जीवनाची गरज' हा लेख आहे. या लेखातून वैचारिक आक्रमणाचे अनेक पैलू आपल्यासमोर उलगडत जातात.
याच महिन्यात स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची जयंती आहे. सशस्त्र क्रांतीचा केतू उभारताना बौद्धिक लढ्यासाठी प्रचंड वाङ्‌मय निर्माण करणारे सावरकर हे या देशाचे अलौकिक महापुरुष आहेत. 'Savarkar In The Light Of Vivekananda' या पुस्तकाची मराठी आवृत्ती सावरकर जयंतीदिनी प्रकाशित होत आहे. यानिमित्ताने या पुस्तकातील एक प्रकरण या अंकात देत आहोत.

Wednesday, May 13, 2009

अंदमानचा कर्मयोगी


"सावरकर इन द लाईट ऑफ विवेकानंदा' या पुस्तकाची मराठी आवृत्ती "सावरकर आणि स्वामी विवेकानंद
- वैचारिक एकरुपता' या नावाने विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागातर्फे सावरकर जयंतीचे
औचित्य साधून प्रकाशित करण्यात येत आहे. पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक आणि सोलापूर येथील
विवेकानंद केंद्र शाखांतर्फे महाराष्ट्रात विविध प्रकाशन समारंभांचे आयोजन करण्यात आले आहे.
मनोज नाईक यांनी लिहिलेल्या या पुस्तकातील एक अनुवादित प्रकरण येथे देत आहोत। -संपादक


श्रीमद्‌ भगवद्‌ - गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात
"" अर्जुना ! नीट लक्ष देऊन पहा ! " मजजवळ नाही ' असे काहीच नसते आणि " मी काही मिळवावे ' असेही काही नसते, तरीही मी सतत कार्यरतच असतो. " कार्य करणे ' मी क्षणभरासाठी जरी थांबवले, तरी अवघे विश्व नष्ट होऊन जाईल. काही मिळावे, कशाचा तरी लाभ व्हावा या इच्छेने जे काम करतात, त्या लोकांहून वेगळया, प्रज्ञावंत लोकांनी कसल्याही लाभाची अपेक्षा न धरता, तसेच बांधिलकी, ओढ न ठेवता, कार्य करीत रहावे.''
हीच कर्मयोगाची मध्यवर्ती कल्पना आहे. सावरकरांच्या जीवनाचा अभ्यास केला तर असे आढळून येईल, की वरील शिकवणुकीशी मिळती जुळती अशीच त्यांची विचारसरणी होती. त्यांच्या तोडीची बुध्दिमत्ता असलेल्या माणसास, " आवाक्यांत येणार नाही ' असे काही सुध्दा नव्हते. सात पिढयांना पुरुन उरेल इतकी धनदौलत, पैसा - अडका मिळवणे त्यांना मुळीच अशक्यप्राय नव्हते. श्रीमंती, ऐषआरामी आयुष्य जगणे, त्यांना सहज शक्य होते. पण स्वतःसाठी काही मिळवणे हे त्यांचे कधीच उद्दिष्ट नव्हते. व्यक्तिगत लाभासाठी काही करणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. ते स्वतः तत्त्वज्ञान जगले व म्हणूनच त्यांना तत्त्वज्ञानी म्हणावयाचे. निव्वळ शुष्क तत्त्वज्ञान इतरांस शिकवणे, त्यांनी कधीच केले नाही.
अंदमानच्या अंधार कोठडीमध्ये फार अमानुष वागणूक मिळत असूनही या महान आत्म्याने गंभीर गुन्हे केलेल्या गुन्हेगारांना आणि अन्य काही अट्टल दरोडेखोरांसमान असलेल्या बदमाषांना प्राथमिक शिक्षण देण्याचे कामही स्वेच्छेने आणि जिद्दीने केले. हेतू असा होता, की भावी काळात, स्वतंंत्र भारतात हेच लोक अव्वल देशकार्य करण्यास उपयोगी पडतील.
त्यांच्या तरुण वयांत " अभिनव भारत ' या त्यांनीच स्थापन केलेल्या संस्थेचे मुख्य नेते म्हणून ते युवकांना वारंवार एकच गोष्ट बजावून सांगत, की कशाचाही नाश करण्यापूर्वी त्याच्या जागी कोणते नवीन कार्य निर्माण करणार आहात? ते आधी पक्के ठरवा.
दूरदृष्टी असलेले सावरकर "" राज्यशास्त्र आणि घटनात्मक कायदेकानून '' या विषयांत विशेष निष्णात होते आणि " घटनात्मक समस्या ' केंद्रस्थानी ठेवून ते लिखाण करीत व भाषणे देत असत.
स्वामी विवेकानंदांनी सुध्दा माणूस घडविणे हेच व्रत अंगिकारले होते. देशाच्या प्रत्त्येक कानाकोपऱ्यातील समाजापर्यंत शिक्षणाचा प्रसाार होणे आवश्यक असल्याचे त्यांचे मत होते. इंग्रजांनी लादलेली शिक्षण प्रणाली त्यांना पार नापसंत होती. कारण त्या योगे आत्म सन्मान, श्रध्दा दुर्बल होते आणि स्वतःच्या हिंदुत्वाचा - भारतीयत्वाबद्दल वाटणारा वंशाभिमान हा नष्ट होतो. त्यांच्या स्वतःच्याच अशा स्वयंस्फूर्त शब्दांत सांगायचे झाले तर ते असे होते -
"" सारी माणसे कशी श्रध्दा-विहीन होत आहेत ते पहा. लहान मुलास शाळेत घातल्या घातल्या सर्वांत प्रथम त्याच्या मनावर हे बिंबवण्यात येते की त्याचे वडील म्हणजे एक मूर्ख गृहस्थ आहेत. त्याचे आजोबा हे सुध्दा एक माथेफिरु आहेत. त्याचे गुरुजन हे सारे दांभिक, ढोंगी आहेत आणि सर्व पवित्र हिंदू ग्रंथ तद्दन खोटे आहेत. याचा संकलित परिणाम म्हणून जेव्हा तो षोडशवर्षीय होतो तेव्हा तो एक कणाविहीन, निर्जीव आणि नकारात्मक प्रवृत्तीचा गोळाच बनतो. ''
म्हणून विवेकानंदांची इच्छा अशी होती की "" पवित्र कार्यासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या संन्यस्त वृत्तीच्या व्यक्तिंची फौज उभारावी आणि त्यांनी खेडयापाडयांत गावोगावी जाऊन आम जनतेला त्यांचा वडिलोपार्जित सांस्कृतिक अमोल ठेवा काय होता ते समजावून सांगावे. त्यांचा भव्य दिव्य असा भूतकाळ त्यांना वर्णन करुन सांगावा, म्हणजे ते पराभूत मनोवृत्ती आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडतील आणि त्यांची स्वश्रध्दा जागृत होईल. ''
याच्याच बरोबरीने त्यांचा असाही दृष्टीकोन होता की "" आम जनतेला आपला इतिहास , आपला भूगोल, ऐहिकासंबंधीचे ज्ञान, अन्य राष्ट्रांनी केलेल्या प्रगतीचा इतिहास, भूगोलशास्त्र अशा विविध ज्ञान - शाखांनी समृध्द करावे. ''
विवेकानंदांची ही दूरदृष्टी सावरकरांनी प्रत्यक्षांत आणली होती. सदैव कार्यतत्पर राहणाऱ्या या युवकास विश्रांती, ऐषआराम, या शब्दांचा जरासासुध्दा अर्थ माहिती नव्हता. निष्ठावान्‌ शिक्षकाच्या कौतुकास्पद, आत्मसमर्पित वृत्तीने, प्रेमाने व सहनशीलतेने त्यांनी त्या अल्पबुध्दी, सुस्त गुन्हेगारांना वाचन व लेखन यांचे प्राथमिक धडे देण्याचे काम अंगावर घेतले. काही राजकीय कैदी पदवीधर व पदव्युत्तर पदवीधारकही होते. पण त्यांच्यापाशी इतरांना शिकविण्यासाठी लागणारा उत्साह, कळकळ व सहनशीलता नव्हती, या कामाकडे, " एक कंटाळवाणे काम ' म्हणून पाहू नये हा मुद्दा सावरकरांनी त्यांच्या मनावर ठसविला. उगाचच विचार करीत कुढत बसण्यापेक्षा आपल्याजवळचे ज्ञान त्यांनी या पतित गुन्हेगारांना सुशिक्षित करण्यासाठी वापरावे असे सावरकरांचे म्हणणे होते. ते म्हणतात, "" परदेशस्थ थोर धर्मप्रसारक, पश्चिमेकडील देशांमधील तुरुंगात असलेल्या गुन्हेगारांना ज्ञानप्रदान करण्याचे कार्य सातत्याने करीत असतात. रशियामध्ये सुध्दा हजारो क्रांतीकारक, तेथील खेडयापाडयात जाऊन दुर्दैवी व अडाणी जनतेमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचे कार्य पार पाडण्यामध्ये आपले उभे आयुष्य खर्च करतात. तर मग आपणच या कामाविषयी कमीपणा का मानावा ?''
अशाप्रकारे शिकवून तयार केलेल्या अंदमान येथील कैद्यांमध्ये कर्तव्यदक्षता आणि जागृतीची जाणीव बाणवीत असताना ते म्हणतात - ""आपणापैकी काही लोकांनी तरी या कामांसाठी स्वतःस वाहून घ्यायला हवे ... केवळ लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या पत्करुन आणि उच्च-पदांवर डोळा ठेवून आणि कंटाळवाणे व कष्टप्रद काम इतरांवर सोपवणे ... याच्याचसाठी आपला जन्म झाला आहे काय? अशी भावना मनांत ठेवणे हे अयोग्य नाही का? खरंखुरं व विश्वसनीय अशा प्रकारचे राष्ट्रीय कर्तव्य, तळागाळातील आणि पायाखाली तुडवल्या गेलेल्या लोकांचा उध्दार करुनच सुरु व्हावयास हवे. ''
सावरकरांची हरएक कृती, त्यांचे एकूण एक विचार हे शुध्द चैतन्य पाझरणारे असेच होते. दररोजचे कष्टप्रद काम आटोपल्यावर आणि रात्रीचे भोजन उरकल्यावर सर्व कैदी एकत्र जमत व सावरकर त्यांना भारताच्या प्राचीन इतिहासाबद्दल, पूर्वीच्या वैभवशाली कालखंडाबाबत गोष्टी सांगत. तसेच युरोपचा इतिहास व त्यांच्या राजकारणाच्या अर्थशास्त्राची मूलतत्वे याविषयीही माहिती देत.
या कैद्यांचे वाचन सुधारावे व त्यांना अधिकाधिक ज्ञान व्हावे यासाठी त्यांनी तुरुंग अधिक्षकांकडे एक अर्ज सादर केला होता. यथावकाश तेथे वाचनालय सुरु केले.
स्वामी विवेकानंद, राजा राममोहन रॉय, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, रविंद्रनाथ टागोर, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी रामतीर्थ, संतकवी ज्ञानेश्वर यांची चरित्रे आणि त्यांचे इतर लिखाण, काव्ये यांचा सावरकरांनी कैद्यांना परिचय करुन दिला व ते वाचावयासही प्रवृत्त केले. त्याचप्रमाणे रामायण, महाभारतासारखे धार्मिक गं्रथ, महाकाव्ये, कुराण - ग्रंथ हे ही त्या ग्रंथालयामध्ये समाविष्ट केले. पाश्चिमात्य देशामधील रुसो, शेक्सपीयर, व्हॉल्टेअर, स्पेन्सर, टॉलस्टॉय आदि थोर लेखक, महान तत्त्ववेत्ते यांचे ग्रंथही यथावकाश वाचनालयात ठेवण्यात आले. राजकीय क्रांतिकारकांना, सावरकरांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील ग्रंथांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. सावरकरांनी अंदमान सोडले त्यावेळी त्या वाचनालयात अंदाजे दोन सहस्त्र पुस्तके संग्रहीत झालेली होती. स्वतः सावरकरांनी पण " राज्यशास्त्र व अर्थशास्त्र यांची मूलतत्त्वे' यांबद्दलची थोडी फार माहिती कारागृहांतील कोठडीच्या भिंतींवर खिळयाने वा गारगोटीच्या दगडांनी कोरुन लिहून ठेवली होती. या कोठडीतून त्या कोठडीमध्ये कैद्यांची अदलाबदल जेव्हा होत असे तेव्हा भिंतीवरील त्या लिखाणाच्या सहाय्याने कैद्यांना आपला स्वाध्याय करता येत असे.
सावरकरांचे उद्दिष्ट सफल झाले होते. त्यांनी जेव्हा अंदमान सोडले तेव्हा कैद्यांमधील 60% साक्षर बनलेले होते. यावरुन आठवण येते ती - भगवद्‌ गीतेमध्ये स्वतः भगवंतांनी जे आश्वासन दिले होते त्याची. ते असे आहे.
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोेशसंभवम्‌ ।। 10 . 41
"" जेव्हा केव्हा तुम्हां लोकांना एखाद्या माणसाचे अंगी असामान्य, अलौकिक, अध्यात्मिक शक्ती असल्याचे जाणवते, तेव्हा तुम्ही हे पक्केपणाने समजा की त्या व्यक्तीच्या अंगी "" माझे अस्तित्व '' आहे. त्या माणसाच्या अंगचे अलौकिक सामर्थ्य हे फक्त माझ्यापासूनच आलेले असते''
असे वाटते, की खरोखर प्रत्यक्ष भगवंतच स्वतःचे चैतन्य सावरकरांना बहाल करुन त्यांच्यामार्फत कार्य करवून घेत होता. एरवी सावरकरांसारख्या असामान्य कर्तृत्ववान व्यक्तीकडून, मानवजातीच्या भल्यासाठी एवढे प्रदीर्घ प्रयत्न, मोठ्या निश्चयपूर्वक रीतीने कसे केले गेले असते ?

Sunday, May 10, 2009

संपादकीय फरवरी

भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहायला शिकवलं ते स्वामी विवेकानंदांनी. गुलामी मानसिकतेत आनंद मानणाऱ्या भारतीय तरुणांमध्ये स्वाभीमान जागृत केला, तो स्वामी विवेकानंदांनीच. मकर संक्रातीच्या दिवशी 1863 साली त्यांचा जन्म झाला. विवेकानंदांचा जन्म झाला त्यावेळची या देशाची परिस्थिती समजून घेण्यासारखी आहे. 1857 साली ब्रिटिशांच्या विरुद्ध भारतीयांनी पुकारलेल्या युद्धात भारतीयांचा पराभव झाला होता. त्यानंतर या स्वातंत्र्ययुद्धाला शिपायांचे बंड म्हणून हिणविण्यात येऊ लागले. ब्रिटिशांच्याच अधिकारात सत्ता असल्याने इतिहासही त्यांना सोयीचा होईल याच पद्धतीने लिहिला जाऊ लागला.ब्रिटिशांच्या पदरी असलेल्या सैन्यात बहुसंख्य सैनिक हिंदू होते. सैन्यांच्या तुकड्यांमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी वेतन देऊन पाद्री नेमण्यात आले होते. ख्रिस्ती धर्म स्वीकारला की हिंदू शिपायाला सैन्यात बढती दिली जात होती. पद्धतशीरपणे ख्रिस्तीकरणाची मोहीम राबविली जात होती. हिंदू धर्माची बदनामी करण्यात येत होती. देश आणि धर्मावर होत असलेल्या आघातांमुळे क्षोभ उत्पन्न होऊन 1857 ची ठिणगी पडली होती. या युद्धात भारतीयांचा पराभव झाल्याने ब्रिटिश आणखीच मुजोर बनले होते. ब्रिटिश सत्तेचे केंद्र कोलकाता येथे होते.त्याकाळी राजधानीचे शहर असलेल्या कोलकात्यातील सामाजिक स्थितीही समजून घेतली पाहिजे. उच्च शिक्षण घेतलेल्या भारतीय तरुणांमध्ये "जे जे परकीय ते चांगले' अशी भावना निर्माण झाली होती. उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या लोकांमध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची लाटच आली होती. मूर्तीपूजेला हिणविण्यात येत होते. हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याला प्रतिष्ठितपणाचे लक्षण समजले जात होते. अशा काळात स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला आहे.शिकागो येथे सर्वधर्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जगातील अन्य देशांमधून आलेल्या धर्मिक प्रतिनिधींना ख्रिस्ती धर्माची महानता सांगायची आणि परिषदेला आलेल्या प्रतिनिधींकडूनच जगभर ख्रिस्ती धर्माचा प्रसार करायचा अशी रणनीती धर्मपरिषदेच्या आयोजनामागे होती, परंतु झाले भलतेच; सर्वधर्मपरिषदेवर स्वामी विवेकानंदांनी भारतीय धर्माचा, हिंदू धर्माचा अमिट ठसा उमटविला."माझाच धर्म खरा. आमच्या पंथाचाच ईश्वर खरा. आमच्या देवाचा स्वीकार न करणारे पापी आहेत. त्यांना या जगात जिवंत राहण्याचा अधिकारच नाही. त्यांना कसेही करून बाटवून आपल्या धर्मात ओढून आणणे गरजेचे आहे' अशी विचारसरणी असलेल्या एकांतिक धर्मांहून हिंदू धर्म खूपच व्यापक आहे. आकाशातून पडणारे पाणी या ना त्या मार्गाने अंती सागराला जाऊन मिळते, त्याप्रकारे कोणत्याही ईश्वराची उपासना केलात तरी ती उपासना अंती एकाच ईश्वराकडे जाते, असे तत्त्वज्ञान हिंदू धर्माचे आहे. भारत सोडून अन्य देशांसाठी हे तत्त्वज्ञान नवीन आणि भावणारे होते. परिणामी सर्वधर्मपरिषदेतील विवेकानंदांचे भाषण ऐतिहासिक ठरले.आपल्या भारताला गुलामीत ठेवणाऱ्या पाश्चात्यांच्या भूमीत जाऊन आमच्या देशाचा एक तरुण विजयी होतो. आपल्या संस्कृतीची आणि धर्माची ध्वजा फडकवितो, ही गोष्ट त्याकाळी भारतातील तरुणांना स्फूर्ती देणारी ठरली. विवेकानंदांनी गीता, वेद आणि उपनिषदांमधील शक्तीदायी विचार सर्वसामान्य भारतीयांना समजेल या भाषेत मांडले. या विचारांमधूनच भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला बळ आणि गती मिळाली. विवेकानंदांच्या विचारांमधून अनेक क्रांतिकारक निर्माण झाले. विवेकानंदांपासून प्रेरणा घेतलेल्या नेतृत्त्वाच्या शक्तीशाली आंदोलनामुळे लॉर्ड कर्झन याने केलेली बंगालची फाळणी रद्द करावी लागली होती.स्वामी विवेकानंदांच्या विचारांपासून हा देश दूर गेला तेव्हा देशाला फाळणीचा सामना करावा लागला. स्वातंत्र्योत्तर काळात सत्तास्थानी असलेले गुलामी मानसिकतेतच आनंद मानणारे होते. या मातीतील चिरंतन मूल्यांकडे दुर्लक्षच झाले. आजची स्थिती त्यामुळेच आव्हानात्मक बनली आहे. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे स्वकीय वैचारिक गुलामीत आनंद मानत आहेत. सर्वधर्मसमभावाचा जप करणारे लोक ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून हिंदूंचे करण्यात येणाऱ्या धर्मांतराला पाठिशी घालत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी दयानंद सरस्वती, स्वातंत्र्यवीर सावरकर, संत गाडगेबाबा, गांधीजी या साऱ्यांनी धर्मांतराचा धोका ओळखला होता. स्वामी विवेकानंद म्हणतात, "एखादा मनुष्य हिंदू धर्मातून दुसऱ्या धर्मात गेल्याने हिंदूंची संख्या एकाने कमी होते असे नाही तर आपल्या शत्रूंची संख्या एकाने वाढते.'आज लब्धप्रतिष्ठित मंडळी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा चुकीचा अर्थ लावतधर्मांतराचे समर्थन करीत आहेत. इस्लामी आतंकवादाने थैमान घातले असतानासुद्धा क्षुद्र राजकीय स्वार्थापायी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. बांगलादेशी घुसखोरांची समस्या बिकट होत चालली आहे. आपल्या देशासमोरील सर्व प्रकारच्या आव्हानांना प्रतिसाद देण्याचे सामर्थ्य स्वामी विवेकानंदांच्या विचारांमध्ये आहे. आजच्या आव्हानांच्या संदर्भात स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा व्यापक प्रमाणात अभ्यास, चिंतन आणि कार्यवाही होण्याची गरज उत्पन्न झाली आहे. या अंकातील मा. निवेदिताताई यांचा लेख या दृष्टीने मार्गदर्शक ठरणारा आहे. विवेकानंद जयंतीच्या शुभेच्छा!-संपादक

Monday, March 2, 2009

समरसता

विश्वकल्याणाचा हिंदू मार्ग

कन्याकुमारीच्या विवेकानंदपुरम परिसरातली अशीच एक नित्याची संध्याकाळ. दिवसभर वाचन आणि लेखन करून त्या संध्याकाळी थोडासा बाहेर पडलो होतो. आकाश काळ्याभोर ढगांनी भरलेले होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, असे वाटत होते. मळभ असल्यामुळे लांबचे काही दिसत नव्हते, पण माझ्यापासून थोड्याच अंतरावर एक मोर दिसत होता. एकटाच उभा होता. माझ्या अस्तित्वाची त्याला अजिबात चाहूल लागलेली नव्हती. बघता बघता त्याने आपला पिसारा उभारला आणि सुप्रसिद्ध मयुरनृत्य सुरू केले. इतक्यात पावसाची भुरभुर सुरू झाली. मग तर त्याचे नृत्य अगदीच भरात आले. त्याला त्याचवेळी नाच करण्याचा "मूड' कसा आला, याचे आश्र्चर्य करीत मी थोडासा झुडपांच्या आड दडलो आणि हर्षविभोर होऊन सुरू असलेला तो नाच बघतच राहिलो!


पाऊस पडला की मोरांना आनंद होतो आणि ते नाचायला लागतात, असे म्हणतात, ते खरेच वाटत होते। मोराचा तो नाच उत्स्फूर्त वाटत होता, मनःपूर्वक वाटत होता. थोड्या वेळात तो नाच संपला आणि तो मोर झाडाझुडपांत अदृश्य झाला, पण मी एक विलक्षण अनुभव घेतला. तो पाऊस, तो मोर आणि त्याचा नाच यांची एक विलक्षण एकतानता मी अनुभवली. तो नाच कोणी पाहत नव्हते, मी तर त्याच्या खिजगणतीतही नव्हतो. त्यामुळे कोणाला तरी खुष करण्यासाठी किंवा कोणाला तरी प्रभावित करण्यासाठी तो नाच मुद्दाम केलेला नव्हता, तर तो उत्स्फूर्त होता. आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम होता तो. मोराचा पिसारा उभारला गेला तेव्हा त्याच्या पिसांचा मनमोहक रंग दृष्टीस पडला. कोणाचेही भान हरपून जावे, असे ते दृश्य होते. नाच करतानाचे मोराचे पदन्यास इतके तालावर होते की, कसलेल्या नर्तकालाही एवढ्या तालात आणि ऐटीत पावले टाकता येणार नाहीत.

त्या दुर्मिळ दृश्याने माझ्या मनात विचारांच्या साखळीला सुरुवात झाली। निसर्गातल्या साऱ्याच प्रक्रियांमध्ये अशी तालबद्धता आणि एकतानता, समरसता आढळत असते. आपल्या सभोवती वाढणारी झाडेसुद्धा अशी उत्स्फूर्त एकतानता व्यक्त करीत असतात. पक्ष्यांचा कलकलाटसुद्धा सभोवतालच्या वातावरणाशी मेळ साधत असतो. अनेक प्रकारचे, अनेक जातींचे पक्षी कसलीही कटुता येऊ न देता सहजीवन व्यतित करीत असतात. मध्येच थोडाफार संघर्ष झाला तरीही तो विसरून ते पुन्हा एकदिलाने नांदायला लागतात. आपल्या भोवतीच्या निसर्गाचेही स्वरूप असेच आहे. हे विश्र्व व्यापक, मोठे आणि महाकाय आहे. त्यात अतिव्याप्त समुद्र आहेत. विशाल खंड आहेत. ग्रह-तारे आहेत. ग्रहमाला आणि आकाशगंगा आहेत. हे विश्र्व विस्तारत चालले आहे, पण त्याचा परिणाम होऊन कोणतेही ग्रह परस्परांवर आदळत नाहीत, ते आपापल्या भ्रमणकक्षा आणि परिघातच फिरत आहेत. जणू काही ते ठरवून दिलेल्या सूचनांबरहुकूम वागत आहेत. दिवस, रात्र, ऋतू, परिभ्रमण, आवर्तन आणि क्रांती-उत्क्रांतीची चक्रे सारे काही आखून दिल्याप्रमाणे बिनचूकपणे सुरू आहे.

आमच्या प्राचीन काळातल्या जाणत्या विचारवंतांनी आणि द्रष्ट्या ऋषी-मुनींनी ध्यान-धारणा आणि चिंतनाच्या जोरावर काळाचे हे परिभ्रमण आणि चिरंतन रचना जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. हे सारे एका शाश्वत नियमाने चालले आहे, अशी त्यांची धारणा होती. या नियमाला ते "ऋतम्‌' असे संबोधत होते. त्यांच्या मते हा सारा एका उच्चतम सत्याचा आविष्कार आहे. त्या एकमेव सत्याला ते "सत्यम्‌' असे संबोधत होते. त्या चाणाक्ष द्रष्ट्यांनी मानवतेविषयीच्या गाढ प्रेमापोटी याच नियमाने मानवी व्यवहारही संचलित व्हावेत असा सल्ला दिला होता. त्यालाच त्यांनी धर्म ही संज्ञा दिली होती. मानवाच्या वर्तनासाठीच्या तत्वांचा हाच आधार असावा, असे त्यांचे म्हणणे होते. सर्व मानवी जातच त्या धर्माच्या आधारावर चालावी, असे त्यांचे आकलन होते. म्हणजे त्यांच्या दृष्टीने धर्म हा सर्वकालिक होता, शाश्वत होता. त्यालाच त्यांनी विश्र्वधर्म किंवा सनातन धर्म म्हटले होते. व्यक्ती आणि समाज या धर्माचे पालन करतील तेव्हा या मानवी जातीत एकतानता, सहकार्य, मेळ आणि आनंद निर्माण होईल, अशी ग्वाही या विचारवंतांनी दिली होती. त्यालाच ते सत्ययुग म्हणत असत.
ज्या काळात समाजावर धर्माचे वर्चस्व होते। कसलेही अपभ्रंश न करता धर्म पाळला जात होता, तेव्हा सत्ययुग होते. मग पुढे असे काय घडले? निसर्गाशी असलेली एकतानता, मेळ गेला कुठे? मानवी जात अशा अवनत अवस्थेला येऊन का पडली? सर्वत्र अधर्माचे साम्राज्य का वाढले? याचे स्पष्टीकरण मानवी स्वभावात दडलेले आहे. मानव हा निसर्गातल्या इतर जीवांपेक्षा वेगळा आहे. एखादा मोर आनंदित झाला की, एखाद्या लहान बालकाप्रमाणे नाचायला लागतो. तो हा नाच अंतःस्फूर्तीने करतो. झाडे आणि पक्षीही असेच अंतःस्फूर्तीने वर्तन करतात. ते वर्तन ठरवून किंवा योजून केलेले नसते किंवा विचारपूर्वकही केलेले नसते. माणसे मात्र अंतःस्फूर्तीपेक्षा विचाराने जास्त वर्तन करीत असतात. मानव हा सर्वात प्रगत प्राणी आहे, पण त्यापोटी विचारपूर्वक विचार करण्याने त्याला काही गमवावेही लागले आहे. कारण शेवटी अंतःप्रेरणा या कधी चुकीच्या नसतात. त्या निसर्गाची देणगी असतात. त्या कधी गफलत करीत नसतात. विचार ही मात्र मेंदूतल्या प्रक्रियांची परिणती असते आणि विचाराने एखादी कृती करायची म्हटले की, ही कृती करावी की ती करावी? असे पर्याय असतात. त्यातून संभ्रम निर्माण होतो. पक्षी आणि प्राण्यांना असे पर्याय नसतात, त्यामुळे ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे वागतात. निसर्गाशी मेळ साधून वर्तन करतात. माणूस मात्र विचाराने वागताना निसर्गाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करतो, त्याचे नियम मोडतो आणि चुका करून बसतो. असे वर्तन करण्याच्या स्वातंत्र्याचा वापर करून माणूस निसर्ग-नियमांचा भंग करतो, त्यानुसार चाललेली प्रक्रिया बिघडवतो आणि निसर्गातील स्वयंस्फूर्त घटनांचा क्रम विचलित करतो. जसजसा माणूस शिक्षण घेत आहे, तसतसा तो संस्कृती विकसित करण्याच्या बहाण्याने काही सोयी वाढवीत चालला आहे आणि त्यासाठी निसर्गातल्या या मेळापासून दूर चालला आहे. त्यामुळे मानव आणि निसर्ग यांच्यातल्या संबंधांत बेसूरपणा वाढत चालला आहे. मानवाची "प्रगती' होत आहे, पण ती होत असताना हा बेसूरपणा किंवा बेबनाव वाढत चालला आहे. माणसाची जडवादी किंवा भौतिक प्रगती पाहिली तर तो यापूर्वी एवढा कधीच प्रगत नव्हता असे लक्षात येते, पण अशी प्रगती होत असतानाच हे जग हिंसा, संघर्ष, गुन्हेगारी यांनी त्रस्त आणि ग्रस्तही होत चालले आहे. हा संसर्ग एवढा झाला आहे की, आपण या मानवी प्रवृतींच्या प्रदूषणाला "संस्कृतींचा टकराव' असे अभिधान दिलेले आहे. प्रगती आणि हे प्रदूषण यांच्याविषयी आणि त्यांच्या परिणामांविषयी विचार करणाऱ्यांनी चिंता व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

अशा एका स्थितीशी आपली गाठ पडली आहे। साऱ्या जगाला विघातक परिणामांचा वेढा पडला आहे. एक पेचप्रसंग उभा आहे. एका संक्रमणावस्थेतून आपली वाटचाल सुरू झाली आहे. हा पेचप्रसंग लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यात विलंब झालेला चालणार नाही, परवडणार नाही. आद्य शंकराचार्यांनी आपल्या गीताभाष्यात धर्माचा विलय किंवा अधर्माचा उदय कसा होत असतो, हे दाखवले आहे. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा होत राहते आणि देवाच्या हस्तक्षेपाची गरज भासायला लागते. देव अवतार किंवा विभूतीच्या रूपाने असा हस्तक्षेप करीत असतो. मानवी जीवनातली वैगुण्ये जेव्हा समाजाच्या नेत्यात भिनतात, तेव्हा ती समाजाच्या सर्व थरांत झिरपत जातात. त्यातूनही एकप्रकारचा पेचप्रसंग जन्माला येत असतो, असंही शंकराचार्यांनी म्हटलं आहे.

""ज्यांनी धर्माचे पालन शहाणपणाला सोडचिठ्ठी देऊन केले, त्यांच्यात विषय-वासना बळावल्या. धर्म आणि मूल्य जागृती भिरकावली गेली, अधर्म आणि समाजविरोधी प्रवृत्ती अनेक पटींनी वाढल्या.''
आपण सध्या ज्या पेचप्रसंगांतून वाटचाल करीत आहोत, त्यावर मात करायची असेल तर आपल्याला सध्या आपण स्वीकारलेल्या पाश्र्चात्त्य संस्कृतीचा विचार करावा लागेल. ही संस्कृती बाकीच्या जगावर लादली गेली आहे. पाश्र्चात्त्यांनी जगात अनेक क्षेत्रांवर आपली छाप पाडली आहे, वर्चस्व निर्माण केले आहे. त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून किंवा "बळी तो कान पिळी !' या न्यायाने जगाने त्यांच्या संस्कृतीचा स्वीकार केला आहे. "सर्व्हायव्हल ऑफ दी फिटेस्ट' हेच या संस्कृतीचे सर्वमान्य तत्व आहे. या संस्कृतीचे विकास आणि प्रगतीचे तत्वज्ञान जडवादी आहे. निसर्गाचे आणि माणसाचे बेमुर्वत शोषण करून भोगवाद वाढवीत नेणे हेच या भोगवादाचे उद्दिष्ट आहे. गळेकापू स्पर्धा हाच या संस्कृतीचा कायदा आहे. भांडवलशाही असो की साम्यवाद असो, या उद्दिष्टांत फारसा फरक नाही. या साऱ्या बाबी स्वीकारल्या की परस्परातील संघर्ष आणि मतभेद यांचा प्रारंभ होतो. त्यांच्या धर्मांतही हीच शिकवण दिलेली आहे. ही सारी सृष्टी माणसाच्या सुखासाठी निर्माण झालेली आहे, त्यामुळे तिचे शोषण करण्याचा माणसाला निसर्गदत्त अधिकार आहे, असेच या धर्मांत परोपरीने सांगितले, शिकविले जात असते. असहिष्णुता हा सर्वप्रकारच्या संघषांर्चा पाया असतो आणि ती तर या धर्मांच्या मुळाशीच आहे. देवांकडून श्रध्दाळूंना मिळणारे अंतिम वरदान म्हणजे स्वर्ग, अशी त्यांची समजूत असते. फरक इतकाच की, धार्मिक नेते तो मेल्यानंतर मिळेल असे म्हणतात तर साम्यवादी तो जिवंतपणीच देण्याचे वचन देतात. सध्या जग हे एक खेडे बनले आहे. त्यामुळे या जगात बाजाराचा कायदा जारी आहे. प्रत्येकाला अमर्याद उपभोगाचे वचन देणारी आणि आमिष दाखवणारी ही व्यवस्था टिकणार नाही, कारण पृथ्वीवर उपलब्ध असलेली साधने कमालीची मर्यादित आहेत. त्यावर तंत्रज्ञानाच्या साह्याने मात करण्याचा प्रयत्न जारी आहे, पण त्यात फारसे यश येणार नाही. कारण तंत्रज्ञानाने उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर काही प्रमाणात वाढवता येतो, पण साधने तयार करता येत नाहीत. त्यातून एक विसंवाद निर्माण झाला आहे. उपभोगाला मर्यादा पडणार आहेत आणि समाजातला प्रभावशाली वर्गच भौतिक सुखाचा लाभ घेणार आहे. तो लाभ समाजाच्या वर्गापर्यंत पोचला तरच साधनांचे समान वितरण शक्य आहे, तसा तो पोचण्यासाठी प्रस्थापित सधन प्रभावशाली वर्गाला काही प्रमाणात त्याग करावा लागणार आहे. भोगवादी जडवादी संस्कृती असा त्याग करणाची शिकवण कधी देत नाही. त्यामुळे या संस्कृतीत विषमता अटळ आहे. ितच्यातून सामूहिक हिंसाचार आणि दहशतवाद याच्याशिवाय दुसरे काय निर्माण होणार आहे? परिस्थितीचे हे विश्र्लेषण सार्थ आणि तर्कशुध्द असेल तर त्यावर पौर्वात्त्य संस्कृतीचा स्वीकार हाच एकमेव इलाज आहे- हा मानवतेच्या जीवन-मरणाचा आणि पर्यायाने या पृथ्वीच्या अस्तित्त्वाचा प्रश्न आहे. आता आणि आताच त्यातल्या एका संस्कृतीची निवड करायची आहे.
ही कल्पना बरोबर पन्नास वर्षांपूर्वी जगप्रसिध्द इतिहास तज्ञ अर्नोल्ड रॉयनबी यांनी बोलून दाखवली होती।

""आज आपण इतिहासाच्या संक्रमणावस्थेतून प्रवास करीत आहोत. या प्रवासाबाबत एक गोष्ट स्पष्ट आहे की, या संक्रमणाच्या अध्यायाचा प्रारंभ पाश्र्चात्त्य असला तरी त्याचा शेवट मात्र खास भारतीय असणार आहे. तसे झाले तरच हा शेवट मानवतेसाठी हितावह ठरणार आहे. सध्याच्या काळात जग पाश्र्चात्त्य तंत्रज्ञानाच्या आधारावर आणि जडवादाच्या निकषावर एकत्र आले आहे. या जगात विविध मानवी गट एकमेकांच्या जवळ आले आहेत. या तंत्रज्ञानाने गटागटातले आणि माणसामाणसातले अंतर कमी केले आहे, पण ही माणसे आणि गट एकमेकांची नीट ओळख न होता आणि परस्परांविषयी प्रेम न वाटताच जवळ आले आहेत. एवढेच नव्हे तर परस्परांना उद्‌ध्वस्त करण्याची जबरदस्त ताकद हातात घेऊन जवळ-जवळ आले आहेत. ते गळाभेट घेतात की एकमेकांचे गळे घोटतात अशी भीती वाटते आहे. अशा या स्थितीतला हा गहन प्रश्न सोडवण्यासाठी मानवतेने भारतीय जीवनमार्ग स्वीकारणे हाच एक उपाय आहे...
...सर्व धर्मात मेळ बसवणाच्या विचारामुळे आपल्या भारतीयांमध्ये असा एक वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन विकसित झाला आहे की, त्याच्या जोरावरच साऱ्या मानवी जाती एका कुटुंबाप्रमाणे राहणे शक्य होईल. त्यातच या माणूस प्राण्याला आत्मघातकी तत्वज्ञानाच्या ऐवजी पर्यायी तत्वज्ञान पुरवण्याची क्षमता आहे.
मानवी जातीचे अस्तित्व पणाला लागले आहे. अशावेळी माणसा-माणसांच्या अंतःकरणापर्यंत रामकृष्ण भारतीय विचासरणी नेऊन पोचवायची आहे, त्या विचारांवर आपल्याला काही काम करायचे आहे. त्यामागे त्या विचारांची उपयुक्तता ठसवणे हा हेतू आहे, पण तो दुय्यम आहे. खरा आणि पहिला हेतू असा आहे की, हे विचार आध्यात्मिक सत्याच्या आविष्कारातून आणि खऱ्या तळमळीतून उगम पावलेले आहेत.''
आपण वारंवार म्हणत आहोत तो पौर्वात्य दृष्टिकोन आहे तरी काय? हे पाहिले पाहिजे, जो हिंदू जीवन दर्शनातून निर्माण झालेला आहे. वेद आणि उपनिषदांच्या संहितांत तो ग्रथित करण्यात आलेला आहे. तो आमच्या ऋषींनी मांडलेला आहे, तो दृष्टिकोन या विश्र्वाकडे आध्यात्मिक विचारांतून पाहायला शिकवतो. या दृष्टिकोनातला परवलीचा शब्द आहे "त्येन त्यक्तेन भुञ्जीथाः' तर स्वार्थ त्यागातून आनंद मिळवा ही कल्पना हा या दृष्टिकोनाचा गाभा आहे. या विचारांत आनंदाचा दुस्वास नाही, पण आनंदाच्या आधी त्याग आहे. त्यागाशिवाय भोग घेणे हा अभद्रपणा आहे. भोग किंवा आनंद यांना त्याग आणि सर्वसंगपरित्याग यांच्या साह्याने उन्नत करता आले पाहिजे, त्यांना पावित्र्यही प्राप्त करून देता आले पाहिजे. हिंदू विचारांमध्ये भौतिक बडिवार त्याज्य मानलेला नाही. आनंदाला बंदी नाही की, त्याला पाप मानलेले नाही. कमावणे आणि आनंदाने उपभोग घेणे ही इप्सिते मानलेली आहेत, पण ते सशर्त आहे, ही दोन्ही इप्सिते धर्माच्या आधारावर वर्तन करून मिळवली पाहिजेत आणि त्यांवर धर्माचे नियंत्रण असले पाहिजे. धर्म हा असा एक कायदा आहे, की जो प्रत्येक गोष्टीला लागू पडतो. सत्यम्‌ आणि ऋतम्‌ यांचा अंमल धर्माच्या रूपात होत असतो.
जेव्हा मानवी व्यवहार धर्माच्या मार्गदर्शनाखाली होतात, तेव्हा स्पर्धा संपून सहकार्य सुरू होते। हीच भावना व्यक्ती-व्यक्तीतल्या संबंधात आणि पर्यायाने समाजात सलोखा आणि सद्‌भाव निर्माण करीत असते. याच तत्वावर हिंदूंनी आपली समाजव्यवस्था उभी केली आहे. जी स्पर्धाविरहित आणि सलोखा करीत आहे. या व्यवस्थेत प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक कुटुंबाला आपापले असे काम नेमून दिलेले असते. धर्माचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. हा दंडक व्यक्तीपासून कुटुंब, समाज, सारी मानवजात आणि सारे विश्र्व असा विस्तारत जातो. तो सजीवांना तर लागू असतोच, पण निर्जीवांनाही लागू होतो. "वसुधैव कुटुंबकम्‌' ही संकल्पना याच मार्गाने राबवली जात असते. त्यात अचेतन वस्तूंसह सर्व प्राण्यांचा एका कुटुंबात समावेश केलेला असतो.

आता आपल्या संस्कृतीत ही उदात्त संकल्पना आणि आजच्या युगातली "जग हे एक मार्केट आहे' ही पाश्र्चात्त्य संकल्पना यांची तुलना करून पहा. या दोन्हींत काय फरक आहे, हे ताडून पहा, मग तुमच्या लक्षात येईल की, या फरकानेच जगाला दोन युध्दसज्ज गटतटात विभागले आहे.
पाश्र्चात्त्य विचारांत माणसाला समजून घेण्याच्या पध्दतीत मोठा दोष आहे। माणसाकडे विविध पैलूंचा पण एकात्मिक सजीव चैतन्यशाली प्राणी म्हणून पाहण्याऐवजी पाश्र्चात्त्य विचारवंत त्याच्याकडे अपूर्ण पण विभाजित दृष्टिकोनातून पाहत असतात. या भूमिकेत सुसंगती नाही. मानवतेच्या विविध पैलूंतली विविधता शेवटी एका सामान्य गुणातून उगम पावलेली असते, पण हे लोक त्या पैलूंना परस्पर विरोधी गुण म्हणून पाहत असतात. ते माणसाकडे एक साधन म्हणून पाहतात. या साधनाचा भरपूर वापर केला पाहिजे, त्याचे कमालीचे दोहन केले पाहिजे, असे त्यांचे विचार आसतात. हे सारे माणसासाठी चालले पाहिजे, असे त्यांना वाटत नाही तर माणसाला पिळून काढून झाले पाहिजे, असे त्यांना वाटते.

सध्याच्या बाजारी अर्थव्यवस्थेत तर प्रत्येक माणसाकडे ग्राहक म्हणून पाहिजे जाते आणि एक नागरिक किंवा माणूस म्हणून असलेल्या त्याच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केले जाते. ग्राहक म्हणून असलेल्या त्याच्या गरजांना प्राधान्य दिले जाते, पण त्यासाठी त्याच्या नागरिक म्हणून असलेल्या हक्कांचा बळी दिला जातो. माणसाचा विचार आध्यात्मिक विचारांचा प्राणी म्हणून करायचा असतो, पण त्याचा सध्या विसर पडला आहे. व्यक्ती व्यक्तीतले व्यवहार ज्या नैतिक मूल्यांच्या आधारावर चालतात, चालायला हवेत त्या तत्वांनाही सोडचिठ्ठी देण्यात आली आहे. मूल्यांना अंधश्रध्दा म्हणून हिणवले जायला लागले आहे. उपयुक्ततावादाने मूल्यांवर मात केली आहे. माणसाच्या अशा भ्रांत आकलनाच्या पायावर पाश्र्चात्त्य तत्वज्ञानाची इमारत उभी आहे. त्यातली तत्वे पौर्वात्त्य संस्कृतीशी तुलना करण्याच्याही पात्रतेची राहिलेली नाहीत. पाश्र्चात्त्य तत्वज्ञान हे मूल्यांबाबत उदासीन आहे. तंत्रज्ञानाचा विकासही त्यांच्या परिणामांचा विचार न करता केलेला आहे. त्यामुळे मानवी मूल्ये, सामाजिक व्यवहार यांना डोळ्यांसमोर ठेवून मानवाचा एकात्मिक विचार करणारे पर्यायी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे. इथेच भारतीय दृष्टिकोन कालोचितही ठरतो आणि अपरिहार्यही ठरतो.
पण एक प्रश्न महत्त्वाचा आहे। संस्कृती बदलणे हे काही सोपे काम नाही. संस्कृती निर्माण करावी लागते. सत्य युगाची तीच स्थिती आहे. सत्य युगाचे दुसरे नाव कृत युग आहे. तो एक आदर्श आहे. तो मानवी प्रयासांनी उभा करायचा आहे. सध्या जग हिंदू जीवनपध्दतीतून विकसित झालेल्या आदर्श व्यवस्थेची मागणी करीत आहे. ती व्यवस्था तिच्या आदर्श अवस्थेत आता सध्या अस्तित्वात नाही, पण तशी व्यवस्था निर्माण करण्याच्या ध्येयाने भारलेल्या समर्पणशील आणि प्रेरित व्यक्तींनी अथक परिश्रम करायचे आहेत, तर ती निर्माण होणार आहे. काम फार मोठे आहे, एकट्या दुकट्याने करून भागणार नाही. आमच्या पुराणांत म्हटले आहे की, अशावेळी परमेश्र्वर स्वतःच अवतार घेतो. तेव्हा तो अवतरणारच असेल तर त्याची पार्श्र्वभूमी आणि होमवर्क आपल्याला केले पाहिजे. काळाची आणि स्थितीची गरज ओळखून देवसुध्दा वेगवेगळ्या स्वरूपात अवतार घेत असतो. या कलियुगात हा अवतार या ध्येयाने झपाटलेल्या व्यक्तींच्या कार्याची पूर्ती करण्यासाठी होणार आहे. तेव्हा पौर्वात्त्य तत्वज्ञानाच्या प्रस्थापनेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकचित्ताने आणि अथकपणे काम केले पाहिजे. हे काम केवळ गप्पा मारण्याने किंवा केवळ कोणाचे तरी ताडन करण्याने साध्य होणारे नाही, तर आदर्शासाठी काम करणाऱ्या कार्यशील, प्रागतिक व्यक्तींच्या संघटनेच्या सातत्यपूर्ण आणि चिकाटीच्या प्रयत्नांनी होणारे आहे. अशा लोकांना त्यासाठी समर्पणशील भावनेने तसेच ध्येयवादाने संघटित व्हावे लागेल. अशा प्रयत्नांची गरज स्वामी विवेकानंदांनी हेरली होती. त्यांनी आपल्या उत्तर आयुष्यात आपले या संबंधातले विचार तरुण स्त्री-पुरुषांसमोर सातत्याने मांडले होते. एखाद्या संघटनेच्या नावाखाली त्यांनी संघटित होऊन हे काम करण्याचे आवाहन त्यांना केले होते.

स्वामीजींना जाऊन शतक लोटले आहे, पण त्यांच्या त्या आवाहनाचे औचित्य अजूनही टिकून आहे. त्यांच्या कल्पना सत्यात उतरवणाऱ्या मिशनरी वृत्तीच्या कार्यकर्त्यांची आजही गरज आहे. असे कार्यकर्तेच नवी संस्कृती आणि नवी व्यवस्था निर्माण करण्याचे आव्हान पेलू शकतील. विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांसाठी हाच स्वामीजींचा वारसा आहे. तो स्वीकारून अशा कार्यकर्त्यांनी स्वामीजींचे स्वप्न पुरे केले पाहिजे.
तेजस्वी तरुणांच्या नव्या पिढीसमोर हे एक आव्हान आहे। स्वामीजी म्हणत असत, ""मोठी कामे मोठ्या त्यागानेच साध्य होत असतात,'' पण त्या त्यागामागची तीव्र भावना अशा कामास सिध्द झालेल्या तरुणांच्या संख्येशी आणि गुणवत्तेशी मेळ राखणारी असली पाहिजे. स्वामीजींना हे काम किती कठीण आहे, हेही माहीत होते आणि म्हणूनच त्यांनी देशातल्या युवकांना सारे काही सोडून आपल्या युवावस्थेतला महत्त्वाचा काळ या भारत मातेच्या सेवेसाठी देण्याचे आवाहन केले होते. आपली सारी चेतना आणि तळमळ या मातृभूमीसाठीच समर्पित करावी, अशी हाक त्यांनी या तरुणांना दिली होती. ""आगामी 50 वर्षे इतर देवदेवतांचे विस्मरण झाले तरी चालेल, पण केवळ मातृभूमीलाच आपली देवता मानले पाहिजे'', असे स्वामीजी म्हणाले होेते. त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की, ""पावित्र्याच्या तेजाने तळपणारे, ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेले, मृगेंद्राचे सामर्थ्य नसांत स्फुरत असलेले, दीनदलितांबद्दल हृदयात अपार करुणा असलेले सहस्रों युवक-युवती हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र संचार करतील; मुक्ती, सेवा आणि सामाजिक उत्थानाचे आणि सर्व प्रकारच्या समानतेचे आवाहन करतील आणि हा देश पौरुषाने मुसमुसून उठेल!''

ही सारी गरज पूर्ण केली तरच सगळ्या जगाला व्यापून राहणारी शांती, समृध्दी यांनी भरलेली आणि भारलेली एक नवी व्यवस्था निर्माण होणे शक्य आहे, हेच स्वामीजींना अभिप्रेत होते आणि म्हणूनच त्यांनी म्हटले आहे। ""भारत देशा उभा रहा आणि आपल्या आध्यात्मिक ताकदीवर जग जिंकायला सज्ज रहा !''


टीप: मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे। तो सुरेलतेचा, समरसतेचा आणि सौंदर्याचा आविष्कार आहे। भारताच्या "विविधतेत एकता' या तत्वाचा आणि "सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरम्‌' या वचनाचा धारक आहे।

***

- पी. परमेश्वरन्‌
राष्ट्रीय अध्यक्ष, विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी

Tuesday, January 6, 2009

मोठ्या लोकांची क्षुद्रता


लोकभावनांच्या सोबत राहण्याऐवजी त्यांनी म्हटले की, ते आता उशाशी पिस्तुल ठेवून झोपतात. प्रसिद्ध चित्रपट निर्माता सुभाष घई यांनी एका इंग्रजी पत्रिकेला दिेलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावरून लक्षात येते की, जेव्हा तुम्ही समाजाच्या एका घटकाला कोपऱ्यात ढकलता, तेव्हा तो असहायपणे उग्र प्रतिक्रिया व्यक्त करतो. अर्थात्‌ 26 नोव्हेंबरचा हल्ला, संत्रस्त आणि दुखविण्यात आलेल्या त्या घटकाची उग्र प्रतिक्रिया होती? परंतु, इथे हे देखील सांगितले पाहिजे की, अनेक वरिष्ठ आणि "पेजथ्री'च्या "पार्टी-सर्कल'मधील नायक, लेखक-लेखिका या मुद्द्यावर असामान्य देशभक्तीसह समोर आले आहेत. त्यात शोभा डे सारखी लेखिका अग्रेसर होती. खरे म्हणजे, मुंबई आणि देशाच्या मुद्द्याला "सोशल एलिट' वर्तुळात शोभा डे यांनी सर्वात ठामपणे आणि तीव्रतेने मांडले. तिकडे मुंबईवरील हल्ल्याला "हिंदू-ज्यू' षड्‌यंत्र संबोधून नकारात्मक भूमिकेत जगण्याची धडपड करणाऱ्या मुसलमानांना "कॉवर्ट' नियतकालिकाचे संपादक एम. जे. अकबर यांनी लाथाडलेच. मुंबईवरील आक्रमकांना दहशतवादी न संबोधता केवळ बंदूकधारी म्हणणाऱ्या बीबीसीला, एम. जे. अकबर यांनी मुलाखत देण्यासही नकार दिला.
अंतुलेच नाही तर, ज्यांनी "सिमी'वरील बंदी उठविण्याची मागणी केली होती त्या लालू आणि पासवानसारख्या मंत्र्यांना सरकारात ठेवून, कॉंग्रेस पक्ष देशभक्तांच्या नजरेत गुन्हेगार ठरला आहे. दिल्लीतील बाटला हाऊस प्रकरणात कॉंग्रेेसने शहीद सुरक्षा जवानांचा अपमान केला आणि मुसलमानांची देशभक्ती व सामाजिक समन्वयाच्या भावनेला सर्वसामान्यांच्या दृष्टीने संदिग्ध बनवून टाकले. जिहादी आक्रमकांच्या समर्थनार्थ दिलेल्या अंतुले यांच्या वक्तव्यामुळे भारतातील मुसलमान खरेच खुष होतील? अगदी असेच वर्तन, बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी गोध्रा कांडाच्या चौकशीचे पाखंड रचून करण्यात आले होते. यात हिंदूंनाच स्वत:च्या व स्वत:च्या मुलांच्या हत्येचा कट रचल्याचे दोषी ठरवून मुस्लिम दहशतवाद्यांच्या बचावाची पूर्ण तयारी करण्यात आली होती. तेव्हा देखील कॉंग्रेस आणि लालूसारख्या सेक्युलर नेत्यांना वाटत होते की, गोध्राच्या मुस्लिम दहशतवाद्यांचा बचाव करून ते मुस्लिम मतदारांची मते घेऊ शकतील. अशा जातीय द्वेषयुक्त कृत्यांच्या विरोधात खुद्द मुस्लिम नेत्यांनीच उभे होऊन या राजकारण्यांपासून मुस्लिम समाजाला वेगळे करायला हवे होते, परंतु दुर्दैव हे आहे की, ते देखील अशा बाबतीत मौनी राहतात.
एवढेच नाही तर, दहशतवादासारख्या मुद्द्यावर जातीय राजकारणाचा रंग असा काही उधळला जातो की, त्यामुळे पाकिस्तानलाच मदत मिळते. उदाहरणार्थ, दिल्लीतील दोन उर्दू वृत्तपत्रांनी लिहिले आहे की, मुस्लिमांना बदनाम करण्यासाठीच "हिंदू, ज्यू आणि अमेरिकी' संगनमताने मुंबईवरील हा हल्ला करण्यात आला होता. एका दैनिकाची तर, ज्या तालिबानी विमान अपहरणकर्त्यांनी कंधारला पळवून नेलेल्या विमानातील 200 प्रवाशांना (एक सोडून) ठार केले नाही, जर मुंबईच्या आक्रमकांनाही त्यांच्यासारखेच जिहादी म्हणून सांगण्यात येत आहे तर, काय खरेच त्यांनी 200 लोकांना मारले असेल? म्हणून याची चौकशी व्हायला हवी, असे लिहिण्यापर्यंत मजल गेली.
मुंबईवरील आक्रमणाबाबत जेथे संपूर्ण भारत संकल्पबद्ध दिसत आहे, तिथे उर्दू वर्तमानपत्रांच्या एका वर्गाचे अशा प्रकारचे भ्रमोत्पादक स्वर कुठले संकेत देत आहेत?
आणखी एक उदाहरण क्रिकेटचे आहे. पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याच्या संदर्भात भारतातील प्रत्येक वैचारिक सीमारेषेच्या पल्याडचे मतैक्य आहे. भाजपा, कॉंग्रेस एवढेच नाही, तर परराष्ट्र मंत्रालय देखील एका स्वरात बोलत आहे परंतु, क्रिकेटचे खेळाडू असे काही मौनी आहेत की, जणू काही सरकार आणि राजकीय पक्ष त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यास भाग पाडत आहेत. पाकिस्तानच्या आक्रमकांच्या संदर्भात सर्वसामान्य भारतीयांनी ज्या तीव्रपणे आपला आक्रोश प्रकट केला, ती तीव्रता सचिन, सौरभ, इरफान पठाण आणि सेहवाग इत्यादींच्या वक्तव्यात कधी कुणाला दिसली का? हे क्रिकेट खेळाडू काय परग्रहावरचे निवासी आहेत काय की, जे मुंबईवरील जिहादी हल्ल्यांना दोन देशांमधील राजकीय मामला मानून स्वत:ला त्याच्या परिघाबाहेरचे "क्रिकेट विश्वाचे असंबद्ध नागरिक' मानतात? ज्या भारतीय जनतेच्या प्रेमामुळे आणि तिरंग्याच्या रंगात रंगलेल्या आत्मीयतेमुळे ऐश्वर्यपूर्ण आणि यशस्वी जीवन जगणाऱ्या या खेळाडूंचा, त्याच भारतीयांच्या वेदनेशी, दु:खाशी आणि आक्रोशाशी काहीच संबंध नाही?
अंतुले यांचे वक्तव्य आणि पाकिस्तानशी खेळण्याच्या संदर्भात क्रिकेट खेळाडूंच्या मौनाने हाच संकेत दिला आहे की, वैभवशाली वर्गाचा देश आणि त्यांची देशभक्ती त्यांच्या निहित स्वार्थाच्या नकाशापुरतीच सीमित असते. या खेळाडूंनी क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाचे गुळमुळीत समर्थन करून, विक्रमासाठी आपल्या स्वत:ला भलेही नोंदणीकृत केलेले असो; परंतु ते तिरंग्याच्या ध्वजवाहक नागरिकाच्या नात्याने प्रखर भावाने अग्रभागी दिसले नाहीत. ते कुठल्या देशाचे नागरिक आहेत? आणि मुंबईत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या क्रूरतेचे बळी ठरले, ते कुठल्या देशाचे होते?
जनतेच्या भावनांचा सन्मान करण्यासाठी अराजकीय नेतृत्व समोर येण्याची हीच वेळ आहे. आमचे साधू, संन्यासी, मुल्ला-मौलवी आणि पादरी भारताचे नागरिक नाहीत की काय? मंदिर, मशीद आणि चर्च भारतापेक्षा मोठे होऊ शकतात काय? चर्च, मशिदी आणि मंदिरांमधून भारताच्या दहशतवाद-विरोधी युद्धाच्या समर्थनार्थ वातावरण तयार होण्यासाठी प्रार्थना होणे, आवश्यक नाही काय? आमच्या देवता आणि देव केवळ व्यक्तिगत स्वार्थांच्या पूर्तीचे माध्यम आहेत काय? राष्ट्राच्या सुरक्षेसाठी त्यांना आवाहन करून जन-गण-मनाची शक्ती मजबूत करणे आणि जन-संघटनेतच ईश्वराचे दर्शन करणे अध्यात्माच्या विरुद्ध होईल काय? जर असे असेल तर, अशा स्वार्थ-केंद्रित अध्यात्माला तिलांजली देऊन राष्ट्र-केंद्रित अध्यात्माची भावना निर्माण करण्याकडे वाटचाल करावी लागेल.
(लेखक, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी शोध संस्थान, नवी दिल्लीचे निदेशक आहेत.)
अनुवाद : श्रीनिवास वैद्य

पथदर्शक बापूसाहेब


"विवेक विचार' या चौमासिकाचे मासिकात रूपांतर होऊन आता दोन वर्षे पूर्ण झाली. आदरणीय बापूसाहेब भिशीकर यांचे विवेक विचार मासिकाला सुरुवातीपासून मार्गदर्शन होत आले आहे. ग.त्र्यं. माडखोलकर आणि ग.वि. केतकर यांच्या हाताखाली संपादनाचे धडे घेतलेले एक व्यासंगी, बहुश्रुत संपादक, उत्तम लेखक आणि ऋजु व्यक्तिमत्त्व म्हणून साऱ्या महाराष्ट्राला बापूसाहेबांचा परिचय होता. बापूसाहेब यांना संघ इतिहासाचे व्यास समजले जायचे. रा. स्व. संघ आणि परिवारातल्या कार्यकर्त्यांना वैचारिक बळ पुरविणारे पुष्कळ लेखन बापूसाहेबांनी केले आहे. लक्षावधी कार्यकर्त्यांसाठी विचारांच्या रूपाने असलेला हा चिरंतन ठेवाच आहे.
सुमारे 25 ते 30 वर्षांपूर्वी "नव्या पिढीशी हितगुज' या सदरातून लिहिलेले लेख गेल्या दोन वर्षांपासून विवेक विचारमधून नियमितपणे पुन:प्रकाशित होत होते. या लेखांचा ताजेपणा इतका की बहुतेक वाचक आवर्जून विचारित "बापूसाहेब या वयातही लिहितात?'. 30 वर्षांपूर्वी लिहिलेले लेख जणु कालच लिहिले असतील असे वाटावे असे होते. विवेक विचारसाठी म्हणून बापूसाहेबांनी गेल्या दोन वर्षांत तीन लेख लिहिले. "विवेक विचारला शुभेच्छा' या शीर्षकाचा त्यांचा लेख वाचकांना स्मरत असेल.
बापूसाहेब सोलापूरच्या ज्ञानप्रबोधिनीत यायचे तेव्हा आम्ही कार्यकर्ते त्यांच्या भेटीला जात असू. या भेटींतून आम्हा कार्यकर्त्यांना कार्यासाठीची शक्ती आणि उत्साह मिळत असे. विजय ! पूर्ण विजय !! या उपक्रमासाठी बापूसाहेबांचे मोलाचे मार्गदर्शन झाले. ऋषीतुल्य जीवन जगून लक्षावधी लोकांच्या अंतरिचा दिवा पेटविणाऱ्या आणि राष्ट्रभक्तीची कास धरून कार्य करणाऱ्यांसाठी पथदर्शक ठरलेल्या बापूसाहेब भिशीकर यांना विवेकानंद केंद्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

-संपादक


पुणे तरुण भारतचे माजी संपादक, "विवेक विचार'चे मार्गदर्शक आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक चंद्रशेखर परमानंद तथा चं। प. भिशीकर यांचे सोमवार दि. 8 डिसेंबर रोजी निधन झाले. बापूसाहेब भिशीकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख.


अरुण करमरकर, मुंबई, हिंदुस्थान समाचार


पूर्णवेळ समाजकार्य करणाऱ्या प्रचारक कार्यकर्त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील परंपरा अत्यंत समृद्ध आहे. ऐन उमेदीच्या वयात व्यक्तिगत आकांक्षा आणि निजी जीवनाची उभारणी (आजच्या परिभाषेत करिअर) पूर्णपणे बाजूला सारून नि:संगपणाच्या वाटेवर काही पावले चालण्याची प्रेरणा आजवर हजारो तरुणांंच्या मनात जागविण्यात ही संघ परंपरा यशस्वी ठरली आहे. अगदी प्रारंभीच्या काळात अनेकांनी याच वाटेवर आपली मार्गक्रमणा अखंडितपणे करून आपली जीवनयात्रा संपन्न केली. तर अन्य अनेकांनी काही वर्षांनंतर प्रचारकी दिनक्रम थांबवून व्यक्तिगत जीवनाचा मार्ग पत्करला. मात्र व्यक्तिगत जीवनाकडेही त्यांनी साधना म्हणूनच पाहिले. प्रचारकी जीवनाच्या काळात प्राप्त केलेल्या जीवनदृष्टीच्या प्रकाशातच प्रत्येक पाऊल टाकण्यात आणि आपल्या कौटुंबिक जीवनाचा प्रत्येक पैलू घडविण्यात इतिकर्तव्यता मानली. चं.प. तथा बापूराव भिशीकर हे अशा तपस्वी व्यक्तिमत्त्वांपैकीच एक.
एकूण 93 वर्षांच्या आयुष्यातील 5-6 वर्षे बापूसाहेब संघाचे प्रचारक राहिले. त्यानंतरच्या 65 वर्षांमध्येही प्रचारकी मानसिकतेचा एका क्षणासाठीही त्यांनी कधी विसर पडू दिला नाही. सामूहिकता, अनामिकता, साधनसुचिता, गुणग्राहकता, मूल्यांबाबतच्या निष्ठा, प्रथमपुरुषी एकवचनी वृत्तीतून स्वत:प्रती कठोर आणि अन्यांप्रति क्षमाशीलतेचे औदार्य या साऱ्या बाबींचा विकटस्पर्श त्यांच्या वृत्तीप्रवृत्तींनी सतत जोपासून ठेवला. संघाच्या वाट्याला आलेल्या संघर्षात साहस, संयम आणि दृढनिष्ठेने सामोरे जाणाऱ्या आघाडीच्या फळीतले स्वयंसेवक ही भूमिकाही कधी सोडली नाही. विभाजनपूर्व कराची- सिंध भागात त्यांनी संघप्रचारक म्हणून काम केले, तो काळ तर सतत संघर्षाचा आणि जोखमीचा. नंतरही पत्रकार- संपादक या नात्याने ज्या तरुण भारतच्या उभारणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली त्यालाही (तरुण भारतला) सतत संकटांनी घेरलेल्या वातावरणातच वाटचाल करावी लागत आली. तशाही स्थितीत सत्य जपत आणि स्वत्वाशी तडजोड न करता त्यांनी तरुण भारत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला आणि लौकिकप्राप्त बनवला. पुढे ज्यांनी पत्रकार-स्तंभलेखक-लेखक म्हणून मानमान्यता मिळविली, अशा अनेकांना लिहिते करण्याचे श्रेय बापूसाहेबांच्याच नावावर लिहिले जाते. आणीबाणी आली, हुकुमशाहीचा बेजुमान वरवंटा लोकशाही मूल्यांना चिरडत निघाला, वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. सुमार बुद्धीचे आणि कर्तृत्वाचे सरकारी अधिकारी सेन्सॉरशिपच्या नावाखाली वृत्तपत्राच्या कार्यालयात बसून मुजोर हडेलहप्पी करू लागले. अशा अत्यंत विपरित परिस्थितीत मोठ्या कुशलतेने पण खंबीरपणे मोजक्याच पत्रकारांनी वृत्तपत्रस्वातंत्र्याची नौका हाकत ठेवली. बापूसाहेबांचे नाव अशा पत्रकार/ संपादकांच्या यादीत अग्रभागी तळपले. संघविचारावरील अतूट, अविचल निष्ठा आणि अस्सल पत्रकाराची तटस्थता यांच्यातील समतोल सांभाळण्याचे कौशल्य त्यांच्या ठायी होते. अनिष्ट, अनौचित्यावर कठोर प्रहार करताना त्यांची लेखणी कधीच थरथरली नाही, पण भाषेचे साधन, सौष्ठव, सभ्यता, शालीनता, यांच्या मार्यादांचाही त्यांनी कधी अतिक्रम केला नाही.
शाश्वत नीतिमूल्ये, सुसंस्कार यांचा पाझर तर त्यांच्या लेखणीतून अखंड स्त्रवत असे. संपादकीय आणि विविध विषयांवर विविध नियतकालिकांमधून त्यांनी दीर्घकाळ केलेले स्तंभलेखन असो. साध्या, सोप्या, सुगम आणि नेमक्या शब्दांमध्ये अर्थगर्भ लिखाण कसे करावे याचा आदर्श वस्तुपाठच बापूसाहेबांचे लेखन साकार करीत आले. म्हणूनच सध्याच्या काळात पत्रकारितेत फोफावलेल्या सवंगपणाने आणि उथळपणाने ते व्यथित होत असत. दोनच वर्षांपूर्वी राष्ट्रीय पत्रकारिता न्यासातर्फे देण्यात येणारा ज्येष्ठ पत्रकाराचा नामवंत पुरस्कार त्यांना सांगली येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्या ज्येष्ठ पत्रकार बापूराव लेलेंचे सहकारी, समकालीन या नात्यानेच बापूसाहेब भिशीकर संपादक म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरले. त्यामुळे बापूराव लेलेंच्या नावाचा पुरस्कार बापूसाहेब भिशीकर यांना हा एक अपूर्व समसमा संयोग होता. त्या समारंभात बापूसाहेबांनी केलेल्या भाषणामधून त्यांनी आजच्या पत्रकारितेवर केलेले भाष्य अतिशय मोलाचे होते. नव्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाने प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात केलेल्या क्रांतीचे त्यांनी आपल्या भाषणातून मुक्तपणे स्वागत केले, पण त्याचबरोबर यांत्रिक झगमगाटाने दीपून न जाण्याचा, पत्रकारितेच्या मूलमंत्रांचा विसर पडू न देण्याचा संदेशही आजच्या पत्रकारांना देण्यास ते विसरले नाहीत. एखाद्या मोठ्या समारंभात बापूसाहेबांनी केलेले बहुधा ते शेवटचेेच मोठे भाषण असावे. व्यक्तिगत संवादातून आजच्या साऱ्या ज्वलंत विषयांवर मनोज्ञ चर्चा करण्याचा क्रम आणि उत्साह मात्र त्यांनी अखेरच्या क्षणांपर्यंत टिकविला हे विशेष. त्यांच्यापाशी बसून ही उत्साही उद्‌बोधक चर्चा करण्याचे भाग्य मला अगदी अलीकडच्या दिवसांपर्यंत लाभत राहिले.
सध्याच्या राजकीय, सामाजिक वातावरणाबाबतची त्यांच्या मनात दाटून राहिलेली खंत त्यांच्या गप्पांमधून जाणवत असे, पण तरीही त्यांचा सूर आणि त्यांच्या वृत्ती कधीही निराशावादाकडे झुकल्या नाहीत हे विशेष. कार्यकर्त्यांमधील अभ्यासूवृत्ती, व्यासंग कमी होत चालल्याबद्दल जशी त्यांच्या मनात व्यथा होती, तशीच अनौपचारिक स्नेहसंबंध, परस्परसंवाद, संपर्क आणि त्यातून परस्परांबद्दल निर्माण होणारा विश्वास यांना ओहोटी तर लागली नाही ना ही शंका त्यांना भेडसावत असे. अडवाणी- अटलजी यांच्याविषयी सरसंघचालकांनी दिलेल्या मुलाखतीवरून प्रसारमाध्यमांनी माजवलेला गदारोळ, अडवाणी यांनी जिनांविषयी, पाकिस्तान दौऱ्यात, काढलेल्या उद्‌गारांच्या विषयावरून स्वयंसेवकांच्या वर्तुळात निर्माण झालेले अस्वस्थतेचे वातावरण, अन्यान्य राजकीय पक्षांबरोबरच भारतीय जनता पक्षातही प्रसंगी अनुभवाला येणारे निराशाजनक प्रसंग अशा अतिशय नाजूक विषयांबाबत त्यांनी प्रत्यक्ष चर्चेत तेसच पत्रांच्या द्वारे केलेले मार्गदर्शन माझ्यासाठी सदैव पथदर्शक राहील.
नव्वदी उलटल्यानंतरही शरीर मनाची सर्व गात्रे बऱ्यापैकी सक्षम स्थितीत राहिली हा अर्थातच त्यांच्या सात्विक आणि तपस्वी जीवनशैलीचा परिणाम होता. शेवटपर्यंत त्यांची लेखणी लिहिती होती हे विशेष. पत्रकार या नात्याने राजकारणावर जितक्या अधिकारवाणीने ते बोलू- लिहू शकत, तितक्याच किंबहुना त्यापेक्षा कांकणभर जास्तच अधिकाराने ते अध्यात्म सांगत- लिहित राहिले. हा अधिकार त्यांना अर्थातच व्यासंगाने आणि तपश्चर्येने प्राप्त झाला होता.
सर्वार्थाने बापूसाहेब "एक दीपस्तंभ' या विशेषणाला पात्र ठरतात. पत्रकार म्हणून स्वयंसेवक म्हणून आणि माणूस म्हणूनही त्यांचे जीवन सदैव दीपस्तंभासारखेच मार्गदर्शन करीत राहील, यात शंका नाही. ***

तरुण असोनि


तरुण असोनि
रक्त न उसळे...


आपण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष साजरे करीत आहोत. आपल्या काव्यातून महाराजांनी आपल्या भक्तांसह सर्वच देशवासीयांना मार्गदर्शन केले आहे. 1962 साली चिनी आक्रमणाच्या वेळी त्यांनी आपल्या काव्यातून सैनिकांमध्ये कशी वीरश्री निर्माण केली होती व ते काव्य आजही कसे लागू पडत आहे, याची आठवण करून देण्याचा हा प्रयत्न.
भविष्यसूचक उद्‌गार काढणाऱ्या व्यक्तींनाच आपण संत-महापुरुष मानतो. याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अपवाद नाहीत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे, दहशतवादाने आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तशीच 1962 साली चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा निर्माण झाली होती. त्या बिकट प्रसंगी संत तुकडोजी महाराजांनी, गावोगावी होणारे आपले भजन-प्रवचनांचे कार्यक्रम स्थगित करून प्रत्यक्ष रणभूमीवर धाव घेऊन सैनिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या दौऱ्यात खुद्द तत्कालीन संरक्षणमंत्रीही राष्ट्रसंतांबरोबर होते, हे विशेष!
मुंबईत ज्याप्रमाणे आधुनिक शस्त्रसज्ज दहशतवाद्यांशी महाराष्ट्र पोलिस जुनाट-कालबाह्य झालेल्या "303' बंदुकीने लढले, त्याच बंदुकीच्या साह्याने 1962 साली भारतीय सैनिक "मरू' किंवा "मारू' या ईर्षेने तळहातावर शिर घेऊन चिनी सैनिकांशी लढत होते. भारताच्या या शूरवीरांचे मनोबल उंचावण्यासाठी तसेच त्यांना स्वकर्तव्याची जाणीव देऊन प्रतीकारार्थ सज्ज राहण्यासाठी आपल्या 15 दिवसांच्या दौऱ्यात तुकडोजी महाराजांनी, सैनिकांसमोर वीरश्री निर्माण करणाऱ्या नुसत्या रचनाच सादर केल्या असे नाही, तर ते स्वत: सैनिक व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटले आणि तेथील युद्धजन्य परिस्थितीचा अनुभव घेतला.
त्या वेळी आपल्या काव्यातून राष्ट्रसंत गरजले होते-
""तैयार हुआ है हिंद तुम्हारे साथ।
आओ चीनीओ मैदानमे, देखो हिंद के हाथ।।''
एवढेच नाही, तर रणभूमीवरील विविध ठिकाणी चिनी आक्रमणाविरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी या जवानांना उद्देशून तुकडोजी महाराज उद्‌गारले होते-
""अग्नि भडकला युद्धाचा अन्‌। तू आळशी होऊनी बसे।।
तरुण असोनि रक्त न उसळे। नौजवान तुज म्हणो कसे?।।
हिंदभूच्या लेकरांनो। स्वस्थ का बसता असे?
भारताचे ग्रहण हे नेत्री । तुम्हा बघवे कसे?''
""राष्ट्र जागवा-राष्ट्र जागवा...जागृत व्हा... तरुणांनो वीर वृत्तीचा दिवा उजळण्या- जागृत व्हा तरुणांनो'' असे म्हणत राष्ट्रसंतांनी त्या वेळी जवानांमध्ये नवचैतन्य निर्माण केले होते.
गत 20 वर्षांपासून भारत दहशतवादरूपी राक्षसाचा सामना करीत आहे। या राक्षसाने देशात आपले पाय चांगलेच रोवले असून, 26 नोव्हेंबर, 08 रोजी तर मुंबईत त्याने परमोच्च बिंदू गाठत प्रशासनासह देशवासीयांना हादरवले आहे. त्याला न घाबरता धैर्याने तोंड देण्यासाठी देशासह जगातील मानव जातीने सर्व बंधने तोडून एकत्र येणे कसे आवश्यक आहे, याचेच मार्गदर्शन व प्रेरणा देण्याचे काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे काव्य आजही करीत आहे.


- विनय म. करंदीकर, नागपूर

वचन

महाराणा प्रताप यांचा तेजस्वी इतिहास कोणाला माहित नाही? मोगल सम्राट अकबराच्या ताकदीपुढे बहुतेक राजपूत सरदारांनीही शरणागती पत्करली होती. काहींनी तर बेशरमपणे आपल्या लेकीबाळी अकबराच्या जनानखान्यात घालून आपण अकबराशी सोयरीक केल्याच्या गुर्मीत ते वावरत होते. ज्या थोड्यांनी अकबराचे वर्चस्व झुगारून देव, देश आणि धर्मासाठी बलिदानाची तयारी दाखवली होती, त्यामध्ये चित्तोडचे महाराणा प्रताप हे होते.
या तत्त्वनिष्ठेचे फळ काय? तर राणा प्रताप यांना थेट विजनवासात जावे लागले. विजनवासात सर्व सैन्य हळूहळू पकडले गेले. कसेबसे फक्त राणा प्रताप आणि त्यांचे कुटुंबीय वेषांतर करून दिवस कंठू लागले. संधी मिळताच पुन्हा सैन्य जमा करून अकबरावर हल्ला करण्याचा मनात दृढनिश्चय होताच. मात्र जंगलात उपासमार होऊ लागली. चंपा ही लहान मुलगी. तिचा एक छोटा भाऊही बरोबर होता. चंपा आपल्या वाट्याला आलेली भाकरी न खाता भावाला खायला द्यायची. या उपासमारीने चंपा अखेर एकेदिवशी खूप आजारी पडली. अगदी शेवटच्या घटका मोजायची वेळ आली. राणा प्रतापांचं मन अतिशय हळवं बनलं. ते म्हणाले, "छे! काही खरं नाही. बेटी चम्पा तू काही काळजी करू नको. मी आत्ताच्या आत्ता अकबराकडे तहनामा पाठवून देतो. सगळं काही ठीक होईल.' मरणासन्न असतानाही चम्पा ताडकन म्हणाली, "छे, छे. हे काय? असला कसला विचार करता आहात? तुम्ही अकबराला शरण गेलात तर आपणा सर्वांचा मृत्यू काही चुकणार आहे काय? आज ना उद्या तो येणारच आहे. शरण जावून जगण्यापेक्षा स्वाभिमानानं आताच मेलेलं केव्हाही चांगलं. मी आता काही जिवंत राहत नाही, पण तुम्ही मला एक वचन द्या. तुम्ही कधीच शत्रूला शरण जाणार नाहीत.'
डोळ्यात आलेल्या अश्रूंना वाट करून देत राणा प्रताप यांनी मुलीला वचन दिलं. अकबरालाच काय, पण अशा कितीही मोठ्या शत्रूला पराभूत करण्याची ताकद आपल्या शरीरात या एका वचनानं निर्माण झाल्याची जाणीव राणा प्रताप यांना झाली.
साभार : युगंधर

माहेरपन


31 जानेवारी 2004 रोजी मी विक्रीकर विभागातून वर्ग 1 अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले. सेवेमध्ये असताना निवृत्त होणाऱ्या कित्येकांना, नंतरच्या रिकामपणाला धास्तावलेले मी पाहिले होते. मी मात्र निवांत होते. कारण? माझी कन्या माझे प्रेरणास्थान ! गुरुसुद्धा !!
कु. प्रांजली रामचंद्र येरीकर. विवेकानंद केंद्राची पूर्ण वेळ कार्यकर्ती! बालवाडीपासून कायम विशेष प्राविण्यासह शिक्षण घेत असलेली, कु. प्रांजली इ. 7 वीची शिष्यवृत्तीधारक बनली. इ. 10 वीला उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाली. वाचनाची, भाषा विषयांची आवड व रसिक वृत्तीमुळे महाविद्यालयामध्ये कलाशाखेत प्रवेश घेतला. मैत्रिणीच्या इच्छेखातर तो रद्द करून इंजिनीअरिंगच्या पदविकेसाठी आवेदनपत्र सादर केले. मामासारखे इंजिनीअर व्हावयाचे ठरवून सिव्हिल इंजिनीअरिंग निवडले. त्यामधील पदविका व पदवी विशेष प्राविण्यासह संपादन केली.
शाळेपासूनच कु. प्रांजली विवेकानंद केंद्राची कार्यकर्ती होती. इ.स. 2002 साली स्वामी विवेकानंद स्मृती शताब्दीनिमित्त कन्याकुमारीला गेली असताना तेथेच तिला आपले "जीवन ध्येय' गवसले. इ.स. 2003 पासून ती विवेकानंद केंद्राची पूर्ण वेळ कार्यकर्ती आहे. घरातील सर्वांची व्यवस्थित समजूत घालून कुणालाही न दुखवता तिने हे शक्य केले आहे. विवेकानंद केंद्राचे पिंपळद, ता. त्र्यंबकेश्र्वर, जिल्हा नाशिक येथे प्रशिक्षण केंद्र आहे. तेथे तिला पोहोचवायला मी स्वतः गेले होते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिची नियुक्ती मुंबई येथे करण्यात आली. तेथे 2-2।. वर्षे काम केल्यानंतर तिला "अरुणाचलमध्ये' कार्य करण्याची संधी मिळाली. ऑक्टोबर 05 पासून अरुणाचल प्रदेशाची राजधानी "इटानगर' येथे ती कार्यरत आहे.
तिच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये पिंपळद व नियुक्तीनंतर मुंबईला मी तिला भेटायला जात असे. केंद्रामध्ये चालू असलेले कार्य त्यामुळे जवळून पाहावयास मिळाले. समाजाला अशा कार्यकर्त्यांची किती निकड आहे, हे त्यावेळी प्रथमतःच जाणवले. यापूर्वी असा विचार कधीच केला नव्हता. हा विचार, ही दृष्टी कु. प्रांजलीमुळेच मिळाली होती. तिच्याबद्दल अभिमान वाटत असतानाच निवृत्तीनंतर आपणही केंद्रात दाखल व्हावयाचे असे मनाने ठरविले. तिच्या मळलेल्या वाटेवरून मी प्रवास करणार होते. ती माझी मार्गदर्शक बनली होती.
ठरविल्याप्रमाणे मी मे 2004 मध्ये केंद्रामध्ये दाखल झाले. मला प्रशिक्षित करण्यात तिचाही वाटा होता. एक वर्ष कार्य केल्यानंतर मी घरी परतले. त्या एक वर्षामध्ये मला जे केंद्रामध्ये शिकायला मिळाले, ते माझ्या अखेरपर्यंत मला उपयोगी पडणार आहे. चारित्र्य, स्वावलंबन, स्वयंशिस्त, परिश्रम व परस्पर सौहार्द ही आहे विवेकानंद केंद्राची "पंचसूत्री'! युवकांनी ती अंगिकारली तर, स्वामी विवेकानंदांचे भारताबद्दलचे स्वप्न साकार व्हायला वेळ नाही लागणार! गरज आहे ती युवकांच्या निर्धाराची! भोगाकडे पाठ फिरवून शाश्वत आनंदाला मिठीत घेण्यास सिध्द होण्याची!
कु. प्रांजली अरुणाचलला गेल्यापासून एकदा तिकडे जाऊन यायचे असे मनामध्ये वारंवार घोळविले जात होते, परंतु योग येत नव्हता, काही मार्गही सापडत नव्हता. एकटीनेच एवढ्या दूरचा प्रवास कसा करायचा? सहप्रवासी कसे भेटतील? काही दगा-फटका तर नाही ना होणार? या सर्व प्रश्नांना धाब्यावर बसवून मे-2007 मध्ये जायचे निश्चित केले. योग्य ती आरक्षणे केली. मग मात्र प्रश्न सुटत गेले, अडचणींनी काढता पाय घेतला व मी दि. 8 मे रोजी रेल्वेच्या डब्यातूनच "दृष्टमिठी' घातली प्रांजलीला !
गुवाहाटीला उतरल्यानंतर सायकलरिक्षाने तेथील विवेकानंद केंद्राकडे निघालो. ऑटोरिक्षा असताना सायकलरिक्षा का? हे माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह वाचून कु. प्रांजलीने उत्तर दिले- ""अगं आई, आपण जर सायकलरिक्षा नाही केली तर बिचाऱ्याला मिळावयाचे तेवढेही पैसे नाही मिळणार''! माझ्या डोळ्यातले कौतुक पाहून लगेच स्पष्टीकरण देऊन मोकळी! ""ही गोष्ट दादामुळे मला समजली, आम्ही मद्रासला गेलो होतो तेव्हा''! तिच्याकडे फक्त पाहातच राहावे असे मला वाटत होते.
विवेकानंद केंद्राची गुवाहाटीमधील इमारत "ब्रह्मपुत्रे'च्या अगदी किनाऱ्यावर आहे. आतील सजावट अप्रतिम आहे. स्थानिक कलाकारांची कला व कलशाची महति यांचे ते मूर्तिमंत उदाहरण आहे. केंद्रातील महिला कक्षामध्ये सामान ठेवून स्वच्छ स्नान केल्यानंतर सुश्री सुजातादीदींच्या निर्देशानुसार नाष्टा करून इटानगरकडे जाण्याचे आरक्षण करण्यासाठी बाहेर पडलो. सायंकाळी 7 वा. सुटणाऱ्या "जेटवर्कच्या' आराम बसचे आरक्षण मिळाले. काही आवश्यक वस्तूंची खरेदी करून केंद्रामध्ये परतलो. थोडी विश्रांती घेतली. इटानगरला जाण्यासाठी सामान घेऊन बाहेर पडताना पावसाळ्यापूर्वीचे "ब्रह्मपुत्रे'चे वत्सलरूप मनाला भावत होते. पैलतीरावरची झाडी दृष्टी खिळवून ठेवत होती. येथून पुढे असेच निसर्गसौंदर्य दिसणार आहे, हा दिलासा बरोबर घेऊन बाहेर पडलो.
बुधवार दि. 9 मे रोजी सकाळी 7 वा. इटानगर येथे पोहोचलो. पहाटे 4-30 लाच उजाडत असल्यामुळे सूर्य बराच वर आला होता. प्रत्येकाच्या हातामध्ये छत्री दिसत होती. 9 ते 22 मे माझा मुक्काम अरुणाचलमध्येच होता. या कालावधीत मला समजलेला अरुणाचल असा, येथे तीनही ऋतु आपल्या रौद्र-भीषण स्वरूपात अरुणाचल वासीयांच्या भेटीला येतात. "इटानगर' राज्याची राजधानी, परंतु आपल्या जिल्ह्याच्या राजधानीपेक्षा लहान! सुधारणेला वाव असलेले एकुलते शहर! बाकी सर्व प्रदेश शेती, जंगल, डोंगर-दऱ्या व नद्या यांनी व्यापलेला! त्यांच्या आश्रयाने छोटी-छोटी गावे वसलेली! मोठे उद्योग-व्यवसाय फारसे नाहीत. बहुतेक जनता मांसाहारी आहे. भात हे मुख्य अन्न आहे. जेवणामध्ये बटाट्याचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो. मसाला व लाल तिखट यांचा वापर फारच कमी प्रमाणात केला जातो. कच्ची हिरवी मिरची खातील, पण मसाला, तांबडं तिखट वर्ज्य! सर्व भाज्या उकडलेल्या, त्यातच मीठ व हिरवी मिरची घातलेली! ती तशीच भाताबरोबर खायची! मसूरडाळीचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. मूगडाळीला "बीमार दाल' म्हणतात. तुरीची डाळ वेगळीच आहे, मसूरडाळीसारखी. फक्त वर्णाने फिक्कट पिवळी! बांबू हा येथील जनतेचा कल्पवृक्ष अाहे. अन्न, वस्त्र व निवारा या तीनही प्राथमिक गरजा पूर्ण करणारा! मिथुन या चतुष्पाद प्राण्याने आपल्याकडील सुवर्णाची जागा घेतली आहे. लग्नकार्ये त्याच्या देवाण-घेवाणीने ठरतात. वरपक्ष-वधूपक्षाला मिथुनाच्या रूपात दक्षिणा देतात. कन्या साक्षात लक्ष्मी असली तरी द्विभार्दा प्रतिबंधक विधेयकाची सफलता प्रश्नचिन्हांकित आहे. सव्वाशेपेक्षा जास्त आदि जमाती आहेत. प्रत्येकीची भाषा वेगवेगळी आहे. अरुणाचलला Land of Khushi-Khushi म्हटले जाते, परंतु काही जमाती अत्यंत मेहनती आहेत. एकाच वेळेला, एकाच शेतात भात, माझे व रागी यांची तीन पिके घेण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. शिव व सूर्य या प्रमुख देवता आहेत. बौध्द व धर्मांतरणाने झालेले ख्रिश्र्चन बरेच आहेत. शिक्षण मुख्यतः इंग्रजी माध्यमातून आहे. जनता चिनी भाषा शिकविण्याच्या सोयीची मागणी करीत आहे, हे कशाचे द्योतक समजायचे? मूळ संस्कृति जोपासनेचे काम आव्हानात्मक आहे.
पर्यटन-स्थलदर्शन हा मुख्य हेतू मनामध्ये धरून मी अरुणाचलला गेले नव्हते. तेथे माझी मुलगी कशी राहते? काय काम करते? ती तिच्या कार्यात कितपत रमली आहे? हे पाहणे व जास्तीत जास्त तिच्या सहवासात राहणे या उद्देशाने मी तिकडे गेले होते. माझे भाग्य एवढे बलवत्तर की, मला तिच्याबरोबरच आणखी "पंच सुकन्यांचा' सहवास लाभला. कु. जागोती (जागृती या शब्दाचा अरुणाचली उच्चार) ही कु. प्रांजलीबरोबरच असते. याशिवाय उन्हाळ्याच्या सुट्टीत एक महिना पूर्णकालीन कार्यकर्त्या म्हणून आलेल्या कु. यात्री, देवी, चांदनी व बबिता या चार माध्यमिक विद्यार्थिनी! सुश्री अलकागौरीदीदीचा सहवास 4-5 दिवस लाभला. ही मूळ पुण्याची आहे. बऱ्याच वर्षांपासून उत्तरपूर्वेत कार्यरत आहे. मा. रूपेशभय्यांची ओळख झाली. मा. राधाकृष्णनजी यांची भेट झाली व मा. विश्र्वासजींबद्दल कु. प्रांजलीकडून खूप प्रशंसोद्‌गार ऐकले होते. त्यांची फक्त भेटच नाही झाली, तर सहप्रवासाचा सुयोगही साधता आला. झीरोला जाताना मा. राधाकृष्णनजी व इटानगरहून-दिब्रुगड व दिब्रुगड ते गुवाहाटी हा प्रवास मा. विश्र्वासजींच्या जीपमधूनच केला.
अरुणाचलमध्ये येण्याचा मुख्य हेतू जरी स्थलदर्शन नव्हता तरी तेथे मी प्राणिसंग्रहालय, दोन बुध्दमंदिरे, पाईत वृक्षांनी समृध्द असलेले इंदिरा गांधी नॅशलन पार्क व स्थानिक बाजारपेठ ही ठिकाणे पाहिली. प्राणिसंग्रहालय मा. राधाकृष्णनजींच्या सौजन्याने जीप मिळाल्यामुळे पाहणे शक्य झाले. तेथे जाताना बरोबर डबे नेले होते. एकूण 22 जण होतो. कु. प्रांजली आली नव्हती. सर्वांनी भरपूर आनंद लुटला. येथे मला अरुणाचलचा पक्षी "हॉर्नबिल' पाहावयास मिळाला.
झीरोला मा. राधाकृष्णन्‌जींच्या जीपमधून गेलो होतो. वाटेवरील शेर व याचुली येथील शाळांना भेट दिली, झीरोला सायंकाळी पोहोचलो. येथील महिला शाखा- अर्थात विवेकानंद केंद्राची- कु. सोन्यादीदी सांभाळते. तिच्याबरोबर एक महिन्यासाठी आलेल्या तीन विद्यार्थिनी होत्या. अगदी गारठलेल्या अवस्थेत केंद्रात दाखल झालो. "भजनसंध्या' सुरू होती. ती पूर्ण झाल्यानंतर गरम-गरम पाणी प्यावयाला देऊन आमचे स्वागत करण्यात आले. अशीच बेसुमार थंडी मागे गौरीकुंडला अनुभवली होती. तेथे गरम पाण्याच्या कुंडातील स्नानाने ऊब दिली होती. येथे गरम पाणी सेवनाने खूप बरे वाटले! येथपर्यंतच्या प्रवासात अरुणाचलचे निसर्गसौंदर्य, पाऊस यांचा अनुभव घेता आला.
दुसऱ्यादिवशी सकाळी "शिवलिंगदर्शनासाठी' बाहेर पडलो. मी, कु. प्रांजली, कु. सोन्या व कृष्णाभैय्या! "वाट ऽ अवघड ऽ गिरीची पायरीऽ। कैसी चढू बा सांग तू तरीऽऽ।। असे व्यंकटेशाचे गीत माझी आई म्हणत असे. येथे फरक फक्त देवतेच्या नावाचा होता. शिवजींचे दर्शनही सहजसाध्य नाही, याचे प्रत्यंतर आले. दर्शनानंतर वाटचालीचा शीण कुठल्याकुठे पळाला! येथील श्री गणेशाचे दर्शन तर फारच मनोहारी होते. स्वयंभू मूर्ती, पण प्रत्येक अवयव अगदी स्पष्ट. पार्वतीदेवी व कार्तिकेय यांनी मात्र आपल्या ख्यातीनुसार "गूढरम्य' दर्शन दिले. हा दर्शनयोग कु. प्रांजलीमुळे आला असला तरी कु. सोन्या व कृष्णा यांचे सहाय्य फार मोलाचे होते. दर्शनाचा माझा निर्धार त्यांनी अगदी हातोहात प्रत्यक्षात उतरविला, परमेश्र्वराची कृपा!
परतीचा प्रवास पुन्हा मा. राधाकृष्णन्‌जींच्या साथीने त्यांच्याच जीपने केला. त्यांचे व मा. विश्र्वासजींचे सहज बोलणे, चुटकुले सांगणे व विनोदही ऐकविणे म्हणजे शंभर टक्के बौध्दिक होते, न संपावे असे वाटणारे! उभयतांचा जनसंपर्क उत्कृष्ट संघटनकौशल्याचे प्रात्यक्षिक होते. दोघांनीही जिव्हाळ्याने केलेली नाष्टा-भोजनाची सोय, त्यांच्या अंतरंगाची ओळख देत होती व मलाच माझ्या भाग्याचा हेवा वाटत होता. नुकतीच माझी आई निवर्तली, तिच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सृष्टिकर्त्याने अशाप्रकारे भरून काढून, त्याने आपलाच नियम सिध्द केला होता. दरीच्या सोबतीने पर्वत असतातच !
दि. 23-5-2007 रोजी सोलापूरकडे येण्यासाठी इटानगर सोडले. मा. विश्र्वासजींच्या जीपने इटानगर ते दिबु्रगड व दिबु्रगड ते गुवाहाटी असा प्रवास केला. दिबु्रगड केंद्रामध्ये भोजनव्यवस्था केली होती. अगदी घरी जेवल्याचे समाधान त्यातून मिळाले. त्याचदिवशी सायंकाळी गुवाहाटीच्या वि.के.मध्ये एका समन्वयात्मक कार्यक्रमास उपस्थित राहता आले. त्याचे संयोजन उत्कृष्टरीत्या करण्यात आले होते. हॉल गर्दीने तुडुंब भरला होता. वि. केंद्राचे मा. सुजातादीदींचे प्रयास त्यातून दिसत होते. उत्साही वातावरणातील यशस्वी कार्यक्रम असेच त्याचे वर्णन करता येईल.
दि। 24 ला गुवाहाटीहून सिकंदराबादकडे जाणारी रेल्वे गाठण्यासाठी सकाळी 6 वा. केंद्र सोडले. मला पोचवायला कु. प्रांजली व कु. भीष्मश्री या दोघी आल्या होत्या. गाडी सुटेपर्यंत दोघीहि थांबल्या, निरोप घेऊन त्या उतरताच थोड्याच वेळात गाडी सुटली आणि माझ्या मिटल्या डोळ्यांसमोर दिसू लागली, पहाडी आवाजात भजने म्हणणारी "जागोती'. उपवास असल्यामुळे नाष्टा केला नव्हता, तर उत्स्फूर्तपणे चहाचा कप समोर धरणारी "देवी', लाडे-लाडे भोवती घुटमळणारी, सडपातळ राहण्याचा ध्यास घेतलेली "चांदनी', पिकलेल्या लाल टोमॅटोची चविष्ट चटणी बनविणारी तेजतर्रार "बबिता', मला आवडलेले गीत कागदावर उतरवून देणारी गोड गळ्याची "यात्री'! कैऱ्या सोबत घेऊन येऊन हक्काने "कैरीची डाळ' करायला लावणारी व कौतुकाने खाणारी तसेच सर्वांसाठी गोड आंबे घेऊन आलेली मा. अलकागौरीदीदी! महाराष्ट्राला एक वर्ष दिलेत, आता अरुणाचलला एक वर्ष द्या, असे म्हणणारे केंद्र कार्याचा ध्यास घेतलेले मा.श्री. रूपेशभैय्या! गुवाहाटी वास्तव्यात सर्वतोपरी सहाय्य करणारी मा. सुजातादीदी! सकाळी निघताना आम्हाला जीप मिळाली की नाही, हे पाहायला स्वतः खाली आलेल्या मा. रेखादीदी! वरच्या मजल्यावरील खिडकीमध्ये उभे राहून पाहणारे भानुदासजी! मला बरे वाटावे म्हणून ही गोष्ट माझ्या लक्षात आणून देणारी कु. भीष्मश्री! नमस्कारासाठी हात जोडले असताना प्रसन्न ओळख देणारे मा. बालकृष्णन्‌जी, सहाय्यासाठी सदैव तत्पर असणारे श्री. कल्याणदत्ताजी! अघळ-पघळ रोमिनभैय्या, गमत्या कमिनकुमार, तारो, तमो, आकू, राजूभैय्या हे सर्व कायम स्मरणात राहणारे! खरंच, केवढ्या प्रेमाची धनी झाले मी! हे सर्व साध्य झाले होते, कु. प्रांजलीमुळे! तिच्या प्रेरणेने मला एक वर्षाचा पूर्णकालीन कार्यकर्तीचा आनंद मिळाला. "वानप्रस्थी' व "मराठी भाषिक' कार्यकर्त्यांच्या शिबिरासाठी कन्याकुमारी येथे उपस्थित राहता आले आणि आता हे असे "माहेरपण' अनुभवता आले, आहे ना उलटी गंगा? पण किती अलौकिक! ईश्र्वरकृपा, दुसरे काय!

शोभा येरिकर
***

जीवन - घडणीचा मंत्र


अलीकडे आमच्या वृंदाच्या स्वभावात खूपच फरक पडला आहे। माझ्या एका निकटच्या मित्राची ती मुलगी. तशी मुळात सात्विक. वाईट काही करायची नाही, पण बुजरी. सारखे आपण अमुक केले तर कोण काय म्हणेल, असे तिला वाटायचे. दडपणाखाली राहायची. तिनेच सांगितलेला एक प्रसंग. तिच्या घरी कोणी पाहुणे यायचे होते, उच्चभ्रू आणि आधुनिक. तशी वृंदाची सांपत्तिक स्थिती चांगली. राहणीचा दर्जाही आधुनिक संपन्न कुटुंबासारखा. घरी सर्व सुखसोयी, पण तरीही तिच्या मनावर या पाहुण्यांचे एक दडपण आले.


का यावे दडपण? तिने सांगितले, ""आमच्याकडे देवघर आहे. साधु-संतांचे फोटो आहेत. ज्यांनी आम्हा उभयतांवर अनुग्रह केला, त्या आमच्या सद्‌गुरूंचा मोठा फोटो फ्रेम करून भिंतीवर लावलेला आहे. त्याला आम्ही रोज ताज्या फुलांचा हार घालतो, उदबत्ती लावतो. आमच्याकडे ज्ञानेश्र्वरी, भागवत, दासबोद, गीता आदी गं्रथ बैठकीच्या खोलीतच ठेवलेले असतात. आमच्या उपासनेच्या ठरलेल्या वेळा असतात. या पाहुण्यांना यापैकी काहीही पटण्यासारखे नव्हते. ताबडतोब त्यांची टीका सुरू झाली असती. तरुण वयात हे काय चालविले आहेस, असा उपहास झाला असता. काय करावे मला कळेना. अखेर पाहुणे येणार त्यादिवशी मी सगळे फोटो, सगळी पुस्तके गुंडाळून एका पेटीत ठेवून दिली. दोन निसर्गचित्रे बैठकीच्या खोलीत लावली. वाटले, आता कोणी काही म्हणायचे नाही. पाहुणे गेले की सगळे पूर्ववत्‌ करू.''
इतका संकोची स्वभाव वृंदाचा. पाहुण्यांनी काही बोलू नये म्हणून स्वतःचे मन मारून तिने या गोष्टी केल्या. मग ती संकोची स्वभावाची, इतरांच्या टीकेला भिणारी व दडपणाखाली स्वतःचे मन मारणारी वृंदा बदलली कशी? आज तिच्यात एक आत्मविश्र्वास दिसतोय, आपण जर चुकीचे काही करीत नसू तर इतरांच्या बऱ्यावाईट टीकेची चिंता करण्याचे कारण नाही, असे ती स्पष्टपणे म्हणते. आधुनिकातील आधुनिक पाहुणा आला तरी सद्‌गुरूंचा फोटो किंवा घरातील सद्‌गं्रथ हलविणार नाही, आपल्या उपासनेत व्यत्यय येऊ देणार नाही, असे तेजस्वीपणाने सांगते. ती धीट झाली आहे. आपल्या श्रध्दांचे निर्भय समर्थन ती करते व जीवनात श्रध्दा पाहिजेच! असे आग्रहपूर्वक प्रतिपादन करते. मला हा बदल चांगला वाटला आणि मी तिचे अभिनंदन केले.
वृंदाचे निवेदन
पण बदल घडला कसा, यासंबंधीची जिज्ञासाही शमली नव्हती. वृंदाने प्रथम माझा प्रश्न टाळला, हसण्यावारी नेण्याचा प्रयत्न केला, परंतु माझा आग्रह पाहून ती म्हणाली.
""त्याचं असं झालं काका, की ते पाहुणे आले होते ना, त्याचं वागणं, बोलणं मला काही आवडलं नाही. तोंडात सिगारेट, बोलण्यात आत्मप्रौढी आणि परनिंदा. सारखी चर्चा, कोणी किती पैसा कशा मार्गाने मिळविला याचीच. "सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते' ही संस्कृत भाषेतील एकच ओळ बहुधा त्यांना ठाऊक असावी! एकदा ते बाहेर एका हॉटेलमध्ये (परमिट रूम असलेल्या) जेवायलाही जाऊन आले. आम्हालाही चला म्हणाले होते, पण आम्ही काहीतरी निमित्त सांगून जायचे टाळले. माझे मन या चार-दोन दिवसांत अत्यंत अस्वस्थ होते. नित्याच्या कार्यक्रमात खंड पडला होता. सद्‌गुरूंची प्रतिमा पेटीत बंदिस्त होऊन पडली होती. पाहुणे आपल्या तंत्राने "आधुनिक'तेचे प्रदर्शन करीत होते. त्यांना ना पिण्याचा संकोच, ना द्रव्याभिलाषेचा संकोच, ना आत्मप्रौढीचा व परनिंदेचा संकोच! जे करू नये या संस्काराचा सखोल ठसा माझ्या मनावर उमटलेला होता व जिथे चहापासून देखील मी मुक्त झाले होते, तिथे अशा माणसासाठी मी मन मारून का राहावे? जे चांगले आहे आणि जीवन आनंदमय करणारे आहे ते का लपवावे? खरंच काका, मला स्वतःच्या भित्रेपणाचा, बुजरेपणाचा विलक्षण राग आला. हा आपल्या स्वभावातला दोष आहे, असं वाटायला लागलं. वाईट गोष्टी लोक निर्जज्जपणे उघड उघड करतात. कोणी दारू पितात, अभक्ष्य भक्षण करतात, काणी उत्तान चित्रपट पाहण्यासाठी ब्लॅकने तिकिटे खरीदतात - काय काय चालेले आहे घरोघर! त्यापैकी कुणालाही तो जे अनिष्ट करतो, त्याची लाज वाटत नाही आणि मला मात्र सद्‌गं्रथ, सद्‌गुरू, संत यांना आपल्या जीवनात स्थान आहे, याचा संकोच निर्माण झाला. हा न्यूनगंड माझ्यात का असावा? कोणाही साधकात का असावा? मी फार चिडले स्वतःवर. फार मोठी प्रतारणा हातून घडल्याच्या भावनेने बेचैन होऊन गेले मी. संतांची एक उक्ती मी वाचली होती.
नारायणी जेणे घडे अंतराय ।
हो का बापमाय त्यजावी ते।।
आणि आपण काय केले? हे संतविचार केवळ वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठीच आहेत का? छोट्याशा कसोटीत आपण नापास झालो! ही खंत दाटून आली आणि निश्र्चय केला की, मूलभूत श्रध्दांच्या बाबतीत इतःपर तडजोड करायची नाही, संकोच बाळगायचा नाही, निर्भयपणे त्यांचा पुरस्कार करायचा. हा निश्र्चय केला व तसे वागू लागले. तुम्हाला काही फरक दिसत असेल तर तो येवढाच !''
चांगल्याची लाज कसली?
वृंदा खूप आवेगाने बोलत होती, मी ऐकत होतो. तिचा प्रत्येक शब्द खूप समाधान देत होता. कारण आधुनिकतेच्या नावावर माणसं स्वैर वागताना मी पाहत होतो. निष्ठापूर्वक नामाच्या आणि ध्यानाच्या अथवा अन्य कोणत्या मार्गाने जे उन्नत जीवनाची साधना करतात, त्यांची होणारी टवाळी मी वारंवार ऐकत होतो. फार काय, अर्धी विजार (हाफपॅंट) घालून व हाती दंड घेऊन संघ शाखेवर जाणारांचा उपहास मी अनुभवलेला होता. या संदर्भात सहज स्मरण झाले म्हणून एक उल्लेख करतो. मी 1940-41 मध्ये कराचीला असतानाची गोष्ट. काही सिंधी भाषक महाविद्यालयीन विद्यार्थी शाखेवर येऊ लागले. ते फुलपॅंट घालूनच शाखेवर येत. मी हाफपॅंट घालून जात असे. एकदा मी त्या मुलांना म्हटले, ""तुम्ही आता हाफपॅंट घालून येत जा ना, कार्यक्रमाला ते सोयीचे पडते. जरा मोकळेपणाने खेळता येईल आपल्याला.''
त्यावर एक मुलगा बोलला, ""भिशीकरजी, यदि निक्कर पहेनके हम सडकपर से घूमेंगे तो लोग क्या कहेंगे?''
पण मग ते एका पिशवीत अर्धी विजार बरोबर आणायचे. शाखेच्या वेळापुरती ती घालायचे आणि कार्यक्रम संपला की बाहेर पडताना पुन्हा फुलपॅंट चढवायचे. अखेर एक दिवस मी त्यांना म्हटले, ""यात लाज वाटण्यासारखे काय आहे? आपण कितीतरी गोष्टीत परक्यांचे निष्कारण अनुकरण करतो, त्याची लाज आपल्याला वाटत नाही आणि चांगल्या गोष्टीची आपण लाज बाळगतो. इथल्या माता-भगिनींची वेशभूषा, युवकांच्या नाना प्रकारच्या "आधुनिक' सवयी यात भूषण वाटण्यासारखे काय आहे? आपल्याला जे चांगले वाटते व जे चांगले आहे, ते करण्याचे नैतिक धैर्य आपल्यात असले पाहिजे. उद्या हजारो तरुण निक्कर घालून शाखेवर यायला लागले तर आपोआपच सगळी तोंडे बंद होतील.'' नंतरच्या पाच-सहा वर्षांत खरोखरच त्या अतिफॅशनेबल शहरात तसे घडून आले!
आणखी एक छोटीशी आठवण, मी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी असतानाची. मला आंघोळ झाल्यावर कपाळावर उभे गंध लावण्याची सवय होती. शाळेत जाताना ते गंध बहुधा कपाळावर असेच. आमच्या नववीच्या वर्गात एक जरा थोराड विद्यार्थी होता. अनेकदा शाळेबाहेर मी त्याला धूम्रपान करताना पाहिले होते. हाच विद्यार्थी शाळेत मी दिसलो की "भटजीबुवा' म्हणून माझी टिंगल करायचा. एक दिवस त्याने जरा मर्यादेबाहेर टिंगल करताच माझा पारा चढला व मी त्याला चढ्या आवाजात म्हटले, ""बाप्या, चारचौघात सिगारेटी फुंकताना तुला शरम वाटत नाही आणि कोणी गंध कपाळी लावले की तुला टिंगल सुचते होय? मला मुळीच लाज वाटत नाही माझ्या कपाळीच्या गंधाची आणि पुन्हा या बाबतीत काही बोललास तर याद राखून ठेव! ही टिंगल माझी नाही, आपल्या सगळ्यांच्या बापजाद्यांची आहे व ती सहन होणार नाही!'' तेव्हापासून त्याची टवाळी थांबली. हा विद्यार्थी अतिधूम्रपानामुळे पुढे तरुण वयातच असाध्य दुखण्याला बळी पडला!
श्रेष्ठ जीवनाचे गमक
वृंदाचे म्हणणे अगदी खरे होते. ज्या गोष्टींची खरोखरच लाज वाटायला पाहिजे, त्यांची कोणला लाज वाटत नाही, संकोच वाटत नाही आणि ज्या गोष्टींनी सुसंस्कारित व उन्नत जीवन उभे होते, त्या गोष्टींची मात्र टवाळी होते! वृंदाशी त्यादिवशी पुष्कळच बोलणे झाले. स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची जी दृष्टी तिने प्राप्त करून घेतली आहे, ती मला फार स्पृहणीय वाटली. या तिच्या विचारांचा स्त्रोत अर्थात्‌ सद्‌गुरूंचा उपदेश, संतांचे साहित्य, तिच्याप्रमाणेच वाटचाल करणाऱ्या साधकांचे व तिचे स्वतःचे अनुभव हा आहे.
यातील मुख्य सूत्र हे की श्रेष्ठ प्रतीचे जीवन याचा अर्थ प्रथम आकलन झाले पाहिजे व तदनुसार आपले जीवन घडविण्याचा जिद्दीने प्रयत्न केला पाहिजे. वृंदाने खुलासा केला तो असा ः "चांगल्या किंवा श्रेष्ठ जीवनाचे मुख्य गमक म्हणजे त्यातील अखंड प्रसन्नता, स्नेहार्द्रता, आनंदमयता आणि अहंकाररहितता. पैसा व चांगले जीवन यांचा लावण्यात येणारा संबंध सर्वस्वी भ्रममूलक आहे. प्रसन्नता यायची व टिकून राहायची तर आंतरिक शांतता पाहिजे. ती संपादन करण्याच्या आड जे येत असेल ते त्याज्य व ती शांतता, आनंदमयता, तृप्तता वाढविण्याला जे पोषक ठरत असेल ते ग्राह्य असा विवेक करीत रोज जगायचे. ज्या मार्गांनी जीवनात कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नसलेला निर्विषय आनंद प्राप्त होतो, त्या गोष्टींची मुळीच लाज बाळगायची नाही, वेळ वाया घालवायचा नाही.''
हे ऐकणे व समजून घेणे तसे अवघड ठरू नये, पण अवघड वाटते खरे. स्थूल स्वरूपात काही नेमक्या गोष्टी दृष्टीपुढे येत नाहीत. ही अडचण माझीच नाही, अनेकांची आहे. आनंद, प्रेम, शांती, तृप्ती हे मोठमोठे शब्द आहेत. त्या दिशेने रोजच्या धकाधकीच्या जीवनात जायचे कसे? अशा प्रश्नांची उत्तरे देण्यात वृंदा आता तयार झालेली दिसली. तिने शेजारचेच मनाच्या श्र्लोकाचे पुस्तक उचलेले व म्हणाली, ""कोणी विचारले तर मी सांगते, जे जडजड वाटते ते वाटल्यास वाचू नका. मनाचे श्र्लोक तर सोपे आहेत ना? त्यातील 47 व्या श्र्लोकापासून (मनी लोचनी.....) 56 व्या श्र्लोकापर्यंत (दिनाचा दयाळू.....) "जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा' अशी चौथी ओळ असलेले केवळ दहा श्र्लोक आहेत. ते अवधान देऊन आणि अर्थ समजावून घेऊन वाचावेत. हे जीवनाचे "मॉडेल' समोर ठेवावे आणि त्याप्रमाणे आपले जीवन घडविण्याचा रोज प्रयत्न करावा. बस, यापेक्षा अधिक काही करावयास नको. यात सारे काही "कॉंक्रीट' आहे. हवेतील काहीही नाही. असे जीवन घडविण्यासाठी काही मार्ग आहेत, तेही या श्र्लोकात सूचित केले आहेत. ही मी साधना मानते. प्रत्येक गोष्टीचा माझ्या जीवनात मला अनुभव घेता यावा असा प्रयत्न करते. यादृष्टीने आत्मनिरीक्षण करते.''
""अनुभव शब्द खूप ऐकतो, पण अनुभव घेण्याचा प्रयत्न कसा करायचा?'' अनेकांच्या मनातील आणखी एक शंका मी वृंदापुढे ठेवली. तिचे उत्तर तयारच होते. ती म्हणाली, ""उदाहरणादाखल मनोबोधातला 48 वा श्र्लोक घेऊया.'' मी पुस्तक घेतले व तो श्र्लोक वाचला -
सदा देवकाजी झिजे देह ज्याचा ।
सदा रामनामे वदे नित्य वाचा ।
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वात्तमाचा।।
वृंदाने मग खुलासा केला, ""मी रोज माझ्या मनाला विचारते, माझा देह परमेश्र्वराला प्रिय अशाच गोष्टी करण्यात गुंततो की स्वार्थापायी, रागापायी, द्वेषापायी, मत्सरापायी काही करतो व मनाला व्यग्रता येते? परमेश्र्वराचे नाव माझ्या मुखात नित्य असते का? अगदी रोजची साधीसाधी कामे करताना देखील! माझा जो स्वधर्म आहे म्हणजे जी प्राप्त कर्तव्ये कुटुंबाचा व समाजाचा घटक या नात्याने मला केलीच पाहिजेत, ती मी उत्तम प्रकारे पार पाडते ना? त्यात हयगय, आळस, कामचुकारपणा तर करीत नाही ना? या प्रश्नांची पूर्ण समाधानकारक उत्तरे अद्यापही मिळत नाहीत, पण कालच्यापेक्षा आज काही सुधारणा झाली आहे का? उणीव राहात असेल तर ती का? उणीव राहण्याची कारणे दूर करण्यासाठी माझी साधना अधिक चांगली व्हावयास हवी ना? याच प्रकारच्या सावध आत्मनिरीक्षणातून प्रगती होत गेली, समाधान वाढत गेले. संतवचनांचा अनुभव घेण्याची हीच पध्दती आहे. संत नामदेवांनी ज्ञानेश्र्वरीसंबंधी सांगताना "एक तरी ओवी अनुभवावी' असे म्हटले. त्याचा अर्थ आता कुठे सद्‌गुरूंच्या कृपेने मला थोडा थोडा कळायला लागला आहे.''
वृंदाच खरी मोठी
वृंदा बोलत होती, मी तिच्या मुखाकडे पाहत होतो. मला तिथे विलक्षण सात्विकतेचे एक तेजोमय पण माणसाला निवविणारे वलय दिसत होते. हा एक न विसरण्यासारखा अनुभव होता! एक साधी बुजरी मुलगी, पण दैनंदिन प्रयत्नांनी व सद्‌गुरूंवरील कृतिशील श्रध्देने किती उंच झाली होती! स्वतःच्या टीचभर आणि नाशवंत देहाची बांधिलकी गळून पडली तरच माणसे अशी विकसतात, मोठी होतात. वृंदाच्या आणि माझ्या वयात केवढे तरी अंतर, पण वृंदा मला खूप खूप मोठी वाटली. जीवन घडवावे कसे, याचा मंत्रच जणू आज या मुलीने सांगितला होता. आता माझे आयुष्य ते किती? पण वृंदाने मला जे काही सांगितले ते तरुण मित्रांनी अवश्य विचारात घ्यावे असे मला वाटते. म्हणूनच तर हा अनुभव शब्दांकित करण्याचा आजचा प्रयत्न.
मी उठलो, वृंदा मला नमस्कार करावयास खाली वाकली. मी मनोमन म्हणालो, "" वृंदा, नमस्काराची खरी अधिकारी तूच आहेस. गुणाः पूजास्थानं गुणिषु न च लिङ्‌गं न च वयः।।'' ***

सम्पादकीय

या भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहायला शिकवलं ते स्वामी विवेकानंदांनी. गुलामी मानसिकतेत आनंद मानणाऱ्या भारतीय तरुणांमध्ये स्वाभीमान जागृत केला, तो स्वामी विवेकानंदांनीच. मकर संक्रातीच्या दिवशी 1863 साली त्यांचा जन्म झाला. विवेकानंदांचा जन्म झाला त्यावेळची या देशाची परिस्थिती समजून घेण्यासारखी आहे. 1857 साली ब्रिटिशांच्या विरुद्ध भारतीयांनी पुकारलेल्या युद्धात भारतीयांचा पराभव झाला होता. त्यानंतर या स्वातंत्र्ययुद्धाला शिपायांचे बंड म्हणून हिणविण्यात येऊ लागले. ब्रिटिशांच्याच अधिकारात सत्ता असल्याने इतिहासही त्यांना सोयीचा होईल याच पद्धतीने लिहिला जाऊ लागला.
ब्रिटिशांच्या पदरी असलेल्या सैन्यात बहुसंख्य सैनिक हिंदू होते. सैन्यांच्या तुकड्यांमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी वेतन देऊन पाद्री नेमण्यात आले होते. ख्रिस्ती धर्म स्वीकारला की हिंदू शिपायाला सैन्यात बढती दिली जात होती. पद्धतशीरपणे ख्रिस्तीकरणाची मोहीम राबविली जात होती. हिंदू धर्माची बदनामी करण्यात येत होती. देश आणि धर्मावर होत असलेल्या आघातांमुळे क्षोभ उत्पन्न होऊन 1857 ची ठिणगी पडली होती. या युद्धात भारतीयांचा पराभव झाल्याने ब्रिटिश आणखीच मुजोर बनले होते. ब्रिटिश सत्तेचे केंद्र कोलकाता येथे होते.
त्याकाळी राजधानीचे शहर असलेल्या कोलकात्यातील सामाजिक स्थितीही समजून घेतली पाहिजे. उच्च शिक्षण घेतलेल्या भारतीय तरुणांमध्ये "जे जे परकीय ते चांगले' अशी भावना निर्माण झाली होती. उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या लोकांमध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची लाटच आली होती. मूर्तीपूजेला हिणविण्यात येत होते. हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याला प्रतिष्ठितपणाचे लक्षण समजले जात होते. अशा काळात स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला आहे.
शिकागो येथे सर्वधर्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जगातील अन्य देशांमधून आलेल्या धर्मिक प्रतिनिधींना ख्रिस्ती धर्माची महानता सांगायची आणि परिषदेला आलेल्या प्रतिनिधींकडूनच जगभर ख्रिस्ती धर्माचा प्रसार करायचा अशी रणनीती धर्मपरिषदेच्या आयोजनामागे होती, परंतु झाले भलतेच; सर्वधर्मपरिषदेवर स्वामी विवेकानंदांनी भारतीय धर्माचा, हिंदू धर्माचा अमिट ठसा उमटविला.
"माझाच धर्म खरा. आमच्या पंथाचाच ईश्वर खरा. आमच्या देवाचा स्वीकार न करणारे पापी आहेत. त्यांना या जगात जिवंत राहण्याचा अधिकारच नाही. त्यांना कसेही करून बाटवून आपल्या धर्मात ओढून आणणे गरजेचे आहे' अशी विचारसरणी असलेल्या एकांतिक धर्मांहून हिंदू धर्म खूपच व्यापक आहे. आकाशातून पडणारे पाणी या ना त्या मार्गाने अंती सागराला जाऊन मिळते, त्याप्रकारे कोणत्याही ईश्वराची उपासना केलात तरी ती उपासना अंती एकाच ईश्वराकडे जाते, असे तत्त्वज्ञान हिंदू धर्माचे आहे. भारत सोडून अन्य देशांसाठी हे तत्त्वज्ञान नवीन आणि भावणारे होते. परिणामी सर्वधर्मपरिषदेतील विवेकानंदांचे भाषण ऐतिहासिक ठरले.
आपल्या भारताला गुलामीत ठेवणाऱ्या पाश्चात्यांच्या भूमीत जाऊन आमच्या देशाचा एक तरुण विजयी होतो. आपल्या संस्कृतीची आणि धर्माची ध्वजा फडकवितो, ही गोष्ट त्याकाळी भारतातील तरुणांना स्फूर्ती देणारी ठरली. विवेकानंदांनी गीता, वेद आणि उपनिषदांमधील शक्तीदायी विचार सर्वसामान्य भारतीयांना समजेल या भाषेत मांडले. या विचारांमधूनच भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला बळ आणि गती मिळाली. विवेकानंदांच्या विचारांमधून अनेक क्रांतिकारक निर्माण झाले. विवेकानंदांपासून प्रेरणा घेतलेल्या नेतृत्त्वाच्या शक्तीशाली आंदोलनामुळे लॉर्ड कर्झन याने केलेली बंगालची फाळणी रद्द करावी लागली होती.
स्वामी विवेकानंदांच्या विचारांपासून हा देश दूर गेला तेव्हा देशाला फाळणीचा सामना करावा लागला. स्वातंत्र्योत्तर काळात सत्तास्थानी असलेले गुलामी मानसिकतेतच आनंद मानणारे होते. या मातीतील चिरंतन मूल्यांकडे दुर्लक्षच झाले. आजची स्थिती त्यामुळेच आव्हानात्मक बनली आहे. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे स्वकीय वैचारिक गुलामीत आनंद मानत आहेत. सर्वधर्मसमभावाचा जप करणारे लोक ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून हिंदूंचे करण्यात येणाऱ्या धर्मांतराला पाठिशी घालत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी दयानंद सरस्वती, स्वातंत्र्यवीर सावरकर, संत गाडगेबाबा, गांधीजी या साऱ्यांनी धर्मांतराचा धोका ओळखला होता. स्वामी विवेकानंद म्हणतात, "एखादा मनुष्य हिंदू धर्मातून दुसऱ्या धर्मात गेल्याने हिंदूंची संख्या एकाने कमी होते असे नाही तर आपल्या शत्रूंची संख्या एकाने वाढते.'
आज लब्धप्रतिष्ठित मंडळी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा चुकीचा अर्थ लावतधर्मांतराचे समर्थन करीत आहेत. इस्लामी आतंकवादाने थैमान घातले असतानासुद्धा क्षुद्र राजकीय स्वार्थापायी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. बांगलादेशी घुसखोरांची समस्या बिकट होत चालली आहे. आपल्या देशासमोरील सर्व प्रकारच्या आव्हानांना प्रतिसाद देण्याचे सामर्थ्य स्वामी विवेकानंदांच्या विचारांमध्ये आहे. आजच्या आव्हानांच्या संदर्भात स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा व्यापक प्रमाणात अभ्यास, चिंतन आणि कार्यवाही होण्याची गरज उत्पन्न झाली आहे. या अंकातील मा. निवेदिताताई यांचा लेख या दृष्टीने मार्गदर्शक ठरणारा आहे. विवेकानंद जयंतीच्या शुभेच्छा!

स्वामी विवेकानंदांचा संदेश


स्वामी विवेकानंद हे एक बहुआयामी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व होते. ते बुद्धिमान होते. त्यांचे भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते आणि ते उत्कट अंत:करणाचे होते. या सर्वात भर म्हणजे त्यांना एक साक्षेपी गुरू लाभलेले होते, ज्यांच्या सान्निध्यात त्यांना सत्याचा साक्षात्कार झाला होता. त्यामुळे त्यांच्या शब्दांना सामर्थ्य प्राप्त झाले होते आणि त्यांच्यात अंतरंग दृष्टी विकसित झाली होती.
स्वामी विवेकानंदांनी पूर्ण भारतभर भ्रमण केलेले होते आणि भारताच्या बाहेरही त्यांनी बऱ्याच देशांतून भ्रमंती केलेली होती. त्यामुळे त्यांना जगाचे दर्शन अगदी जवळून घेण्याची संधी प्राप्त झाली होती. माणसांच्या कमतरता आणि शक्तिस्थाने, विविध संस्कृती तसेच मानवाच्या जीवनावर प्रभाव गाजविण्याची त्यांची शक्ती यांचेही दर्शन त्यांना घडलेले होते. या संबंधात शतकभरात जगभर झालेले विचारमंथन स्वामी विवेकानंद यांनी समजून घेतले होते.
स्वामी विवेकानंदांनी अनेक प्रकारच्या श्रोत्यांपुढे भाषणे केलेली होती. अतिशय गरीब आणि अतिशय श्रीमंत, अशिक्षित आणि सुशिक्षित, तंत्रकुशल आणि तंत्रज्ञान वंचित, जेते असल्याचा गर्व बाळगणारे उन्मत्त राज्यकर्ते आणि त्यांच्या जुलुमी राजवटीखाली दबले जाणारे गुलाम, आस्तिक आणि नास्तिक अशा सर्व प्रकारच्या श्रोत्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेले होते. त्यांनी संबोधित केलेल्या श्रोत्यांमध्ये हे विश्व म्हणजे एका सत्याचाच विस्तार आहे असे मानणारे लोकही होते आणि त्याच्या विपरीत जगाला सश्रद्ध आणि अश्रद्ध अशा दोनच गटात वाटणारे कट्टर धर्मपंथी सुद्धा होते. सर्वांच्या कल्याणासाठी परमेश्वराची प्रार्थना करणारे लोकही त्यांच्या श्रोत्यांत होते आणि आमची देवाची व्याख्या मान्य करतील त्यांचेच फक्त कल्याण होईल असे मानणारे अभिनिवेशी लोकही होते. त्यांना अशा प्रकारे विविध प्रकारच्या श्रोत्यांपुढे भाषणे करावी लागली. त्यांचे भाषण हे त्यांच्या वक्तृत्वाचे प्रदर्शन घडविण्यासाठी होत नसे, तर त्यांचे भाषण म्हणजे त्यांच्या उत्कट अंत:करणाचा सहज आविष्कार असे. त्यांनी लोकांना आध्यात्मिकदृष्ट्या आहे त्या स्तरावरून वरच्या स्तरावर नेण्यासाठीच सातत्याने भाषणे केली.
प्रत्येक माणसाच्या अंत:करणामध्ये दैवी अंश आहे, या उपनिषदांतील सिद्धांतावर स्वामी विवेकानंदांची श्रद्धा होती आणि त्या ईश्वरी अंशाला जागे करणे तसेच जगामध्ये होणाऱ्या ईश्वरी आविष्काराचा आदर करणे कसे आवश्यक आहे, हाच त्यांचा भाषणांचा हेतू असे परंतु आपल्यासमोर बसलेले श्रोते कोणत्या वर्गातले आहेत, याचा विचार करून ते आपल्या याच एका तत्त्वाच्या निरनिराळ्या आयामांवर भर देत असत. असे त्यांच्या वक्तृत्वाचे विश्व व्यापक होते. त्यांच्या श्रोत्यांमध्ये भौगोलिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या परस्परविरोधी लोकांचाही समावेश असे. त्यामुळे त्यांनी केलेल्या व्याख्यानांमध्ये अनेकवेळा परस्परविरोधी विचारांचाही समावेश झालेला दिसून येतो. त्यांच्या विचारातली ही विसंगती आणि विरोधाभास खटकतो, परंतु या विरोधाभासाचा विचार आपल्याला त्यांच्यासमोर बसलेल्या श्रोत्यांचा संदर्भ घेऊन करावा लागेल. तरच या वरवर दिसणाऱ्या विरोधाभासामागचे कारण आपल्या लक्षात येईल. उदाहरणार्थ...
स्वामी विवेकानंदांनी आपल्या एका पत्रात हिंदूंविषयी म्हटले आहे, ""हिंदूंविषयी आता खूप बोलून झाले... आता फारच झाले... हिंदूंच्या त्या भूमीत म्हणजे भारतात जाण्यासाठी मी अमेरिकेचा निरोप का घ्यावा? अंधश्रद्ध, निर्बुद्ध, रूढीप्रिय, दुष्ट, निर्दयी अशा प्रथा पाळणाऱ्या या देशात मी का जावे?'' हिंदूंविषयी आणि हिंदुस्थानाविषयी अशाप्रकारचे उपहासात्मक उद्‌गार काढणारे स्वामीजी दुसऱ्या एका व्याख्यानात म्हणतात, ""माझ्या देशबांधवांनो, मी या अमेरिकेत एक वर्षभर राहिलेलो आहे. मी या देशाचा कानाकोपरा आणि हा समाज यांचे जवळून दर्शन घेतलेले आहे आणि त्यानंतर मी त्यांच्यात आणि आपल्यात एक तुलना करून अशा निष्कर्षाप्रत आलो आहे की, ते सांगतात त्याप्रमाणे आपण तेवढे दुष्ट नाहीत आणि ते स्वत:ला समजतात तेवढे देवदूत सुद्धा नाहीत. मला हे सांगितले पाहिजे की, अमेरिका आणि भारत यांची तुलनाच करायची झाली आणि ती प्रामाणिकपणे केली तर असे लक्षात येईल की, नीतिमत्तेच्या बाबतीत आम्हीच श्रेष्ठ आहोत आणि त्या बाबतीत मान ताठ करून चालण्याचा आम्हालाच अधिकार आहे.'' असे सांगून स्वामी विवेकानंद आपण हिंदू आहोत याचा आपणाला अभिमान आहे! असा उच्चरवाने घोष करतात.
शिकागो येथे झालेल्या सर्वधर्मपरिषदेत बोलताना स्वामी विवेकानंद असे म्हणाले होते की, ""एखाद्या धर्माचे प्रचारक, त्यांच्या धर्माच्या प्रसाराने आणि अन्य सर्व धर्माच्या विध्वंसाने धार्मिक ऐक्य प्रस्थापित होईल अशा भ्रमात असतील तर मी त्यांना सांगू इच्छितो की, बंधूंनो, तुमचे हे स्वप्न म्हणजे एक अशक्य ठरणारी आशा आहे. कोणत्याही एका धर्माच्या विजयाने जगात धार्मिक सौहार्द्र नांदू शकणार नाही.'' असा संदेश देणारे स्वामी विवेकानंद भारतात परत आल्यानंतर असे म्हणाले होते की, ""आपल्याला केवळ आपल्या देशाचे पुनरुज्जीवन करून भागणार नाही. केवळ आपल्या देशाचाच असा विचार करणे ही एक छोटी गोष्ट आहे. मी नव्या कल्पना मांडणारा माणूस आहे आणि माझी एक मोठी कल्पना अशी आहे की, हिंदूधर्मीयांनी सगळे जग जिंकलेले आहे.''
स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते, ""शूर लोकच जगाचा उपभोग घेऊ शकतात. तुमचे शौर्य दाखवून द्या, त्याचा कालानुरूप आविष्कार घडवा, तुमच्या शत्रूत फूट पाडा, भेद निर्माण करा, वेळ पडल्यास लाच द्या, त्यांच्यात बंडखोरीची पेरणी करा आणि तुमच्या शत्रूविरुद्ध उघड युद्ध पुकारा, त्याला जिंका आणि जगाचा आनंद लुटा. तरच तुम्ही खरे धार्मिक राहाल, अन्यथा इतरांनी तुम्हाला लाथाडले, सतत अपमानित केले आणि तरी तुम्ही ते अपमान गिळून अध:पतित जीवन जगत राहाल, तर तुमचे आयुष्य म्हणजे एक नरकवास ठरेल! नंतर तर तुम्हाला नरकात जावे लागेलच, हेच शास्त्राने सांगितले आहे.''
विजयासाठी वाट्टेल ते करण्याचा संदेश देणारे स्वामी विवेकानंद दुसऱ्या ठिकाणी म्हणतात, ""माझ्या आयुष्यात मी एक मोठा धडा शिकलो आहे की, आपण जे साध्य करतो, ते साध्य तर पवित्र असले पाहिजेच, परंतु त्यासाठी वापरलले साधनसुद्धा शुद्ध असले पाहिजे. किंबहुना मी तर असे म्हणेन की, आपण जे साध्य करतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ते कोणत्या मार्गाने साध्य करतो, यावर जास्त लक्ष देणे हेच यशाचे रहस्य आहे.''
स्वामी विवेकानंद ख्रिश्चन धर्मावर टीकाही करतात आणि दुसऱ्या बाजूला येशू ख्रिस्तांविषयी अतिशय आदरानेही बोलतात. ख्रिस्ताने ग्रीस आणि रोम यांचा विध्वंस केला, असेही स्वामीजी दाखवून देतात. येशू ख्रिस्त आणि ख्रिश्र्चन धर्म यांच्याविषयी स्वामीजींनी जे काही म्हटले आहे, त्याचा संदर्भ सोडून विचार केला तर त्या म्हणण्यात विरोधाभास आहे असे दिसेल. त्यांनी ही विधाने कधी केली आहेत आणि कशाच्या संदर्भात केली आहेत, हे तर पाहणे गरजेचे आहेच, पण ते कोणासमोर बोलत होते, त्या श्रोत्यांची वैचारिक, आध्यात्मिक पातळी कोणती होती आणि त्यांनी ती विधाने कोणत्या परिस्थितीत केली आहेत? हेही पाहणे गरजेचे आहे.
असा विचार केला नाही तर ही विधाने परस्परविरोधी असल्याचे तर दिसतेच, पण त्यामुळे आपण संभ्रमातही पडतो. हा संभ्रम संपवण्यासाठी आपल्याला स्वामीजींच्या विचारांचा सखोल अभ्यास करावा लागेल. सत्य हे बहुआयामी असते, हे विसरून चालणार नाही. शास्त्रज्ञांनीही हे मान्य केले आहे. उदाहरणार्थ प्रकाश हा कणांचा बनलेला आहे की तरंगांचा बनलेला आहे, असा प्रश्न आपण एखाद्या वैज्ञानिकाला विचारला तर तो उत्तर देईल, दोन्हींनीही बनलेला आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, आपण असत्याकडून सत्याकडे जात नसतो तर सत्याकडून सत्याकडे जात असतो. सामान्य माणसाची प्रगती होत असते तेव्हा तो मर्यादित सत्याकडून उच्च दर्जाच्या सत्याकडे प्रवास करीत असतो.
स्वामीजींचे विचार एवढे सामर्थ्यवान आहेत की, त्यांनी साऱ्या भारत देशाला चेतना दिली आणि या चेतनेने स्वातंत्र्य लढ्याला चालना दिली. तेव्हापासून भारतात घडलेल्या प्रत्येक चांगल्या कामामागे स्वामीजींच्या विचारांची प्रेरणा होती, अजूनही आहे. असे का घडले? स्वामीजींचे हे विचार समजून घेण्यासाठी आणि स्वामीजींना पूर्णपणे समजून घेण्यासाठी त्यांच्या विचारांचा सखोल अभ्यास केला पाहिजे, नित्य अभ्यास केला पाहिजे. केवळ त्यांची उद्धरणे समोर ठेवून आणि त्यांचे संदर्भाशिवाय विश्र्लेषण करून वरवरचा विचार करणे पुरेसे नाही.
भारतीयांची स्वामीजींवर एवढी श्रध्दा आहे की, स्वामी विवेकानंदांचा संदेश म्हणून जे काही सांगितले जाते, त्याचा ते स्वीकार करतात. त्यामुळे माणसाच्या उन्नतीसाठी पाश्चात्त्य देशात जे सांगावे लागते, ते भारतीयांना सांगून चालत नाही. आपण भारतीयांना भलते-सलते काही संागायला लागलो तर ती स्वामीजींशी प्रतारणा तर ठरेलच, पण एका रोगासाठीचे औषध दुसऱ्या रोगासाठी दिल्यासारखे ते घातकही ठरेल. आपले दुर्दैव असे आहे की, या देशातले काही लोक तसा प्रयत्न जाणीवपूर्वक करायला लागले आहेत. हिंदू समाजाची लढावू वृत्ती मारली जावी, या हेतूने हा खोडसाळपणा सुरू आहे.
स्वामींनी पाश्चात्त्य श्रोत्यांसमोर बोलताना, त्यांनी जगभर आपला धर्म पसरविण्याची स्वप्ने पाहू नयेत, असे त्यांना बजावतात पण तेच स्वामीजी हिंदूंसमोर बोलताना मात्र हिंदूंनी आपल्या "आध्यात्मिक' शक्तीच्या जोरावर जगाला जिंकले पाहिजे, असे आवाहन त्यांना करतात. ख्रिश्र्चॅनिटी आणि इस्लाम यांची भूमिका फार वेगळी आहे. आम्ही जो देव मानतो तोच इतरांनी मानला पाहिजे, सर्वजण तो मानत नासतील तर त्यांना त्यासाठी छळ-कपट, हिंसा किंवा धाकाने बाध्य करणे हे आमचे कर्तव्यच आहे, असे ते मानतात, पण हिंदूंची मान्यता तशी नाही. जगाचा पसारा हा एकाच शक्तीचा विस्तार आहे. त्यामुळे त्याच्या विविध रूपांचा आणि निरनिराळ्या आविष्कारांचा आपण आदर केला पाहिजे, असे हिंदू मानतात.
हिंदूंच्या या विचारांचा साक्षात्कार झालेली एक संवेदनशील व्यक्ती म्हणून स्वामीजींना सर्व मानवांविषयी अतोनात प्रेम वाटते. त्यामुळेच ते वरवर विरोधाभास असलेली अशी विधाने करीत असतात. त्यांना एक बाब प्रकर्षाने लक्षात येते की, सर्वसमावेशक धार्मिक विचार हा सकारात्मक झाला पाहिजे, तरच हट्टाग्रही धार्मिक विचार मर्यादेत राहतील. तसे न झाल्यास एकांगी आणि अभिनिवेश पूर्ण धार्मिक विचार मानवतेचा नाश करतील. सर्वसमावेशक विचार आग्रही राहिले नाहीत तर मानवतेचे अस्तित्व आणि प्रगती यांच्यात बाधा येईल. मानवी जात धराशायी होईल. एकांगी धार्मिक विचार सीमित राहिले नाहीत तर ते इतरांनाही संपवतात आणि कालांतराने स्वतःही संपून जातात. त्यामुळे स्वामी विवेकानंद जगद्‌गुरूंच्या भूमिकेतून एकांगी विचारांना सर्वसमावेशक करण्याची पद्धत सांगतात, त्यांना जीवनातल्या वस्तुस्थितीची जाणीव देतात. सर्व समावेशकतेचा आत्मविश्र्वास वाढवतात. त्यांना आग्रही बनवून जगभर प्रभावी करण्याचा मार्ग दाखवतात.
दुर्दैवाने भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या धार्मिक विचारांच्या प्रसाराने स्वामी विवेकानंद यांच्या या भावनेशी पूर्णपणे विसंगत रूप धारण केले आहे. सर्वसमावेशक विचारांच्या हिंदूंना एकांगी विचारातून निर्माण होणाऱ्या हिंसक कारवायांबद्दल दोषी धरले जात आहे. एकांगी विचारांच्या धर्मांचा फाजील लाड केला जात आहे. त्यांनाच मान दिला जात आहे. विद्वान, बुद्धिवादी, पंडित, राजकीय नेते आणि मान्यवर लोक हाच मार्ग अवलंबत आहेत.
याचे एक उदाहरण देता येईल. ओरिसाच्या कंधामल जिल्ह्यात स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या निर्घृण हत्येनंतर उसळलेल्या दंगलीवर शशी थरूर यांनी एक लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, "धर्मांतराला असा विरोध करणे आणि त्यावर अशी प्रतिक्रिया व्यक्त करणे हे "इंडियन मुजाहेदीन' ने केलेल्या बॉम्बस्फोटासारखेच आहे.' म्हणजे स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांनी वनवासींचे धर्मांतर रोखले जावे म्हणून केलेले त्यांच्या कल्याणाचे कार्य हे एक अतिरेकी कृत्य आहे, असे थरूर यांना म्हणायचे आहे.
त्यांचे हे मत पटण्यासारखे नव्हतेच, त्यामुळे अनेकांनी त्यांचा निषेध केला, तेव्हा त्यांनी दुसरा लेख लिहिला. त्यात त्यांनी स्वामी विवेकानंदांचेच उदाहरण वापरले. ""सर्व धर्मांच्या उपासना पद्धती निरनिराळ्या असल्या तरी शेवटी ईश्र्वर हा एकच आहे, असे विवेकानंद म्हणतात, मग एक वनवासी हिंदूंप्रमाणे मूर्तीची पूजा करण्याऐवजी ख्रिश्र्चन होऊन आकाशातल्या बापाकडे हात पसरायला लागला तर काळजी वाटण्याचे कारण काय?''
शशी थरूर यांचे हे म्हणणे सकृत्‌दर्शनी बरोबर वाटते आणि ते हिंदूंना चांगले माहीतही आहे. हिंदूंना हे फार पूर्वीपासूनच माहीत आहे. ते त्यांनी आपल्या जीवनात उतरवलेसुद्धा आहे. त्यासाठी शशी थरूर यांनी स्वामी विवेकानंदांना उद्‌घृत करण्याचीही गरज नाही, पण थरूर यांना विवेकानंदांचा हा विचार सांगायची हौसच असेल तर त्यांनी तो पाश्र्चात्त्य देशातल्या ख्रिश्र्चन मिशनऱ्यांना सांगावा, ते तसा सांगतील?
शशी थरूर यांच्यासारखे हिंदू समाजात जन्मलेले आणि हिंदू समाजाच्याच अंगाखांद्यावर खेळून, बागडून मोठे झालेले लोकच स्वामी विवेकानंदांनी काढलेले उद्‌गार असे नको तिथे वापरत असतात. स्वामीजींचा असा विचार चुकीच्या लोकांना सांगण्याची ही कृती अज्ञानाने किंवा अनवधानाने झालेली नाही तर ती जाणीवपूर्वक केलेली आहे. सर्वसमावेशक धर्मविचार क्षीण व्हावा म्हणून एकांगी विचारांच्या धर्मासाठी असलेला हा विचार सर्वसमावेशक हिंदूधर्मीयांना हेतुपुरस्सरपणे सांगितला जात आहे. तसा तो सांगितल्याने हिंदूंनाच अपराध्यासारखे वाटायला लागते. आपल्या धर्मातल्या लोकांनी अन्य धर्मात जाऊ नये यासाठी प्रयत्न करणे हासुद्धा अपराध आहे, गुन्हा आहे, असे त्यांना वाटायला लागते.
या सगळ्यांचा परिणाम काय? असहाय्य समाज, दुबळे नेतृत्व आणि 26 नोव्हेंबरसारखे दहशतवादी हल्ले। असे हल्ले पुन्हा होऊ नयेत असे वाटत असेल तर स्वामी विवेकानंद जयंतीच्या औचित्यावर आपण आध्यात्मिक शक्तीच्या आधारे जग जिंकण्याचा निर्धार केला पाहिजे. सर्वसमावेशक धर्मविचार आग्रही झाला पाहिजे. विध्वंस नको, एकत्रीकरण हवे. मतभेद नकोत, मनोमिलन हवे. दहशतवादाशी सामना करण्यासाठी स्वामी विवेकानंदांचाच विचार हवा !''

बी निवेदिता

- अनुवाद ः अरविंद जोशी