Tuesday, January 6, 2009

सम्पादकीय

या भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहायला शिकवलं ते स्वामी विवेकानंदांनी. गुलामी मानसिकतेत आनंद मानणाऱ्या भारतीय तरुणांमध्ये स्वाभीमान जागृत केला, तो स्वामी विवेकानंदांनीच. मकर संक्रातीच्या दिवशी 1863 साली त्यांचा जन्म झाला. विवेकानंदांचा जन्म झाला त्यावेळची या देशाची परिस्थिती समजून घेण्यासारखी आहे. 1857 साली ब्रिटिशांच्या विरुद्ध भारतीयांनी पुकारलेल्या युद्धात भारतीयांचा पराभव झाला होता. त्यानंतर या स्वातंत्र्ययुद्धाला शिपायांचे बंड म्हणून हिणविण्यात येऊ लागले. ब्रिटिशांच्याच अधिकारात सत्ता असल्याने इतिहासही त्यांना सोयीचा होईल याच पद्धतीने लिहिला जाऊ लागला.
ब्रिटिशांच्या पदरी असलेल्या सैन्यात बहुसंख्य सैनिक हिंदू होते. सैन्यांच्या तुकड्यांमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी वेतन देऊन पाद्री नेमण्यात आले होते. ख्रिस्ती धर्म स्वीकारला की हिंदू शिपायाला सैन्यात बढती दिली जात होती. पद्धतशीरपणे ख्रिस्तीकरणाची मोहीम राबविली जात होती. हिंदू धर्माची बदनामी करण्यात येत होती. देश आणि धर्मावर होत असलेल्या आघातांमुळे क्षोभ उत्पन्न होऊन 1857 ची ठिणगी पडली होती. या युद्धात भारतीयांचा पराभव झाल्याने ब्रिटिश आणखीच मुजोर बनले होते. ब्रिटिश सत्तेचे केंद्र कोलकाता येथे होते.
त्याकाळी राजधानीचे शहर असलेल्या कोलकात्यातील सामाजिक स्थितीही समजून घेतली पाहिजे. उच्च शिक्षण घेतलेल्या भारतीय तरुणांमध्ये "जे जे परकीय ते चांगले' अशी भावना निर्माण झाली होती. उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या लोकांमध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची लाटच आली होती. मूर्तीपूजेला हिणविण्यात येत होते. हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याला प्रतिष्ठितपणाचे लक्षण समजले जात होते. अशा काळात स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला आहे.
शिकागो येथे सर्वधर्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जगातील अन्य देशांमधून आलेल्या धर्मिक प्रतिनिधींना ख्रिस्ती धर्माची महानता सांगायची आणि परिषदेला आलेल्या प्रतिनिधींकडूनच जगभर ख्रिस्ती धर्माचा प्रसार करायचा अशी रणनीती धर्मपरिषदेच्या आयोजनामागे होती, परंतु झाले भलतेच; सर्वधर्मपरिषदेवर स्वामी विवेकानंदांनी भारतीय धर्माचा, हिंदू धर्माचा अमिट ठसा उमटविला.
"माझाच धर्म खरा. आमच्या पंथाचाच ईश्वर खरा. आमच्या देवाचा स्वीकार न करणारे पापी आहेत. त्यांना या जगात जिवंत राहण्याचा अधिकारच नाही. त्यांना कसेही करून बाटवून आपल्या धर्मात ओढून आणणे गरजेचे आहे' अशी विचारसरणी असलेल्या एकांतिक धर्मांहून हिंदू धर्म खूपच व्यापक आहे. आकाशातून पडणारे पाणी या ना त्या मार्गाने अंती सागराला जाऊन मिळते, त्याप्रकारे कोणत्याही ईश्वराची उपासना केलात तरी ती उपासना अंती एकाच ईश्वराकडे जाते, असे तत्त्वज्ञान हिंदू धर्माचे आहे. भारत सोडून अन्य देशांसाठी हे तत्त्वज्ञान नवीन आणि भावणारे होते. परिणामी सर्वधर्मपरिषदेतील विवेकानंदांचे भाषण ऐतिहासिक ठरले.
आपल्या भारताला गुलामीत ठेवणाऱ्या पाश्चात्यांच्या भूमीत जाऊन आमच्या देशाचा एक तरुण विजयी होतो. आपल्या संस्कृतीची आणि धर्माची ध्वजा फडकवितो, ही गोष्ट त्याकाळी भारतातील तरुणांना स्फूर्ती देणारी ठरली. विवेकानंदांनी गीता, वेद आणि उपनिषदांमधील शक्तीदायी विचार सर्वसामान्य भारतीयांना समजेल या भाषेत मांडले. या विचारांमधूनच भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला बळ आणि गती मिळाली. विवेकानंदांच्या विचारांमधून अनेक क्रांतिकारक निर्माण झाले. विवेकानंदांपासून प्रेरणा घेतलेल्या नेतृत्त्वाच्या शक्तीशाली आंदोलनामुळे लॉर्ड कर्झन याने केलेली बंगालची फाळणी रद्द करावी लागली होती.
स्वामी विवेकानंदांच्या विचारांपासून हा देश दूर गेला तेव्हा देशाला फाळणीचा सामना करावा लागला. स्वातंत्र्योत्तर काळात सत्तास्थानी असलेले गुलामी मानसिकतेतच आनंद मानणारे होते. या मातीतील चिरंतन मूल्यांकडे दुर्लक्षच झाले. आजची स्थिती त्यामुळेच आव्हानात्मक बनली आहे. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे स्वकीय वैचारिक गुलामीत आनंद मानत आहेत. सर्वधर्मसमभावाचा जप करणारे लोक ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून हिंदूंचे करण्यात येणाऱ्या धर्मांतराला पाठिशी घालत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी दयानंद सरस्वती, स्वातंत्र्यवीर सावरकर, संत गाडगेबाबा, गांधीजी या साऱ्यांनी धर्मांतराचा धोका ओळखला होता. स्वामी विवेकानंद म्हणतात, "एखादा मनुष्य हिंदू धर्मातून दुसऱ्या धर्मात गेल्याने हिंदूंची संख्या एकाने कमी होते असे नाही तर आपल्या शत्रूंची संख्या एकाने वाढते.'
आज लब्धप्रतिष्ठित मंडळी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा चुकीचा अर्थ लावतधर्मांतराचे समर्थन करीत आहेत. इस्लामी आतंकवादाने थैमान घातले असतानासुद्धा क्षुद्र राजकीय स्वार्थापायी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. बांगलादेशी घुसखोरांची समस्या बिकट होत चालली आहे. आपल्या देशासमोरील सर्व प्रकारच्या आव्हानांना प्रतिसाद देण्याचे सामर्थ्य स्वामी विवेकानंदांच्या विचारांमध्ये आहे. आजच्या आव्हानांच्या संदर्भात स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा व्यापक प्रमाणात अभ्यास, चिंतन आणि कार्यवाही होण्याची गरज उत्पन्न झाली आहे. या अंकातील मा. निवेदिताताई यांचा लेख या दृष्टीने मार्गदर्शक ठरणारा आहे. विवेकानंद जयंतीच्या शुभेच्छा!

No comments: