Tuesday, January 6, 2009

तरुण असोनि


तरुण असोनि
रक्त न उसळे...


आपण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष साजरे करीत आहोत. आपल्या काव्यातून महाराजांनी आपल्या भक्तांसह सर्वच देशवासीयांना मार्गदर्शन केले आहे. 1962 साली चिनी आक्रमणाच्या वेळी त्यांनी आपल्या काव्यातून सैनिकांमध्ये कशी वीरश्री निर्माण केली होती व ते काव्य आजही कसे लागू पडत आहे, याची आठवण करून देण्याचा हा प्रयत्न.
भविष्यसूचक उद्‌गार काढणाऱ्या व्यक्तींनाच आपण संत-महापुरुष मानतो. याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अपवाद नाहीत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे, दहशतवादाने आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तशीच 1962 साली चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा निर्माण झाली होती. त्या बिकट प्रसंगी संत तुकडोजी महाराजांनी, गावोगावी होणारे आपले भजन-प्रवचनांचे कार्यक्रम स्थगित करून प्रत्यक्ष रणभूमीवर धाव घेऊन सैनिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या दौऱ्यात खुद्द तत्कालीन संरक्षणमंत्रीही राष्ट्रसंतांबरोबर होते, हे विशेष!
मुंबईत ज्याप्रमाणे आधुनिक शस्त्रसज्ज दहशतवाद्यांशी महाराष्ट्र पोलिस जुनाट-कालबाह्य झालेल्या "303' बंदुकीने लढले, त्याच बंदुकीच्या साह्याने 1962 साली भारतीय सैनिक "मरू' किंवा "मारू' या ईर्षेने तळहातावर शिर घेऊन चिनी सैनिकांशी लढत होते. भारताच्या या शूरवीरांचे मनोबल उंचावण्यासाठी तसेच त्यांना स्वकर्तव्याची जाणीव देऊन प्रतीकारार्थ सज्ज राहण्यासाठी आपल्या 15 दिवसांच्या दौऱ्यात तुकडोजी महाराजांनी, सैनिकांसमोर वीरश्री निर्माण करणाऱ्या नुसत्या रचनाच सादर केल्या असे नाही, तर ते स्वत: सैनिक व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटले आणि तेथील युद्धजन्य परिस्थितीचा अनुभव घेतला.
त्या वेळी आपल्या काव्यातून राष्ट्रसंत गरजले होते-
""तैयार हुआ है हिंद तुम्हारे साथ।
आओ चीनीओ मैदानमे, देखो हिंद के हाथ।।''
एवढेच नाही, तर रणभूमीवरील विविध ठिकाणी चिनी आक्रमणाविरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी या जवानांना उद्देशून तुकडोजी महाराज उद्‌गारले होते-
""अग्नि भडकला युद्धाचा अन्‌। तू आळशी होऊनी बसे।।
तरुण असोनि रक्त न उसळे। नौजवान तुज म्हणो कसे?।।
हिंदभूच्या लेकरांनो। स्वस्थ का बसता असे?
भारताचे ग्रहण हे नेत्री । तुम्हा बघवे कसे?''
""राष्ट्र जागवा-राष्ट्र जागवा...जागृत व्हा... तरुणांनो वीर वृत्तीचा दिवा उजळण्या- जागृत व्हा तरुणांनो'' असे म्हणत राष्ट्रसंतांनी त्या वेळी जवानांमध्ये नवचैतन्य निर्माण केले होते.
गत 20 वर्षांपासून भारत दहशतवादरूपी राक्षसाचा सामना करीत आहे। या राक्षसाने देशात आपले पाय चांगलेच रोवले असून, 26 नोव्हेंबर, 08 रोजी तर मुंबईत त्याने परमोच्च बिंदू गाठत प्रशासनासह देशवासीयांना हादरवले आहे. त्याला न घाबरता धैर्याने तोंड देण्यासाठी देशासह जगातील मानव जातीने सर्व बंधने तोडून एकत्र येणे कसे आवश्यक आहे, याचेच मार्गदर्शन व प्रेरणा देण्याचे काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे काव्य आजही करीत आहे.


- विनय म. करंदीकर, नागपूर

No comments: