Tuesday, January 6, 2009

वचन

महाराणा प्रताप यांचा तेजस्वी इतिहास कोणाला माहित नाही? मोगल सम्राट अकबराच्या ताकदीपुढे बहुतेक राजपूत सरदारांनीही शरणागती पत्करली होती. काहींनी तर बेशरमपणे आपल्या लेकीबाळी अकबराच्या जनानखान्यात घालून आपण अकबराशी सोयरीक केल्याच्या गुर्मीत ते वावरत होते. ज्या थोड्यांनी अकबराचे वर्चस्व झुगारून देव, देश आणि धर्मासाठी बलिदानाची तयारी दाखवली होती, त्यामध्ये चित्तोडचे महाराणा प्रताप हे होते.
या तत्त्वनिष्ठेचे फळ काय? तर राणा प्रताप यांना थेट विजनवासात जावे लागले. विजनवासात सर्व सैन्य हळूहळू पकडले गेले. कसेबसे फक्त राणा प्रताप आणि त्यांचे कुटुंबीय वेषांतर करून दिवस कंठू लागले. संधी मिळताच पुन्हा सैन्य जमा करून अकबरावर हल्ला करण्याचा मनात दृढनिश्चय होताच. मात्र जंगलात उपासमार होऊ लागली. चंपा ही लहान मुलगी. तिचा एक छोटा भाऊही बरोबर होता. चंपा आपल्या वाट्याला आलेली भाकरी न खाता भावाला खायला द्यायची. या उपासमारीने चंपा अखेर एकेदिवशी खूप आजारी पडली. अगदी शेवटच्या घटका मोजायची वेळ आली. राणा प्रतापांचं मन अतिशय हळवं बनलं. ते म्हणाले, "छे! काही खरं नाही. बेटी चम्पा तू काही काळजी करू नको. मी आत्ताच्या आत्ता अकबराकडे तहनामा पाठवून देतो. सगळं काही ठीक होईल.' मरणासन्न असतानाही चम्पा ताडकन म्हणाली, "छे, छे. हे काय? असला कसला विचार करता आहात? तुम्ही अकबराला शरण गेलात तर आपणा सर्वांचा मृत्यू काही चुकणार आहे काय? आज ना उद्या तो येणारच आहे. शरण जावून जगण्यापेक्षा स्वाभिमानानं आताच मेलेलं केव्हाही चांगलं. मी आता काही जिवंत राहत नाही, पण तुम्ही मला एक वचन द्या. तुम्ही कधीच शत्रूला शरण जाणार नाहीत.'
डोळ्यात आलेल्या अश्रूंना वाट करून देत राणा प्रताप यांनी मुलीला वचन दिलं. अकबरालाच काय, पण अशा कितीही मोठ्या शत्रूला पराभूत करण्याची ताकद आपल्या शरीरात या एका वचनानं निर्माण झाल्याची जाणीव राणा प्रताप यांना झाली.
साभार : युगंधर

No comments: