Tuesday, January 6, 2009

माहेरपन


31 जानेवारी 2004 रोजी मी विक्रीकर विभागातून वर्ग 1 अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले. सेवेमध्ये असताना निवृत्त होणाऱ्या कित्येकांना, नंतरच्या रिकामपणाला धास्तावलेले मी पाहिले होते. मी मात्र निवांत होते. कारण? माझी कन्या माझे प्रेरणास्थान ! गुरुसुद्धा !!
कु. प्रांजली रामचंद्र येरीकर. विवेकानंद केंद्राची पूर्ण वेळ कार्यकर्ती! बालवाडीपासून कायम विशेष प्राविण्यासह शिक्षण घेत असलेली, कु. प्रांजली इ. 7 वीची शिष्यवृत्तीधारक बनली. इ. 10 वीला उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाली. वाचनाची, भाषा विषयांची आवड व रसिक वृत्तीमुळे महाविद्यालयामध्ये कलाशाखेत प्रवेश घेतला. मैत्रिणीच्या इच्छेखातर तो रद्द करून इंजिनीअरिंगच्या पदविकेसाठी आवेदनपत्र सादर केले. मामासारखे इंजिनीअर व्हावयाचे ठरवून सिव्हिल इंजिनीअरिंग निवडले. त्यामधील पदविका व पदवी विशेष प्राविण्यासह संपादन केली.
शाळेपासूनच कु. प्रांजली विवेकानंद केंद्राची कार्यकर्ती होती. इ.स. 2002 साली स्वामी विवेकानंद स्मृती शताब्दीनिमित्त कन्याकुमारीला गेली असताना तेथेच तिला आपले "जीवन ध्येय' गवसले. इ.स. 2003 पासून ती विवेकानंद केंद्राची पूर्ण वेळ कार्यकर्ती आहे. घरातील सर्वांची व्यवस्थित समजूत घालून कुणालाही न दुखवता तिने हे शक्य केले आहे. विवेकानंद केंद्राचे पिंपळद, ता. त्र्यंबकेश्र्वर, जिल्हा नाशिक येथे प्रशिक्षण केंद्र आहे. तेथे तिला पोहोचवायला मी स्वतः गेले होते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिची नियुक्ती मुंबई येथे करण्यात आली. तेथे 2-2।. वर्षे काम केल्यानंतर तिला "अरुणाचलमध्ये' कार्य करण्याची संधी मिळाली. ऑक्टोबर 05 पासून अरुणाचल प्रदेशाची राजधानी "इटानगर' येथे ती कार्यरत आहे.
तिच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये पिंपळद व नियुक्तीनंतर मुंबईला मी तिला भेटायला जात असे. केंद्रामध्ये चालू असलेले कार्य त्यामुळे जवळून पाहावयास मिळाले. समाजाला अशा कार्यकर्त्यांची किती निकड आहे, हे त्यावेळी प्रथमतःच जाणवले. यापूर्वी असा विचार कधीच केला नव्हता. हा विचार, ही दृष्टी कु. प्रांजलीमुळेच मिळाली होती. तिच्याबद्दल अभिमान वाटत असतानाच निवृत्तीनंतर आपणही केंद्रात दाखल व्हावयाचे असे मनाने ठरविले. तिच्या मळलेल्या वाटेवरून मी प्रवास करणार होते. ती माझी मार्गदर्शक बनली होती.
ठरविल्याप्रमाणे मी मे 2004 मध्ये केंद्रामध्ये दाखल झाले. मला प्रशिक्षित करण्यात तिचाही वाटा होता. एक वर्ष कार्य केल्यानंतर मी घरी परतले. त्या एक वर्षामध्ये मला जे केंद्रामध्ये शिकायला मिळाले, ते माझ्या अखेरपर्यंत मला उपयोगी पडणार आहे. चारित्र्य, स्वावलंबन, स्वयंशिस्त, परिश्रम व परस्पर सौहार्द ही आहे विवेकानंद केंद्राची "पंचसूत्री'! युवकांनी ती अंगिकारली तर, स्वामी विवेकानंदांचे भारताबद्दलचे स्वप्न साकार व्हायला वेळ नाही लागणार! गरज आहे ती युवकांच्या निर्धाराची! भोगाकडे पाठ फिरवून शाश्वत आनंदाला मिठीत घेण्यास सिध्द होण्याची!
कु. प्रांजली अरुणाचलला गेल्यापासून एकदा तिकडे जाऊन यायचे असे मनामध्ये वारंवार घोळविले जात होते, परंतु योग येत नव्हता, काही मार्गही सापडत नव्हता. एकटीनेच एवढ्या दूरचा प्रवास कसा करायचा? सहप्रवासी कसे भेटतील? काही दगा-फटका तर नाही ना होणार? या सर्व प्रश्नांना धाब्यावर बसवून मे-2007 मध्ये जायचे निश्चित केले. योग्य ती आरक्षणे केली. मग मात्र प्रश्न सुटत गेले, अडचणींनी काढता पाय घेतला व मी दि. 8 मे रोजी रेल्वेच्या डब्यातूनच "दृष्टमिठी' घातली प्रांजलीला !
गुवाहाटीला उतरल्यानंतर सायकलरिक्षाने तेथील विवेकानंद केंद्राकडे निघालो. ऑटोरिक्षा असताना सायकलरिक्षा का? हे माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह वाचून कु. प्रांजलीने उत्तर दिले- ""अगं आई, आपण जर सायकलरिक्षा नाही केली तर बिचाऱ्याला मिळावयाचे तेवढेही पैसे नाही मिळणार''! माझ्या डोळ्यातले कौतुक पाहून लगेच स्पष्टीकरण देऊन मोकळी! ""ही गोष्ट दादामुळे मला समजली, आम्ही मद्रासला गेलो होतो तेव्हा''! तिच्याकडे फक्त पाहातच राहावे असे मला वाटत होते.
विवेकानंद केंद्राची गुवाहाटीमधील इमारत "ब्रह्मपुत्रे'च्या अगदी किनाऱ्यावर आहे. आतील सजावट अप्रतिम आहे. स्थानिक कलाकारांची कला व कलशाची महति यांचे ते मूर्तिमंत उदाहरण आहे. केंद्रातील महिला कक्षामध्ये सामान ठेवून स्वच्छ स्नान केल्यानंतर सुश्री सुजातादीदींच्या निर्देशानुसार नाष्टा करून इटानगरकडे जाण्याचे आरक्षण करण्यासाठी बाहेर पडलो. सायंकाळी 7 वा. सुटणाऱ्या "जेटवर्कच्या' आराम बसचे आरक्षण मिळाले. काही आवश्यक वस्तूंची खरेदी करून केंद्रामध्ये परतलो. थोडी विश्रांती घेतली. इटानगरला जाण्यासाठी सामान घेऊन बाहेर पडताना पावसाळ्यापूर्वीचे "ब्रह्मपुत्रे'चे वत्सलरूप मनाला भावत होते. पैलतीरावरची झाडी दृष्टी खिळवून ठेवत होती. येथून पुढे असेच निसर्गसौंदर्य दिसणार आहे, हा दिलासा बरोबर घेऊन बाहेर पडलो.
बुधवार दि. 9 मे रोजी सकाळी 7 वा. इटानगर येथे पोहोचलो. पहाटे 4-30 लाच उजाडत असल्यामुळे सूर्य बराच वर आला होता. प्रत्येकाच्या हातामध्ये छत्री दिसत होती. 9 ते 22 मे माझा मुक्काम अरुणाचलमध्येच होता. या कालावधीत मला समजलेला अरुणाचल असा, येथे तीनही ऋतु आपल्या रौद्र-भीषण स्वरूपात अरुणाचल वासीयांच्या भेटीला येतात. "इटानगर' राज्याची राजधानी, परंतु आपल्या जिल्ह्याच्या राजधानीपेक्षा लहान! सुधारणेला वाव असलेले एकुलते शहर! बाकी सर्व प्रदेश शेती, जंगल, डोंगर-दऱ्या व नद्या यांनी व्यापलेला! त्यांच्या आश्रयाने छोटी-छोटी गावे वसलेली! मोठे उद्योग-व्यवसाय फारसे नाहीत. बहुतेक जनता मांसाहारी आहे. भात हे मुख्य अन्न आहे. जेवणामध्ये बटाट्याचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो. मसाला व लाल तिखट यांचा वापर फारच कमी प्रमाणात केला जातो. कच्ची हिरवी मिरची खातील, पण मसाला, तांबडं तिखट वर्ज्य! सर्व भाज्या उकडलेल्या, त्यातच मीठ व हिरवी मिरची घातलेली! ती तशीच भाताबरोबर खायची! मसूरडाळीचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. मूगडाळीला "बीमार दाल' म्हणतात. तुरीची डाळ वेगळीच आहे, मसूरडाळीसारखी. फक्त वर्णाने फिक्कट पिवळी! बांबू हा येथील जनतेचा कल्पवृक्ष अाहे. अन्न, वस्त्र व निवारा या तीनही प्राथमिक गरजा पूर्ण करणारा! मिथुन या चतुष्पाद प्राण्याने आपल्याकडील सुवर्णाची जागा घेतली आहे. लग्नकार्ये त्याच्या देवाण-घेवाणीने ठरतात. वरपक्ष-वधूपक्षाला मिथुनाच्या रूपात दक्षिणा देतात. कन्या साक्षात लक्ष्मी असली तरी द्विभार्दा प्रतिबंधक विधेयकाची सफलता प्रश्नचिन्हांकित आहे. सव्वाशेपेक्षा जास्त आदि जमाती आहेत. प्रत्येकीची भाषा वेगवेगळी आहे. अरुणाचलला Land of Khushi-Khushi म्हटले जाते, परंतु काही जमाती अत्यंत मेहनती आहेत. एकाच वेळेला, एकाच शेतात भात, माझे व रागी यांची तीन पिके घेण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. शिव व सूर्य या प्रमुख देवता आहेत. बौध्द व धर्मांतरणाने झालेले ख्रिश्र्चन बरेच आहेत. शिक्षण मुख्यतः इंग्रजी माध्यमातून आहे. जनता चिनी भाषा शिकविण्याच्या सोयीची मागणी करीत आहे, हे कशाचे द्योतक समजायचे? मूळ संस्कृति जोपासनेचे काम आव्हानात्मक आहे.
पर्यटन-स्थलदर्शन हा मुख्य हेतू मनामध्ये धरून मी अरुणाचलला गेले नव्हते. तेथे माझी मुलगी कशी राहते? काय काम करते? ती तिच्या कार्यात कितपत रमली आहे? हे पाहणे व जास्तीत जास्त तिच्या सहवासात राहणे या उद्देशाने मी तिकडे गेले होते. माझे भाग्य एवढे बलवत्तर की, मला तिच्याबरोबरच आणखी "पंच सुकन्यांचा' सहवास लाभला. कु. जागोती (जागृती या शब्दाचा अरुणाचली उच्चार) ही कु. प्रांजलीबरोबरच असते. याशिवाय उन्हाळ्याच्या सुट्टीत एक महिना पूर्णकालीन कार्यकर्त्या म्हणून आलेल्या कु. यात्री, देवी, चांदनी व बबिता या चार माध्यमिक विद्यार्थिनी! सुश्री अलकागौरीदीदीचा सहवास 4-5 दिवस लाभला. ही मूळ पुण्याची आहे. बऱ्याच वर्षांपासून उत्तरपूर्वेत कार्यरत आहे. मा. रूपेशभय्यांची ओळख झाली. मा. राधाकृष्णनजी यांची भेट झाली व मा. विश्र्वासजींबद्दल कु. प्रांजलीकडून खूप प्रशंसोद्‌गार ऐकले होते. त्यांची फक्त भेटच नाही झाली, तर सहप्रवासाचा सुयोगही साधता आला. झीरोला जाताना मा. राधाकृष्णनजी व इटानगरहून-दिब्रुगड व दिब्रुगड ते गुवाहाटी हा प्रवास मा. विश्र्वासजींच्या जीपमधूनच केला.
अरुणाचलमध्ये येण्याचा मुख्य हेतू जरी स्थलदर्शन नव्हता तरी तेथे मी प्राणिसंग्रहालय, दोन बुध्दमंदिरे, पाईत वृक्षांनी समृध्द असलेले इंदिरा गांधी नॅशलन पार्क व स्थानिक बाजारपेठ ही ठिकाणे पाहिली. प्राणिसंग्रहालय मा. राधाकृष्णनजींच्या सौजन्याने जीप मिळाल्यामुळे पाहणे शक्य झाले. तेथे जाताना बरोबर डबे नेले होते. एकूण 22 जण होतो. कु. प्रांजली आली नव्हती. सर्वांनी भरपूर आनंद लुटला. येथे मला अरुणाचलचा पक्षी "हॉर्नबिल' पाहावयास मिळाला.
झीरोला मा. राधाकृष्णन्‌जींच्या जीपमधून गेलो होतो. वाटेवरील शेर व याचुली येथील शाळांना भेट दिली, झीरोला सायंकाळी पोहोचलो. येथील महिला शाखा- अर्थात विवेकानंद केंद्राची- कु. सोन्यादीदी सांभाळते. तिच्याबरोबर एक महिन्यासाठी आलेल्या तीन विद्यार्थिनी होत्या. अगदी गारठलेल्या अवस्थेत केंद्रात दाखल झालो. "भजनसंध्या' सुरू होती. ती पूर्ण झाल्यानंतर गरम-गरम पाणी प्यावयाला देऊन आमचे स्वागत करण्यात आले. अशीच बेसुमार थंडी मागे गौरीकुंडला अनुभवली होती. तेथे गरम पाण्याच्या कुंडातील स्नानाने ऊब दिली होती. येथे गरम पाणी सेवनाने खूप बरे वाटले! येथपर्यंतच्या प्रवासात अरुणाचलचे निसर्गसौंदर्य, पाऊस यांचा अनुभव घेता आला.
दुसऱ्यादिवशी सकाळी "शिवलिंगदर्शनासाठी' बाहेर पडलो. मी, कु. प्रांजली, कु. सोन्या व कृष्णाभैय्या! "वाट ऽ अवघड ऽ गिरीची पायरीऽ। कैसी चढू बा सांग तू तरीऽऽ।। असे व्यंकटेशाचे गीत माझी आई म्हणत असे. येथे फरक फक्त देवतेच्या नावाचा होता. शिवजींचे दर्शनही सहजसाध्य नाही, याचे प्रत्यंतर आले. दर्शनानंतर वाटचालीचा शीण कुठल्याकुठे पळाला! येथील श्री गणेशाचे दर्शन तर फारच मनोहारी होते. स्वयंभू मूर्ती, पण प्रत्येक अवयव अगदी स्पष्ट. पार्वतीदेवी व कार्तिकेय यांनी मात्र आपल्या ख्यातीनुसार "गूढरम्य' दर्शन दिले. हा दर्शनयोग कु. प्रांजलीमुळे आला असला तरी कु. सोन्या व कृष्णा यांचे सहाय्य फार मोलाचे होते. दर्शनाचा माझा निर्धार त्यांनी अगदी हातोहात प्रत्यक्षात उतरविला, परमेश्र्वराची कृपा!
परतीचा प्रवास पुन्हा मा. राधाकृष्णन्‌जींच्या साथीने त्यांच्याच जीपने केला. त्यांचे व मा. विश्र्वासजींचे सहज बोलणे, चुटकुले सांगणे व विनोदही ऐकविणे म्हणजे शंभर टक्के बौध्दिक होते, न संपावे असे वाटणारे! उभयतांचा जनसंपर्क उत्कृष्ट संघटनकौशल्याचे प्रात्यक्षिक होते. दोघांनीही जिव्हाळ्याने केलेली नाष्टा-भोजनाची सोय, त्यांच्या अंतरंगाची ओळख देत होती व मलाच माझ्या भाग्याचा हेवा वाटत होता. नुकतीच माझी आई निवर्तली, तिच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सृष्टिकर्त्याने अशाप्रकारे भरून काढून, त्याने आपलाच नियम सिध्द केला होता. दरीच्या सोबतीने पर्वत असतातच !
दि. 23-5-2007 रोजी सोलापूरकडे येण्यासाठी इटानगर सोडले. मा. विश्र्वासजींच्या जीपने इटानगर ते दिबु्रगड व दिबु्रगड ते गुवाहाटी असा प्रवास केला. दिबु्रगड केंद्रामध्ये भोजनव्यवस्था केली होती. अगदी घरी जेवल्याचे समाधान त्यातून मिळाले. त्याचदिवशी सायंकाळी गुवाहाटीच्या वि.के.मध्ये एका समन्वयात्मक कार्यक्रमास उपस्थित राहता आले. त्याचे संयोजन उत्कृष्टरीत्या करण्यात आले होते. हॉल गर्दीने तुडुंब भरला होता. वि. केंद्राचे मा. सुजातादीदींचे प्रयास त्यातून दिसत होते. उत्साही वातावरणातील यशस्वी कार्यक्रम असेच त्याचे वर्णन करता येईल.
दि। 24 ला गुवाहाटीहून सिकंदराबादकडे जाणारी रेल्वे गाठण्यासाठी सकाळी 6 वा. केंद्र सोडले. मला पोचवायला कु. प्रांजली व कु. भीष्मश्री या दोघी आल्या होत्या. गाडी सुटेपर्यंत दोघीहि थांबल्या, निरोप घेऊन त्या उतरताच थोड्याच वेळात गाडी सुटली आणि माझ्या मिटल्या डोळ्यांसमोर दिसू लागली, पहाडी आवाजात भजने म्हणणारी "जागोती'. उपवास असल्यामुळे नाष्टा केला नव्हता, तर उत्स्फूर्तपणे चहाचा कप समोर धरणारी "देवी', लाडे-लाडे भोवती घुटमळणारी, सडपातळ राहण्याचा ध्यास घेतलेली "चांदनी', पिकलेल्या लाल टोमॅटोची चविष्ट चटणी बनविणारी तेजतर्रार "बबिता', मला आवडलेले गीत कागदावर उतरवून देणारी गोड गळ्याची "यात्री'! कैऱ्या सोबत घेऊन येऊन हक्काने "कैरीची डाळ' करायला लावणारी व कौतुकाने खाणारी तसेच सर्वांसाठी गोड आंबे घेऊन आलेली मा. अलकागौरीदीदी! महाराष्ट्राला एक वर्ष दिलेत, आता अरुणाचलला एक वर्ष द्या, असे म्हणणारे केंद्र कार्याचा ध्यास घेतलेले मा.श्री. रूपेशभैय्या! गुवाहाटी वास्तव्यात सर्वतोपरी सहाय्य करणारी मा. सुजातादीदी! सकाळी निघताना आम्हाला जीप मिळाली की नाही, हे पाहायला स्वतः खाली आलेल्या मा. रेखादीदी! वरच्या मजल्यावरील खिडकीमध्ये उभे राहून पाहणारे भानुदासजी! मला बरे वाटावे म्हणून ही गोष्ट माझ्या लक्षात आणून देणारी कु. भीष्मश्री! नमस्कारासाठी हात जोडले असताना प्रसन्न ओळख देणारे मा. बालकृष्णन्‌जी, सहाय्यासाठी सदैव तत्पर असणारे श्री. कल्याणदत्ताजी! अघळ-पघळ रोमिनभैय्या, गमत्या कमिनकुमार, तारो, तमो, आकू, राजूभैय्या हे सर्व कायम स्मरणात राहणारे! खरंच, केवढ्या प्रेमाची धनी झाले मी! हे सर्व साध्य झाले होते, कु. प्रांजलीमुळे! तिच्या प्रेरणेने मला एक वर्षाचा पूर्णकालीन कार्यकर्तीचा आनंद मिळाला. "वानप्रस्थी' व "मराठी भाषिक' कार्यकर्त्यांच्या शिबिरासाठी कन्याकुमारी येथे उपस्थित राहता आले आणि आता हे असे "माहेरपण' अनुभवता आले, आहे ना उलटी गंगा? पण किती अलौकिक! ईश्र्वरकृपा, दुसरे काय!

शोभा येरिकर
***

No comments: