Wednesday, June 21, 2017

योग आणि बौद्ध धम्म - साम्यस्थळे आणि वेगळेपण


डेव्हिड फ्राॅली,

विविध धर्मांचे साक्षेपी अभ्यासक. भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरव केला.

योग आणि बौद्ध धम्म या प्राचीन भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीतून विकसित झालेल्या भगिनी परंपरा आहेत. या दोन्ही परंपरांमध्ये अनेक संज्ञा एकसारख्या आहेत. अनेक तत्त्वं आणि उपासना एकसारख्या आहेत. यामुळेच माझ्यासारख्या पाश्चात्त्य देशात जन्म झालेल्या माणसाला सुरुवातीच्या काळात तरी योग आणि बौद्ध धम्माची शिकवण एकसारखी वाटते, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

वास्तविक पाहता या दोन्ही परंपरांमध्ये फरक नसल्यामुळे त्यातील शिकवण आणि साधना यांचा आम्ही एकत्र अभ्यास करू शकतो. ऐतिहासिकदृष्ट्या या दोन्ही पद्धतींमध्ये अस्तित्वात असलेल्या वेगळेपणामुळे त्यांना स्वतंत्र परंपरा म्हणून वेगळे ठेवले आहे. परंतु आमच्यासारख्या पाश्चिमात्यांच्या दृष्टीने या दोन्ही परंपरांत वेगळेपणापेक्षा समानताच अधिक आहे किंवा या दोन्हींपैकी एका परंपरेचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीची समजूत अशी होऊ शकते की, त्या परंपरेचा दुसऱ्यावर प्रभाव पडला आहे.
बौद्ध धम्माचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीस योगामध्ये इतकी समानता आढळून येईल की, त्याला वाटू शकते की योगावर बुद्ध धम्माचा मोठा प्रभाव आहे. योगाचे अध्ययन करणाऱ्याला बौद्ध धम्मात इतकी समानता आढळून येईल की, त्याला वाटू शकते बुद्ध धम्मावर योगशास्त्राचा अमिट प्रभाव आहे.
तथापि, या दोन महान आध्यात्मिक परंपरांतील समानता शोधण्याची जिज्ञासा फक्त पश्चिमेपुरती मर्यादित नाही. पश्चिमेकडे योगशास्त्र सर्वप्रथम आणण्याचे श्रेय महान योगी स्वामी विवेकानंद यांना जाते. ते वेदांती होते. त्यांनी बौद्ध महायान ग्रंथावर भाष्य केले आहे. बौद्ध तत्त्वज्ञानाची प्रमुख तत्त्वे आणि वेदांत तत्त्वज्ञान हातात हात घालून जातात, हे त्यांनी पुरेसे स्पष्ट करून सांगितले आहे. अलीकडच्या काळात आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्यासह तिबेटी निर्वासित मोठ्या प्रमाणात भारतात आले. त्यानंतर या दोन्ही परंपरांमध्ये सुसंवाद होऊन परस्परांविषयी आदरभावना वाढीस लागल्याचे दिसते. तिबेटी बौद्ध अनेकदा हिंदूंच्या धार्मिक संमेलनांमध्ये सहभागी होताना दिसतात आणि सर्व प्रकारच्या चर्चा, विचारविनिमय यामध्येही भाग घेतात.

अलीकडच्या काळातील संदर्भ घेऊन दोन परंपरा जोडणे हा माझा उद्देश नाही. हिंदू-बौद्ध एकत्रीकरणाची अनेक उदाहरणे इतिहासात दिसून येतात. बुद्ध स्वत: हिंदू धर्मात जन्मले होते आणि काही विद्वानांनी असा दावा केला आहे की, गौतम बुद्ध यांच्या महानिर्वाणानंतर अनेक वर्षांपर्यंत हिंदू धर्मापेक्षा वेगळा धर्म म्हणून बुद्ध धम्म अस्तित्वात नव्हता. मध्ययुगीन काळात इंडोनेशियामध्ये शिव-बुद्धांची उपासना अस्तित्वात होती. अनेक तांत्रिक योगींना हे सांगणे अवघड आहे की, ते हिंदू आहेत की बौद्ध. मध्ययुगीन काळात हिंदूंनी विष्णूचे अवतार म्हणून बुद्ध स्वीकारले आणि बहुतेक हिंदू अजूनही मानतात की, आपण बुद्ध-अवतार युगात आहोत. बहुतांश हिंदू गौतम बुद्धांची उपासना करत नसले तरी गौतम बुद्ध हे महान ऋषी असल्याची त्यांची श्रद्धा आहे.

असे असले तरी समानतेची सूत्रे बाजूला ठेवल्यास दोन्ही परंपरांमध्ये काही मतभेद आहेत, हे आपण नाकारू शकत नाही. मतभेद आणि वादविवाद यामुळेच या दोन्ही परंपरा आजवर पूर्णपणे एकजूट होऊ शकल्या नाहीत. दोन्ही परंपरांतील काही प्रथा आणि इतर बाबी आजपर्यंत वेगळ्या चालत आल्या आहेत. सामान्यतः हिंदू योग परंपरेने गौतम बुद्धांची वेदांतिक प्रकाशात पुनर्मांडणी केली आणि बुद्धांना आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. बौद्ध धर्माने मात्र आपले वेगळेपण जपण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचे दिसते. वैदिक आस्तिकता आणि स्व:च्या उच्च स्वरूपाला असलेली वैदिक मान्यता या दोन्ही बाबींशी असलेली असहमती बौद्ध परंपरेने जपली आहे.
बहुतेक हिंदू आणि बौद्ध गुरूंनी (यामध्ये विविध योग संस्था चालवणारे हिंदू आणि तिबेटी बौद्धही आले) आपल्या शिकवणीमध्ये विवेकभाव आणणे आवश्यक आहे. विशेषत: साधना आणि अंतर्दृष्टी याचा सूक्ष्म स्तरावर विचार करताना. योगविषयक ग्रंथांमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी बौद्ध मताचे खंडन केल्याचे दिसते आणि बौद्ध ग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी योग आणि वेदांत मताचे खंडन केल्याचे दिसते. म्हणूनच आपण या दोन परंपरांतील साम्यस्थळांचा गौरव करताना त्यांतील मतभेदांकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

योग परंपरा
शास्त्रीय योग प्रणालीचा विचार करता ही प्रणाली ऋषी पतंजली यांनी योगसूत्रांद्वारे मांडली. पतंजली ऋषींनी मांडलेली प्रणाली ही मोठ्या वैदिक परंपरेचा केवळ एक भाग होता. ऋषी पतंजली यांच्याकडे योग परंपरेचे संस्थापक म्हणून कधीही पाहिले गेले नाही, हे ध्यानात घेतले पाहिजे. योगशास्त्राचे संकलक म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. आधीपासून चालत आलेल्या परंपरेचा आधार घेत त्यांनी अष्टांगयोगाचा मार्ग सांगितला. यामध्ये नैतिक शिस्त (यम आणि नियम), आसन, श्वसनाद्वारे प्राणशक्तीचे नियमन (प्राणायाम), इंद्रियांचा निग्रह (प्रत्याहार), एकाग्रता (धारणा), ध्यान आणि समाधी यांचा समावेश होतो.
योगाकडे पाहण्याचा हा आठ आयाम असलेला दृष्टिकोन बहुतेक हिंदू विचाराच्या संस्थांमध्ये स्वाभाविकपणे दिसून येतो. पुराणे, महाभारत आणि उपनिषद आदी पतंजलीपूर्व साहित्यात योगासंबंधीची ही मूलभूत चर्चा दिसून येते. योग परंपरेचा उगम हिरण्यगर्भापासून झाला असे मानले जाते. हिरण्यगर्भ हा विश्वातील सृजनशील आणि उत्क्रांती शक्तीचे प्रतीक आहे.
ऋग्वेदामध्ये योगाचा शोध घेतला जाऊ शकतो, जो हिंदूंचा सर्वात प्राचीन ग्रंथ समजला जातो. या ग्रंथामध्ये मनाचा संयम आणि सत्याकडे घेऊन जाणाऱ्या अंतर्ज्ञानाबद्दल वर्णन आले आहे. योगाच्या सुरुवातीच्या महान गुरूंमध्ये वशिष्ठ, याज्ञवल्क आदी महान वैदिक ऋषींचा समावेश होतो. भगवान श्रीकृष्ण हे सर्वात महान योगी होते. म्हणूनच त्यांना योगेश्वर असे म्हटले जाते. भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेल्या भगवद््गीतेला योगशास्त्रही म्हटले जाते. हिंदू देवतांपैकी भगवान शिव यांना आदियोगी म्हटले जाते. म्हणूनच शास्त्रीय योग आणि बौद्ध धम्म यांची तुलना करताना सामान्यपणे बौद्ध आणि हिंदू मत (त्यातही विशेषकरून हिंदू धर्मातील योग आणि वेदांताचा भाग) यांची तुलना करावी लागते.
काही लोक, विशेषतः पश्चिमेमध्ये, असा दावा केला जातो की, "योग हिंदू किंवा वैदिक नसून एक स्वतंत्र किंवा अधिक सार्वभौमिक परंपरा आहे. ते दाखवतात की हिंदू शब्द योगसूत्रांत दिसत नाही आणि योगसूत्रांचा हिंदुत्वाच्या मूलभूत उपासनापद्धतींशीही काही संबंध नाही.’ वरवरचे वाचन करणाऱ्यांना असेच दिसते. योगसूत्रे ही हिंदू आणि वैदिक तत्त्वज्ञानाच्या तांत्रिक संज्ञांसह प्रचलित आहेत. ग्रंथांमध्ये या संज्ञांचे विस्तृत आणि तपशीलवार विवरण आढळून येते. 

योगशास्त्र हे वेद, भगवद््गीता आणि उपनिषद यांचा अधिकार स्वीकार करणाऱ्या वैदिक तत्त्वज्ञानाच्या सहा दर्शनांतील एक आहे. या परंपरेतील भाष्यकारांनी हे ठळकणे पुढे आणले आहे. बृहद योग याज्ञवल्क्य स्मृती हा प्रारंभिक योगशास्त्रावरील एक महान ग्रंथ आहे. यामध्ये आसन आणि प्राणायाम साधनेसह वैदिक मंत्र आणि उपासना याविषयीचे वर्णन आहे. अनेक संख्येने असलेल्या योग उपनिषदांमध्येही असेच वर्णन आहे. एखाद्याने या महान परंपरेला दूर सारून योग सूत्रांचा अभ्यास करायचा प्रयत्न केला तर तो मार्ग चुकणार हे निश्चित आहे. कारण योगसूत्र हे केवळ सूत्र रूपात आहेत. सूत्र म्हणजे अतिशय छोटी वाक्ये आहेत. बहुतेक वेळा अर्धवट भासणारी ही वाक्ये विस्तृत भाष्याशिवाय जवळजवळ अर्थहीन ठरतात किंवा त्या सूत्रांतून अनेक अर्थ निघू शकतात. त्यामुळे एखाद्याला योग सूत्र आणि योग परंपरेचा अभ्यास करायचा असेल तर त्याने केवळ त्या विषयावर आधुनिक काळात व्यक्त होणाऱ्या मतांचा विचार करून चालणार नाही. संबंधित सूत्राचा विचार अधिकृत ग्रंथ, भाष्य आदींचा आधार घेतच करावा लागेल.
पश्चिमेकडील योग शिक्षकांसह अनेकजण म्हणतात की योग हा धर्म नाही. हा मुद्दा विचार करण्यासारखा असला तरी यातून प्रामुख्याने दिशाभूल करण्याचाच अधिक प्रयत्न असतो. योग हा ईश्वर किंवा तारणकर्त्याकडे जाण्याचा आम्ही सांगतो तोच एकमेव मार्ग खरा आहे. अशा प्रकारचा प्रचार करणाऱ्या कोणत्याही धार्मिक शिकवणीचा भाग नाही. भारतातील योग शिक्षक हे त्यांच्या विद्यार्थ्यांनी औपचारिकरीत्या हिंदू धर्म स्वीकारला पाहिजे यासाठी कधीच आग्रह करत नाहीत, हे खरेच आहे. असे असले तरी योग हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा भाग आहे आणि हिंदू धर्माच्या सर्व पैलूंशी आणि भारतीय संस्कृतीशी तो जोडलेला आहे. योग हा आत्मा, ईश्वर आणि अमरत्वाचे स्वरूप उलगडून दाखवतो, जे संपूर्ण जगभरातील धर्मांचे प्रमुख विषय आहेत. योग हा केवळ व्यायाम किंवा आरोग्याशी संबंधित नसून  धर्म (रिलीजन या अर्थाने नव्हे) हा त्याचा मुख्य विषय आहे. योग हा प्रामुख्याने धर्माच्या आध्यात्मिक बाबींशी निगडित असला तरी तो उपासनापद्धतींशी संबंधित किंवा संस्थात्मक स्वरूपाचा नाही.
स्वैर अनुवाद : सिद्धाराम
साभार : विवेक विचार । जून २०१७
vivekvichar.vkendra.org