Monday, August 14, 2017

राष्ट्रभक्तीच्या भावनेचे सर्वोच्च पुरस्कर्ते काय म्हणतात पाहा...



राष्ट्रभक्तीच्या भावनेचे सर्वोच्च पुरस्कर्ते काय म्हणतात पाहा... 
 

लोकमान्य टिळक 
दोघे जेव्हा बेलूरला भेटले तेव्हा त्या भेटीत विवेकानंदांनी शत्रूशी मुकाबला करताना अधिक विध्वंसक मार्ग चोखाळण्याचा आग्रह टिळकांपाशी धरला. टिळक हे स्वामी विवेकानंदांना राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे, पिता मानित होते.

सुरेंद्रनाथ बॅनर्जी
सुरेंद्रनाथांनी आपल्या बंगाली वृत्तपत्रात विवेकानंद चरित्राचे परीक्षण करताना, कार्लाइलच्या ‘देशाचा इतिहास हा त्याच्या महापुरुषांचा इतिहास असतो’ या वाक्याचा संदर्भ देऊन रामकृष्ण व विवेकानंद यांचे समकालीन महामानव म्हणून उदाहरण दिले.

बिपिनचंद्र पाल
बिपिनचंद्र पाल लिहितात, आपल्या राष्ट्रभक्तीच्या भावनेचे सर्वोच्च पुरस्कर्ते व महापुरुष होण्याचा मान विवेकानंदांचाच आहे. आपल्या देशाबद्दलच्या व संस्कृतीबद्दलच्या ज्वलंत भावनेची तार त्यांनीच प्रथम छेडली.

गोपाळकृष्ण गोखले
गोपाळ कृष्ण गोखलेंच्या धर्मासंबंधी कल्पनांमध्ये विवेकानंदांच्या प्रभावामुळे बदल घडल्याचे दिसून येते. त्यांच्या सामाजिक कल्पना, बहुजन समाजाच्या उद्धारावरील त्यांचा भर याचे स्फूर्तिस्थान विवेकानंद होते हे म्हणणे साधार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भगवान बुद्ध यांच्यानंतर कोणी महापुरुष या भारतवर्षात अवतरीत झाला असेल तर ते स्वामी विवेकानंद होत.
(संदर्भ : रिमेन्सेस ऑफ नेहरू एज, लेखक : एम. ओ. मथाई)

वि. दा. सावरकर
क्रांतिकारकांचे मुकुटमणी वि. दा. सावरकर लिहितात, 1898च्या सुमारास उभा हिंदुस्थान विवेकानंदांच्या पुस्तकांनी भारला होता. ती पुस्तके आणि व्याख्याने माझ्या बंधूंनी आणि त्यांच्या नादाने मीही वाचली. राष्ट्रासाठी जीवनाचे बलिदान करण्याची प्रेरणा यातूनच मिळत होती.

महात्मा गांधी
आपली देशभक्तीची भावना प्रचंडतेने प्रखर होण्याचे कारण सांगताना महात्मा गांधी म्हणतात, मी विवेकानंदांच्या समग्र वाङमयाचे अध्ययन केले आहे. त्याचमुळे माझ्या ठायी असलेले मातृभूमीवरील प्रेमहजारोपटीने वाढले आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस
सुभाषचंद्र बोस वारंवार हेच लिहित की, त्यांचे जीवन विवेकानंद यांच्या प्रभावाखाली घडवले गेले; आणि युवकांनीही विवेकानंदांचा आदर्श समोर ठेवावा असाच त्यांचा आग्रह असे. त्यांच्या मते, चारित्र्य निर्माणाचा सर्वोच्च आदर्श देशापुढे जर कुणी ठेवला असेल तर तो विवेकानंदांनी. 

रवींद्रनाथ टागोर
रवींद्रनाथ टागोर लिहितात, तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल, तर स्वामी विवेकानंदांचा अभ्यास करा. स्वामी विवेकानंदांनी मानवाच्या संपूर्ण विकासाचा मूलमंत्र दिला व त्यातून देशाच्या उद्धारासाठी अनेक तरुण कार्यप्रवृत्त झाले व अनेकांनी सर्वोच्च त्यागही केला.

जवाहरलाल नेहरू
चिनी आक्रमण होत असताना तरुणांपुढे आदर्श म्हणून ठेवण्यास नेहरुंनी सामर्थ्याची व तेजाची मूर्तिमंत प्रतिमा असलेल्या विवेकानंदांची निवड केली.विवेकानंदांबद्दल ते म्हणतात : ते कोणी राजकारणी नव्हते... आणि तरीही भारतातील राष्ट्रीय आधुनिक चळवळ सुरू करणारे ते एक थोर संस्थापक होते.

इंदिरा गांधी
इंदिरा गांधी यांचा स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठाशी घनिष्ट संबंध होता. भारतीय तरुणांसमोर स्वामी विवेकानंदांचा आदर्श असला पाहिजे, अशी त्यांची भावना होती. १२ जानेवारी हा विवेकानंद जयंतीचा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित करण्याचे त्यांनीच ठरवले. राजीव गांधी यांनी या निर्णयाला मूर्त रूप दिले.

सर्वपल्ली राधाकृष्णन
डॉ. राधाकृष्णन म्हणतात, मातृभूमीच्या चैतन्याची विवेकानंद प्रत्यक्षमूर्ती होते. तिच्या आध्यात्मिक आशा आकांक्षा व त्यांची परिपूर्ती याचे ते प्रतीक होते. आणि हेच ते चैतन्य की जे आमच्या भक्तजनांच्या काव्यातून, द्रष्ट्यांंच्या तत्त्वज्ञानातून, पूजा प्रार्थनांतून व्यक्त झाले.

डॉ. एपीजे कलाम
डॉ. एपीजे कलाम म्हणतात, लोकांमध्ये विवेकानंदांच्या संदेशाचा प्रचार आणि प्रसार करणे खूप महत्त्वाचे आहे. मानव सेवा आणि मनुष्य निर्माण या संबंधात स्वामीजींची किमान १० बोधवाक्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि चमकणार्या बोर्डाद्वारे जागोजागी प्रचारित केली पाहिजेत. आणि लोकांना आवाहन केले पाहिजे की त्यांनी यातील किमान एका संदेशाचे जीवनभर पालन करावे.

नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. श्री. मोदी हे १७ वर्षांचे असताना स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांमुळे अतिशय प्रभावित होऊन सत्याच्या शोधासाठी घराबाहेर पडले होते. संन्याशी बनण्यासाठी राजकोट येथील रामकृष्ण मठात गेले होते. त्यांच्यावरील विवेकानंदांच्या प्रभावामुळेच द गार्डियनने आपल्या संपादकीयात लिहिले, १६ मे २०१४ पर्यंत भारतात ब्रिटिशांचेच राज्य होते आणि नरेंद्र मोदी यांच्या निवडीमुळे भारत खर्या अर्थाने स्वतंत्र झाला.

-------

स्वामी विवेकानंदांनी आधुनिक काळामध्ये जगद्गुरू भारताची संकल्पना मांडली. समर्थ भारताशिवाय जगद्गुरू भारत ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही, याची जाण स्वामीजींना होती.

स्वामी विवेकानंदांनी स्वातंत्र्य आंदोलनाला गती दिली, इतकेच नाही तर पुढील काळात भारत कधीच परतंत्र बनणार नाही यासाठीची पायाभरणीही केली. जे कार्य त्यांच्या पश्चातही हजारो वर्षे चालू राहणार आहे. आणि वृद्धिंगत होत राहणार आहे.

स्वामी विवेकानंद म्हणतात,
मी भविष्यकाळात डोकावून पाहात नाही. तसे करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण एक चित्र माझ्या दृष्टीपुढे साक्षात् उभे राहते : ही प्राचीन माता पुन्हा एकदा जागी झाली आहे. सर्व वैभवांसह पुनश्च आपल्या सिंहासनावर आरूढ झाली आहे. शांतिमंत्रांनी आणि आशीर्वचनांनी तिचे आगमन जगापुढे प्रकट करू या !

विवेकानंद केंद्राचे मासिक - विवेक विचार । ऑगस्ट २०१७ मधून साभार 
vivekvichar.vkendra.org

No comments: