Thursday, February 25, 2010

... "कॅथॉलिक' बनावे

सर्व ख्रिस्ती संप्रदायांमध्ये, कॅथॉलिक चर्च अधिक कट्टर, अधिक जुलमी, अधिक असहिष्णू आणि अधिक मूलस्थितिवादी राहिलेले आहे. या चर्चची म्हणजे चर्च चालविणाऱ्या प्रमुखांची अशी वागणूक राहिल्यामुळेच तर, त्याविरुद्ध मार्टिन ल्यूथरला या चर्चविरुद्ध बंड करावे लागले. त्याने स्थापन केलेल्या पंथाचे "प्रॉटेस्टंट' हे नावच कॅथॉलिक चर्चच्या निषेधाचे द्योतक आहे.
नुकतीच "कॅथॉलिक कौन्सिल ऑफ इंडिया,' या ख्रिस्ती संप्रदायाच्या संस्थेची 10 वी सर्वसाधारण बैठक झाली. ती चार दिवस चालली. त्या बैठकीला, कॅथॉलिक चर्चच्या भारतातील 160 घटकसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तेथे पारित झालेल्या एका ठरावान्वये "राष्ट्रीय एकात्मता आणि भारतातील अन्य नागरिकांच्या शांततापूणर्ण सहजीवनासाठी' आपली प्रतिबद्धता प्रकट करण्यात आली. ही प्रतिबद्धता, प्रस्तावाच्या शब्दांमध्ये बुडून न जाता, ती प्रत्यक्षात उतरली, तर ती स्वातंत्र्योत्तर भारताच्या राष्ट्रजीवनातील फार मोठी उपलब्धी ठरेल, याविषयी शंका नको. "कॅथॉलिक' या विशेषणाचा अर्थ वैश्विक उदारता असा आहे. त्या अर्थाला साजेसेच हे वर्तन ठरेल. परंतु, कॅथॉलिक चर्चचा इतिहास आणि वर्तमानही, या प्रतिबद्धतेला अनुरूप आहे, असे मात्र म्हणता यावयाचे नाही.
भूतकाळ : मागच्या इतिहासातील कृष्णकारस्थाने उगाळीत बसण्यात अर्थ नाही. तथापि, एवढे सांगणे अप्रासंगिक होऊ नये की, सर्व ख्रिस्ती संप्रदायांमध्ये, कॅथॉलिक चर्च अधिक कट्टर, अधिक जुलमी, अधिक असहिष्णू आणि अधिक मूलस्थितिवादी राहिलेले आहे. या चर्चची म्हणजे चर्च चालविणाऱ्या प्रमुखांची अशी वागणूक राहिल्यामुळेच तर, त्याविरुद्ध मार्टिन ल्यूथरला या चर्चविरुद्ध बंड करावे लागले. त्याने स्थापन केलेल्या पंथाचे "प्रॉटेस्टंट' हे नावच कॅथॉलिक चर्चच्या निषेधाचे द्योतक आहे. ल्यूथरनंतर सुमारे शंभर वर्षांनंतर गॅलिलिओ झाला. त्याचा अपराध एवढाच होता की, तो सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्याभोवती फिरते, असे प्रतिपादित होता. हा धर्मद्रोह आहे, असे चर्चने ठरविले आणि त्याला तुरुंगात टाकून त्याचा इतका छळ केला की, त्याने आपले मत चूक असल्याचे कबूल केले, तेव्हा त्याची तुरुंगातून सुटका झाली. किती प्रॉटेस्टंट धर्मगुरूंना कॅथॉलिक चर्चने जिवंत जाळले, याचा सारा हिशेब प्रॉटेस्टंटांजवळ आहे.
वर्तमान : पण ही सारी "रानटी' मध्ययुगातील प्रकरणे आहेत. त्याबद्दल कॅथॉलिक चर्चच्या अलीकडच्या प्रमुखांनी म्हणजे पोपमहाशयांनी खेदही व्यक्त केला आहे. पण या 20 व्या व 21 व्या शतकातही, कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट पंथीय लोकांमध्ये सामंजस्य निर्माण झाले, असे दिसून येत नाही. मी, नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये 17 वर्षे प्राध्यापक होतो. हे कॉलेज, "चर्च ऑफ स्कॉटलंड' या प्रॉटेस्टंट चर्चमार्फत चालविले जाते. त्या काळात अनेक नव्या प्राध्यापकांची नियुक्ती झाली. काही वर्षे मी या निवड मंडळीचा एक सदस्यही होतो, पण एकाही कॅथॉलिकाला आमच्या कॉलेजमध्ये नोकरी मिळाल्याचे उदाहरण नाही. नागपूरचे सेंट फ्रान्सिस डिसेल्स कॉलेज कॅथॉलिकांकडून चालविले जाते. त्या कॉलेजमध्ये कधीतरी कुणा प्रॉटेस्टंटाला नोकरी मिळाली असेल, असे वाटत नाही. माझे हे विधान चूक असेल, तर मी आले शब्द माफीनाम्यासह परत घेईन. मी असे ठामपणे म्हणण्याचे कारण आहे. गोष्ट 2002 ची आहे. मी, तेव्हा, दिल्लीला रा. स्व. संघाचा प्रवक्ता म्हणून कार्यरत होतो. संघाच्या राष्ट्र जागरण अभियानाच्या दरम्यान अल्पसंख्यक आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष सरदार तरलोचन सिंग यांच्या घरी आम्ही गेलो होतो. शीख रिलिजन आणि शीख समाज यांच्यासंबंधी संघाची भूमिका, आम्ही त्यांना समजावून सांगितली. ते आम्हाला म्हणाले, ""हे तुम्ही अल्पसंख्यक आयोगासमोर सांगाल काय?'' आम्ही होकार दिला. त्याप्रमाणे बैठक ठरली. आयोगाचे संपूर्ण सदस्य उपस्थित होते. आम्ही आपले निवेदन इंग्रजी भाषेत लेखी स्वरूपात सादर केले होते. बहुतेक चर्चा इंग्रजीतच झाली. तेव्हा त्या आयोगाचे एक सदस्य श्री जॉन जोसेफ म्हणाले, ""आपण ख्रिस्ती धर्मगुरूंशीही बोलाल काय?'' आम्ही होकार दिला. त्याप्रमाणे त्यांनी दिल्लीच्या कॅथॉलिक चर्चच्या प्रमुखांशी संपर्क केला. त्यांच्या तीन अटी होत्या- 1. आम्ही प्रवक्ता वगैरे खालच्या दर्जाच्या संघ कार्यकर्त्याशी बोलणार नाही, सर्वोच्च व्यक्तीशीच बोलू. 2. आमच्याबरोबर प्रॉटेस्टंट असणार नाहीत आणि 3. बैठक चर्चच्या इमारतीतच होईल. आम्ही या सर्व अटी मान्य केल्या. मात्र, प्रॉटेस्टंटांबरोबर बसायचेही नाही, एवढी अस्पृश्यता हे चर्च का पाळत असते, याचा उलगडा काही झाला नाही. त्यानंतर सुमारे एक महिन्याने प्रॉटेस्टंटांच्या 27 उपसंप्रदायांचे 29 प्रतिनिधी नागपूरला संघाच्या मुख्य कार्यालयात आले होते. दीड-दोन तास त्यांच्याशीही चर्चा झाली. सर्वांनी आमच्याबरोबर कार्यालयातच भोजन केले. हे सांगण्याचा उद्देश हा की, जो पंथ आपल्या अभिधानात "कॅथॉलिक' हे व्यापक विशेषण वापरतो आणि ज्याला आपल्याच धर्माच्या अन्य पंथांविषयी एवढी अनुदारता आहे, तो अन्य धर्मांच्या बाबतीत सहिष्णू आणि शांततापूर्ण सहजीवनासाठी उत्सुक राहील काय?
कॅथॉलिकच तेवढे अनुदार आहेत आणि बाकीचे पंथ खूप उदार आहेत, असे मला सूचित करावयाचे नाही. अमेरिकेचे उदाहरण माझ्यासमोर आहे. अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिका. जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र. या राष्ट्रात, बहुसंख्या प्रॉटेस्टंटांची आहे. पण कॅथॉलिकही 24 टक्के आहेत. या राष्ट्राच्या गेल्या तीनशे-सव्वातीनशे वर्षांच्या इतिहासात, फक्त एकदाच एक कॅथॉलिक राष्ट्रपती बनू शकला, पण तोही आपला चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही. तीन वर्षांच्या आत त्याची हत्या झाली.
सेमेटिक : सारेच सेमेटिक पंथ संप्रदाय अनुदारतेने ग्रस्त आहेत. केवळ ख्रिस्तीच अनुदार आहेत असे नाही. मुसलमानातही भरपूर अनुदारता आहे. शिया, सुन्नी, अहमदिया हे स्वत:ला इस्लामीच मानतात; ते सारे कुराण शरीफवर विश्वास ठेवतात आणि पैगंबरसाहेबांचाही आदर करतात; पण परस्परांचा द्वेष करावयाला कमी करीत नाहीत. इराण व इराक यांमधील संघर्ष हा शिया व सुन्नी यांच्यातील संघर्ष असतो. अहमदियांना, तर पाकिस्तानात मुसलमानच मानले जात नाही! कारण हे की, ते महमदसाहेबांना अंतिम पैगंबर मानीत नाहीत! अन्य बाबतीत सर्व समान असताना, या एका बाबीवरून जे आपल्या बांधवांना परके ठरवितात, ते अन्य पंथसंप्रदायांच्या लोकांशी समानतेने व्यवहार करू शकतील? -हा सर्वात मोठा कळीचा प्रश्न आहे. आणि त्याचे ठाम सकारात्मक उत्तर अद्यापि प्राप्त झालेले नाही, पण आजचा आपला मुद्दा कॅथॉलिक पंथांच्या संदर्भात आहे. त्यांच्याशी झालेल्या वार्तालापात आम्ही एकच प्रश्न उपस्थित केला की, चर्चमध्ये न जाताही पापमुक्ती मिळू शकते काय? (Can there be salvation outside the Church also) आणि या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आम्हाला मिळू शकले नाही. हिस्लॉप कॉलेजमध्ये असताना माझ्यापेक्षा निदान दोन दशके वयाने ज्येष्ठ असलेल्या अत्यंत शांत स्वभावाच्या प्राध्यापकाने मला प्रश्न केला होता की, ""मी आरएसएसचा सदस्य होऊ शकतो काय? त्यासाठी मी काय केले पाहिजे?'' मी उत्तर दिले होते की, ""आपणास आपले चर्च सोडण्याची जरुरी नाही. आपण बायबलवर श्रद्धा ठेवू शकता, परंतु आपणास हे मान्य करावे लागेल की, इतरही पंथ आणि विश्वासही, आपल्या पंथासारखेच योग्य असू शकतात.'' माझे वाक्य, पन्नास- पंचावन्न वर्षांनंतर आजही माझ्या स्मरणात आहे. मी म्हटले होते, Sir, You have to accept the validity of other faiths and religions. ते प्रामाणिक होते. ते म्हणाले, ""मी हे मान्य करू शकत नाही. हे मान्य केले तर मी आपल्या धर्माचा प्रचार कसा करू शकेन?''
अनिवार्यता : भारताच्या एकात्मतेसंबंधी आणि शांतिपूर्ण सहजीवनासाठी कॅथॉलिक चर्चची खरेच प्रतिबद्धता असेल, तर रोमची गोष्ट सोडा, भारतातील कॅथॉलिक चर्चच्या प्रमुखांनी असे नि:संदिग्ध विधान केले पाहिजे की, ईश्वराच्या उपासनेचे, ईश्वरप्राप्तीचे अन्यही मार्ग असू शकतात. आहे या चर्चच्या प्रमुखांची तयारी? एकात्मतेसाठी ही अगदी मूलभूत आवश्यकता आहे. या भारतात हिंदू बहुसंख्य आहेत, म्हणूनच एवढी उदारता, भारताच्या संविधानात आहे. आपल्या घटनेच्या 25 व्या कलमात प्रत्येकाला आपला वेगळा पंथ मानण्याचा (प्रोफेस), त्याप्रमाणे उपासना करण्याचा (प्रॅक्टिस), आणि प्रचार करण्याचा (प्रॉपॅगेट) मौलिक अधिकार दिला आहे. माझा व्यक्तिश: या व्यापक अधिकाराला विरोध आहे. ज्यांना इतर पंथ व आस्था यासंबंधीची वैधता मान्य नाही, त्यांना आपल्या असहिष्णू मताचा प्रचार करण्याचा अधिकार असू नये, असे मला वाटते. कारण, ते असहिष्णुतेचाच प्रचार करणार. आमची अशी इच्छा आहे की, सारेच पंथ, संप्रदाय, रिलिजन, मजहब खऱ्या अर्थाने "भारतीय' बनावेत; आणि त्यासाठी सर्व पंथसंप्रदायांच्या अस्तित्वाला मान्यता देणे अनिवार्य आहे. भारतातीलच ख्रिस्ती व इस्लामी संप्रदाय हे महत्‌ कार्य करू शकतात. कारण, नवे स्वीकारण्याची इथली फार प्राचीन परंपरा आहे.
उदारता : परमेश्वराची अनेक रूपे व अनेक नावे असू शकतात, ही इथली फार प्राचीन काळापासूनची मान्यता आहे. ऋग्वेदात इंद्र, वरुण आणि अग्नी या प्रधान देवता होत्या. नंतरच्या काळात ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिमूर्ती आल्या. त्यानंतरही राम, कृष्ण अशा अवतारी महापुरुषांना देवत्व प्राप्त झाले. विठोबा, खंडोबा, बालाजी अशी नवी दैवते आली. साई महाराज, गजानन महाराज, संतोषी माता ही आणखी अलीकडची दैवते आहेत. त्यांची भव्य, समृद्ध मंदिरेही उभी झाली. या मंदिरांच्या उभारणीला कुणाचाही आक्षेप नाही. अट एकच आहे की, जुने मंदिर उद्‌ध्वस्त करून आपले नवे मंदिर उभे करावयाचे नाही. बाबराला हे जमले नाही म्हणून अयोध्येत मंदिराच्या जागी मशीद बांधण्याचे दुष्कृत्य त्याच्या हातून घडले. वस्तुस्थिती ही आहे की, शरयूच्या किनाऱ्यावर मशीद बांधण्यासाठी भरपूर जागा होती, पण बाबराच्या सेनापतीला मशीद बांधायचीच नव्हती. हिंदूंचे मंदिर आक्रमायचे होते. औरंगजेबानेही त्याचेच अनुकरण करीत काशी व मथुरेची मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्या. गझनीच्या महमदानेही सोमनाथला तेच केले. अत्याचारांची, ही दृष्टीला बोचणारी आणि अंत:करणाला पिळवटून काढणारी प्रात्यक्षिके संपली पाहिजेत. भारतातील मुसलमानांचे हे आद्य कर्तव्य आहे. राजकारणाच्या आणि मतपेढीच्या मर्यादेच्या बाहेरचे हे प्रश्न आहेत.
अंतरंग : "कॅथॉलिक कौन्सिल ऑफ इंडिया'ने आपल्या एका प्रस्तावात "घरवापसी'ला (रिकॉन्व्हर्शन) विरोध केला आहे. त्यांनी मुख्यत: ओरिसा, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांचा निर्देश केला आहे. मला बरे वाटले. मिशनऱ्यांना, घरवापसीची आच लागत आहे, ही चांगली गोष्ट आहे. धर्मान्तराचा एकदिक्‌ मार्गच का असावा? जे ख्रिस्ती झाले, खरे म्हणजे ज्यांना ख्रिस्ती करण्यात आले, त्यांना परत स्वधर्मात का आणले जाऊ नये? यात व्यक्तीच्या "धर्मस्वातंत्र्या'वर कसा काय घाला पडतो? केवळ कॅथॉलिकच नव्हे, तर सर्वच चर्चेसने विचार केला पाहिजे की, ओरिसा आणि छत्तीसगड पूर्वी ज्या प्रांतात अंतर्भूत होते तो मध्यप्रदेश, यातील सरकारांनी "लालूच, कपट आणि जबरदस्ती' याद्वारे धर्मांतर करण्यावर बंदी का घातली? ही सरकारे भाजपाची सरकारे नव्हती. "सेक्युलर' कॉंग्रेसची सरकारे होती. या सरकारांनी अवैध धर्मपरिवर्तनाला प्रतिबंध करणारा, कायदा केल्याबद्दल, त्या कायद्याच्या विरोधात कुणी न्यायालयात धाव घेतली होती? चर्चेसनीच ना! का? लालूच, लबाडी व जबरदस्ती हे धर्मप्रसाराचे मार्ग चर्चेसला मान्य आहेत, म्हणूनच की नाही! हे पापलिप्त मार्ग या चर्चेसना योग्य वाटत असलेच पाहिजेत आणि आजही या वृत्तीत फारसा फरक पडला असेल, असे वाटत नाही. म्हणून तर, या कायद्याचे मनापासून स्वागत करण्याऐवजी चर्चची मंडळी न्यायालयात गेली. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने साफ सांगितले की, "धर्मस्वातंत्र्याचा हक्क' म्हणजे धर्मपरिवर्तन करण्याचा हक्क नव्हे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय कॅथॉलिक चर्चला मान्य आहे की नाही, हे त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे.
हित-अहित : हे खरेच आहे की, धर्म, उपासना, श्रद्धा हे वैयक्तिक पातळीवरचे विषय आहेत. पण चर्चेसने सामूहिक धर्मपरिवर्तन केले आहे. कायद्याची ऐसीतैसी करून हे अपप्रकार करण्यात धन्यता मानली आहे. स्टेन्सची हत्या, या अपप्रकारामुळे घडली. चर्चच्या उद्दंड कारवायांना लक्ष्मणानंद सरस्वती विरोध करीत होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. आताचा काळ, ना बाबर- औरंगजेबाचा आहे, ना सेंट झेवियरचा. आता अत्याचाराची प्रतिक्रिया उमटणार आहे. ओरिसात ज्या निरपराध ख्रिस्ती बांधवांचे विस्थापन झाले आहे, त्यांचे पुनर्वसन झालेच पाहिजे. कॅथॉलिक कौन्सिलच्या ठरावाच्या या भागाचे कुणीही समजदार माणूस समर्थनच करील. परंतु, कॅथॉलिक चर्चने, त्यांच्या त्या कारवायाही थांबविल्या पाहिजेत. आपल्या कळपाची संख्या वाढविणे हे एका काळी वैध मानले गेले असेलही, पण आता ते चालायचे नाही. धर्मपरिवर्तनाची फार मोठी किंमत या आपल्या हिंदुस्थानाने दिली आहे. आपल्या पवित्र मातृभूमीचे तुकडे यामुळेच झाले. यामुळेच काश्मीरच्या खोऱ्यातील पाच टक्के हिंदूंना देशोधडीला लागावे लागले. यामुळेच नागालॅंडमध्ये भारत सरकारचे नाममात्र अस्तित्व आहे. तेथे म्हणे "युद्धबंदी' (सीज्‌ फायर) आहे! युद्धबंदी कोणात असते? दोन देशांमध्येच की नाही? नागालॅंड वेगळा देश आहे काय? वेगळे राष्ट्र आहे काय? तेथे कोणत्या चर्चचे वर्चस्व आहे, याची मला कल्पना नाही, पण कुणाचेही वर्चस्व असो, त्यांच्या फूटपाड्या कारवाया सहन करण्याची जनतेची मानसिकता नाही. हे ख्रिस्ती चर्चेस जेवढ्या लवकर समजून घेतील, तेवढे त्यांच्या हिताचे आहे.
अल्पसंख्य? : सर्व ख्रिस्ती आणि इस्लामी संघटनांना माझा प्रश्न आहे की, आपण स्वत:ला अल्पसंख्यक का समजता? बहुसंख्यकांना जे अधिकार आहेत, त्यातल्या कोणत्या अधिकारापासून आपणांस वंचित ठेवण्यात आले आहे? वस्तुत:, जे अधिकार बहुसंख्यकांना नाही, ते ज्या अल्पसंख्यकांना, हिंदूंच्या उदारतेमुळे म्हणून प्राप्त आहेत, ते आम्हाला नको, असे या धर्मसंस्थांना म्हणता आले पाहिजे. घटनेच्या 30 व्या कलमात अल्पसंख्यकांना आपल्या शिक्षणसंस्था स्थापन करण्याचा अनिर्बंध अधिकार दिला आहे. या तथाकथित अल्पसंख्यकांना आपले वेगळे अल्पसंख्यकत्व टिकविण्याला मोकळीक असावी, यासाठी या कलमाचा अंतर्भाव घटनेत केला असावा, असे मला वाटते.
मग त्यांनी, आपले कार्यक्षेत्र आपल्या पंथाच्या लोकांपर्यंतच मर्यादित ठेवायला हवे. उदाहरणार्थ, स्थानिक हिस्लॉप कॉलेजात फक्त प्रॉटेस्टंट पंथीय ख्रिस्त्यांनाच प्रवेश असावा. सेंट फान्सिस डिसेल्समध्ये फक्त कॅथॉलिकांना, परंतु या कॉलेजांमधील 90 टक्के विद्यार्थी त्यांच्या संप्रदायांच्या बाहेरचे असतात. त्यांना "अल्पसंख्यक संस्था' का मानायचे? केवळ मालकीच्या आधारावर? हे योग्य नाही. सर्वसाधारण संस्थांप्रमाणे तेथेही नियम लागू असले पाहिजेत. तेथेही एस. सी., एस. टी. यांच्यासाठी आरक्षण असले पाहिजे. केवळ विद्यार्थ्यांच्या बाबतीतच नाही, तर सर्व नियुक्त्यांच्या बाबतीतही. या महाविद्यालयाचा प्राचार्य ख्रिस्तीच का असावा?
दांभिकपणा : अलीकडे ख्रिस्ती चर्चेस, दलित ख्रिश्चनांना अन्य दलितांप्रमाणे सुविधा मागत आहेत. या मागणीने, माझ्या मते, या धर्मसंस्था आपल्याच धर्माचा अपमान करीत आहेत. जे जुन्या काळात अस्पृश्यतेच्या दुष्ट रूढीचे बळी ठरले होते, त्यांच्याकरिता "दलित' शब्द प्रचलित आहे. गांधीजी त्यांना "हरिजन' म्हणत. आता त्यांना "दलित' शब्द अधिक पसंत आहे. हिंदू समाजात अस्पृश्यतेची दुष्ट रूढी होती. अनेक समाजसुधारकांच्या आणि समाजसंघटकांच्या प्रयत्नांनी ती जवळ जवळ समाप्त झाली आहे. कायदाही अस्पृश्यतेच्या विरोधात ठामपणे उभा आहे. त्यांना काही काळपर्यंत इतरांच्या बरोबर येण्यासाठी काही सोयी, काही सुविधा आवश्यक होत्या. गेल्या 60 वर्षांपासून त्या त्यांना प्राप्त आहेत. त्यांचे फायदेही दृग्गोचर आहेत, पण ख्रिस्त्यांमध्ये "दलित' केव्हापासून शिरलेत? कोणत्या ख्रिस्ती संप्रदायाची किंवा पंथाची जातिव्यवस्थेला मान्यता आहे? हिंदू समाजातील या अनिष्ट प्रथेवर आघात करूनच, तर या समाजातून लोकांचे घाऊक धर्मांतर करण्यात आले. त्यांना समान वागणुकीचे आश्वासन देण्यात आले. मग, ख्रिस्त्यांमधील सवर्ण लोक त्यांना बरोबरीने का वागवीत नाहीत? ते ख्रिस्ती बनण्यापूर्वी "दलित' होते. ख्रिस्ती बनल्यानंतरही "दलित'च कसे राहिले? ख्रिस्ती चर्चने आणि विशेषत: ज्या कॅथॉलिक कौन्सिलने, दलित ख्रिस्त्यांच्या मागण्यांचा, आपल्या ठरावात पाठपुरावा केला आहे, याचे उत्तर दिले पाहिजे. ख्रिस्त्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब नक्कीच असतील. त्यांना खरेच काही सुविधा मिळाल्या पाहिजेतच. तेव्हा आवश्यकता ही आहे की, यच्चयावत्‌ ख्रिस्ती संस्थांनी आरक्षणाचा आणि तसेच अन्य सुविधांचा निकष आर्थिक स्तर ठरविण्यासाठी मागणी केली पाहिजे. जन्माने येणारे दलितत्व हा आधार राहू शकत नाही. तो निकष मानायचा असेल, तर पोपपासून व प्रॉटेस्टंट बिशपपर्यंत सर्व ख्रिस्ती संप्रदायांच्या धर्मनेत्यांनी आणि धर्मपंडितांनी एकमुखाने सांगावे की, ""होय, आम्ही जन्माने येणारी जात मानतो; म्हणून जातीच्या आधारावर आम्हाला सोयी-सवलती व आरक्षणे हवी आहेत.'' या घोषणेत, निदान प्रामाणिकपणा तरी दिसेल. एकीकडे, जन्माने येणारी जातिव्यवस्था मानली जाते म्हणून हिंदू धर्म व हिंदू समाज यांच्यावर टीकेचे आसूड ओढायचे आणि दुसरीकडे त्याच आधारावर मतलबी मागण्या करायच्या, हा दांभिकपणा आहे. राजकारण्यांना दांभिकपणाबद्दल सामान्यत: कोणी वेठीस धरणार नाही. उक्ती एक आणि कृती दुसरी, हे त्या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे, पण धर्माच्या, अध्यात्माच्या, पारलौकिक कल्याणाच्या आणि नैतिकतेच्या गोष्टी करणाऱ्यांनी असला दांभिकपणा अंगीकारू नये. असला दांभिकपणा त्यांचे सारे वैशिष्ट्यच समाप्त करील.
कॅथॉलिकांची संख्या साऱ्या जगात अधिक आहे. त्यांनी नव्या चांगल्या परंपरा पाडल्या पाहिजेत. त्यामुळेच ते आपल्या धर्माचे सच्चे संवाहक बनतील आणि आपल्या अभिधानातील "कॅथॉलिक' या शब्दाच्या अर्थाप्रमाणे त्यांची धोरणे व आचरण राहील, तर ते केवळ भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या एकात्मतेचे ते पुरोधा बनतील. खऱ्या अर्थाने भारतीय बनतील. जैन आणि बौद्धांप्रमाणे समान सांस्कृतिक मूल्यांचे वारसदार बनतील. खऱ्या अर्थाने "कॅथॉलिक' म्हणजे उदारमनस्क व समावेशक बनतील. इतर संप्रदायही मग त्यांचे अनुकरण करतील.
***

No comments: