टाइम्स हे भारतातले आघाडीचे दैनिक आहे. पण भारताच्या सुरक्षेच्या सामाजिक, संरक्षण विषयक
प्रश्नांवर त्यांची मते फारच एकांगी राहिलेली आहेत. त्याची काही संपादकीय मते राष्ट्रविरोधी वाटावीत
अशी आहेत. भारतात बांगला देशातून येणारे निर्वासित आणि घुसखोर ही डोकेदुखी ठरलेली आहे. पण
टाइम्सला मात्र ती संधी वाटते. कारण त्यांच्यामुळे भारताला स्वस्त मजूर मिळतात.
नवे वर्ष सुरू झाले की, सर्वांनाच हे वर्ष आपल्याला आनंदाचे जावे असे वाटते. पण माझ्यासाठी तरी या वर्षाचा पहिला दिवस निराशाजनक ठरला. या दिवशी टाइम्स ऑफ इंडियाने "लव्ह पाकिस्तान' हे अभियान सुरू केले. त्या दिवशी एक विशेष लेख छापून या आंग्ल दैनिकाने भारतीयांना, पाकिस्तानचा आदर करण्याचा संदेश दिला. आपण पाकिस्तानशी सलोख्याने जगायला शिकले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतात बहुसंख्य लोक याच मनाचे आहेत, असा दावाही टाइम्सने केला. त्यासाठी सर्व्हे केल्याचे त्याचे म्हणणे आहे. भारताच्या मोठ्या शहरात तो केला म्हणे.
टाइम्स हे भारतातले आघाडीचे दैनिक आहे. पण भारताच्या सुरक्षेच्या सामाजिक, संरक्षण विषयक प्रश्नांवर त्यांची मते फारच एकांगी राहिलेली आहेत. त्याची काही संपादकीय मते राष्ट्रविरोधी वाटावीत अशी आहेत. भारतात बांगला देशातून येणारे निर्वासित आणि घुसखोर ही डोकेदुखी ठरलेली आहे. पण टाइम्सला मात्र ती संधी वाटते. कारण त्यांच्यामुळे भारताला स्वस्त मजूर मिळतात. नक्षलवादी चळवळीने देश तुटण्याची वेळ आली आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये त्यांच्या विरोधात सलवा जुडुम ही सामाजिक चळवळ उभी करण्यात आली. पण टाइम्सने नक्षलवाद्यांना सोडून या चळवळीलाच टीकेचे लक्ष्य केले. वास्तविक नक्षलवाद्यांना परदेशी पैसा मिळतो आणि त्यांनी देशाच्या आर्थिक विकासात मोठाच अडथळा आणायला सुरुवात केलेली आहे. पण टाइम्सला ती मात्र सामाजिक, आर्थिक समस्या वाटते. ही राष्ट्रविरोधी चळवळ बळाने दडपता कामा नये असे टाइम्सचे मत आहे. नक्षलवादी चळवळ बंद पाडली पाहिजे असे टाइम्सने कधी म्हटलेले नाही. सलवा जुडुमवर बंदी घालण्यासाठी याच या दैनिकाने आपली संपादकीय मजकुराची जागा भरपूर खर्ची घातली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने भूतकाळात अशा अनेक निरर्थक आणि समाजघातक मोहिमा हाती घेतल्या आहेत. त्यातलीच एक म्हणजे ही "लव्ह पाकिस्तान' मोहीम. खरे तर पाकिस्तानवर भारताने प्रेम करावे हे सांगण्याची काही गरज आहे का ? त्यासाठी टाइम्स एवढा जीव का टाकत आहे ? भारताने पाकिस्तानचा कधी अधिक्षेप केला आहे का ? भारताशी एक हजार वर्षे लढण्याची प्रतिज्ञा कोणी केली आहे ? भारत-पाक सीमेवर दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबिरे काय भारत सरकार चालवत आहे का ? भारताचे हजार तुकडे करून भारतात रक्तपात घडवण्याच्या आणि त्यासाठी घातपाती कारवाया करणाऱ्या पाकिस्तानवर भारतीयांनी प्रेम केले पाहिजे असा भारतीयांना उपदेश करणाऱ्या टाइम्सचा भोंचकपणा पाकिस्तानी जनतेला मान्य आहे का ? टाइम्सच्या या प्रेम मोहिमेला पाकिस्तान प्रतिसाद देणार आहे का ? आणि कसा ?
1987 पासून म्हणजे जवळपास 23 वर्षांपासून काश्मीरमार्गे पाकिस्तानने भारतात दहशतवादी पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर 17 वर्षांनी दाऊद इब्राहिमने हा काश्मीरमधला दहशतवाद भारताच्या मुख्य भूमीत आणला. 1993 साली त्याने मुंबईत 258 जणांचे प्राण घेणारी बॉम्बस्फोटांची मालिका घडवली. त्यासाठी त्याने जैश-ए-महंमद, लष्करे-तोयबा अशा इस्लामी दहशतवादी संघटनांची मदत घेतली. त्यानंतर हे प्रकार भारतात जारीच राहिले. दाऊदच्या कारस्थानातून भारतात 2006 साली मुंबईत पुन्हा एकदा असाच घातपात घडवण्यात आला. 26/11 चा प्रकार तर ताजाच आहे. दाऊदचे 5 हजार दहशतवाद्यांचे दल आता भारत, पाकिस्तानात आणि अरबस्तानात निरनिराळ्या प्रकाराने वळवळ करीत आहे. पाकिस्तानस्थित मुस्लीम दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानची आय.एस.आय. ही लष्करी गुप्तचर संघटना यांच्या सहकार्याने हे धोकादायक अतिरेकी आणि त्यातले मानवी बॉम्ब कार्यरत आहेत.
हा दाऊद इब्राहिम आता पाकिस्तानातल्या कराची शहरात एका आलिशान बंगल्यात आपल्या कुटुंबासह रहात आहे. आंतरराष्ट्रीय पोलिसांनीही त्याचा छडा लावलेला आहे. तिथूनच तो अनेक दहशतवादी कारवायांचे नियंत्रण करीत असतो. तो तिथे पाकिस्तानच्या कृपेने विलासी जीवन जगत आहे. एवढेच नव्हे तर नकली नोटा छापणे, नशिल्या पदार्थांची निर्यात करणे अशा अनेक गुन्ह्यांचा तो सूत्रधार आहे. त्याला पाकिस्तानने आश्रय दिला आहे. एवढेच नव्हे तर पाकिस्तानचे लष्करी जवान या दाऊद इब्राहिमच्या दिमतीला असतात आणि पाकिस्तानी निमलष्करी दलाचे जवान हे त्याचे अंगरक्षक असतात. पण हे सारे एवढे उघडपणे होत असताना पाकिस्तानचे सरकार मात्र दाऊद पाकिस्तानात नाहीच, असा खुलासा करून हात झटकत असते. दाऊद इब्राहिमसह विविध दहशतवादी कृत्यांतले आरोपी पाकिस्तानात आश्रयाला आहेत. टाइम्सच्या लव्ह पाकिस्तान मोहिमेतून पाकिस्तान या दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करणार आहे का ?
पाकिस्तानात विविध छापखान्यात छापल्या गेलेल्या लाखो रुपये किंमतीच्या बनावट चलनी नोटांचा भारतात सुळसुळाट झाला आहे. बांगला देश, नेपाळ, दुबई या मार्गांनी किंवा कराचीतून थेट या नोटा भारतात आणल्या जात आहेत. मुंबईच्या मानखुर्द भागात अशा नोटा बाळगणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली. या चौघांनी या नोटा पाकिस्तानात छापल्या गेल्या असल्याचे कबूल केले. महसुली गुप्तचर खात्याने अशा चार महिलांना पकडून त्यांच्याकडून 18 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. तामिळनाडू आणि नेपाळात अशाच काही लोकांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळ सापडलेल्या नकली नोटांचे मूळ पाकिस्तानात असल्याचे दिसून आले. टाइम्सच्या "लव्ह पाकिस्तान' मोहिमेला पाकिस्तान भारतातले हे चलन बंद करून प्रतिसाद देणार आहे का? पाकिस्तान भारतावर एवढे प्रेम करणार आहे का?
भारत-पाक सीमेवर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारी 50 शिबिरे जारी असून या शिबिरात आय.एस.आय. आणि पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी काही तरुणांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देत आहेत. काही दहशतवाद्यांनीच ही माहिती दिली आहे. टाइम्सच्या लव्ह पाकिस्तान मोहिमेत ही प्रशिक्षण शिबिरे बंद करण्याची काही तरतूद आहे का ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही अशी आहेत. अट्टारी सरहद्दीवर 12 जानेवारी 2010 रोजी नूमात हर्षद या तरुण मानवी बॉम्बला पकडण्यात आले. त्याने आपल्यासह सात मानवी बॉम्ब भारतात पाठवण्यात आले असल्याचे मान्य केले. एवढेच नव्हे तर पाकिस्तानी पंजाबच्या ओकारा इथे आपल्याला प्रशिक्षण देण्यात आले आहे हेही त्याने मान्य केले.
26/11 च्या हल्ल्याने तर अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. वस्तुस्थिती अशी असताना टाइम्सला "अमन की आशा' कशाच्या आधारावर वाटत आहे? टाइम्सची ही मोहीम म्हणजे काही पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांचे कारस्थान आहे. त्याला अमेरिकेतल्या सी.आय.ए.ची फूस आहे. काश्मीरचा प्रश्न पाकिस्तानच्या बाजूने सोडवला जावा अशी भारतीयांची मन:स्थिती निर्माण करण्याचा हा एक गुप्त डाव आहे.
याच कारस्थानाचा एक भाग म्हणून कारगीलमध्ये आक्रमण करण्यात आले होते. अशा चळवळी आणि वळवळी करून भारताला चर्चेच्या मेजावर ओढून आणण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. त्यात यशही येत आहे. कारगीलच्या युद्धानंतर भारताने पाकिस्तानशी काश्मीरच्या प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी दाखवली. खरे तर काश्मीरवर चर्चा करण्याची काहीच गरज नाही. पण भारताने तशी तयारी दाखवणे हा पाकिस्तानचा विजय आहे. जनरल मुशर्रफ यांनी तसे म्हटलेही होते. 2004 आणि 2009 या दोन निवडणुकांतून भारतात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेवर आले. या आघाडीतले काही अमेरिका शरण नेते आता पाकिस्तानबाब मवाळ धोरणांची चर्चा करायला लागले आहेत.
2006 साली मुशर्रफ भारत-पाक मैत्रीचा एक चार कलमी मसुदा घेऊन आले होते. त्यात भारताने काश्मीरमधले लष्कर काढून घ्यावे, काश्मीरला स्वायत्तता द्यावी, दोन देशांदरम्यान नागरिकांना मुक्तपणे ये-जा करण्याची परवानगी द्यावी अशी होती. खरे तर या चार कलमांत नवे काही नव्हते. ती केवळ नवे रुप देऊन मांडली गेली होती. मुशर्रफ यांनी मांडलेली ही चार कलमे हिजबुल मुजाहिदीनच्या नेत्यांनी आपल्या सुपीक डोक्यातून काढली होती. ती मान्य केली तर काश्मीर भारतात राहणार नाही. त्यामुळे ती स्पष्टपणे नाकारायला हवी होती. पण त्याऐवजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी ती भारत-पाक चर्चेच्या कार्यक्रम पत्रिकेत घेण्याचे मान्य केले. ही चर्चा सुद्धा होऊ शकत नाही इतके या दोन देशांतले संबंध बिघडले आहेत. पण या चर्चेचा प्रस्ताव पुढे रेटण्याचा अमेरिकेचा प्रयत्न जारी आहे.
भारताचा अविभाज्य भाग असलेले जम्मू-काश्मीर कसलाही संघर्ष न करता पाकिस्तानला मिळावे असा अमेरिकेचा डाव आहे. त्यासाठी दोन देशांदरम्यानची बस, रेल्वे वाहतूक सुरू रहावी असा अमेरिकेचा दबाव आहे. काश्मीरला स्वायत्तता देण्याचा प्रस्ताव हा त्याच कारस्थानाचा एक भाग आहे. मुशर्रफ यांनी मांडलेला 4 कलमी प्रस्तावच आता काश्मीरमधल्या विभाजनवादी संघटनांनीही मांडायला लागल्या आहेत. हा सारा कट आहे.
भारत सरकारने 3000 सुरक्षा सैनिक, निमलष्करी दलाच्या आठ तुकड्या मागे घेतल्या असून अजूनही काही पावले टाकण्याची तयारी दाखवली आहे. त्याऐवजी काश्मिरी पोलीस नेमण्यात येत आहेत. त्यांची भरती सुरू आहे. त्यांच्या संख्या 30 हजारांवरून 70 हजारांपर्यंत वाढवली जात आहे. न्या. सागीर अहमद यांनी सरकारला एक अहवाल सादर करून त्यात काश्मीरला स्वायत्तता देण्याची शिफारस केली आहे.
अमेरिका आणि पाकिस्तान यांचे संबंध सर्वज्ञात आहेत. काश्मीरवरून सुरू असलेल्या भारत आणि पाक यांच्यातल्या वादात अमेरिकेने मध्यस्थ म्हणून काम करण्याची कितीही तयारी दाखवली तरी मध्यस्थ म्हणून अमेरिकेवर विश्वास ठेवता येत नाही. अमेरिकेलाही ते कळते. म्हणून आपल्याला जे घडवायचे आहे ते भारतातल्या बुद्धीवादी लोकांच्या तोंडून वदवून घेण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे आणि त्यांची मन:स्थिती तशी व्हावी यासाठी लव्ह पाकिस्तान सारख्या मोहिमा आखल्या जात आहेत आणि टाइम्ससारखी दैनिके त्यांना त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत.
विशेष नोंद
हा मजकूर लिहिताना एक आशादायक बातमी हाती आली आहे. नक्षलवाद्यांच्या मानवी हक्कांसाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या मेधा पाटकर आणि संदीप पांड्ये यांच्यावर छत्तीसगडमधील काही वनवासींनी हल्ला केला. त्यांच्या सभेवर अंडी आणि टोमॅटो फेकले. नक्षलवाद्यांनी आयोजित केलेल्या एका जनता कोर्टात सहभागी होण्यासाठी ते चालले होते. पण वनवासींनी त्यांना पळवून लावले. मेधा पाटकर आदि ढोंगी लोकांचे ढोंग वनवासींना तर कळले आहेच. पण शहरातल्या सुशिक्षितांनाही ते कळायला लागले आहे.
No comments:
Post a Comment