Thursday, February 25, 2010

खरा ख्रिस्ती

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात एक ख्रिस्तानुयायी "फादर' दासबोध अभ्यास वर्गासाठी शिवथर घळीत येऊन आठ-दहा दिवस राहिले होते. फादर मायकेल घोन्सालविस हे त्यांचे नाव. त्यांना संक्षेपाने "मायकल जी' असे संबोधले जाते. या वर्गातील वातावरण, शिवथर घळीचा इतिहास व परिसर, दासबोधातील जीवनविचार आणि एकूणच हिंदू तत्त्वज्ञानाचा आवाका यांनी ते अतिशय प्रभावित झाले. समरस होऊन गेले. "फादर' असल्यामुळे ख्रिस्ती मताचा त्यांचा अभ्यास अर्थात आहेच. हिंदू आणि ख्रिस्ती अशा दोन विचारांचा तुलनात्मक अभ्यास ते सहज करू शकले.
आपण हिंदू समाजातील माणसे. आपल्याला आपलाच धर्मविचार किंवा जीवनविषयक तत्त्वज्ञान यांची नीटशी ओळख नसते, तिथे तुलनात्मक चिंतन आपण काय करणार? आपण तरुणपणी तत्त्वज्ञान तर समजून घेत नाहीच, पण जेवढ्या प्रकाराने आपल्या समाजाचे दोष काढता येतील आणि त्याचा तेजोभंग करता येईल, तेवढे सारे प्रकार अवलंबितो. आपला धर्म आपल्याला वायफळ, भ्रांत समजुतीच्या एखाद्य़ा गाठोड्यासारखा वाटू लागतो. जेवढ्या लवकर या धर्माला व संस्कृतीला मूठमाती मिळेल तेवढे आधुनिक प्रगतीसाठी आपले मन मुक्त होईल, असे तारस्वराने सांगणारे महाभागही आपल्यात आहेत. हिंदू समाजात जन्म घेतला म्हणून बिचारे शरमिंदे असतात! कत्येक गरम रक्ताचे असतात ते, जे, जुने आहे त्या सगळ्यांची होळी करण्याची आक्रस्ताळी भाषा वापरतात. ख्रिस्ती धर्माची स्तुतिस्तोत्रे तर अनेकजण गातात. भूतदया, करूणा, समानता, सोशिकपणा, सोपेपणा इ. अनेक "ख्रिस्ती' सदगुणांचा उल्लेख वारंवार त्यांच्या बोलण्यात येतो. आपल्या समाजातील उपेक्षित बांधवांना मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली, तरी त्याचे त्यांना काही वाटत नाही.
असे जे बंधू आहेत, त्यांच्यासाठी मायकेल जीचा अनुभव मोठा बोधप्रद ठरेल. घळीवरील अभ्यास वर्गानंतर मायकेल जी यांनी हिंदू व ख्रिस्ती मतांचे अनेक अंगांनी सखोल तुलनात्मक चिंतन केले. आपले विचार ते व्यक्त करू लागले. ख्रिस्त्यांनी आपल्या इतर मतांसंबंधीच्या भूमिकेत सहिष्णुता, उदारता व गुणग्राहकता आणली पाहिजे, असे प्रतिपादन करू लागले. फादर मायकेल जी यांचे मराठी भाषेचे ज्ञान चांगले. त्यांनी वसईच्या "नम्रता' मासिकासाठी "ख्रिस्ती दृष्टिकोनातून गणपती दैवत' या मथळ्याचा एक लेख लिहिला, तो त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाला.
खळबळजनक लेख
या लेखात लेखकाने असे सूचित केले आहे की, ख्रिस्ती मतानुयायांनी संकुचित, एकांगी आणि असहिष्णू न राहता विविध मूर्तीतील देवत्वाच्या संकल्पनेबद्दल सहिष्णु राहावे आणि त्यातील सत्य ध्यानात घेऊन ख्रिस्ती पंथात देखील ते ग्राह्य मानावे. नमुन्यादाखल त्यांचा हा एक अभिप्राय पाहा.
""विवेकानंदांची उदार मनोवृत्ती पाहिल्यावर मला गेल्या शतकातील ख्रिस्ती धर्मातील इन्क्विझिशन पद्धती आठवते. ख्रिस्तावरचीच श्रद्धा, पण रोमचे अधिकारी म्हणतील त्याच शब्दात व्यक्त न करणारांचा छळ करणारी ती इन्क्विझिशन कोर्टे कुठे आणि हजारो धर्मपंथांचे स्वागत करणारे विवेकानंद कुठे!'' सर्व देवता ही निराकार ईश्वराची केवळ प्रतीके आहेत, असे म्हटल्यावर माझ्यासारखा ख्रिस्ती माणूस गणपतीच्या मूर्तीसमोर बसून परमात्म्याचे ध्यान फार सुंदर करू शकेल. जोपर्यत परमात्म्याच्या ध्यानाचे ते एक साधन म्हणून मी मानतो, तोवर ख्रिस्ती धर्मपंथाची देखील काही अडचण नसावी. अशाने माझी ख्रिस्तावरील भक्ती कमी न होता उलट वाढेल. हे ख्रिस्ताचेच एक रूप असे मी मानीन. कारण संत पॉलने दुसऱ्या शब्दात त्याला "मंडळींचा पति' म्हटले आहे. तेव्हा गणपती हे ख्रिस्तांचेचरूप मानून मी त्याला नमस्कार करायला हरकत कुठे आहे? पण बरेच ख्रिस्ती लोक ख्रिस्ताचे वैश्विक रूप स्वीकारावयास तयार नाहीत. त्यांना तो इस्त्रायली येशूच हवा आहे, पण असा आग्रह धरण्याने ख्रिस्ती लोक आपली आध्यात्मिक दिवाळखोरीच प्रकट करतात.''
प्रतिक्रिया
ख्रिस्ती समाजाच्या विचारांना एक नवी व्यापक दिशा दाखविणाऱ्या या लेखाची प्रतिक्रिया ख्रिस्ती समाजात काय झाली? किंवा नंतर ""सज्जनगड' मासिकात "आम्ही ख्रिस्ती देखील हिंदूच आहोत' ही जी भूमिका त्यांनी मांडली, तिचा परिणाम काय झाला? परिणाम असा झाला की, वसईतून ख्रिस्ती मिशनऱ्यांनी त्यांची उचलबांगडी केली व चुळणे या ठाणे जिल्ह्यातील आडगावी त्यांना काम करावयास सांगितले.
(मुक्काम चुळणे, पोस्ट वसई रोड, जि. ठाणे पिन- 401202) तेथे "फातिमा माता मंदिरा'त ते असतात. त्यांचे एक पत्र मी पाहिले. चिंचवडच्या एका समर्थभक्त मित्राला आलेले. पत्रावर "श्रीअभिषिक्ताय नम:' असे लिहिलेले असते. आपण श्रीगणेशाय नम: लिहितो तसे. स्वत:ला ते "अभिषिक्तानंद' म्हणवितात. अभिषिक्त म्हणजे येशू ख्रिस्त!
वसईतून हकालपट्टी होण्यावरच थांबले नाही. त्यांच्या लेखांची कात्रणे अनुवादासहित थेट रोमपर्यंत रवाना झाली. रोमने या कागाळीची दखल घेतली आणि "शो कॉज नोटीस'सारखी एक प्रश्नावली रोमहून मायकेल जी यांच्याकडे येऊन थडकली. मला असे कळले आहे की, या प्रश्नावलीला एक दहापानी उत्तर मायकेल जी यांनी तयार केले आहे. यात आपल्या भूमिकेचे समर्थन त्यांनी केले असून, ख्रिस्ती पंथाने उदार होण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. या निवेदनाचा उपयोग बहुधा होणार नाही आणि संभवत: चर्चमधून त्यांची हकालपट्टी होईल! ख्रिस्ती पंथाचे व मिशनऱ्यांच्या मतलबी सेवेचे ऊठसूट कौतुक करणाऱ्यांना मायकेल जी यांचाच आणखी एक अनुभव सांगण्यासारखा आहे. हिंदुस्थानातील ख्रिश्चनांच्या प्रतिगामित्वावर त्यामुळे झगझगीत प्रकाश पडतो.
ख्रिस्ती लोकात अशी पद्धत रूढ आहे की, " गुड फ्रायडे'ला धर्मगुरूने शिष्याच्या पायावर पाणी घालावे, ते धुवावे. येशूने तेच केले होते. जीवनाच्या अंतिम समयी केलेली ती सेवा होती. स्वामी विवेकानंदांनी महासमाधी घेण्याच्या दोनच दिवस आधी (2 जुलै 1902) असाच प्रसंग घडला होता. भगिनी निवेदिता यांना त्यांनी स्वहस्ते मोठ्या प्रेमाने जेवण वाढले होते. त्यांच्या हातावर पाणी घातले होते आणि टॉवेलने त्यांचे हात पुसले होते. ""स्वामीजी, जी सेवा मी करावयास हवी ती तुम्ही का करताहात?'' या निवेदितांच्या प्रश्नावर स्वामीजी उद्‌गारले होते, ""ख्रिस्ताने तर आपल्या शिष्याचे पाय धुतले!''
विवेकनंदांनाही एवढा उदात्त वाटलेला तो प्रसंग! त्याची स्मृती म्हणून धर्मगुरूने शिष्याचे पाय धुण्याची प्रथा ख्रिस्ती संप्रदायात चालू आहे, पण चमत्कार असा की, बिचाऱ्या महिलांना यात कुठेही स्थान नसते. मायकेल जी यांच्या उदार मनाला वाटले की, ज्यांचे पाय धुवावयाचे, त्यांत काही महिलांचाही समावेश करावा, त्या प्रमाणे त्यांनी केले, पण ख्रिस्ती लोकांना हा "धर्मभ्रष्टपणा' अजिबात मानवला नाही. सोहळा पाहण्यासाठी आलेल्या ख्रिस्ती लोकांपैकी अनेकांनी धर्मगुरूवर हल्ला चढविला! त्यांना मारायला ते उठले, हिंदू महिलांचा कळवळा ख्रिस्ती धर्मप्रचारक दाखवितात, पण ख्रिस्ती समाजात औदार्य ते आणीत नाहीत. समतेचा भाव ओतत नाहीत. अनाथ आणि गांजलेल्या हिंदू स्त्रियांना आश्रय देऊन त्यांना ख्रिस्ती कळपात ओढण्यापलीकडे कोणता विचार त्यांच्याजवळ असतो? काही तरुणांनी साहसपूर्वक मायकेल जी यांना संरक्षण दिले म्हणून केवळ तो प्रसंग निभावला.
मला म्हणायचे असे की, आपल्या हिंदू समाजात दोष शिरले असतील. वौदिक तत्त्वज्ञानाची विटंबना करणाऱ्या प्रथा रूढ झाल्या असतील, अध्यात्माच्या किंवा परमार्थाच्या मूळ शुद्ध प्रेरणा मलीन होऊन गेल्या असतील. भोंदू महाराजांचा सुळसुळाट झाला असेल, पण परधर्मात आपल्या बांधवांनी जाणे हा त्यावर तोडगा ठरू शकत नाही. त्या समाजातही अवगुण काय थोडे आहेत? असहिष्णुता आणि छळवाद काय कमी आहे? विधवांसाठी जे आश्रम (होम्स) ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केले, त्यातील महिलांच्या दुर्धर अवस्थेने स्वत: विवेकानंद कळवळून चिडून गेले होते. हिंदू समाजाने या दुर्दैवी महिलांना कुटुंब व्यवस्थेत सामावून घेतले पाहिजे, असा अभिप्राय आपल्या अखेरच्या दिवसात त्यांनी व्यक्त केला होता. तेव्हा, ज्या त्या समाजाने आपल्याच पद्धतीने अवगुण किंवा दोष निपटून काढले पाहिजेत व समाज एकरस, एकात्म आणि प्रगतीशील बनविला पाहिजे. हाच योग्य मार्ग आहे. गांधीजींनीही ख्रिस्ती मिशनऱ्यांना सांगितले होते की,""तुम्ही आमच्या सुधारणेची चिंता करू नका ते आमचे आम्ही पाहून घेऊ.''
या मायकेल जी प्रकरणावरून आणखी एक विचार मनात येतो तो हा की, आपल्या समाजातील दोषच केवळ पाहण्याची धडपड का? आपली बलस्थाने हेरून त्यांच्यावर भर देण्याचा व आत्मगौरवाची भावना हिंन्दूंच्या ठायी पुष्ट करण्याचा विधायक प्रयत्न का नाही? ज्याची जगण्याचीच पात्रता नाही, जो केवळ सडलेलाच आहे आणि जिजीवेच्छा जो पूर्णपणे हरवून बसला आहे, तो समाज अनादी काळापासून आजवर एक सातत्यपूर्ण जीवन कंठू शकेल, ही गोष्ट अशक्यच. ज्या अर्थी हा समाज जगला, वेळोवेळी त्याचे पुनरुत्थान झाले, थोर अवतारी व महात्मे या समाजाने जन्माला घातले, जीवनाच्या सर्व क्षेत्रांत दिग्गज इथे निपजले व ख्रिस्ती आणि इस्लामी आक्रमणांचे हालाहल पचवून आपले अमृतत्त्व त्याने सिद्ध केले, त्याअर्थी काही तरी अंगभूत गुणवत्ता या समाजात व या भूमीत असलीच पाहिजे. त्या गुणांचा शोध घेऊन त्यांचा पुन्हा उत्कर्ष घडवून आणला, तर आज त्याचे भासणारे विकृत दयनीय स्वरूप नाहीसे होऊन नव्या तेज:पुंज स्वरूपात तो उभा का होऊ शकणार नाही? घरच्या म्हातारीचा काळ बनणारांनी तसेच हताश वैफल्यग्रस्त होऊन गेलेल्यांनी या दृष्टीने परिस्थीतीकडे पाहावयास पाहिजे. परक्यांना आपले गुण दिसू शकतात. आपल्या श्रेष्ठ द्रष्ट्या पुरुषांचे द्रष्टेपण कळू शकते, पण आपण मात्र "उध्दरेदात्मनात्मानम्‌' हा प्राचीन महामंत्र विसरून आत्मनिंदेत मश्गुल होतो! आत्मसन्मानाची भावना तर माणसात आधी पाहिजे. कोणत्या मूल्यांसाठी आपले जीवन आहे, याचा विवेक सदैव पाहिजे. त्यासाठी प्राणपणाने झुंजण्याची वृत्ती पाहिजे. परक्यांकडे आपली बुद्धी गहाण टाकून हे करता येत नाही. आंधळया व मर्कटछाप परानुकरणाने काहीच साधत नाही. मानसिक दास्य, पराभूतता व परावलंबन यांनाच जन्म देते.
आपले बलस्थान
आज मायकेल जी यांचे अनुभव मी सांगितले याचे कारण एवढेच की, आपल्यापेक्षा अन्य समाज सुखी, प्रगतीशील व प्रगल्भ आहेत, हा अनेकांच्या मनातील भ्रम दूर व्हावा. कोणाच्या स्तुती-निंदेवर आपली महत्ता अवलंबून नसते. "स्वयमेव मृगेन्द्रता' हीच पुरुषार्थी वृत्ती समाज वा राष्ट्र या नात्याने जीवनात धारण करावी लागते. अनेक विचारवंतांच्या दृष्टीने आपले मुख्य बलस्थान आपल्या तत्त्वज्ञानाने दिलेल्या आणि हजारो सत्पुरुषांनी आचरून उद्‌घोषिलेल्या आपल्या जीवनदृष्टीत आहे. ही जीवनदृष्टी एकदा स्वीकारली व तद्‌नुसार जगण्याचा प्रयत्न केला, तर एकेका व्यक्तीपासून तो समस्त विश्वापर्यंत सर्वांच्या सुखी आणि विकासोन्मुख, तृप्त आणि धन्य जीवनाचा राजमार्ग दृष्टिपथात येतो. मात्र या जीवनदृष्टीची दोन्ही अंगे नीट आत्मसात केली पाहिजेत. पहिले अंग हे की, कोणीही व्यक्ती क्षुद्र नाही. उपेक्षणीय नाही. कारण तिच्यात भगवंत असतो. त्या व्यक्तीलाही हे ज्ञान व्हावे की मी क्षुद्र, क्षणभंगुर, सुख-दु:खाचे आगतिकपणे हेलकावे खाणारा जीव नाही, तर अविनाशी, शाश्र्वत चैतन्य हे माझे "स्वरूप' आहे. यालाच देहबुद्धीचा लोप आणि आत्मबुद्धीचा उदय असे आपल्या जीवन चिंतकांनी म्हटले आहे. देहबुद्धी क्षीण झाली की, इतरांची दु:खे दिसतात. त्यांच्यातील देवत्व जाणवते. त्यागभावना निर्माण होते. सोशिकता येते. क्षुद्र मानापमान गळून पडतात. सत्ता आणि संपत्ती यासाठी सर्व उन्नत जीवनमूल्ये पायदळी तुडविण्याचा उन्मत्तपणा स्पर्शही करीत नाही. समाजाचे जीवन आध्यात्मिकतेच्या भक्कम पायावर उभे होते. ओघानेच भौतिक सुस्थितीही समाजाला अवश्यमेव लाभते.
आणि दुसरे अंगही महत्त्वाचे आहे. जगात देवमाणसे असतात तसे प्रकृतीच्या अंगाने दानव ठरणारेही असतात. कितीही प्रयत्न केला, तरी त्यांची प्रकृती पालटत नाही. हे दानव सात्विक गुण आणि संस्कृती यांच्यावर आततायी आघात करतात. त्यांना ऐश्र्वर्य हवे असते. अमर्याद देहसुखाची अनावर अभिलाषा असते. हे यज्ञरूपी जीवनाचा विध्वंस करण्यास प्रवृत्त होतात. आतंक निर्माण करतात. नृशंस व्यवहार करतात. सुसंस्कृत व दिव्यत्वाची साधना करणाऱ्या समूहांचा प्रत्येक मानबिंदू विटंबितात, अशा आततायी आणि दानवी शक्तीला वेळीच ठेचण्याचे व त्यांचा उपद्रव रोखण्याचे अमोघ सामर्थ्यही समाजात पाहिजे. सज्जनांना निर्वेधपणे जगता येईल आणि आनंद साधना करता येईल, अशी भौतिक परिस्थिती राखणे हे थोर धर्मकार्य आपल्याकडे मानले गेले आहे, ते ईश्र्वरी कार्य आहे. सुखी व संपन्न समाजासाठी या जागृत, नित्यसिद्ध शक्तीची परम आवश्यकता असते. तशी ऐहिक रचना समाजाने करावयाची असते.
खरे प्रबोधन
मूलत: हा सगळा विचार हिंदू तत्त्वज्ञानाने सांगितला आहे. आपल्या इतिहासातील घटनात त्याची गुंफण झालेली आहे. या दुहेरी जीवनविचाराने आपल्याला अमरत्व प्रदान केले आहे. माणसाला वेळोवेळी याच विचाराने उंच उठविले आहे, परंतु या विचारापासून आपण दूर भरकटलो, तेव्हा आपल्याला दैन्यावस्थाही आलेली आहे. हे आज आपण जाणले पाहिजे. कोण पुढारी कसा वागतो, लोक कसे पैशाच्या व भोगाच्या मागे वेड्यासारखे धावत आहेत, हे आपण विषण्ण होऊन सांगतो, पण मुळाशी जात नाही. सत्तेषणा, लोकेषणा, वित्तेषणा, अनिर्बंध दुर्वासना, मत्सरग्रस्तता यावर माणूस व समाज कशी मात करू शकेल, हा मूळ प्रश्न आहे. केवळ ऐहिक विचाराने या प्रश्र्नाचे उत्तर मिळूच शकत नाही. अनेक पंथ, अनेक संप्रदाय, अनंत प्रकारची विविधता यांना सामावून घेणारा तत्त्वविचार कोणता व हे भगवंताने दिलेले वैभवशाली जीवन उद्‌ध्वस्त करणारा असहिष्णु दानवी विचार कोणता याची स्पष्ट जाण समाजात प्रसृत करणे म्हणजे खरे समाजप्रबोधन होय. असे प्रबोधन जो करीत असेल, तो समाजाचा हितकर्ता आणि रक्षणकर्ता या स्वरूपाच्या वैश्र्विक प्रबोधनाचे निहित सामर्थ्य ख्रिस्ती वा इस्लामी पंथांनी कधी प्रकट केले नाही. रक्तपात आणि शोषण केले. धमार्च्या क्षेत्रात जुलूम आणि वंचना याचे थौमान घातले. त्याला इतिहास साक्षी आहे. हिंदूचे हे अजोड बलस्थान आपण जाणले पाहिजे व संस्कृतिधारेतील अमृत सर्व बांधवांपर्यंत पोचविले पाहिजे. प्रथम स्वत: ते ग्रहण करावे लागेल हे सांगणे न लगे!
( 30 वर्षांपूर्वीचा हा लेख आजही प्रासंगिक आहे.)

No comments: