अरुण करमरकर, ठाणे
डोळ्यांनी बघतो, ध्वनि परिसतो कानीं, पदी चालतो,
जिव्हेने रस चाखितो मधुरही वाचे आम्ही बोलतो!
हाताने बहु साल काम करितो, विश्रांतीही घ्यावया
घेतो झोपे सुखे, फिरूनि उठतो ही ईश्वराची दया।।
अगदी बालवाडीच्या वर्गात शिकविलेल्या या बडबडगीतातूनही आपल्या साऱ्या क्रियांची क्षमता सृष्टीकर्त्यानेच आपल्याला दिली असल्याचा संकेत ठळकपणाने केला आहे. थोडक्यात, सारे मानवी जीवन ही केवळ ईश्वराची देणगी आहे. ईश्वराचे नाव घेण्यास काही जणांना लाज वाटते, तरी त्यांनाही हे मान्य करावेच लागते की, माणसाला निसर्गाने शक्तीसंपदा बहाल केली आहे. यातल्या कुठल्याही एका शक्तीची कमतरता असली तर रोजच्या जगण्यात पदोपदी ती जाणवत, बोचत राहते. डोळस माणसाने प्रयोग म्हणून एक-दोन तास डोळे बांधून वावरावे, म्हणजे त्याला नेत्रहीनांची वेदना कळेल. समंजस माणसाने यावर दोन तीन उपाय शोधून काढले आहेत. एकतर विज्ञानाच्या साह्याने आणि बुद्धीच्या वापराने त्याने काही साधने बनवून अपंगत्व भरून काढण्याचा (फक्त काही प्रमाणातच) प्रयत्न केला आहे, दुसरे म्हणजे ज्याच्यापाशी एखादंदुसरी क्षमता कमी आहे, त्याला इतरांनी साह्य करण्याची जाण विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. याबरोबरच ज्या क्षमता मिळाल्या आहेत, त्यांच्याविषयीची कृतज्ञता बाळगणे ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब नव्हे काय? आणि ही मनात बाळगलेली कृतज्ञता व्यक्त करण्यात का संकोच करावा? स्वर्गातील "त्या' दालनाच्या वर्णनाच्या िनमित्ताने आणि तिथे आळसावून, खंतावून बसलेल्या देवदूताच्या मनोगताच्या माध्यमातून हीच जाणीव आपल्या स्नेही प्राध्यापिकेने करून दिलीय. त्यांचा ई-मेल पुढे म्हणतो, "दोन्ही वेळेच्या जेवणाची आपल्याला भ्रांत नसेल तर आपण जगातील एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के भाग्यवंतांपैकी एक आहोत. अहो एवढंच काय आपले बॅंकेत खाते असेल तरीही आपला फारच थोड्या भाग्यवंतांमध्ये समावेश असेल. त्या खात्यात जमा रक्कम असणे ही तर आणखीनच भाग्याची बाब आहे. एकट्या महाराष्ट्रातच सात-आठ लाख कुटुंबे अशी आहेत की, ज्यातल्या सदस्यांना स्वतःवर दिवसाकाठी 20 रुपये सुद्धा खर्च करता येत नाहीत. हिशेबच करायचा झाला तर जेवणखाण, चहा-कॉफी, कपडे आणि डोक्यावरील छप्पर या गरजांसकट सर्व गरजा महिना 600 रुपयांपेक्षा कमी उत्पन्नात भागवाव्या लागतात. आर्थिकदृष्ट्या "प्रगत' असलेल्या महाराष्ट्राची ही कथा. बिहार, ओरिसाच्या गोष्टी बोलायला नको! म्हणजे असा "चमचाभर' विकासही ज्यांच्या वाट्याला आलेला नाही अशांची संख्या काही कोटींची आहे. त्यात आपला समावेश नाही, आपल्या वाट्याला चांगला बादलीभर विकास आलाय, मग जे विकासाच्या लाभाचा समुद्र ओरबाडताहेत त्यांच्याकडे बघून बोटे मोडायची की जे मिळालेय त्याबाबत ईश्वराचे/निसर्गाचे आभार मानायचे? आणि परमेश्वराचीही आभाराची अपेक्षा म्हणजे तरी काय आहे? तर त्याचे स्मरण करायचे, त्याला मनोभावे नमन करायचे आणि मनातल्या मनातच पण मनापासून म्हणायचे "धन्यवाद देवा!' तेवढेही करावेसे आपल्याला वाटू नये?
sahavedana@gmail.कॉम
***
No comments:
Post a Comment