Thursday, February 25, 2010

आठवणीतील अरुणाचल

अभियांत्रीकीची पदवी घेतलेला सोलापूरचा एक
तरुण समाजऋणाचे भान ठेवून अरुणाचल
प्रदेशातील विवेकानंद केंद्राच्या शैक्षणिक
सेवाकार्यात सहभागी होतो. तेथील समाज
जीवनाशी समरस होण्याचा प्रयत्न करतो. या
काळातील संस्मरणीय आठवणींना उजाळा देणारा सचिन भिडे यांचा हा लेख. अरुणाचल दिनाच्या (20 फेबु्रवारी) निमित्ताने....

"केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे'
"यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे

या श्रीसमर्थांच्या उक्तीचा मान ठेवत मी शाळेतील कार्यास आरंभ केला. जर काश्मीर भारतमातेचा मुकुट असेल, तर त्यात जडविलेला "कोहिनूर' म्हणजे अरुणाचल प्रदेश! नयनरम्य अशा येथील निसर्ग सान्निध्यात मन लवकरच रमले. येथून जाताना ऐकिवात होते की, तेथे काही अतिरेकी कारवाया होतात. तिथे गेल्यावर त्या कारवायांमागील मानसिकता व कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला. अरुणाचल हा म्यानमार, नेपाळ, चीन व तिबेट यांच्या सीमालगतचा प्रांत आहे. दक्षिण व अग्नेय आशियावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने काही जागतिक शक्तींनी येथील कारभारात ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली व राजकीय डोळेझाकीमुळे त्यात ते यशस्वीही झाले. माध्यमे अनेक होती, जसे गुप्त संघटना, सशस्त्र कारवाया, मादक पदार्थांचा वापर, ख्रिश्चन मिशनरीज वगैरे. याचा परिणाम तिथे दिसतच आहे. ""आम्ही सर्व लोक या सात बहिणी घेऊन भारतातून वेगळे होणार. आम्हास कोणीही अडवू शकत नाही'', असे बोलणे सर्रास ऐकू येऊ लागते, कधी उघड तर कधी छुपे! (सात बहिणी-ईशान्येकडील सात राज्ये - आसाम, अरुणाचल, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय) तेव्हा ही फोफावत असलेली विषवल्ली वेळीच उखडण्याच्या दृष्टीने आपण आपले प्रयत्न सुरू करावे हा विचार केला गेला.
शाळेत गेल्यावर मुलांना गाणी, शिवचरित्र व इतर कथा, नाटक वगैरेंच्या माध्यमातून आपलंसं केलं. त्यांना आपण भारतीय संस्कृतीचे पाईक आहोत ही बाब विविध प्रकारे सांगितली. अर्थात त्यांनाही हे पटलेच. कारण यात वावगे व चुकीचे असे काहीच नव्हते. महाभारत व इतर ग्रंथातील अरुणाचलचा उल्लेख सांगून, आपली नाळ या संस्कृतीशी कशी जोडली आहे हे समजावले गेले. "देणाऱ्याने देत जावे व घेणाऱ्याने घेत जावे'प्रमाणेच स्वामीजींचे विचार आम्हास प्रेरित करीत होते. खूप काही देत होते, तर आम्ही तेच सर्व सदस्य परिस्थितीशी एकरूप होऊन पुढील पिढीस प्रदान करीत होतो. मुले ही चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असतात, त्यांना जसा आकार देऊ तशी ती घडतात, तेव्हा त्या चिखलाच्या गोळ्यापासून देवाची मूर्ती घडवायची का दानवाची हे आपल्याच हाती असते, नाही का?
मी इयत्ता चौथीत असताना मराठी पाठ्यक्रमात आम्हाला एक कविता होती "निर्धार'. त्यातील काही ओळींनी मला खूप काही शिकविले. त्यात तो कवी म्हणतो -
"दे टोले जोवरी असे, तप्त लाल लोखंड
येईल आकारास कसे, झाल्यावर ते थंड'
जगणे व कर्म याबद्दल तो म्हणतो -
"झटणे या जगण्याचे, तत्त्व मनी तू जाण
म्हणून उद्य़म सोडू नको, जोवरी देही प्राण'
अतिरेकी आहेत, जीव गेला तर काय करशील? या प्रश्नास वरील ओळींचे उत्तर पुरेसे आहे ना!
दुर्गम भागातील जंगली लोक हा मनावर उमटलेला शिक्का तेथे गेल्यावर काही दिवसांतच पुसला गेला. निसर्गाच्या एवढ्या जवळ राहण्याची सवय झालेले ते कलेच्या क्षेत्रात इतकी उत्कृष्ट कामगिरी बजावताना दिसतात की, विचारायची सोय नाही. शिल्पकला हस्तकला, चित्रकला, वाद्य, नृत्य, संगीत, खेळ व बरेच काही! त्यांच्या सुपिक डोक्यातून व अनुभवी हातातून साकारलेल्या त्या आखीवरेखीव कलेकडे बघतच राहावे वाटते. माणूस अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो.
मुलांबाबत तर विचारायचीच सोय नाही. लहान वयातच दिसून येणारी परिपक्वता व सामंजस्य तिथे खूप अनुभवायला मिळते; जे इकडे कमीच दिसते. निसर्गाच्या कुशीत जगताना त्याच्याशी अनुरूप होणे नवीन नाही. अगदी छोट्या छोट्या मुलांना इतक्या औषधी वनस्पतींची माहिती आहे की, विचारू नका. मला असे अनेक बालवैद्य तेथे भेटले. माझ्या पोटदुखीवर त्यांनी फारच प्रभावी औषध मला दिले होते. तेथे पाऊस प्रचंड व त्याचमुळे जळवाही! त्यांच्यापासून सुटकेसाठीचा रामबाण इलाजही त्यांनीच मला सांगितला. अशा बुद्धिमान लोकांसोबत वावरताना कोण आनंद होत असेल!
गणित (त्यांच्यामते राक्षस) हा विषय सोडला तर इतर विषयात व मुख्य करून भाषा विषयात फार लवकर प्रगती होताना दिसते. मला त्याच गणिताची भीती दूर करण्यासाठी धाडले गेले होते. कधी वेगवेगळ्या मजेदार पद्धतीतून गमतीशीर उदाहरणे, चित्रे यांच्या सहाय्याने, तर कधी आपले प्राचीन शास्त्रज्ञ व शोध, गणिताचा इतिहास या मार्गाने गणित सोपे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. बौद्धिक पातळीनुसार माझ्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन दिले गेले, त्यामुळे प्रथम चाचणीस जो निकाल 30% होता तो शेवटी 90-92% पर्यंत वाढला. अर्थात याचे श्रेय मला नसून मुलांच्या कष्टालाच आहे.
शाळेत 11 सप्टेंबर (विश्वबंधुत्वदिन) व 12 जानेवारी (राष्ट्रीय युवादिन) फार मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. वस्तीतील नागरिकांशी सलोख्याचे संबंध असल्याने त्यांचाही यात सक्रिय सहभाग असतो. त्यानिमित्ताने विविध क्रीडा व कलेच्या स्पर्धा होतात. अतिशय आनंदी व चुरशीचे वातावरण असते. तेथील गावबुढा (ज्येष्ठ व्यक्ती) राजा व नेते मंडळी यांच्याही उत्तम संपर्कात असल्याने फारच बरे वाटते. शाळेसही त्यांची खूप मदत होते. आम्ही काही शिक्षकांनी बस्तीत जाऊन प्रौढ साक्षरता वर्गही सुरू केला. इंग्रजी, गणित, हिंदी हे विषय तेथे होत होते. शिवाय केंद्राची गीतेही शिकविली. प्रतिसाद इतका सुंदर मिळाला की बस! संध्याकाळी शेतीची कामे करून दमून आलेली मंडळी लगेचच वर्गात धाव घेतात, ते पाहून फार आनंद वाटायचा, उत्साह वाटायचा. त्यांचे इतके स्नेह व आपुलकी आम्हास मिळाली की, पूर्ण वर्षात कधीच घरची आठवण व उणीव भासली नाही. तेथील वृद्धांना आम्ही आपू (आजोबा) व आपी (आजी) असेच म्हणत होतो.
तेथील मुख्य सण म्हणजे "बिहू'व "ओरीया'. त्या वेळी केलेले अगत्य, झालेले आतिथ्य पाहून डोळे भरून आले. इतक्या प्रेमाने आपल्याशी एक प्रथमदर्शी अनोळखी गृहस्थ वागतो, हे आपण शहरात अनुभवू शकतो का? ही व अशी हजारो उदाहरणे मी अनुभवली. किती लिहावे हा प्रश्नच आहे. या सर्वानंतर मला खरंच प्रश्न पडला की, या सभ्य संस्कृतीस जंगली, रानटी का म्हटले जाते? केवळ जंगलवासी आहेत म्हणून? मग आपण सिमेंटच्या जंगलात राहणारे त्यापेक्षा काय वेगळे आहोत?
अनुभव न संपणारे आहेत, पण इतर गोष्टीस मर्यादा आहेत. आपणही यांच्या उन्नतीसाठी खूप काही करू शकता.
"ज्यांना जे जमेल, त्यांनी ते जरूर करावे', माझे तरुण उसळत्या रक्ताचे मित्र आपला वेळ या शाळांसाठी देऊ शकतात. सेवाव्रती, जीवनव्रती म्हणून केंद्राचे कार्य करू शकतात, कारण तन-मन अर्पणाची हिच तर वेळ आहे.
माझे ज्येष्ठ व आदरणीय बांधव की, ज्यांनी आपले सारे आयुष्य गृहस्थाश्रमी वेचले ते "अरुणाचल बंधू परिवारास' आपली आर्थिक सेवा देऊ शकतात. तेथील मुलांना शिष्यवृत्ती रूपाने सहाय्य करू शकतात. यथाशक्ती श्रमदान व वेळही केंद्रास देऊ शकतात.
आपल्या इच्छेचा मान ठेवत हे केंद्र आपल्या सेवेशी या पत्त्यावर हजर आहेच.
विवेकानंद केंद्र, विवेकानंदपुरम्‌, कन्याकुमारी - 629702.
तामिळनाडु- दूरध्वनी ः 04652 - 347012, 346250, 346232.
website.www.vkendra.org
शेवटी माझे आपणा सर्वांना, माझ्या सुज्ञ बांधवांना एक आवाहन आहे.
"अरुणाचल वाचवा, देश वाचवा'
"जीवने यावदादानं, स्यात्‌ प्रदानं ततोऽधिकम्‌'

No comments: