विकासाचा दर वाढतोय. तसं पाहिलं तर महागाई, फुटिरता, दहशत आणि हिंसाही वाढत आहे. हे सारंं विकासाची देणगी असल्याचंही म्हटलं जातं आहे. मनाची समजूत घालण्यासाठी असं विचार करणं ठीक आहे, परंतु ज्या प्रक्रियेचे हे सर्व अनिवार्य परिणाम आहेत, त्याला विकास म्हणता येईल का? याला वित्तवृद्धीतून आलेली समृद्धीही म्हणता येणार नाही.
श्री आणि समृद्धी यांमध्ये साधनसामग्री आणि पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच संपूर्ण समाजाची सुख, शांती व निर्भयताही अंतर्भूत असते, परंतु आज तर समाजाची शकलं उडताना दिसत आहेत. माणूस हा विकासाचा आधार मानला गेला आहे. माणूस हा एकटा राहू शकत नाही, तो तर कुटुंब, समाज आणि राष्ट्राचे नैसर्गिक अंग आहे, याचे विस्मरण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. जोवर मन-वाचा-कर्माने ही भावना विस्तारित होणार नाही, तोवर खरा विकास होणे शक्य नाही! परंतु आज अर्थव्यवस्था असो वा न्यायव्यवस्था, ते समाज आणि कुटुंबव्यवस्था तोडण्याचे काम करीत असल्याचे दिसते. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावावर करण्यात येत असलेल्या तथाकथित सुधारणा या व्यक्तीलाच आतून पोखरून काढत आहेत.
राजकारणात तर स्वार्थासाठी समाजाचे तुकडे-तुकडे करण्यालाच सफलता मानण्यात येऊ लागले आहे. बहुपक्षीय निवडणूकप्रणालीत सर्वाधिक मते मिळवणे म्हणजेच विजयी होणे असल्यामुळे तेथे सर्व काही तोडण्या-फोडण्यावरच आधारलेले असते. 100 च्या लोकसंख्येत समजा आपला गट 20 चा आहे, तर इतरांना इतक्या छोट्या-छोट्या तुकड्यांत विभागून टाका की, 20 वालाच सर्वात मोठा गट राहील. परिणामी करण्यात आलेल्या मतदानापैकी 22 प्रतिशत मते घेऊन आमचे प्रतिनिधी संसदेत जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची धोरणं निर्धारित करतात. यात सुधारणा करणे सहज शक्य आहे. 50 प्रतिशतपेक्षा किमान 1 मत अधिक घेणाराच विजयी असेल, असा नियमच केला पाहिजे. असे झाले तर मग जाती, भाषा आणि अन्य गोष्टींवरून समाज तोडणारे हेच सारे स्वार्थी राजकीय नेते आपल्या विजयासाठी समाज जोडण्याचे काम करू लागतील.
आपली इतिहासाकडे पाहण्याची दृष्टीदेखील याच व्यक्तिवादी दृष्टिकोनाने ग्रासली गेली आहे. यामुळेच आपण आपल्या महापुरुषांचे वर्णन आणि मूल्यमापन दोन्हीही व्यक्तिगत उपलब्धंींच्या आधारेच करतो. भगवान गौतम बुद्ध यांना त्यांच्या त्याग, साधना, बोध आणि करुणा यासाठी स्मरले जाते, परंतु त्यांचा मुख्य विचार तर व्यक्तिकेंद्रित कर्मकांड आणि त्यामुळे समाजात आलेल्या अंध रूढींच्याप्रति विद्रोह होता. त्यांच्याच अनुयायांकडून सर्वाधिक अन्याय जर कोणत्या महापुरुषावर झाला असेल, तर तो बुद्धांवरच होय. ज्या बुद्धाने मूर्तिपूजेच्या अज्ञानाचा जीवनभर विरोध केला, आज मूर्तींच्या बाबतीत सारे विश्व-कीर्तिमान, बुद्ध मूर्तींच्या नावानेच आहेत. साक्षात करुणेची प्रतिमूर्ती भगवान बुद्धांचे अनुयायी त्यांच्या नावावर विद्वेषाचे समाजकारण करताना दिसत आहेत. राज्याचा त्याग करून ज्ञानाची साधना करणाऱ्या बुद्धाच्या नावावर नोटांचा हार घालून सत्तेचे राजकारण सुरू आहे.
भगवान बुद्धांचा मुख्य संदेश त्यांच्या मंत्रात सामावला आहे -
बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि।।
हाच चिरंतन विकासाचा मूलमंत्र आहे. माणसाने आपला अहं आणि स्वार्थ ज्ञानाच्या शरणात न्यावा. याचे व्यवस्थारूप माध्यम आहे- संघटनेला शरण जाणं आणि अशा संघटनशक्तीनेच संपूर्ण मानवता धर्माच्या सिद्धांताना शरण जाऊन खऱ्या अर्थाने विकास साधू शकेल. या त्रिसूत्रीय मंत्रावर आधारित गणतंत्र, राजतंत्र आणि समाज निर्माणातूनच मानवी समस्यांचे दूरगामी निदान आणि समाधान शक्य आहे. याच महिन्यात जयंती असलेल्या वि.दा. सावरकर आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनातूनही हाच संदेश ध्वनित होतो.
धर्माच्या सनातन तत्त्वांना युगानुकूल आवश्यकतेनुसार आचरणात आणून समाजात रुजविण्याचे कार्य करणाऱ्या बुद्ध, बसवेश्वर आणि वि.दा. सावरकरांवरील लेख निश्चितच वाचकांना उपयुक्त ठरतील, अशी आशा आहे. धर्माचे मर्म आचरणात आहे, म्हणून याची सम्यक प्रतिष्ठा प्रत्यक्ष आपल्या कार्यानेच होईल. "विवेक विचार'चे वाचक विवेकानंद केंद्र परिवाराचे सदस्य आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून कार्यात प्रत्यक्ष सहभाग आणि सेवाकार्यात सक्रीय नेतृत्वाची अपेक्षा आहे.
अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना शुभेच्छा!
No comments:
Post a Comment