Tuesday, May 11, 2010

अनुसंधानातून ध्यानाकडे


स्वयंसूचनेद्वारा एखादी प्रक्रिया न्याहाळणे म्हणजे अनुसंधान. तेव्हा या अनुसंधानाच्या साह्याने धारणेकडून ध्यानाकडे जायचे आहे. ध्यानालाच प्रत्यय एकतानता असे म्हटले जाते. आपल्या शरीरातल्या काही मर्मस्थानांमध्ये "व्यान' प्राणाची जाणीव जागृत करून म्हणजे अनुसंधानाच्या साह्याने आपण शरीरातल्या मर्मस्थानांच्या जोडांमधले म्हणजे सांध्यांमधले व्यान-प्राणाचे भ्रमण न्याहाळणार आहोत. ही प्रक्रिया पूर्णपणे आंतरिक असते. या प्रक्रियेत आता प्राणशक्ती एका मर्मस्थानाकडून दुसऱ्या मर्मस्थानाकडे कशी जाते, हे तर अनुभवायचे आहेच, पण हा प्रवास होताना वाटेतल्या अवयवांवरही त्याचा प्रभाव कसा पडतो, याचाही अनुभव घ्यायचा आहे. प्राणशक्ती स्वत:च फिरणार आहे. आपल्याला तिचा प्रवाह केवळ अनुभवायचा आहे. या भ्रमणाचे आपल्याला साक्षीदार व्हायचे आहे.
पहिल्या स्तरावर ही हालचाल डोक्यापासून तळपायांपर्यंत म्हणजे अधोगामी असते. हा प्रवास होताना ही प्राणशक्ती वाटेत काही स्टेशन्स घेत जाते. मस्तकापासून तिचा प्रवास चेहऱ्यावरून त्याच्या मागून सुरू असतो. ती डाव्या, उजव्या बाजूने मागून पुढून गळ्यापर्यंत येते. तेव्हा तिचा अन्य प्राणिक शक्तींशी मिलाफ होतो. यावेळी आपल्याला एक प्राणिक कंठा परिधान केल्याची जाणीव होते. ही जाणीव आणि प्राणिक शक्तींचा मिलाफ यांच्यात अधिक एकतानता निर्माण व्हावी यासाठी आपण "म'काराचा घोष करू शकतो. तसे केल्यास आपण चेहऱ्यावरून प्राणिक मुखवटा घातला आहे, असे वाटायला लागते.
अशाच रीतीने गळ्यापासून कटिप्रदेशापर्यंत प्राणशक्तीचा अधोगामी प्रवास सुरू राहतो. गळा, मान, खांदे, पाठ, छाती, बगल, पोट असा मागे-पुढे आणि डाव्या-उजव्या बाजूंनी प्राणशक्ती कटिप्रदेशापर्यंत हा प्रवास सुरू असतो आणि अनुसंधानाद्वारा या प्रवासाची जाणीव घेतली जाते. तेव्हा कंबरेभोवती "उ'काराचा कंबरपट्टा घातला असल्याची जाणीव होते. हातांच्या बोटांच्या पेरापासून ते कंठस्थानापर्यंतच्या या प्रवासातली जाणीव आणि ही प्राणशक्तीच्या जाणिवेची एकतानता प्रस्थापित होण्यासाठी "उ' काराचा घोष केला जातो. तेव्हाच्या अननुभूत चेतनेमुळे आपण प्राणिक शक्तीचा सदरा घातला आहे की काय, असे वाटायला लागते.
प्राणिक शक्तीच्या या अधोगामी प्रवासाच्या तिसऱ्या टप्प्यात प्राणिक शक्तीचा प्रवास कंबरेपासून पायांच्या बोटांच्या पेरांपर्यंत सर्वबाजूंनी होत असताना आपल्याला वेगळीच जाणीव होते. ती जाणीव अधिक एकात्मिक व्हावी यासाठी "अ' काराचा घोष केला जातो. अनुसंधानाच्या या पायऱ्यांवर अ, उ आणि म कार उच्चारला जातो. त्यास "नादानुसंधान' असे संबोधले जाते.
अनुसंधानाच्या दुसऱ्या भागात प्राणशक्तीच्या ऊर्ध्वगामी प्रवासाची जाणीव घेतली जाते. याच प्राणशक्तीच्या अधोगामी प्रवासाच्या नेमक्या उलट दिशेने म्हणजे पायाच्या बोटाच्या टोकापासून ते डोक्यापर्यंत प्रवास होत असतो. हा ऊर्ध्वगामी प्रवासही अधोगामी प्रवासाप्रमाणेच तीन टप्प्यांत होत असतो. पहिल्या टप्प्यात हा प्रवास पायांच्या बोटांच्या टोकापासून कंबरेपर्यंत होतो. प्राणशक्ती कंबरेपर्यंत आल्यावर होणारी जाणीव एकात्मिकपणे व्हावी यासाठी "उ' काराचा घोष करावा.
दुसऱ्या टप्प्यात हा प्रवास कंबरेपासून ते कंठापर्यंत होतो. प्राणशक्ती कंठापर्यंत आल्याची जाणीव होताच ती अधिक एकात्मिक व्हावी यासाठी "म'काराचा उच्चार करावा तर कंठापासून मस्तकापर्यंत होणाऱ्या प्रवासाचे साक्षीदार होतानाच नाद आणि प्राण यांच्या एकतानतेसाठी "अ'काराचा नाद करावा.
अनुसंधानाच्या तिसऱ्या पायरीवर फारसे प्रयास करावे लागत नाहीत. प्राणशक्तीच्या ऊर्ध्वगामी आणि अधोगामी अशा दोन्ही प्रवासांची केवळ जाणीव घेत राहावे लागते. ही जाणीव घेण्याची प्रक्रिया अखंड, विनासायास आणि सतत सुरू राहिली की धारणेचाच विकास ध्यानाच्या रूपात होतो. ध्यान म्हणजेच प्राणशक्तीच्या भ्रमणाची सतत नेहमीसाठी जाणीव घेत राहणे.
अशी जाणीव घेत असतानाच आपण नादानुसंधान करतो. आपण ॐकार गर्जना करतो, तेव्हा शरीरभर आतून-बाहेर खालून-वर आणि डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे अशी सर्वत्र ॐकाराची स्पंदने जाणवायला लागतात. त्यांची स्पंदने हा आपल्या जाणिवेचा विषय केला की ती स्पंदने यथावकाश आपल्या आतल्या शांतिस्थळाला स्पर्श करतात. चित्त शांत आणि शांत होत जाते. प्राणशक्तीची ही जागृती पसरत जाते आणि वैश्विक शक्तीच्या संपर्कात येते. साधक शांत होतो, आनंदी होतो, चैतन्याने भारला जातो. ऊर्जेच्या जागृतीच्या जाणिवेने समाधानी होतो. शरीरात वैश्विक प्राणशक्तीचा संचार होतो. शरीरातल्या प्राणाला प्रेरणा मिळते आणि साधक शक्तिमान होतो.
या अवस्थेत आपण एक संकल्प केला पाहिजे की, आपण ही अवस्था कायम टिकवू आणि ध्यान थांबवले पाहिजे. यानंतर दोन्ही तळवे डोक्यावर ठेवावेत. तिथून ते अधोगामी दिशेने मान, कान, चेहरा, गळा, कंठस्थान, छाती, पोट अशारीतीने पायाच्या तळव्यापर्यंत खाली आणावेत. आपल्या शरीरातले सारे मालिन्य शरीरातून बाहेर पडत असून, आपले शरीर, चित्त शुद्ध होत आहे, अशी कल्पना करावी. तळवे परस्परांवर घासावेत आणि डोळे उघडावेत. हळूच आपल्या भोवतालच्या वातावरणाची जाणीव घेऊन मग ते ठिकाण सोडावे.
या साऱ्या प्रक्रियेच्या पायऱ्या खालीलप्रमाणे थोडक्यात देता येतील.
1) प्रार्थना - सहनाववतु, 2) पूर्वतयारी - कपालभाती, योगिक श्र्वसन, नाडीशुद्धी 3) प्राणायाम मंत्र 4) करन्यास 5) अंगन्यास 6) अनुसंधान 7) संकल्प
8) प्राणशक्तीची प्रार्थना 9) प्राणशक्तीचे संचयन
10) विश्र्वशांतीची प्रार्थना। ***

सतीश चौकुलकर

No comments: