Tuesday, May 11, 2010

दर्शन, "गणपत वाण्या' च्या चिवटपणाचे.....!

किराणा-भुसार मालाचा असा किरकोळ व्यापारी दुकानदार ही जगभरातीलच व्यापाराच्या प्रांतातील
एक पुरातन संस्था होय. आज मात्र या प्राचीन संस्थेचे पारंपरिक स्वरूप पालटते आहे. कारण
जगाच्या कानाकोपऱ्यातील किरकोळ व्यापाराच्या व्यवसायाचेच रंगरूप आताशा आमूलाग्र बदलू लागलेेले दिसते.

दुर्बोधतेचा शिक्का रचनेवर बसलेला असल्याने "नवकवितेचे प्रर्वतक' गणल्या गेलेल्या बाळ सीताराम मर्ढेकरांच्या कवितेच्या वाटेला फ़ारसे कोणी सहसा जात नाहीत. असे असले तरीही मर्ढेकरांचा "गणपत वाणी' कधी ना कधी, कोठे ना कोठे भेटलेला असतो. निदानपक्षी शालेय जीवनात मराठीच्या क्रमिक पुस्तकात तरी "गणपत वाण्या'शी गाठ झालेली असतेच असते. बाळपणीचे मैत्र टिकावू असते. त्यामुळे, अगदी संपूर्ण कविता जरी नाही तरी ,
गणपत वाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काडी
म्हणायचा अन्‌ मनाशीच की या जागेवर बांधीन माडी
मिचकावून मग उजवा डोळा आणि उडवून डावी भिवयी
भिरकावून तो तशीच द्यायचा लकेर बेचव जैशी गवयी
हे त्या कवितेचे पहिले कडवे आजही आठवणारे कितीतरी सापडतील. कर्तृत्वाचे इमले मनातल्या मनातच बांधणारा, परंतु त्या मनोरथांना प्रयत्नाची साथ व्यवहारात यत्किंंचितही न देणारा तो कृतिशून्य "गणपत वाणी' एक दिवस मर्ढेकरांच्याच शब्दांत सांगावयाचे तर "बापडा बिडी पिता पिताना मरून गेला...'
खंगलेल्या दुकानाच्या जागेवर एकही माडी न बांधताच मर्र्ढेकरांच्या कवितेतील "गणपत वाणी' मनातले इमले आपल्या चिवट प्रयत्नांनी भुईवर प्रत्यक्षात उठवण्याच्या खटाटोपात गुंतलेेले ठायी ठायी दिसतील. कष्टांची पराकाष्ठा करणे त्यांना भागच आहे. कारण, आता त्यांच्याही अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते आहे. मर्ढेकरांचा"गणपत वाणी' हे खरे म्हणजे एक प्रतीक आहे. किराणा मालाचे पिढीजात दुकान पेठेत थाटलेला, रोजच्या गिऱ्हाईकाशी जिव्हाळ्याचे नाते जोपासलेला, पुड्याच्या दोऱ्याने गुंडाळलेल्या कागदात गूळ-मीठमिरची बांधून देणारा, रोख हिशेब चुकता करण्याचा हठ्ठ न धरता नेहेमीच्या गिऱ्हाईकाला उधारीवर माल देणारा, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा पारंपारिक किरकोळ दुकानदार मर्ढेकरांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या कवितेत नेऊन बसवला आणि त्याचे बारसे केले "गणपत वाणी'.
किराणा-भुसार मालाचा असा किरकोळ व्यापारी दुकानदार ही जगभरातीलच व्यापाराच्या प्रांतातील एक पुरातन संस्था होय. आज मात्र या प्राचीन संस्थेचे पारंपरिक स्वरूप पालटते आहे. कारण जगाच्या कानाकोपऱ्यातील किरकोळ व्यापाराच्या व्यवसायाचेच रंगरूप आताशा आमूलाग्र बदलू लागलेेले दिसते. किरकोळ व्यापाराच्या प्रांतात मोठ्या संघटित व्यवसायघटकांना अलीकडच्या काळात मोठाच रस निर्माण झालेला आहे. जगभरातच हे चित्र दिसते. अनेक संघटित "कार्पोरेट' उद्योग आता किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात उतरले आहेत. आजही उतरत आहेत. केवळ इतकेच नाही तर, नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्याही या व्यवसायात भांडवल गुंतवणूक करून आपले बस्तान बसविण्याबाबत उत्सुक आहेत. राजधान्यांची शहरे, मोठमोठी महानगरे, महानगरसंकुले इथे झपाट्याने वाढत असलेेले मॉल्स, मेगा स्टोअर्स, सुपरस्टोअर्स, हायपर मार्केटस.... या सगळ्या किरकोळ व्यापारातील या नवीन प्रवाहांच्या खुणा आहेत.
याचा स्वाभाविक परिणाम म्हणजे, परंपरागत किरकोळ व्यापारी दुकानदार एकीकडे आणि या क्षेत्रात नव्याने हातपाय पसरत असलेले संघटित "प्लेअर्स' दुसरीकडे असे एक द्वैत आता किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात स्थिरावते आहे. या दोन गटांमधील स्पर्धा वाढते आहे. पारंपरिक पध्दतीने किरकोळ व्यापार करणाऱ्या सगळ्या "गणपत वाण्या'चा या स्पर्धेत टिकाव लागणार का, हाच प्रश्न त्यामुळे विचारला जातो आहे. कारण, व्यवसायाचे आकारमान, भांडवली पाया, तंत्रज्ञान... अशा सगळ्याच बाबतीत किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात नव्याने प्रवेशत असलेल्या घटकांची बाजू पारंपरिक व्यापारी दुकानदारांच्या तुलनेत प्रचंड वरचढ आहे. या क्षेत्रातील परिभाषेत, पारंपरिक किरकोळ व्यापाऱ्यांच्या वर्गाला किरकोळ व्यापारांचे "असंघटित क्षेत्र' असे संबांधले जाते. तर नव्याने येत असलेल्या व्यवसायघटकांना किरकोळ व्यापाराचे "संघटित क्षेत्र' असे म्हटले जाते.
भारतातील किरकोळ व्यापाराचे क्षेत्रही आजमितीस या स्थित्यंतरामधून जात आहे. तसे पाहिले तर, किरकोळ व्यापाराच्या क्षेत्राचा हा जो रूपपालट घडून येतो आहे, त्या प्रवाहात भारत तुलनेने उशीराच दाखल होत आहे, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. आधुनिक अशा संघटित व्यवसायघटकांनी विकसनशील देशांमधील किरकोळ व्यापाराच्या क्षेत्राकडे वळण्याच्या प्रवाहाची पहिली लाट 1990 च्या दशकाच्या प्रारंभी उमटली. 1990 च्या दशकाच्या मध्यापर्यंत ही लाट टिकली. अर्जेन्टिना, ब्राझील, चिली, दक्षिण कोरिया, मलेशिया, थायलंड, तैवान, फिलिपिन्स या देशांमधील किरकोळ व्यापार क्षेत्राने या पहिल्या लाटेत हात धुवून घेतले. 1990 च्या दशकाच्या मध्यास या लाटेचे दुसरे पर्व जे सुरू झाले, ते त्या दशकाच्या अंतापर्यंत टिकले. ग्वाटेमाल, कोलंबिया, इंडोनेशिया, बल्गेरिया या देशांमधील किरकोळ व्यापाराचे क्षेत्र या दुसऱ्या लाटेमधून प्रक्षाळून निघाले. विकसनशील देशांमधील किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात घुमणाऱ्या या प्रवाहाची तिसरी लाट उमटली ती 1990 च्या दशकाच्या अखेरीस. केनिया, निकाराग्वा, पेरू, बोलिव्हिया, व्हिएतनाम, चीन, भारत आणि रशिया या देशांमधील किरकोळ व्यापारक्षेत्र या तिसऱ्या लाटेवर आता स्वार झालेले दिसते.
देशोदेशींच्या किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात संघटित व्यवसायघटकांनी बसवलेले बस्तान, यामुळेच एकसारखे दिसत नाही. विकसित देशांच्या गटात किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात संघटित घटकांचा हिस्सा सरासरीने जवळपास 75 ते 80 टक्क्यांचा असल्याचे दिसते. विकसनशील देशांच्या गटात मात्र या प्रमाणात तुफान तफावत दिसते. 2006 सालातील जी काही आकडेवारी उपलब्ध आहे, ती बघितली तर पाकिस्तानात हे प्रमाण अवघा एक टक्का इतकेच होते. भारताची स्थिती जरा "बरी' होती. किरकोळ व्यापारात संघटित व्यापारक्षेत्राचा तौलनिक हिस्सा होता चार टक्क्यांचा हे दोन सख्खे शेजारी या यादीत तळाला आहेत. यादीच्या दुसऱ्या टोकाला आहेत मलेशिया (संघटित किरकोळ व्यापार घटकाचा एकंदर किरकोळ व्यापारातील हिस्सा 55 टक्के), थायलंड (40 टक्के), ब्राझील (36 टक्के), इंडोनेशिया (30 टक्के) आणि व्हिएतनाम (22 टक्के).
आर्थिक विकासाच्या संदर्भात ज्या आपल्या शेजाऱ्याबरोबर आपली सतत तुलना केली जाते, त्या चीनमध्येही किरकोळ व्यापाराच्या एकूण उलाढालीत संघटित क्षेत्रांचा तौलनिक हिस्सा 2006 साली जवळपास 20 टक्क्यांच्या घरात होता. संघटित क्षेत्राने किरकोळ व्यापाराबाबत रस घेण्याच्या प्रवाहाच्या तिसऱ्या लाटेत भारताच्या आगेमागेच प्रवेश होऊनही चीन आणि रशिया तुलनेने बरेच पुढे सरकलेले दिसतात; याचे कारण त्या देशाच्या व्यापारविषयक धोरणांत दडलेले आहे. परकीय थेट भांडवली गुंतवणुकीस किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात मुक्तद्वार न देण्याचे या तीनही भांडवली गुंतवणुकीस प्रवेश न देण्याचे हे धोरण चीन आणि रशिया या दोन देशांनी 1990 च्या दशकात क्रमाने शिथील केले. भारताच्या बाबतीत मात्र, ही बंधने शिथिल करण्याची - तीही पुन्हा संपूर्ण नव्हे तर अंशत: प्रक्रिया 2000 सालानंतर हळूहळू सुरू झालेली दिसते.
देशी बाजारपेठेतील संघटित उद्योगघटकांबरोबर व्यवसायीक हातमिळवणी करून किरकोळ व्यापाराच्या भारतीय क्षेत्रात पाऊल घालण्यास आजमितीस बहुराष्ट्रीय अनेक ताकदवान कंपन्या उत्सुक आहेत. परंतु, अशा सुदृढ स्पर्धकांपुढे भारतीय किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रातील असंघटित, पारंपरिक व्यापारी दुकानदारांचा टिकाव लागेल अथवा नाही, या चिंतेपायी किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात परकीय थेट गुंतवणुकीस पायघड्या घालण्याबाबत धोरणात्मक एकवाक्यता दिसत नाही. ते साहजिकही आहे. किंबहुना, देशी काय वा बहुराष्ट्रीय काय, संघटित व्यापारघटकांची तगडी स्पर्धा अर्थव्यवस्थेतली पारंपरिक, असंघटीत किरकोळ व्यापारी दुकानदारांना पेलवेल का, ही शंका जवळपास सगळ्याच विकसनशील देशांमधील धोरणकत्यार्ंना आजवर सतावत आलेली आहे. किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात संघटित व्यवसायघटकांना मुक्त वाव देण्याने असंघटित, पारंपरिक किरकोळ व्यापारघटकांचे अस्तित्वच धोक्यात येईल का, हा खरोखरच एक संशोधनाचा विषय होय. केवळ असंघटित किरकोळ व्यापारीच नव्हे तर, ग्राहक, उत्पादक, शेतकरी... अशांसारख्या अन्य आर्थिक घटकांवर तसेच या क्षेत्रातील रोजगारावर त्याचे कोणते परिणाम संभवतात ?
संघटित व्यापारघटकांचा प्रवेश किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात घडून आल्याने त्याचे जे विविधांगी परिणाम -पडसाद उमटतात त्यांबाबतचा जो एक अभ्यास "इंडियन कौन्सील फॉर रीसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स' या नवी दिल्ली येथील संस्थेने अलीकडेच केलेला आहे .
त्या अभ्यासाचे निष्कर्ष अतिशय उद्‌बोधक आहेत. नमुना पाहणी तत्त्वावर (सॅम्पल सर्व्हे) केलेल्या या व्यापक क्षेत्रीय अभ्यासात देशभरातील 10 मोठ्या शहरामधील पारंपरिक किरकोळ असंघटित व्यापारी, दुकानदार, असंघटित तसेच संघटित दुकानदार, व्यावसायिकांकडून नेहमी खरेदी करणारे ग्राहक, शेतकरी, विक्री -विपणनाच्या साखळीतील मध्यस्थ-अडते अशा नानाविध घटकांचा अंतर्भाव करण्यात आलेला होता. या व्यतिरिक्त मोठे उत्पादक-कारखानदार, लघुउद्योजक, आधुनिक व संघटित व्यापारी, व्यावसायिक यांचाही समावेश या पाहणीत आवर्जून करण्यात आला होता. संघटित व्यापारी, दुकानदारांनी किरकोळ व्यापाराच्या प्रांतात पाऊल घातल्याने पारंपरिक, असंघटित किरकोळ व्यापारीवर्गावर नेमके काय परिणाम होतात, याचा अभ्यास करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू होता.
संघटित, आधुनिक व्यापारी घटक किरकोळ व्यापाराच्या व्यावसायात प्रवेशल्याने देशाच्या कानाकोपऱ्यात पिढ्यान्‌पिढ्या व्यवसाय करणाऱ्या असंघटित, पारंपरिक किरकोळ व किराणा भुसार मालाच्या व्यापारी, दुकानदारांवर अरिष्ट कोसळेल, ही भीती निराधार असल्याचा या सर्वेक्षणाचा निर्वाळा आहे. संघटित व्यापारक्षेत्राच्या प्रवेशामुळे किरकोळ व्यापाराच्या प्रांतातील वाढलेल्या स्पर्धेचा चिमटा पारंपरिक, असंघटित व्यापाऱ्यांना जाणवतो हे खरे, परंतु त्यामुळे या क्षेत्रातील उद्यमशीलताही सक्रीय व स्पर्धात्मक बनत असल्याचे या अभ्यासक्रमाद्वारे समोर आले आहे. बदललेल्या वातावरणात टिच्चून टिकून राहण्यासाठी पारंपरिक किरकोळ व्यापारीही प्रगत तंत्रज्ञानाचा अंगिकार करतात. आपले परंपरागत ग्राहक आपल्याशीच एकनिष्ठ राहावेत यासाठी नानाविध व्यावसायिक क्लृप्त्या लढवितात, असे या पाहणीअंती स्पष्ट झाले आहे. "गणपत वाण्या'च्या अंगी असणाऱ्या या चिवट जिजीविषेचे हे दर्शन जितके दिलासादायक, तितकेच आश्र्वासक नाही का?
साभार : अर्थबोधपत्रिका

No comments: