Tuesday, May 11, 2010

केंद्र वृत्त

बालमित्रांनो,
विवेकानंद केंद्राकडून साप्ताहिक संस्कार वर्ग सुरू असतात. इयत्ता 5 वी ते 8 वीचे बालमित्र या वर्गांत सहभागी होत असतात. दरवर्षी सुटीच्या कालावधीत विविध शहरांमध्ये केंद्राकडून संस्कार शिबिरे, तसेच व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचेही आयोजन होत असते. गेल्या महिन्यात विविध ठिकाणी झालेल्या काही शिबिरांचे वृत्त...
नागपूर : दि. 26 ते 29 एप्रिल या कालावधीत निवासी व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराची दिनचर्या पहाटे 5 ते रात्री 10 अशी होती. "वीर व्रतधारी बनूया' या विषयावर लखेश दादा, "ऋषीमुनियोंकी संतती हम है' या विषयावर प्रियादीदी तर "आपणही असे बनूया' या विषयावर क्षमाताई यांनी मार्गदर्शन केले.
कृष्णाष्टकम्‌, ऐक्यमंत्र, एकात्मता स्तोत्र, हनुमान चालिसा, राष्ट्रभक्तीपर गीते, मैदानी खेळ, सूर्यनमस्कार, प्राणायाम, नाट्यप्रशिक्षण, मातीची भांडी बनविणे आाणि प्रेरक गोष्टी या माध्यमातून विद्यार्थ्यांची आंतरिक क्षमता वाढविण्याचा प्रयत्न झाला. आत्मविश्वास वृद्धी झाली.
समारोप सत्रासाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसेविका समितीच्या अ.भा. प्र. कार्यवाहिका मा. शांताक्का व अध्यक्ष म्हणून नगरप्रमुख श्री. आनंद बागडिया उपस्थित होते. आदरणीय शांताक्का यांनी आई-वडील आणि ग्रहस्थ धर्माचे महत्व सांगितले. यावेळी मातृपितृपूजन व भारतमाता पूजन झाले.
सोलापूर : दि. 18 ते 25 एप्रिल या कालावधीत सोलापूर केंद्राकडून 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांकरिता वासंतिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रेरणेतून पुनरुत्थान -धनंजय सूर्यवंशी (विवेक विचार व्यवस्थाप्रमुख), कथाकथन -गीता भालेराव, व्यक्तिमत्व विकास -प्रभाकर जमखंडीकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. वन्य जीव या विषयावर भरत छेडा यांनी सादरीकरणासह मार्गदर्शन केले. शिबीर प्रमुख पार्वती शेटे आणि योगेश, विवेक, राहूल, पवन, किरण, प्रणव, केशव, प्रतीक्षा, पूजा, स्वेता आदी युवा कार्यकर्त्यांनी शिबिरात विविध दायित्व घेतले होते.
मुंबई : दि. 14 ते 18 एप्रिल या कालावधीत मुंबई विवेकानंद केंद्राकडून संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 16 मुले व 16 मुलींनी सहभाग घेतला. विवेकानंदांच्या कथा - विभाग संघटक मंगलाताई, सुलेखन - सुचेता चाफेकर, माझा भारत -मंगलाताई, वैज्ञानिक खेळ -भगवान चक्रदेव याप्रमाणे विविध विषयांवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. आशियायी चॅंपियन कु. पूर्वा मॅथ्यू हिची मुलाखत झाली. दि. 18 रोजी मुंबई विभाग प्रमुख श्री. अभय बापट यांच्या उपस्थितीत शिबिराचा समारोप झाला. यावेळी पालकांशी संवाद साधला गेला.

No comments: