भारतीय संस्कृती ही आपल्यातील सद्गुणांची वाढ व्हावी व दुर्गुण कमी व्हावेत, अशारीतीने बनलेली आहे. गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की आपल्या दैवी संपत्तीत वाढ व्हावी व आसुरी संपत्ती कमी व्हावी. यासाठी निरनिराळ्या सद्गुणांचे आचरण करून त्यांची जोपासना केली पाहिजे. त्यासाठी आपण एकेका सद्गुणाचा सविस्तर विचार करू, प्रथम आपण कृतज्ञता या गुणाचा विचार करू.
कृतज्ञता शब्द उच्चारला की लोक म्हणतात, त्यात काय नवीन गोष्ट सांगताय? कोणी काही मदत केली तर आम्ही थॅंक्स, आभारी आहे, असे म्हणतच असतो, परंतु आभारी आहे वगैरे म्हणणे हा केवळ एक शिष्टाचार झाला. कृतज्ञता म्हणजे शिष्टाचारपेक्षा काहीतरी वेगळे आहे, त्याचा मनाशी, हृदयाशी संबंध आहे. तो वरवरचा शिष्टाचार नाही, भारतीय संस्कृतीचा तो एक भाग आहे. माणसाचे मन उन्नत होऊन दैवीगुणांची वाढ होण्यासाठी याची जरुरी आहे.
कृतज्ञता म्हणजे आपल्याला मदत करून किंवा काही देऊन उपकृत केल्याची भावना. ही भावना व्यक्त करण्यासाठी आपण काही छोटीशी परतफेडही करतो, परंतु ही परतफेड म्हणजे त्याच्या ऋणातून मुक्त होणे असे मात्र नाही. उलट त्या व्यक्तीच्या ऋणात राहणे आपण पसंत करतो, ही कृतज्ञता होय.
आई मुलाला 9 महिने गर्भात वाढविते, तो भार आनंदाने सहन करते. त्याचे संगोपन करते, वाढविते, त्याला पुढील आयुष्यात आवश्यक असलेल्या गोष्टी शिकविते. त्यामागे तिची काहीही अपेक्षा नसते. वडीलही मुलांसाठी सर्व गोष्टी करीत असतात. गुरुजन आपल्या विद्यार्थ्याला ज्ञानार्जन करून सज्ञान बनवीत असतात. त्यामुळे आई, वडील, गुरुजन यांचे आपण सदैव कृतज्ञ असले पाहिजे.
आपल्या घरी कामासाठी गडी, मोलकरीण असते. आपण त्यांना दर महिन्याला पगार देतो व आपले काम झाले असे समजतो, परंतु त्यांनी त्यांच्या आयुष्यातील केलेल्या या योगदानामुळे आपले जीवन सुसह्य झालेले असते. त्यामुळे आपण त्यांचे कृतज्ञ असले पाहिजे. निव्वळ पैसे फेकून सर्व कामे होत नसतात. आपण कृतज्ञता दाखविण्यावर ते लोकसुध्दा मनापासून काम करतील.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी निंदकांबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली आहे. धोबी साबण लावून कपडे स्वच्छ धुवून देतो, परंतु त्यासाठी तो पैसे घेतो परंतु निंदक मात्र आपले दोष सतत दाखवून आपली सुधारणा करण्यासाठी आपणास फ़ुकटात मदत करीत असतो. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की, "निंदकाचे घर असावे शेजारी!'
माणसात दैवी संपत्तीची वाढ करणारी कृतज्ञता आपण अंगी बाणवूया व मानवाचे देवमाणसात रूपांतर होण्यासाठी प्रयत्न करूया।
वसंत कुलकर्णी ठाणे
No comments:
Post a Comment