Tuesday, May 11, 2010

सावरकरांची विज्ञाननिष्ठा

मुळात विज्ञाननिष्ठा या शब्दाची वा संकल्पनेची
व्याख्या काय, त्या कल्पनेची ठळक वैशिष्ट्ये
कोणती? हे समजून घेतले की, सावरकरांच्या
विचार-व्यवहाराला त्या सर्व लक्षणांचे कसे
भक्कम अधिष्ठान होते, ते दिसून येईल. प्रत्येक
बाब बुध्दीच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून
मगच स्वीकारणे, शोधक- जिज्ञासू वृत्तीचा
अंगिकार करणे, प्रत्ययाला येणाऱ्या कोणत्याही नव्या गोष्टींचा मन:पूर्वक स्वीकार करण्याची मानसिकता
बाळगणे ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्यवच्छेदक लक्षणे म्हणता येतील.

क्रांतीवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावामागे जितक्या स्वाभाविकपणे "स्वातंत्र्यवीर' ही बिरुदावली लावली जाते, तितक्याच सहजपणे अन्यही अनेक विशेषणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसतात. कट्टर राष्ट्राभिमानी, प्रतिभावन्त साहित्यिक, बुध्दिमान विचारवंत, निरलस-स्वार्थत्यागी देशभक्त, संवेदनशील कवी, ... या साऱ्या विशेषणांबरोबरच "निखळ विज्ञाननिष्ठ' याही शब्दांत सावरकरांचे वर्णन केले जाते. सनातन हिंदुधर्माचे कडवे अभिमानी असूनही बावनकशी विज्ञाननिष्ठांची जोपासना या दोन बाबींमध्ये विरोधाभास असल्याचा भ्रम अनेकदा सावरकरांच्या संदर्भात हेतुपूर्वक निर्माण केला जातो. गमतीची बाब पहा : सावरकरांच्या व्यक्तित्वाच्या या विज्ञानिष्ठ पैलूकडे एकतर आंधळेपणाने दुर्लक्ष तरी केले जाते किंवा त्यांच्या विज्ञानविषयक वक्तव्यांचा मतलबासाठी गैरवापर तरी केला जातो. अन्यथा त्यांच्या विचारांशी सुतराम संबंध नसणारे राजकारणी आपल्या स्वार्थासाठी मात्र सावरकरांच्या वक्तव्यांचा-मोडून, तोडूनच- आधार घेतात.
गोहत्येबाबतची चर्चा आणि त्यात आपापल्या युक्तिवादासाठी सावरकरांच्या मताचा दिला जाणारा दाखला हे याचे अत्यंत ठळक उदाहरण आहे. आभास असा निर्माण केला जातो की जणू "उठा आणि सरसकट गायींची कत्तल करीत सुटा' असेच सावरकरांनी सांगितलेय. खरेतर सावरकरांनी गायीविषयी जे विचार व्यक्त केले आहेत, त्यांचा वस्तुनिष्ट सारांश, "गोपालन, गोरक्षण आणि गोसंगोपन ही मनुष्यमात्रांस अतिशय उपयुक्त बाब आहे,' असाच आहे. "गोपालन-गोपूजन नव्हे' हे त्यांच्या गायीवरील निबंधाचे शीर्षकच बोलके आहे. "गाय हा पशु हिंदुस्थानसारख्या कृषिप्रधान देशात अत्यंत उपयुक्त असल्याने अगदी वैदिक काळापासून आपल्या हिंदू लोकांत तो आवडता असावा, हे साहजिकच आहे. शेतीच्या खालोखाल जिच्या दूध-दही-लोणी-तुपावर मनुष्याचा पिंड आजही पोसला जात आहे, त्या अतिउपयुक्त पशुंचे आम्हां मनुष्यांस एखाद्या कुटुंबीयाइतके ममत्व वाटावे, हे माणुसकीला धरूनच आहे. अशा त्या गायीचे रक्षण करणे, हे आपले वैयक्तिक नि कौटुंबिकच नव्हे तर, आपल्या हिंदुस्थानपुरते एक राष्ट्रीय कर्तव्यच आहे... तेव्हा आमची साऱ्या गोरक्षक संस्थांस अशी विनंती आहे की, त्यांनी गोपालक बनावे. वैज्ञानिक साधनांनी मनुष्यास त्या पशुचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल, याच काय त्या दृष्टीने तिची अमेरिकेसारखी सकस नि सुरेख वीण वाढवून, दूध वाढवून, आरोग्य वाढवून जोपासना करावी, गोरक्षण करावे. राष्ट्राचे गोधन वाढवावे, परंतु त्या नादात भाबडेपणाची भेसळ होऊ देऊन पशुलाच देव करून पूजण्याचा मूर्खपणा करू नये. गाईचे कौतुक करायचे तर तिच्या गळ्यात घंटा बांधा-पण देवाच्या गळ्यात हार घालतो त्या भावनेने नव्हे तर, कुत्र्याच्या गळ्यात पट्टा घालतो त्या भावनेने...' या शब्दांत भाष्य करताना सावरकराना जो संकेत ठळकपणाने व्यक्त करायचा आहे, तो लक्षात घेणे आवश्यक आहे.
त्या निबंधात सावरकर पुढे म्हणतात, "हा प्रश्न एका फ़ुटकळ धर्मसमजूतीचा नाही. अशा धार्मिक छापाच्या ज्या शेकडो खुळ्या समजुती आपल्या लोकांची बुद्धिहत्या करीत आहेत, त्या भाकड प्रवृत्तींचा आहे...! तिचे एक उपलक्षण म्हणून आम्ही गायीची गोष्ट तेवढी निवडली...' या उद्‌गाराचा थोडा तटस्थ आणि बारकाईने विचार केला तर, त्यांच्या दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य लक्षात येते. ते ध्यानात घेण्याऐवजी मोडतोड करून संकुचित अर्थाने सावरकर विचारांचा वापर केल्यामुळे विज्ञानाचा अंगिकार म्हणजे धर्मावर आघात असा अत्यंत चुकीचा समज प्रस्तुत होतो. सावरकरांनी उलट धर्माची जोपासना खऱ्या अर्थाने विज्ञानाच्या आधारेच करता येईल आणि केली पाहिजे असेच महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे. सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेचे संपूर्ण आकलन करून घ्यायचे तर, अशा अर्धवट आणि मतलबी तर्कवादाच्या पलीकडे जाऊन विचार करणे आवश्यक आहे.
वैज्ञानिकता म्हणजे काय?
मुळात विज्ञाननिष्ठा या शब्दाची वा संकल्पनेची व्याख्या काय, त्या कल्पनेची ठळक वैशिष्ट्ये कोणती? हे समजून घेतले की, सावरकरांच्या विचार-व्यवहाराला त्या सर्व लक्षणांचे कसे भक्कम अधिष्ठान होते, ते दिसून येईल. प्रत्येक बाब बुध्दीच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून मगच स्वीकारणे, शोधक-जिज्ञासू वृत्तीचा अंगिकार करणे, प्रत्ययाला येणाऱ्या कोणत्याही नव्या गोष्टींचा मन:पूर्वक स्वीकार करण्याची मानसिकता बाळगणे ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्यवच्छेदक लक्षणे म्हणता येतील. मात्र यातल्या कोणत्याही एका बाबीचा- अगदी बुध्दिवादासकट-एकात्मिक दुराग्रहसुध्दा वैज्ञानिकतेला अंतिमत: बाधाच उत्पन्न करणारा ठरतो, याचे भान बाळगले पाहिजे. आंधळा दैववाद जसा चुकीचा, तितकाच एककल्ली बुध्दिवादही अनुपयोगी. बुध्दिगम्यतेच्याही पलीकडच्या अनेक गोष्टी एका मर्यादेपर्यर्ंत मान्य करणे अपरिहार्य असते. याचे असंख्य उदाहरणे आपण दैनंदिन जीवनात अनुभवतो. बुध्दी ही सृष्टीतल्या सर्व सजीवांपेक्षा मानवाला श्रेष्ठत्व प्रदान करणारी बाब आहे, हे सर्वमान्य सत्य."बुध्दिर्विहिन: पशुभि: समान:' ही उक्ती प्रसिध्दच आहे. मात्र भूकंपासारख्या अवचित येणाऱ्या संकटांची पूर्वसूचना माणसाच्या कितीतरी आधी त्या "निर्बुध्द' पशुंना कळते, हे आपण अनुभवले आहे. पावसाळा जवळ येत चालला की मुंग्यांची वर्दळ वाढते, पक्ष्यांचीही धांदल उडते, हेही आपण पाहतो. म्हणूनच निसर्गात असलेल्या नियमांना संपूर्णपणे समजून घेण्यात मानवी बुध्दी तोकडी पडते, हे मान्य करावेच लागते. सावरकर हे मोकळेपणाने मान्य करतात, हे त्यंाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य.
"खरा सनातन धर्म कोणता,' या त्यांच्या निबंधात सावरकर नमूद करतात, "ही गोष्ट आम्ही जाणून आहोत की हे सनातन धर्म, हे सृष्टिनियम संपूर्णपणे मानवाला आज अवगत नाहीत. जे आज अवगत आहेसे वाटते, त्याबाबतचे आमचे ज्ञान विज्ञानाच्या विकासाने पुढे थोडेसे चुकलेलेही आढळेल आणि अनेक नवनवीन नियामांच्या ज्ञानाची भर त्यात निश्चित
पडेल. जेव्हा जेव्हा ती पडेल वा त्यात सुधारणा करावी लागेल, तेव्हा तेव्हा आम्ही आपल्या या वैज्ञानिक स्मृतीत न लाजता, न लपविता किंवा आजच्या श्र्लोकांच्या अर्थाची अप्रामाणिक ओढताण न करता नवीन श्र्लोक प्रकटपणे घालून ती सुधारणा घडवून आणू आणि उलट मनुष्याचे ज्ञान वाढले म्हणून त्या सुधारणेचे भूषणच मानू...' इतक्या स्वच्छ शब्दांत विज्ञानाचे महानपण आणि मानवी शक्तीचे तोकडेपण मान्य करणारे स्वातंत्र्यवीर नव्याचा स्वीकार करण्याची- सदैव टवटवीत मानसिकता बाळगणे या वैज्ञानिकतेच्या कसोटीला तंतोतंत उतरतात.
त्याउलट दैववादावर मात्र ते कडाडून हल्ला चढवितात-मात्र तोही अत्यंत तर्कनिष्ठ शब्दांत आणि समर्पक उदाहरणांसह. विरोधासाठी विरोध नव्हे, तर बिनतोड युक्तिवादाच्या आधारे त्यांनी भाबड्या दैववादावर आपल्या निबंधात कसा आसूड ओढला आहे, तो त्यांच्याच शब्दांत पाहणे उद्‌बोधक होईल. "खरा सनातन धर्म कोणता' या निबंधात सावरकर लिहितात, "सूर्य, चंद्र, आप, तेज, वायु, भूमि, अग्नि आणि समुद्र प्रभुती या कोणी लाभाच्या लहरीप्रमाणे प्रसन्न वा रुष्ट होणाऱ्या देवता नसून, या आमच्या सनातन धर्माच्या नियमांनी पूर्णपणे बध्द असणाऱ्या वस्तू आहेत. ते नियम जर आणि ज्या प्रमाणात मनुष्यास हस्तगत करता येतील, तर आणि त्या प्रमाणात सर्व सुष्ट शक्तींशी त्याला रोखठोक आणि बिनचूक व्यवहार करता आलाच पाहिजे-करता येतोही. भर महासागरात तळाशी भोके पडलेली नाव सोडून मग ती बुडू नये म्हणून त्या समुद्रास प्रसादविण्यासाठी नारळांचे ढीग त्यात फ़ेकले आणि अगदी शुध्द वैदिक मंत्रांत जरी टाहो फ़ोडला तरी तो समुद्र आमच्या जनांसह त्या नावेस बुडविल्यावाचून हजारात नऊशे नव्याण्णव प्रसंगी राहत नाही आणि जर त्या नावेस वैज्ञानिक नियमांनुसार ठाकठीक करून, पोलादी पत्र्यांनी मढवून, बेडर बनवून सोडली तर तिच्यावर वेदांची होळी करून शेकणारे आणि पंचमहत्पुण्ये समजून दारू पीत, गोमांस खात मस्त झालेले रावणाचे राक्षस जरी चढलेले असले तरी त्या बेडर नावेस हजारात नऊशे नव्याण्णव प्रसंगी समुद्र बुडवीत नाही-बुडवू शकत नाही, तिला वाटेल त्या सुवर्णभूमीवर तोफ़ांचा भडिमार करण्यासाठी सुखरूपपणे वाहून नेतो. जी गोष्ट समुद्राची तीच इतर महाभूतांची. त्यांस माणसाळविण्याचे महामंत्र वेदात, कुराणात, झेंद अवेस्थात नसून, प्रत्यक्षनिष्ठ विज्ञानात सापडणारे आहेत...!' केवळ दैववादावर आंधळी निष्ठा ठेवणे कसे चुकीचेच नव्हे तर, सर्वथा अनर्थकारक आहे, हे सावरकरांनी निखळ बुध्दिनिष्ठ आणि तर्कशुध्द भाषेत सातत्याने मांडले. श्रुती, स्मृतींमध्ये जे मांडले, ते अनुभवसिध्द आणि ज्ञाननिष्ठ चिंतनातूनच पूर्वजांनी सांगितले आहे, त्याबद्दल शंका न घेता त्याचा अवलंब करणेच हिताचे आहे, त्यातच संस्कृतीचे जतन, रक्षण सामावले आहे. अशा प्रगाढ श्रध्देच्या आधारे रूढींचे पालन करणाऱ्यांना उद्देशूनही सावरकरांनी दिलेला संदेश असाच तर्कशुध्द आहे. "संस्कृतीरक्षणाचा खरा अर्थ प्राचीन काळी वेळोवेळी ज्या उलटसुलट प्रथा त्या काळच्या ज्ञान-अज्ञानाप्रमाणे "संस्कृत' वाटल्या, त्या जरी आज व्यर्थ वा विक्षिप्त वाटल्या तरीही तशाच चालू ठेवणे हा नव्हे- आज जे संस्कृत म्हणून अभिमानाने रक्षावयाचे, ते प्राचीनातले आजही मनुष्यास हितकारक ठरणारे तेवढे, तेवढेच काय ते होय...' थोडक्यात, प्राचीन ग्रंथवाङ्‌मयातून जे सांगितले, तेही आजच्या विज्ञानसिध्द, वस्तुनिष्ठतेच्या कसोटीवर पारखून मगच स्वीकारायचे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. "वस्तुनिष्ठता' हा त्यांच्या बुध्दिप्रामाण्यवादी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा दुसरा महत्त्वाचा पैलू आहे, हे येथे लक्षात घ्यायला हवे. याच वस्तुनिष्ठतेच्या कसोटीवर शंकराचार्यादि महापुरुषांचे मार्गदर्शनही पारखून घ्यायला हवे, हेही स्पष्टपणे सांगण्यात ते संकोच करीत नाहीत. एका निबंधात याचा परामर्श घेताना त्यांनी म्हटले आहे की, "आंतरअनुभूतीतून प्राप्त झालेले आणि शंकराचार्य, मध्व, रामानुज, पतंजली, कपिलमुनी आदींच्या कथनांतून प्रकट झालेले ज्ञानही अंतिम नाही- नाहीतर त्या सर्वार्ंच्या मांडणीत विसंगती राहिली नसती...' हाच मुद्दा एका मार्मिक काव्यपंक्तीतून अधिक स्पष्ट करताना सावरकर लिहितात :
" पाहिले प्रत्यक्षचि, कथितो पाहियले त्याला,
वदति सारे आप्तचि सारे, मानू मी कवणाला...?'
सगळेच थोर चिंतक जे प्रत्यक्ष पाहिले त्याचेच प्रमाण देऊन सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात. ते सारे आत्मीय, आप्तच आहेत. तरीही त्यांनी त्यांना जे सत्य गवसले वा भासले ते सांगितले आहे, परंतु सत्याचा शोध ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सखोल विचार आणि सातत्याच्या संशोधनातून सत्याचे नवे नवे पैलू प्रत्येक चिंतकाला गवसतात. त्यामुळेच त्यांच्या मांडणीत, ती अनुभवसिध्द असली तरीही, परस्परविरोधी आणि विसंगती आढळते. अशा स्थितीत "मानू मी कवणाला?' अशा संभ्रमात न घोटाळता, बुध्दिनिष्ठा आणि विवेकनिष्ठा अंगिकारणे हेच श्रेयस्कर आहे. म्हणजेच वस्तुनिष्ठेच्या पाठोपाठ विवेकनिष्ठा हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणखी एक पैलू सावरकर आपल्यासमोर उलगडून ठेवतात आणि बुध्दीच्या सहाय्याने, विवेकाच्या आधारे सतत चिंतनशील राहण्याची प्रेरणा जागवितात. ज्ञान-विज्ञानाच्या अंगिकाराने सामोरा येणारा सत्याचा नवा पैलू जुन्या समजुतींना धक्का देणारा असला तरीही त्याला मोकळेपणाने स्वीकारण्याचे धैर्य ही प्रेरणा आपल्याला प्रदान करते.
परिपूर्ण वैज्ञानिकता
सावरकर यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा चौथा आणि महत्त्वाचा पैलू लक्षात घेणे अतिशय आवश्यक आहे. कारण तो पैलू त्यांच्या विज्ञाननिष्ठेला परिपूर्णता प्रदान करतो आणि आपणा सर्वांना एक उज्ज्वल प्रेरणा प्रदान करतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयीच्या भौतिक आणि सैध्दांतिक चर्चेच्या पलीकडे आपणा सर्वांना घेऊन जाणाऱ्या या प्रेरणेचा अंगिकार हाच सावरकरांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला केलेला सर्वश्रेष्ठ प्रणाम होय. प्रखर वास्तवतेची जाणीव करून देत आपणा सर्वांना कर्तव्यबोध करून देणारा संदेश जागविताना सावरकर म्हणतात, "कोणत्या हेतूने वा हेतुवाचून हे जगड्‌व्याळ विश्र्व प्रेरित झाले, ते मनुष्याला तर्किता देखील येणे शक्य नाही. जाणता येणे शक्य आहे ते इतकेच की, काहीही झाले तरी मनुष्य या विश्वाच्या देवाच्या खिजगणतीतही नाही. जशी कीड, मुंगी, माशी तसाच या अनादि अनंत काळाच्या असंख्य उलाढालीतील हा मनुष्यही एक तात्पुरता आणि अत्यंत तुच्छ परिणाम आहे... विश्वात आपण आहोत, पण विश्व आपले नाही. फार फार थोड्या अंशांनी ते आपणास अनुकूल आहे. फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे...' या शब्दांत केवळ वस्तुस्थितीची जाणीव करून देऊन ते थांबले असते तर, कळत-नकळत तुम्हा आम्हा सर्वांना न्यूनभावाच्या आहारी जाऊन अधोमुख होण्याला प्रवृत्त करणारे ठरले असते, पण सावरकर येथेच थांबत नाहीत आणि यातच त्यांच्या चिंतनाचे, दृष्टिकोनाचे आणि मार्गदर्शनाचे सर्वांत मोठे महत्त्व प्रत्ययाला येते. सावरकर पुढे बजावून सांगतात : "... फार फार मोठ्या अंशांनी आपल्याला प्रतिकूल असे जे आहे ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी, विश्वाच्या देवाची तीच खरी पूजा... ही विश्वाची आदिशक्ती ज्या काही ठराविक नियमांनी वर्तते, ते तिचे नियम समजतील, जे समजून घेऊन त्यातल्या त्यात आपल्या मनुष्यजातीच्या सुखाला नि हिताला पोषक होईल तसा त्यांचा साधेल तसा उपयोग करून घेणे मनुष्याच्या हातात आहे...!' म्हणजे, विश्वाच्या आदिशक्तीच्या दृष्टीने भले मानवी जीवनास अत्यंत तात्पुरते वा तुच्छ स्थान असो; आपण मात्र त्या शक्तीच्या नियमांना बेधडक आणि धीटपणे सामोरे जावे, हीच खरी माणुसकी. असा पुरुषार्थप्रेरक आवाहन करणारा आणि जगड्‌व्याळ आदिशक्तीच्याही समोर आव्हान उभे करू पाहणारा विचार सावरकर देऊन जातात. नुसता विचारच देतात असे नव्हे, तर तशा पुरुषार्थाच्या व्यवहाराचे खणखणीत उदाहरण आपणासमोर आणि आगामी अनेक पिढ्यांसमोर स्वत:च्या जीवनव्यवहारातून उभे करतात.
सावरकरांच्या व्यक्तित्व, चरित्र आणि विचारांचा या उत्तुंग उंचीला नीटपणे समजून घेतले म्हणजे मग त्यांच्या कवितेच्या ओळी कारागृहाच्या भिंतीवरून पुसून टाकण्याचा नतदृष्टपणा करणाऱ्यांनी क्षुद्रतेची कशी पराकोटी गाठलीय, हे सहज लक्षात येईल. अशा कोत्या आक्षेपांना आणि अडथळ्यांना सहजपणे ओलांडून सावरकरांचे नाव आणि शिकवण इतिहासाच्या कालपटलावर कधीच कोरली गेली आहे आणि ती सृष्टीविज्ञानाशी इतकी घट्‌ट नाते सांगणारी आहे की, निसर्ग आणि त्यातून अभिव्यक्त होणारे ज्ञानविज्ञान जितके चिरपुरातन आणि नित्यनूतन आहे, तितकेच अमरत्व सावरकरांच्या विचारांनाही प्राप्त झाले आहे. बुध्दिप्रामाण्य, वस्तुनिष्ठता, विवेकनिष्ठा आणि पुरुषार्थ या चार स्तंभांच्या भक्कम आधारावर उभा असलेला सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकरण्याची प्रेरणा आपणां सर्वांच्या विचार, वृत्ती आणि वर्तनात सतत जागती राहो, ही भारतमातेच्या चरणी प्रार्थना !
***

No comments: