अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील डेट्रॉईट नामक
शहरी एकदा व्याख्यान देताना स्वामी
विवेकानंदांनी भगवान बुद्धदेवांसंबधी पुढील विचार
प्रकट केले होते.
प्रत्येक धर्माने एकेका विशिष्ट साधनावर भर देऊन त्याचाच विशेष विकास केला असल्याचे आपल्याला आढळून येईल. बौद्ध धर्मामधे निष्काम कर्माला प्राधान्य मिळाले आहे. तुम्ही लोक बौद्धधर्म आणि ब्राह्मणीधर्म यांत घोटाळा करून नका. या तुमच्या देशात अनेक व्यक्ती असला घोटाळा करताना आढळतात. ह्या लोकांची अशी समजूत आहे की, बौद्धधर्माचा सनातनधर्माशी काहीही संबंध नसून, तो एक संपूर्ण स्वतंत्र धर्म आहे, परंतु ही त्यांची गैरसमजूत आहे, वस्तुस्थिती अशी नाही. वस्तुत: बौद्धधर्म हा सनातन धर्माचाच केवळ एक विशिष्ट संप्रदाय आहे. हा बौद्धधर्म गौतम नामक एका महापुरुषाने स्थापिला आहे. तत्कालीन लोकांतील तात्त्विक काथ्याकुटाची बेसुमार आवड, प्रचलित कर्मकांडातील अनुष्ठानांची अस्वाभाविक गुंतागुंत आणि विशेषत: जातिभेदाची प्रथा या सर्वांना गौतम अगदी विटून गेले होते.
कुणाकुणाचे असे म्हणणे असते की, आम्ही एका विशिष्ट कुळात जन्मलो आहोत आणि म्हणून जे अशा कुळात जन्मले नाहीत, त्यांच्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत! भगवान बुद्ध जातिभेदाच्या असल्या कल्पनेचे विरोधक होते. त्याप्रमाणे धर्माच्या गोंडस नावाखाली कपट-कौशल्याने आपलीच तुंबडी भरून घेण्याच्या पुरोहितांच्या स्वार्थी खटाटोपाचेही ते घोर विरोधी होते. त्यांनी स्वत: अशा धर्माचा प्रचार केला की, ज्यात सकामभावाला थाराच नव्हता.
तत्त्वज्ञान व ईश्र्वर या संबंधीची नानाविध मतमतान्तरे घेऊन वादावादी आणि चर्वितचर्वण करीत बसणे त्यांना मुळीच पसंत नव्हते. या बाबतीत ते संपूर्ण अज्ञेयवादी होते. पुष्कळदा अनेक लोक त्यांना ईश्र्वर आहे की नाही, म्हणून विचारीत. त्यावर त्यांचे उत्तर ठरलेलेच असे. ते उत्तर देत - ""यासंबंधी मला काहीच माहिती नाही.'' माणसाचे खरे कर्तव्य काय, अशी पृच्छा केल्यास ते म्हणत की, सच्छील व्हा आणि इतरांचे कल्याण करा.
एकदा पाच ब्राह्मणांनी बुद्धदेवांकडे जाऊन त्यांच्यात आपापसात चाललेला वादविवाद मिटवून देण्याची त्यांना विनंती केली. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, ""भगवन्, माझ्या शास्त्रात ईश्र्वराच्या स्वरूपासंबंधी आणि त्याचा लाभ करून घेण्याच्या उपायासंबंधी ही अशी अशी वचने आहेत.'' दुसरा ब्राह्मण म्हणाला,""अंहं, ती सारी खोटी असली पाहिजेत. कारण माझ्या शास्त्रात ईश्र्वराच्या स्वरूपासंबंधी आणि त्याला मिळविण्याच्या साधनासंबंधी अगदी निराळेच सांगितले आहे.'' याप्रमाणे बाकीचेही आपापल्या आवडीच्या शास्त्रांतून ईश्र्वराचे स्वरूप व त्याच्या प्राप्तीचे उपाय व यासंबधी नाना वचने उद्धृत करू लागले. बुद्धदेवांनी त्या सगळ्यांचे म्हणणे अगदी शांतपणे ऐकून घेतले आणि नंतर एकामागून एक त्यांतील प्रत्येकाला त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला. ते म्हणाले, ""बरे पण तुमच्यापैकी कुणाच्या शास्त्रात असे सांगितले आहे काय की, ईश्र्वर क्रोधी, हिंसापरायण वा अपवित्र आहे?''
पाचही ब्राह्मण एकमुखाने म्हणाले,""नाही भगवन्, सर्वच शास्त्रांचे म्हणणे आहे की, ईश्र्वर शुद्ध आणि शिवस्वरूप आहे.'' त्यावर बुद्धदेव म्हणाले, ""बंधूंनो, मग तुम्ही स्वत: आधी शुद्ध आणि चांगले बनण्याचा का बरे यत्न करीत नाही, की जेणेकरून ईश्र्वर म्हणजे काय वस्तू आहे, हे तुम्हाला आपोआपच कळून येईल.''
अर्थातच मी बुद्धदेवांच्या सर्वच मतांचे समर्थन करीत नाही. तात्त्विक चिंतनाचीच मला स्वत:ला अत्यंत आवश्यकता आहे, असे मला वाटते. कितीतरी बाबतीत माझा बुद्धदेवांशी संपूर्ण मतभेद आहे, पण मतभेद आहे एवढ्यासाठी मी त्यांच्या चारित्र्याचे, त्यांच्या उदात्त उपदेशांचे सौंदर्य लक्षात घेऊ नये असे थोडेच आहे? जगातील सर्व आचार्यांमध्ये बुद्धदेव हे एकटेच असे आहेत, की ज्यांच्या कार्याला बाहेरील कोणताही हेतू प्रेरक नव्हता. इतर महापुरुषांनी व सर्वांनीच आपण ईश्र्वरावतार आहोत अशी घोषणा केलेली आहे आणि ते असेही संगून गेले आहेत की, त्यांच्यावर जो विश्र्वास ठेवील तो स्वर्गी जाईल, मुक्त होईल, पण बुद्धदेवांकडे बघा. मृत्यूच्या अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी काय म्हटले आहे? ते नेहमी हेच म्हणत असत, ""कुणीही तुम्हाला मुक्त होण्यासाठी सहाय्य करू शकणार नाही. स्वत:च स्वत:ला सहाय्य करा, स्वत:च्याच प्रयत्नांनी मुक्तिलाभाची कास धरा!''
स्वत:संबंधी ते म्हणत, ""बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशाप्रमाणे अनंत ज्ञानसंपन्न. मी गौतमाने ती अवस्था प्राप्त करून घेतली आहे. तुम्हीही जर तिच्यासाठी प्राण पणास लावून प्रयत्न कराल, तर तुम्हालाही ती प्राप्त होऊ शकेल?''
ते पूर्ण कामनाशून्य होते. त्यांचे ठायी स्वार्थी हेतूंचा लेशही नव्हता. म्हणून स्वर्गात जाण्याच्या वा ऐश्र्वर्याच्या आकांक्षेचा गंधही त्यांचेठायी नव्हता. यौवनाच्या भर वसंतात, राज्यलक्ष्मीच्या स्नेहल अंकावर लोळत असताना सत्यलाभार्थ सिंहासनावर लाथ मारून आणि सर्व भोग-सुखांवर पाणी सोडून ते भारताच्या रस्त्या-रस्त्यांतून भ्रमण करीत भिक्षावृत्तीने उदरभरण करीत फिरले आणि समुद्रासारख्या आपल्या विशाल हृदयाच्या पवित्र प्रेरणेने, समस्त नर-नारींची व इतर प्राणिमात्रांचे कल्याण व्हावे म्हणून सत्याचा प्रचार करीत त्यांनी सर्वत्र संचार केला. अवघ्या जगामध्ये तेच असे एकमेव महापुरुष आहेत, की ज्यांनी यज्ञातील पशुहत्या थांबविण्यासाठी यज्ञपशूंच्या ऐवजी स्वत:चे जीवन बळी देण्याची तयारी दाखविली.
एकदा ते एका राजाला म्हणाले होते, ""यज्ञात पशूंचा बळी दिल्याने जर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होऊ शकत असेल, तर मानवाचा बळी दिल्याने त्याहीपेक्षा केवढीतरी श्रेष्ठ प्राप्ती होईल यात काय संशय? म्हणून यज्ञवेदीवर माझाच बळी द्या!'' त्यांचे हे म्हणणे ऐकून तो राजा खरोखर अत्यंत विस्मित होऊन गेला आणि लक्षात ठेवा, हे सर्व त्यांनी केले ते कोणताही मतलब पोटात न बाळगता. ते कर्मयोगाचे मूर्तिमंंत उदाहरण होते. त्यांना जी अत्युच्च अवस्था लाभली होती, तिच्यावरून हेच स्पष्ट दिसते की, कर्माच्या जोरावर आपणही आध्यात्मिक जीवनाचा अंतिम टप्पा गाठू शकू.
ईश्र्वरावर विश्र्वास ठेवल्याने पुष्कळांचा साधनामार्ग सुगम होत असतो यात शंका नाही, परंतु बुध्ददेवांच्या जीवनाचे अनुशीलन केल्यास हे स्पष्टपणे प्रतीत होते की, एखाद्याचा ईश्र्वरावर मुळीच विश्र्वास नसला, कोणत्याही विशिष्ट तत्त्वज्ञानाकडे त्याचा ओढा नसला, त्याने कोणत्याही संप्रदायाची कास धरलेली नसली किंवा तो कोणत्याही मंदिरात देवदर्शनार्थ जात नसला, फ़ार काय पण तो जरी बाह्यत: नास्तिक वा जडवादी वाटला तरीही तो ती चरम अवस्था प्राप्त करून घेण्यास समर्थ होऊ शकेल, यात काहीच संदेह नाही.
बुद्धदेवांच्या मतांचे वा कार्याचे मूल्यमापन करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. त्यांच्या अपूर्व हृदयाचा एक लक्षांशही मला लाभता, तर मी स्वत:ला धन्य मानले असते. त्यांचा ईश्र्वरावर विश्र्वास असला काय आणि नसला काय, त्याच्याशी मला काहीच करावयाचे नाही आणि त्याने माझी काही हानीही व्हावयाची नाही, परंतु एवढे मात्र निश्चित की, इतर व्यक्ती योगाच्या, भक्तीच्या वा ज्ञानाच्या साहाय्याने ज्या पूर्णावस्थेचा लाभ करून घेत असतात, तिचा बुद्धदेवांनाही लाभ झालेला होता. यावर किंवा त्यावर नुसता विश्र्वास ठेवीत गेल्याने सिद्धी लाभते असे नव्हे. केवळ तोेंडाने धर्माच्या आणि ईश्र्वराच्या लांबलचक बाता झोकूनही काहीच साधावयाचे नाही. एखादा पोपटही शिकवाल त्याची घडघड उजळणी करून दाखवू शकतो. कर्म निष्कामभावाने करू शकल्यासच सिद्धिलाभ होत असतो.
No comments:
Post a Comment