Tuesday, May 11, 2010

चिनी चक्रव्यूहाचा भेद

जपानने चीनच्या विस्तारवादावर तोडगा म्हणून
भारताशी नव्याने गोत्र जुळविल्याचे वर्तमान आहे.
या नव्या परिस्थितीचा लाभ उठविण्यासाठीच
भारताने अन्दमान निकोबारला अत्याधुनिक
पाणबुड्या व युद्धनौका यांनी सुसज्ज असे
नौदलाचे तळ उभे करण्याचे ठरविले आहे. या
माध्यमातून हिन्दी महासागरातली चीनची
घुसखोरी आटोक्यात आणता येईल ही खात्री
आपल्या नौदलप्रमुखांनी व्यक्तविली आहे.

चीनने तिबेटवर ताबा मिळविला या घटनेला साठ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारताने चीनला या कृतीपासून रोखले असते, तिबेटच्या स्वातंत्र्याची ध्वजा उंच उचलून धरली असती, तर त्यानंतरच्या दशकांमध्ये चीनकडून भारताचे जे अपमान सातत्याने झाले, त्यापासून आपल्या अब्रूचीही राखण करता आली असती. सुरुवातीस आपण "हिन्दी-चिनी भाई भाई' या घोषणेची व पंचशील धोरणाची कबुतरे उडविली, खोट्या भ्रामक मृगजळामागे धावण्यात धन्यता मानली. चीनने मात्र, सरळ सैन्य पाठवून आपला पराभव केला. नंतर काही वर्षे उलटल्यावर आपण पुन्हा चीनशी बोलणी सुरू केली. ही बोलणी करण्यासाठी आपले बडे पुढारी बीजिंगला गेले. चीनच्या राज्यकर्त्यांनी यापैकी प्रत्येकाकडून "तिबेटवर चीनचे निर्भेळ वर्चस्व आहे' या वाक्यावर सह्या घेतल्या. एकदा तिबेटवरचा स्वत:चा हक्क असा मोहोरबंद करून घेतल्यावर चीनने "अरुणाचल सुद्धा चीनचाच हिस्सा आहे' असा सूर आळविण्यास सुरुवात केली. पण आश्चर्य म्हणजे गेल्या वर्षापासूनच नियतीने भारताच्या बाजूने फासे टाकण्यास प्रारंभ केला व या वर्षी तर वेगवेगळ्या कारणांमुळे चीनची कोंडी होतेय्‌ असे चित्र दिसू लागले. म्हणजे एका बाजूने चीन भारताच्या भोवती चक्रव्यूहाचे जाळे विणत आहे, हे सत्य अाहे. पण भारताचे सेनापती दीपक कपूर, निस्संदिग्ध शब्दांत चीनने चालविलेल्या घुसखोरीबद्दल आरोप करून मोकळे झाले आहेत. हिन्दी महासागरात खास करून श्रीलंकेच्या आसपास आपल्या नौदलाने सागरी सीमांच्या रक्षणासाठी प्रभावी पावले उचलली आहेत आणि आपले संरक्षणमंत्री "भारताच्या सैन्याच्या सामर्थ्याची ग्वाही' देऊन मोकळे झाले आहेत. चीनने दलाई लामांच्या अरुणाचल भेटीवर आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्या अरुणाचल दौऱ्यावर आक्षेप घेतले. आपण या आक्षेपांना कस्पटासमान लेखून दोन्ही दौऱ्यांची आखणी केली. अमेरिकेनेही दलाई लामांशी खुलेआम चर्चा करून चीनच्या धमक्यांना धुडकावून लावले. कल्पना करा, भारताने बदलत्या परिस्थितीचा फायदा उठवून हिमतीने आपले सैन्य अद्ययावत केले. सीमांच्या रक्षणासाठी दमदार पावले उचलली, तर सन 1962 च्या पराभवाचे शल्य संपुष्टात येईल. चीनच्या चक्रव्यूहाचा भारताने भेद केला याचा आनंद आपणास साजरा करता येईल.
मुळात चीनने रचलेले चक्रव्यूह समजून घेतले पाहिजे. आपण एकतृतीयांश काश्मीर पाकिस्तानच्या वर्चस्वाखाली राहू दिला. चीनने त्याच भागात आपले तळ रोवले, आपण ब्रह्मदेशाला काही भूदान केले, चीनकडून तिथेही वाटमारी झाली, शेजारच्या बांगला देशातही चीनने घुसखोरी केली. म्हणजे बंगालच्या उपसागरात चीनने मुसंडी मारली आहे. पाकिस्तानच्या ग्वादार बंदरापर्यंत थेट काराकोरमपासून रस्ता बांधून चीनने अरबी समुद्रात पाय रोवले आहेत, तर थेट श्रीलंकेशी संधान साधून हिन्दी महासागरापर्यंत धडक मारण्यात याच चीनने यश मिळविले आहे. तिबेट म्हणजे जगाचे छप्पर. या छपरावर बसून बीजिंग ते ल्हासा आणि उजवीकडे ल्हासा ते काठमांडू असा प्रशस्त महामार्ग चीनने बांधला आहे. परिणामत: चीनचे भूदल व नौदल विनादिक्कत भारताला वळसा घालू शकते, असे वर्तमान आहे! रशिया, मंगोलिया, कझाखस्तान, किरगीझस्तान या देशाबरोबर करारमदार करून चीनने तिकडच्या सीमांवर पकड मिळविली आहे. साहजिकच खुश्कीच्या मार्गाने थेट युरोप गाठता येईल, तर जलमार्गाने पर्शियन आखातात व इराणमधेही घुसता येईल, अशी व्यूहरचना आखण्यात चीन सफल झाला आहे.
पाकिस्तानचा जन्मच भारताच्या द्वेषापोटी झाला. याच पाकिस्तानला सर्वतोपरी सहकार्य देण्यास चीन सदैव सिद्ध आहे. अमेरिकेला अफगाणिस्तानातले तालिबानी उद्योग उद्‌ध्वस्त करायचे आहेत व बिनभरवश्याच्या पाकिस्तानवरच वॉशिंग्टनचे राज्यकर्ते विसंबून राहात आहेत. चीनला "शत्रूचा शत्रू तो मित्र' या सूत्राच्या प्रकाशात भारतविरोधी पाकिस्तान एकदम प्रिय वाटतो. नजीकच्या भविष्यात समजा, अमेरिकेने अफगाण भूमीवरून काढता पाय घेतला, तर पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही राक्षस दिवाळी साजरी करतील. राहू व केतू यांची अभद्र युती भारताच्या सुखात माती मिळवील. चीनचा चक्रव्यूह भीषण आहे, यात शंका नाही.
चीनने भारताच्या परिघावर संकटांचे ढग उत्पन्न केले आहेतच; पण भारताचे तुकडे होतील असे शिव्याशापही दिले आहेत. काश्मीरमधून चीनचा प्रवास करणाऱ्या त्रयस्थ भारतीय नागरिकांना वेगळ्या प्रकारचा व्हिसा देऊन काश्मीर भारतापेक्षा वेगळा आहे, असे सूचित करणारा चीन भारतविरोधी कट कारस्थाने करण्यात व्यग्र आहे. बिचारे जवाहरलाल नेहरू याच चीनला युनायटेड नेशन्समध्ये प्रवेश मिळावा म्हणून जिवाचे रान करीत होते. अँग्लो-अमेरिकन व जपानी साम्राज्यवाद्यांपासून चीनला वाचविले पाहिजे, चिनी क्रान्ती यशस्वी झाली पाहिजे, यासाठीही कटिबद्ध होते. चीनने भारताचा विश्वासघात केला, तरी या विश्वासघातकी कारवायांवर पांघरूण घालीत होते. चीनच्या विरोधात भारतात म्हणे युद्धज्वर उत्पन्न होऊ नये यासाठीच जवाहरलालजींची घालमेल चालली होती. पण शेवटी चीनच्या पापांचा घडा भरला. चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा मात्र जवाहरलालजींच्या रूपातला शांतिदूत संरक्षणसज्ज झाला. या नव्या धोरणामुळेच दलाई लामांना भारतात आश्रय देण्याचा निर्णय झाला. दुर्दैव म्हणजे रणांगणात मात्र चीनकडून आपला पराभव झाला. चीनने भारताच्या भावनांची कधीच कदर केली नाही, उलटपक्षी भारताला शंभर टक्के नामोहरम्‌ करायचे, युनायटेड नेशन्समध्ये प्रवेश मिळाल्यावर जो नकाराधिकार प्राप्त झाला त्याचा आधार घेऊन जगाच्या चावडीवर भारताची सतत कोंडी करायची, अशीच दुष्ट खेळी या कृतघ्न राष्ट्राने नेहमी खेळली.
पण ढगालाही सोनेरी किनार असते याची सुखद प्रचीती नजीकच्या भूतकाळात आपण घेतलीय्‌ व म्हणूनच समाधान आहे. चीनच्या चढेल आगाऊपणावर अंकुश बसविण्यासाठी अमेरिकन अध्यक्षांनी दलाई लामांना सन्मानपूर्वक स्वत:च्या कार्यालयात पाचारण केले व चीनमधल्या लोकशाहीच्या गळचेपीचा निषेध केला. पाठोपाठ तैवानला क्षेपणास्त्रविरोधी अस्त्रे आणि लक्षावधी डॉलर्सच्या किमतीची शस्त्रेही रवाना केली. शिवाय, चीनकडून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर आयात करही लावले. जपानने चीनच्या विस्तारवादावर तोडगा म्हणून भारताशी नव्याने गोत्र जुळविल्याचे वर्तमान आहे. या नव्या परिस्थितीचा लाभ उठविण्यासाठीच भारताने अन्दमान निकोबारला अत्याधुनिक पाणबुड्या व युद्धनौका यांनी सुसज्ज असे नौदलाचे तळ उभे करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून हिन्दी महासागरातली चीनची घुसखोरी आटोक्यात आणता येईल ही खात्री आपल्या नौदलप्रमुखांनी व्यक्तविली आहे.
भारताने स्वसामर्थ्य वाढविण्याचे व निर्धारपूर्वक पावले उचलून चिनी चक्रव्यूह भेदून जाण्याचे ठरविले आहे. अशी ही शुभचिन्हे सुखद आहेत, असेच सच्चा भारतीय म्हणेल!

No comments: