Tuesday, May 11, 2010

अक्षता


पिंजर किंवा केशर लावून रंगविलेल्या अक्षत म्हणजेच अखंड तांदुळांना अक्षता म्हणतात. अक्षतांचे अनेक उपयोग आपल्या धर्मकृत्यांत सांगितले आहेत. अक्षता हे पूजोपचारांतले प्रातिनिधिक द्रव्य आहे. म्हणजे देवपूजेत एखादा उपचार उपलब्ध नसेल, तर त्या ऐवजी देवाला अक्षता वाहतात. महापूजेतील अंगपूजा, आवरणपूजा इ. पूजा अक्षता वाहूनच करतात. विविध कर्मांग देवता, पीठावर देवतेसाठी ठेवलेल्या सुपारीवर अक्षता वाहूनच त्या त्या देवतेचे आवाहन करतात. अक्षता हा पूजेतला एक गौण पण स्वतंत्र असा उपचारही आहे. त्या साठीचा हा मंत्र -
अक्षतास्तंडुला: शुभ्रा: कुंकुमेन विराजिता: ।
मयानिवेदिता भक्त्या गृहाण परमेश्र्वर ।।
कुंकुमाने रंगविलेले शुभ्र तांदूळ म्हणजेच अक्षता मी तुला भक्तीने समर्पण करतो. हे परमेश्र्वरा, त्यांचे ग्रहण (स्वीकार) कर.
लग्न-मुंजीच्या प्रसंगी, वधू-वरांच्या आणि मुंजा मुलांच्या मस्तकावर अक्षता टाकतात. वधू-वरांवर अक्षता टाकण्याचीही चाल पुरातन आहे. अक्षतेतले धान्य सुपीकपणाचे प्रतीक समजले जात असे. वधू-वरांचा विवाह संततीने सुफ़लित व्हावा, हा उद्देश त्यात आहे. याशिवाय धान्याच्या ठिकाणी भूता-खेतांचे निवारण करण्याची शक्ती असल्यामुळे वधू-वरांना भूता-खेतांची दृष्ट लागू नये, म्हणूनही त्यांच्यावर अक्षता टाकतात. लग्नविधीत ""अक्षता रोपण'' हा एक स्वतंत्र विधी आहे.
या मंगल अक्षता तांदूळ, ज्वारी इत्यादी कोणत्याही धान्यांच्या असू शकतात. प्राचीन काळी ग्रीसमध्येही वधू-वरांवर याच कारणासाठी पीठ आणि मिठाई उधळण्याची चाल होती. प्राचीन पर्शियन विवाह समारंभातही तांदुळांना महत्त्वाचे स्थान होते. आजही पारश्यांत लग्न आणि नवज्योत या प्रसंगी अक्षता टाकण्याची चाल आहे. विविध कर्मांमध्ये ब्राह्मण आशीर्वादाचे मंत्र म्हणून यजमानाला मंत्राक्षता देतात. या अक्षता बळ, समृध्दी आणि दीर्घायुष्य देणाऱ्या आहेत.
***

जयंत फडके

No comments: