Tuesday, May 11, 2010

तरुण साधकांचा प्रपंच

गेल्या काही वर्षांत अनेक तरुण साधक मित्रांच्या विवाह समारंभात उपस्थित राहाण्याचा योग आला. अगदी ताजा समारंभ म्हणजे मिलिंदच्या लग्नाचा. कुणी विचारेल मग यात काय झालं? मुलं मोठी होतात आणि गृहस्थामश्रम स्वीकारतात. तुम़च्या मित्रांचे विवाह, यात मुद्दाम सांगण्यासारखं काय आहे येवढं? प्रश्न योग्य आहे, पण अशा मुलांची नावं मला स्मरतात तेव्हा वाटतं की, सभोवार आपण पाहतो तसा सर्वसामान्य चाकोरीतला गृहस्थाश्रम हा नाही.
मकरंद, पंकज, माधव, विजय, शशांक, प्रमोद, दुसरा मकरंद ही नावाची मालिका. या मुलांचं विवाहपूर्व जीवन मी पाहिलेले आहे. नंतरचंही जीवन पाहतो आहे. खरं सांगायचं तर ही मुलं प्रपंचात पडतील असं मला प्रथम वाटलंच नव्हतं. कारण ती "साधक' बनलेली होती. उपासनेच्या मार्गाकडे वळली होती. या सगळ्या मुलांनी आपलं जीवनध्येय निश्चित केलं होतं. आत्मदर्शन आणि अखंड आनंदानुभूती. तसंच परमार्थाचा प्रसार !
ही गोष्ट माझ्या निदर्शनाला आली तेव्हा मला खूप नवल वाटलं होतं. कारण ही मुलं चांगली शिकली-सवरलेली. कुशाग्र बुध्दीची. चांगल्या पगाराच्या नोकऱ्या असलेली, पण याच वयातील आणि असंच शिक्षण वगैरे झालेल्या कितीतरी कमावत्या तरुणांपेक्षा किती वेगळी ! खूप पैसा मिळवावा, उपभोगसाधनं गोळा करावीत. इंद्रीयसुखात डुंबावं, नाटक-सिनेमा-हॉटेलिंग यात आनंद मानावा, अशा प्रवत्तीची तरुण मुलं पदोपदी दिसतात. त्यात कोणाला काही गैर वाटत नाही. न आई-वडिलांना न समाजाला. हेच चांगलं आणि यशस्वी जीवन, अशी त्यांची धारणा. अशा मुलांच्या दोन हाताचे चार हात झाले, घर समृध्द करण्यातच धन्यता त्यांना वाटली, तर ते जगरहाटीला धरूनच ठरते.
उलट, परमार्थाकडे आकृष्ट झालेली, उच्चविद्याविभूषित तरुण मुलं म्हणजे मात्र कुतूहलाचा, टीकाटिप्पणीचा विषय. "ही काय दुर्बुध्दी आठवली तरुणपणीच या मुलांना कोणास ठाऊक !' म्हणून हळहळणारेही असतातच, पण कशाचीही चिंता न करता या मुलांचा कार्यक्रम चालू असतो. पहाटे उठणं, व्यायाम करणं, ध्यानाला बसणं, नामस्मरणात रंगणं, संतसाहित्यात रमणं, स्वामी माधवनाथांच्या सत्संगाला व प्रवचनांना जाणं, स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळाचे उत्सव दृष्ट लागावी अशा देखणेपणानं व कल्पकतेनं पार पाडणं, नित्य अभ्यास विषयावर चिंतन करणं, बस, हाच एक ध्यास. दिवसभराचा सगळा कार्यक्रम रेखीव. कुठे वेळेचा अपव्यय नाही, सुख-साधनांची आसक्ती नाही, हे हवं आणि ते हवं नाही. सवंग करमणूक नाही. भलतं-सलतं खाणंपिणंही नाही.
सात्विक आनंद!
एकदा मी मकरंदला विचारलं, ""इतर तरुणांप्रमाणे मौजमजा करावीशी वाटत नाही तुला? कसलं रुक्ष आणि कळाहीन जीवन अंगिकारलंय तुम्ही तरुण मुलांनी?''
या प्रश्नांवर मकरंद प्रथम केवळ हसला. मला वाटलं तो उत्तराची टाळाटाळ करणार, पण त्यानं तसं केलं नाही. तो म्हणाला, ""बापूसाहेब, ज्या प्रकारचं जीवन आम्ही स्वीकारलं आहे, ते नियमबाह्य असेल, संयमित असेल, आमच्याच वयाच्या इतर बहुतेक तरुणांना नाकं मुरडण्यासारखं वाटत असेल, पण आम्हाला त्यापासून सुख वा आनंद लाभत नाही, हा मात्र सर्वस्वी चुकीचा समज आहे. आम्ही ध्यानास बसतो, नाम घेतो, सत्संगाला उपस्थित असतो, प्रवचनं ऐकतो, पाद्यपूजेच्या सोहळ्यात भाग घेतो आणि हे करीत असताना आमचा प्रत्येक क्षण दिव्य आनंदाचाच असतो. राजस आणि तामस स्वरूपाचा नव्हे, तर सात्विक आनंद आम्ही लुटत असतो. उपभोग्य वस्तूंकडे म्हणजे विषयाकडे मनाची धाव नसल्यामुळे मन पुष्कळ शांत राहते, हलके राहते व समाधान लाभते.''
सुमारे 22-23 वर्षांचा एक तरुण मुलगा मला हे सांगत होता. एक श्रेष्ठ प्रतीचा, दिवसाचे 24 ही तास चित्त व्यापून टाकणारा आनंद लाभतो, हे अगदी सहज बोलत होता. आपल्या मार्गदर्शक सद्‌गुरूंसंबंधी अपार श्रद्धेचा, अकृत्रिम आविष्कार तो करीत होता. त्याचवेळी मी मकरंदला विचारलं होतं, ""लग्नबिग्न करायचा विचार आहे का तुझा?'' ""अद्याप त्या बाबतीत मी काही ठरवलं नाही बापूसाहेब. आजच ठरवलं पाहिजे असंही नाही. पू. स्वामींच्या मार्गदर्शनानुसार अभ्यास करणं हेच सध्यातरी करायचं आहे. लग्न करणं किंवा न करणं यापैकी कोणताही पर्याय मी पुढे स्वीकारू शकेन. त्यामुळे जीवनात मोठे अंतर पडतं, असंही मला वाटत नाही.''
काय कारण असेल ते असो, पण या मुलांनी प्रपंचात पडण्याचा निर्णय केला. मकरंद त्याच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी जेव्हा मला भेटला, तेव्हा मी त्याला विचारलं, ""मकरंद, आता जीवनाचा नवा अध्याय सुरू होईल तुझ्या. आजवर एकचित्त होऊन परमार्थ साधना करता आली तुला. इत:पर वेगळी दिशा मिळेल तुझ्या दिनक्रमाला. साधक मित्रांचा सहवास, ध्यानधारणा, सद्‌गं्रथांचे वाचन, ध्यानकेंद्राची कामं इत्यादीसाठी वेळ कसा मिळणार तुला? तुझ्या पत्नीच्याही अपेक्षा राहतील. तुझ्या फावल्या वेळाचा वाटा तिलाही द्यावाच लागेल.''
मी विचारले ते मकरंदची परीक्षा पाहण्यासाठी नव्हे. मला त्यावेळी खरंच असं वाटत होतं की, एका म्यानात दोन तलवारी राहाणार कशा? प्रपंच आणि परमार्थ यांचं घनिष्ट साहचर्य या तरुण मुलाला साधणार कसं? यांची मानसिक ओढाताण तर होणार नाही? मकरंदची गुरुनिष्ठा अत्यंत उत्कट. परमार्थाची त्याची ओढ जबरदस्त. ध्यानाला बसला की त्याचा देहभाव हरपून जायचा. पुरता रंगला होता तो या मार्गात. आता संसारात पडल्यावर कोठल्या संघर्षाला तोंड द्यावे लागेल या मुलाला? म्हणूनच मी त्याला ही पृच्छा केली होती. हा विवाह न करता अधिक आनंदात राहिला असता, असं माझ्या अंत:करणात खोलवर कुठंतरी वाटत होतं.
परमार्थी भूमिका
माझ्या प्रश्नाचा सगळा आशय मकरंदच्या ध्यानात आला असावा. प्रश्नाचं गांभीर्य जाणूनच त्यानं मला सविस्तर उत्तर दिलं. जणू काही आपल्या सगळ्या तरुण साधक मित्रांचा प्रतिनिधी या नात्यानं. त्याचं हे उत्तर तीन-चार वर्षांपूर्वीचं, पण माझ्या ध्यानात पक्के राहून गेलेले. त्यानंतर मकरंदच्या साधक मित्रांचेही विवाह झाले. त्यांच्यापैकी कोणालाही विचारलं असतं तरी मकरंदनं सांगितलं तेच त्यांनी सांगितलं असतं, यात मला मुळीच शंका नाही. मिलिंदच्या लग्नाला 8 दिवसांपूर्वी गेलो तेव्हा या जुन्या संभाषणाचं स्मरण मला झालं. मकरंदला जे मी विचारलं, ते या मुलांपैकी कोणालाही पुन्हा विचारलं नाही. विचारण्याची गरजच नव्हती.
मकरंदशी झालेल्या प्रश्नोत्तरातून त्याची जी भूमिका मला कळली, ती केव्हातरी सर्वच तरुण मित्रांपुढे यावी असं मला वाटतं. म्हणून मकरंदाचं म्हणणं जरा विस्तारानं नमूद करीत आहे. मकरंद म्हणाला, ""माझ्या अनेक हितचिंतकांनी तुमच्याप्रमाणेच प्रश्न विचारला, मला वाटतं दोन गोष्टी स्पष्ट करून टाकणं बरं. पहिली गोष्ट ही की श्री स्वामींच्या संमतीने आणि त्यांचा शुभाशीर्वाद घेऊनच हे पाऊल मी उचललं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सभोवार लोक कशा प्रकारचे जीवन सुखकारक मानतात, यासंबधी मीही काही विचार केला आहे. माझे सद्‌गुरू हे स्वत: प्रापंचिक आहेत, त्यांचा प्रपंच मी जवळून पाहिला आहे. आंधळेपणाने गतानुगतिक म्हणून मी काही करतो आहे, अशातला भाग नाही. प्रपंचाचं स्वरूप मला कळलेलं आहे. त्या प्रपंचात परमार्थ कसा भरावा याचं साक्षात्‌ उदाहरण माझ्या दृष्टीपुढं आहे. मी प्रवाहपतित होईन, असं मला वाटत नाही.''
एका तरूण मुलाच्या मुखातून निघणारे, सध्याच्या भोगप्रवण वातावरणात सहसा कानी न येणारे केवढे हे आत्मनिर्भराचे शब्द ! अन्‌ मग मकरंदनं प्रपंचाचं त्याला कळलेलं स्वरूप मला ऐकविलं. तो म्हणाला, ""मी ऐकले, वाचले आणि पाहिले त्यावरून कोणत्या मर्यादेत प्रपंच करावयाचा यासंबंधीच्या कल्पना स्पष्ट झाल्या. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही स्वीकारलेला साधनेचा मार्ग आणि घरगृहस्थीचा तथाकथित व्याप यात मूलत: विरोध मानण्याचे कारण नाही. उलट परमार्थ नसलेला पसारा नि:सार होय. खाणेपिणे, उपभोग घेणे इत्यादी गोष्टींपुरतेच जीवन सीमित राहिले तर ते मनुष्यजीवन नव्हे. मनुष्यजन्म मिळाल्यानंतर आत्मदर्शनाच्या साधनेने त्याचे सार्थक करावयास पाहिजे. बुद्धीचा निश्चय आहे. संतांचा हा निर्णायक सांगावा आहे.
आता दुसरी गोष्ट : प्रपंच अशाश्र्वत आहे. मी किंवा माझी भावी पत्नी, आमचे सारे आप्त यापैकी कोणाच्या देहाची शाश्र्वती आहे? ही अशाश्र्वतता गृहीत धरून मी प्रपंचात पाऊल टाकणार आहे. तसेच मला हेही ठाऊक आहे की बरे वाईट माझ्यावर येणारच. तेव्हा या सर्व प्रसंगात चित्त प्रसन्न राखण्याचा अभ्यास करणे, त्यासाठी शाश्र्वत वस्तूचा बोध अंत:करणात मुरविणं हा परमार्थाचा भाग आहे, हेच सार आहे. माझे प्रत्येक कर्म जर भगवंतापीत्यर्थ झाले तर संसारही तसाच होईल.
तिसरी गोष्ट : घरादाराचा व्याप अवघड होऊन बसतो. तो "मी-माझे' या अहंकाराने व वासना आणि गरजा यांना आळा न घातल्याने. ही वखवख जर मला नसेल तर अमुक गोष्ट नाही म्हणून मी रडणार नाही किंवा वैभव लाभले म्हणून नाचणार नाही. उपभोगाच्या स्पर्धेत मी उतरणारच नाही. परमार्थ प्रयत्नपूर्वक करावयाचा व प्रपंचात जे वाट्याला येईल त्यात समाधान मानावयाचे, हीच सार्थ जीवन जगण्याची खरी पध्दती आहे.''
लोकांतील गैरसमज
मला हे सगळेच मोठे अवघड वाटत होते. मकरंद मात्र अगदी सहजपणे बोलत होता. मी माझे समाधान व्हावे म्हणून त्याला आणखी एकच प्रश्न विचारला. माझा प्रश्न असा : ""संसार जर सारहीन आहे व परमार्थ जर जीवनाला सारभूत आहे, तर त्या प्रपंचाचा व्याप मागे लावून घेतोस कशाला? सद्‌गुरूंनी खरे तर तुझ्यासारख्या साधकाला या मार्गाने जाऊच द्यावयास नको होते. श्रीरामकृष्ण परमहंसांनी नाही का आपल्या तरुण शिष्यांना संन्यासदीक्षा घ्यावयास लावली?''
पण याही प्रश्नाचं उत्तर मकरंदने सहजपणे देऊन टाकले. तो म्हणाला, ""सध्याचा काळ जरा लक्षात घेतला पाहिजे आणि जे जीवनध्येय माझ्यापुढे स्थिर झाले आहे, त्याचाही संदर्भ ध्यानात ठेवला पाहिजे. सध्या परमार्थ व प्रपंच या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि परमार्थ ही उत्तरायुष्यात केव्हातरी सवडीने करावयाची गोष्ट आहे, असा समज बळावलेला दिसतो. तरुणपणी तर परमार्थाचा वाराही नकोसा वाटतो. हा अपसमज दूर झाला पाहिजे आणि प्रपंचच परमार्थरूप करता येतो, हा विश्र्वास बळावला पाहिजे. असा परमार्थरूप प्रपंच धन्य आणि आनंदमय ठरतो, हे लोकांना प्रत्यक्ष पाहता आले पाहिजे. कोणी अविवाहीत व एकांतात राहून परमार्थी झाला, तर "छे, हा मार्ग आपल्यासाठी नव्हे' असे म्हणून तरुण मंडळी चटकन्‌ मोकळी होतात. आम्हाला स्वत:चा उद्धार तर करून घ्यायचाच आहे, पण परमार्थाचे शुद्ध स्वरूपात पुनरुज्जीवन करण्याचे दायित्व देखील साधक या नात्याने आमच्यावर आहे, असे आम्ही मानतो. श्री सद्‌गुरू स्वामी समर्थांची एक ओवी वारंवार सांगतात -
आत्मज्ञान जीर्ण जर्जर ।
त्याचा करी जीर्णोद्धार ।
विवेके पावे पैलपार ।
या नाव साधक ।।
"परमार्थासी माजविले । विरवित बळे' असेही समर्थांनी म्हटले आहे. या दायित्वाचा स्वीकार करून जीवन आम्हाला जगायचे आहे. जे पाच-दहा टक्के सात्विक प्रवृत्तीचे लोक समाजात असतील, त्यांच्याद्वारे आध्यात्मिक पुनरुत्थान घडवून आणायचे आहे. या पुनरुत्थानामागोमाग आपले भौतिक जीवनही उजळून निघेल, असा आमचा विश्र्वास आहे.''
कृतार्थ जीवनाचा वस्तुपाठ
अशा स्वरूपाची चर्चा कधी विस्मरणात जात नाही. मकरंदचा आणि त्याच्या अनेक साधक मित्रांचा विवाह झाला. सर्वसामान्यांप्रमाणेच तेही गृहस्थी बनले. ज्यांचे ज्यांचे साधकावस्थेत विवाह झाले, त्यांचे जीवन मी पाहतो आहे. या मुलांपैकी कोणामध्येही आसक्ती, वखवख, साधनेतील टाळाटाळ मला अद्याप तरी दिसलेली नाही. पतिपत्नी दोघांचाही मार्ग एकच. मुलांनी निवड योग्य अशीच केलेली आहे. परवा मिलिंदच्या लग्नाच्या वेळी स्वामी मोठ्या कौतुकाने म्हणाले, ""ही मुले अशी आहेत की, लग्नाच्या दिवशी देखील त्यांच्या नित्यसाधनेत खंड पडलेला नाही. उगाच आपण प्रपंचाचा बाऊ करीत असतो. परमार्थावरील पकड घट्ट असली की प्रपंचाच्या मर्यादा कळतात व आपल्या बोधाचा जो आनंद आहे, तो बाधित होत नाही. केवळ भोगाधीन जीवन हे पशुजीवन होय. परमार्थी साधकाला आपली कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय अशी कर्तव्ये उत्तमप्रकारे पार पाडता येतात, हे आपल्या जीवनानेच आपल्याला दाखवून द्यावे लागेल.''
प्रपंच आणि परमार्थ यांच्या अन्योन संबंधाची व जीवन कृतार्थ करण्यासाठी लागणाऱ्या गुणवत्तेची अशी नवीन जाण या मुलांच्या विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने मला लाभत गेली आहे. म्हणूनच, या मुलांच्या भावी कर्तृत्वासंबंधी काही आगळीच स्वप्ने मला पडतात. ती साकार झालेली पाहण्यास मी असलो काय आणि नसलो काय, त्याचं महत्त्व मला वाटत नाही.
***

No comments: