Thursday, December 31, 2015

एका हातात बॉम्ब दुसर्‍या हातात गीता

''आम्हाला वारंवार एक प्रश्‍न विचारला जातो आणि तो अनेक दशके विचारला गेलेला आहे की, भारताने गेल्या हजारो वर्षांच्या वाटचालीमध्ये आपला भूभाग विस्तारित का केलेला नाही किंवा जगामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा  प्रयत्न का केला नाही ? त्याचे उत्तर आपण देऊ शकत नसलो तरी काही नामवंत अभ्यासकांनी ते दिलेले आहे. भारतीयांच्या विस्तार न करण्याच्या प्रवृत्तीमागे त्याची मानसिकता दडलेली आहे. त्याचे स्पष्टीकरण करताना हे विद्वान लोक भारतीयांची सहिष्णुता, बेशिस्त, कोणाचाही बदला न घेण्याची किंवा सूड न घेण्याची भावना, परकीयांना आपल्यात सामावून घेण्याची लवचिकता आणि आक्रमणापेक्षा स्वसंरक्षणाला महत्त्व देण्याची प्रवृत्ती याकडेे बोट दाखवतात.''
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी सहलेखक एस. वाय. राजन यांच्या सहकार्याने 1998 साली लिहिलेल्या ‘इंडिया व्हिजन 2020 - अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ या पुस्तकात वरील प्रतिपादन केलेले आहे. डॉ. कलाम यांनी या पुस्तकात हा विषय फार सखोलपणे मांडलेला आहे.
भारतीयांच्या या सार्‍या  मनोवृत्तीचे मूळ त्यांच्या गोंधळलेल्या मनःस्थितीत असते आणि ही गोंधळलेली मनःस्थिती ही आपली राष्ट्रीय प्रवृत्ती आहे. युध्दाचा त्याग करणारा राजा अशोक हा आपल्या देशातल्या जनतेचा आदर्श राजा झाला तेव्हापासूनची अनेक शतके भारतीयांच्या मनःस्थितीला हा संभ्रम वेढून राहिलेला आहे.


डॉ. अब्दुल कलाम हे मोठे लोकप्रिय होते. त्यांना त्यांचे लाखो चाहते जनतेचा राष्ट्रपती म्हणत असत. शिवाय आदर्श शिक्षक, वैज्ञानिक, दूरदृष्टीचा विचारवंत आणि राष्ट्रभक्त अशा अनेक विशेषणांनी त्यांना गौरवले जात होते. अर्थात ही सारी विशेषणे डॉ. कलाम यांना चपखल लागू होत होतीच. पण ते त्याही पलीकडे काहीतरी होते.  त्यांच्या एका हातात अणूबाँब आणि क्षेपणास्त्रे होती आणि दुसर्‍या हातात वीणा आणि भगवद्गीता होती. त्यांच्या या व्यापक आवाक्यामुळे त्यांना एक राष्ट्रवादी विचारवंत असे स्थान प्राप्त झाले होते. त्यांनी फार सखोलपणे आत्मपरीक्षण केलेले होते आणि देशासमोर काही चिकित्सक प्रश्‍न उपस्थित केले होते. आपण आपल्या इतिहासापासून जे काही शिकलो आणि जे काही शिकलो नाही किंवा जे शिकण्यास आपण नकार देत आहोत त्या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या या मांडणीत पडलेले दिसते.
भारतीयांच्या या मनोवृत्तीचे अनेक पैलू डॉ. कलाम यांनी चर्चिले आहेत. आपण विस्ताराला नकार दिला त्यामुळे आपला भूगोल संकुचित झाला. आमच्यात शिस्त नव्हती.  त्यामुळे आमची सहिष्णुता हा उदारतेचा पोकळ देखावाच ठरला. आपण परकीयांना आपलेसे केले एवढेच नव्हे तर त्यांच्याशी रक्ताचे नातेही निर्माण केले परंतु त्यामुळे आपण विभाजित झालो. आपण साहसाला नकार दिला आणि अतिक्रमणा- पेक्षाही  स्वसंरक्षणाला प्राधान्य दिले. त्यामुळे आपण आक्रमकांचे गुलाम झालो. आपण बळी ठरलो. डॉ. कलाम यांचे हे प्रतिपादन किती खरे आहे हे आपण जाणतोच. त्यांनी दाखवलेले आपले दुुर्गुण केवळ जुन्या काळातच होते असे  नाही तर ते अजूनही आपल्यात आहेत. त्यांनी हे पुस्तक 1998 साली लिहिले परंतु त्यांनी दाखवलेल्या या कमतरता कमी व्हाव्यात या दृष्टीने आपण अजूनही शिक्षणात काही बदल केलेले नाहीत आणि आपल्या राष्ट्रीय वृत्तीतही काही सुधारणा झालेल्या नाहीत. त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेले भारताचे स्वरूप आपण गौरविले त्याबद्दल डॉ. कलाम यांना मोठा मान दिला. परंतु त्यांनी जे काही सांगितले त्याच्यावर मात्र आपण लक्ष केंद्रित केलेले नाही. त्यांच्यावर आपण स्तुती आणि प्रशंसेचा वर्षाव करीत असतो पण त्यांनी काय सांगितले आहे याचा विचार करीत नाही. त्यांचे आत्मपरीक्षण हा आपल्या सर्वांच्या चिंतनाचा विषय असला पाहिजे. सरकार, माध्यमे, समाजातले प्रस्थापित वर्ग आणि विचारवंत या सर्वांच्याच चिंतनाचा तो आधार झाला पाहिजे. डॉ. कलाम यांनी पाहिलेल्या स्वप्नाच्या दृष्टीने वाटचाल करता येईल पण त्यांच्या या चिंतनावर आपण काही विचार केला नाही तर या वाटचालीला सुरूवात करता येणार नाही. अजूनही  वेळ गेलेली नाही. आपण असे चिंतन करणे हीही डॉ. कलाम यांना श्रद्धांजली ठरेल.
डॉ. कलाम यांचे अणूबाँब आणि क्षेेपणास्त्रे यांनी भारताला  जगाच्या राजकीय आणि भौगोलिक नकाशावर व्यूहात्मकदृष्ट्या मोक्याच्या जागी आणून ठेवले आहे हे नि:संशय आहे. याचे विवेचन राजीव शिक्री यांनी केले आहे. शिक्री हे  भारताचे माजी परराष्ट्र सचिव आहेत. त्यांनी, चॅलेंजेस अँड स्ट्रॅटेजी : इंडियाज फॉरेन पॉलिसी हे पुस्तक लिहिले आहे.  या पुस्तकात ते म्हणतात, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी  1950 च्या दरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यात मैत्रीचे संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून प्रयत्न केले पण ते यशस्वी  झाले नाहीत. या दोन देशांत नंतरची 50 वर्षेही दुरावाच राहिला. नंतर शिक्री म्हणतात, असे असले तरीही 1998 साली भारताने अणुचाचण्या घेतल्यानंतर मात्र या संबंधात मोठा बदल झाला. अमेरिकेने भारताची दखल घ्यायला सुरूवात केली. केवळ भारतच नाही तर सगळ्या दक्षिण आशियाचा राजकीय आणि भौगोलिक तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेही विचार करायला अमेरिकेला भारताच्या अणुचाचण्यांनी भाग पाडले. याच काळात भारताचा अर्थिकदृष्ट्याही विकास होत होता आणि अमेरिकेत स्थायिक असलेल्या मूळ भारतीयांचा तिथल्या राजकारणातला प्रभाव वाढत चालला होता. याही दोन घटकांनी अमेरिकेच्या नजरेत भारताचे महत्त्व वाढत चालले.
   पाश्‍चात्य जग कशाला महत्त्व देत असते हे कलाम  यांनी बाँबने दाखवून दिले. अणूबाँब आणि आण्विक शस्त्रे ही खरे तर भीतिदायक असतात. जेव्हा पहिला अणुस्फोट झाला तेव्हा त्या चाचणीचा प्रमुख असलेला शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट ओपनहायमर याने केलेले वर्णन तर फारच भीतीदायक होते. ओपनहायमर हा भारतीय अध्यात्म शास्त्राचा मोठा भोक्ता होता. त्याने ते दृश्य पाहिल्यावर त्याला गीतेतला  अकरावा अध्याय आठवला. तो म्हणाला, ‘एक हजार सूर्यांचा  एकदम स्फोट झाला तर आकाशात जे दृश्य दिसेल ते माझे स्वरूप होय. मीच मृत्यू आहे. या जगाला मी उद्ध्वस्तही करू शकतो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विराट रुप दाखवले. तेव्हा काढलेले हे उद्गार आज अणुचाचणीचे हे रुप बघितल्यावर मला आठवत आहेत.’
याच अर्थाचे प्रतिपादन एका हातात गीता घेतलेल्या डॉ. कलाम यांनी 1998 साली झालेल्या अणुचाचणीनंतर बोलताना केले होते. ते म्हणाले होते, ‘मी माझ्या पायाखालची भूमी प्रचंड हादर्‍यांनी हादरताना ऐकली आणि त्यातून प्रचंड भयकारी भास आम्हाला झाला. मात्र ते दृश्य माझ्यादृष्टीने  अभिमानाचेसुध्दा होते. कारण ती भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाने घेतलेली झेप होती.’
खरे म्हणजे सामर्थ्य धोकादायक असते. परंतु सामर्थ्याशिवाय जगणे त्यापेक्षा अधिक धोकादायक असते. भारताची परिस्थिती अशीच होती. बुध्द, शंकराचार्य आणि महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान लाभलेला हा देश जगातला एक मोठा देश आहे. या जगाच्या लोकसंख्येच्या एक षष्ठांश लोकसंख्या केवळ या देशाची आहे. या देशाने कोणावर कधी आक्रमण केलेले नाही. परकीयांना आपल्यात सामावून घेतले आहे. तेवढी लवचिकता दाखवली आहे. परंतु भारताकडे सामर्थ्य नसल्यामुळे भारताच्या या सद्गुणाचा कधीच कोणी आदर केला नाही. उलट त्याची कुचेष्टा केली गेली. या ठिकाणी चीनचे उदाहरण घेण्यासारखे आहे. 1970 च्या दशकामध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री हेन्री किसींजर हे चीनमध्ये चकरा मारत होते. हुकूमशाही राजवट असलेल्या  चीनच्या सत्ताधार्‍यांची भेट घेण्यासाठी ताटकळत उभे राहत होते. खरे म्हणजे त्यावेळी चीन काही श्रीमंत नव्हता. चीनमध्ये  दरसाल 3 कोटी लोक उपासमारीने मरत होते. मात्र या गरीब असलेल्या चीनच्या राज्यकर्त्यांची भेट अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्याला आवश्यक वाटत होती कारण चीन उपाशी असला तरी त्याच्या शस्त्राच्या साठ्यात शेकडो अणूबाँब होते. जग सामर्थ्याची कशी बूज राखते याचे हे एक उदाहरण होय. या उदाहरणाने भारताला बरेच काही शिकवले. महात्मा गांधींच्या या देशात दरदहा माणसांमागे आठ हिंदू आहेत. ज्यांचे वर्णन महात्मा गांधींनी या पृथ्वीतलावरील सर्वात सभ्य लोक असे केलेले आहे. या देशाला सामर्थ्याचे महत्त्व कळायला लागले ते त्याच्या अणुचाचण्यांमुळे.
पोखरणच्या अणुचाचण्यांमुळे भारताचे महत्त्व सर्वांना कळले आणि ते नंतरच्या काही वर्षात वाढत गेले. अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संघटनेने 2012 साली आपल्या सरकारला सादर केलेल्या एका अहवालामध्ये भारत हा देश 2030 सालपर्यंत अमेरिका आणि चीन यांच्या बरोबरीची महासत्ता बनेल असे नमूद करण्यात आले होते. खरे म्हणजे डॉ. कलाम यांचा अणूबाँब आणि क्षेपणास्त्राचा कार्यक्रम हा काही महाशक्ती बनण्यासाठी आखलेला नव्हता आणि भारत त्या अर्थाने महासत्ता होईल की नाही अशी शंका मनात येते. तसा तर जपान हा श्रीमंत देश होता. त्याची मालमत्ता कित्येक अब्ज डॉलर्स एवढी होती. मात्र एवढी श्रीमंती असूनसुध्दा जपान त्या अर्थाने महाशक्ती झाला नाही. याचा अर्थ महाशक्ती होणे हे केवळ आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नसून लष्करी सामर्थ्यावरही अवलंबून आहे असा होतो. पण जो देश केवळ आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होतो आणि लष्करी सिध्दतेकडे दुर्लक्ष करतो त्याच्यावर आक्रमणे होण्याची शक्यता असते. भारताच्या बाबतीत हेच घडले. अँगस मॅडिसन या अभ्यासकाने तेल उत्पादक देशांच्या संघटनेसाठी केलेल्या एका अभ्यासामध्ये असे दाखवून देण्यात आले आहे की 1700 वर्षांच्या इतिहासात अलीकडचा काही काळ वगळता भारत हा जगातली
मोठी आर्थिक शक्ती होता. एवढा श्रीमंत असूनही भारतावर अतिक्रमणे झाली आणि क्रौर्याची परिसिमा गाठणार्‍या आक्रमकांनी भारतीयांना जिंकून घेतले. आपण पराभूत झालो कारण संपत्तीबरोबरच सामर्थ्याचेही संपादन केले पाहिजे. याचे भान आपल्याला नव्हते. उलट आपण लष्कर, सामर्थ्य, युध्दे या गोष्टी असंस्कृतपणाच्या मानल्या.
सामर्थ्याविषयीचा आपल्या मनातला संभ्रम आणि लष्करी शक्तीविषयीचा आपला दुःस्वास हा राजा अशोकापासून सुरू झाला. कलिंगाच्या युध्दामध्ये राजा अशोकाने प्रचंड रक्तपात पाहिला आणि त्याच्या मनामध्ये   युध्दाविषयी तिडिक निर्माण झाली. शेवटी युध्दे करायची कशाला असा प्रश्‍नच त्याच्या मनात दाटून आला. अशीच अवस्था महाभारताच्या युध्दात अर्जुनाची झाली होती. परंतु या दोघातला फरक असा की अर्जुनाच्या मनात युध्दापूर्वी संभ्रम निर्माण झाला होता आणि अशोकाच्या मनात युध्दानंतर संभ्रम निर्माण झाला. अर्जुनाच्या मनातला संभ्रम श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश करून संपवला आणि अर्जुनाला युध्दास प्रवृत्त केले. अशोकाला मात्र कोणी त्याच्या मनातला संभ्रम दूर करणारा श्रीकृष्ण भेटला नाही आणि त्यामुळे आपल्या देशाला व्यापून राहणारा संभ्रम कायम राहिला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्याला या संभ्रमाचाच अभिमान वाटायला लागला. त्याची किंमत आपण चुकती केली.
डॉ. कलाम यांच्या पोखरण अणुचाचणीने हा संभ्रम दूर झाला आहे आणि त्यामुळेच भारत देश
महाशक्ती बनण्याकडे वाटचाल करत आहे. ही प्रक्रिया आपल्या देशातल्या विचारवंतांच्या लक्षात अजून आलेली नाही. मात्र 30 मार्च 2013 च्या द इकॉनॉमिस्ट या मासिकाने या प्रक्रियेचे विश्‍लेकषण केले आहे. या मासिकाच्या संपादकीय लेखात भारत महाशक्ती होईल का हा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे आणि एक मार्मिक प्रश्‍न विचारलेला आहे. ‘भारत महाशक्ती होऊ शकतो परंतु भारताला महाशक्ती होण्याची इच्छा आहे का, हा प्रश्‍न
महत्त्वाचा आहे.’ राष्ट्रवादी विचारवंत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी याचे उत्तर दिलेले आहे. भारत
महाशक्ती होऊ इच्छितो असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे तर भारताच्या 125 कोटी जनतेने एका आवाजात, होय, आम्ही महाशक्ती होऊ इच्छितो, असे म्हणावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. अशा प्रकारचे
सामर्थ्याच्या महत्त्वाचे धडे गिरवण्याच्या दृष्टीने भारताच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणे हीच डॉ. अब्दुल कलाम यांना खरी श्रध्दांजली ठरणार आहे.
(लेखक हे आर्थिक आणि राजकीय विश्‍लेषक आहेत.)
vivekvichar.vkendra.org 
विवेक विचार, डिसेंबर २०१५

No comments: