कालगणनेनुसार 9 मे रोजी त्यांना जन्मून 150 वर्षे होत आहेत. हे पूर्ण
वर्ष त्यांची जन्म-सार्धशत वर्ष म्हणून साजरे होतेय. रवींद्रनाथांचे नाव
माहीत नसलेली व्यक्ती विरळाच. भारतातील प्रादेशिक साहित्यामध्ये
रवींद्रांचे नाव सर्वात प्रथम घ्यावे लागेल. प्रत्येक भारतीयाच्या तोंडी
हे नाव पोहोचलं ते त्यांच्या "जन-गण-मन' या राष्ट्रगीतामुळे. भारत आणि
बांगलादेश या दोन स्वतंत्र राष्ट्रांमध्ये यांचेच राष्ट्रगीत गायले जाते,
हे एक याचे वैशिष्ट्य आहे. त्यांना "कविगुरू' किंवा "विश्वकवि' असेही
म्हणतात. नोबेल पुरस्कार मिळविलेले हे पहिले भारतीय. जाज्वल्य
राष्ट्रभक्तीमुळे त्यांना मिळालेल्या "सर' आणि "नाईट' - या उपाधि त्यांनी
परत केल्या होत्या.
आपल्या देशात अनेक वर्षांपासून महिला राजकारणात असूनही महिला-बील हा शब्द
मात्र आत्ता समोर आला आणि वृत्तपत्रांमध्ये महिलांबद्दल भरभरून लिहून
यायला लागले. याच दृष्टीने रवींद्रनाथांच्या दृष्टिकोनातून "ती' याचा
विचार करण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे.
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी लेखनाला सुरुवात केली. त्यांच्यात
उपजतच एक भावुकता होती. जी साधारणपणे स्त्रियांमध्ये आढळते. बंगालला
निसर्गानेच भरभरून दिलेले आहे. तिथल्या संस्कृतप्रचूर भाषेतही ही
संपन्नता दिसून येते. संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होतेच, हे
त्यांच्या केवळ एका राष्ट्रगीतातूनही दिसून येते, पण त्यांच्या काव्यात
कठेार वर्णांचा उच्चार कमी होता. संपूर्ण राष्ट्रासाठी गीत लिहायचे असेल,
तर संस्कृतभाषाच सगळ्यात सोयीची असे त्यांनाही वाटले. त्याकाळी प्रत्येक
भाषाप्रभूचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते, हे आपण सगळे जाणतोच.
80 वर्षांच्या आयुष्यात रवींद्रनाथांनी भरभरून लेखन केले. त्यातील
अधिकाधिक भाग स्त्रीकेंद्रित आहे. त्यांच्या काव्यसंग्रहांची केवळ
नावेसुद्धा त्यासाठी पुरेशी आहेत. चैताली, पलातका, चित्रा, मानसी, बलाका,
प्रकृति, पूजा, गीतांजली, सॅंजुति, खिया इ. अनेक त्यांच्या बऱ्याच
साहित्यात स्त्रियांचे प्रश्न समाजासमोर मांडलेले आहेत. त्यातील "चौखेर
बाली' ही साधारण सर्वांना माहीत असलेली कादंबरी. उघड्यावर असलेली स्त्री
ही कशी सगळ्यांची संपत्ती मानली जाते, हे यात मांडलेले आहे.
रवींद्रनाथ घरचे तसे संपन्न, सुस्थितीतले, सुसंस्कृत घराण्यातले, दिसायला
सुंदर आणि सौंदर्याचे पुजारी होते. "चित्रांगदा' हे त्यांचे सर्वांगसुंदर
नृत्यनाट्य. चित्रांगदा मणिपूरची राजकन्या असते. तिच्या वडिलांना
शिवाकडून त्यांच्या वंशात मुलगी होणार नाही, असा वर मिळालेला असतो. तरीही
ती जन्माला येते. ती म्हणजे मी शिवाच्या वराचा भेद करून मुलगी म्हणूनच
जन्माला आली, पण तिचे संगोपन मुलाप्रमाणेच केले गेले. दिसायलाही ती
साधारणच होती, पण एकदा पर्वतीय प्रदेशात जाणाऱ्या अर्जुनाला पाहून
त्याच्या प्रेमात पडली, पण तिच्या सामान्य रूपामुळे अर्जुन काही बघत
नाही. त्यामुळे ती अपमानित होते. मदनाकडे प्रार्थना करते. एका वर्षासाठी
सुंदर बनव असे म्हणते. ती सुंदर झाल्यावर मात्र दोघांचे मिलन होते, पण
तिच्या मनात खंत असते ती ही की याने फक्त माझ्या बाह्यरूपाला स्वीकारलं
आहे. खरं तर मी जशी आहे तशीच त्याने मला स्वीकारलं पाहिजे. म्हणून ती
पुन: मदनाला शेवटच्या दिवशी प्रार्थना करते की, माझं रूप परत घे.
अर्जुनाला सांगते, "मी एक स्त्री आहे. देवी नाही, पण मी चारचौघींसारखी
सामान्य स्त्रीही नाही. तुम्ही माझी पूजा करून मस्तकी बसवावं हे मला नकोच
आहे. पण अवहेलना करून बाजूला करणेही मला नको आहे. शेवटी ती म्हणते जर तू
मला आपल्या बाजूला ठेवून सगळ्या सुख-दु:खात वाटेकरी करणार असशील, तरच मी
तुला साथ देईन.' या सर्वांगसुुंदर काव्यात स्त्रीचे बाह्यसौंदर्य न बघता
एक सच्ची जीवनसाथी म्हणून तिच्याकडे बघितलं पाहिजे हा संदेश दिलेला आहे.
गुजराथमधील मुलींनी एकदा त्यांना विचारले-पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये
स्त्रियांना यथार्थ सन्मान आतापर्यंत का मिळाला नाही? त्यावर ते म्हणाले
पुरुषांनी स्त्रीचे यथार्थ रूप खऱ्या अर्थाने अजून ओळखले नाही. तिला केवळ
उपयोग्य वस्तू मानले. हाच स्त्रीचा सगळ्यात मोठा अपमान आहे, पण काही
स्त्रियांना याच गोष्टीचा अभिमान वाटतो. या काही स्त्रियांना हाच विचार
बदलण्यासाठी त्यांनी स्वत:च प्रयत्न करायला हवा. हाच विचार त्यांच्या
चित्रांगदामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे.
डोळ्यावर पट्टी बांधून पतीबरोबर अंधत्व स्वीकारणाऱ्या गांधारीवरचे
"गान्धारिर आवेदन' या काव्यात त्यांची चिंतनशीलता दिसून येते. या काव्यात
गांधारी स्वत:चा पुत्र दुर्योधनाचा तुम्ही त्याग करावा, असे
पुत्रप्रेमाने अंध झालेल्या धृतराष्ट्राला अनेक परींनी विनविते. जी
गांधारी पतिनिष्ठेने बांधलेले डोळे दुर्योधनासाठी एकदाच उघडते. ती
गांधारी रवींद्रांच्या या काव्यात मात्र अतिशय सडेतोड प्रामाणिक
सत्प्रवृत्त दाखविली आहे.
प्रकृतिप्रेमी, पुष्पप्रेमी रवींद्रांचे षड्ऋतूंवर एक नितांत सुंदर काव्य आहे.
"श्यामा' या त्यांच्या प्रसिद्ध कादंबरीत स्त्री ही प्रेमासाठी कुठपर्यंत
पोहोचू शकते, प्रसंगी स्त्रिया कशा आक्रमक होतात हे मांडले आहे.
व्यापाराच्या निमित्ताने आपल्या देशात आलेल्या व्यापाऱ्याच्या प्रेमात
श्यामा पडते, पण काही कारणाने त्याच्यावर राजरोष ओढवतो आणि फाशी होते, पण
तिच्यावर पूर्वीपासून प्रेम करणाऱ्या युवकाला ती तो आळ घ्यायला लावून
फाशी स्वीकारायला लावते. व्यापाऱ्याला काही वर्षांनंतर हे कळल्यावर तोही
तिला सोडून जातो. "प्रेमासाठी वाट्टेल ते' या स्वभावाची ही स्त्री.
"प्रवाशी' या फार जुन्या बांगला भाषेतील मासिकात रवींद्रनाथांच्या गुजरात
भेटीचे आणि तिथल्या संवादांचे दीर्घ वर्णन आलेले आहे. 1920 च्या एप्रिल
महिन्यात महात्मा गांधींच्या निमंत्रणावरून रवींद्रनाथ मुंबईमार्गे
गुजरातला साहित्य संमेलनाचे सभापतिपद भूषविण्यासाठी गेले होते.
गुजरातमधील स्त्रिया आधुनिक विचारांच्या आहेत, असे त्यांचे मत होते.
एका प्रसंगी ते म्हणाले, ""स्त्रियांनी हे विसरू नये की, प्रत्येक
स्त्रीच्या आत एक गौरीचे रूप दडलेले असते.'' त्याच वेळी एक मुलगी त्यांना
विचारते नारी चरित्रात अशी कोणती विशेषता आहे की, जी तुम्हाला सगळ्यात
महत्त्वाची वाटते. त्यावर त्यांनी उत्तर दिले होते, ""कुठल्याही
आदर्शासाठी स्त्री ही आत्मसमर्पण करते हे स्त्रियांच्या चरित्राचे
वैशिष्ट्य आहे.'' त्यावर ती मुलगी म्हणते, "विधात्याने या आदर्शापायी
स्त्रिच्या कपाळी दु:खावर दु:खे लिहिली नाहीत काय?'' त्यावर त्यांचे
उत्तर होते. ""हो विधात्याने स्त्रीला कोमल बनविले म्हणून दु:खे ओढवतात,
परंतु हीच स्त्री कठीणातले कठीण व्रत करू शकते एवढी शक्तीही तिला दिली
आहे.'' यालाच आपण आता नैसर्गिक सहनशक्ती म्हणतो.
त्याचवेळी भावनगर येथील एका तपस्विनी वृद्धेच्या संवादात त्या इतक्या
सहजपणे घराबाहेर कशा पडू शकतात. (त्याकाळी) असा प्रश्न रवींद्रनाथांना
पडल्यावर तिने उत्तर दिले होते की, ""स्त्रीमध्ये ती शक्ती आहे, जशी टणक
जमीन भेदून वर येणाऱ्या एका कोवळ्या अंकुरात असते.'' त्यावर ते म्हणाले,
""आज मी स्त्रीचे सच्चे स्वत:चे बोल ऐकले. आजपर्यंत स्त्रिया पुनरुच्चार
करताना ऐकले होते.''
सुरत येथे वनिता आश्रमाच्या भेटीत एक स्त्री म्हणाली, ""मी विवाहविरोधी
आहे. लग्न करू इच्छित नाही.' त्यावर त्यांचे उत्तर होते, "प्रेम काही
तुच्छ नाही, पण हे प्रेम सगळ्यांच्या कल्याणाकरिता उपयोगी आणले पाहिजे.
लग्नानंतरचे प्रेम हे नियंत्रित प्रेम असते. अशाच प्रेमाचे गुणगान
कालीदास वगैरे सगळ्याच कवींनी केलेले आहे. प्रेमाशिवाय एकमेकांचा परिचय
होत नाही.'
पराक्रमी पुरुषाच्या वीरतेमध्ये स्त्रीसौंदर्याने बाधा येते का? अशा एका
प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणतात, सुंदर स्त्री युद्धावर निघालेल्या
पुरुषाला ओवाळते तेव्हा पुरुषाचा पराक्रम वाढतोच. ते सौंदर्य त्याला अडवत
नाही, पण स्त्रीने अयोग्य पुरुषाला ओवाळले की त्याच्या दु:खाचा अंत होत
नाही.
एका ठिकाणी स्त्रियांनी त्यांना घरात बोलावून सत्कार आणि आदरातिथ्य केले.
तेव्हा ते म्हणाले, ""आतापर्यंत घराबाहेर (सार्वजनिक) सत्कार झाले. आज
घरात झाला. म्हणजे तुमच्या अंत:करणात मी थोडेसे माझे स्थान ठेवून जाऊ
शकेन. स्त्रियांना मनात स्थान मिळाले म्हणजे माझ्या लेखनाचे चिज झाले.''
रवींद्रनाथांच्या लेखनाचा आवाका फार मोठा आहे. त्यांच्या कवितेत गेयता
होती. ती कविता सुरावटीतूनच बाहेर यायची. त्यांच्या काव्यांना त्यांच्याच
चाली असत. "स्वरबितान' नावाचे त्यांचे गाण्यांच्या नोटेशन 10,10
व्हॉल्युम्स आहेत.
त्यांची पत्रोत्तरे हे ललित-लेखांचे एक अंगच होते. "पत्रावली' नावाने 19
व्हॉल्युम्स प्रसिद्ध झालेले आहेत. 1931 साली हे मोन्तो बालादेवी
नावाच्या एका अशिक्षित स्त्रीबरोबर त्यांचा साहित्यिक पत्रव्यवहार सुरू
झाला. त्यात रवींद्रांची तिला 10 वर्षांत 264 पत्रे गेलेली आहेत. त्यातील
साहित्यिक मूल्यही फार उच्च दर्जाचं आहे. त्यात संवाद तर आहेच, पण त्या
स्त्रीची प्रतिवाद करण्याची हिंमतही त्यात दिसून येते. विश्वभारतीनेही
सगळी पत्रे मुद्रित केलेली आहेत.
शिशू आणि शिशू भोलानाथ या त्यांच्या काव्यात आई-मुलांचा विलोभनीय संवाद आहे.
वसंत ऋतूत एकदा गाडीतून जात असताना त्यांना भोवताली खूप फुलं फुललेली
दिसली. त्याने ते मोहून गेले. तेव्हा शेतात एक आम्रवृक्ष पानांनी,
मोहोरांनी पूर्ण बहरून गेलेला दिसला. तेव्हा त्यांना वाटले, फुले काय
काही दिवसांत सुकून जातील, पण हा वृक्ष शाश्वत सत्य आहे. त्यांच्या
संपूर्णच लिखाणात ही शाश्वताची आश्वासकता आढळून येते. विधात्याची
शाश्वतता आणि प्रकृतीची सुंदरता यावर रवींद्रनाथांची नितांत श्रद्धा
होती.
--
visit @
www.psiddharam.blogspot.com
1 comment:
Geetanjali Kelkar yanni ha lekh lihila ahe.
Post a Comment