Thursday, April 14, 2011

मोझेसच्या पाऊलखुणा

-
मल्हार कृष्ण गोखले
मुंबई

शिमला, कुलू-मनाली, दार्जिलिंग किंवा
नेपाळ अशा पर्यटन सहलींप्रमाणेच धार्मिक पर्यटन सहलीही आपल्याकडे
चांगल्याच लोकप्रिय आहेत. फक्त धार्मिक स्थळांची माहिती कुणी नीटशी देत
नाही. कित्येकदा लोकांनाही नीट माहिती करून घेण्यात स्वारस्य नसतं.
युरोपमधील इटलीसारख्या देशामध्ये पर्यटन सहलीत सेंट पीटर्ससारखी भव्य
चर्चेस अर्थातच असतात. पण त्यात धार्मिक स्थळाला भेट या हेतूपेक्षा तिथली
अप्रतिम कलाकारी पाहणं हा मुख्य हेतू असतो.इजिप्तमधल्या रफिक बुत्रोस या
पर्यटन संस्थाचालकाने मात्र वेगळी वाट शोधून काढली आहे. इजिप्तमध्ये
आलेल्या पर्यटकांना पिरॅमिड्‌स, राजा रामसिसच्या भव्य मूर्ती, नाईल नदी,
अलेक्झांड्रिया बंदर अशा नेहमीच्या स्थळांखेरीज आणखी काय दाखविता येईल,
याचा विचार करता करता त्याला एकदम आठवण झाली ओल्ड टेस्टामेंटची. बायबलचे
दोन भाग आहेत. ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट. ओल्ड टेस्टामेंटला
ज्यू लोक पवित्र मानतात. या ओल्ड टेस्टामेंटमध्ये एक्सोड्‌स नावाचं
प्रकरण असून, त्यात ज्यू लोक मोझेसच्या नेतृत्वाखाली इजिप्तमधून कसे
निसटून गेले, याचा कथाभाग येतो. रफिक बुत्रोसने एक्सोड्‌सचा कसून अभ्यास
केला आणि इजिप्तमधील मोझेसशी संबंधित अशी स्थळं शोधून काढली. मग आपल्या
पर्यटन संस्थेच्या एका सहलीला त्याने नाव दिलं, 'मोझेसच्या पावलावर!'
आमच्या धार्मिक पर्यटन सहलीत सामील व्हा आणि मोझेसच्या पावलावर पाऊल
टाकून प्राचीन तीर्थस्थळांचे दर्शन घ्या!त्याच्या या नव्या सहलीला चांगला
प्रतिसाद मिळू लागला आहे. केवळ ज्यू धर्मीयच नव्हे, तर युरोप-अमेरिकेतील
ख्रिश्‍चन आणि मध्य पूर्वेतले अरबही मोझेसच्या खाणाखुणा बघायला
उत्सुकतेने जात आहेत. पण कोण होता हा मोझेस? त्याच्याबद्दल पर्यटकांना
इतकी उत्सुकता निर्माण होण्याचं कारण काय?ज्यू आणि अरब हे आज एकमेकांशी
कितीही भांडत असले, तरी दोघांचा मूळपुरुष एकच आहे, तो 'सेम' या नावाने
ओळखला जातो. म्हणून ज्यू आणि अरब या दोघांनाही 'सेमेटिक' वंशाचे म्हणूनच
ओळखलं जातं. या सेमेटिक वंशीय लोकांचे मूळ स्थान उत्तर अरबस्थानात होतं
असं मानतात. तेथून हे लोक सर्वत्र पसरले. या सेमेटिक वंशीय लोकांपैकी एक
माणूस अब्राहम हा 'ऊट' या प्रदेशात रहात होता. ऊट हा प्रदेश सध्या
इराकमध्ये येतो. अब्राहमला परमेश्‍वराचा आदेश मिळाला की, 'मी दाखवीन त्या
भूमीत जाऊन रहा.' या आदेशानुसार अब्राहम पॅलेस्टाईन म्हणजे तत्कालीन कनान
या प्रदेशात जाऊन राहिला. अब्राहमचा विस्तारलेला वंश म्हणजेच आजचा ज्यू
समाज.अब्राहमचा नातू जेकब याला बारा मुलगे आणि सत्तर नातू होते. या विशाल
कुटुंबासह जेकब कनान प्रांतात शेळ्या-मेंढ्यांचे कळप घेऊन भटके जीवन
घालवीत असताना भयंकर दुष्काळ पडला. तेव्हा अर्थातच सुपीक, समृद्ध
भूमीच्या शोधात जेकब दक्षिणेकडे गोशेन प्रदेशात गेला. हा प्रदेश त्यावेळी
इजिप्तच्या साम्राज्यात होता आणि इजिप्तवर सेमेटिक वंशाचाच राजा राज्य
करत होता. त्यामुळे जेकब आणि त्याच्या विशाल परिवाराला गोशेन प्रांतात
उदार आश्रय मिळाला. इजिप्तमध्ये जेकबला इस्रायल असं नाव पडलं. हा काळ
साधारण इ. स. पूर्व १७०० हा मानला जातो. तिथून पुढे सुमारे दीडशे वर्षे
जेकबचा परिवार जो लवकरच एका छोट्या लोकसमूहात परिवर्तित झाला व
सुखासमाधानाने जगला. पण इ. स. पूर्व १५८३ च्या सुमारास इजिप्तमधील
सेमेटिक राजवंशाची सत्ता जाऊन तिथे फरोहा राजांची सत्ता आली. त्यांनी
ज्यू लोकांना गुलाम बनविले. गुलामगिरीत पिचणार्‍या एका सर्वसामान्य ज्यू
जोडप्याच्या पोटी मोझेसचा जन्म झाला. ज्यू गुलामांचं पहिलं अपत्य मारून
टाकण्यात यावं, अशी राजाज्ञा त्यावेळी निघाली होती. म्हणून मोझेसच्या
आईने त्याला बांबूच्या टोपलीत ठेवून नाईल नदीत सोडून दिलं. ती टोपली
नेमकी सापडली सम्राटाची बहीण नेफरटीटी हिला. हिब्रू शब्दाचा अर्थच मुळी
'पाण्याने वहावलेला.' साहजिकच मोझेसचं पालनपोषण राजपुत्र म्हणून झालं.
पुढे त्याला आपलं मूळ आणि कूळ कळल्यावर, गुलामीत पिचणार्‍या आपल्या
समाजाला घेऊन तो सिनाई पर्वताकडे निघाला. या पळणार्‍या गुलामांचा पाठलाग
शस्त्रसज्ज इजिशियन सैन्य करीत होतं. इथे दैवी चमत्कार घडला. पळणार्‍या
ज्यूंच्या मार्गात आडव्या आलेल्या लाल समुद्राचं पाणी दुभंगलं. ज्यू समाज
सुखरूप पार गेला आणि पाणी परत पहिल्यासारखं झालं. इजिप्तची सेना अलीकडेच
अडकून राहिली.सिनाई पर्वताच्या आसपासच्या रेताड प्रदेशात मोझेस आणि
त्याच्या समाजाला चाळीस वर्षे काढावी लागली. या कालखंडात ज्यू समाजातले
सगळे दोष उसळून वर आले. इजिप्तच्या गुलामगिरीतून केवळ मोझेसच्या
नेतृत्वामुळे मुक्त झालेले हे ज्यू त्याच्याचविरुद्ध उठले. शेवटी सिनाई
पर्वताच्या माथ्यावर मोझेसला दैवी आदेश प्राप्त झाला. याच त्या
सुप्रसिद्ध 'टेन कमांडमेंट्‌स' किंवा दहा आज्ञा. या दैवी आज्ञांच्या
आधारावर मोझेसने आपला समाज सुसज्ज आणि सुसंघटित केला.अशा प्रकारे मोझेस
या कर्तबगार आणि दैवी कृपाप्राप्त पुरुषाने इस्रायल राष्ट्राचीच एक
प्रकारे निर्मिती केली. ज्या दिवशी मोझेसला परमेश्‍वराकडून दहा आज्ञा
मिळाल्या तो दिवस आजही ज्यू समाजात 'शाबाथ' या नावाने साजरा केला
जातो.चाळीस वर्षे सिनाई प्रदेशात काढल्यानंतर हे इस्रायली लोक हळूहळू
जॉर्डन नदीच्या पलीकडील दक्षिण कनान प्रांतात सरकू लागले. तिथले कनानाईट
लोकही मूळचे सेमेटिकच असल्यामुळे हे दोनही समाज हळूहळू एकमेकांत मिसळून
गेले. पुढे अनेक लढाया, हल्ले इत्यादी घालमेली होत असतानाच हे लोक
मेंढपाळ जीवनाकडून कृषी जीवनाकडे प्रगत होत होते. एका युद्धात सॉल या
आपल्या नेत्याला त्यांनी 'राजा' म्हणून घोषित केलं. इस्रायलचा हा पहिला
राजा. नंतर डेव्हिड या राजाने गाझा ते जोप्पा या भागात राज्य करणार्‍या
फिलिस्टिनी लोकांचा पराभव करून जेरुसलेम हे बुलंद ठाणं जिंकलं. डेव्डिडचा
मुलगा सॉलोमन याने जेरुसलेममध्ये येहोवा या आपल्या देवाचं एक अतिविशाल
मंदिर बांधलं.एकंदरीत इजिप्तच्या गुलामगिरीतून ज्याने ज्यू समाजाला
सोडविलं आणि त्या समाजाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगण्याची अस्मिता
दिली, त्या मोझेसबद्दल ज्यूंना अतिशय आदर वाटावा, हे साहजिकच आहे. पण
पराभूत, गुलामी मनोवृत्ती भिनलेल्या, नालायक आणि विश्‍वासातकी अशा ज्यू
समाजाचा उद्धार करणारा मोझेस हा खरोखरच एक कुशल संघटक आणि महान नेता असला
पाहिजे, या भावनेने ख्रिश्‍चन आणि अरबांनाही त्याच्याबद्दल कुतूहल वाटतं.
येशू ख्रिस्त ऊर्फ जोशुआ हा स्वत: ज्यूचं होता, त्याच्या अनुयायांना
ख्रिश्‍चन म्हणतात. त्यामुळेच अब्राहम, जेकब, मोझेस, डेव्हिड, सॉलोमन या
सगळ्यांना ख्रिश्‍चन धर्मीय मानतातच. अरबांनी इसवीसनाच्या
सहाव्या-सातव्या शतकात इस्लामचा स्वीकार केला. पण तेही इब्राहिम, याकूब,
मूसा, दाऊद, सुलेमान या नावांनी वरील सगळ्या मूळ ज्यू नेत्यांना मानतात.
इतकंच नव्हे, तर येशूलाही ते ईसा या नावाने मान देतात् म्हणजे पैगंबर
म्हणतात. मात्र, त्यांचं यापुढचं म्हणणं असं की, महंमद हा शेवटचा पैगंबर
होय. त्याच्यानंतर कुणीही पैगंबर झाला नाही, होणारही नाही. त्यामुळे
त्याने जे काही म्हटलेलं आहे ते अंतिम सत्य आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
ते कसंही असो. रफिक बुत्रोस या कल्पक पर्यटन संस्थाचालकाने मोझेसच्या या
एक्सोड्‌समधील म्हणजे इजिप्तमधून आपल्या समाजाला घेऊन बाहेर पडण्याची अशी
बत्तीस ठिकाणं शोधून काढली आहेत. रफिक बुत्रोसच्या या उद्योगावरून
प्रेरणा घेऊन दुसर्‍या एका पर्यटन संस्थेचा चालक कामेल शेनुदा हा
इजिप्तमधल्या कॉप्टिक चर्चच्या साहाय्याने एक वेगळीच योजना तयार करतो
आहे. (इजिप्तमधले ख्रिश्‍चन कॅथालिक किंवा प्रोटेस्टंट नसून काप्टिक
पंथीय आहेत.) येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी पॅलेस्टाईनवर रोमनांची
अधिसत्ता होती. रोमनांपासून बचाव करण्यासाठी जोसेफ आणि मेरी बाल येशूला
घेऊन इजिप्तमध्ये पळून गेले होते. या तिघांनी जिथे जिथे मुक्काम केला
होता, अशा ठिकाणांची तपशीलवार यादी करून तिथे पर्यटन सहल आयोजित करायची,
अशी कामेल शेनुदाची कल्पना आहे. (साभार : तरुण भारत)

--
visit @
www.psiddharam.blogspot.com

No comments: