Thursday, April 14, 2011

मामाच्या गावाला जाऊ या...

- अलका रविंद्र नेरकर
नांदगांव (नाशिक)

अलिकडे सुट्टीतले छंदवर्ग आपल्या मुलांना 'ऑल राऊंडर' बनविण्यासाठी
पालकांनी शेाधलेला शॉर्टकट... मग मामाच्या गावी मुले तेच तर शिकत नव्हते
का?

रोजचे रुटीन, शाळा-परीक्षा-अभ्यास या चक्रातून फिरत असताना कुठेतरी तोच
तोचपणा-मरगळ आलेली असते. त्यातून सुटण्यासाठी आणि नव्या रुटीनला सामोरे
जाण्यासाठी आयुष्यात बदल हवा असतो. त्यासाठी मुलांना मामाच्या गावाला
जाण्याचा उत्तम पर्याय होता. ते नुसतेच मामाच्या गावाला जाणे नसते.ही
नात्याची वीण पक्की करण्याचा भाग होता. कुठेतरी बरोबरीच्या नात्यांमध्ये
मिसळणे असते. सुख-दुःख, ताण-तणाव त्या-त्या वयातल्या समस्यांची मुले
आपल्या आपण उकल करत एकमेकांना सहन करायचे... एकमेंकांमध्ये सहभागी
व्हायचे... एकमेकांच्या कला-गुणांची, देवाणघेवाण करायची. थोडक्यात
'शाळेबाहेरचे व्यवहारिक शिक्षण' मिळवून देण्याची ही मुक्त शाळाच नव्हे
का?आई-बाबांच्या धाकात अभ्यास आणि अति जपणूक यामध्ये वावरताना मुलांच्या
सुप्त मनात कुठेतरी उद्रेक होत असतो. त्याचा निचरा होण्यासाठी वेगळ्या
वातावरणाची पण काळजीने संभाळणार्‍या, मायेने शिकवणार्‍या नात्याची गरज हे
'मामाचे गाव' पूर्ण करते.अलिकडे सुट्टीतले छंदवर्ग आपल्या मुलांना 'ऑल
राऊंडर' बनविण्यासाठी पालकांनी शेाधलेला शॉर्टकट... मग मामाच्या गावी
मुले तेच तर शिकत नव्हते का? मनसोक्त हुंदडणे, निसर्गात रमणे, आंब्याच्या
झाडावर चढणे, कैर्‍या पाडणे, नदीमध्ये डुंबणे, पोहायला शिकणे, पडत-झडत
सायकल शिकणे... नवीन नवीन गावे पाहणे, गावांची वैशिष्ट्ये, निरीक्षण...
वेगळ्या चवीचे पदार्थ, फळे खाणे, नवे-नवे खेळ शिकणे, कलाकुसर करणे... मला
आठवते माझ्या लहानपणी कशीदा काढणे, भरतकामाचे टाके, उन्हाळी पांढर्‍या
फ्रॉकवर काढण्याचे आम्ही आजोळीच शिकलो.... कैरीचे पन्हे... आणि कैरीची
आंबट-गोड दाळ गूळ-शेंगदाणे कुटून केलेली भातुकलीतल्या ह्या रेसिपीज आम्ही
आपोआप शिकलो. कुठल्या महागड्या क्लासला जाण्याची वेळ आम्हाला कधी आली
नाही.मामाच्या गावी आई-बाबांचा धाक नसतो. मनसोक्त पत्ते खेळणे, कॅरम
खेळणे, गोष्टीची पुस्तके वाचणे... श्यामची आई, चांदोबा, कुमार ह्या
पुस्तकांमध्ये आम्ही गढून जात असू आणि मुख्य म्हणजे पानात पडेल ते
सर्वांबरोबर खाऊन संपवणे, घरी जेवणाला नाके मुरडणारी मुले मामे-मावस
भावंडाबरोबर न कुरकूर करता खातात. ही सहजीवनाची सवय लागते. अंगणातली ही
'अंगत-पंगत' भूक वाढवते!झाडांना झोके बांधून... उन्हाळ्यातही दाट झाडीत
दुपारची सुट्टी कशी थंडावा देई, घरी बनवलेले लाकडी पॉटमधील आईस्क्रीम,
ऊसाचा रस, कलींगडे, टरबूजे आणि सर्वांनी गोल करून एकत्र चाखलेले आंबे...
रात्री सर्वांनी जमून खेळलेल्या गावाच्या नावांच्या, गाण्यांच्या
भेंड्या... ह्या आजोळने आम्हाला काय म्हणून दिले नाही? झब्बू,
सट्टाझब्बू, गाढवपाणी, बदामसात, भिकार-सावकार, लॅडीस ही पत्त्यांची नावे
पुढच्या आयुष्यात पार पुसली गेली. गाण्याच्या भेंड्यात माम्या, आज्या पण
सामील होत असत. माझ्या एक मामी 'ह' आले की हमखास 'हरिणीवाणी आम्ही गवळणी
जातो यमुनेला श्याम पुढे आला' हे गाणे म्हणत. आजही हे गाणे ऐकले की
त्यांच्या आठवणीने मन व्याकूळ होते. 'ड' आले की 'डम डम डिगा डिगा' हे
त्याकाळचे एकमेव गाणे गायले जायचे. मुळाक्षरांची भाषेची समृद्धी अशी वाढत
जाई म्हणूनच आमचे मातृभाषेवरचे प्रेम असे घट्ट आहे.भेंडया खेळत खेळत
अंगणात टाकलेल्या भल्या मोठ्या सतरंजीवर आकाशातले तारे मोजत मोजत त्या
अथांग छताखाली झोपेच्या कुशीत कधी सामावून जायचे हे कळायचेही नाही आणि हे
उन्हाळ्याच्या सुट्टीचे... अंगावर मायेचा गारवा आणि स्वच्छंदी जीवनाचा
वारा पिऊन हुंदडणार्‍या कोकराचे दिवस संपत येतात... अधून मधून भरून
येणारे ढग.... जून आल्याची वर्दी देतात... शाळा सुरू होण्याची चाहूल
आणतात आणि मामे-मावस भावंडांची आणि आजोळी मैत्रीत गुंफलेल्या अनेक
सवंगड्यांची ताटातूट होणार या कल्पनेने मन हुरहुरते... डोळयांच्या कडा
ओलावतात आणि पुढच्या सुट्टीत भेटण्याचे ठरवून हे 'मामाचे गाव' तिथेच
ठेवून काढता पाय घ्यावा लागतो आणि मग कितीतरी दिवस या आठवणींच्या पुंजीवर
पुढचे दिवस आनंदात जातात...***
--
visit @
www.psiddharam.blogspot.com

No comments: