Thursday, April 14, 2011

अभूतपूर्व स्वागत

-
बी.निवेदिता
राष्ट्रीय उपाध्यक्ष, विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी

एका वृत्तात म्हटले आहे की लोकसमूहाच्या त्या लाटा पाहून समुद्रही क्षणभर
अचंबित झाला अन् लाटानिर्मितीचे आपले काम विसरून अगस्ती ऋषीच्या या
वारसाचे स्वागत स्तब्ध होऊन पहात राहीला.

स्वामी विवेकानंद यांना घेऊन येणारी बोट जसजशी भारतीय किनार्‍यासमीप येऊ
लागली तसे संपूर्ण दक्षिण भारतात एक चैतन्य पसरले. त्यांच्या प्रति आदर
व्यक्त करण्यासाठी, त्यांचा बहुमान करण्यासाठी गावागावातून लोकांची तयारी
सुरु झाली. स्वामीजींचे एक सहकारी स्वामी निरंजनानंद हे त्यांच्या
स्वागतासाठी सिलोन येथे उपस्थित होते. बाकीचे बोट येणार तेथे जमले.
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्वामीजींच्या होणार्‍या आगमनाबद्दल संपूर्ण
भारतात उत्सुकता निर्माण झाली होती. त्यांच्या स्वागतासाठी गावागावातून
स्वागत समित्या स्थापन झाल्या होत्या. या समितीत विविध पंथ-संप्रदायाचे
आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. आपल्या आगमनाबद्दल
आपल्या देशबांधवांत किती औत्सुक्य निर्माण झाले आहे, याची खुद्द
स्वामीजींना कल्पना नव्हती. आपण विदेशात धर्मपताका डौलांनी फडकावली
त्यामुळे देशबांधव आनंदित झाले असतील याची त्यांना कल्पना होती. पण हा
आनंद किती पराकोटीचा आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. त्यानाच काय
कोणालाच कल्पना आली नाही असे ते अभूतपूर्व स्वागत होते. ज्याचे स्वागत
करायचे त्यांना आणि जे स्वागत करणार होते त्यांनाही या स्वागताच्या
भव्यतेची कल्पना आली नव्हती.१५ जानेवारी १८९७ ला सूर्यनारायण कोलंबोच्या
पूर्व दिशेस उगवले ते विजयपताका फडकावत. स्वगृही परतणार्‍या भारतमातेच्या
सुपुत्राच्या स्वागतासाठी हा सूर्य जसा उगवला तसेच स्वामीजी लक्षावधी
भारतीयांच्या हृदयात सहस्त्रसूर्याप्रमाणे उगवले. त्या प्रचंड
जनसमुदायाच्या भावना आणि दृगोच्चर होणारे प्रेम वर्णन करण्यास शब्द अपुरे
पडतात. स्वामीजींना घेऊन येणारी बोट लोकांना दिसताच त्यांनी जेट्टीवर एकच
गर्दी केली. लोकांच्या घोषणा आणि टाळ्याचा गजर यात समुद्र लाटांचा आवाज
लुप्त झाला. एका वृत्तात म्हटले आहे की लोकसमूहाच्या त्या लाटा पाहून
समुद्रही क्षणभर अचंबित झाला अन् लाटानिर्मितीचे आपले काम विसरून अगस्ती
ऋषीच्या या वारसाचे स्वागत स्तब्ध होऊन पहात राहीला. कोलंबो येथे झालेले
स्वामीजींचे स्वागत हे पहिले सार्वजनिक स्वागत होते. त्यानंतर प्रारंभ
झाला तो 'विजय ही विजय' या भव्य अभियानाचा. दक्षिणेचे टोक असलेल्या
कोलंबोपासून उत्तरेचे टोक असलेला अल्मोडा आणि नंतर राजस्थान अशा दिशेनेे
वर्षभर स्वामींचा स्वागत समारोह चालला होता. प्रांत आणि वेळ यानुसार
स्वागत समारोहात भिन्नता असलीतरी सर्वत्र उत्साह सारखाच होता. कोलंबो आणि
दक्षिणेतील इतर शहरात स्वामीजींची मिरवणुक ज्या मार्गाने जाणार त्या
मार्गावर सडे घालण्यात आले होते. आंब्याच्या पानांची तोरणे दारावर लावली
होती. संपूर्ण रस्त्यावर केळीचे खुंट लावले होते. रात्रीची वेळ असेल तर
लोकांनी रस्त्यावर मशाली पेटवून ठेवल्या होत्या. प्रत्येक घराबाहेर दिवे
पेटवलेले होते. 'स्वामीजींनी भारतात प्रकाश आणला' हे वाक्य शब्दशः खरे
ठरत होते. मांडव आणि पताका सर्वत्र होत्याच, एका प्रत्यक्ष दर्शीनुसार
देवाच्या मूर्तीवर छत्र असते ते छत्र स्वामींच्या डोक्यावर धरण्यात आले
होते. देवाचा वार्षिक उत्सव असतो व छबीन्यासाठी मूर्ती बाहेर काढली जाते
तेंव्हाच हे छत्र बाहेर काढले जाते. स्वामींची मिरवणूक जाताना हर हर
महादेवचा घोष चालला होता. सजवलेली घोडागाडी, किंवा बैलगाडी नेहमी असे पण
रामनदच्या राजांनी स्वामींची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढली तर अल्मोडा
येथे सजवलेल्या घोड्यावरून मिरवणूक निघाली. स्वामींचा रथ रामनदच्या
राजांनी स्वतः ओढला. कलकत्ता आणि मद्रास येथे रथ ओढण्यात तरुणांचा
पुढाकार होता. एका वृत्तानुसार सभा संपली. स्वामी रथात बसले. रथ
राजनिवासाकडे निघाला. राजेसाहेब इतरांसोबत पायी चालले होते. थोडे अंतर
गेल्यावर राजांनी रथाचे घोडे सोडण्याचा आदेश दिला. त्यानंतर राजे व
इतरांनी रथ गावातून ओढत नेला. स्वामींच्या गौरवार्थ अनेक काव्यरचना
झाल्या. कोलंबो येथे 'थेवरम' म्हणण्यात आले. मिरवणुकीत वाद्यवृंदावर अनेक
भारतीय व इंग्रजी गाणी वाजवण्यात आली.त्यावेळचा हा उत्साह एवढा अमाप होता
की ते वर्णन आजही वाचताना आपलं अंग मोहरून येते. त्यापैकी कांही वर्णने
पुढील प्रमाणे आहेत.कोलंबो येथे ''वहातुकीसाठी जी जी साधने होती त्याचा
वापर करुन तसेच पायी चालत हजारो लोक पानाफुलांनी सजवलेल्या मंडपाकडे धाव
घेत होते. स्वामीजी रथातून उतरले. मिरवणुकीत सामील होऊन निघाले. ध्वज,
छत्र आणि श्वेतवस्त्र ही हिंदुच्या मानाची प्रतिके मिरवणुकीत होती.
वाद्यवृंद समयोचित धून वाजवत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजुस मांडव होते.
दोन मांडवातील अंतर पाव मैल होते. दोन मांडवातील अंतरांत पानाफुलांनी
सजवलेल्या कमानी होत्या. स्वामीजी मांडवात शिरताच कृत्रिम कमळ उमलत असे,
त्यातून एक पक्षी बाहेर येई. पक्षाची मुक्ती म्हणजे भारतमातेच्या
शृखंलामुक्ततेचा संकेत होता. मात्र ही सारी सजावट तशी दुर्लक्षितच
राहीली. कारण सर्वांच्या नजरा स्वामीजींचा तेजपुंज चेहरा आणि चमकणारे
डोळे या कडे लागल्या होत्या. या ठिकाणी जणू भारतमातेचे स्वातंत्र्य
दृगोच्चर झाले.''जाफना येथे ''विश्वविख्यात योगीपुरुषाचे दर्शन
घेण्यासाठी आणि मिरवणुकीने स्वागत करण्यासाठी बेटावरील सर्व भागातून
हजारो लोक या शहरात जमले होते. जाफनातील कांगेसंतुरा हा मार्ग हिंदु
कॉलेजपर्यंत सायंकाळी ६ पासून गर्दीने एवढा फुलून गेला होता की त्यावरून
एकही वाहन जाणे अशक्य झाले. रात्री ८.३० ला मशाल मिरवणूक काढण्यात आली.
एका अंदाजानुसार १५ हजार लोक मिरवणुकीत सहभागी झाले. दोन मैल लांबीच्या
या रस्त्यावर माणसेच माणसेच होती. जणू हा मस्तकांचा समुद्र भासत होता.
असे असूनही अथ पासून इति पर्यंत सर्वत्र कमालीची शिस्तबद्धता होती. या
संपूर्ण मार्गावर जेवढी घरे होती त्या घराबाहेर नीरयकुडम आणि दीप ठेवले
होते. एखाद्याला परमोच्च मान देण्याचा हा हिंदु रिवाज आहे. प्रत्येक
घराने हा मान त्या थोर सन्यांसाला दिला.''रामगड येथे ''स्वामीजींची
प्रतिक्षा करणार्‍या हजारो लोकांना फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांच्या
आगमनाची सूचना देण्यात आली. स्वामी आल्यानंतर आणि मिरवणूक चालू असताना
आकाशात अनेक अग्नीबाण सोडण्यात आले. सर्वत्र आनंदी आनंद पसरला होता.
दरबाराच्या खास गाडीत स्वामीजी बसले होते. त्यांच्या शेजारी एक शरीर
रक्षक होता. महाराजांचे बंधू सर्वांवर देखरेख करीत होते. स्वतः राजेसाहेब
पायी चालले होते. स्वतः मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते. रस्त्याच्या दुतर्फा
मशाली पेटल्या होत्या. भारतीय व पाश्चात्य संगीत मिरवणुकीच्या आनंदात भर
घालत होते. 'पहा जगज्जेता नायक आला' हे गीत स्वामीजींच्या आगमनाबरोबर
सुरु झाले. स्वामीजी मिरवणुकीने समारंभस्थळी पोहचले तेंव्हा निम्मी
मिरवणूक रस्त्यावरच होती. महाराजांच्या विनंतीनंतर स्वामींनी वाहन बदलले
नंतर ते शंकरा व्हिला येथे गेले.अल्मोडा येथे ः ''स्वामीजी येथे आले तो
दिनांक १० मे हा होता. प्रत्यक्षात स्वामींच्या स्वागताची तयारी जानेवारी
पासून चालू होती. गुडविन हा युरोपिय लेखक म्हणतो 'पारंपारिक पद्धतीने
निघालेल्या या मिरवणुकीत अल्मोडाचा प्रत्येक रहिवासी सामील झाला होता.
घराघरावर दीप असल्याने संपूर्ण शहरात दीपोत्सव सुरु असल्यासारखे भासत
होते. स्थानिक संगीत, लोकांच्या घोषणा यामुळे वातावरण भारून गेले होते.
स्वामीजींच्या बरोबर जे लोक कोलंबोपासून आले होते. त्यांनाही हे स्वागत
अपूर्व वाटले. प्रत्येक घरातून स्वामींच्या अंगावर फुले व तांदुळ उधळले
गेले.''शिकागोच्या धर्मसंसदेत स्वामीजींचे भाषण झाल्यापासून भारतीय
वृत्तपत्रांत स्वामींच्या प्रशंसेने रकानेच्या रकाने भरून मजकूर प्रसिद्ध
झाला. स्वामीजी कोलंबोस पोहाचल्यापासून त्यांच्यावर तारांचा पाऊस पडत
होता. त्यात अभिनंदन, शुभेच्छा, भेटीचे निमंत्रण, भाषणाचे निमंत्रण अशा
सर्व प्रकारच्या तारा होत्या. स्वामीजी राष्ट्रनायक बनले होते. त्यांच्या
रुपाने भारतमातेला आपला आत्मा गवसला होता. त्यांचा संदेश म्हणजे
भारतीयांना जागे करण्यासाठी दिलेली हाक होती. अनेक जणांची निमंत्रणे,
त्यांचा आग्रह यामुळे स्वामीजींना आपल्या कार्यक्रमांत वारंवार बदल करावा
लागत होता. रामनदच्या राजेसाहेबांच्या निमंत्रणाचा ते जसा स्वीकार करीत
तसाच इतरांना होकार देत. स्वामीजी २७ जानेवारीला आपल्या येथे येत आहे हे
कळताच महाराजांना पराकोटीचा आनंद झाला. लगेच त्यांनी हजारो गरिबांना
अन्नदान केले. प्रत्यक्ष स्वामीजी आले या आनंदाप्रित्यर्थ पुन्हा अन्नदान
आणि वस्त्रवाटप केले. १ डिसेंबरला खेत्री येथे जाण्यासाठी स्वामी
विवेकानंद रेवाडी जंक्शनवर आले. तेंव्हा खेत्री आणि अल्वारचे शेकडो लोक
आपल्या घोडागाडीसह आले होते. तेथे अल्वारच्या लोकांनी एवढा प्रचंड आग्रह
केला की स्वामींना खेत्रीच्या ऐवजी आधी अल्वारला जावे लागले.
पूर्वनियोजित कार्यक्रमातील अशा बदलामुळे पुणे, त्रिचनापल्ली येथे
स्वामीजींना जाता आले नाही. त्रिचनापल्ली येथे पहाटे ४ वाजता स्टेशनवर
हजारो लोकांनी एवढी गर्दी केली की स्वामींना बाहेर उतरताच आले नाही.
तंजावर येथेही याच कारणामुळे त्यांना डब्यातून बाहेर येता आले
नाही.मद्रासच्या पुढे एक लहानसे स्टेशन आहे. स्वामीजी होते ती रेल्वे
त्या स्टेशनवर थांबत नव्हती. हजारो लोक स्टेशनवर जमले. त्यांनी
स्टेशनमास्तरला गाडी थोडा वेळ थांबवण्याची विनंती केली. स्टेशनमास्तरने
असमर्थता व्यक्त केल्यावर त्या हजारो लोकांनी रुळावरच ठाण मांडले.
स्वामीजींच्या दर्शनासाठी ते आपल्या प्राणावर उदार झाले होते. गार्डने
समयसूचकता दर्शवल्यामुळे दुर्घटना टळली. गाडी थांबल्यावर स्वामीजी
डब्याबाहेर आले. रुळावर बसलेल्या लोकांशी बोलले लोकांना दुसरे काय हवे
होते? स्वामीजींचे डोळे भरून दर्शन. ज्या स्वामींनी लोकांना स्वाभीमान
परत मिळवून दिला. त्यांच्या खाजगी आणि राष्ट्रीय जीवनाला एक उद्दिष्ट
मिळवून दिले. त्यांच्या विश्वासाला एक भक्कम आधार मिळवून दिला.आगमनास एक
वर्ष पूर्ण झाले तरी स्वामी विवेकानंद यांना सत्काराची निमंत्रणे येतच
होती. सततच्या प्रवासाने ते थकले होते. एखादे निमंत्रण स्वीकारले की
जाताना किंवा येताना वाटेतील अनियोजित निमंत्रणांना तोंड द्यावे लागे.
परिणामी वेळापत्रक बिघडणे, वेळे अभावी ठरलेले कार्यक्रम रद्द करायला
लागणे असेही प्रकार घडत. या सर्व दगदगीचा स्वामी विवेकानंद यांच्या
प्रकृतीवर प्रतिकुल परिणाम झाला. प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात लोकांना
स्वामी विवेकानंद यांना पहायचे होते. आयुष्यभर उपयोगी पडेल असा संदेश
त्यांच्या मुखातून ऐकायचा होता. मानवजातीतील सर्वात प्राचीन आणि वैश्विक
वारसा म्हणजे वेदांत होय. याचा अर्थ जाणून त्या विषयी ते आश्वस्त होत.
शारिरीक दृष्ट्या प्रत्येक गावाला भेट देणे हे स्वामी विवेकानंद यांना
अशक्य होते. पण त्यांचा प्रभाव एवढा दुरगामी ठरला की त्यानंतर भारतीयांनी
प्रथम त्यांची जन्मशताब्दी साजरी केली. नंतर शिकागो येथील भाषणाची
शताब्दि साजरी केली. या शताब्दि सोहळ्याची शृंखला थांबतच नाही. आता
भारतवासी त्यांची १५० वी जयंती साजरी करण्यास सज्ज झाले आहेत. स्वामी
विवेकानंद यांचे स्वागत पूर्णविराम न मिळता अजून चालू आहे.***

--
visit @
www.psiddharam.blogspot.com

No comments: