Thursday, April 14, 2011

‘नालंदा’चे पुनरुज्जीवन : मूळ उद्देश हरवतोय ?

- अनिर्बन गांगुली
संशोधक, विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन, नवी दिल्ली

प्राचीन काळातल्या नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न
जारी आहेत. २००७ सालपासून सुरू असलेल्या या प्रयत्नांना व्यापक
प्रसिद्धीही मिळालेली आहे. हे काम बिहारमध्ये होणार आहे हे साहजिक आहे.
पण हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीय मान्यता आणि पाठिंबा हवा असतो.
तसा तो मिळण्यासाठी आवश्यक ती पार्श्‍वभूमी तयार होत नाही. दृष्टीकोनाचा
अभाव आणि संभ्रम असे अडथळे त्यात येत आहेत. हा अभाव या प्रकल्पाविषयीच्या
आकसातून उद्भवला आहे आणि प्रकल्पाच्या प्रारंभापासूनच त्याला त्रासदायक
ठरायला लागला आहे.

या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी नेमण्यात आलेल्या आधार गटात काही बुद्धीवंत
आहेत, शास्त्रज्ञ आहेत, संशोधक, सनदी अधिकारी आहेत. पण तिबेटीयन समाजाचा
एकही प्रतिनिधी नाही. तिबेटी जनतेचा आणि नालंदा विद्यापीठाचा फार घनिष्ठ
संबंध आहे. तिबेटमधील सत्ताधारी आपल्या अधिपत्त्याखालील विद्यापीठात
नालंदा विद्यापीठातला स्नातक शिक्षक म्हणून नेमण्याचा प्रघात पाडलेला
होता. अशा शिक्षकांच्या प्रयत्नातूनच तिबेटच्या इतिहासातले सुवर्ण युग
साकार झाले होते. त्यामुळे नालंदा विद्यापीठातून शिक्षण घेऊन
येणार्‍यांना तिबेटमध्ये फार मान दिला जात असे.'नालंदा'मध्ये शिक्षण
घेतलेल्या या पंडितांनीच बुद्ध धर्माची तत्त्वे तिथल्या भाषेत अनुवादित
केली आहेत आणि त्यामुळेच तिबेट आणि चीनमध्ये बौद्ध मताचा प्रसार झालेला
आहे. आठव्या शतकातला तिबेटचा राजा ड्यू त्सान याने तिबेटमध्ये धर्म
प्रचारार्थ काही भारतीय पंडितांना पाचारण केले होते. आचार्य शांत रक्षित
हे त्यातलेच एक होते. त्यांनी तिथे केलेल्या कार्याची पावती म्हणजे
तिबेटी जनतेने त्यांना दिलेला 'आचार्य बोधिसत्व' हा सन्मान.हा संबंध
अर्वाचिन काळातही जारी राहील. नालंदा विद्यापीठाचा हा ज्ञानाचा दिवा
प्रज्ज्वलित ठेवणार्‍या दोन संस्था आजही भारतात आहेत. वाराणसी जवळील
सारनाथ येथे असलेले 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हायर तिबेटन स्टडीज' आणि
लेह (लडाख) येथील 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिस्ट स्टडीज'. जवाहरलाल
नेहरू यांनी आपल्या मृत्यूच्या पाच दिवस आधी दलाई लामांंंशी चर्चा करताना
भारतात तिबेटी ज्ञानाचे जतन करण्यासाठी एखादी संस्था स्थापन करण्याचा
विचार बोलून दाखवला होता. हे सारे संबंध पाहिल्यावर नालंदा विद्यापीठ
पुनरुज्जीवन सल्लागार समितीवर तिबेटचा प्रतिनिधी किती आवश्यक आहे हे
लक्षात येईल. या सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. अमर्त्य सेन यांना, 'या
समितीवर दलाई लामा यांना का समाविष्ट करण्यात आलेले नाही?' असा प्रश्‍न
विचारला असता त्यांनी 'ते धार्मिकदृष्ट्या सक्रिय आहेत, त्यामुळे त्यांना
धार्मिक अभ्यासाविषयीच्या समितीवर घेणे उचित होणार नाही' असे उत्तर दिले.
धार्मिक असणे ही धर्माचा अभ्यास करण्यासाठी अपात्रता ठरवली गेली आहे. ही
बाब भारतीय तत्त्वज्ञानात तरी न बसणारी आहे.तसा चीनचाही या प्रस्तावाशी
संबंध आहे. कारण तिथेही दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात आचार्य धर्मदेव
यांना बौद्ध मताच्या चिनी अनुवादासाठी पाचारण केलेले होते. पण त्यामुळे
तिबेट-नालंदा संबंधाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तसा तर कोरियाचाही
नालंदाशी काही प्रमाणात संबंध आला होता, पण तिबेटच्या प्रतिनिधीत्वाला
संस्कृती-संगमाच्या दृष्टीने खास महत्व आहे. पण तिबेटला वगळून चीनला खूष
करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्यक्षात एकेकाळी भारताने बौद्ध मताच्या
आधारे चीनसह त्या भागातल्या सर्व देशांतल्या लोकांची मने नालंदातील
शिक्षणाच्या आधारे घडवलेली आहेत.हा प्रकल्प साकार करणारी एजन्सी म्हणून
मनुष्य बळ विकास मंत्रालयाची नियुक्ती करण्याऐवजी परराष्ट्र खात्याची
नियुक्ती करण्यात आली आहे. असे का? असाही एक प्रश्‍न जाता-जाता विचारता
येतो. खरे तर ही मनुष्यबळ विकास खात्यासाठी शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय
विचार मांडण्याची एक उत्तम संधी होती. महत्वाचा प्रश्‍न आहे तो या
विद्यापीठाच्या स्वरूपाचा. पुनरुज्जीवित नालंदा विद्यापीठ हे
इंजिनियरींग, व्यवस्थापन शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान अशा
उपयोजित-भौतिक शास्त्रांचे शिक्षण देणारे आणखी एक विद्यापीठ असणार आहे
का? की नालंदा विद्यापीठाने पुरातन काळी जाग्या केलेल्या ज्ञानाच्या आणि
अध्यात्माच्या प्रेरणा पुन्हा जागृत करणारे खरेखुरे नालंदा विद्यापीठ
राहणार आहे? इतिहासतज्ञ आर.के. मुखर्जी यांनी 'मेन अँड थॉट इन एन्शिएण्ट
इंडिया' या आपल्या ग्रंथात नालंदा विद्यापीठातल्या त्या प्रेरणा आणि
शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोन यांचे संक्षिप्त वर्णन केलेले आहे. नालंदा
विद्यापीठातल्या अभ्यासाला वैश्‍विक स्वरूप होते. जगाच्या सर्व भागातून
आलेल्या ज्ञानाचे तिथे स्वागत होत होते. सर्व पंथांच्या ज्ञानावर तिथे
चर्चा होत असे. चर्चा हीच तिथल्या ज्ञान ग्रहणाची पद्धत होती' असे श्री.
मुखर्जी यांनी म्हटले आहे. विचारांचे स्वातंत्र्य हा तिथल्या अध्यापन
शास्त्राचा आणि अध्यापन पद्धतीचा आधार होता. आताच्या विद्यापीठांनी हा
आधार गमावला आहे. पुनरुज्जीवित नालंदा विद्यापीठातही हीच 'निराधार'
पद्धती अवलंबिली जाणार असेल तर ती नालंदा 'स्पिरीट'ची कुचेष्टा ठरणार
आहे.या विद्यापीठात केवळ मानव्यशास्त्र, संस्कृती आणि इतिहास यांचेच
अध्यापन केले जाता कामा नये तर अन्यही विषय शिकवले जावेत असे जोरदारपणे
म्हटले जात आहे. सकृतदर्शनी या म्हणण्यात काही चूक नाही पण एका बाजूने
असाही प्रश्‍न केला जातो की, केवळ मानव्यशास्त्रांचाच अभ्यास करणारे
एखादे केंद्र का असू नये? आणि ते भारतात का असू नये ? भारतात
मानव्यशास्त्रातले किती तरी विद्वान, संशोधक आहेत पण तरीही विविध
विद्यापीठांत मानव्य शास्त्रांची अवस्था वाईट आहे. तेव्हा नालंदाच्या
आधुनिक अवतारालाच मानव्यशास्त्राचे आंतरराष्ट्रीय अध्ययन केंद्र बनवायला
काय हरकत आहे?नालंदा विद्यापीठाचे आणखी एक वैशिष्ट्य होते, ते होते
शिक्षण संस्थांच्या सामाजिक जबाबदारीचे. नालंदा विद्यापीठ हे समाज आणि
परिसर यातून अलग झालेले केवळ उच्च शिक्षण देणारे केंद्र नव्हते तर ते
ज्ञानदान करणारे आणि समाजाला अभ्यासू व विद्वान व्यक्ती उपलब्ध करून
देणारे केंद्र होते. एवढीच त्याची मर्यादित भूमिका नव्हती. ते रुग्णांना
औषधे देणारे औषधालय होते. ते निराधारांना आधार देणारे आश्रयस्थान होते
आणि अन्न छत्रही होते. तेव्हा आजही त्यांचे पुनरुज्जीवन करताना त्याला
विकासाचेही केन्द्र बनवता येते. एकंदरीत नालंदा हे असे एक जागतिक
कीर्तीचे विद्यापीठ होते जिथे जगातले सर्व धर्म आणि पंथांचे विद्यार्थी
ज्ञानार्जनासाठी जमत असत. जिथून चीन, अफगाणिस्तान आणि अन्यही अनेक देशांत
बौद्ध धर्माचा प्रसार झालेला होता. पंथ, धर्म, भाषा आणि देश वेगवेगळे
असले तरीही माणूस एकच आहे हा संदेश जगाला देणारे तत्त्वज्ञान याच
विद्यापीठात जोपासले गेले होते. मानवाला मानवाशी जोडणारा मानव्याचा धागा
बळकट करण्याचे ते स्थान बनले होते. त्या काळात जगात अस्तित्वात असलेल्या
सर्व संस्कृतींचा संगम या ठिकाणी झाला होता. आताही आपण या विद्यापीठाला
ते जुने वैभवशाली स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर
या विद्यापीठातून खरे खुरे जागतिक नेते शिकून बाहेर पडतील याची दक्षता
घेतली पाहिजे.
स्वैर अनुवादअरविंद जोशी

--
visit @
www.psiddharam.blogspot.com

No comments: