Thursday, April 14, 2011

नालंदातील अभ्यासक्रम

चिनी प्रवाशांनी मुक्त कंठाने गौरविलेल्या या विद्यापीठातील
अभ्यासक्रमाची माहिती आजही उद्बोधक ठरेल असे वाटते. नालंदा विहारात
प्रवेश मिळविण्यासाठी ज्या परीक्षा द्याव्या लागत त्यांचे कार्य
'द्वारपंडित' आचार्यांच्या हातात होते. या परीक्षेकरता लागणारे ज्ञान
आजच्या इंटर किंवा 'बारावी' च्या तोडीचे; किंबहुना त्यापेक्षा कंकणभर
जास्तच ठरेल. प्रत्येक विषयाकरता स्वतंत्र द्वारपंडित असत व त्यांनी
घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होणे सोपे नसे. फार थोड्या विद्यार्थ्यांना
प्रवेश-पात्र ठरवले जात असे. द्वारपंडिताला लाच देऊन उत्तीर्ण होण्याची
कल्पना त्या काळी अस्तित्वात नव्हती. नालंदा म्हणजे आजच्या परिभाषेत
'प्रगत अनुसन्धान केंद्र 'Centre of Advanced Study'
मानले जात असे.भाषाशिक्षणाची विज्ञानाशी सांगडसाहजिकच येथील
अभ्यासक्रमात व्याकरण, गद्य-पद्य, साहित्य, तर्कशास्त्र (आन्वीक्षिकी),
योगविद्या यांच्याबरोबर महायान शाखा, जातकग्रंथ व तत्कालीन बौद्धांचे १८
संप्रदाय यांचा प्राधान्याने निर्देश करावा लागेल. म्हणजे हिन्दु धर्मा
बरोबर बौद्ध व जैन पंथाच्या अध्ययनालाही येथे भरपूर वाव होता.
स्वाभाविकपणे येथे आशियाखंडाच्या निरनिराळ्या भागांतून प्रवेशासाठी
येणार्‍या विद्यार्थ्यांची रांग लागलेली असे. योगविद्येबरोबर तंत्रविद्या
व महायानाबरोबरच 'हीनयाना' च्या अध्यापनाची येथे सोय होती.
धर्मग्रंथांशिवाय, चित्रकला, शिल्पशास्त्र, वैद्यकशास्त्र, गणितशास्त्र
यासारख्या व्यावहारिक विषयांचे पद्धतशीर शिक्षण येथे दिले जात असे हे
उत्खननातील अवशेषांवरून स्पष्ट होते. या विद्यापीठात शिल्पकला फारच प्रगत
झालेली होती हे येथे सापडलेल्या बांधकामाच्या व कोरीव कामाच्या
नमुन्यावरून लक्षात येते. त्या काळी छापखाने नसल्यामुळे निरनिराळे ग्रंथ
लिहून काढून त्यांच्या हस्तलिखित प्रती जपून ठेवाव्या लागत असल्यामुळे
हस्तलिखित तयार करण्यात वेळ जाई; पण त्यामुळे हस्तलिखित मोत्याच्या
दाण्यासारखे होई हे अमान्य करता येणार नाही. नालंदा येथे दहाव्या,
अकराव्या व बाराव्या शतकात लिहिलेले लेख पहावयास मिळतात असे
पुरातत्त्वेत्ते डॉ.अ.स.आळतेकर यांनी आपल्या 'एज्युकेशन इन एन्शिएन्ट
इंडिया' या पुस्तकात नमूद केलेले आहे. (हा ग्रंथ १९४४ मध्ये प्रकाशित
झाला). चीन, तिबेट वगैरे देशांतून शिक्षणेच्छू विद्यार्थी नालन्दात येत
असत अशी इतिहासाची साक्ष असल्यामुळे येथे निरनिराळ्या भाषाही शिकवल्या
जात असत हे अनुमान करणे भाग आहे. भाषाशिक्षण व वैज्ञानिक दृष्टिकोन
यांमध्ये काही मुलभूत विरोध आहे असे गृहीत धरून भाषांच्या
अध्ययन-अध्यापनाकडे तुच्छतेने बघण्यात समाधान मानण्याच्या आजच्या काळात,
या जुन्या विद्यापीठाने या दोन्हीचा समन्वय साधला होता हे लक्षात
ठेवण्यासारखे आहे.(संदर्भ : भारतातील प्राचीन विद्यापीठे - मो. दि.
पराडकर, भारतीय विचार साधना, पुणे प्रकाशन. पृष्ठ : २८)***

--
visit @
www.psiddharam.blogspot.com

No comments: