आकाशातून पडणारे पाणी शेवटी एकाच सागराला जाऊन मिळते त्या प्रमाणे कोणत्याही ईश्वराची केलेली उपासना एकाच ईश्वराला पोहोचते, असे हिंदू धर्म सांगतो. सर्वच धर्म सत्य आहेत यावर हिंदू धर्मियांचा विश्वास आहे. ही विचारधारा अर्थात वेदान्त जगात शांती आणू शकेल आणि वेदान्त हाच भावी जगासाठी उपयुक्त असेल असे विचार स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेच्या जगप्रसिद्ध भाषणांतून मांडले.
इस्लामच्या आक्रमणाने स्वत:चा धर्म वाचवण्यासाठी पळून आलेल्या पारसी लोकांना हृदयाशी धरणार्या आणि रोमन लोकांच्या अत्याचाराने देशोधडीला लागलेल्या यहुदी लोकांना त्यांच्या धर्मासह आश्रय देणार्या हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी येथे उभा आहे, असे स्वामी विवेकानंदांनी अभिमानाने सांगितले.
आत्मविस्मृत झालेल्या हिंदूंमधील स्वाभिमान जागवण्यासाठी स्वामी विवेकानंद म्हणतात, “माझे हे शब्द स्मरणात असू द्या : ‘हिंदू’ हा शब्द उच्चारताच अपूर्व चैतन्याची लहर जर तुमच्यात सळसळून जात असेल तर आणि तरच तुम्ही हिंदू आहात. ‘मी हिंदू आहे’ असे जो बांधव म्हणतो तो लगेच तुमचा परमप्रिय, परमनिकट आप्त झाला पाहिजे. मग तो कोणत्याही देशातून आलेला असो. तो तुमची भाषा बोलत असो वा अन्य भाषा बोलत असो. कोणत्याही हिंदूची वेदना स्वत:च्या वेदनेइतकीच तुमचे हृदय व्यथित करत असेल तरच तुम्ही ‘हिंदू’ आहात.’’
“आपण हिंदू आहोत. ‘हिंदू’ या शब्दातून मला कोणताही वाईट अर्थ ध्वनित करावयाचा नाही. त्यामध्ये काही वाईट अर्थ आहे याच्याशी मी सहमत नाही. भूतकाळामध्ये सिंधूच्या एका बाजूला राहणारे ते हिंदू इतकाच त्याचा अर्थ होता. जे आपला द्वेष करीत आले त्यांनी या शब्दाला वाईट अर्थ चिकटविला असेल. पण त्याचे काय ! हिंदू या शब्दाने जे उज्ज्वल आहे, जे आध्यात्मिक आहे त्याचा निर्देश व्हावा; अथवा जे लज्जास्पद आहे, जे पायदळी तुडविले गेलेले आहे, जे दैन्यवाणे आहे अशाचा बोध व्हावा हे आपल्यावर अवलंबून आहे. हिंदू या शब्दाला कोणत्याही भाषेतील अधिकांत अधिक गौरवपूर्ण अर्थ आपल्या कृतींनी आणून देण्यासाठी आपण सिद्ध होऊया.’’
लेखक - सिद्धाराम भै. पाटील
संपादक, विवेक विचार
No comments:
Post a Comment