Saturday, December 13, 2008

भगवद्‌गीतेची शिकवण


समाज दुभंगलेला असताना, समाजात आसुरी शक्तींचे प्राबल्य असताना, अनेक समस्यांची गुंतागुंत असताना धर्माचे आकलन आणि आचरण गहन आणि सूक्ष्म बनून जाते. अशा किंकर्तव्यमूढ अवस्थेत कसे वागायचे? याचे शहाणपण, मार्गदर्शन, चातुर्य आणि विवेक आपणाला श्रीकृष्ण देतो.


या महिन्यात गीताजयंतीचा पवित्र दिवस येत आहे. द्वापारयुगाच्या शेवटी भगवान श्रीकृष्णाचे आगमन झाले होते आणि श्रीकृष्णाने देह ठेवला तसा कलियुगाचा प्रारंभ झाला. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने दिलेला संदेश हा नव्या युगासाठी अर्थात कलियुगासाठी होता, आपल्यासाठी होता. श्रीकृष्णाच्या जीवनचरित्रातून आणि सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशी कुरुक्षेत्रावर त्याने अर्जुनाला केलेल्या उपदेशातून आपल्याला तो संदेश मिळतो. काय आहे तो संदेश? तो संदेश, कालसुसंगत आहे काय? हे आपण पाहणार आहोत.
प्रत्येकजण धर्माने आचरण करीत असता, सगळीकडे सुखशांती नांदत असता, धर्म समजून घेणे अगदी सोपे असते. समाज दुभंगलेला असताना, समाजात आसुरी शक्तींचे प्राबल्य असताना, अनेक समस्यांची गुंतागुंत असताना धर्माचे आकलन आणि आचरण गहन आणि सूक्ष्म बनून जाते. अशा किंकर्तव्यमूढ अवस्थेत कसे वागायचे? याचे शहाणपण, मार्गदर्शन, चातुर्य आणि विवेक आपणाला श्रीकृष्ण देतो.
भगवान श्रीकृष्णाने आपल्याला उपनिषदांचे सार सांगितले. त्याने दिलेली शिकवण ही वेदांतावर आधारित आहे. श्रीकृष्णाने दिलेल्या संदेशात प्राचीन परंपरांचे विविध आयाम, त्याची दैनंदिन जीवनातील उपयुक्तता, कालसुसंगत मांडणी याचे एकीकरण झाले आहे. संत ज्ञानेश्वरांनी याचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. वेद हे ईश्वराचे निद्रावस्थेतील घोरणे आहे, असे गृहीत धरले तर गीता ही भगवंताच्या जागतेपणी मुखातून बाहेर पडलेली वाणी आहे. म्हणूनच गीता ही कालसुसंगत आणि स्पष्ट आहे.
श्रीकृष्णपूर्व काळात उपासकांचे प्रामुख्याने दोन प्रकार होते. आत्मज्ञानेच्छुकांसाठी संन्यासमार्ग. आत्मा हा कर्मापासून अलिप्त असल्यामुळे यामध्ये सर्वकर्मसंन्यासाचा आग्रह असायचा. कर्महीनता किंवा निष्क्रीयताच संन्यास मार्गाचे लक्षण मानले जायचे. दुसरा मार्ग होता, तो वर्तमान आणि भविष्यामध्ये आनंदाची कामना करणाऱ्यांचा. यात यज्ञ-कर्म करण्यावरच भर दिला जायचा. आतून सुसंघटित, स्वयंप्रेरित समाजासाठी तसेच शत्रुविरहीत समाजासाठी हे मार्ग ठीक होते, परंतु समाजात आसुरी शक्तींनी उच्छाद मांडलेला असताना स्वार्थात गुंतून राहणे, क्रीयाहीन राहणे परवडणारे नाही.
श्रीकृष्णाने उपरोक्त दोन्ही मार्गांचे एकीकरण केले. संन्यासमार्गातली कर्महीनता (निष्क्रीयता) काढून टाकली, पण आत्मज्ञान स्वीकारलं. त्यांनी आसक्तीयुक्त कर्म किंवा आवडी-निवडी, इच्छा यावर आधारित कर्म त्याज्य ठरवलं; परंतु आत्मज्ञान मिळविण्यासाठी नित्य कर्माला दैवी अधिष्ठान मिळवून दिलं. क्रियाशीलतेला महत्त्व मिळवून दिलं. अशाप्रकारे दोन्ही मार्गांचे उद्देश आणि ध्येय सारखे झाले आणि दोन्ही मार्ग परस्परपूरक ठरले. प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करण्यामागे ध्येयाचे झालेले एकीकरणच कारण आहे. एखाद्याला आत्मज्ञान हवं असेल अथवा आनंद हवा असेल (दोन्ही एकच आहेत.) त्याला कर्म करावेच लागेल. आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंतरही (आत्मा अलिप्त आहे तरी) एखादा कर्म करणे थांबवत नाही. अशाप्रकारे आत्मज्ञानाची इच्छा बाळगणारा आणि आत्मज्ञानी दोघेही समाजाच्या उत्थानासाठी सामाजधर्म म्हणून कर्म करतात.
उपनिषदामध्ये नसलेली अवताराची संकल्पना श्रीकृष्णाने भगवद्‌गीतेत सांगितली आहे. भगवद्‌गीतेनुसार भगवंताच्या जागरूक कृपादृष्टीखाली या जगाचा विकासरथ चालू आहे. तिची वाटचाल विनाशाकडे होत असता भगवंत स्वस्थ बसून राहत नाही. जेव्हा धर्माला अवकळा येते, अर्थात जग तेव्हा स्वविकासाची दिशा हरवून बसते, तेव्हा भगवंत प्रकट होऊन तिचे संरक्षण करतो. धर्माच्या संरक्षणासाठी मी पुन:पुन्हा जन्म घेईन, असे भगवंताने सांगितले आहे. गीतेतील दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे विश्वरूप दर्शन होय. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, "निमित्तमात्रम्‌ भव सव्यसचिन्‌।।' अर्थात माझे उपकरण बन!
भगवद्‌गीतेच्या अभ्यास करताना आपल्या ध्यानात येते की, ईश्वर स्वतःच्या कार्यासाठी मनुष्यमात्राची एक उपकरण म्हणून निवड करतो. महाभारत युध्दातदेखील भगवंत युध्दात प्रत्यक्ष भाग न घेता अधार्मिक शक्तींविरुध्द लढण्यासाठी पांडवांना प्रत्येक ठिकाणी धर्म समजून देत युध्दासाठी प्रेरित करतो. धर्माचे आकलन आणि स्पष्टता म्हणजेच कलियुगात ईश्वरी स्वरूप होय. दुर्दैवाने आमची आकलनशक्ती लोप पावली अन्‌ आम्ही गीतेचा संदेश विसरलो. आम्ही भगवद्‌गीतेची पारायणं करीत बसलो; परंतु श्रीकृष्णाने दिलेला संदेश जीवनात उतरवलाच नाही. अधार्मिक शक्तींच्या नाशासाठी ईश्वर अवतार घेईल, तोच धर्म संस्थापना करेल, या विचारातच आम्ही राहिलो. एखाद्याने यशस्वीपणाने धर्मकार्य केलेच तर त्याने ईश्वरी कार्याचे उपकरण बनून स्वतःची उन्नती कशी साधली, या दृष्टीने न पाहता त्या व्यक्तीचा अवतार बनवून टाकला आणि धर्मरक्षणाची स्वतःची जबाबदारी झटकून टाकली.
या विश्वाला धारण करणाऱ्या तत्वांचे संवर्धन आणि संरक्षण म्हणजे धर्म. कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या भौतिक तसेच आध्यात्मिक विकसनासाठी प्रयत्न करणे म्हणजे धर्म. समाज, राष्ट्र आणि धर्मासाठी वैयक्तिक अथवा संघटितपणे कार्य करीत असता स्वतःची प्रतिमा, स्वतःच्या आवडी-निवडी यामुळे एखाद्यावर काही बंधने येतील.
भीष्म हा लग्न न करण्याच्या आपल्या प्रतिज्ञेशी अधिक बांधील होता. सावत्र आईने वंशसातत्यासाठी लग्न अरण्याचा आग्रह करूनही तो आपली प्रतिज्ञा मागे घेत नाही. तसेच कर्णाच्या अधिपत्याखाली युध्द करण्यास भीष्माची तयारी नसते. कौरवांच्या विजयापेक्षा "दानवीर' ही प्रतिमा कर्णासाठी अधिक महत्त्वाची होती. द्रोणाचार्यांची आपल्या मुलावरील आसक्ती ही जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्त्वाची होती. म्हणूनच कौरव विजयी होऊ शकले नाहीत, परंतु धर्माधिष्ठित कल्याणकारी समाजासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी श्रीकृष्णाने केल्या. हाती शस्त्र न घेण्याची प्रतिज्ञा केली असली तरी युध्दभूमीवर भीष्माची सरशी होतेय हे पाहून तो रथाचे चाक घेऊन भीष्मावर धावून गेला. आवश्यक तेव्हा श्रीकृष्णाने संताप व्यक्त केला, पण इतर वेळी इतरांनी प्रयत्न करूनही तो संतापला नाही. आपली प्रतिमा, आपले नाव या साऱ्या गोष्टी समाजाच्या चांगल्यासाठी वापराव्यात. वेळप्रसंगी त्यांचा त्यागही करावा. युधिष्ठिराच्या तोंडी, "अश्वत्थामा हतः' (अश्वत्थामा मेला) हे शब्द उच्चारायला सांगून श्रीकृष्णाने हाच संदेश दिला आहे. काय घडले हे सांगणे म्हणजेच सत्य आहे असे नव्हे तर ज्या शब्दाने समाजाचे हित होते, संरक्षण होते ते सत्य होय. धमर्ाच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. धर्ममार्गी लोकांसाठी असलेले नियम अधर्मी अथवा आसुरी लोकांसाठी वापरणे म्हणजे अधर्म होय, असा महत्त्वाचा सिध्दांत श्रीकृष्णाने सांगितला आहे.
कर्ण रथात नसल्याचे सांगून अर्जुन त्याच्यावर बाण चालविण्यास नकार देतो. श्रीकृष्ण अर्जुनाला सजग करतो. युधिष्ठिर द्युतात हरला तेव्हा पांडव आणि द्रौपदीची मानखंडना करणारा हा कर्णच होता. नियम धाब्यावर बसवून अभिमन्यूची निर्दयपणे हत्या करणाऱ्या सहा योद्‌ध्यांमध्ये हाच कर्ण होता, याची आठवण तो अर्जुनाला करून देतो. कर्ण आपल्या जीवनात धर्माने वागला नाही, म्हणून त्याला धार्मिक नियम लावू नकोस असेही श्रीकृष्ण अर्जुनाला बजावतो. धर्माने न वागणाऱ्याला धर्माचे नियम लावणे खरे तर अधर्म आहे. भारताने जर हे तत्व भारतावर आक्रमण करणाऱ्या मोहंमद घौरी, बाबर, अहमदशाह अब्दाली आदींना वापरले असते, तर भारताचा नकाशा आज आहे त्याहून वेगळा दिसला असता. भगवद्‌गीतेने सांगितलेले तत्व खऱ्या अर्थाने पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अमलात आणले. राष्ट्र आणि धर्मासाठी त्यांनी सारे रूढ नीतिनियम झुगारून दिले. धर्माची सूक्ष्म आणि गहन जाण छ. शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून स्पष्टपणे व्यक्त होताना दिसते आणि म्हणूनच भारत आपले स्वत्व आणि संस्कृती टिकवू शकला.
आमच्या संस्कृतीवरती विविध राष्ट्रद्रोही शक्तींचे आघात होत असताना, भगवान श्रीकृष्णाने दिलेला धर्माचा संदेश आपण ध्यानात घ्यायला हवा. सर्वच प्रसंगी आणि सर्वांसाठी एकच धर्म किंवा नीती वापरून चालत नाही, हेही ध्यानात घ्यायला हवे. राष्ट्राच्या भल्यासाठी हे आवश्यकच आहे. आपण प्रत्येकजण त्या ईश्वराचे उपकरण आहोत आणि म्हणूनच आपल्यातील प्रत्येकाने धर्माच्या संस्थापनेसाठी, समाजाच्या संरक्षणासाठी आणि आसुरी शक्तींच्या नाशासाठी कार्य करायला हवे. व्यक्तिगत फायदा, आवडी-निवडी, स्वतःची प्रतिमा या सर्वाहून राष्ट्रहित महत्त्वाचे आहे, हे आपल्याला ध्यानात ठेवावे लागेल. जेव्हा असे लोक आपल्या भोवताली असतील, जेव्हा वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्याने ओतप्रोत लोक असतील तेव्हा विजय आपलाच आहे आणि समाजाचे कल्याणही होणारच!
(अनुवाद - सिद्धाराम)

No comments: