असीमानंद हे एम। एस्सी. झालेले आहेत आणि हिंदू धर्माच्या प्रचारार्थ दीक्षा घेऊन संन्यास घेतलेले स्वामी आहेत. प्रथम त्यांनी आसाम भागात आपले कार्य सुरू केले. तिथे होणारे धर्मांतर त्यांना अस्वस्थ करीत होते. प्रलोभन दाखवून, बळजबरीने हिंदू मोठ्या संख्येने ख्रिश्चन होत होते...
स्वामी असीमानंद यांच्या एका भाषणाची कॅसेट ऐकल्यापासून त्यांना भेटण्याची इच्छा होती. भाषण अत्यंत साधे असले तरी, रक्त तापविणारे होते. बंगाली उच्चार असल्यासारखी त्यांची हिंदी भाषा असली तरी, ज्या तळमळीने ते बोलत होते, ते निश्चितच हृदयाला भिडणारे होते.
गुजरात प्रांताच्या महाशिबिराच्या वेळी त्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. एक भगवे कपडे घातलेली, थोडी दाढी असलेली व्यक्ती समोरून भरभर चालत येत होती. लोक त्या व्यक्तीच्या पटापट पाया पडत होते. पाया पडणे त्या व्यक्तीला आवडत नसल्याचे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत होते. मी बाजूच्याला विचारले- कोण हे? तो म्हणाला- स्वामी असीमानंद! त्याच्या चेहऱ्यावर "असीमानंद को नही जानता?' असे भाव होते. मला खूप आनंद झाला. परंतु, त्यांचे भाषण ऐकून त्यांची जी प्रतिमा मी मनात तयार केली होती, त्याला छेद देणारे हे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या भोवती सतत लोकांचा गराडा राहायचा.
गुजरातमध्ये डांग जिल्ह्यात शबरीकुंभ आयोजित करण्याची तयारी सुरू झाल्यावर प्रसिद्धिमाध्यमांमधून त्यांच्याबद्दल उलटसुटल खूप काही येत गेले. शबरीकुंभावर होणारी सेक्युलर टीका संपूर्णपणे असीमानंदांवरच एकवटली आहे की काय, असे वाटायचे. एवढे काय या माणसाने केले, असे वाटायचे.
शबरीकुंभाचे वार्तांकन करण्यासाठी गुजरातमधील डांग जिल्ह्यात जाण्याचा योग आला. त्यावेळी मात्र असीमानंद म्हणजे काय चीज आहे, याची पुरती कल्पना आली. त्यांच्याबद्दलची खूप माहिती गोळा होत गेली आणि या व्यक्तीविषयीचा आधीच असलेला आदर द्विगुणित होत गेला.
गुजरातचा डांग जिल्हा हा सर्वात लहान व सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. संपूर्ण जिल्हा सातपुडा पर्वतरांगांनी व्यापलेला आहे. सातपुडा पर्वतातून वाहणारी पूर्णा नदी नयनरम्य आहे. घनदाट जंगल, त्यात ठिकठिकाणी वसलेली वनवासी लोकांची खेडी, असे या जिल्ह्याचे सर्वसाधारण स्वरूप आहे. आहवा हे जिल्ह्याचे ठिकाण. आपल्याकडील एखाद्या तालुक्याएवढे. ही सर्व भौगोलिक परिस्थिती मिशनरींना काम करण्यास अत्यंत अनुकूल होती आणि त्याचा त्यांनी पुरेपूर लाभही घेतला. दुर्गम भागातही मिशनऱ्यांनी उभारलेली रुग्णालये, शाळा यांची संख्या डोळ्यांत भरणारी आहे.
असीमानंद हे एम. एस्सी. झालेले आहेत आणि हिंदू धर्माच्या प्रचारार्थ दीक्षा घेऊन संन्यास घेतलेले स्वामी आहेत. प्रथम त्यांनी आसाम भागात आपले कार्य सुरू केले. तिथे होणारे धर्मांतर त्यांना अस्वस्थ करीत होते. प्रलोभन दाखवून, बळजबरीने हिंदू मोठ्या संख्येने ख्रिश्चन होत होते. या धर्मांतराचे समर्थन करणारे सेक्युलर म्हणत असत की, वनवासी लोकांकडे हिंदू समाजाचे दुर्लक्ष होते. परंतु, मिशनरींनी तिथे दवाखाने उघडले, शाळा काढल्यात, त्यांना आधुनिक विकासाचे धडे दिलेत. तुम्ही काय केले? आणि म्हणून जर हे वनवासी ख्रिश्चन होत असतील तर काय बिघडले? सेक्युलरांचा हा प्रश्न असीमानंदांना अस्वस्थ करीत होता. या संपूर्ण परिस्थितीचे सम्यक चिंतन केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, जंगलात राहणाऱ्या हिंदूंना शिक्षण दिले नाही, आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्या नाहीत म्हणून जर ते सहजपणे, स्वखुशीने ख्रिश्चन होत असतील तर, मग मुसलमान का नाही ख्रिश्चन होत? त्यांच्यातही या सर्व समस्या विद्यमान आहेत. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न स्वामीजींनी सुरू केला. आणि त्यांच्या लक्षात आले की, कितीही सुखसुविधा उभारल्या, विकासाच्या प्रवाहात या वनवासींना कितीही आणले तरी, त्यांचे धर्मांतर काही थांबणार नाही. हिंदू समाजात आपल्या धर्माबाबत कट्टरपणा नसल्याने हे सर्व काही होत आहे. ही कट्टरता मुसलमानांमध्ये असल्याने त्यांचे धर्मांतर होत नाही. कितीही नरकयातना भोगाव्या लागल्या तरी कुठलाही मुसलमान ख्रिश्चन होत नाही आणि हिंदू मात्र "तुम्ही आम्हाला काय दिले' असा प्रश्न आपल्याच समाजाच्या तोंडावर फेकून मारतात. हे बंद झाले पाहिजे, असा ध्यास स्वामीजींनी घेतला. हिंदूंना आपल्या धर्माबाबत कट्टरता शिकविली की, तो कितीही अडचणीत असला तरी धर्म काही सोडणार नाही, असे एक गृहीतक स्वामी असीमानंद यांनी तयार केले. या गृहीतकाला त्यांना सिद्ध करायचे होते. त्यासाठी स्वामीजींनी डांग जिल्हा निवडला.
डांग जिल्ह्यात हिंदू समाजातर्फे कुठल्याही विकासाच्या योजना चालू न करता, तिथल्या वनवासींना आपल्या स्वधर्माबाबत कट्टरता शिकविण्याचे कार्य त्यांनी सुरू केले. अगदी एकटे, निर्भयपणे स्वामीजी या परिसरात विचरण करू लागले. लोकांशी संवाद साधू लागले. त्यांच्या सुखदु:खाशी समरस होऊ लागले. त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी यथाशक्ती सोडविण्याचा प्रयत्न करू लागले. तिथल्या लोकांचाही आता स्वामीजींवर विश्वास वाढू लागला. ते त्यांना आपल्यापैकीच एक मानू लागले. या परिसरात राहणाऱ्या विविध जमातींचे एकमेकांशी पटत जरी नसले, तरी त्या सर्वांची शबरीमातेवर विलक्षण श्रद्धा आहे, असे त्यांच्या लक्षात आले. त्या परिसरात शबरीमातेची एक टेकडी आहे आणि पंपा सरोवरही आहे, याची माहिती स्वामीजींना समजली आणि मग त्यांनी शबरीमातेचे मंदिर बांधण्याचे ठरविले.
स्वामी असीमानंदांनी तिथे शबरीमातेचे मंदिर उभारले आहे. तेथील स्थानिक लोकांची अशी भावना आहे की, शबरी ही मूळ तिथलीच आहे आणि प्रभू रामचंद्र वनवासात असताना तिथे आले होते. एका टेकडीवर तीन शिला आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, दोन शिलांवर राम व लक्ष्मण बसले होते आणि तिसऱ्या शिलेवर शबरीने बसून या दोघांची पूजा करून त्यांना बोरे खाऊ घातली होती. तिथे जत्रा देखील भरत असे.
हळूहळू या शबरीमातेच्या मंदिराची महती वाढू लागली. कानाकोपऱ्यातील वनवासी तिथे श्रद्धेने येत. पंपा सरोवरात स्नान करून नंतर मंदिरात शबरीमातेची पूजा वगैरे करीत. आपला धर्म श्रेष्ठ आहे आणि तो आपण कुठल्याही कारणास्तव सोडता कामा नये, अशी स्वामीजींची शिकवण लोकांना पटू लागली. आणि येथूनच संघर्षाला सुरवात झाली.
मिशनरी आणि कम्युनिस्टांचा विरोध ज्यांनी भोगला आहे, त्यांनाच तो किती भयंकर असतो हे माहीत असेल. मिशनरीजना धर्मांतरासाठी भोळे-भाबडे वनवासी मिळणे दुरापास्त होऊ लागले आणि मग तेव्हापासून सेक्युलरांनी स्वामी असीमानंदांविरुद्ध विषारी प्रचाराची आघाडी उघडली.
धर्मांतर करण्याची ख्रिश्चनांची पद्धत वनवासींच्या श्रद्धेवर आघात करणारी होती. ख्रिश्चनांच्या दहशतीपुढे हे बिचारे वनवासी हतबल होते. परंतु, त्यांना स्वामीजींच्या रूपाने एक भक्कम आधार मिळताच, त्यांची हतबलता समाप्त झाली आणि त्याची जागा मिशनरींवरील संतापाने घेतली. आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा, फसवणुकीचा बदला घेण्याचा ते निश्चय करू लागले. लहानसहान झोपड्यांवर लागलेले क्रूस त्यांना सलू लागले आणि एके दिवशी त्यांच्या संतापाचा स्फोट झाला. त्यांनी मिशनरींचे दडपण झुगारून दिले आणि पुन्हा हिंदू धर्मात परतण्याचे सत्र सुरू झाले.
इतक्या वर्षांची मेहनत आणि परदेशातून आलेला अमाप पैसा व्यर्थ गेल्याचे पाहून मिशनरींचा थयथयाट सुरू झाला. संपूर्ण भारतात डांग जिल्हा, तिथल्या कथित चर्चेसवर झालेले हल्ले आणि स्वामी असीमानंद यांचे नाव गाजू लागले.
शबरीकुंभाच्या वेळी स्वामीजींची मुद्दाम भेट घेतली. शबरी मातेच्या मंदिराशेजारीच असलेल्या एका साध्या खोलीत त्यांचा मुक्काम असतो. तसे ते तिथे फार कमी काळ असतात. सतत फिरतीवर असतात. परंतु, योगायोगाने ते नुकतेच दौऱ्याहून आले होते. सायंकालीन प्रार्थना झाल्यावर भेटीला आलेल्या भाविकांशी त्यांनी चर्चा केली. त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलले आणि नंतर आमच्याशी चर्चा केली.
विषय अर्थातच चर्चेवरील हल्ले व सेक्युलरांचा विषारी प्रचार हा होता. स्वामीजींबद्दल बाहेरच्या जगात इतका विषारी प्रचार सुरू असताना ते मात्र अत्यंत शांत होते. स्वामीजी म्हणाले, मी इथल्या लोकांना काहीही सांगितले नाही. हल्ले करा की करू नका, हे देखील सांगितले नाही. मी फक्त त्यांना आपल्या हिंदू धर्माचे महत्त्व आणि श्रेष्ठत्व पटवून दिले आणि आपला धर्म आपण सोडता कामा नये, हे सांगितले. आजही माझे हेच कार्य सुरू आहे. मी त्यांना कुठलेही आश्वासन देत नाही की प्रलोभन किंवा धाक दाखवीत नाही.
तुम्हाला भीती नाही वाटत का, या प्रश्नावर ते म्हणाले, ""कशाला आणि कुणाला भ्यायचे. सर्व काही त्या परमेश्वराच्या अधीन आहे. मला जे नियत कार्य सोपविण्यात आले आहे, ते मी करतो. त्यामुळे या परिसरात मी निर्भयपणे फिरत असतो. करायचीच झाली तर माझी काळजी तो जयन्नियंता करतो.'' स्वामीजींचे उत्तर थक्क करणारे होते. नंतर शबरीकुंभावर चर्चा झाली.
वनवासींमध्ये आत्मविश्वास निर्माण करून भारतातील संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी आहे, ही भावना प्रबळ व्हावी म्हणून शबरीकुंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसिद्ध प्रवचनकार मुरारीबापूंची रामकथा आम्ही या शबरी मंदिरात आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी प्रवचनातून ही संकल्पना मांडली. आम्ही फक्त त्याला मूर्त रूप दिले, एवढेच. स्वामीजींनी नम्रपणे सांगितले.
आपल्याकडे जे कुंभमेळे होतात त्यांची स्थाने बघितली तर ते उत्तर-दक्षिण होतात, असे लक्षात येईल. भारताचे थोडे बारकाईने निरीक्षण केले तर लक्षात येईल की, बहुतेक वनवासी भाग हा पूर्व-पश्चिम असा पसरला आहे. त्यामुळे शबरीकुंभ पूर्व-पश्चिम पट्ट्यात घेण्याचा मानस आहे. दर बारा वर्षांनी याच ठिकाणी कुंभमेळा आयोजित होणार आहे. सुरवातीला थोडे फार आयोजन करावे लागणार आहे. नंतर मात्र जनताच या मेळ्याचे आयोजन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोकांमध्ये धर्माबाबत कट्टरता निर्माण केली की, धर्मांतरण होणार नाही, या त्यांच्या गृहीतकाचे आता एका सिद्धांतामध्ये रूपांतर झाले आहे. भारतातील धर्मांतरण रोखण्याच्या कार्याला स्वामीजींनी आपल्या चिंतनातून आणि अथक प्रयत्नांतून एक नवी, आश्वासक आणि सिद्ध अशी दिशा दिली आहे. आधुनिक भारताच्या इतिहासात याचे फार मोठे स्थान राहणार आहे. एका अर्थाने स्वामी असीमानंद ऐतिहासिक पुरुष ठरणार आहेत. मिशनरींच्या डोळ्यांत स्वामीजी अजूनही का सलत असतात, याचे कारण सहजपणे समजता येणारे आहे. त्या दृष्टीने अजूनही स्वामीजींविरुद्ध सुरू असलेल्या विषारी प्रचाराकडे आपण बघितले पाहिजे. एवढ्यावरच न थांबता, या परिसराला नेहमी भेट दिली पाहिजे. इथल्या समाजाशी समरस होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शबरीमातेचे मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात खूप रमणीय असे आहे. पंपा सरोवर तर छाती दडपून जाईल, इतके निसर्गाच्या जवळ आहे. आपण हे सर्व बघितले पाहिजे. शबरी कुंभानिमित्त या भागात चांगले रस्ते झाले आहेत. त्यामुळे ती अडचण आता राहिली नाही. एवढे जरी आपण केले तरी, स्वामीजींच्या अविश्रांत मेहनतीला आपण कृतिरूप अभिवादन केले, असे होईल.
***
- श्रीनिवास वैद्य
नागपूर
No comments:
Post a Comment