Saturday, December 13, 2008

त्यांच्या देशाचा नेता


ज्या माणसाने अभूतपूर्व क्रांती घडवून आणली, अमेरिकच्या इतिहासातील पहिलीच असे जिचे वर्णन केले जाते, त्यातील विजयी उमेदवाराची स्तुती करताना आत्मविश्र्वास कायम राहू द्या। ओबामाने आपल्या प्रचार मोहिमेतील अनेक भाषणांत एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे कुटुंब व्यवस्थेचा.


अमेरिकेच्या अध्यक्षपदावर झालेल्या बराक ओबामा यांच्या निवडीचे महत्त्व अमेरिकन लोकशाही, मूल्ये यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे. अमेरिकेत आजवर 43 राष्ट्राध्यक्ष होऊन गेले. त्यांच्या राजवटी, त्यांची कृती याबद्दल आपण चर्चा करतो. अमेरिकेचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन, सामाजिक निर्णय आणि त्यामागच्या भावना यातून होईल. ओबामा यांची निवड आणि त्यांची व्हाईट हाऊसवर झेप म्हणजे कॅथॉलिक पोपच्या कालबाह्य अश्मावशेष यांना मार्टिन ल्युथर किंग यांनी दिलेल्या आव्हानांची परिणिती आहे, त्याला अभिवादन केले पाहिजे. अमेरिकेत गौरवर्णीयांनी आपल्याच कृष्णवर्णीय बांधवांवर वंश, कातडीचा रंग यावरून वागणूक देताना जी असंख्य पापे केली, ती या निवडीने धुऊन निघाली आहेत. हे अगदी अविश्र्वनीय आहे, जगात शतकानुशतके जे शोषित आणि दुय्यम राहिले, त्यांच्यासाठी ही नवी पहाट आहे; त्यामुळे आशा पल्लवित झाल्या.
मुबलक, प्रत्येकासाठी,
ब्राव्हो अमेरिका
ओबामा यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द, विजयानंतरचे त्यांचे वक्तव्य हे मोकळ्या, स्वच्छ हवेची मंद झुळुक आल्यासारखे होते. त्याची अनुभूती मला माझ्या घरात बसून आली. मला ते उद्‌धृत करावेसे वाटते, संपूर्ण ओळ न ओळ. ""सर्व काही शक्य आहे, असा अमेरिका देश आहे, याबद्दल आता कोणाच्या मनात शंका आहे का? आपल्या संस्थापकांनी पाहिलेली स्वप्ने आजच्या काळातही सुस्थितीत आहेत, याबद्दल आता कोणाच्या मनात शंका आहे का? लोकशाहीची शक्ती किती असते, याचे उत्तर म्हणजे आजची रात्र आहे.''
""या देशाने न पाहिलेल्या, पण शाळा आणि चर्चभोवती आखलेल्या रेषांनी हे उत्तर दिले आहे. ज्यांनी 3-4 तास वाट पाहिली, त्यांनी उत्तर दिले आहे. आपला आवाज ऐकला जातोय, काहीतरी वेगळे घडतेय, याची जाणीव त्यांना प्रथमच झाली.''
थोडेसे मागे जाऊयात. 28 ऑगस्टाला डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार म्हणून त्यांची निवड पक्की झाली तेव्हा ते म्हणाले होते, ""4 वर्षांपूर्वी मी येथेच उभा होतो. माझा पूर्वेतिहास सांगत होतो. केनियातील एक तरुण आणि कन्सास येथील एक तरुणी यांचे मिलन. ते संपन्न वा प्रसिध्दही नव्हते, पण अमेरिकेला जे हवे त्याचे स्वप्न पाहिले आणि त्यांचे स्वप्न त्यांचा मुलगा प्रत्यक्षात उतरवत आहे. देशापुढे असलेले ते नेहेमीसाठीचे ध्येय आहे. कठोर परिश्रम आणि त्याग यांतून आपल्यापैकी प्रत्येकजण या स्वप्नापर्यंत पोहोचू शकतो. आपल्या पुढच्या पिढ्यांनाही हेच स्वप्न पाहता यावे यासाठी आता आपण एक झालो पाहिजे, एक अमेरिकन कुटुंब बनलो पाहिजे. अमेरिका हा छोटे संकल्प सोडणारा देश राहिलेला नाही.''
सहज, साधे पण स्फूर्तिदायी !
हिलरी, बिल आणि शेवटी मॅकेन - या आपल्या प्रतिस्पर्ध्यांविषयी तो नेहेमी चांगलेच बोलला.
विजयानंतर त्याचा उन्माद न चढता भारदस्तपणे त्याचा स्वीकार, हे आपण अमेरिकेतच पाहतो. पराभव हा देखील कसा भारदस्तपणे मान्य करायचा असतो, हे मॅकेन यांच्या शेवटच्या भाषणातून दिसले, अतिशय महान होते ते सर्व काही.
ओबामाचे भाषण ऐकताना मी येथील वृत्तपत्रे पहात होतो. आसाम, काश्मीर, भयावह कुजका भाग, दिल्ली नावाचा भाग, जेथे लघुदृष्टीचे, कसलेही स्वप्न नसलेले लोक, त्यांची गर्दी. प्रत्यक्षात हे लोक म्हणजे पैसा कमवायला आलेले. पैसा देऊन सत्ता हस्तगत करण्यात चतुर असलेले, भारतासाठी त्यांच्याकडे कसलेच स्वप्न नाही. भारतीय वचन म्हणण्याजोगे कोणतेच वचन त्यांच्यापाशी नाही. ते आपल्यात हिंदू-मुस्लिम अशी दुही पाडतात. मग परदेशातून आपले बाप आणतात. आपल्याला शिक्षेची भीती घालतात. आपल्याला ग्रीन कार्ड मिळेल, या आशेने आपण शरण जातो, आप्त मारले गेलेले सहन करतो. आपला प्राचीन वारसा विद्रुप होताना आपण निमूटपणे बघतो.
ओबामाने नेमकी याविरुद्धची कृती केली. त्याने आपल्या परकेपणाच्या भावनेचे रूपांतर उत्साही स्वदेशीत केले. मातीची महती, तिचा वारसा अंगिकारून तो टिकवण्याचे जाहीर केले. अमेरिकेचे जे रंग आहेत, त्यातील एक तो झाला.
आत्तापर्यंत अमेरिकेचे जेवढे म्हणून राष्ट्राध्यक्ष झाले त्यातील सर्वात शक्तिमान, यशस्वी, लोकप्रिय अध्यक्ष ओबामा होईल, याबद्दल मला खात्री आहे. अमेरिका आणि अमेरिकन लोक यांच्यासाठी तो काय करतो, याकडे लक्ष ठेवावे लागेल. अमेरिकनांचे हितसंबंध जपणे-इतरांचे नाही-हे त्याचे प्रमुख काम असेल. आता भारतीय नेत्यांचे हे कर्तव्य ठरते की, ओबामाची एखादी कृती भारतीय हितसंबंधांना बाधक ठरत असेल, तर ती कृती निष्प्रभ करून टाकायची. काश्मीरच्या बाबतीत ओबामा काही अनिष्ट चाल खेळत असेल तर ती वेळीच उद्‌ध्वस्त करायची. जर आपल्या देशाचे नेते आपले देशहित परकीयांना विकत असतील तर तो दोष आपला, विकणाऱ्याचा असेल, विकत घेणाऱ्याचा नाही.
ज्या माणसाने अभूतपूर्व क्रांती घडवून आणली, अमेरिकच्या इतिहासातील पहिलीच असे जिचे वर्णन केले जाते, त्यातील विजयी उमेदवाराची स्तुती करताना आत्मविश्र्वास कायम राहू द्या. ओबामाने आपल्या प्रचार मोहिमेतील अनेक भाषणांत एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे कुटुंब व्यवस्थेचा.
युनियन बॅंकेच्या जाहिरातीत एक ओळ आहे, ""तुमची स्वप्ने तुमच्या एकट्याची नाहीत.'' ही ओळ माझ्या डोळ्यांत अश्रू आणते. माता-पिता-पत्नी-छोटी बहीण या सर्वांना सामावून घेणारे कुटुंब. या जाहिरातीचे कौतुक करण्याची संधी मी बऱ्याच दिवसांपासून शोधत होतो.
ओबामाने ही संधी मला मिळवून दिली. बॅंकेच्या जाहिरातीसाठी ज्याने ही ओळ लिहिली आणि ज्याने ती मान्य केली, त्यांचा जाहीर सत्कार व्हायला हवा! ""तुमची स्वप्ने तुमच्या एकट्याची नसतात.'' होय, अगदी खरे, पण अतिशय निर्दय आणि आत्मकेंद्रित झालो आहोत! ज्या मुलांना आपण जन्म दिला, त्या मुलांकडे पाहण्यास आपल्याला वेळ नाही आणि ज्यांनी आपल्याला जन्म दिला व जे आता वृद्ध झाले आहेत, त्या माता- पित्यांकेडेही पाहण्यास आपल्याला वेळ नाही. मात्र ते वृद्धाश्रमासाठी भरभरून देणग्या देतात. राखी हे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक राहिले नाही, तर "व्हॅलेंटाईन डे'ला शह म्हणून त्याकडे पाहिले जाते. आपले सणवार म्हणजे अत्यंत तिरस्करणीय, मागासलेला प्रकार, अशा नजरेने पाहिले जाते. आधुनिक जगात सण म्हणजे "आंधळी रूढी' समजली जाते. भारतातील सुखसंपन्न समाजाने स्वतःभोवती विणून घेतलेले हे जाळे आहे.
नात्यांच्या बाबतीत आपण दिवसेंदिवस निष्ठूर आणि संवेदनविरहीत होत आहोत. भारताला सतःच्या पायावर उभे राहून जगाला मार्गदर्शक ठरायचे असेल, तर आपली कुटुंबव्यवस्था आणि पर्यावरण यांचे काळजीपूर्वक जतन केले पाहिजे, परंतु आता आपण अशांकडून शिकायला लागलोत की, ज्यांनी पूर्वी या चुका केल्या आणि त्या दुरुस्तही केल्या.
ओबामा यांचे वर्तन आणि वक्तव्य हे प्रामाणिक आहे. तरीही त्यांचे पद आणि त्यांचा देश यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले. आपल्या आईविषयी त्यांनी व्यक्त केलेली श्रध्दा, आपल्या आजीबद्दल जागवलेल्या मधुर स्मृती, त्यांचा प्रामाणिकपणा, 106 वर्षांची एक मतदार, जिने तिच्या कातडीच्या रंगामुळे खूप पक्षपात, अन्याय सहन केला होता तो काळ. जेव्हा विमानेही नव्हती, त्या मतदार महिलेस त्यांनी न्याय आणि उज्वल भविष्याचे आश्र्वासन दिले. आपले सहकारी निवडण्याची त्यांची पद्धत अतिशय समाधान देणारी आहे. एक निश्र्वास टाकून आपण म्हणायचे की, असे आपल्या देशात का घडू शकत नाही?
आपण बिनमणक्याचे झालो आहोत! राष्ट्र ही संकल्पना मोडीत काढून राष्ट्रउभारणीस सहाय्यभूत ठरलेल्या मूल्यांवर आघात करीत आहोत. शिकलेल्या कथित विद्वानांना त्यात आनंद मिळतो. प्रामाणिक, निःपक्ष, समर्पित भावनेने काम करणाऱ्यांचे "तारकामंडळ' आपण पहा, ज्यांची निःसंशय एकनिष्ठा........ पुढचे शब्द आपणच घाला. ते सुचवण्याचा मी प्रयत्नही करणार नाही.
ओबामाच्या निवडीचा आपल्याला फायदा काय, असा विचार करणारे चूक करीत आहेत. अमेरिकेचे वर्चस्व मान्य करीत आहेत. ओबामाशी आपले नेते कसे वागणार, असा आपल्यापुढे प्रश्न पडायला हवा. कारण जॉर्ज बुशमुळे अमेरिकेचा अध्यक्ष म्हणजे "जगातील दादा' अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. आपले नेते पुन्हा या नेत्याबरोबर हस्तांदोलन करता यावे यासाठी जीव टाकणार का? मोनिका लेव्हेन्स्कीबरोबरची भानगड उजेडात आल्यावर बिल क्लिंटन भारतात आले होते तेव्हा सेंट्रल हॉलमध्ये त्याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी खासदारांत विशेषतः महिला खासदारांत चढाओढ लागली होती.
आपल्यापुढे दहशतवाद, काश्मीर, फसवून किंवा धाकाने धर्मांतर, ईशान्य भारतातील घुसखोरी असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उकल करताना आपली मतपेढी भक्कम होईल की मोडेल, याचा विचार न करता केवळ राष्ट्रहिताच्या भावनेतून विचार करणारे नेतृत्व हवे. यासाठी ओबामाला भेटायचे तर ओबामा होऊन भेटा, तरच तुम्हाला मानसन्मान मिळेल.
ओबामा याचे मधले नाव (हुसेन) जरा वेगळे आहे व त्यामुळे अनेकांचा भृकुटीभंग होतो. इतकेच नव्हे तर त्याचे ओबामा हे नाव संगणकाने अनेकदा चुकून ओसामा (बिन लादेन) असे केले. नंतर ते दुरुस्त करावे लागले. असे असूनही अमेरिकेने त्याच्या निष्ठेबद्दल शंका घेतली नाही, त्याच्या प्रामाणिकपणावर विश्र्वास ठेवला.
ओबामा यांना शुभेच्छा व्यक्त करताना त्यांच्यासारखा खराखुरा नेता आपल्यालाही लाभावा, अशी आपण प्रार्थना करूया। अनेक गैरप्रकार करून निर्वाचित झालेले अनेक नेते आपल्याकडे आहेत, पण आता ओबामासारख्या खऱ्याखुऱ्या लोकप्रिय नेत्याची आपल्याला आवश्यकता आहे.


- तरुण विजय
नवी दिल्ली
अनुवाद - अरुण रामतीर्थकर
**

No comments: