कुटुंबाची उभारणीच पायाशुद्ध कल्पनांवर व्हावी. "पेरावे तसे उगवते!' हा निसर्गाचा नियमच आहे. स्वार्थ, द्रव्यतृष्णा, संयमशून्यता, भोगासक्ती यांची पेरणी केल्यावर सदाचार, सच्चारित्र्य, कृतज्ञता, त्याग, सेवा इत्यादी सद्गुणांचे पीक येणे कसे शक्य आहे? प्रेम न देता प्रेम मिळेल काय? योग्यवेळी हा विचार केला गेला आणि व्यवहाराला तसे वळण मिळाले, तरच घराचे घरपण टिकून राहील, अन्यथा अनेक घरांची दुर्दशा आपण पाहातोच आहोत.ं
संगमनेरचे माझे स्नेही श्री. ओंकारनाथजी मालपाणी आणि सांस्कृतिक क्षेत्रात धडाडीने काम करणारे दुसरे एक मित्र श्री. किशोरजी व्यास यांच्या आग्रहावरून काही वर्षांपूर्वी संगमनेरला गेलो होतो. तिथे मुलांसाठी सात दिवसांचा एक संस्कारवर्ग श्री. किशोरजींनी आयोजित केला होता. दोनदिवस या वर्गात बालगोपालांच्या सान्निध्यात होतो मी. तोही एक आनंदाचाच योग !
संस्कारवर्ग आता ठिकठिकाणी भरू लागले आहेत. संगमनेरला 38 गावांतील 200 मुले आली होती. दहा-बारा तरुण कार्यकर्ते स्वतःला विसरून या वर्गाचे सारे कार्यक्रम पार पाडीत होते, मुलांत मिसळत होते आणि चांगले जीवन कसे असावे, चांगल्या सवयी कोणत्या आणि त्याज्य काय, हे पदोपदी मुलांच्या निदर्शनाला आणून देत होते. सकाळी 5 वा. मुले उठण्यापूर्वी उठत होते, मुलांबरोबर प्रभातफेरीला जात होते, रस्त्याने निःसंकोचपणे मोठ्याने "मनाचे श्र्लोक' म्हणत होते, गाणी गात होते आणि खेळत होते किंवा छोट्या गटात मुलांशी गप्पागोष्टी करीत होते. कसे प्रसन्न वातावरण! सदाचारसंपन्न, ईश्र्वराभिमुख जीवनाचा वस्तुपाठच. "आमच्या येथील शिक्षकांनी आम्हाला जसे प्रेम दिले, तसे शाळेतील शिक्षकांकडून कधी मिळाले नाही!' हे एका 12 वर्षाच्या मुलाने काढलेले उद्गार.
पालक वर्गाचा चांगलाच ओढा दिसतो आहे, अशा संस्कार वर्गाकडे. आपल्या महाराष्ट्र प्रांतात शेकडो ठिकाणी कोणी ना कोणी कार्यकर्ते पुढाकार घेऊन मुलांना एकत्र करीत आहेत, आपल्या परंपरेतील सद्विचार त्यांच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न जिद्दीने करीत आहेत. मुलांशी जिव्हाळ्याने बोलत आहेत. श्रेष्ठ आदर्श त्यांच्या मनावर बिंबवीत आहेत. शरीर, मन आणि बुद्धी ही जीवनात काही साध्य करून घेण्याची प्रमुख साधने. व्यायामाने शरीर पुष्ट आणि निरोगी बनले पाहिजे. तास, अर्धा तास एका जागी मांडी घालून शांतपणे बसू न शकणारी कितीतरी मुले आपण पाहतो. मोठी माणसेही पाहतो. अगदी पुढारी देखील पाहतो. व्यासपीठावर बसले तरी सारखी चाळवाचाळव करतील. कधी खुशाल पाय पसरतील, तर कधी घडोघडी मांडी बदलतील, कधी लोडाला टेकून कुशी बदलत राहातील. शरीराला वळण नाही, कळ सोसण्याची सवय नाही! मनही अस्थिर. सारखे बाहेर धावणारे. स्थिरता, एकाग्रता नाही. बुद्धी देखील सरळ चालायची नाही. वक्रता, परनिंदा, आत्मप्रौढी यांची तिला चटक. म्हणून बालपणापासूनच शरीर-मन-बुद्धी यांना चांगले वळण लावण्याची गरज.
एक धक्कादायक अनुभव !
ही गरज पालकांना तीव्रपणे जाणवायला लागली आहे. अनेक पालक अगदी प्रांजळपणे ही वस्तुस्थिती मान्य करतात. त्यांच्या मनांत भीतीने, चिंतेने ठाण मांडले आहे. ते पाहतात वातावरणातील दूषितपणा, त्याचा झटकन् होणारा संसर्ग, त्यामुळे निर्माण होणारा संघर्ष, भलत्याच समस्या अन् म्हणतात, ""अहो, आमच्या मुलांवर संस्कार करा!'' पुण्यातील एक सत्पुरुष श्री दादा वासवानी यांनी नुकताच सांगितलेला अनुभव बोधप्रद आहे. एका ठिकाणी ते गेले होते. तिथे कुटुंबातला एक लहान मुलगा (वय वर्षे 4-5 असावे) खांद्याला बंदूक लटकावून उभा होता. बंदूक अर्थातच "लुटूपुटूची', हट्ट करून वडिलांकडून मिळवलेली. मग साधू वासवानी व तो बालक यात थोडी प्रश्नोत्तरे झाली.
वासवानीजींना विचारले, ""अरे, ही बंदूक कशासाठी लटकावली आहेस खांद्याला?''
मुलगा - ""वा, बंदूक घेऊन मी दरोडा घालायला निघालो आहे ना !''
""दरोडा?''
""हो, पैसे लुटणार आहे !''
""बंदूक कशाला हवी?''
""वा, कोणी मधे आल्यास त्याला शूट करीन मी!''
""हे कुठे शिकलास?''
मुलाने टी.व्ही.कडे बोट दाखविले.
कोणाचा कदाचित विश्र्वास बसणार नाही, पण वास्वानीजी म्हणाले, "" त्या मुलाची उत्तरे ऐकली व एक वेदना हृदयात निर्माण झाली. असे विपरित काहीतरी मुले ग्रहण करीत आहेत. प्रौढ माता-पित्यांना माझी विनंती आहे की, आपल्या मुलांची काळजी घ्या ! त्यांच्यावर तुमच्या केवळ कुटुंबाचेच सुख-समाधान अवलंबून नाही, तर आपल्या देशाचे भवितव्यही अवलंबून आहे.''
समस्याच समस्या
कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य पूज्यपाद श्री जयेन्द्रस्वामी यांच्या सत्कारानिमित्त भरलेल्या सभेत वास्वानीजींना हा अनुभव सांगितला आणि तिथेच पालकांना कळविण्यात आले की, पू. स्वामीजी स्वतः रोज दुपारी एक तास मुलांच्या सहवासात घालविणार आहेत. सतत सहा दिवस ते मुलांशी बोलतील, त्यांना गोष्टी सांगतील. काही आवश्यक पाठांतर करवून घेतील. सद्भावनांचे मुलांत बीजारोपण करतील. मला नंतर असे कळले की, सुमारे 200 मुले-मुली आणि अनेक प्रौढ पालक देखील या उपक्रमासाठी रोज जमत असत, सत्संगाचा आनंद लुटीत असत. मुलांच्या मनाला अशा आनंदाची गोडी लावली तर लागू शकते. चांगले काही सांगितले, शिकविले आणि बोलणाराने अकृत्रिम जिव्हाळा दिला व त्याचे स्वतःचे जीवन निर्मळ आणि निःस्वार्थ असले, तर मुलांच्या मनावर अवश्य परिणाम होतो.
आज वांड मुलांची समस्या, कुमार्गाकडे वळलेल्या मुलांची समस्या, व्यसनांना बळी पडणाऱ्या तरुण मुलांची समस्या, शरीराचे व चंचल मनाचे चोचले पुरविण्यामागे लागलेल्या मुलांची समस्या, अशा अनेक समस्यांसंबंधी आपण ऐकतो. मोठ्या माणसांशी किंवा प्रापंचिकांशी बोलावे तर अशा समस्यांचा पाढाच ऐकावा लागतो. मुलींसाठी चांगला निर्व्यसनी मुलगा शोधणे ही समस्याच होऊन बसली आहे. कित्येक सत्प्रवृत्त मुलींना विवाहानंतर पतीचे "गुण' कळतात आणि बिचारीचे जीवन दुःसह होऊन जाते. संसाराची सगळी रम्य स्वप्ने उद्ध्वस्त होतात. नाईलाजाने परत पित्याकडे यावे लागते. चांगल्या कुटुंबात देखील असे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. आर्थिक सुबत्ता, मुलाची बड्या पगाराची नोकरी पाहून केवळ मुलगी देण्यातील धोके ध्यानात येऊ लागले आहेत.
पैशाच्या मर्यादा
हा एकप्रकारे भ्रमनिरास होत आहे, यात शंका नाही. एकेकाळी पैशाची गुर्मी असलेले व इतरांस तुच्छ लेखणारे अनेक महाभाग, नव्या पिढीकडून ठोकर बसल्यानंतर अगदी दीन आणि केविलवाणे होऊन गेलेले मी पाहिले आहेत. प्रपंच चांगला करायचा, मुलांची शिक्षणे करायची म्हणजे पैसा लागतोच हे निर्विवाद आहे, पण प्रत्येकवेळी पैशाचे जीवनातील जे स्थान आहे, त्याच्या मर्यादा कटाक्षाने ध्यानात असल्या तर पैसा उपद्रव निर्माण करीत नाही. उलट पैसा हेच सर्वस्व मानले व भरपूर पैसा मिळवून ऐषआरामात राहण्याची आकांक्षाच मुलांच्या मनात फुलविली, तर जीवनाचा सगळा तोल जातो, आज पुष्कळ प्रमाणात हे घडते आहे.
घरात समृद्धी आहे, ही भगवंताची कृपा आहे, असे मानणारे किती? आपल्याजवळ देवदयेने आहे, तर अडी-अडीचणीतील चार बांधवांना सहाय्य करूया, अशी बुद्धी असणारे किती? हाताशी पैसा आहे तर पाच- पन्नास रुपये "पॉकेट मनी' म्हणून मुलांच्या अंगावर फेकून हॉटेलिंग, सिनेमा यावर पैसा उधळण्याची चटक त्यांना लावणारे किती? गलेलट्ट पगारही पुरत नाही म्हणून कर्जबाजारी होत जाणारे किती? असे अनेक प्रश्न दृष्टीपुढे येतात. उत्तर हेच मिळते की, व्यक्तिगत आणि मर्यादित कुटुंबातील लोकांचे उथळ इंद्रियजन्य सुख यांचेच पैसा हे साधन बनते. त्या पैशाचीच आसक्ती जीवनव्यापी होते. यात खरे सुख, खरा आनंद आणि खरे समाधान यांची आपण आहुती देत आहोत, याचे भानच उरत नाही. असा हा "गृहस्थाश्रम' नव्हे, हे यथार्थाने घरही नव्हे. स्वैराचाराचे पोषण करणारे अड्डे असे फार तर त्यांना म्हणता येईल. अशा घरातील मुले चार दिवस संस्कार वर्गात पाठविण्यात आली तरी उपयोग काय होणार?
आत्मनिरीक्षण हवे
म्हणून मुलांचा व समाजाचा प्रश्न उत्तमप्रकारे सुटावयास हवा असेल, तर कुटुंबाची उभारणीच पायाशुद्ध कल्पनांवर व्हावी. "पेरावे तसे उगवते!' हा निसर्गाचा नियमच आहे. स्वार्थ, द्रव्यतृष्णा, संयमशून्यता, भोगासक्ती यांची पेरणी केल्यावर सदाचार, सच्चारित्र्य, कृतज्ञता, त्याग, सेवा इत्यादी सद्गुणांचे पीक येणे कसे शक्य आहे? प्रेम न देता प्रेम मिळेल काय? योग्यवेळी हा विचार केला गेला आणि व्यवहाराला तसे वळण मिळाले, तरच घराचे घरपण टिकून राहील, अन्यथा अनेक घरांची दुर्दशा आपण पाहातोच आहोत. मी वर भ्रमनिरास म्हटले ना, ते याच परिस्थितीला उद्देशून. खूप पालक पोळल्यासारखे झाले आहेत. काही तरी चुकले आहे, याची जाण त्यांच्याठायी निर्माण झाली आहे. म्हणून सध्या दिसणारी ही नवी ओढ. रोग जडलेला आहे, तो दुरुस्त करण्याचा आणि आरोग्य संपादण्याचा हा प्रयत्न, पण चार-आठ दिवसांच्या घराबाहेरील प्रयत्नांनी कितीसा कार्यभाग होणार?
मूळ तत्व हे आहे की, मुले शिकतात ती सहवासाने, प्रत्यक्ष उदाहरणाने, डोळ्यांनी पाहून!
याचे नुसते बौद्धिक आकलन नको आहे. आई, वडील, ज्येष्ठ मंडळी या सर्वांनी अतिशय दक्ष राहण्याचा हा विषय आहे. त्यांच्या आत्मनिरीक्षणासाठी कितीतरी प्रश्न ते स्वतःलाच विचारू शकतील. इष्टानिष्ट परिणामांची कल्पना करू शकतील. उदा. आई-वडिलांनी क्षुल्लक कारणास्तव एकमेकांशी भांडावे का? घरांची स्वच्छता, टापटीप याकडे दुर्लक्ष करावे का? पाहुणे येण्यापूर्वी अथवा येऊन गेल्यानंतर त्यांची निंदा करावी का? देव-धर्म यासंबंधी कुत्सितपणे बोलावे का? मुलाने किंवा मुलीने जर सत्कार्यासाठी चार पैसे मागितले तर त्यांचा हिरमोड करावा का? मुलाचे भलतेच लाड करावेत का? सकाळी आई- वडिलांनी उशीरापर्यंत झोपून राहावे का? मुलाच्या अभ्यासाचे दिवस असता त्याला अभ्यास करावयास सांगून आपण टी.व्ही.पुढे बसावे का? "स्टेटस्'- सामाजिक दर्जा व पैसा यांच्या अहंकाराने इतरांना तुच्छ लेखावे का? आज घराघरांतून जे घडताना प्रत्यक्ष दिसत आहे, त्याला अनुलक्षूनच आत्मनिरीक्षणासाठी हे काही प्रश्न सुचविले आहेत. ही यादी पुष्कळच लांबविता येईल, पण मुद्दा येवढाच की, अशा घरातून आई, वडील आणि मुले यांचे जे सहजीवन असते ते सुसंस्कारांना पोषक ठरत नाही. त्यात प्रेम, आस्था, आत्मीयता, सौहार्द यांचे रेशमी धागे गुंफलेले नसतात. परस्परसंबंधांना काही उदात्त आधारच नसतो.
ध्येय कोणते?
सुसंस्कारित जीवन हे असे छोट्या-मोठ्या गोष्टींतून घडत असते. मोठी गोष्ट म्हणजे विशिष्ट ध्येयाप्रेत नेणारे जीवन जगण्याची जिद्द निर्माण होणे. "नारायण' हे ते ध्येय. जगायचे ते "नराचा नारायण' व्हायचे या आकांक्षेने. शक्य तो "येणेचि जन्मे येणेचि काळे.' अन्यथा पुन्हा प्राप्त होणाऱ्या जन्मात नारायण व्हायचे असेल तर वाटेल तसे वागून चालत नाही. "नारायणी जेणे घडे अंतराय। हो का बाप माय त्यजावी ते ।।' हा पक्का निर्धार आवश्यक असतो. नारायणाच्या प्राप्तीत अंतराय येईल असे विचार नकोत, सवयी नकोत. प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीचा यात समावेश होतो. भगवंताला काय रुचते आणि रुचत नाही, याचा विवेक असतो. या विवेकाची सगळ्या विकारांवर मात असते. इंद्रियांचे विषय खूप हवेहवेसे वाटत असतील व बेचैनी निर्माण होत असेल तर खुशाल समजावे की, नारायणाशी जिथे अंतराय आहे, असे जीवन उभे होत आहे. विद्वत्तेचा अहंकार असेल, पैशाचा मद असेल, यशस्वी होणारांसंबंधी मत्सर असेल तर या विकारांच्या डोंगराआड नारायण राहून जाईल, तो दिसायचाच नाही, भेटायचाच नाही. प्रेम, तितीक्षा, करुणा, सेवातत्परता, निःस्वार्थता अशा एकेका सद्गुणाच्या विकासाबरोबर नारायण आपल्याला अधिकाधिक जवळ करीत असतो.
छोट्या-छोट्या गोष्टींतून या सद्गुणांचा संस्कार आपल्यावर होऊ शकतो. म्हणून या सद्गुणांना पोषक ठरणाऱ्या माणसांच्या सहवासात राहण्याचे महत्त्व, वाचन, श्रवण, चिंतन, दर्शन या सगळ्यांचे महत्त्व त्यांतून होणाऱ्या संस्कारासाठीच. मला ही जाण हवी की, माझ्या लिहिण्याने मी संस्कारित झालो पाहिजे. माझ्या जीवनातील मळ धुऊन निघाला पाहिजे व माझे मलाच प्रसन्न वाटले पाहिजे. पुष्कळ लोक सांगतात की, असे लिहा आणि तसे लिहा, पण विचार करावा लागतो की, त्या लिहिण्याचा आपल्यावर काय परिणाम होईल? जो केवळ इतरांना उपदेश करण्यासाठी किंवा रिझविण्यासाठी लिहितो-बोलतो त्याची बरोबरी मी बापडा काय करणार? तशी बरोबरी करण्याची माझी इच्छाही नाही, कारण गरज आहे संस्कारांची. समाजाच्या उभारणीचा भक्कम आधार सुसंस्कृत माणसांची नारायणाकडे वाटचाल करणाऱ्या हिंमतबहाद्दरांची घडण हाच असू शकतो.
संगमनेरला मला एक तरुण मित्राने विचारले, ""अशा संस्कार वर्गांचा आपल्या समाजावरील संकटांचा परिहार करण्यासाठी काय उपयोग आहे? तुम्ही तर मुलांत त्वेष आणि चीड निर्माण करीतच नाही. मुलांना कसे पेटविले पाहिजे!''
आपल्या प्राचीन समाजावर नव्याने कोसळणाऱ्या अनेकविध उघड आणि छुप्या संकटांचा प्रतिकार झालाच पाहिजे हे निर्विवाद, पण केवळ क्षणिक भावना भडकावून हे होईल काय? भावना उत्कट असाव्यात व ती उत्कटता हृदयात सदैव असावी, पण राष्ट्र विजयी करण्यासाठी दैनंदिन जगावे कसे, हे तर कळले पाहिजे ना? पुष्कळदा क्षोभ पचवून विजयासाठी सर्वांगीण सिद्धता करावी लागते. त्यासाठी मजबूत फळी उभारावी लागते. रोज झिजावे लागते. "सदा राष्ट्रकारणी झिजे देह ज्याचा' अशी माणसे सर्वत्र उभी व्हावी लागतात. मोह ठोकरण्याचे व निर्मळ राहण्याचे नैतिक बळ त्यांच्याठायी अखंड असावे लागते. संस्कार आणि अभ्यास यावाचून घडणारी ही गोष्ट नाही. ईश्वरभक्तीचा संस्कार व राष्ट्रभक्तीचा संस्कार यात आपण कुठेही विरोध मानलेला नाही. जे काय करावयाचे ते "देव मस्तकी धरूनच' करावयाचे आहे.
संस्कारांची व्याप्ती व त्यांचे मूलभूत महत्त्व ध्यानात घेऊनच घरात व घराबाहेर नव्या पिढीच्या घडणीचा जबरदस्त प्रयत्न आज संकटकाळी हवा आहे। कारण संकट चारित्र्यात्मक गुणांच्या अभावाचे, कॅरेक्टरचे आहे. जसे संकट तशीच उपाययोजना केली पाहिजे व ती टिकाऊ परंपरा निर्माण करणारी असली पाहिजे. "चार दिवस आमच्या मुलांवर चांगले संस्कार करा,' असे म्हणून भागणार नाही! ***
- चं.प. भिशीकर
917/8, गणेशवाडी, पुणे - 411004
No comments:
Post a Comment