Saturday, December 13, 2008

युद्धाय कृत निश्चय



आपल गुप्तचरं खातं इथेच कमी पडतं. मान्य आहे की, दहशतवाद्यांना ओळखणं फार कठीण असतं. परंतु प्रत्येक शहरात, ज्या वस्तीत दहशतवादी मुक्काम करू शकतात, त्या वस्त्यांवर गुप्तचर खात्याची विशेष नजर असावी. गुप्तचर खातं कसं असावं हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आहे. शिवाजी महाराजांच्या मोहिमांच्या यशात बहिर्जी नाईकच्या गुप्तचर खात्याचा मोठा वाटा होता. दुर्दैवाने काही दिवसांपासून आपलं गुप्तचर खातं, खरे दहशतवादी सोडून, साध्वी व लष्करी अधिकाऱ्यांच्या मागे लागलं होतं. यामागे राजकीय हेतू होते हे स्पष्टपणे समोर आलं. गठ्ठा मतांसाठी आपला कसा फायदा होईल, यामागे राजकीय पक्ष व यंत्रणा लागल्याने दहशतवाद्यांविषयी आपलं हेर खातं जरा नरम पडलं व त्याचाच फायदा 26/11 ला दहशतवाद्यांनी घेतला. त्यामुळे या हल्ल्यात जे नुकसान झालं आहे, त्याला पुढाऱ्यांचे राजकीय हेतूदेखील जबाबदार आहेत. नेत्यांनी राजकीय खेळी खेळाव्यात, पण ते जनतेच्या जिवावर नाही.
यावेळी दहशतवाद्यांनी पंचतारांकित हॉटेल्स व तेथील यात्रींना बंधक करण्याचे योजिले. याचसोबत नरिमन हाऊस निवडले, जिथे इस्रायलचे ज्यू राहतात. हॉटेल्समध्ये विदेशी लोक असतात. म्हणजे दहशतवादी हल्ल्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व देण्याची दहशतवाद्यांची योजना होती. दहशतवाद्यांचे इस्रायलशी हाडवैर आहे, हे आपण सर्व जाणतो. म्हणजे हा पूर्ण कट योजनाबद्ध आहे. आपल्या कारवाईला आंतरराष्ट्रीय महत्त्व देण्यासोबत, हॉटेल निवडण्यामागे दहशतवाद्यांचा खूप फायदा आहे. हॉटेल जर पंचतारांकित असेल तर ते खूप मोठं असेल. स्वाभाविकपणे त्यात खूप जास्त खोल्या असतील. त्या खोल्याही मोठ्या असतील. हॉटेल्समधील व्हरांडे लांबच्या लांब असतील व मध्ये मध्ये लपण्यासाठी बऱ्याच खोल्या. हॉटेल असल्यामुळे खाणे, टॉयलेट वगैरे सोय असतेच. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून दहशतवाद्यांनी पंचतारांकित हॉटेल व नरिमन हाऊसची निवड केली. येथे लोकांना बंधक केले. यानंतर जेव्हा महाराष्ट्र पोलिसांना कळले की, ही कारवाई आता भारतीय सेना, नौसेना, वायुसेना योग्य प्रकारे करतील, तेव्हा लष्कराला पाचारण करण्यात आले. ले. कर्नल पुरोहित प्रकरणातून भारतीय लष्कराबद्दल बऱ्याच वाहिन्यांनी अपप्रचार करून तोंडसुख घेतले होते. कारण, एटीएसने प्रसारमाध्यमांना त्याप्रमाणे बातम्या पुरविल्या होत्या. "कठीण समय येता भारतीय लष्कर कामास येते' याविषयी दुमत नाही. कमीत कमी 26/11च्या हल्ल्यानंतर तरी प्रसारमाध्यमांनी भारतीय सैन्यदलांचा मान राखावा.
मी स्वत: एक कमांडो आहे. त्यामुळे ओबेराय, ताज व नरिमन हाऊसवर जी कमांडो कारवाई चालू आहे, त्याची मला पूर्ण कल्पना आली आहे. हा लेख लिहीत असताना कोणत्याही क्षणी कमांडो कारवाई संपेल अशी स्थिती आहे. मला काही फोन आले की, आठ-दहा दहशतवाद्यांना पकडण्याकरिता सेनेच्या कमांडोजना इतका वेळ का लागत आहे? त्याचं असं आहे की, हॉटेलमधील सेनेची कारवाई पद्धतशीर असते. काही सैनिक हॉटेलच्या बाहेर, चारही बाजूने, आऊटर सर्कलमध्ये तैैनात असतात. मग पहिल्या मजल्यावर चढण्याकरता विविध मार्गाने दुसरे सैनिक जातात. हे सैनिक पहिल्या मजल्यावर प्रत्येक खोली तपासतात. या तपासातदेखील दोन सैनिक आत व दोन बाहेर असतात. पहिला मजला झाल्यावर त्या मजल्याचा ताबा घेतला जातो. याप्रमाणे प्रत्येक मजल्यावर कारवाई होते. ही कारवाई चालू असताना कमांडोज विविध मार्गाने भराभर पुढे जातात, जेथे दहशतवाद्यांनी लोकांना ओलीस ठेवले असते. नरिमन हाऊसमध्ये वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने कमांडोजना दोरीवरून इमारतीच्या गच्चीवर उतरविण्यात आले. याला "स्लिदरिंग' म्हणतात. वरती उतरलेले कमांडो वरून खाली कारवाई करतात. दोन्ही बाजूने कारवाई झाल्याने ऑपरेशन लवकर होण्याची शक्यता असते. भारतीय सेनेकरिता ही कारवाई अत्यंत कठीण आहे. कारण यात ज्या लोकांना ओलीस ठेवले आहे त्यांना इजा न पोचणे, हा सैनिकांचा उद्देश असतो. म्हणून फायरिंग करताना व इतर कारवाई करताना खूप संयम बाळगावा लागतो. ऑपरेशन ब्लू स्टारमध्येदेखील स्वर्णमंदिरात सेना जेव्हा आत घुसली, तेव्हा असाच संयम बाळगावा लागला. स्वत:चे जोडे बाहेर ठेवून सेना आत घुसली होती. जर कारवाई लवकर संपवणे हा उद्देश असता तर रणगाडे बोलावून हॉटेलवर फायर केला असता. अर्ध्या तासात इमारत कोसळली असती. परंतु, उशीर झाला तरी हरकत नाही, तेथील ओलीस असलेल्या नागरिकांची जीवहानी टाळण्याचा उद्देश असतो. भारतीय सेना, नौसेना व वायुसेनेने संयम राखून अद्वितीय शौर्याचं उदाहरण देत कारवाई केली. तपासात सारे काही उघड होईलच. सुरवातीच्या कारवाईत हेमंत करकरे, अशोक कामटे व विजय साळसकर या बहादूर पोलिस अधिकाऱ्यांनी आपले बलिदान दिले. पुढील दहशतवाद विरोधी कारवाईत यांचं बलिदान सर्वांना प्रेरणा देईल.
हॉटेलमधील कारवाईत दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या नागरिकांना ठार मारू नये, ही काळजी आपल्या कमांडोजना घ्यावी लागते. म्हणजे दहशतवाद्यांपर्यंत पोचण्याकरिता अत्यंत चुपचाप व सावधगिरीनं जावं लागतं. दहशतवाद्यांवर "सरप्राईज' हल्ला करणे हा उद्देश असतो. समजा दहशतवाद्यांना कळलं की, कमांडोज आता अगदी जवळ आले व आपल्याला मारणार, तर दहशतवादी ओलिसांवर ग्रेनेड फेकून त्यांना ठार करतील. म्हणून कमांडोजने दहशतवाद्यांपर्यंत चुपचाप जाऊन अचानक वार करायचा असतो. कमांडोजना ही पण काळजी घ्यावी लागते की, या ऑपरेशनमधून एकही दहशतवादी निसटता कामा नये. कारण दहशतवाद्यांकरिता निसटणे फार सोपे आहे. दहशतवादी आपले हत्यार टाकून, वेश पालटून ओलीस असलेला नागरिक म्हणून निसटू शकतो. अशा निसटण्याकरिता ते हॉटेलमध्ये बॉम्ब टाकून आग लावतात. लोक सैरावैरा पळू लागले की, त्यासोबत निसटणे सोपे जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाविरुद्ध लाल महाल येथे जी कारवाई केली, त्यात गोंधळ निर्माण केला व महालाची सर्व दारे आतून एकदम उघडली. मग या गोंधळात मोगल आत आले व मराठे बाहेर निसटले. म्हणून आपल्या कमांडोजना अत्यंत सावध राहावे लागते.
26/11 च्या कारवाईतील दहशतवादी पाकिस्तानातून आले आहेत, हे स्पष्ट आहे. आयएसआयच्या पाठिंब्यानेच या कारवाया सुरू आहेत. मी सैन्यात असताना लीडरशिपवर एकदा भाषण देत होतो. मी म्हटले की, सैन्यात "फीअरलेस लीडरशिप'ची आवश्यकता आहे. आज पंतप्रधानांनी स्पष्टपणे म्हटले पाहिजे की, या कारवाईत पाकिस्तानचा हात आहे. विनाकारण "विदेशी हात' म्हणून गोलमाल बोलण्यात अर्थ नाही. पाकिस्तानने भारतावर एक अघोषित युद्ध थोपलं आहे. आता सरकारने ठोस पावले उचलली पाहिजे. "पोटा' ताबडतोब लावला पाहिजे. अफजल गुरूला ताबडतोब फाशी दिली पाहिजे. यामुळे आपल्या देशाच्या स्पष्ट इराद्याचा दहशतवाद्यांना एक संदेश मिळेल. राजकीय नेत्यांनी व सरकारने आता हे जाणलं पाहिजे की, आतापर्यंतच्या दहशतवादी कृत्यांमध्ये जे निष्पाप बळी गेले आहेत त्याचे ते देखील भागीदार आहेत. सरकारने जर कणखर नीती अमलात आणली, तर दहशतवादी कृत्यावर आळा बसेल. गठ्ठामतांकडे लक्ष ठेवून सरकारची धोरणे स्वार्थी व नपुंसक आहेत. आता खूप झालं. राजकीय नेत्यांनी हे गांभीर्य ओळखलं पाहिजे. राजकीय खेळी खेळून जनतेची आपापसात धर्म, जातीपातीच्या नावाखाली भांडणे लावणे बंद केले पाहिजे. जर ते असे करत असतील तर जनतेने त्यांचा हा डाव समजला पाहिजे व निवडणुकीत त्यांना घरचा रस्ता दाखविला पाहिजे. अमेरिकेत 9/11 नंतर कोणतीही दहशतवादी घटना झाली नाही, कारण त्यांची दहशतवादाविरुद्धची भूमिका स्पष्ट आहे. तेथे लाड नाही. आपल्याकडील मिळमिळीत धोरण व गठ्ठामतांकरिता फाजील लाडांमुळे दहशतवाद्यांना कारवाई करणे सोपं जातं. भारतात तळ ठोकणे दहशतवाद्यांकरिता यामुळेच सोपे जाते. कडक कारवाईची सरकारने हिंमत दाखविली पाहिजे. नाही तर आपल्या सुरक्षा दलांच्या सैनिकांच्या बलिदानाला त्यांना उत्तर द्यावे लागेल. सरकारने व जनतेने आता कुंभकर्णी झोपेतून जागे झाले पाहिजे. जात, पात, पंथ विसरून सर्वांनी संघटित व्हावे व म्हटले पाहिजे- "आम्ही हिंदुस्थानी.' जर आपण आता खंबीरपणे लढा दिला नाही व सध्याचंच धोरण चालू ठेवलं तर सर्व जग आपली छी: थू: करेल व पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही. कारण आपण दहशतवाद्यांना त्यांच्या उद्देशांत मदत करीत आहोत. त्यांचं धोरण आहे- देशावर सत्ता मिळवणे व देशाला खिळखिळे करणे. म्हणून भारतमातेच्या सुपुत्रांनो, ""हिंदुस्थान्यांनो, युद्धाय कृत निश्चय:''
व्हीएसएम (निवृत्त)
वासुदेवलीला, 114, पांडे ले-आऊट,
खामला, नागपूर . दूरध्वनी क्रमांक : 0712- 2290109

No comments: